आम्ही ‘ललित कला केंद्रा’च्या (गुरुकुल) विद्यार्थी, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांसोबत एकजुटीने उभे आहोत
पडघम - सांस्कृतिक
माजी विद्यार्थी, कलाशिक्षक, अभ्यासगत प्राध्यापक आणि नाट्य-सिने कलावंत
  • पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत आणि ललित कला केंद्र
  • Thu , 08 February 2024
  • पडघम सांस्कृतिक ललित कला केंद्र Lalit Kala Kendra प्रवीण भोळे Pravin Bhole पुणे विद्यापीठ Pune University राम Ram रामायण Ramayana

आम्ही विविध वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी असलेले संवेदनशील कलाकार आणि भारताचे नागरिक, या नात्याने एकत्रितपणे हे जाहीर करत आहोत. आम्ही सर्व धर्म, जाती, पंथ, संप्रदाय यांचा आदर करतो. आम्हाला आमच्या समृद्ध भारतीय संस्कृती आणि परंपरांचा अभिमान आहे.

ललित कला केंद्र (गुरुकुल), ज्याला ‘सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ म्हणूनही ओळखले जाते. हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक विभाग आहे, जो पारंपरिक भारतीय गुरुकुल प्रणालीमध्ये नृत्य, संगीत आणि नाटक यांत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देतो. ललित कला केंद्र (गुरुकुल) द्वारे चालवले जाणारे सर्व अभ्यासक्रम युजीसी मान्यताप्राप्त आहेत. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पद्मश्री सतीश आळेकर (ज्यांनी २००९पर्यंत विभागप्रमुख म्हणूनही काम केले), पंडिता रोहिणी भाटे यांसारखे ‘परफॉर्मिंग कलां’मधील अनेक मान्यवर कलाकार या विभागाशी जोडले गेले आहेत. अनेक दिग्गज विभागाच्या अभ्यासक्रम मंडळाशी संलग्न आहेत. हे दिग्गज विद्यार्थ्यांना वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शनही करतात.

गेल्या काही वर्षांमध्ये, ललित कला केंद्राने (गुरुकुल) अनेक प्रतिष्ठित माजी विद्यार्थी घडवले आहेत, जे आजही नाट्य, संगीत, नृत्य, कलाशिक्षण, दूरचित्रवाणी मालिका आणि सिनेमा या क्षेत्रांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अशा प्रकारे हा विभाग कलेच्या जगात प्रवेश करण्याची एक अमूल्य पायरी आहे, यावर आमचा उत्कट विश्वास आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

संगीत, नृत्य, नाटक यांना ‘प्रयोगकला’ म्हणतात, कारण त्यात नवनवीन प्रयोग करणे अभिप्रेत असते. प्रयोगकलांच्या विद्यार्थ्याने शरीर, आवाज, विचार, आपली मते यांच्यांवर विविध अंगांनी काम करणे गरजेचे असते.

दरवर्षी नाट्य विभागाचे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेअंतर्गत विविध विषयांवर नाट्यप्रयोग सादर करतात. विद्यार्थी लिखित नाटके ते उत्स्फूर्त नाटके, प्रस्थापित दिग्दर्शकांनी आणि विद्यार्थी दिग्दर्शकांनी रचलेली नाटके, आहार्य (शारीर) अभिनयाआधारित ते वाचिक अभिनयाआधारित नाटके, लोककला ते अभिजात नाटके अशी विविध नाटकांचे प्रकार हाताळून बघतात. ही वैविध्यपूर्ण स्वरूपाची, आशयाची, पारंपरिक आणि आधुनिक अशी नाटके सादर करणेही चालत आले आहे.

विद्यार्थ्यांनी स्वतःतील कलाकार शोधताना आपली सर्जनशीलता आणि तंत्र घालत कला कशी जोपासता येईल? याचे शिक्षण ललित कला केंद्र देते आहे, हेच या विभागाचे वैशिष्ट्य आहे. ही परंपरा जतन करायला हवी, त्याचे समर्थन करणे आवश्यक आहे, असे आम्हाला वाटते.

ललित कला केंद्र (गुरुकुल) विद्यापीठाच्या नियमांनुसार लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेते. दरवर्षी त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून नाटकाचे विद्यार्थी त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा म्हणून विविध विषयांवर नाटके सादर करतात.

आपण असे म्हणू शकतो की, अशा परीक्षांच्या वेळी, रंगमंच हाच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका असतो. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाच्या मूल्यमापनासाठी अंतर्गत आणि/किंवा बाह्य परीक्षक/तज्ज्ञ उपस्थित असतात. या परफॉर्मन्समध्ये तोंडी परीक्षा (Viva) हा मूल्यमापन प्रक्रियेचा एक भाग असतो. या सादरीकरणांमध्ये कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, संप्रदायाचा अपमान करण्याचा किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू असत नाही.

संहिता ते प्रयोग (स्क्रिप्ट टू परफॉर्मन्स) हे नाटक अभ्यासक्रमातील एक महत्त्वपूर्ण मॉड्यूल आहे. यामध्ये विद्यार्थी स्वतःचे १५ मिनिटांचे नाटक लिहिण्याचा आणि सादर करण्याचा प्रयत्न करतात. हा उपक्रम साधारण १९९०पासून चालू आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने आजपर्यंत अधिक नाटके सादर केली गेली आहेत.

या ललित कला केंद्रामध्ये २ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी संहिता ते प्रयोग परीक्षेला उपस्थित असलेल्या एका गटाला एका संहितेच्या सादरीकरणाचा चुकीचा अन्वयार्थ लागला. त्या गटाने विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक, परीक्षक आणि प्रेक्षक यांना अडथळा करत चालू प्रयोग थांबवला. विद्यार्थी-विद्यार्थिनींना मारहाण करण्यात आली, शिक्षकांना धमकावण्यात आले आणि शिवीगाळ करण्यात आली. हे वर्तन अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे आणि कायदेशीर कारवाईयोग्य आहे. आम्ही या झाल्या प्रकाराचा तीव्र निषेध करतो.

चर्चेतून वादविवाद करत नवनवीन कल्पनांना जन्म देण्याच्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगणाऱ्या आपल्या देशात हा गट धमक्या- गैरवर्तन- हिंसाचार करतो, हे लज्जास्पद आहे. हे कृत्य आमच्या विद्यापीठाच्या परीक्षाप्रणालीचे विचित्र उल्लंघन आहे, आणि दहशत वाढवणारेही आहे.

त्या संध्याकाळी सादर झालेल्या कोणत्याही नाटकाच्या सादरीकरणाबाबत जर कुणा प्रेक्षकाला आक्षेप असेल, तर ती व्यक्ती औपचारिकपणे विभागप्रमुख किंवा विद्यापीठ प्रशासनाकडे त्यांचे आक्षेप नोंदवू शकते. तशी तरतूद आहे, पण तसे झाले नाही.

उलट विद्यापीठातील विद्यार्थी आणि विभागप्रमुख यांच्या विरोधात थेट पोलीस तक्रारी नोंदवल्या गेल्या. हे अत्यंत दुःखदायक आहे. आणि त्या वेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींना झालेल्या धक्काबुक्कीची दखल घेतली गेली नाही. तक्रार नोंदवून घेतली गेली नाही. हे अनाकलनीय आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

विभाग, त्याचे विद्यार्थी आणि विभागप्रमुख हे या घटनेचे खरे बळी आहेत. त्यांना आता अन्यायकारकपणे लक्ष्य केले जात आहे. त्यांची जाणूनबुजून बदनामी केली जात आहे. जे व्हिडिओज प्रसारित (व्हायरल) केले जात आहेत, ज्या गोष्टी बोलल्या आणि लिहिल्या जात आहेत (सोशल मिडिया तसेच इतर ठिकाणी), त्यातून चुकीची माहिती देऊन संस्थेबद्दल गंभीर गैरसमज निर्माण झाले आहेत.

सध्याचे विभागप्रमुख प्रविण भोळे हे गेली अनेक वर्षे नाट्यशिक्षक, अभ्यासक आणि रंगकर्मी आहेत. ते या विभागाशी गेली अनेक वर्षे सबंधित आहेत. विद्यार्थ्यांच्या नाटक यांविषयीच्या जिज्ञासेमध्ये ते आनंदाने भर घालत असतात. त्यांच्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन केलेली शेरेबाजी ही अस्वस्थ करणारी आहे.

आम्ही सर्वांना आवाहन करतो की, कृपया ही अनुचित निंदा आणि बदनामी थांबवावी. आम्ही विनंती करतो की, विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांनी आमच्या सर्व प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना पुरेसे संरक्षण द्यावे.

हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. आम्ही सर्व गट, संस्था, विद्यार्थी, कलाकार आणि कलाप्रेमी मंडळींना आवाहन करतो की, त्यांनी भारतीय राज्यघटना आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर करावा.

आम्ही ललित कला केंद्राच्या (गुरुकुल) विद्यार्थी, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांसोबत एकजुटीने उभे आहोत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख