तुम्हाला ‘प्लांट ब्लाइंडनेस’ झालेला आहे का? म्हणजे प्राणी, पक्षी, वस्तू आणि वास्तू यांच्या तुलनेत वनस्पतींना कायम नजरअंदाज करण्याचा आंधळेपणा…!
पडघम - विज्ञाननामा
शुभांगी गबाले
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 03 April 2026
  • पडघम विज्ञाननामा प्लांट ब्लाइंडनेस PLANT BLINDNESS

आपण प्रवासात असतो… पायी अथवा वाहनात… रस्त्यालगतची झाडं सरकत असतात एकेक करत. नेहमीसारखीच. आपण मग्न आपल्याच तळ्याकाठी. कुठल्या कुठल्या पोकळीतून निर्माण झालेल्या. तर, नजरेसमोरून सरकत जाणारी झाडं आपण बघत असतो सवयीनं… ती विचारात क्वचितच उतरतात. बहुतेकदा नाहीच. मन, मेंदू सहसा आवर्जून त्यांची दखल घेत नाही. ती दिसत राहतात, पण आत पोहोचतातच असं नाही.

आसपासच्या हिरव्या जगाशी कसलाच संबंध नसल्यासारखं आपलं माणसांचं जग वावरत असतं. रोजच्या वाटेला लागून उभं असलेलं एखादं जुनंजाणतं झाड अचानक एके दिवशी तिथं नसतंच. त्या कापलेल्या बुंध्याकडे पाहून आपल्या आत खरंच किती हलतं? ते कुणी तोडलं, का तोडलं, या विचारांनी आपण अस्वस्थ होत नाही. त्याचं नाव, त्याचा बहराचा काळ, त्याच्या पानांच्या बदलत जाणाऱ्या छटा, यावर किती जणांनी भान हरपून विचार केला असेल, हा प्रश्न अलाहिदा! या मानवी व्यवहाराचा थेट धागा वनस्पती जगताविषयी असलेल्या अनास्थेशी जुळलेला आहे.

आजूबाजूला दिसत राहणाऱ्या झाडा-वेलींकडे सतत डोळेझाक करत राहण्याची आपली वृत्ती असते. त्यांचं असणं जसं गृहीत धरत राहायचं, तसंच त्यांचं नसणंही. ना पानांची सळसळ ऐकण्याची उत्सुकता, न त्यातल्या बदलत राहणाऱ्या रंग-पोताचं कौतुक. अशा प्रवृत्तीत दडलेल्या मानसिकतेची कारणं शोधण्याच्या हेतूनं काहीएक अभ्यास केला गेला. त्यातून हाती आली एक अनोखी संकल्पना- ‘प्लांट ब्लाइंडनेस’ म्हणजे ‘वनस्पती दृष्टीहीनता’ (आंधळेपणा!)

तुलनेनं आजच्या पिढीचं आपल्या भवतालाशी, तिथल्या झाडा-फुलांशी, एकूणच वनस्पतींशी असणारं जैविक नातं तुटत चाललं आहे. याबाबतची त्यांची असंवेदनशीलता कमालीची वाढत आहे, या विचारांनी अमेरिकेतल्या विद्यापीठांतले दोन वनस्पतीशास्त्रज्ञ अस्वस्थ होतात- एलिझाबेथ शुसलर आणि जेम्स वँडरसी. बहुसंख्य लोकांमध्ये वनस्पतींबद्दल हरवत चाललेल्या संवेदनांची मुळं त्यांना शोधावीशी वाटतात. कारण ती हळूहळू लुप्त होत चाललेल्या निसर्ग-पर्यावरणाशी जोडलेली आहेत. ‘प्लांट ब्लाइंडनेस’ ही संकल्पना हा अस्वस्थ सूर अधोरेखित करते.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

माणसाच्या जगण्या-वागण्यातून तो कसा कमी करता येईल, ही मुख्य आस्था. म्हणजे समोरची फॅन्सी गाडी चटकन लक्ष वेधून घेते, पण तिथं शेजारी असलेलं भलमोठं झाड मात्र लक्षात येत नाही. चित्रातला सुंदर पक्षी आधी दिसतो, तो ज्या झाडावर बसलाय त्याचा मात्र विचार होत नाही. छायाचित्रं पाहताक्षणी माणसांकडे लक्ष जातं, त्यांच्या मागे दिसणाऱ्या झाडांकडे नव्हे. कुठच्याही इमारतींचं भव्य, देखणं आर्किटेक्चर लागलीच नजरेत भरतं, पण आसपासची झाडंझुडपं क्वचित निरखली जातात.

हाच तो ‘प्लांट ब्लाइंडनेस’. प्राणी, पक्षी, वस्तू आणि वास्तू यांच्या तुलनेत वनस्पतींना कायम मागच्या सीटवर ढकलत राहण्याच्या किंवा नजरअंदाज करण्याच्या मानसिकतेतून पोसला जाणारा.

मुळात झाडं हलत-बोलत नाहीत. इकडून-तिकडे फिरत नाहीत. हिरवी घोंगडी पांघरून निपचित पडून राहिल्यासारखा त्यांचा एकूण आविर्भाव. माणूस याच्या अगदी उलट. दृश्य प्रलोभनांची भुरळ पडणारा. गतिमान, चमत्कारिक गोष्टींकडे आकृष्ट होणारा. सतत विचित्राच्या शोधात. म्हणूनच झाडाला अकाली वठवून तयार केलेलं बोन्साय नजरेत भरतं, महागडं शो-पीस म्हणून ड्रॉइंग रूममध्ये सजवलं जातं. तेच झाड बाहेर रस्त्यावर असताना लक्षातही येत नाही. हेच सेम प्लॅस्टिक किंवा कागदापासून तयार केलेल्या झाडा-वेलींबाबत. कोणत्याही गोष्टीचं शो-पीस करण्यात आपण तसे हुशारच. आर्ट असते ती आपली!

एरवी माळरानावर उभी एकटीच बाभळी कोण बघतं निरखून. चित्रात चितारलं की, तिला मूल्य चिकटतं. कौतुकानं पाहतो ते पेंटिंग आपण मग. दुष्काळ, दारिद्र्य अंगावर वागवणाऱ्या किडकिडीत मुलांचे कलात्मक नजरेने टिपलेली छायाचित्रं अथवा पेंटिंगजची प्रदर्शनं किती वाखाणली जातात! त्याच चित्रातलं पोर जेव्हा सिग्नलवर उभं असतं आशाळभूत डोळे घेऊन, तेव्हा ते फक्त दुर्लक्षाचंच धनी होतं. नजर चुकवून सटकतो आपण सवयीनं. मळकट, ओबडधोबड, अनपॉलिश्ड टाळतोच आपण. असंस्कृत, घाटी, अडाणी वगैरे वगैरे लेबलं लावून.

चकचकीत वर्ख चढलेल्या, रंगीन, पॉलिश्ड गोष्टी आपल्याला भुलवतात. सतत evolved होत राहणाऱ्या माणसाच्या जगात चामधाम अप्रूपाचा, पण झाडं कितीही evolved झाली, तरी मूळ सोडत नाहीत. जिथं उगवतात त्या मातीशी इमान राखून असतात. जागा, हवा बदलली तरी त्यांचा ना टोन बदलतो, ना रंगरूप… ना कुठचा दिखावा, ना कसले मुखवटे. रॉ, अस्सल, अकृत्रिम. लक्ष वेधून घेण्यासाठी ना चलाखी, ना रंगरंगोटी. झाडांच्या जगात मॅनिक्युअर, पेडीक्युअर नसतं. सुमना रॉय त्यांच्या ‘How I became a tree’मध्ये म्हणतात तसं.

यामुळे वनस्पती माणसाला आकृष्ट करून घेण्यात सहसा नापास होतात. त्यातच माणसाला एंगेजमेंट हवी असते. भावनिक, शा‍ब्दिक, निःशब्द. तिथं माणूस थांबून राहतो, रेंगाळतो. झाडांपाशी यातलं काही मिळत नाही. ती आपल्या दुनियेत मश्गुल. 

सोपं नाहीये त्यांची आतली दुनिया समजून घेणं. सान्निध्य जितकं अधिक तितकंच त्या गोष्टीचं कुतूहल कमी अन् जे सतत दूरवर, नजरेआड त्याबाबतही अनास्था अधिक, असं आपलं मानसशास्त्र सांगतं. ‘Out of sight out of mind’ हा साधा हिशेब. गाव-खेड्यातल्यांना निसर्गाची सोबत सतत म्हणून त्यांचं झाडा-फुलांबद्दलचं भान अधिक जागं हा खरं तर गैरसमज. फ्लॅटच्या खिडकीतून कसंबसं एखादं झाड बघणाऱ्या, निसर्गाची वाणवा सोसाव्या लागणाऱ्या शहरी मनांना सृष्टीचं अमाप कुतूहल असावं, हादेखील गैरसमजच. खरी फक्त बहुतेकांच्या दृष्टीत भरून राहिलेली झाडापानांबाबतची उदासीनता. मग ती वाढत्या गॅझेटसपायी असेल वा मनोरंजनाच्या मुबलक सुविधांमुळे…

आपली हीच उदासीनता निसर्गाची टेपेस्ट्री मुळातून बिघडवत चालली आहे.

बरं, ही निसर्गाची टेपेस्ट्री किती किती प्राचीन. करोडो वर्षं जुनी. पहिलवहिलं झाड निर्माण झालं, त्याला जवळपास चाळीसेक कोटी वर्षांचा काळ उलटून गेलाय. माणूस नावाच्या सजीवाचा  मागमूसही नसण्याचा तो काळ. आणि हा सगळा आदिम पसारा आपण विस्कटत निघालो आहोत. ‘विकास’ नावाच्या शब्दाखातर. जैवविविधतेची पाळंमुळं काँक्रिट खाली दडपून टाकत.

उत्क्रांतीच्या इतिहासातला पहिला अध्याय ‘सृष्टी-निर्माणा’वर लिहिला गेलाय हे पार पार विसरून… झाडं, वेली, फळं, फुलं ही कृत्रिम बिरुदं आपण तयार करण्याच्या केवढातरी काळ आधी. ऋतूंना कॅलेंडरमध्ये अडकवण्याची सोय तर त्याहून अलीकडची. झाडांच्या सावलीतून काँक्रिटच्या सावलीत आल्यानंतरची. जिथं आता उत्क्रांतीचे हे प्राचीन साक्षीदार अंग चोरून उभे असतात. अतिशय मोठी भूक असलेल्या ‘होमो सेपियन’ नावाच्या नवजात बालकाला निमूट जागा करून देतात.

यात निसर्ग उरतो केवळ ‘शो-पीस’ म्हणून… घरं, बागा, इमारतींच्या सजावटींत. आकर्षक दिसणारी झाडं-फुलं हा तिथल्या निवडीचा एकमेव निकष. मग ती झाडं स्थानिक की परकीय, पर्यावरणाला पोषक की मारक हे द्वंद्वच तिथं उमटत नाही. ‘परिसर सुशोभीकरण’ ही अक्षरं विकासकामांच्या गाभ्याशी. जिथं अडसर ठरणारी झाडं-झुडपं सहज बेदखल केली जातात. पूर्वापार रुजलेली त्यांची मुळं निर्विकारपणे उखडून टाकली जातात. त्यांच्यासोबत त्या जागेतला इतिहासही मिटवला जातो.

‘प्लांट ब्लाइंडनेस’मध्ये अंतर्भूत हिरव्या जगाच्या अनास्थेचे असे किती किती दाखले… जसं पालेभाजीबद्दलचं कुतूहल रेसिपीपर्यंत जाऊन संपतं. कोणत्या ऋतूचं कोणत्या भाजीशी, त्या त्या भाजीचं त्या त्या हवेशी, प्रदेशाशी नेमकं नातं काय इथपर्यंत आपल्या जाणिवा क्वचितच पोहोचतात.

म्हणजे रोज जेवणात असणारी मेथी किती आपली वाटते आपल्याला. पण ती भारतीय नाही, तर पूर्णतः फिरंगी. मेथीचं मूळ घराणं मध्यपूर्व आणि दक्षिण युरोपातल्या देशांशी जोडलेलं आहे. वृक्षांमध्येही हेच. जिथंतिथं आपल्या घरांवर, मंदिरांवर, दर्ग्यावर सावली धरणारी चिंच मूळ आफ्रिकन वंशातली. अन् भर उन्हाळ्यात फुलून येणारा गुलमोहरही आफ्रिकन मातीतलाच.

असं भारतात स्थलांतरित बनून आलेल्या अन् इथल्याच होऊन गेलेल्या कितीतरी वनस्पती.

हेच झाडा-पानांच्या आतल्या जगातही. म्हणजे पानं पिकली-सुकली की, गळून पडतात, इतकं साधं सूत्र पानगळीमागे नाही. देठावरून पानं अलगद सोडून देणं, हे Survival Mechanism असतं झाडांचं. उन्हाळी दिवसांतल्या पाण्याच्या कमतरतेशी केलेली समंजस हातमिळवणी. 

थंड वातावरणाच्या देशांमधून हिवाळ्यात सुरू होणारा पानांचा रंगीत सोहळा हीदेखील त्या हवेत तगून राहण्याकरता झाडांमध्ये असणारी एक मूलभूत संरचना… अंधार आणि गारठ्याशी झगडत राहण्यासाठीची. माणूस त्यात सौंदर्य शोधत फिरतो. वनस्पतींच्या जगात ती निव्वळ एक जैविक प्रक्रिया असते. त्या त्या ऋतूंत जगूनतगून राहण्याच्या धडपडीतून उमटलेली प्रतिक्रिया.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

खरं तर साक्षर आहोत म्हणून वनस्पतींची भाषा नीट कळेल हा आपला भ्रम. त्यांची भाषा अन् त्यातलं व्याकरण समजून घेण्याची कला हा खास अभ्यासाचा विषय. तो काहीसा सुरस करून शिकवायला आपल्या शाळांना उसंत नाही. आखीवरेखीव अभ्यासक्रमांतून सिलिकॉन व्हॅलीकडे नेणारे तथाकथित तल्लख मेंदू वेगानं तयार करण्याच्या स्पर्धेत वनस्पती-आख्यान कोण अन् कधी शिकवणार? ‘फोटो सीन्थेसिस अन पोलिनेशन’ इतकाच अर्थ मुलांच्या गाठीशी उरतो मग. शाळा संपता संपता.

मुळात वनस्पती आणि त्यांचा अभ्यास यांना कायम विज्ञानाच्या भिंगातून जोखत राहण्याची, शास्त्रीय चौकटीत तो विषय जखडून ठेवण्याची जी परंपरा शाळांमधून नकळत रुजवली गेलीय, त्यातूनच एक क्लिष्ट निरसता या विषयाभोवती निर्माण झाली असेल का? ‘प्लांट ब्लाइंडनेस’च्या तळाशी साचलेल्या कारणातलं एक सूत इथंही कदाचित गुंतलेलं आहे.

हेच बघा ना, या हिरव्या दुनियेत डोकवायच तर शास्त्राचा हात धरूनच त्यांची मुळं खणून बघावी लागतात. ‘ये हौसला कैसे झुके...’ म्हणत सावकाशीनं त्यांच्या मनात उतरावं लागतं. वेगाचा दिवाना असलेल्या माणसांत हा पेशन्स नसतो. मग ती समोर येणारा झाडोरा बाजूला सरकवत राहतात. झाडा-झुडपांच्या दुनियेत बरंच काही असतं. त्यांच्यातही संवाद चालतो, हितगुज चालतं. अभावाच्या काळात एकमेकांना ते अन्न पुरवत राहतात अन् धोक्याची चाहूल लागताच तशा सूचनाही परस्परांना पोहोचवतात. जगण्याची लढाई हरत चाललेल्या शेजाऱ्याला हरतऱ्हेची मदत करून तगवून ठेवतात. बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्याचं त्यांचं त्यांचं एक तंत्र असतं. त्यांच्याही जगात एक सामाजिक पर्यावरण असतं. हेच पर्यावरण सूझान सीमार्ड या कॅनेडियन वन-अभ्यासक व संशोधक असलेल्या बाई ‘फायडिंग द मदर ट्री’ या पुस्तकात मनापासून उलगडत नेतात. हाच धागा पकडून लिहिल गेलेलं ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ तर झाड आणि माणूस यांच्यामध्ये येणाऱ्या सगळ्या उभ्या आडव्या रेघा खोडायला बघतं.

सामान्यांच्या नजरेत एक हिरवी उत्सुकता निर्माण करण्यात ही पुस्तकं हातभार लावू शकतात.  हेच शहरांमधून सुरू असणाऱ्या ‘नेचर वॉक’ किंवा निसर्ग सहलींबद्दल म्हणता येतं. Ecological Society of Pune तसेच ‘भवताल’ यांसारख्या पर्यावरणात पथदर्शी काम करणाऱ्या काही संस्था अशा सहलीवजा उपक्रमांतून लोकांचं निसर्गभान जागं करत आहेत.     

निरनिराळ्या वाटांनी सुरू असलेला हा प्रयास ‘प्लांट ब्लाइंडनेस’ म्हणजे ‘वनस्पती दृष्टीहीनते’वर उत्तम उतारा ठरतोय अन् तो ठरत रहावा...  

.................................................................................................................................................................

लेखिका शुभांगी गबाले स्त्रीप्रश्न आणि पर्यावरण यांच्या अभ्यासक आहेत.

shubhangi.enw87@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Anup Badve

Sat , 04 April 2026

खूप छान लेख !


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......

बाबाबुवा, गुरू, साधू, संत या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी लोकांच्या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे शोषण केले आहे – विशेषत: स्त्रियांच्या

अनेक बाबाबुवांनी ‘आध्यात्मिक साधना’, ‘देवाची कृपा’ किंवा ‘उपचार’ यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते - अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे.......