डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची ‘दौलतजादा’!
पडघम - साहित्यिक
राम जगताप
  • दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या मुंबई आवृत्तीमध्ये १५ एप्रिल २०१७ रोजी आलेली बातमी
  • Thu , 20 April 2017
  • पडघम साहित्यिक साहित्य संमेलन Sahitya Sammelan डी.वाय. पाटील विद्यापीठ D. Y. Patil University पी.डी.पाटील P.D. PatiL मंगेश पाडगावकर Mangesh Padgaonkar अमिताभ बच्चन Amitabh Bachchan मुकेश अंबानी Mukesh Ambani पिंपरी-चिंचवड Pimpri Chinchwad श्रीपाल सबनीस Shripal Sabnis

ही बातमी तुमच्या वाचनात बहुधा आली नसेल. कारण ती फक्त दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आली आहे. या दैनिकाच्या नाशिक आवृत्तीमध्ये १३ एप्रिल २०१७ रोजी आणि मुंबई आवृत्तीमध्ये १५ एप्रिल २०१७ रोजी ही बातमी आली आहे. बातमीचे शीर्षक आहे - ‘मराठीतील पहिला १० लाखांचा काव्यसंग्रह’. तिचे उपशीर्षक आहे - ‘प्रत्येक कवितेला चक्क १० हजार मानधन’. आधी थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ. २०१६मध्ये पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजक पद डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेने स्वीकारले होते. त्यामुळे या संस्थेचे कुलगुरू पी.डी.पाटील हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या ज्या धनाढ्य शिक्षणसंस्था आहेत, तशीच ही संस्था असल्याने या संस्थेने संमेलनाचे आयोजक पद स्वीकारल्यावर ते संमेलन जोरदार होणार याच नवल नव्हते. त्यानुसार ते झालेही. पी.डी. पाटलांनी संमेलन यशस्वी करण्यात कुठलीही कसर ठेवली नाही. श्रीपाल सबनीस यांच्यासारखा वाचाळ संमेलनाध्यक्षही त्यासाठी खपवून घेतला, पण संमेलन यशस्वी करून दाखवले.

संमेलन संपल्यावर आयोजक संस्थेचे काम संपते. मराठी साहित्याच्या प्रेमाचे तिचे प्रायोजित आयोजकत्वही संपते. पण डी.वाय.पाटील या संस्थेने आपण इतरांसारखे नाही हे दाखवून दिले. वर्षाच्या सुरुवातीला या संस्थेने तीन खंडातली साहित्य दैनंदिनी काढली. अतिशय देखण्या स्वरूपात काढलेली ही दैनंदिनी चर्चेचा विषय होईल, याची रितसर काळजी घेतली गेली. त्यामुळे प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावरून तिचा थोडाफार गाजावाजाही झाला. ही त्रिखंडी साहित्य दैनंदिनी महाराष्ट्रातल्या निवडक साहित्यिकांना, साहित्यरसिकांना, पत्रकारांना भेट दिली गेली. तीही घरपोच. तो खर्चही याच संस्थेने केला. कुणी स्वत:हून प्रेमाने काही भेट पाठवली असेल तर त्याचा अव्हेर करणे भारतीय संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे अनेकांनी तित्याचा स्वीकार केला, प्रत्यक्षात त्या दैनंदिनीचा उपयोग होवो वा ना होवो. त्यात काहीही चुकीचे नव्हते, नाही. मृण्मयी रानडे या आमच्या पत्रकार मैत्रिणीने मात्र आपल्याला या दैनंदिनीचा काहीही उपयोग नाही, तेव्हा ज्याला ती हवी असेल, त्याने ती घेऊन जावी, अशी पोस्ट फेसबुकवर लिहून आपला ‘बाणा’ दाखवून दिला होता. पण असा ‘स्वतंत्र बाणा’ सगळ्यांकडेच नसतो. ज्यांच्याकडे असतो, त्यांना तो ऐनवेळी दाखवता येतोच असेही नाही. त्यामुळे बहुतेकांनी ही सप्रेम भेट स्वीकारण्यातच धन्यता मानली.

खरे तर डी.वाय.पाटील या संस्थेचे साहित्यप्रेम इथेच थांबायला हवे होते. पण नाही. कारण ते तात्कालिक नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या संस्थेने साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील काव्यप्रतिभेचा बहर लक्षात घेऊन तीन दिवस कवीकट्टा ठेवला होता. त्या तिन्ही दिवसांत नवोदित व इतर कवींनी १०२४ कविता सादर केल्या. महाराष्ट्रातल्या कवींना इतक्या मोठ्या प्रमाणावर साहित्य संमेलनात सामावून घेणे, हेच खरे तर थोर होते. त्याबद्दल या कवीसंमेलनाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हायला हवी होती. पण ती कुणाला करावीशी वाटली नाही. कारण हा उपक्रम केवळ रेकॉर्डसाठी राबवलेला नव्हता. त्यामुळे त्याची पर्वा आयोजक संस्थेने केली नाही. या संस्थेने आता नवा रेकॉर्ड केला आहे. त्यातून या संस्थेचे जाज्वल्य साहित्यप्रेम तर सिद्ध होतेच, पण त्यामुळे मराठी प्रकाशन व्यवसायातही न भूतो न भविष्यती असा रेकॉर्ड निर्माण झाला आहे.

या संस्थेने संमेलनात सादर झालेल्या १०२४ कवितांपैकी निवडक ८९ कवितांचा कविता संग्रहरूपाने प्रकाशित केल्या आहेत. एवढेच नव्हे तर यातील प्रत्येक कवीला त्याच्या कवितेसाठी दहा हजार रुपये इतके मानधनही दिले आहे. त्याची एकत्रित रक्कम होते, आठ लाख नव्वद लाख रुपये. शिवाय या संग्रहाची निर्मिती चांगली केली असल्याने त्याचा खर्चही एक लाखाहून अधिक आहे. त्यामुळे हा संग्रह दहा लाखांचा झाला आहे. मराठीमध्ये आजवर कुठल्याही कवितासंग्रहाचा एकंदर निर्मिती खर्च दहा लाख रुपये झालेला नाही. आता इतका खर्च केल्यावर त्याचा प्रकाशन समारंभ वगैरे व्हायला हवा की नको? तर म.टा.मधील बातमीनुसार तोही २८ फेब्रुवारी रोजी तत्कालीन संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस व स्वागताध्यक्ष पी.डी.पाटील यांच्या उपस्थितीत झाला. त्या समारंभात पाटलांनी प्रत्येक कवीच्या कवितेला दहा हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ‘पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मस्युटिकल सायन्स अँड रिसर्च’ यांच्याकडून हे चेक संबंधित कवींना रवानाही झाले आहेत.

मराठी साहित्येतिहासात आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत या घटनेचे काय मोल आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे, साहित्य संमेलनात सादर झालेल्या कवितांपैकी निवडक कवितांचा संग्रह आयोजक संस्थेनेच प्रकाशित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. यापूर्वी संमेलनात सादर झालेल्या सर्व कार्यक्रमांचे इतिवृत्त देणारे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अहमदनगरच्या साहित्य संमेलनाचे इतिवृत्त असलेला ग्रंथ हा त्यापैकी सर्वांत सुंदर म्हणावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे, संग्रहात समाविष्ट असलेल्या केवळ एका कवितेपोटी दहा हजार रुपये इतके मानधन दिले जाण्याचीही महाराष्ट्राच्या प्रकाशन व्यवहारातील पहिली वेळ आहे. एका कवितेला काय अख्ख्या कवितासंग्रहाचे मानधनही एकरकमी दहा हजार रुपये क्वचितच कुणा कवीच्या नशिबी आले असेल. महाराष्ट्रात असा एकच नशिबवान कवी होऊन गेला, ज्याच्या प्रत्येक कवितासंग्रहाचे मानधन दहा हजार वा त्यापेक्षा जास्तच मिळाले असेल, तो कवी म्हणजे मंगेश पाडगावकर. त्यांच्या जवळपास प्रत्येक कवितासंग्रहाच्या किमान दोन आणि कमाल तीस-चाळीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यामुळे केवळ त्यांनाच एका कवितासंग्रहाचे असे भरघोस मानधन मिळालेले असू शकते. पण तेही एकरकमी मिळाले असेल की नाही, याबाबत नक्की सांगता येणार नाही. पाडगावकरांइतका लोकप्रिय आणि मानधन घेणारा दुसरा कवी महाराष्ट्रात नसावा, असा आमचा समज होता. त्याला आता तडा गेला. पाडगावकरांपेक्षाही डी.वाय.पाटील पुरस्कृत कवी जास्त नशिबवान ठरले आहेत. कारण त्यांच्या एकाच कवितेला दहा हजार रुपये इतके मानधन दिले गेले आहे. एकाच कवितेला दहा हजार नाही, पण पाच हजार रुपये मानधन देण्याचा प्रघात एकेकाळी काही मराठी वर्तमानपत्रांमध्ये होता. अरुण टिकेकर लोकसत्ताचे संपादक असताना ते विंदा करंदीकर, कुसुमाग्रज यांच्यासारख्या ज्येष्ठ कवींच्या एका कवितेला पाच हजार रुपये इतके मानधन देत, अशी आठवण त्यांनी प्रस्तुत लेखकाला सांगितली होती. पण ही कविता खास दिवाळी अंकासाठी मागवलेली असायची आणि तीही मान्यवर कवीकडून.

काही लाखांमध्ये खप असलेल्या वर्तमानपत्राला असे मानधन परवडू शकते. नव्हे ते द्यायलाच हवे. पण प्रातिनिधिक कवितासंग्रहात कवितेचा समावेश झाला म्हणून दहा हजार रुपये इतके मानधन देणे सयुक्तिक ठरेल का? अगदी स्पष्टच सांगायचे तर अजिबात ठरणार नाही. त्याची काही कारणे आहेत. एक, प्रातिनिधिक कवितासंग्रहाची कधीही फारशी विक्री होत नाही (अपवाद - ‘आठवणीतल्या कविता’, भाग १ ते ४). दोन, त्यामुळेच असे कवितासंग्रह प्रकाशक फारसे प्रकाशितही करत नाहीत. तीन, कवितासंग्रह एकाच कवीच्या नावावर जातात, अनेक कवींच्या नावावर नाही. चार, मराठीतल्या कुठल्याही कवीचा कवितासंग्रह हा प्रकाशकाला फारसा फायदेशीर ठरत नाही. कारण त्या संग्रहाची एका मर्यादेबाहेर विक्री होत नाही.

त्यामुळे शुद्ध व्यावसायिक दृष्टिकोनातून डी.वाय.पाटील पुरस्कृत ८९ कवींच्या कवितासंग्रहाकडे पाहिले तर या संग्रहाच्या विक्रीतून त्याचा जो काही लाखभर रुपये फक्त निर्मिती खर्च आला, तोही निघण्याची शक्यता नव्हती. शिवाय डी.वाय.पाटील ही काही प्रकाशनसंस्था नाही. त्यामुळे या एकाच संग्रहाची महाराष्ट्रभर पसरलेल्या पुस्तकांच्या दुकानांतून विक्री करणे त्यांना शक्य नाही. त्यासाठी वितरणयंत्रणा, जाहिरात अशा अनेक गोष्टींचा जबाबदारी उचलावी लागली असती. समजा केवळ वितरण करण्याची जबाबदारी मराठीतल्या एखाद्या प्रकाशनसंस्थेला दिली असती तरी हा संग्रह कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात फारसा विकला गेला नसता. कारण कवितासंग्रहांची विक्री फारशी होत नाही. त्यामुळे अपेक्षेनुसार डी.वाय.पाटील संस्थेने हा संग्रह मराठी साहित्यिक, साहित्यप्रेमी, पत्रकार यांना उदार अंत:करणाने सप्रेम भेटच द्यावा लागणार. त्याची बहुधा त्यांना कल्पना असल्यानेच या संग्रहावर त्यांनी त्याचे विक्रीमूल्य दिलेले नाही.

आता काही कळीचे प्रश्न. ‘मराठीतील पहिला १० लाखांचा काव्यसंग्रह’, ‘प्रत्येक कवितेला चक्क १० हजार मानधन’ या महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेल्या बातमीचे शीर्षक व उपशीर्षक यातून काय सूचित होते? एक वेळ आपण हे समजून सोडून देऊ की, ही बातमी ज्या वार्ताहराने लिहिली त्याला प्रकाशनव्यवसायाची फारशी माहिती नसावी. ज्या पुस्तकाची निर्मिती व्यावसायिक कारणासाठीच केली जाते, ज्याच्या विक्रीतून त्याचा निर्मितीखर्च, लेखकाचे मानधन आणि प्रकाशकाची गुंतवणूक वसूल होते, त्याच पुस्तकाच्या विक्रमाची प्रकाशनव्यवसाय दखल घेतो. जी पुस्तकनिर्मिती केवळ हौसेखातर केली जाते, तिला व्यावसायिक नीतिमत्तेतून तयार झालेले निकष लावता येत नाहीत. कारण हौसेला मोल नसते.

प्रसिद्ध अमिताभ बच्चन यांनी आपले वडील, कवी हरिवंशराय बच्चन यांच्या निवडक कवितांचा एक संग्रह अतिशय उत्तम कागद, अतिशय उत्तम शाई, अतिशय उत्तम मांडणी करून छापून घेतला. वाट्टेल तेवढे पैसे खर्च केले. त्यामुळे त्या संग्रहाच्या एका प्रतीची किंमत लाखाच्या घरात होती. (चूकभूल द्यावी घ्यावी, कारण गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची असल्याने केवळ स्मरणावर विसंबून लिहीत आहे.) हरिवंशराय हिंदीतले मोठे कवी होते (आणि अमिताभ हिंदी चित्रपटसृष्टीतील जिवंत दंतकथा आहेत), पण म्हणून एक लाख रुपयांचा कवितासंग्रह कोण सहजासहजी विकत घेईल?

मुकेश अंबानीही यांनी आपल्या वडलांवरील एका पुस्तकाची निर्मिती अशीच महाखर्चिक केली होती. ही दोन्ही पुस्तके ‘सप्रेम भेट’ म्हणूनच द्यावी लागली. किंबहुना त्यासाठीच त्यांची निर्मिती केली गेली होती. डी.वाय.पाटील यांच्या कवितासंग्रहाचेही काहीसे असेच आहे. त्यांच्याही हौसेला मोल नाही आणि पैशाला कमी नाही. त्यामुळे ते प्रत्येक कवीच्या कवीला दहा हजारच काय दहा लाख रुपयेही देऊ शकले असते. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

बच्चन-अंबानी यांनी हौसेने प्रकाशित केलेली पुस्तके त्यांच्या स्टेटसला साजेशा व्यक्तीलाच भेट दिल्याची माहिती आहे. डी.वाय.पाटील या संस्थेच्या पी.डी. पाटीलांनी तसे काही जाहीर केलेले दिसत नाही. निदान तसे काही बातमीमध्ये तरी छापून आलेले नाही. पण म्हणून हा कवितासंग्रह काही महाराष्ट्रातल्या सर्व साहित्यिकांना वा कवींना वा साहित्यरसिकांना भेट दिला जाणार असेही दिसत नाही. तो निवडक लोकांनाच दिला जाणार. ते साहजिकच आहे.

या सगळ्याबाबत फार काही आक्षेप असायचे कारण नाही. डी.वाय.पाटील या संस्थेने कसा कवितासंग्रह छापावा, संबंधित कवींना त्यांच्या कवितेचा किती मोबदला द्यावा, त्या संग्रहाची विक्री करावी की, तो फुकटात वाटून टाकावा, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. मात्र या घटनेतून मराठी साहित्यात, प्रकाशनव्यवसायात काही विक्रम घडला असे कुणाचे मत असेल तर ते मात्र साफ चुकीचे आहे. या घटनेचा साहित्याशी, साहित्यप्रेमाशी काडीचाही संबंध नाही. याचा संबंध असलाच तर तो पैशाशी आहे.

कधीकाळी शरद पवारांनी ‘रमणा’ भरवून महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांना उपकृत केले होते. तेव्हापासून अनेक छोटे-मोठे राजकारणी, स्वयंघोषित पुढारी आणि काही साहित्यप्रेमी आपली आई, वडील, भाऊ, बहीण, असा कुणाच्या ना कुणाच्या नावे पुरस्कार सुरू करून दोन-चार हजारापासून लाखभर रुपयांपर्यंत पुरस्कारनामक खिरापत वाटत असतात. डी.वाय.पाटील यांचा कवितासंग्रहही त्या ‘रमण्या’चा किंवा ‘खिरापती’चाच नवा प्रकार आहे. फक्त त्यांनी तो जरा चाणाक्षपणे केला आहे. आता ज्या संग्रहाची व्यावसायिक पातळीवर विक्रीच केली जाणार नाही, त्यातील एका कवितेसाठी किती मोबदला द्यावा याला काही धरबंध नसतो. व्यावसायिक पद्धतीने त्याची निर्मिती केली असती तर संग्रहाच्या विक्रीमूल्याच्या दहा टक्के मानधन संबंधित ८९ कवींना विभागून द्यावे लागले असते. मराठीत कवितासंग्रहाला १० टक्केच मानधन दिले जाते, ते २०, २५ टक्केही देता आले असते डी.वाय.पाटील यांना. पण त्यांनी तो मार्ग निवडला नाही. शिवाय मानधनाच्या अपेक्षेबाबत त्यांनी संबंधित कवींकडे विचारणा केलेली नव्हती. त्यामुळे हा प्रकार ‘मानधन’, ‘मोबदला’ या प्रकारात बसत नसून तो ‘खिरापत’ याच प्रकारात बसतो.

अजून एक असा प्रश्न पडतो की, या संग्रहासाठी सर्वच म्हणजे, १०२४ कवितांच्या कविता का निवडल्या गेल्या नाहीत? ज्याची व्यावसायिक विक्री केली जाणार नाही, जो सप्रेम भेट म्हणून दिला जाणार आहे, त्यासाठी बहुधा सर्वच कवींनी आपली कविता विनामूल्यही दिली असती. मग केवळ ८९ कवींनाच ही दहा हजार रुपयांची खिरापत का? असो. रमणा किंवा खिरापत निवडक लोकांसाठीच असते. ते काही गावजेवण असत नाही. त्यामुळे ते साहजिकच म्हणावे लागेल. पण इथे एक प्रश्न पडतो की, एखादा नवा पुरस्कार सुरू करून काही निवडक कवींना पुरस्काराची खिरापत वाटली असती तर एका कार्यक्रमात सगळे झाले असते. त्यासाठी पुस्तक छापा, त्याचा प्रकाशनसमारंभ करा, कवींना घरपोच मानधन पाठवा, नंतर तो संग्रह कुणाकुणाला सप्रेम भेट म्हणून पाठवा, त्यांच्या नावांच्या-पत्त्यांच्या याद्या तयार करा, कुरिअरने त्यांना संग्रह पाठवा, शिवाय त्याच्या काही प्रती प्रसारमाध्यमांकडे, लिटररी एजंटाकडे पाठवून त्यावर अनुकूल अभिप्राय छापून येतील, हे पहा, इतका सगळा उपदव्याप करायची काय गरज होती?

महाराष्ट्रातले काही राजकारणी दौलतजादा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण ही दौलतजादा बाईप्रेमासाठी केली जाते. डी.वाय.पाटील या संस्थेचे प्रवर्तक दौलतजादाच करत असून ती मात्र साहित्यप्रेमासाठी करत आहेत, एवढाच काय तो यात फरक आहे! यातून मराठी साहित्याचे काहीही भले होणार नसून काही कवींच्या वाट्याला मिंधेपण मात्र नक्की येणार आहे!

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......