बाळासाहेब, येती लोकसभा निवडणूक ही अटीतटीची ‘लढत’ आहे, ‘लोकशाही’साठी निर्णायक निवडणूक आहे. तुम्ही या लढ्याचे अग्रदूत व्हा!
पडघम - राज्यकारण
बंधुराज लोणे
  • अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि ‘वंचितांचं राजकारण’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Mon , 04 March 2024
  • पडघम राज्यकारण प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar भारिप भारतीय रिपब्लिकन पक्ष वंचित बहुजन आघाडी Vanchit Bahujan Aaghadi

आदरणीय बाळासाहेब आंबेडकर,

सविनय जयभीम.

तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ते १९८४ साली. तेव्हा मी नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबादच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थी म्हणून राहत होतो. माझ्या बापाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा बघितलं होतं. त्यामुळे त्यांच्या नातवाला बघितलं, याचा मला इतका आनंद झाला की, मी बापाला पत्र पाठवून तुम्हाला पाहिल्याचं सांगितलं.

त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी पत्रकार म्हणून तुमची प्रत्यक्ष भेट घेतली. मग अनेकदा तुम्हाला भेटलो, तुमच्या मुलाखती घेतल्या. एकदा तर एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत तुमच्यासोबत माझा वाददेखील झाला. त्या आधी १९९७मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात तुम्ही इतर रिपब्लिकन नेत्यांना विश्वासात न घेता भाजपपुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तेव्हा मी दै. ‘महानगर’मध्ये होतो. त्याच्या मी दिलेल्या सविस्तर बातमीची संपादक निखिल वागळे यांनी हेडलाईन केली होती. तिचा मथळा होता – ‘प्रकाश आंबेडकरांचा भाजपशी सौदा’.

तेव्हा आपले तत्कालीन मुंबई अध्यक्ष सुदास जाधव यांनी ‘महानगर’वर मोर्चा आणला होता आणि आपणही वागळेंना न्यायालयीन कारवाईची नोटीस पाठवली होती. त्या आधी १९९३मध्ये आपण ‘बहुजन महासंघा’ची स्थापना केली होती. त्याचं शेगावला अधिवेशन होतं. त्याच्या वार्तांकनासाठी मला वागळेंनी पाठवलं होतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

त्यानंतर अकोला मतदारसंघातून तुम्ही विजयी होणं, अकोला जिल्ह्यात तुम्ही केलेले विविध जातसमूहाचे वेगवेगळे प्रयोग वगैरे महाराष्ट्रासह मीही पाहत आलो आहे. त्याआधी किनवट विधानसभा पोटनिवडणुकीत भीमराव केरामसारख्या साध्या कार्यकर्त्याला तुम्ही आमदार केलं होतं. ‘रिपब्लिकन’ ऐक्य फुटल्यानंतर नांदेडला सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्यदिव्य अधिवेशन झालं होतं. नामांतर प्रश्नावर तुम्ही रोखठोक भूमिका घेतली होती. भावनिक प्रश्नांपेक्षा मूलभूत प्रश्नांवर तुम्ही उभ्या केलेलेल्या लढ्यांचा एक पत्रकार आणि एक कार्यकर्ता म्हणून मी साक्षीदार आहे.

बाळासाहेब, तुम्ही काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विश्लेषण करणारा एक अभ्यासपूर्ण लेख दै. ‘लोकसत्ते’मध्ये लिहिला होता. (त्याचं कात्रण कदाचित माझ्याकडे अजूनही असेल) त्यानंतर तुम्ही सातत्यानं संघपरिवार आणि भाजपविरोधात ठाम भूमिका घेतलेली आहे. याचा माझ्यासारख्यांना नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे. आपल्यावर सार्वजनिक किंवा एखाद्या बैठकीत टीका झाली की, हा सारा इतिहास सांगून माझ्यासारखे अनेक जण आपली पाठराखण करत असतात.

हे मान्यच करावं लागेल की, आंबेडकरी चळवळीला तुम्ही एका वेगळ्या उंचीवर आणि वळणावर नेलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर आंबेडकरी चळवळ, पक्ष आपण जातीच्या कक्षेबाहेर नेण्याचा यशस्वी प्रयोगही करून दाखवला आहे. बौद्धापेक्षा इतर समाजाकडे नेतेपद देणं, एका महिलेला प्रमुखपद देणं, असे प्रयोग तुम्ही जाणीवपूर्वक केले आहेत. ‘भारतीय रिपब्लिकन पक्ष’ बरखास्त करून ‘वंचित बहुजन आघाडी’ स्थापन करण्याचा आपण धाडसी निर्णय घेतला. सद्यस्थितीत केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर, देशाच्याही राजकारणात तुमचा हा प्रयोग अतिशय मोलाचा, महत्त्वाचा आणि तुमच्या राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा आहे.

बाळासाहेब, तुमचं वाचन, चिंतन, आंतरराष्ट्रीय प्रश्नांची जाण, आंबेडकरी विचाराची समज, पकड यांचं मला नेहमीच कौतुक आणि अभिमान वाटत आलाय. आपण एक अस्सल स्वाभिमानी नेते आहात. ‘तुम्ही स्वाभिमानाचं राजकारण करता’ असा तुमच्या कार्यकर्त्यांचा दावा असतो, मलाही तसंच वाटतं, पण तरीही तुमच्या राजकारणाबद्दल, ध्येयधोरणांबद्दल मला अनेकदा काही प्रश्न पडतात.

मला माहिती आहे की, संघाने तुमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा ‘कुजबूज मोहीम’ राबवलेली आहे, मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांतून तुमची बदनामी केलेली आहे, पण तुम्ही अतिशय खंबीरपणे त्याचा सामना केला आहे.

इतर रिपब्लिकन नेत्यांच्या तुलनेत तुमचं राहणीमान अगदी साधं आहे. तुमचं पक्ष कार्यालयसुद्धा साधं आहे. अनेकदा तुम्हाला उच्च न्यायालय ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनपर्यंत चालत येताना मी बघितलं आहे. एक-दोन वेळा मीदेखील तुमच्यासोबत गप्पा मारत आलेलो आहे.

कधी काळी तुमच्या पक्षात कार्यकर्त्यांची शिबिरं वगैरे घेतली जात होत होती. तुमच्या पक्षाची ‘राजकीय व्यवहार समिती’ होती. या समितीत बऱ्यापैकी चर्चा व्हायची, अशी माझी माहिती आहे.

बाळासाहेब, तुमच्या १९८३ ते आजवरच्या कारकिर्दीचा आढावा घेतला, तर एक गोष्ट ठळकपणे दिसते : तुमचे सोबती फार काळ तुमच्यासोबत राहत नाहीत किंवा तुम्ही त्यांना ठेवत नाही. सुरुवातीच्या काळात तुम्ही डाव्या आघाडीचं नेतृत्व केलं. व्ही. पी. सिंग यांनी तुमची राज्यसभेवर केलेली नेमणूक, ‘रिडल्स’ प्रकरणी तुम्ही उभा केलेला लढा, त्यानंतर काँग्रेससोबत (खरं तर शरद पवारांसोबत) न जाण्याचा घेतलेला निर्णय, पण काही वर्षांतच विलासराव देशमुखप्रणीत सरकारमध्ये सहभागी होण्याचा आणि बाहेर पडण्याचा ठराव आणि गेल्या निवडणुकीत ‘वंचित’चा प्रयोग, अशा काही प्रमुख नोंदी करता येतील.

महाराष्ट्रातील मतदारसंघ आणि जातीय समीकरणं यांचा मुंडे, महाजन, शरद पवार यांच्यापेक्षा थोडा जास्तच तुमचा अभ्यास आहे. गेल्या तीन दशकांत तुमचं कायम काही टक्के मतांवर वर्चस्व राहिलेलं आहे. तुमच्याकडे मतं ‘वळवण्या’ची ताकद आहे. आजवर तुम्ही दहा-पंधरा आमदार निवडून आणले आहेत. कोणालाही पराभूत करण्याची ‘ताकद’ तुम्ही बाळगून आहात.

बाळासाहेब, कांशीरामजी म्हणायचे, कोणाला पाडण्याची ताकद असेल, तर आपण जिंकण्याचा डाव खेळू शकतो. मला अनेकदा असा प्रश्न पडतो की, गेल्या तीन दशकांत तुम्ही राजकारणात आहात, पण जिंकण्याचा डाव मात्र खेळू शकलेला नाहीत, असं का व्हावं? स्वतंत्रपणे लढून आम्ही आमचा पक्ष बांधायचा नाही का? आमची ताकद वाढवायची नाही का, असे युक्तीवाद ‘वंचित’च्या स्थापनेनंतर तुमच्या कार्यकर्त्यांनी टीकाकारांना उत्तर देताना केलेले आहेत. ते एका मर्यादेपर्यंत योग्यच आहेत.

पण तुमचे कार्यकर्ते, पाठीराखे ‘कमिटेड’ आहेत. ते प्रत्येक निवडणुकीत तुमच्यासाठी त्याग करतात. पदरमोड करून आपल्या नेत्यासाठी, स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीसाठी आणि पक्षासाठी झटत असतात, पण त्यांच्या त्यागाचं चीज होत नाही. असं का व्हावं?

बाळासाहेब, अलीकडच्या काळात तर आंबेडकरी समाजाला राजकीयदृष्ट्या ‘एकटं’ पाडण्यात प्रस्थापित पक्ष, व्यवस्थेनं खूपच यश मिळवलं आहे. त्यामुळे आता आंबेडकरी समाजाला ‘त्यांचा’ म्हणावा असा नेताच राहिलेला नाही. बहुतेक प्रमुख नेते भाजपच्या कळपात सामील झाले आहेत. काहींनी तर इतकी मजल मारली आहे की, ते केवळ निवडणुकाच नाही, तर संघाचा अजेंडाही पुढे नेण्यात धन्यता मानत आहेत. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांच्यासह स्थानिक पातळीवरचे अनेक नेते भाजपच्या दावणीला बांधले गेले आहेत.

त्यामुळे आंबेडकरी समाज तुमच्याकडे आशेनं पाहतो आहे. तो प्रत्येक निवडणुकीत आपण किती ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर आहोत, याची मोजदाद करत, त्यावरच समाधान मानत पुढील निवडणुकीत आपली सत्ता येणार, किमान बाळासाहेब ‘किंगमेकर’ होतील, अशी अशा बाळगून कामाला लागतो. पण बाळासाहेब, आपल्यावर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना हा प्रश्न पडतो की, हे किती वर्षं, किती निवडणुका चालणार?

आपण संघाच्या विरोधात प्रखर वैचारिक भूमिका घेता. ‘सनातनी हिंदू’ आणि ‘वारकरी हिंदू’ ही आपली मांडणी\भूमिका रुजली, तर नक्कीच ‘राजकीय आणि सामाजिक क्रांती’ होऊ शकेल, असं मला वाटतं. पण संसदीय राजकारणात ‘संख्ये’ला, ‘आकड्यां’ना महत्त्व असतं. तिकडे उत्तर प्रदेशात कांशीराम यांनी अतिशय सरंजामी समाज असतानाही सत्ता मिळवून दाखवली, एका महिलेला मुख्यमंत्री करून दाखवलं. बाळासाहेब, हे तुम्हाला फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात तर नक्कीच करून दाखवता येईल.

मात्र हेही तितकंच खरं आहे की, तुम्ही आपला राजकीय पक्ष आंबेडकरी समाजाच्या पलीकडे नेलात. पण मधल्या काळात आंबेडकरी समाजाचं राजकीय अस्तित्वच धोक्यात आलं आहे, राजकारणातून हा समाज ‘आयसोलेट’ झाला आहे, आंबेडकरी समाजाची निर्णायक ताकद संपली आहे. अर्थात हे तुम्हीही जाणून आहातच आणि त्याबाबत गंभीरपणे विचारही करत असालच. पण…पण आतापर्यंत तुम्ही निवडून आणलेल्या आमदारांत एकही बौद्ध का नाही? इतर समाजासाठी आंदोलनं आम्हीच करायची आणि त्यागही आम्हीच करायचा? त्याला आमची हरकतही नाही, पण किती काळ, किती वर्षं?

बाळासाहेब, मंडल अहवालाच्या अंमलबजावणीला शिवसेनेने विरोध केला, भाजपनं षडयंत्र केलं, व्ही. पी. सिंग यांचं सरकार पाडलं, पण महाराष्ट्रात या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी आपण यशस्वी लढा उभारला होता (ना. ग. गोरे, नीळकंठ खाडिलकर, शरद यादव यांच्या आपण आयोजित केलेल्या सभेचं वार्तांकन मी केलेलं आहे.), पण मंडलचा फायदा घेणाऱ्या जाती आपल्यासोबत आल्या नाहीत. का बरं असं व्हावं? त्यासाठीच कदाचित तुम्ही ‘वंचित’चा प्रयोग केला असावा. पण ‘वंचित’चं राजकारण एक निश्चित दिशा असलेलं आहे, याची माझ्यासारख्या तुमच्या चाहत्यांना, कार्यकर्त्यांना फारशी खात्री वाटत नाही. कारण तसा कृतिकार्यक्रम तुम्ही अजून तरी जाहीर केलेला नाही.

बाळासाहेब, प्रत्येक निवडणुकीत मतदारसंघ, उमेदवारांची निवड यांबाबतीत तुम्ही नेमके काय निकष लावता, हे एक कोडंच आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात आपण पडळकर नावाचा उमेदवार दिला. तो मनोहर भिडेंच्या संपर्कात असलेला आणि संघाची बांधीलकी मानणारा होता. त्याच्यामुळे या मतदारसंघात भाजपचा विजय झाला, आणि गंमत म्हणजे लोकसभा निवडणूक संपताच तो भाजपमध्ये गेला… आता तो भाजपचा आमदार आहे.

अशी प्रत्येक निवडणुकीतली अनेक उदाहरणं सांगता येतील. उमेदवारी देताना तुम्ही कार्यकर्त्यापेक्षा वेगळ्या ‘मेरिट’चा विचार करत असालही, पण तुमचे हे डावपेच दुर्दैवानं यशस्वी ठरताना दिसत नाहीत. निवडणूक संपताच तुम्ही उमेदवारी दिलेले उमेदवार तुमचा पक्ष सोडून जातात. याचा अर्थ असा होतो की, त्यांनी फक्त निवडणुकीच्या फायद्यासाठी तुमचं नेतृत्व मान्य केलं होतं.

बाळासाहेब, संघ-भाजपविरोधाच्या आपल्या ‘जहाल’ भूमिकेचा त्यांना काही तोटा झाल्याचं अजून तरी दिसलेलं नाही. उलट आकडेवारी भाजपचा फायदाच झाल्याचं सांगते. गेल्या लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’मुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे किती उमेदवार पराभूत झाले, यापेक्षा भाजपचे किती निवडून आले, यादृष्टीने ‘वंचित’च्या कामगिरीकडे बघितलं पाहिजे. साधारण  ९ लोकसभा मतदारसंघांत ‘वंचित’मुळे भाजपच्या उमेदवारांना लाभ होऊन ते विजयी झाले. विशेष म्हणजे जेवढी मतं ‘वंचित’ला मिळाली, साधारण तेवढ्याच मताधिक्यानं भाजपचे उमेदवार निवडून आले. 

वंचितला मिळालेली मते

१)  अकोला (तुम्ही स्वतः) - २,७८,८४८

२) बुलढाणा - १,७२,६२६

३) हिंगोली - १,७४,०५१

४) नांदेड - १,६६,१९६

५) परभणी - १,४९,९४७

६) गडचिरोली - १,११,४६८

७) चिमूर -  १,११,२५५

८) सोलापूर - १,७०,००७

९) सांगली - ३,००,२३४

गेल्या विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’मुळे भाजपचा किमान १६ मतदारसंघात फायदा झालेला दिसतो.

बाळासाहेब, प्रसारमाध्यमं आणि इतर विविध मार्गांनी तुम्ही निवडणुकीच्या काळात जबरदस्त वातावरण निर्माण करता. त्यात तुमचा हातखंडा आहे, यात काही वाद नाही. पण याचं एक कारण आंबेडकरी समाजाकडे पर्याय नसणं, हेही आहे. हा समाज वैचारिकदृष्ट्या संघपरिवाराच्या विरोधात आहे. आणि हाच फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा आहे. त्यामुळे तुम्ही जेवढ्या जोरदारपणे भाजप-संघाच्या विरोधात आवाज कराल, तेवढं आंबेडकरी समाजाचं पारड जड होतं.

बाळासाहेब, शरद पवारांबाबत नेहमीच राष्ट्रीय पातळीवर एक संशयाचं वातावरण राहत आलं आहे. केवळ ‘सत्तेचं राजकारण’ यातच पवारांचं सौख्य सामावलेलं दिसतं. तुमच्यावर तसा आरोप माझ्यासारखे तुमचे चाहते, कार्यकर्तेच काय, पण शत्रूही करणार नाहीत. मात्र तुम्ही दिलेला शब्द पाळालच, असा विश्वास का वाटत नाही? पवारांबाबत कोणी काहीही म्हणो, त्यांनी नेमक्या वेळी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेऊन फुले-शाहू-आंबेडकरी विचारांशी असलेली बांधीलकी सिद्ध करून दाखवली आहे. त्यासाठी त्यांना उत्तरायुष्याच्या टप्प्यावर फार मोठी किंमतही मोजावी लागली आहे. 

काही वेगळ्या कारणांसाठी आपण शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना जवळ करत नाही. आपला काँग्रेसवर राग आहे. (‘वंचितांचं राजकारण’ या पुस्तिकेत मी त्याबाबत सविस्तर लिहिलं आहेच.) खास करून यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यावर आपला वैयक्तिक राग आहे. भैयासाहेब आंबेडकरांना यशवंतराव चव्हाण यांनी त्रास दिला होता.

काँग्रेस-राष्ट्रवादी संपल्याशिवाय नवीन काही उभं राहणार नाही, अशी तुमची भूमिका आहे. पण यांना संपवण्याच्या नादात भाजपच वरचढ होऊन बसलाय. मला हेही मान्य आहे की, पुरोगामी पक्ष आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ देणं, निवडून आणणं, ही काही आपली जबाबदारी नाही आणि जवळपास सगळ्याच प्रस्थापित पक्षांचे नेते भाजपसोबत ‘साटंलोटं’ करतात… पण आता काळदेखील ‘सोकावला’ आहे. आणि हे जास्त गंभीर आहे, अशी माझ्यासारख्यांची भावना आहे.

बाळासाहेब, तुम्हीच सध्या सांगत आहात की, मोदींची सत्ता पुन्हा आली, तर संविधान आणि देश शिल्लक राहणार नाही. (तसं आताही फारसं काही त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाहीच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेद्वारे निर्माण केलेल्या घटनात्मक संस्था मोडीत काढलेल्या आहेतच) याचा सरळ अर्थ असा आहे की, येती लोकसभा निवडणूक ही अटीतटीची ‘लढत’ आहे, ‘लोकशाही’साठी ‘लोकशाहीवाद्यां’साठी ‘निर्णायक’ निवडणूक आहे.

बाळासाहेब, राजकारण असो की, वैयक्तिक आयुष्य, किंमत तर सगळ्यांनाच मोजावीच लागते. भाजप-संघाच्या विरोधात ठामपणे बोलून वैचारिकदृष्ट्या या शक्तीच्या विरोधात असलेल्या समाजांना, मतदारांना ‘गोलबंद’ करणं, ही तुमची कार्यपद्धती आहे, अशी टीका होत असते. ही टीका गैरलागू असल्याचं सिद्ध करण्याची आता वेळ आलेली आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

बाळासाहेब, सध्याचा काळ खूप कठीण आहे. ब्राह्मणी फॅसिस्ट शक्तीचा उदय, विकास आणि सध्याच्या काळातील त्याचं चारित्र्य, त्याची वाटचाल कोणत्या दिशेनं सुरू आहे, हे तुम्हाला माझ्यासारख्यांनी सांगण्याची अजिबात गरज नाही.

या शक्तीचा पाडाव करण्याची वैचारिक ताकद आणि मैदानी शक्ती, केवळ फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेतच आहे, असं मला वाटतं. इतकंच नव्हे तर, माझा तसा ठाम विश्वास आहे. (युरोपात या फॅसिस्ट शक्तीचा पाडाव कम्युनिस्ट विचाराच्या जनतेनं केला असेल, पण भारतीय फॅसिस्टांचं चारित्र्य आणि स्वरूप वेगळं आहे.) हा संघर्ष आता अंतिम टप्प्यावर आला आहे.

बाळासाहेब, तुम्ही या लढ्याचे अग्रदूत व्हा! केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील ‘लोकशाहीवादी’ जनतेची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे, असेल. ही शेवटचीच संधी आहे. ती तुम्ही वाया जाऊ देऊ नये, अशी माझी आपल्या तमाम चाहत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं तुम्हाला नम्र विनंती आहे. तुम्ही फक्त ‘लढ’ण्याचा आदेश द्या. प्रबोधनकारांचा नातू, राष्ट्र निर्माण कार्यासाठी बाबासाहेबांचं सहकार्य घेणाऱ्या, त्यांचा प्रचंड आदर करणाऱ्या पंडित नेहरूंचा पणतू आणि घटनाकारांचा नातू म्हणजे तुम्ही एकत्र आलात, तर सारा देश ढवळून निघेल. 

जयभीम!!

..................................................................................................................................................................

लेखक बंधुराज लोणे पत्रकार आहेत.

bandhulone@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......