बीबीसीने एका अहवालात करोना संपल्यावर मानसिक आरोग्याच्या समस्यांची त्युनामी येईल, असं म्हटलं होतं. ते दुर्दैवानं आता खरं ठरताना दिसू लागलं आहे…
पडघम - विज्ञाननामा
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 10 October 2023
  • पडघम विज्ञाननामा जागतिक मानसिक आरोग्य दिन World Mental Health Day

महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य संस्थेची आकडेवारी सांगते की, गेल्या पाच महिन्यांत तब्बल २० हजार लोक मानसिक आजारानं त्रस्त आहेत. या सर्वांच्या भीती वाटणं, चिंता वाटणं, झोप न येणं, व्यसनाधीनता, एकटं वाटणं आणि आत्महत्येचे विचार मनात येणं, यांसारख्या तक्रारी होत्या. एकट्या गोंदिया जिल्ह्यात जर ही स्थिती आहे, तर संपूर्ण राज्यात व देशात काय असेल, याची कल्पना करवत नाही. करोना महामारी सुरू झाल्यानंतर मानसिक आरोग्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या. अर्थात या काळात त्या संपूर्ण जगातच खूप वाढल्या. बीबीसीने एका अहवालात करोना संपल्यावर मानसिक आरोग्याच्या समस्यांची त्युनामी येईल, असं म्हटलं होतं. ते दुर्दैवानं आता खरं ठरताना दिसू लागलं आहे.

पहा : https://www.bbc.com/news/health-52676981

मानसिक आरोग्य म्हणजे केवळ ‘छिन्नमनस्कता’ (Schizophrenia, Bipolar disorder, Borderline personality disorder), विविध प्रकारचे फोबिया असे गंभीर पद्धतीचे आजार नसून, दुःख, निराशा, आनंद, चिंता प्रमाणाबाहेर जाऊन रोजचं आयुष्य डळमळीत करायला लागल्या की, त्यांनाही ‘मानसिक आजारा’च म्हटलं जातं. यासोबत दुर्लक्षित असलेला मानसिक आघात म्हणजे ‘ट्रॉमा’. त्यामुळे साधारण वागणूक असलेल्या व्यक्तीची मज्जासंस्था (central nervous system) बदलून, ती व्यक्ती काही दिवस ते काही वर्षंसुद्धा सतत भीतीच्या छायेखाली वावरू शकते. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, अपघात, परीक्षेतील अपयश, नैसर्गिक आपत्तीचा सामना, शारीरिक व मानसिक छळ या व अशा पद्धतीच्या घटना, आपल्यावर मानसिक आघात करतात. या अवस्थेला ‘PTSD’ (post-traumatic stress disorder) असे म्हणतात.

करोना महामारीमुळे आपण सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारे मानसिक आघातांचा अनुभव घेतला. त्याचा परिणाम म्हणून अनेकांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या. यात प्रामुख्यानं म्हातारी मंडळी, पंचविशीच्या आतील मुलं-मुली, गृहिणी यांना जास्त त्रास झाला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भारतात मानसिक आरोग्याबद्दल असलेले गैरसमज आणि एकंदरच आरोग्याबद्दल असलेला निष्काळजीपणा, यांमुळे लोक मोठ्या प्रमाणात त्रास सहन करतात. त्याहून गंभीर म्हणजे त्यावर उपचार करत नाहीत. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात असलेले अपुरे कुशल मनुष्यबळ हेसुद्धा या त्रासाला कारणीभूत आहे.

एका अहवालानुसार तरुणींमध्ये व्यसनांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे. शहरी भागांत आढळून येणाऱ्या व्यसनी तरुणी आता ग्रामीण भागातदेखील आढळू लागल्या आहेत. मोठ्या शहरांतल्या सरकारी व खासगी मनोरुग्णालयांत व्यसनांवर उपचार घ्यायला येणाऱ्यांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ४० टक्के इतकी झाली आहे. दारू, तंबाखू, गांजा, सिगरेट व इतर अमली पदार्थ, या व्यसनांबरोबर मोबाईल व सोशल मीडियाचं व्यसनदेखील प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. मोबाईल/सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आपला मेंदू स्थिर राहत नाही, लक्ष केंद्रित करू शकत नाही, त्याच्यावर ताण येतो आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होतो.

आपलं सामाजिक जीवनही आपल्या व्यक्तिमत्त्वावर मोठा परिणाम करत असतं. आपल्याला बालपणापासून जितकी चांगली नाती मिळतील, तितका आपल्या ‘स्व’चा विकास होतो. ज्यांच्या वाट्याला वाढत्या वयात सोशल मीडिया आला, त्यांचं सामाजिक जीवन तर बिघडलंच, पण त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावरही त्याचे परिणाम झाले आहेत. म्हणूनच या पिढीमधील मुला-मुलींमध्ये मानसिक आरोग्याचे प्रश्न जास्त प्रमाणात दिसतात.

भारतातील समाजरचना जात-धर्म यांच्यावर आधारित आहे. ७५ वर्षांच्या या देशात १४० कोटी लोकसंख्येला आपलं अस्त्वित्व टिकवण्यासाठी सतत लढावं लागतं. गेल्या काही वर्षांत मुद्दाम वाढवलेला जात-धर्म द्वेष हा मानसिक स्वास्थ्य बिघडण्याचं महत्त्वाचं कारण ठरत आहे. सगळ्याच क्षेत्रांत असलेला भ्रष्टाचार, रोज वाढणारी महागाई आणि शिक्षणक्षेत्राची घसरत चाललेली गुणवत्ता, यांमुळे सामान्य नागरिकाला सुरक्षित आयुष्य जगता येत नाही. त्यात तीन वर्षं करोना आपल्या आयुष्यात ठाण मांडून होता, त्यामुळे लाखो भारतीयांच्या आयुष्याची उलटापालट झाली आहे.

‘कोटा’ शहरातील कोचिंग क्लासमधील मुला-मुलींच्या आत्महत्या आणि त्यांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न, हा एक दुर्लक्षित विषय आहे. विज्ञान विषयातील पदवीधर असल्यानं स्पर्धा काय असते, याचा अनुभव मी वाढत्या वयात घेतला आहे. आपल्या देशात विज्ञान विषयाचा संपूर्ण भर परीक्षा चांगल्या मार्कांनी कशी उत्तीर्ण करता येईल, यावरच असतो. त्यामुळे सगळेच मार्कांच्या मागे धावतात, कारण मार्क नाही मिळाले, तर चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळत नाही. चांगल्या महाविद्यालयामधून पदवी घेतली की, लाखो रुपयांचं ‘पॅकेज’ मिळणार… हीच कथा-व्यथा एमपीएससी-युपीएससीवाल्यांचीही आहे.

नाती कशी वाढवायची-टिकवायची, याचं प्रशिक्षण या इंजिनिअर, डॉक्टर व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलं जात नाही. शरीर व मन यांच्या दृष्टीकोनातून हा काळ आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. शरीरात होणारे बदल सांभाळत येणाऱ्या आयुष्याचा पाया मजबूत करण्याचे हे दिवस १४-१५ तास घोकंपट्टी करण्यातच घालवले, तर आपल्या शरीराचं व मनाचं काय होईल?

एक परीक्षा, एक पदवी किंवा काही टक्के मार्क आपलं आयुष्य घडवू शकत नाही. जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या क्षमता अभ्यासक्रमातून येत नाहीत, हे आता विद्यापीठंदेखील मान्य करतात. विज्ञान शाखेतल्या मुला-मुलींची तर्कबुद्धी चांगली विकसित होत असली, तरी त्यांच्या भावनिक क्षमता चांगल्या असतातच, असं नाही; किंबहुना भावनिकरित्या ही मंडळी गोंधळलेलीच असतात. अवांतर वाचन कमी, समाजाशी संपर्क कमी, सामाजिक जाणि‍वांची उणीव, असा बहुतेकांचा नन्नाचाच पाढा असतो. ‘आपण भले, आपले काम भले’ ही वृत्ती ठेवून वागणारे डॉक्टर/इंजिनीअर्स/प्रशासकीय सेवेतील अधिकारी जेव्हा नकारात्मक भावना अनुभवतात, तेव्हा त्या सहन न झाल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करतात. अहंकार हा मानसिक आरोग्याचा शत्रू आहे. त्यामुळे बहुतेक जण अपयशाला आणि ते आलं की, मदत मागायला घाबरतात.

कोटातल्या कोचिंग क्लासेसची उलाढाल ५००० कोटींवर पोहचली असून, तिथं दरवर्षी दोन लाख विद्यार्थी शिकायला जातात. त्यावर अनेक वेब सिरीज व अनेक लघुपट निघाले आहेत. संशोधन करणारे माध्यमकर्मी व मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, या क्लासेसमध्ये मैत्री शिकवत नाहीत, तर एकमेकांचे स्पर्धक, एवढीच भावना रुजवली जाते. त्यामुळे तिथल्या मुला-मुलींमध्ये निकोप मैत्री निर्माण होत नाही. एकटेपणा हे मानसिक आरोग्य बिघडण्याचं सर्वांत मोठं कारण आहे. पहा :

https://indianexpress.com/article/education/kota-factory-city-of-iit-jee-neet-coaching-fails-to-teach-friendship-aspirants-say-there-are-only-competitors-8906820/

नुकताच नितीन चंद्रकांत देसाई या गुणी कलावंताचा मृत्यू महाराष्ट्राला चटका लावून गेला. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या नोंदीनुसार भारतात दर चार मिनिटाला एक आत्महत्या होते. महाराष्ट्रात दरवर्षी १५ हजारांपेक्षा जास्त आत्महत्या होतात आणि त्यातील ५० टक्के १५ ते ३५ या वयोगटातल्यांच्या असतात.

भारत हृदयविकारात जगात पहिल्या नंबरवर आहे. ताण, चिंता व नैराश्य यांचा परिणाम हृदयावर होऊन हृदयविकार व मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढलं आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की, मानसिक आरोग्य हा शारीरिक सुदृढतेचा पहिला निकष आहे.

आर्थिक स्तर हा मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. कुटुंबातील सर्वांच्या गरजा भागतील आणि भविष्याची तरतूद होईल, एवढी आर्थिक सुरक्षितता असल्यावर मानसिक आरोग्य चांगलं राहतं. अमाप, गरजेपेक्षा जास्त पैसा मानसिक आरोग्याची खात्री देत नाही.

भारताची ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे, आणि त्यातील ४१ टक्के बेरोजगार आहेत. भारतातील ८० कोटी लोकांचं महिन्याचं उत्पन्न फक्त ७५०० रुपये एवढंच आहे.

अशा परिस्थितीत त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं कसं राहील?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गेल्या वीस वर्षांत आलेली ‘मोटिवेशन स्पिकर्स’ची लाट मानसिक आरोग्याच्या गोंधळात भर घालण्याचंच काम करत आहे. व्यक्तीला केवळ ‘ग्राहक’ म्हणून किंमत असलेल्या समाजात कितीही पैसा आला, तरी तो मार्केटिंगने तयार केलेल्या गरजांपुढे कमी पडतो. या चक्रात अडकलेली मंडळी विशिष्ट रक्कम कमवू शकत नाहीत, म्हणून निराशेच्या चक्रात अडकतात.

मानसिक आरोग्याचा विचार केला, तर रोजच्या आयुष्यात चार प्रकारची संप्रेरकं (Hormones) आपला ‘मूड’ चांगला ठेवण्यासाठी मदत करतात-

डोपामाइन : हे ‘फील-गुड’ संप्रेरक म्हणून ओळखलं जातं. हा एक न्यूरोट्रान्समीटर आहे, जो आपल्या मेंदूच्या बक्षीस प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग असतो.

सेरोटोनिन : हे संप्रेरक आणि न्यूरोट्रान्ससमीटर आपला ‘मूड’ आणि झोप, भूक, पचन, शिकण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती इत्यादी नियंत्रित करण्यास मदत करतात.

ऑक्सिटोसिन : याला ‘प्रेम संप्रेरक’ असंही म्हटलं जातं. हे बाळंतपण, स्तनपान आणि पालक-मुलाच्या मजबूत बंधनासाठी आवश्यक असतं. हे संप्रेरक नातेसंबंधांमध्ये विश्वास, सहानुभूती आणि बंधन वाढवण्याला मदत करतं. सामान्यत: शारीरिक स्नेहामुळे याची पातळी वाढते.

एंडोर्फिन : हे संप्रेरक आपल्या शरीरात तणाव किंवा अस्वस्थतेमुळे तयार होणाऱ्या वेदना कमी करण्याचं काम करतं. खाणं, व्यायाम किंवा लैंगिक सुख यांसारख्या क्रियाकलापांमध्ये याची पातळी वाढते.

या संप्रेरकांची कामं बघितल्यावर लक्षात येतं की, मानसिक आरोग्य पूर्णपणे आपल्यावर अवलंबून नसून आपल्याला मिळणारं वातावरण, नाती, संसाधनं आणि आयुष्य जगण्यासाठी असलेलं निवडीचं स्वातंत्र्य, यांवर अवलंबून असतं. जगाचं एकंदरीत बदलत चाललेलं रूप, हवामान बदल, तंत्रज्ञानामुळे कमी होत जाणाऱ्या नोकरीच्या संधी आणि जगभरात लोकशाहीवर होत असलेले हल्ले, यांमुळेही मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढत चालले आहेत.

नात्यांना वेळ देणं (त्यांना गृहीत न धरणं), अर्थ व्यवस्थापन, गरजा आटोक्यात ठेवणं, वेळेवर झोप व नियमित व्यायाम, पुरेसं पौष्टिक अन्न व छंद, या गोष्टी आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात. अर्थव्यवस्था, राजकीय परिस्थिती, यांसारख्या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या वा नियंत्रणाबाहेरच्या आहेत. त्यामुळे जे आपल्याला शक्य आहे, ते प्राधान्यानं करावं. तरीही आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अपयश, निराशा व दुख येतंच, तेव्हा गरजेनुसार समुपदेशकाची/मानसोपचारतज्ज्ञांची न लाजता मदत घ्यावी.

आज १० ऑक्टोबर, ‘जागतिक मानसिक आरोग्य दिवस’. आजपासून आपण आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला नक्कीच सुरुवात करू शकतो…

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.

vrushali31@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Jayant Raleraskar

Tue , 10 October 2023

अत्यंत महत्वाचा लेख. दुर्दैव असे की आपला सभोवताल याबद्दल अनभिज्ञ आहे. किंवा त्याची gravity त्याला कळली नाही. यावर डोळस संवाद व्हायला हवा. आर्थिक स्थैर्याचा गैर अर्थ काढून गैरमार्ग घेणाऱ्या तरुणांना तज्ञ मार्गदर्शन ही देखील आजची गरज आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा