‘घराणेशाहीचे कांदे’ नाकाने सोलण्याचा भाजपचा ‘नस्ता’ उद्योग!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • चित्र - विवेक रानडे
  • Sat , 10 February 2024
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP काँग्रेस Congress

पुन्हा एकदा काँग्रेसमधील घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या निवासस्थानी एक तर आरसा नसावा किंवा घरातल्या आरशात हे नेते स्वत:चा चेहरा बघत नसावेत, असंच म्हणायला हवं. खरं तर, घराणेशाही हे आपल्या देशातील राजकारणाचं सर्वपक्षीय व्यवच्छेदक लक्षणं आहे, तरी प्रत्येक राजकीय पक्ष दुसऱ्या पक्षातल्या घराणेशाहीवर मानभावीपणे टीका करत असतात.

काँग्रेसला गांधी-नेहरूंशिवाय जसा पर्याय नाही, तशीच स्थिती आपल्या देशातील बहुतेक सर्व राजकीय पक्षांची आहे. भाजपला तरी मोदींशिवाय दुसरे कोणते नेतृत्व आहे? ठाकरेंशिवाय शिवसेना नाही, यादवांशिवाय सपा नाही, मायावतींशिवाय बसपा नाही, लालंशिवाय राष्ट्रीय जनता दल नाही... स्टॅलिन, देवेगौडा, ममता बॅनर्जी, शरद पवार, चंद्रशेखर राव, गेला बाजार नितीशकुमार अशी अनेक घराणी आहेत. ते पुढारी पक्षाच्या प्रमुखपदी त्या-त्या घराण्यातील व्यक्तीला बसवतात आणि अन्य पक्षांवर घराणेशाहीची टीका करतात. ‘स्वत:चं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून’ असा प्रकार आहे. 

आगामी लोकसभा निवडणूक देशाच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचलेली आहे. १५-२० फेब्रुवारीच्या आत सर्व कामे आटोपण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या गेलेल्या आहेत, कारण त्यानंतर कोणत्याही दिवशी निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू होऊ शकते. देशाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडून झालेला आहे आणि त्यानिमित्तानं नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणातून नेहमीप्रमाणं काँग्रेसवर सडकून टीका करत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारचं बिगुल फुंकलेलं आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

(बाय द वे, मोदींच्या भाषणाचा प्रभावी  सोडाच, पण किमान तरी प्रतिवाद करण्याइतकाही काँग्रेस पक्ष  सभागृहात उरलेला नाही, हे चित्र काही हा पक्ष लोकसभा निवडणुकीत भाजपला तुल्यबळ  लढत देईल, या आशेला बळकटी देणारं नाही!) मोदी नेहमीच संसदेत प्रचारकी भाषण करतात, असं म्हणून घराणेशाहीवर केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण ती टीका करताना त्यांच्या पक्षामधील घराणेशाहीकडे त्यांनी ‘सोयीस्कर’ कानाडोळा केलेला आहे… म्हणून भाजपमधील घराणेशाहीचा पुन्हा एकदा घेतलेला हा धांडोळा…

भाजप सध्या राज्यात ज्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आहे, त्या राज्याचे माजी मुख्य आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य होते. त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस प्रदीर्घ काळ आमदार आणि १९९५मध्ये राज्यात सत्तारूढ झालेल्या सरकारात मंत्रीही होत्या.

भाजप महाराष्ट्रात ज्यांनी खोलवर रुजवला असं समजलं जातं, त्यात गोपीनाथ मुंडे यांचं नाव अग्रस्थानी आहे. त्याच मुंडे यांचीही घराणेशाही भाजपमध्ये आहे. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि पक्षाचा मध्य  प्रदेशचा कार्यभार असलेल्या, महाराष्ट्रातील ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ आहोत असा दावा केलेल्या, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे तीन वेळा आमदार आणि राज्यातील भाजपच्या सरकारात एक प्रभावी मंत्रीही होत्या.

पंकजा यांची सख्खी बहीण डॉ. प्रीतम सलग दुसऱ्यांदा भाजपच्या उमेदवार म्हणून विजयी झालेल्या असून पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारीच्या रिंगणात आहेत.

भाजपचे एकेकाळचे दिग्गज एकनाथ खडसे आता जरी राष्ट्रवादीत गेले असले, तरी ते भाजप-सेना मंत्रीमंडळात दोन वेळा मंत्री होते. ते विधानसभेचे विरोधी पक्ष म्हणून वावरले, तेव्हाही भाजपमध्येच होते. ते भाजपमध्ये असतानाच त्यांच्या सूनबाई रक्षा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आणि त्या लोकसभा  निवडणुकीत विजयी झाल्या. भाजपने एकनाथ खडसे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली (देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान करून नंतर ते भाजप  सोडून गेले!), पण त्यांच्या कन्येला पक्षानं उमेदवारी दिली.

‘दाजी’ या नावानं ओळखले जाणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही त्यांच्या पुत्राला राजकारणात आणून पक्षांतर्गत विरोधकांच्या नाकावर टिच्चून विधानसभेची उमेदवारी मिळवून दिली आणि विजयी करून दाखवलेलं आहे.

भाजपचे एकेकाळचे राष्ट्रीय स्तरावरील ‘हेवी वेट’ प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यावर त्यांची कन्या पूनम महाजन-राव यांना उमेदवारी देणं, ही ‘राजकीय घराणेशाही’च आहे. त्या  उत्तर-मध्य मुंबई मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर विजयी झाल्या आहेत आणि त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची अंधुक का असेना संधी आहे. पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या शाखांवरही त्यांनी काम केलेलं आहे.

विद्यमान कॅबिनेट मंत्री विजय गावित यांची कन्या हिना (नंदुरबार) आणि एक आप्त राजेंद्र (पालघर) हे दोघेही भाजपचे खासदार आहेत. पक्षाची राष्ट्रीय तिजोरी प्रदीर्घ काळ सांभाळलेले वेदप्रकाश गोयल आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र पियूष गोयल, हे दोघेही भाजपचे खासदार म्हणून वावरले. पियूष गोयल तर २०१४पासून केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत.

‘येनकेन’ मार्गानं अन्य पक्षातून लोकांना ओढून पक्ष बळकट करण्यात भाजप माहीर आहे. (अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या अशा लोकांना मी ‘परोपजीवी जंतू’\Ectoparasite म्हणतो!) शिवसेना ते भाजप मार्गे काँग्रेस, असा प्रवास झालेले नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे पुत्र नीतेश आमदार आहेत. मोठे पुत्र माजी खासदार पुन्हा राजकारणात संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी-काँग्रेस असं तळ्यात मळ्यात करून दत्ता मेघे भाजपत आल्यावर त्यांचे पुत्र सागर आणि समीर या दोघांनाही भाजपनं उदार हस्ते आमदारकी बहाल केली. काँग्रेस-शिवसेना-काँग्रेस असा प्रवास करून भाजपवासी झालेले राधाकृष्ण पाटील राज्यात नुकतेच कॅबिनेट मंत्री झाले आहेत, तर त्यांचे पुत्र डॉ. सुजय लोकसभेचे सदस्य आहेत.

अशा अनेक ‘परोपजीवीं’ची घराणेशाहीदेखील आता भाजपमध्ये पावन झालेली आहे, होत आहे…

भाजपमधील घराणेशाही केवळ महाराष्ट्रातच घडलेली आहे असं नाही. उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महंत अवैद्यनाथ यांचे वारसदार आहेत. देशाचे विद्यमान संरक्षणमंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी सिंह यांचे पुत्र पंकज सिंह सलग दुसऱ्यांदा आमदार आणि मंत्री आहेत.

भाजपचे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे पुत्र अभिषेक, हिमाचलचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचे पुत्र अनुराग ठाकूर सलग तिसऱ्यांदा खासदार आणि दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र पर्वेश खासदार आहेत.

याशिवाय कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा आणि बी. वाय. राघवेंद्र, मनेका गांधी आणि वरुण गांधी, सी. लाल गोयल आणि विजय गोयल, व्ही. के. मल्होत्रा आणि ए. के मल्होत्रा, सुंदरलाल पटवा आणि त्यांचे बंधू, के. विजयवर्गीय आणि ए. विजयवर्गीय अशी भाजपच्या घराणेशाहीची कितीतरी उदाहरणे देता येतील.

भाजपच्या स्थापना आणि उभारणीत ‘राजमाता’ या नावाने ओळखल्या गेलेल्या विजयाराजे शिंदे यांच्या कन्या वसुंधराराजे राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांचे पुत्र दुष्यंत सिंह खासदार होते. वसुंधराराजे यांची बहीण यशोधरा राजे याही मंत्री होत्या.

विजयाराजे शिंदे यांच्याच कुटुंबातील (काँग्रेस नेते माधवराव शिंदे यांचे पुत्र) ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसचा त्याग करून आणि मध्य प्रदेशात काँग्रेसला खिंडार पाडून नुसतेच भाजपमध्ये आलेले नाहीत, तर काँग्रेसचं मध्य प्रदेशातलं सरकार घालवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ज्योतिरादित्य सध्या केंद्रीय मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत.

वर दिलेली सर्व उदाहरणं घराणेशाहीची आणि भाजपमधीलच आहेत. ती जर घराणेशाही नाही, असं कुणाला (म्हणजे भाजप समर्थकांना) वाटत असेल, तर ते सर्व ‘गोडगैरसमजाच्या ढगात आत्ममश्गुल’ विहार करत आहेत, असंच म्हणायला हवं!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

एका अहवालानुसार उत्तर प्रदेशमधले भाजपचे ७१पैकी १२, बिहारमधले २२पैकी ५, गुजरात आणि राजस्थानमधले प्रत्येकी ३ खासदार ‘घराणेशाही’चं प्रतिनिधित्व करतात. केंद्रीय मंत्रीमंडळातही १५ मंत्री घराणेशाहीतून आलेलेच आहेत.

त्यामुळे अन्य पक्षांतल्या घराणेशाहीमुळे लोकशाहीला धोका आहे आणि भाजपमधील घराणेशाही मात्र लोकशाहीला पोषक आहे, अशी टीका करणं, हा शुद्ध ढोंगीपणा आहे. आपल्याच पक्षातील या घराणेशाहीची माहिती नसणाऱ्यांना, एक तर विस्मृतीचा आजार झालेला असावा किंवा ते सोंग तरी घेत असावेत.

घराणेशाहीची लागण सर्वपक्षीय आणि राष्ट्रीय आहे, हे लक्षात घेऊन, दुसऱ्या पक्षातील घराणेशाहीचं कुसळ बघणाऱ्याच्याही डोळ्यांत घराणेशाहीचंच मुसळ आहे, याचा विसर भाजपने पडू न देता ‘घराणेशाहीचे कांदे’ नाकानं सोलण्याचे नस्ते उद्योग बंद करावेत.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......