राजसाहेब, ‘खंबीर नेतृत्व’ काय असतं, ते लक्ष्मण राजगुरू या शाहिराने एका गाण्यात नोंदवून ठेवलंय. जमलं तर कधी ते पूर्ण गाणं ऐका…
पडघम - राज्यकारण
आनंद भंडारे
  • मनसेचे राज ठाकरे
  • Fri , 12 April 2024
  • पडघम राज्यकारण मनसे MNS राज ठाकरे Raj Thackeray

प्रिय राजसाहेब,

जय महाराष्ट्र!

‘गुढीपाडव्या’च्या दिवशी तुमचं शिवाजी पार्कावर भाषण चालू होतं, तेव्हा मी तिथून जवळच होतो. पण सव्वा नऊलाच लोक परत येताना दिसायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी निराशा होती. सभा एवढ्या लवकर संपली, याचं मला आश्चर्य वाटलं. घरी आल्यावर तुमचं भाषण पूर्ण ऐकलं. तेव्हा लोकांच्या लवकर परत येण्याचा आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या निराशेचं कारण कळलं. तुमच्या भाषणातही नेहमीचा ‘चार्म’ नव्हता!

तुम्ही ‘महायुती’ला पाठिंबा का देत आहात, हा तुमच्या भाषणाचा विषय. मात्र मोदीजींकडून तुमच्या खूप अपेक्षा आहेत, असंही तुम्ही म्हणालात. त्यामुळेच भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीला, केवळ मोदीजींच्या ‘खंबीर नेतृत्वा’साठी मनसे ‘बिनशर्त पाठिंबा’ देत असल्याचं तुम्ही जाहीरपणे सांगितलंत.

राममंदिर आणि ३७० कलम हटवणं, हे दोन निर्णय तुमच्यासह अनेक ‘मोदीभक्तां’ना मोदीजींच्या ‘खंबीर नेतृत्वा’चे निर्णय वाटतात. एनआरसीचा तुम्ही भाषणात उल्लेख केलात, पण ते अजून अमलात आलेलं नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल तूर्तास नको बोलूया. मात्र वर्षानुवर्षं भिजत पडलेले दोन प्रश्न मोदीजींनी निकाली काढले, त्यामुळे तुम्हाला मोदी हे ‘खंबीर नेतृत्व’ वाटतं, असं दिसतंय.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या पाच सदस्यीय खंडपीठाने राममंदिराचा मुद्दा निकाली काढला. कधी? तर गोगोई सरन्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त होणार त्याच्या आठ दिवस आधी! त्यानंतर सेवानिवृत्त होताच तीन महिन्यांत त्यांची राज्यसभेवर निवड झाली. हा योगायोगच म्हणायला हवा!

म्हणजे राममंदिरचा मुद्दा हा दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने, समेट घडवून किंवा मेरीटवर सोडवलेला नाहीय. तो भ्रष्ट मार्ग वापरून, लालूच दाखवून आणि राज्यसभेच्या ‘बक्षिसी’तून सोडवलेला आहे, असा अनेकांचा आक्षेप आहे. याला तुम्ही ‘खंबीर नेतृत्व’ म्हणता?

५ ऑगस्ट २०१९ रोजी ३७० कलम हटवलं गेलं. ते कसं हटवलं, ते सगळ्यांनी पाहिलं आहे. जम्मू-काश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांना नजरकैद करून, सुरक्षा बलाची कुमक वाढवून, कर्फ्यूसारखी परिस्थिती करून, इंटरनेट सेवा, शाळा, शैक्षणिक संस्था बंद करून अक्षरश: तो निर्णय जम्मू-काश्मीरवर लादला. त्या वेळी ते आवश्यक होतं, असं आपण मान्य करूया.

पण आता पाच वर्षांनी तिथली परिस्थिती काय आहे? खोऱ्यातला दहशतवाद आटोक्यात आला का? जम्मूतल्या पंडितांची घरवापसी झाली का? किती भारतीय नागरिकांनी तिथं जमिनी विकत घेतल्या? लडाखची सध्या काय अवस्था आहे? ३७० कलम हटवल्याबद्दल मोदीजींचं कौतुक करणाऱ्या सोनम वांगचूक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नुकतेच उपोषण का करावे लागले? ३७० कलम हटवल्याच्या श्रेयाबद्दल नेहमी बोललं जातं. पण त्याच्या परिणामांबद्दल कधी मोदीजी बोलल्याचं तुम्हाला आठवतं का?

तरी वादासाठी हे मान्य करू की, मोदीजींनी हे दोन धाडसी निर्णय घेतले. भले त्यामुळे सर्वसामान्य बहुसंख्य भारतीय नागरिकांच्या आयुष्यात विशेष काही फरक पडला नाही. आता मला मोदीजींचा कुठलाही तिसरा निर्णय सांगा, ज्याबद्दल तुम्हाला ते ‘खंबीर नेतृत्व’ वाटतं?

त्यांच्या हाती गेली दहा वर्षँ बहुमत असलेली सत्ता असताना बहुसंख्य भारतीय नागरिकांच्या आयुष्यात शिक्षण, महिलांची सुरक्षा, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, उद्योग, व्यवसाय, महागाई, बेकारी, आर्थिक दरी, यांबद्दल सकारात्मक फरक पडलेला आहे, असा त्यांचा तिसरा निर्णय तुम्हाला सांगता येईल का?

राजसाहेब, सर्जिकल स्ट्राईकबद्दल तुम्हाला मोदीजींचे अप्रूप वाटत असेल. पण त्यासाठी ४० जवानांना शहीद व्हावं लागलं, हे आपल्याला विसरून कसं चालेल? बरं, ते जवान पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत वा त्यांच्या स्वत:च्या चुकांमुळे शहीद झालेले नाहीत. हवाई मार्गाचा वापर केला नाही, तर जवानांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला होईल, याची स्पष्ट माहिती गुप्तहेर विभागाने तेव्हा दिली होती. तरीही त्यांना रस्त्यानेच जाऊ दिलं. अतिरेक तर तेव्हा झाला जेव्हा की, निवडणूक प्रचारात भारतीय लष्कराचे, शहीद जवानांचे नाव घेऊन मते मागू नयेत, असा स्पष्ट नियम असतानाही शहिदांच्या नावानं मोदीजींनी मतं मागितली.

अमेरिकेच्या सातव्या आरमाराला न जुमानता इंदिरा गांधींनी पश्चिम पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) वेगळा करण्यात मोलाची कामगिरी बजावली. पण त्याचा इंदिरा गांधींनी निवडणुकीचा मुद्दा केल्याचं आजवर मोदींजी किंवा त्यांच्या भाजपनेही म्हटलेलं नाही! ‘घर में घुस के मारा’ म्हणून ज्या ‘एअर स्ट्राईक’बद्दल मोदीजी स्वत:ची पाठ थोपटून घेतात, ते कधीही ३०० किलो आरडीएक्स आणि पुलवामा हत्येचा ‘मास्टरमाईंड’ याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. याला तुम्ही ‘खंबीर नेतृत्व’ म्हणता?

चीनमध्ये आयोजित आशियाई क्रिडा स्पर्धेत अरुणाचल प्रदेशच्या तीन खेळाडूंना चीनने व्हिसा नाकारला. त्याचं कारण सगळ्यांना माहीत आहे. त्याचा निषेध करत आपल्या केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी चीनचा दौरा रद्द केला. पण त्या तीन खेळाडूंना मोदी सरकार व्हिसा मिळवून देऊ शकली नाही, हे वास्तव आहे!

ही घटना नेहरूंच्या काळातील नाही, हे फक्त सहा महिन्यांपूर्वीच घडलंय. अरुणाचल प्रदेशची सध्याची अवस्था काय आहे, किती जमीन चीनने हडपलीय, कुठंवर घुसखोरी केलीय, याची स्पष्टीकरणं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी देतात, पण मोदीजींनी त्याबद्दल देशाला आजवर काही धडपणे सांगितल्याचं तुम्हाला आठवतं का? बाकी ‘वंदे भारत’ ट्रेनपासून देवळं, पूल आणि हायवे यांच्या उद्घाटनांसाठी मात्र मोदीजी हिरिरीनं पुढे असतात. चीनच्या घुसखोरीबाबत पंतप्रधान म्हणून अवाक्षरही काढायला धजावत नाहीत. याला तुम्ही ‘खंबीर नेतृत्व’ म्हणता?

जवळपास एक वर्ष देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमारेषेवर ऊन, वारा, पाऊस झेलत तळ ठोकून आंदोलन करत होते. सातशेहून अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला त्या आंदोलनात, पण शेतकरी तसूभरही मागे हटले नाहीत. शेवटी ते तीन काळे कायदे मागे घेत असल्याची जाहीर कबुली मोदीजींना संसदेत द्यावी लागली. पण आंदोलकांपासून हाकेच्या अंतरावर असूनही मोदीजी शेतकऱ्यांना सामोरे गेले नाहीत. उलट ‘खलिस्तानी’, ‘देशद्रोही’ अशी शेतकऱ्यांची बदनामी त्यांच्याच पक्षातले गणंग करत असताना मोदीजी नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्पले. ‘माझ्या जीवाला धोका आहे’ म्हणत त्यांनी अक्षरश: पळ काढला.

राजसाहेब, तुमच्या स्वप्नातला जीन्स-टी शर्ट घालून शेती करणारा शेतकरी कधी सत्यात येईल तेव्हा येईल, पण सध्या आहे त्या अवस्थेतील शेतकऱ्यांनाही सामोरे न जाणं, याला तुम्ही ‘खंबीर नेतृत्व’ म्हणता?

तीच गत महिला खेळाडूंची. रस्त्यावरून फरफटत नेलं त्या खेळाडूंना, हे जगाने पाहिलंय. स्वकष्टाने कमावलेले बूट काढून ठेवावे लागले त्या खेळाडूंना. पण त्या ब्रिजभूषणला साधं चारचौघांत फटकारता आलं नाही मोदीजींना. शेवटी जागतिक बॉक्सिंग समितीने दट्ट्या दिला, तेव्हा कुठे ब्रिजभूषणची समिती बरखास्त झाली. आपल्या देशाच्या ऑलिंम्पिक विजेत्या महिला खेळाडूंच्या मानहानी प्रकरणात देशाचा प्रमुख म्हणून काय भूमिका घेतली मोदीजींनी?

वर्ष झालं तरी मणीपूर जळतंच आहे. शेकडो नागरिक त्यात मेले, असंख्य स्त्री-पुरुष गायब झाले. उद्घाटनं हजारो नागरिक भीतीच्या छायेत आजही जगत आहेत. दोन मणीपुरी महिलांची नागव्याने धिंड काढण्याचं प्रकरण ४० दिवसांनंतर बाहेर आलं, तेव्हा कुठे देशाला तिथल्या परिस्थितीची थोडीफार कल्पना आली. तोवर मोदीजींचा ‘नवा भारत’ मस्त लोडाला टेकून माजघरात चॅनेल बदलत होता. मणीपूरच्या नागरिकांना भेटणं, दिलासा देणं तर सोडाच, तब्बल शंभर दिवसांनंतर चहूबाजूंनी टीका सुरू झाल्यावर मोदीजींनी धातूरमातूर प्रतिक्रिया दिली! तरीही तुम्ही त्यांना ‘खंबीर नेतृत्व’ म्हणता?

बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना तर मोदीजींच्या गुजरात सरकारने १५ ऑगस्ट रोजी तुरुंगातून बाहेर काढलं. त्यांच्या भाजपने त्या आरोपींना पेढे भरवून, हार घालून त्यांचा सत्कार केला! त्याबद्दल मोदीजी काही बोलल्याचं तुम्हाला आठवतं का? हाथरस, उन्नाव इथं झालेल्या मुलींवरील अमानुष बलात्कार प्रकरणांबद्दल मोदीजींनी साधा निषेध केल्याचं तुम्ही ऐकलं-वाचलं आहे का कुठे?

सोनिया गांधी यांना ‘बारगर्ल’, ‘काँग्रेस की विधवा’, ममता बॅनर्जी यांना विक्षिप्त आवाजात ‘दीदी ओ दीदी’ म्हणणं, रेणुका चौधरींना भर संसदेत ‘शूर्पणखा’ म्हणणं, सुनंदा पुष्कर यांना ‘पचास करोड की गर्लफ्रेंड’ म्हणणं, ही आहे मोदीजींची देशातल्या महिलांबद्दलची आदराची भावना!

देशातल्या महिलांबद्दल आदरानं बोलण्याऐवजी मोदीजींनी आणि त्यांच्या पक्षातील अनेक गणंगांनी महिलांची अनेकदा जाहीर हेटाळणी केली आहे! या देशाचा पंतप्रधानच जर महिलांबद्दल तुच्छतेनं बोलत असेल, तर त्यांच्या पक्षातील इतर गणंग बोलतात त्यात नवल नाही!

एखाद्या महिलेला राष्ट्रपदी पदावर बसवलं वा ‘शक्ती अभियान’ नावाचं अभियान सुरू केलं, म्हणजे महिलांचा सन्मान झाला, त्यांच्यावरील अत्याचार कमी झालेत असं होतं का? उलट मोदीजींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात महिला सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झालाय. तरीही मोदीजींना तुम्ही ‘खंबीर नेतृत्व’ म्हणता?

राजसाहेब, आपला देश हा सर्वाधिक तरुणांची संख्या असलेला देश आहे. पुढच्या दहा वर्षांत त्यांच्या रोजगारांबाबत मोदीजींकडून तुमच्या खूप अपेक्षा आहेत, असंही तुम्ही भाषणात म्हणालात. मात्र मागच्या दहा वर्षांत मोदीजींनी या तरुणांच्या रोजगाराबाबत नेमकं काय केलं, त्याबद्दल बोलायचं टाळलंत! दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या मिळतील, असं मोदीजी म्हणाले होते. आता त्याबद्दल ते काहीही बोलत नाहीत. तरी बरं ‘तो निवडणुकीचा जुमला होता’, असं अमित शहा अजून तरी म्हणालेले नाहीत!

आकडेवारी बाजूला ठेवा. आयआयटी आणि आयआयएममधील विद्यार्थ्यांनाही नोकरी मिळेना, ही परवाचीच बातमी आहे. चतुर्थ श्रेणी पदावरील नोकरीसाठी, हवालदार पदाच्या जागेसाठीही पीएच.डी. केलेले तरुण अर्ज करत आहेत, ही सध्याची तरुणांची अवस्था आहे.

महाराष्ट्रात तर शिकलेल्या तरुणांना नोकऱ्या नाहीत म्हणून लग्न होईनात, अशांची जिल्हानिहाय आकडेवारीच प्रसिद्ध झालीय. त्यात मोदीजी महाराष्ट्रातील उद्योग, प्रकल्प शेजारच्या गुजरातेत नेत आहेत. कसा मिळणार आहे महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार? मुळात रोजगार निर्मिती, तरुणांच्या नोकऱ्यांचे प्रश्न यापेक्षा धर्माचे रक्षण करणं आणि हिंदू-मुस्लीम तेढ वाढवणं, हाच ‘अजेंडा’ राबवणाऱ्या मोदीजींना तुम्ही ‘खंबीर नेतृत्व’ म्हणता?

नोटबंदी प्रकरणावर न्यायमूर्ती नागेश्वर यांनी मारलेले ताशेरे, इलेक्ट्रॉल बाँड प्रकरणावर पराकला प्रभाकर यांनी मोदी सरकारच्या अब्रूची काढलेली लक्तरे आणि जगातील दोन नंबरची अर्थव्यवस्था आपण होणार, या मोदीजींच्या ठोकमपट्टी दाव्यावर अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी मारलेले फटकारे, ही तीन उदाहरणं मोदीजींच्या फसलेल्या आर्थिक धोरणाची चिरफाड करण्यासाठी पुरेशी आहेत.

