जे कोणी वॉडरोब कपड्यांनी ओसांडून जात असूनदेखील, ‘घालायला कपडे नाहीत’ असे म्हणत असतील, त्यांनी या डॉक्युमेंट्री नक्कीच बघायला हव्यात...
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
देवयानी पेठकर
  • फास्ट फॅशन कपड्यांची दफनभूमी बनलेली चिली देशातल अटाकामा पर्वरांग
  • Mon , 05 June 2023
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जागतिक पर्यावरण दिन World Environment Day फास्ट फॅशन Fast-Fashion फास्ट फॅशन कपड्यांची दफनभूमी Junkyard for Fast-Fashion

सर्वश्रुत असलेल्या नागड्या राजाच्या गोष्टीचे हे आधुनिकीकरण. गोष्टीतल्या राजाला नवनवीन वस्त्र परिधान करण्याचा शौक लक्षात घेऊन कारागीर म्हणजेच फॅशन डिझायनर कोणी स्वप्नातही विचार करू शकणार नाही, असे पोशाखाचे रसभरीत वर्णन करतो. फॅशन सायकॉलॉजी तंत्र तो राजावर आजमावतो आणि अपेक्षेप्रमाणे राजा त्याला प्रतिसाद देतो. इतरांपेक्षा वेगळं घालण्याची थोडक्यात, फॅशनेबल दिसण्याच्या ट्रिगरने आपलं काम केलेलं असतं.

‘नया हैं यह’, या जाणिवेने राजाच्या मेंदूतील अ‍ॅमिडाला सक्रिय होऊन, खरेदीच्या नुसत्या कल्पनेने राजाचे न्यूरो ट्रान्समीटर डोपामाइन शरीरभर बागडायला लागतात. क्षणाचाही विचार न करता, तो पोशाख बनवण्याचा आदेश देऊन टाकतो. ठरल्या दिवशी कारागीर कलाकुसर केलेले सुंदर पॅकिंग घेऊन राजाकडे येतो. तेव्हा बघतो, तर राजाच्या अवतीभवती शॉपिंगच्या बॅगाच बॅगा असतात. राजा राणीसोबत मोबाइलवर ऑनलाइन शॉपिंग करत असतो. कारागीर त्याला ऑर्डर दिलेल्या ड्रेसची आठवण करून देतो, तेव्हा राजा त्रासिक नजरेने त्याच्याकडे बघत म्हणतो, ‘तू किती वेळ लावलास! आता तुझी फॅशन ‘out of trend’ झाली आहे. त्यामुळे तुझी ऑर्डर कॅन्सल.’

कारागिराला हे ऐकून मोठा धक्का बसतो. त्याच्या लक्षात येतं की उत्सुकता ताणण्यासाठी जाणीवपूर्वक घेतलेला वेळ आपल्याच अंगाशी आला आहे. मधल्या काळात राजाच्या डोपामाइन सोबत अड्रेनाइलची रासायनिक लढाई झाली असेल. त्यामुळे उदास झालेल्या राजाने ‘फील गुड हार्मोन्स’चा पुनश्च अनुभव घेण्यासाठी शॉपिंगचा सपाटा लावला असेल. आपण वर्णन केलेल्या ड्रेसपेक्षा, ऑनलाइनवर दिसणाऱ्या इमेजेस, शिवाय कमी किंमत, झट की पट ‘डिलिव्हरी’ या गोष्टींमुळे राजाच्या मेंदूतले रिवॉर्ड सेंटर वेगाने उद्दिपीत झाल्याने कारागिराचा पत्ता कापला गेला. राजाला गंडवण्याच्या नादात, तोच गंडला गेला. त्याने आपली चूक सुधारण्यासाठी लगेचच ‘कस्टमर बिहेवियर कोर्स’ला अ‍ॅडमिशनही घेतली...

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

हा आधुनिक राजा दुसरा तिसरा कोणी नसून, फास्ट फॅशनच्या मागे धावणारा उपभोगाला चटावलेला ग्राहक आहे. जो वैविध्यपूर्ण, चित्ताकर्षक व नवनवीन ट्रेंडच्या व्यसनात गुरफटला आहे. गंमत ही आहे, ‘फास्ट फॅशन इंडस्ट्री’ नवनवे फॅशनचे फॅड आणून ग्राहकाला ‘राजा’ असल्याचे समाधान देत असते. ट्रेंडी, फॅशनेबल दिसण्याची मानसिकता आणि इतरांच्या तुलनेत मागे पडण्याची धास्ती, या गोष्टी ‘फास्ट फॅशन’चे खरे भांडवल! एकेकाळी तेलउद्योगांचे जगावर राज्य होते, आता वस्त्र उद्योग जगावर राज्य करत आहे.

फास्ट फॅशन आज आहे, उद्या गायब

मुळात, फास्ट फॅशन म्हणजे तरी काय? फास्ट फॅशन म्हणजे स्वस्त फॅब्रिकसह मोठ्या प्रमाणात उत्पादित केलेले कपडे, जे दुकानात शक्य तितक्या लवकर वितरित केले जातात. ते कमी किमतीत ग्राहकांची मागणी, नवीन फॅशन पूर्ण करण्यासाठी बनवले असतात. जेणेकरून ग्राहक नव्या ट्रेंडचे कपडे परवडतील, अशा किमतीला विकत घेताना नैतिकता आणि टिकावूपणाकडे डोळेझाक करतात. इतकंच नव्हे घेतलेला पोशाख फार तर फार दोन-तीनदा वापरला जातो, कधीकधी तो वापरलादेखील जात नाही. कारण लगेचच आलेल्या नव्या फॅशनच्या लाटेमुळे त्याचे महत्त्व शून्य झाल्याने, तो टाकून दिला जातो. पण मग, या टाकून दिलेल्या, आजच्या भाषेत डम्प केलेल्या पर्यायाने कालबाह्य, फॅशनबाह्य झालेल्या कपड्यांचे पुढे काय होतं?

शांता ब्लोमन यांच्या ‘टी शर्ट ट्रॅव्हल्स’ (T-shirt Travels) या डॉक्युमेंट्रीतून अशा टाकून दिलेल्या कपड्यांबाबतचा उलगडा आपल्याला होतो. झांबियातील एका दुर्गम खेड्यात एका आंतरराष्ट्रीय सहाय्य संस्थेत कार्यकर्त्या म्हणून ब्लोमेन कार्यरत असताना, गावातील किती जणांनी अमेरिका आणि पश्चिमेकडील कपडे परिधान केले आहेत, हे पाहून त्यांना धक्का बसला होता. नंतर त्यांच्या लक्षात आले होते की, गावातील जवळपास प्रत्येक जण बाहेरून आलेले सेकंड हँड कपडे वापरतो आहे. चैनल, नॉक ऑफ आणि एसी / डीसी टी-शर्ट घातलेल्या गावातल्या वृद्ध लोकांना पाहणे, नजरेला विचित्र वाटत होते. गावातील काही लोकांचा उदरनिर्वाह सेकंड हँड कपड्यांच्या पुनर्विक्रीवर बेतलेला होता. ब्लॉमेन यांनी जिज्ञासावृत्तीने या सेकंड हँड कपड्याच्या व्यापाराचा सखोल अभ्यास केला. तेव्हा त्यांना कळाले की, अमेरिकन सेकंड हँड कपड्यांची सर्वांत मोठी निर्यात आफ्रिकेला केली जाते. तिथे वापरलेले, नको असलेले कपडे लोकांनी धर्मदाय पेटीत टाकलेले असतात. दान करणाऱ्याला असे वाटते की, आपण कपडे दान करून एक मोठेच पुण्यकर्म करत आहोत, परंतु त्या कपड्यांचे पुढे काय होते? त्यांचे अनेक घटकांवर होणारे दूरगामी परिणाम काय होतात, हे फारसं कोणी विचारात घेत नाही.

वास्तव हे असतं की, दान पेटीतल्या कपड्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे वापरण्यासाठी योग्य आहेत की अयोग्य यांची शहनिशा न करता बांधले जातात व जहाजातून तिसऱ्या जगातल्या जागेत शब्दशः फेकले जातात. जगात दरवर्षी १५० अब्ज नवीन वस्त्रे तयार होतात. त्यातले ३० टक्के कपडे कधीही विकले जात नाहीत. एकट्या यूएसमध्ये अंदाजे १५ दशलक्ष लोक फास्ट फॅशन व्यसनांच्या आहारी गेले आहेत. युकेत दसरोज हजारो लोक त्यांचे नको असलेले कपडे मोठे औदार्य दाखवत दान करतात.

ही डॉक्युमेंट्री पाश्चात्य वस्तूंचा विकसनशील देशांवर कसा खोल परिणाम होतो, याचे परीक्षण करते. अशाच अजून काही माहितीपटांमुळे फास्ट फॅशनचे जगाच्या इतरही भागात झालेले सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक भस्मासुराची बलाढ्य शक्ती बघून मती गुंग होते.

‘ओब्रोनी बाबू’

‘ओब्रोनी बाबू’ (Dead white man's clothes) हा घानातल्या स्थानिकी (Twi) भाषेतील एक वाक्प्रचार आहे. जो परदेशातून आलेल्या कपड्यांच्या अकल्पनीय पुरासाठी वापरला जातो. ‘मेलेल्या गोऱ्या माणसाचे कपडे ’असा त्याचा सरळसरळ अर्थ. जेव्हा ७०च्या दशकात पश्चिमेकडून वापरलेले कपडे तिसऱ्या जगातल्या लोकांकडे ढकलायला सुरुवात झाली, तेव्हा त्या उच्च दर्जाच्या कपड्यांकडे बघून स्थानिकांचा विश्वास बसत नव्हता. इतके चांगले कपडे कोणी का बरं टाकून देईल? नक्कीच या कपड्यांचा मालक मेलेला असेल, अशी भाबडी समजून त्यांनी करून घेतली. मात्र आता त्यांना पुरते कळाले आहे की, एक विशाल कचरापेटी म्हणून आपला वापर होत आहे.

दोन दशकांपासून, घानामध्ये ‘ओब्रोनी बाबू’ किंवा मृत पांढऱ्या माणसाच्या कपड्यांचा व्यापार वाढतो आहे. हे सर्व कपडे अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या सधन राष्ट्रांचे आहेत. येणारे सर्वच कपडे सेकंड हँड नसतात. तर न खपलेला, कालबाह्य झालेल्या फॅशनचा डेड स्टॉकही इथे खपवला जातो. घानाची राजधानी अक्रा येथील ‘कांतामंतो मार्केट’ हे कपड्यांनी ओसांडून वाहत असतं. यामुळे गट्ट्यातले कपडे वेगवेगळे करणे, रफू, अल्टर, शिलाई, धुलाई, इस्त्री, हमाली, वितरण अशा हजारो नवीन नोकऱ्या आणि संधी निर्माण झाल्या असल्या तरी, यामुळे मोठ्या पर्यावरणीय आपत्तीसह अनेक चिंताजनक समस्याही निर्माण झाल्या आहेत. सधन राष्ट्रांच्या या मेहेरबानीमुळे तिथले स्थानिक वस्त्र उद्योग नामशेष झाले आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

टनावारी कपड्यांची आवक

केवळ ३० दशलक्ष लोकसंख्या असलेल्या घानात ३०,००० टनांहून अधिक कापड माल बंदरात येतो. जहाजाने आलेले गठ्ठे त्यांच्या नवीन मालकांना दिले जातात. हे नवीन मालक घानाचे आयातदार आहेत. जे त्यांना संपूर्ण देशात आणि बहुतेक आफ्रिकेमध्ये पुनर्विक्री करतात. एक गठ्ठा साधारण ५० ते ९० किलोचा असतो. त्यासाठी त्यांना आगाऊ पैसे द्यावे लागतात. जेव्हा आयातदार कपड्यांचा गठ्ठा खरेदी करतात, तेव्हा कपड्यांची गुणवत्ता तपासण्याचा कोणताही मार्ग नसल्याने खजिना आहे का कचरा, हा जुगारच ठरतो.

स्वस्त, वेगवान फॅशन जगभर पसरत असताना, अलीकडच्या वर्षांत येणाऱ्या कपड्यांची गुणवत्ता खराब होत चालली आहे. यात दान केलेल्या कपड्यांची अवस्था खूपच वाईट असते. बरेच कपडे छिद्रे पडलेले, फाटलेले, अस्वच्छ, घामेजलेले, डागाळलेले असतात. त्यांचा पुनर्वापर करणे शक्य नसल्याने त्याच्यासाठीदेखील तो कचराच ठरतो. अंदाजे ४० टक्के इतके कपडे निकृष्ट दर्जाचे असतात. आयातदार त्यांना मिळणाऱ्या कपड्यांच्या स्थितीबद्दल खेद व्यक्त करतात. हे त्यांच्यासाठी खूप अपमानास्पद असतं. आपले जुने कपडे कुठे जातात? आणि त्यांची विल्हेवाट कशी लावायची? याचा विचार पाश्चिमात्य देशात कोणी करत नाही. जगातील काही वंचित भागाचे हे विदारक सत्य आहे की, त्यांना या सर्व कचऱ्यासह जगावे लागेल आणि सर्वांत मोठे प्रदूषक असल्याचा दोषही त्यांच्या माथी मारला जातो. जागतिक कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या तिसऱ्या जगाला, प्रगत देशांची ही अरेरावी सहन करावी लागत आहे.

घानासारख्या भौगोलिक आकाराने लहान असलेला देश, कचऱ्याची इतकी मोठी समस्या हाताळण्यासाठी सक्षम नाहीये. अशा वेळी समस्या निर्माण करणाऱ्या देशांकडून कोणतेच साहाय्य मिळत नाही. ‘कांतामंतो मार्केट’मधून दर आठवड्याला एक दशलक्ष पौंडांचे कपडे लैंडफिलमध्ये जातात. परिणामी, साधारणतः २५ वर्ष वापरयोग्य लैंडफिलची जागा ३ वर्षांतच संपुष्टात येत चालली आहे.

याचा परिणाम असा होतो की, पावसाळ्यात शहरातील नाले तुंबतात, पूर येतो. समुद्र किनाऱ्यावर कपड्याच्या हजारो गुंडाळ्या मृतदेहांसारख्या लाटांमुळे पुढे-मागे होत असतात. समुद्रकिनारी लोळत असलेल्या, ३०-३० फूट लांब, रेतीमध्ये अडकलेल्या, गाडलेल्या, सडलेल्या कपड्यांच्या वेड्यावाकड्या रांगांच्या रांगा दिसतात. तिथेच जवळ २० मीटर मोठी टेकडी, जी माती, दगडांनी नाही, तर मातीच्या भरावातून तयार झाली आहे. त्यात ७० टक्के अवांछित कपडे आहेत. तयार झालेला ढीग इतका मजबूत, भक्कम आहे की, त्याच्या वरच्या बाजूला झोपड्या आहेत. इथे अक्षरश: चिंध्यांच्या पायावर वसलेली झोपडपट्टी दिसते. काही अंशी का होईना पण कापड-कचरा जाळणे, गरजेचे असल्याने, अक्राचे आकाश कायम धुराने काळवंडलेले असते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

घानासारखेच चित्र ब्राझील, केनिया, सोमालिया, मोझांबिक, नेदरलँड अशा अजून काही भागांमध्ये आहे. भारतदेखील यूएस, यूकेसह जगभरातील देशांमधून मोठ्या प्रमाणावर सेकंड हँड कपडे आयात करत आहे. ज्यांचा प्रवास शेवटी हरियाणातल्या पानिपत इथे होतो. आपणही कपडे-कचरा समस्येच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत.

दक्षिण अमेरिकेतील चिली हा देश सुंदर पर्वतांसाठी ओळखला जातो. त्या पर्वतांपेक्षा वेगळा डोंगर अटाकामाच्या वाळवंटामध्ये निर्माण झाला आहे, तो टाकून दिलेल्या कपड्यांचा! जगात दर सेकंदाला एक ट्रकभर कपडा कचरा जाळला किंवा लँडफिलमध्ये रिकामा होत असतो. एलेन मॅक ऑर्थर फौंडेशनच्या मते, जगभरातील वाढत्या मध्यमवर्गीय लोकसंख्येमुळे आणि विकसित अर्थव्यवस्थांमध्ये वाढलेल्या दरडोई विक्रीमुळे गेल्या १५ वर्षांत कपड्यांचे उत्पादन अंदाजे दुप्पट झाले आहे. २०५०पर्यंत जागतिक जीडीपीमध्ये अपेक्षित ४०० टक्के इतकी वाढ होईल, म्हणजे कपड्यांची मागणी आणखी वाढणार आहे. हे वाचून आताच श्वास गुदमरायला लागला आहे. कारण कापड मग ते कोणत्याही प्रकारचे असो, ते पूर्णपणे विघटन व्हायला २०० वर्षं लागतात.

