अभिव्यक्ती : दक्षिणायन राष्ट्रीय परिषदेची फलश्रुती
पडघम - सांस्कृतिक
दत्ता नायक
  • दक्षिणायन अभियान
  • Fri , 21 April 2017
  • पडघम सांस्कृतिक दक्षिणायन अभियान Dakshinayan Abhiyan गणेश देवी Ganesh Devi मनोहर पर्रिकर Manohar Parrikar नसीम निकोलाय ताहेब Nassim Nicholas Taleb चार्ल्स कुरैया Charles Correa दत्ता नायक Datta Naik

गोव्यातल्या मडगाव शहरात नोव्हेंबर २०१६ मध्ये ‘अभिव्यक्ती : दक्षिणायन राष्ट्रीय परिषद’ पार पडली. देशभरातील ७५० प्रतिनिधींनी तीन दिवसांच्या या परिषदेत भाग घेतला. या प्रतिनिधींपैकी २२० प्रतिनिधी राष्ट्रीय व राज्य पातळीवरचे साहित्य किंवा कलाक्षेत्रातले पुरस्कारविजेते होते. शुक्रवारी मडगावच्या रवींद्र भवनापासून लोहिया मैदानापर्यंत संकल्पयात्रा, तदनंतर लोहिया मैदानावर जाहीर सभा, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, शनिवारी रवींद्र भवनातील तीन सभागृहांत वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद, कवी संमेलन, आनंद पटवर्धन यांची फिल्म, संभाजी भगत यांचे पोवाडे असा भरगच्च कार्यक्रम आणि रविवार दुपारपर्यंत परत विविध विषयांवर परिसंवाद व शेवटच्या सत्रात वेगवेगळे ठराव संमत करून परिषदेची सांगता- असे परिषदेचे साधारण स्वरूप होते.

परिषदेतल्या परिसंवादांत विषयांचे वैविध्य व वैचित्र्य होते. ‘विचारवंतांनी आपली भूमिका योग्य रीतीने वठवली आहे का?’, ‘काश्मीर : हिंसाचारापलीकडे उपाय’, ‘प्रचारमाध्यमे : स्वातंत्र्य आणि स्वैराचार’, ‘सर्व भाषा संवाद’, ‘सोशल मीडिया : जोडते का तोडते?’, ‘विकास आणि पर्यावरण यांमधले द्वैत’, ‘विज्ञान आणि संस्कृती यांमध्ये सुसंवाद कसा साधता येईल?’, ‘नेत्रदान, अवयवदान व देहदान’, ‘धर्मांधतेविरुद्ध संघर्ष’, ‘लोकवेद, चित्रकला, सिनेमा यांमधल्या अंधश्रद्धा आणि समाजप्रबोधन’ असे परिसंवादाचे विषय परिषदेत होते. प्रत्येक परिसंवादानंतर प्रश्‍नोत्तरासाठी पुरेसा वेळ होता. काही परिसंवादांनंतर श्रोत्यांना आपले विचार मांडायलाही संधी दिली जात होती.

दक्षिणायन परिषदेची फलश्रुती काय, याचा विचार करणे गरजेचे आहे. दक्षिणायन परिषदेचा गोव्याला नक्कीच फायदा झाला. देशभरात गोव्याची एक वेगळीच प्रतिकूल प्रतिमा रूढ होते आहे. गोवा हे केवळ मौजमजेचे स्थळ असा (अप)समज अन्य भारतीयांत पसरत आहे. ‘गोवा - 365 days on Holiday’ यासारखी पर्यटनाची जाहिरात करणारे गोवा सरकारही याला बरेचसे कारणीभूत आहे. गोव्याचा दृश्य अवतार म्हणजे गोव्याची ‘कार्निव्हल परेड’ असे अनेकांना वाटते. गोव्याचे नाव घेतले की, सगळ्यांना गोव्याची फेणी आठवते. ज्ञानपीठविजेत्या मराठी कादंबरीकाराने फार पूर्वी गोवा म्हणजे 3 पी अर्थात् Peg, Pig आणि Prostitute असे अनादरवाचक वर्णन केले होते. सगळ्या मराठी कादंबर्‍यांतून गोव्यातील भाविणीचे वर्णन आंबटशौकीनपणे केले गेले आहे.

हिप्नोटिस्टचा शोध लावणारे आबे फारिया, ज्या देशाने बुद्धिबळाचा शोध लावला आणि महाभारतासारखे श्रेष्ठ काव्य ज्या देशात लिहिले गेले त्या देशात मी जन्मलो-असे पोर्तुगीज पार्लमेंटमध्ये ठणकावून सांगणारे फ्रान्सिस लुईस गोम्स, स्वातंत्र्यसैनिक व विचारवंत त्रिस्ताव ब्रिगांझा ‘कुन्हा, मिनोझिस ब्रिगांझा’ कुन्हा, पद्मविभूषण आर्किटेक्ट चार्ल्स कुरैय्या, भारतरत्न लता मंगेशकर, व्यंग्यचित्रकार मारियो मिरांडा, संगीतकार अँथनी गोन्साल्विस, रेमो फर्नांडिस, भारतीय लष्कराचे प्रमुख सुनीत रॉड्रिग्ज, साहित्यकार बा. भ. बोरकर, शंकर रामाणी, मारिआ अरोरा कुतो, दामोदर मावजो, रवींद्र केळेकर, फॅशन डिझायनर वेंडल रॉड्रिग्ज, टेनिसपटू लिएंडर पेस, सौंदर्यललना रिटा फारिया, संगीतकार मोगूबाई कुर्डूकर, किशोरी आमोणकर, दीनानाथ मंगेशकर, आशा भोसले, चित्रकार लक्ष्मण पै, गायतोंडे, डिसुजा, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेलो, शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर आणि सगळ्यात शेवटी आचार्य धर्मानंद कोसंबी व दामोदर कोसंबी ही महापंडित पिता-पुत्रांची जोडगोळी... ही वैचारिक, साहित्यिक, कला, संगीत, शिल्प, चित्रकला, वास्तुशिल्प या विविध क्षेत्रांतील गोमंतपुत्राची आणि कन्यांची देदीप्यमान परंपरा विसरली जाते.

दक्षिणायन परिषदेचे आयोजन हे गोव्याची प्रतिकूल प्रतिमा पुसण्याचे पहिले पाऊल आहे, असे मी समजतो. दक्षिणायन परिषदेनंतर दैनिक ‘लोकसत्ते’च्या अग्रलेखात टीका झाली. त्यांचा रोख असा होता की- ही सर्व प्रागतिक मंडळी जमतात आणि प्रागतिक लोकांसमोरच प्रागतिक मते मांडतात, त्याचा काहीच उपयोग होत नाही. याचा प्रतिवाद करताना मी म्हणेन- दक्षिणायन संमेलनाने देशभरातील प्रागतिक कार्यकर्त्यांचे नेटवर्किंग केले. प्रागतिक कार्यकर्ते अनेक वेळा बेटासारखे कार्यरत असतात. या छोट्या-छोट्या बेटांमध्ये साकव (पूल) बांधणे आवश्यक असते. दक्षिणायन परिषदेची ती फार मोठी फलश्रुती आहे.

दुसरी गोष्टी अशी की- अनेक वेळा आपण आपल्या गावात एकाकीपणे काम करत असताना निराश होतो, वैफल्यग्रस्त होतो. दक्षिणायनसारख्या परिषदेत भाग घेतल्यावर आपल्यासारखेच असंख्य कार्यकर्ते देशभर विखुरलेले आहेत, हे पाहून आपला उत्साह-आपली ऊर्जा शतगुणित होते. समाजकार्य करण्याची आपली बॅटरी रिचार्ज होते. उत्साह, ऊर्जा ही अशी संसर्गजन्य असते!

तिसरी फलश्रुती म्हणजे, आपले बौद्धिक संचित वाढते. दक्षिणायन परिषद त्या दृष्टीने Intellectually Stimulating होती. या परिषदेत घरी नेण्यासारखे- Take Away- विचारधन खूप होते. याशिवाय वैचारिक पुस्तकांची विक्री, एकमेकांशी ओळख, अनौपचारिक चर्चा हे अनेक फायदे अशा परिषदांतून होतात.

गोव्याला या परिषदेचा दुसरा एक फायदा झाला. गोव्याच्या निवडणुका फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार होत्या. दक्षिणायन अभियान ही जरी अ-राजकीय संस्था असली, तरी तिचा लढा धर्मांधतेविरोधी आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मांध व जातीयवादी तत्त्वांवर पोसलेला राजकीय पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाला प्रत्येक राज्यात व केंद्रात सत्ताच्युत करणे, हे प्रागतिक चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आद्य कर्तव्य आहे, असे मी समजतो.

दक्षिणायन परिषदेमुळे- विशेषत: लोहिया मैदानावर झालेल्या दणकेबाज जाहीर सभेमुळे गोव्यात निवडणूकपूर्व एक प्रागतिक पार्श्‍वभूमी निर्माण झाली आणि प्रागतिक कार्यकर्त्यांत एक उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले.

दक्षिणायन परिषदेची दुसरी फलश्रुती ही की-राजकारणात जे तटस्थ लोक असतात किंवा जे गोंधळलेले असतात, त्यांना प्रागतिक विचारांकडे वळवण्यात आपल्याला मर्यादित का होईना, यश आले. प्रतिगामी शक्तीचा टार्गेट ग्रुप हाच असतो.

ट्रॅफिक लाईटमध्ये तीन लाईट्स असतात. लाल, नारिंगी आणि हिरवा. लाल म्हणजे- प्रतिगामी विचारांचे लोक असे आपण समजू. हिरवा म्हणजे- प्रागतिक विचारांचे लोक असे आपण गृहीत धरू. नारिंगी म्हणजे- हे मधले- ना प्रतिगामी, ना पुरोगामी असे तटस्थ लोक! हे दोन्हीपैकी कोठेही वळू शकतात. या लोकांना आपल्याकडे वळवणे हेच पुरोगामी चळवळीचे उद्दिष्ट असले पाहिजे. गोव्यातील दक्षिणायन परिषदेने मर्यादित प्रमाणात का होईना, ते साध्य केले.

इथे नसीम निकोलाय ताहेब या ख्यातनाम विचारवंताच्या एका सिद्धांताविषयी मला आपल्याला सांगायचे आहे. ताहेबाचा हा सिद्धांत आहे- Law of Assymetry. या सिद्धांतात ताहेब म्हणतात- जे लोक हलाल मटण खात नाहीत, ते लोक कधीच हलाल न केलेले मटण खाणार नाहीत. पण जे लोक हलाल न केलेले मटण खातात, त्यांना हलाल केलेले मटण खाण्यास काहीच संकोच वाटत नाही. ताहेबचा हा सिद्धांत आपण समाजकारणात वापरू. जे धर्मांध, जातीयवादी व प्रतिगामी लोक आहेत, ते कधीच पुरोगामी होणार नाहीत; पण जे धर्मांध, जातीयवादी व प्रतिगामी नाहीत (तटस्थ आहेत), ते मात्र पुरोगामी किंवा प्रतिगामी होऊ शकतील. त्यामुळे Law of Assymetry हा सिद्धांत लक्षात घेऊन समाजातील तटस्थ, मध्यमवर्गीय, बिगरमध्यमवर्गीय यांकडे पुरोगामी चळवळीने आपले लक्ष वळवणे आवश्यक आहे.

श्रीमंत, गरीब व मध्यमवर्गीय असे तीनच वर्ग समाजात आहेत, असे अर्थशास्त्रज्ञ पूर्वी मानत. आता समाजात चौथा वर्ग आहे, असे अर्थशास्त्रज्ञ मानतात. त्याचे NRNPNMC म्हणजे- Not Rich, Not Poor, Not Middle Class अर्थात् श्रीमंत नाही, गरीब नाही आणि मध्यमवर्गीयही नाही असा वर्ग- असे नामकरण केले आहे. पुढे दिलेल्या आकृतीतून त्याचे स्पष्टीकरण होईल

पूर्वी-

श्रीमंत

मध्यमवर्ग

गरीब

आता-

श्रीमंत

मध्यमवर्ग

श्रीमंत नाही, गरीब नाही, मध्यमवर्गीय नाही

गरीब

पुरोगामी चळवळीच्या दृष्टीने हा नवा वर्ग अतिशय महत्त्वाचा आहे, असे मला वाटते.

दक्षिणायन परिषदेच्या निमित्ताने पुरोगामी चळवळीसंदर्भात आणखी एक मुद्दा मला अधोरेखित करायचा आहे. दक्षिणायन परिषदेच्या एक-दोन आठवडे आधी मी गोव्याच्या स्थानिक दैनिकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खरमरीत टीका करणारा लेख लिहिला. त्याचा प्रतिवाद करायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणताही कार्यकर्ता वा नेता पुढे सरसावला नाही. त्यानंतर माझ्या ओळखीच्या एका कार्यकर्त्याला मी यासंबंधी विचारले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘संघाच्या कार्यपद्धतीत आमच्यावरील टीकेवर प्रत्युत्तर करण्यात आम्ही वेळ घालवत नाही.’’ या गोष्टीवर मग मी बराच विचार केला. त्यानंतर माझ्या लक्षात आले- प्रतिगामी चळवळीतील लोकांची एवढी मेंदूधुलाई झालेली असते की, हे लाल दिवे कधीही हिरवे होणार नसतात. त्यामुळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते प्रतिगामी चळवळीतील संघटनांवर टीका करून आपल्या शक्तीचा व वेळेचा अपव्यय करत असतात. त्यापेक्षा नारिंगी दिव्यांना हिरवे बनवण्यात आपली शक्ती व वेळ खर्च केला पाहिजे.

वैज्ञानिक सत्यांबद्दल हल्लीच एक सिद्धांत माझ्या वाचनात आला. Science progressess by series of funerals. ज्या समाजात ही वैज्ञानिक सत्ये मांडली जातात, त्या समाजातील बहुतांश लोक या सत्यांना आयुष्यभर विरोध करतात. या लोकांच्या मृत्यूनंतरच पुढील पिढी ही सत्ये स्वीकारते, हा ऐतिहासिक अनुभव आहे, असे हा सिद्धांत सुचवतो. हे लक्षात घेऊन प्रतिगामी शक्तीच्या भिंतीवर पुरोगामी लोकांनी आपली डोकी आपटणे थांबवले पाहिजे. कारण त्यामुळेच संघ परिवारातली मंडळी समाजातील तळागाळातील स्तरांत आपले विषारी व्हायरस पसरवण्याचे काम विचारपूर्वक व बिनबोभाट करत असतात.

दक्षिणायन परिषदेनंतर दक्षिणायन अभियानाने आपली संघटना बांधण्यासाठी प्रबोधन, संघटन, रचना, संघर्ष आणि सहिष्णुता ही पंचसूत्री वापरण्याची गरज आहे. प्रबोधनाच्या दृष्टीने डॉ. गणेश देवींनी एका अभिनव उपक्रमाचे सूतोवाच केले आहे. पाठ्यपुस्तकांतून फारसे काहीच मूल्यशिक्षण दिले जात नाही. सर्व भाषांतील पहिली ते बारावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचे पुनर्लेखन होणे आवश्यक आहे. नव्या पाठ्यपुस्तकांतून श्रममाहात्म्य, उद्योजकता, देहबोली, मानसशास्त्र, अर्थशास्त्र यांची तोंडओळख करून देऊन पर्यावरण, संवेदनशीलता, मुदिता, मैत्री, करुणा यांसारखी बौद्ध मूल्ये यांचे मूल्यशिक्षण देणे आवश्यक आहे. पाठ्यपुस्तकांत एकाही उद्योजकावर धडा असत नाही; मग विद्यार्थ्यांना उद्योजक व्हायचे उत्तेजन कसे मिळेल? सॅम माणेकशॉ, करीअप्पा यांसारख्या एकाही पराक्रमी लष्करी अधिकार्‍यावरील धडा एकाही पाठ्यपुस्तकात मी वाचलेला नाही.

विषयांतराचा दोष पत्करून इथे मला एक गोष्ट नमूद केली पाहिजे. भारताचे संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रिकर यांना मी काही महिन्यांपूर्वी पत्र लिहून एक योजना सादर केली. या योजनेला भारतीय भाषांतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांना सरहद्दीवर लष्करी छावणीत किंवा नेव्हल बेसवर, एअर फोर्सच्या बेसवर काही दिवस जवानांसमवेत राहण्याची व त्यांची मुलाखत घेण्याची आणि या अनुभवावर लेखन करण्याची परवानगी द्यावी. शक्य असल्यास गुप्ततेचे संकेत पाळून १९६२, १९६५, १९७१ व कारगिलचे युद्ध यांचे दस्तऐवज त्यांना अभ्यासायला मिळावेत. या लेखनातला काही भाग वेगवेगळ्या राज्यांतल्या पाठ्यपुस्तकांत समाविष्ट व्हावा, अशी ती योजना होती. आनंदाची गोष्ट ही की, काही अटींसह संरक्षण मंत्रालयाने माझी योजना मान्य केलेली आहे.

आता मूळ मुद्द्यावर येताना सांगायचे म्हणजे, पाठ्यपुस्तकांचे पुनर्लेखन करणे आपल्या हातात नाही. त्यामुळे देशातील दहा प्रमुख भाषांतील निवडक प्रागतिक साहित्याचे संपादन व संकलन करून संस्कारक्षम वयांतील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी दक्षिणायन अभियानातर्फे पुस्तके प्रकाशित करावीत, अशी डॉ.गणेश देवी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. आपल्याला शिक्षकांचेही प्रबोधन करावे लागेल. सर्व शिक्षकांविषयी आदर व्यक्त करून मोठ्या जबाबदारीने, माझ्या शाळा व्यवस्थापनाच्या गेल्या २५ वर्षांच्या अनुभवानंतर, मी असे विधान करतो की- ‘‘कोणताच विद्यार्थी ‘ढ’ नसतो, शिक्षक हे ‘ढ’ असतात.’’

प्रा. गणेश देवी यांच्यासह लेखक दत्ता नायक

प्रत्येक विद्यार्थी Multiple Intelligence-बहुविध बुद्धिमत्तेच्या नियमानुसार कोणत्या ना कोणत्या शाखेत हुशार असतो; पण शिक्षकांवरील ब्राह्मणी संस्कृतीच्या प्रभावामुळे प्रत्येक विद्यार्थी भाषेत व गणितात पारंगतच असला पाहिजे, असा प्रत्येक शिक्षकाचा अट्टहास असतो. भाषेत नापास होणार्‍या पण चित्रकलेत हुशार असणार्‍या विद्यार्थ्याचे वर्गात कौतुक होत नाही. गणितात कच्च्या असणार्‍या, पण फुटबॉलपटू असणार्‍याला शाळेत प्रोत्साहनच दिले जात नाही. प्रबोधनापाठोपाठ दक्षिणायन अभियानाला नेटवर्किंग करून, सोशल मीडियाचा उपयोग करून, तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होऊन संघटना बांधावी लागेल. या संघटनेला सहिष्णुतेच्या धाग्याने एकात्म करावे लागेल.

देशभरात संघर्षात्मक चळवळीत गुंतलेल्या किंवा रचनात्मक चळवळीत गुंतलेल्या संघटनांनी एक तर रचनात्मक कामांकडे किंवा संघर्षात्मक चळवळीकडे दुर्लक्ष केले आहे. संघर्ष आणि रचना ही संघटनेच्या रथाची दोन चाके आहेत- हाच महात्मा गांधींच्या यशस्वी सार्वजनिक जीवनाचा मूलमंत्र आहे, हे आपण ओळखले पाहिजे. संघर्षात्मक चळवळी या पर्यावरण मूलतत्त्ववादी- Environment Fundamentalist आणि सरसकट शहरीकरण, औद्योगिकीकरण, तथाकथित पाश्‍चात्त्यीकरणाविरोधी होणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे. एके काळी शेतीलाही त्या वेळच्या पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कुरणे आणि शेते Pastures and Agricultures हा संघर्ष ‘बायबल’मधल्या Kane आणि Able यांच्या कहाणीत आपल्याला पाहायला मिळतो.

नदीच्या काठावरची जंगले आणि मॅग्रोव्हज् तोडली नसती (महाभारतातील खांडववनाच्या कथा आठवा) तर पुरातन काळापासून आजपर्यंत नदीकाठी वसलेली कैरो, न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस, पणजी, पुणे... अशी शहरे वसलीच नसती. विख्यात गोमंतकीय वास्तुशिल्पी चार्ल्स कुरैया यांनी सांगितलेली एक दंतकथा इथे सांगण्याचा मोह मला आवरत नाही. हजारो वर्षांपूर्वी जगात सर्वत्र विपुल झाडे होती आणि माणसांची संख्या अत्यल्प होती. हळूहळू रोगराई, वणवे, पूर यांमुळे माणसांची लोकसंख्या कमी होत गेली. यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी झाले आणि ऑक्सिजनने ‘प्रदूषण’ वाढले. त्यामुळे झाडांमधल्या पर्यावरणवाल्यांनी ठरवले- आता आपण माणसांची ‘लागवड’ करू या. त्यामुळे झाडांनी माणसांची लागवड केली आणि ‘जाणीवपूर्वक’ त्याचे ‘संवर्धन’ केले. हळूहळू माणसांची लोकसंख्या वाढली. हवेतील ऑक्सिजनचे ‘प्रदूषण’ कमी झाले. झाडांना हवा तेवढा कार्बन डायऑक्साईड मिळू लागला. तात्पर्य- पर्यावरण आणि विकास या संकल्पनांकडे एकांगी टनेल व्हिजनमधून न पाहता अधिक परिपक्वतेने पाहण्याची गरज आहे.

समाजवाद मानणार्‍यांनी दारिद्र्य हे सगळ्यात मोठे प्रदूषण मानले पाहिजे आणि दारिद्र्यनिर्मूलनाला आद्यक‘म दिला पाहिजे. या संदर्भात गोव्यातील खाणींचे उदाहरण दिले पाहिजे. पाच वर्षांपूर्वी गोव्यातील अतिउत्साही खाणमालकांनी, सरकार व नोकरशहा यांच्या संगमनताने खाणीतून भरमसाट लोहखनिजाचे उत्खनन केले. गोव्यातून दर वर्षी २० दशलक्ष मेट्रिक टन लोहखनिजाची निर्यात होई, ती ५० दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली. डी.डी. (दामोदर) कोसंबी याला वाळवी मोह Termite greed  असा शब्द वापरतात. याची प्रतिक्रिया म्हणून पर्यावरणवाद्यांनी चळवळ उभी केली आणि गेली साडेचार वर्षे गोव्यातील सर्व खाणी बंदच आहेत, हजारो कामगार बेकार आहेत.

विकासाचा अतिरेक आणि पर्यावरण मूलतत्त्ववाद याची ही दोन टोके आहेत. ती दोन्ही आपल्याला टाळायची आहेत. समाजवादाच्या संकल्पनेकडेही आपल्याला वेगळ्या परिप्रेक्ष्यातून (Perspective) पाहावे लागेल. जग आता Post Capitalist Socialism भांडवलशाही उत्तर समाजवाद या अवस्थेत आहे. आज उद्योजक व्हायला जमीन, भांडवल, मानवी संसाधन या तिन्हींची गरज नाही. केवळ ज्ञानकेंद्रित उद्योजकतेच्या बळावर निम्न- मध्यमवर्गातले स्टीव्ह जॉब्ज, मार्क झुकेरबर्ग, बिल गेट्स हे तरुण अब्जाधीश झाले आहेत.

जागतिकीकरणाला सरसकट विरोध करणेही चुकीचे आहे. जागतिकीकरण म्हणजे- भांडवल, मानवी संसाधन (मनुष्यबळ) व ज्ञान यांचा एका देशातून कुठल्याही देशात होऊ शकणारा अव्याहत पुरवठा! तो आपण रोखू शकत नाही. शेवटी मानवी स्वातंत्र्य- त्यातही निवडस्वातंत्र्य Freedom to choose हे श्रेष्ठ मानवी मूल्य आपण मानतो की नाही, हा कळीचा मुद्दा आहे.

त्यामुळे आपल्या देशातील तरुणांना शिक्षणातून जागतिक स्पर्धेस तोंड देण्यास स्वयंसिद्ध करणे, त्यांना योग्य कौशल्यांनी प्रवीण करणे, त्यांना निर्णयस्वातंत्र्य देणे (Empower), त्यांना हवा तो उद्योग सुरू करायला भांडवल पुरवणे (Venture Capital), देशात बौद्धिकदृष्ट्या प्रोत्साहित करणारे (Intellectually Stimulating), सर्जनशील (Creative), कोणतीही बंधने न घालणारे, प्रगमनशील (Liberal)), पुढारलेले (Forword looking) वातावरण निर्माण करणे ही आजची गरज आहे.

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली हा भौगोलिक प्रदेश नाही, ती एक वैचारिक संकल्पना आहे. भारत आणि India यामधली भारताची मूल्यव्यवस्था सांभाळून आपल्याला जगात वावरताना नव्या India ची पुनर्स्थापना करायची आहे.

दक्षिणायन ही केवळ झुळूक आहे.

kdnaik@gmail.com

(साधना साप्ताहिकाच्या ‘दक्षिणायन अभियान विशेषांकातील लेख’ पूर्वपरवानगीसह साभार, २९ एप्रिल २०१७)

……………………………………………………………………………………………

Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Alka Gadgil

Fri , 21 April 2017

DN sir, apratim analysis, sambhrmavastha dur honyas madat zali