इलेक्ट्रॉल बाँड, ‘चंदा दो धंदा लो’, हफ्तावसूली, सरकारी कंत्राटे, इडी/आयकर विभागाचा वापर, आमदार/खासदारांची खरेदी, उद्योगपती मित्रांना मिळणारी कंत्राटे, त्यांचीच कर्जमाफी, पीएमकेअर फंड, देशावरील वाढते कर्ज, रिझर्व्ह बॅंकेच्या राखीव गंगाजळीवर हात मारणे, इत्यादी इत्यादी आर्थिक गैरव्यवहाराची किती तरी प्रकरणं आहेत.

मोदीजींच्या मनमानी कारभाराला कंटाळून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या दोन गव्हर्नरांनी त्यांच्यासोबत काम करणे सोडून दिले. इतिहासाच्या अभ्यासकाला रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदी बसवणाऱ्या मोदीजींना तुम्ही ‘खंबीर नेतृत्व’ म्हणता?

मोरांना दाणे टाकायला, निवडणुकीच्या ऐन मोक्यावर एखाद्या गुहेत भगवी कफनी घालून कॅमेऱ्यासमोर डोळे बंद करून बसायला, समुद्राच्या तळाशी मोरपीस घेऊन जायला मोदीजींकडे वेळच वेळ असतो. मात्र गेल्या दहा वर्षांत एक पत्रकार परिषद त्यांना घेता आली नाही. पत्रकारांच्या ‘अनस्क्रिप्टेड’ प्रश्नांना सामोरं जाण्याचं धाडस दाखवता आलेलं नाही. सार्वजनिक क्षेत्रातलं कुठलंही उत्तरदायित्व ज्यांना मान्य नाही, त्यांना तुम्ही ‘खंबीर नेतृत्व’ म्हणता?

फक्त ‘मन की बात’ ऐकवायला रेडिओवर आणि निवडणूक प्रचारासारखी भाषणं ठोकायला संसदेत हजेरी लावणाऱ्या मोदीजींना तुम्ही ‘खंबीर नेतृत्व’ म्हणता?

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

देशातील असं एक घर नसेल, असं एक कुटुंब नसेल, असा एक नातेपरिवार नसेल वा असा एखादा मैत्रीचा गट नसेल, जिथे मोदीजींच्या विखारी, द्वेषपूर्ण, धर्माधारित राजकारणाने वातावरण नासवलेलं नाही. श्रीनिवास पवारांनी व्यक्त केलेला जाहीर संताप हा काही केवळ वैयक्तिक वा कौटुंबिक त्रागा नाही. ती संपूर्ण महाराष्ट्राची आंतरिक भावना आहे. या देशाची सगळी उदारमतवादी, प्रागतिक, सामाजिक, सांस्कृतिक वीण मोदीजींच्या कार्यकाळातच उसवली गेलीय. तरीही त्यांना तुम्ही ‘खंबीर नेतृत्व’ म्हणता?

राजसाहेब, फार मागच्या गोष्टींची तुम्हाला आठवण करून देत नाही, कारण आता तुम्ही सगळं विसरलाही असाल. पण ‘माझ्या आयुष्यात एवढं खोटं बोलणारा प्रधानमंत्री मी आजवर पाहिलेला नाही’, हे तुमचंच वाक्य तुम्हाला आजही छळत असेल, याची मला खात्री आहे.

‘खंबीर नेतृत्व’ काय असतं, ते लक्ष्मण राजगुरू या शाहिराने एका गाण्यात नोंदवून ठेवलंय. जमलं तर कधी ते पूर्ण गाणं ऐका. त्यातल्या दोन ओळी नोंदवतो आणि थांबतो -

‘माझ्या खंबीर नेत्यानं, पाणी चाखलं तळ्याचं

त्यानं जीवाच्या पल्याड, केलं राखण मळ्याचं!’

याला म्हणतात, खंबीर नेतृत्व!

.................................................................................................................................................................

लेखक आनंद भंडारे ‘सामाजिक कार्यकर्ते आहेत. 

bhandare.anand2017@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......