फास्ट फॅशनचे दुष्परिणाम

गेल्या वर्षी युकेस्थित मार्केट फाउंडेशन, सिंथेटिक्स इनॉनिमस फॅशन ब्रँडच्या अहवालात, आपले कपडे बहुतेक प्लॅस्टिकपासून कसे बनवले जातात, हे सत्य लपलेलं नाहीये. सिंथेटिक तंतू आता कापडांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व सामग्रीच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त प्रमाणात असतात. ते आणखी वाईट होत चालले आहे. २०३०पर्यंत ही संख्या जवळपास तीन-चतुर्थांश गाठण्याची भीती आहे.

कपड्यांचे उत्पादन करताना भरपूर नैसर्गिक संसाधने वापरली जातात आणि हरितगृह वायू उत्सर्जन निर्माण होते. ही संसाधने आणि त्यातून निर्माण होणारे उत्सर्जन हवामान बदलासाठी जबाबदार घटक असतात. जाणकारांच्या मते, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आणि शिपिंगच्या एकत्रित तुलनेत वस्त्रोद्योगाचे उत्पादन हवामान बदलामध्ये अधिक योगदान देते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

फक्त एक पांढरा सुती शर्ट खरेदी केल्याने ३५ मैल कार चालवण्याइतकेच उत्सर्जन होते. एकूणच, जागतिक उत्सर्जनासाठी ८-१० टक्के फॅशन उद्योग जबाबदार आहे, असे ठामपणे म्हणता येते. फॅशन उद्योगाचा हा बेजबाबदारपणा पाहता २०३०पर्यंत जागतिक कपड्यांची विक्री ६५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. फॅशन उद्योगातून होणारे प्रदूषण हे मुख्यतः कच्च्या मालाच्या वापरामुळे घडून येते. फॅशन उद्योगासाठी कापूस हे पीक जगातील सुमारे २.५ टक्के इतकी शेतजमिनी वापरते, तर पॉलिस्टरसारख्या कृत्रिम घटकांना दरवर्षी अंदाजे ३४२ दशलक्ष बरेल तेल लागते. कपड्यांच्या तंतू आणि रंगांमधून रसायने बाहेर पडून हवेत मिसळल्याने होणारे प्रदूषण तर त्याहून चिंताजनक आहे.

फास्ट फॅशनची नकारात्मक व सर्वांत चिंतेची बाब म्हणजे पाण्याच्या स्त्रोतांमध्ये होणारा विषारी रसायनांचा प्रवेश वन्यजीवांनाही हानी पोहोचवतो. समुद्र आणि गोड्या पाण्याच्या जैवसंस्थेचा नाश करतो. काही रसायनामुळे महासागरातील आम्लीकरण होऊन सागरी अन्नसाखळीवर दूरगामी परिणाम करतात. फॅब्रिक्समधून बाहेर पडणाऱ्या मायक्रोफायबर्समुळे आरोग्याच्या समस्याही उद्भवू लागल्या आहेत. समुद्रीखाद्य किंवा पिण्याच्या पाण्यातील मायक्रोप्लास्टिक विशेषतः हानिकारक असतात. दरवर्षी अर्धा दशलक्ष टन प्लास्टिक मायक्रोफायबर समुद्रात टाकले जाते. जे ५० अब्ज प्लास्टिकच्या बाटल्यांच्या समतुल्य आहे. (संदर्भ : वर्ड इकॉनॉमिक फोरम)

माहितीपटांचा प्रभाव

फॅशन उद्योगाच्या भस्मासुरी भुकेमुळे होणारे किंवा कधीही भरून न निघणारे नुकसान त्या-त्या देशांतले जाणकार अभ्यासक वेळोवेळी जगापुढे आणत आहेतच. परंतु कलेच्या माध्यमातूनही हा पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास जगापुढे आणण्यासाठी लघुपट - माहितीपट निर्माते पुढे सरसावलेले दिसत आहेत. अशाच काही लक्षवेधी माहितीपटांपैकी एक आहे, ‘रिव्हरब्लू’ हा माहितीपट. तो वस्त्रोद्योगातील टाकाऊ पद्धतींचा जगावर कसा परिणाम होतो, याचा शोधात्मक प्रवास मांडतो. जलसंवर्धन समर्थक जेशन प्रीस्टली यांचे कथन असलेला व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नदी संरक्षक मार्क अँजेलो या दोघांच्या तीन वर्षांच्या अथक परिश्रमातून हा माहितीपट आकारास आलेला आहे.

जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या प्रदूषणकारी उद्योगाची तपासणी करण्यासाठी संपूर्ण जगभरात प्रवास करून, बांगलादेश, भारत आणि चीन यांसारख्या ठिकाणच्या नद्यांमधील रासायनिक कचऱ्याची तपासणी करून त्यांनी तथ्य मांडले आहे. हा माहितीपट विषारी व प्रदूषित नद्या, उद्योगाची प्रगती आणि निसर्ग विनाशाच्या समस्या दर्शविणाऱ्या प्रतिमा आणि वास्तव कथन या आधारे माहिती देतो.

https://nomadicfriends.com/pages/river

बेजबाबदारपणे कचऱ्याची विल्हेवाट लावल्यामुळे, विषारी पदार्थांच्या डम्पिंगमुळे जगभरातील नद्यांवर गंभीर परिणाम होत आहे. कपडे उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा, हा पर्यावरणासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. हा माहितीपट निळ्या जीन्स व लेदर उत्पादनावर लक्ष केंद्रित करून कापड उद्योगातील विषारी प्रथा दर्शवतो.

जीन्सची एक जोडी तयार करण्यासाठी आवश्यक असलेले अमाप पाणी आणि डिझाइनिंग प्रक्रियेत वापरला जाणारा फॅब्रिक डाय, ज्यामध्ये असलेला घातक पदार्थ व जीन्सच्या खास रंगांची मागणी असलेल्या रंगांमधील कार्सिनोजेन तसेच लेदर टॅनिंगमधील जड धातू हे घटक वन्यजीवांवर कसा परिणाम करतात, हे दूषित पाण्याच्या चाचण्या करून, ढळढळीत पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. अनियंत्रित टॅनरींमुळे कातडे आणि कापड रासायनिक प्रक्रिया उद्योगामुळे बांगलादेशातील बुरीगंगा नदीवर सांडपाण्याचा इतका भयानक परिणाम झाला आहे की, टॅनरींची सर्वाधिक संख्या असलेल्या हजारीबाग जिल्ह्यात (ह्युमन राइट्स वॉचच्या २०१२ केलेल्या एका सर्वेक्षणानुसार बांग्लादेशात अंदाजे २२० टॅनरी आहेत. यातल्या जवळपास ९५ टक्के टॅनरी एकट्या हजारीबाग जिल्ह्यात वसलेल्या आहेत.) गंधाची जाणीव पूर्णपणे गमावलेली मुलं त्यांना आढळली.

चीनमधील काही नद्यांमध्ये असलेले काळे चिकट पाणी, त्या नद्यांच्या काठावर ‘कर्करोगाची गावे’ वसलेली या माहितीपटात आपल्याला दिसतात. आणि अर्थातच बघताना आपल्याला अस्वथ व्हायला होतं. भारतातील गंगा नदीदेखील बेसुमार औद्योगिकीकरणाची बळी ठरली आहे, या साऱ्याचा सप्रमाण पर्दाफाश या माहितीपटात करण्यात आला आहे.

कंपन्या त्यांच्या उत्पादन आणि कचरा विल्हेवाट प्रक्रियेपासून लोकांना अंधारात कसे ठेवतात, याचं भयावह दर्शन यात आपल्याला होतं. कारखान्याचे पाईप भूमिगत असल्याने कारखान्यांचे साहित्य पाण्यात टाकताना कोणीही पाहू शकत नाही; दूषित द्रव आणि साहित्य नंतर सिंचन कालव्यामध्ये जाते आणि ते अन्न साखळीत प्रवेश करतं, असा हा माणसाच्याच मुळांवर उठणारा प्रवास आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

‘रिव्हरब्लू’ने मांडलेली तथ्ये

- कारखान्यांमधून वर्षाला ८० अब्ज कपड्यांची डिलिव्हरी केली जात आहे. फास्ट फॅशनची सर्वाधिक मागणी, उत्पादन आणि विल्हेवाट याद्वारे ९२ दशलक्ष टन कचरा तयार होतो.

- जगभरातील पाण्याचा सुमारे २० टक्के कचरा फॅशन इंडस्ट्रीद्वारे तयार केला जातो आणि टेक्सटाइल डाइंग हे जागतिक स्तरावर पाण्याचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे प्रदूषण आहे.

- जीन्सची ठराविक जोडी बनवण्यासाठी सुमारे २००० गॅलन पाणी लागते. आणि २०,००० लिटर पाणी एक किलो कापूस तयार करण्यासाठी लागतो.

- एकंदरीत, हा वस्त्रोद्योग पाण्याचा अपव्यय करणाऱ्या टॉप ३ उद्योगांपैकी एक आहे, जो दरवर्षी २.५ अब्ज टनांपेक्षा जास्त सांडपाणी सोडतो.

- कमी किमतीत एखादी वस्तू विकत घेणे, हे खरोखर जगाच्या इतर भागांतील लोकांच्या मृत्यू, आजारपणात आणि दुःखात योगदान देते, याचा विचार करण्याची मागणी ‘रिव्हरब्लू’ कळकळीने करते...

 उपेक्षितांची हाक

अशी कळकळीची हाक ‘द टु कॉस्ट’मधून ऐकायला येते. ती हाक आहे, ‘पुरवठा तशी मागणी’ हे नवीन समीकरण बनवणाऱ्या H&M, Forever, Zara या सारख्या २१ कंपन्यांसाठी काम करणाऱ्या स्वस्त कामगारांची! कागदोपत्री या कामगारांशी त्याच्या काहीही संबंध नसतो. हे ब्रॅण्ड्स अशा जागतिकीकृत उत्पादनात भाग घेतात. जागतिकीकृत उत्पादनाचा अर्थ असा आहे की, सर्व वस्तूंचे उत्पादन कमी किमतीच्या अर्थव्यवस्थांना ‘आउटसोर्स’ केले गेले जाते, जिथे मजुरी कमी आहे, जिथले औद्योगिक, कामगार हक्क, पर्यावरण कायदे शिथिल आहेत. कंपन्यांना उत्पादने कोठे बनवायची, ते निवडण्याची संधी असते, म्हणून जर एखाद्या कारखान्याने म्हटले की, आम्ही आता इतक्या स्वस्तात काम करू शकत नाही, तर ब्रँड म्हणेल मग आम्ही यापुढे तुमच्याकडे येणार नाही, आम्ही स्वस्त असलेल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊ.

या दबावामुळे २०१३मध्ये बांगलादेशातील ढाका गार्मेंट फॅक्टरी कोसळून १,१३४ कामगारांचा मृत्यू झाला होता. इमारत कोसळण्यापूर्वी कामगारांनी या इमारतीबद्दल तक्रारी केल्या होत्या. इमारतीला तडे, भेगा पडल्या आहेत, एकंदरीत इमारतीची अवस्था बिकट आहे, असे निदर्शनात आणून काम बंद केल्यावर, ऑर्डर वेळेत पूर्ण न केल्यास मोठं नुकसान होईल, या भीतीपोटी मालकाने ‘कामावर या नाहीतर एक महिन्याचे वेतन देणार नाही’ अशी धमकी दिली होती. हातावर पोट असल्याने कामगार रुजू झाले आणि त्याच दिवशी ही इमारत कोसळली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

या घटनेने अंतर्मुख झालेल्या अँड्रयू मॉर्गन यांनी जगातील फॅशनसाठी कपडे बनवणाऱ्या व कपड्यांच्या प्रत्येक बाजूची आणि फॅशन उद्योगाची कथा ‘द टु कॉस्ट’मधून सांगितली आहे. कारखान्यात कपड्यांचे उत्पादन सुरू होण्याआधीच गडबड व्हायला लागते. कारखान्यांमध्ये स्थिर उत्पादन दरामुळे मोठ्या प्रमाणात कापूस लागतो. शेतकरी मागणी कायम राहिली पाहिजे, म्हणूनच ते जनुकीय अभियांत्रिकी बियाण्यांच्या वापराकडे वळतात. या बियांना जास्त प्रमाणात कीटकनाशकांची आवश्यकता असते. त्यामुळे कालांतराने रसायनांवर अवलंबून राहावे लागते. मागणी पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कीटकनाशकांच्या रक्कमेमुळे शेतकरी इतके कर्जबाजारी होतात की, ते आत्महत्येकडे ढकलले जातात.

असाच दबाव इतर देशांतही आढळतो. विशेषतः बियाणे आणि कृषी रसायनांच्या खरेदीच्या कर्जामुळे २५०,०००हून अधिक भारतीय शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या व्यतिरिक्त, कीटकनाशके कर्करोग/मृत्यू दर आणि जन्म दोष वाढवतात, हे सिद्ध झाले आहे. वस्त्रोद्योगात वापरल्या जाणारा ९० टक्क्यांपेक्षा जास्त कापूस जनुकीय उत्परिवर्तित असतो. त्यात मोठ्या प्रमाणात रसायने आणि पाण्याचा अपव्यय होतो. कापूस उत्पादन आता जगभरातील कीटकनाशकांच्या वापराच्या १८ टक्के आणि एकूण कीटकनाशकांच्या २५ टक्के वापरासाठी जबाबदार आहे. कीटकनाशकांच्या वापरामुळे ते वापरल्या जाणाऱ्या जमिनीवर आणि आजूबाजूच्या वनस्पती आणि जीवजंतूंवर दीर्घकालीन भयंकर परिणाम होतात, ते वेगळेच.

शेवटी, चामड्याचे उत्पादन विविध पर्यावरणीय आणि मानवी आरोग्याच्या धोक्यांशी वाढत्या प्रमाणात जोडले जात आहे. चामड्याच्या उत्पादनासाठी पशुधन वाढवण्यासाठी वापरले जाणारे चारा, जमीन, पाणी आणि जीवाश्म इंधने आपल्या जगाच्या आरोग्यासाठी खूप मोठी किंमत मोजतात. आवश्यक पशुधन वाढवण्याव्यतिरिक्त, लेदर टॅनिंग प्रक्रिया ही फॅशन सप्लाय चेनमधील सर्वांत विषारी घटक आहे. कामगारांना कामावर हानिकारक रसायनांचा सामना करावा लागतो, तर निर्माण होणारा कचरा नैसर्गिक जलस्रोतांना प्रदूषित करतो ज्यामुळे आजूबाजूच्या भागात रोगराई वाढते. अभ्यासात असे आढळून आले आहे की, लेदर टॅनरी कामगारांना कर्करोगाचा धोका २० ते ५० टक्क्यांच्या दरम्यान असतो.

वरील माहितीपटांद्वारे वस्त्र व्यवसाय, फास्ट फॅशनची काळी बाजू बघून ‘देखे भयानक झांकियेलें डोळे’ अशी आपली गत होते. त्यामुळे जे कोणी वॉडरोब कपड्यांनी ओसांडून जात असून देखील, ‘घालायला कपडे नाहीत’ असे म्हणत असतील, त्यांनी या डॉक्युमेंट्री नक्कीच बघायला हव्यात. हाव सुटलेल्या जगाच्या भेसूर चेहऱ्याची निदान या निमित्ताने तोंडओळख तरी होऊन जाईल.

.................................................................................................................................................................

‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या जून २०२३च्या अंकातून साभार.

.................................................................................................................................................................

लेखिका देवयानी पेठकर सामाजिक-सांस्कृतिक विषयांच्या अभ्यासक आणि चित्रपटकला आस्वादक आहेत.

devayanipethkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा