‘त्यांच्यासोबत’ असाल तर स्वच्छ आणि विरोधात असाल तर गलिच्छ! ‘त्यांच्या’ बाजूनं असाल तर ‘देशभक्त’ आणि विरोधात जाल तर ‘देशद्रोही’!
पडघम - साहित्यिक
चंद्रकांत वानखेडे
  • १७व्या अखिल विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आणि संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे
  • Mon , 06 February 2023
  • पडघम साहित्यिक १७वे अखिल विद्रोही मराठी साहित्य संमेलन 17th Akhil Bhartiy Vidrohi Marathi Sahitya Sammelan चंद्रकांत वानखेडेChandrakant Wankhede

१७वे अखिल विद्रोही मराठी साहित्य संमेलन ४ व ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान वर्धा इथे पार पडले. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा दुसरा अंश...

..................................................................................................................................................................

समतेचा मुद्दा जेव्हा जेव्हा समोर येतो, तेव्हा तेव्हा हिंदू उच्चवर्णीयांना पोटदुखी सुरू होते. हिंदू उच्चवर्णीयांनी आपल्याच हिंदू बांधवांवर हजारो वर्षे केलेल्या अन्याय-अत्याचारावर पडदा टाकण्यासाठी सातत्याने हिंदू-मुस्लीम द्वेषाला खतपाणी घातलं जातं. मी, माझी जात व माझं जन्मजात वर्णश्रेष्ठत्व म्हणजेच राष्ट्र, असं मानणार्‍यांचा राष्ट्रवाद सध्या जोरात आणि जोमात आहे. हा राष्ट्रवाद थोडा खरवडला, तर त्याखाली हिंदुत्ववाद दिसतो आणि हा हिंदुत्ववाद थोडा खरडला की, त्याखाली ब्राह्मणवाद दिसायला लागतो.

सध्या या राष्ट्रवादाच्या विरोधात बोलणार्‍याला ‘देशद्रोही’ ठरवलं जातं. खरं तर हिंदुत्ववादी हा हिंदूच असत नाही. गाय आणि गायीच्या अंगावरचे गोचीड. गोचिडाच्या अंगातदेखील गायीचं रक्त आहे, म्हणून गोचीड जसा गाय होऊ शकत नाही, त्याप्रमाणे हिंदुत्ववाद्यांच्या अंगात हिंदूचं रक्त आहे, म्हणून हिंदुत्ववादी हिंदू होऊ शकत नाही. दुर्दैवाने गोचिडाला मारण्यासाठी जी जी काठी उगारली गेली, ती ती गायीच्या पाठीवर बसत गेली आणि आज परिणास्वरूपी गायच खाटिकधार्जिणी होऊन बसली.

औरंगजेब हिंदूद्वेष्टा कसा होता, हे ठसवण्यासाठी औरंगजेबाने हिंदूंवर ‘जिझिया’ कर कसा लावला होता, हे उच्चरवाने सांगितले जाते, पण हा ‘जिझिया’ कर ब्राह्मणांवर नव्हता, ही बाब मात्र लपवली जाते. औरंगजेब ब्राह्मणांना हिंदू समजत नव्हता की काय? हिंदू आणि हिंदुत्ववादी एक असत नाहीत, या विधानाला ‘जिझिया’ करातून ब्राह्मणांना वगळून औरंगजेब पुष्टीच तर देत नाही ना? औरंगजेबासाठी ब्रह्मवृंदांनी दुवा मागितल्याचे दाखले आहेत. ब्राह्मणांनी आपल्या निष्ठा खाविंदचरणी अर्पण केल्या होत्या. औरंगजेबाच्या वतीने मिर्झा राजे शिवाजी महाराजांवर म्हणजेच स्वराज्यावर चाल करून जातो, तेव्हा शिवाजी महाराजांविरुद्ध मिर्झा राजेंना जय मिळावा, म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कोट चंडियज्ञ केला होता, ही बाब तर सर्वविदित आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसुद्धा महाराष्ट्रातील ब्रह्मवृंदांनी नाकारला होता. ही बाबही जगजाहीर आहे. या सर्व बाबी ध्यानात घेऊन औरंगजेबाने ब्राह्मणांना ‘जिझिया’ करातून सवलत दिली असेल?

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६मध्ये येवला येथे ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही’, ही घोषणा केली. त्यानंतर त्यांनी हिंदू सनातनी कर्मठ धर्ममार्तंडाच्या वागणुकीत काही बदल होतो का, म्हणून तब्बल २० वर्षे वाट पाहिली आणि १९५६मध्ये त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. लाखोंच्या संख्येने हिंदूंची संख्या कमी झाली ती मुसलमानांचा अन्याय, अत्याचारामुळे नव्हे, तर हिंदुत्वाच्या जन्मजात वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनेने दलितांवर केलेल्या छळामुळे आणि खापर फोडतात मुस्लिमांमुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे म्हणून!

पाकिस्तान निर्मितीचे जनक मोहंमद अली जिना आहेत, असे म्हटले जाते. गांधींनाही फाळणीसाठी जबाबदार धरण्याचा खटाटोप हिंदुत्ववाद्यांकडून वारंवार केला जातो. पण, प्रश्नाच्या मुळाशी गेलं तर आढळून येईल की, यासाठी जबाबदार खर्‍या अर्थाने सनातनी ‘हिंदुत्ववादी’च आहेत. जिना मूळचे हिंदू लोहाना समाजाचे. त्यांच्या वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय. लोहाना समाजात मासेमारीचा व्यवसाय निषिद्ध. म्हणून कर्मठ सनातनी हिंदुत्वाद्यांनी त्यांचा छळ केला. याच छळापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी धर्मांतर केले. त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला. अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला व पाकिस्तानच्या निर्मितीच्या जनकाला जन्म दिला असेल, तर आपल्याच हिंदू बांधवांना धर्माच्या नावाखाली छळणार्‍या कर्मठ सनातनी हिंदुत्ववाद्यांनी. पण हे आपले पाप झाकण्यासाठी वारंवार मुस्लिमांचा आधार घेत असतात, हेही तेवढेच खरे.

दुर्दैवाने खरा इतिहास लिहिलाच गेला नाही. काश्मीर प्रश्न नेहरूंनी निर्माण केला, अशा खोट्यानाट्या पावत्या आजही नेहरूंच्या नावाने हिंदुत्ववादी फाडत असतात. काश्मिरी पंडितांवरील मुस्लिमांनी केलेल्या भीषण अन्याय-अत्याचाराचे अतिरंजित चित्रण ‘काश्मीर फाइल्स’ सिनेमात केले आहे. मुस्लीम द्वेषावर आधारित या सिनेमाचे ‘प्रमोशन’ खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी केले. अशा प्रकारच्या सिनेमाचे प्रमोशन करण्याचा ‘पायंडा’ या देशात प्रधानमंत्र्यांनी पाडला.

अर्थात सरसंघचालक मोहन भागवत याबाबतीत मागे राहण्याची शक्यता कमीच. त्यांनीही या सिनेमाचं प्रमोशन केलं. प्रेक्षकांना हा सिनेमा फुकटात दाखवण्याची चढाओढ भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. या सिनेमाने करोडोचा धंदा केला व मुस्लीम द्वेषाचे भरघोस पीक या माध्यमातून घेतले गेले. जे भाजपला भविष्यात ‘राजकीय’ फायदा करून देईल.

पण या विषयाची एक दुसरीही बाजू आहे. हरिसिंग काश्मीरचे राजे होते, तेव्हा मोठ्या संख्येनी हिंदू धर्मातून धर्मांतरित झालेल्या मुस्लिमांनी त्यांना हिंदू धर्मात परत घेण्याची विनंती केली. हरिसिंगांनी त्यांना सांगितले, ‘हा प्रश्न धर्मक्षेत्रातील असल्यामुळे यावर निर्णय काश्मीरी पंडित घेतील’. निर्णयासाठी हा प्रश्न काश्मिरी पंडितांकडे सोपवण्यात आला, पण काश्मिरी पंडितांनी या प्रश्नापासून हात झटकत या प्रश्नावर केवळ काशीचे पंडितच निर्णय देऊ शकतात, असा निवाडा दिला. काशीच्या पंडितांनी त्या धर्मांतरित मुस्लिमांना हिंदू धर्मात घेण्यास नकार दिला. आता हिंदूंची लोकसंख्या कमी होण्याला जबाबदार कोण? हिंदू धर्माचे धर्ममार्तंड की मुस्लीम?

इतिहास घडवण्याची ‘औकात’ हिंदुत्ववाद्यांमध्ये कधीच नव्हती; पण इतिहासाची मोडतोड करून जनतेसमोर सादर करण्याची क्षमता मात्र दांडगी होती आणि आजही आहे. आणि आज तर राज्यसत्ताही त्यांच्या ताब्यात आहे. इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर हे तसे हिंदुत्ववादीच. पण त्यांच्या मते, ‘संशोधक ब्राह्मण, इतिहास लेखक व विवेचक ब्राह्मण, संपादक ब्राह्मण, व्याख्याते ब्राह्मण, शिक्षक ब्राह्मण चळवळी त्यांनी काढल्या आणि या सर्वांचे श्रोते, वाचक व अनुयायी तेही ब्राह्मण!’

या सर्व बनावाचा दुष्परिणाम असा की, ब्राह्मणांची कर्तबगारी अगदी गागाभट्टांपासून तर गोळवलकरांपर्यंत अशा प्रकारे फुगवण्यात, सोज्वळ करण्यात, चुकीची व म्हणूनच खोटी करून सांगण्यात शक्य तेवढी जास्त कोशीश करण्यात आली. इतिहासकार शेजवलकरांच्या या मताच्या प्रकाशात मग इतिहास तपासायला गेलो, तर अनेक बाबी स्पष्ट दिसायला लागतील. पण, पाहायला कोणाला वेळ आहे? त्यांनी फेकत जावं आणि आम्ही झेलतं जावं, असंच प्रामुख्यानं होत राहिलं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मी आयुष्यभर काँग्रेसविरोधक राहिलो. काँग्रेस बहुतांश काळ प्रस्थापित सत्तेत होती. म्हणूनही कदाचित काँग्रेसच्या विरोधी राहिलो. सत्तेचा विरोध ही माझी स्वाभाविक प्रेरणाच होती की काय, मला माहिती नाही. सत्तेचा विरोध, सत्तेविरुद्ध आंदोलन, त्यामुळे स्वाभाविकपणे तुरुंगवास, वेगवेगळ्या कारणांसाठी गुन्हे दाखल. त्यामुळे त्या कारणांसाठी कोर्टाचे नियमितपणे तारखेवर खेटे घेणे क्रमप्राप्त होते. आणीबाणीच्या विरोधात याच वर्ध्याच्या तुरुंगात वर्षाचा तुरुंगवास भोगला.

एवढं सगळं होऊनही काँग्रेसच्या राजवटीत कोणी मला चुकूनही ‘देशद्रोही’ म्हटलं नाही. काँग्रेसच्या विरोधात का बोलता? का लिहिता म्हणून कोणी टोचलं, टोकलं नाही. आता तर विद्यमान भाजप  सरकारविरोधात लिहितो, बोलतो, तेव्हा मोठ्या प्रमाणात ‘ट्रोल’ केले जाते... तेही फार सुसंस्कृत भाषेमध्ये. देशद्रोह्यांमध्ये तर माझी गणना होतेच. त्याचंही आता फारसं अप्रूप वाटत नाही.

काँग्रेसच्या काळात काँग्रेसने स्वायत्त संस्था बर्‍यापैकी अबाधित ठेवल्या होत्या. या देशाच्या पंतप्रधानाविरोधात, इंदिरा गांधींविरोधात अलाहाबादच्या उच्च न्यायालयात निर्णय दिला जातो. हे केवळ काँग्रेसच्याच काळात घडू शकत होतं, हे आज जाणवतं. या विद्यमान पंतप्रधानाच्या विरोधात एखादं न्यायालय निर्णय देईल, याची सुतराम शक्यता वाटत नाही. तसं जर काही होण्याची शक्यता निर्माण झाली, तर त्याचा न्यायमूर्ती लोया कसा केला जातो, याचं पुराव्यासह वर्णन पत्रकार निरंजन टकले यांनी आपल्या ‘हू किल्ड लोया?’मध्ये केलं आहे. 

काँग्रेसच्या काळात शेषनसारखा खमक्या निवडणूक आयोगाचा अध्यक्ष होण्याची शक्यता होती. आता असा शेषन तयार होण्याआधीच कोणत्या का कारणाने होईना तुरुंगामध्ये जाईल आणि वर्ष दोन वर्ष त्याची जमानतही होणार नाही. विरोधकांच्या बाबतीत इतकं टोकाचं, सुडाचं राजकारण आधीच्या सत्तेनं केलं नाही. सत्तेच्या माध्यमातून चालणारी न्यायदानाची ‘प्रोसेस’ हीच आज ‘पनिशमेंट’ म्हणून उघड्यानागड्या पद्धतीनं काम करत आहे.

सत्ताधारी पक्ष आज एकप्रकारे वॉशिंग मशीनचं काम करत आहे. त्यांच्यासोबत असाल तर स्वच्छ आणि विरोधात असाल तर गलिच्छ! त्यांच्या बाजूनं असाल तर ‘देशभक्त’ आणि विरोधात जाल तर ‘देशद्रोही’! भाजप म्हणजे ‘हिंदुस्थान’ आणि विरोधक म्हणजे डायरेक्ट ‘पाकिस्तान’, अशा प्रकारे बटबटीत पद्धतीने देशांतर्गत विभाजन सुरू आहे. काळ तर कठीण आहेच. आणि म्हणूनच ‘विद्रोही’ संमेलनासोबत राहून विद्रोहाचीही गरज आहे.

कसाबला फाशी दिली गेली, तेव्हा सार्‍या देशाने आनंद व्यक्त केला, पण या देशातील सरकारच्या ‘कसाब’नीतीमुळे शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतात, याबाबत फारसं दुःख या देशातील जनतेला आहे असं वाटतं नाही. तसे तर या देशात सगळेच प्रश्न संपल्याचा आभास निर्माण केला जात आहे. प्रश्नांचे मढे झाकून ठेवून खुळखुळ्यांनी अन्यत्र लक्ष वेधून घेतल्याने प्रश्न संपत नसतात, हे ‘अच्छे दिन’वाल्या सरकारला कोणी समजावून सांगावे? २०१६ नंतर सरकारने ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो’मार्फत देण्यात येणारी शेतकरी आत्महत्येची आकडेवारी देणं थांबवलं म्हणून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या, असंही होत नाही. फक्त त्या प्रश्नांची तीव्रता त्यामुळे जाणवत नाही एवढेच.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

डॉ. पंजाबराव देशमुख शेतकर्‍यांना ‘धननिर्माता’ म्हणायचे आणि सातत्याने प्रश्न विचारायचे, ‘धननिर्माता निर्धन का? आणि धननिर्माताच कर्जबाजारी का?’ आपण या प्रश्नाचे ना कधी मूळ समजावून घेतले ना त्यातील मेख. मोदी सरकारने कोरोनाचा कहर सुरू असताना शेतकरी ‘कल्याणा’साठी तीन अध्यादेश घाईगर्दीने काढले. या अध्यादेशातील करार शेतीचे समर्थन करताना सरकार म्हणाले होते, ‘शेतकर्‍यांजवळ शेती आहे, पण भांडवल नाही आणि कंपन्यांकडे भांडवल आहे पण शेती नाही.’ या विधानानंतर परत प्रश्न पडतो; पण मुळात शेतकर्‍यांकडे भांडवल का नाही? परंतु हा प्रश्न आपल्याला पडतही नाही आणि पडूही दिला जात नाही. आणि समजा प्रश्न पडण्याची किंचितही शक्यता निर्माण होणार असेल, तर तो प्रश्नच पाताळात गाडण्याची योग्य ती दक्षता घेतली जाते.

पुरातन काळात बळीराजाला पाताळात गाडण्याची कथा आहे. आधुनिक काळात बळीराजाऐवजी बळीराजाचे प्रश्नही पाताळात गाडल्या जाण्याची तजवीज केली जाते, एवढाच काय तो फरक. असाच पाताळात गाडल्या गेलेल्या प्रश्नांपैकी डॉ. भाऊसाहेबांनी विचारलेला प्रश्न आहे आणि तो म्हणजे, ‘धननिर्माता निर्धन का?’ किंवा ‘ज्या शेतीतच भांडवल तयार होतं तिथेचं भांडवलाचा अभाव का?’

शेतीत गुणाकार होतो. एका दाण्याचे हजार दाणे, मूठभराचे मणभर किंवा मणभर दाण्याचे टनभर करण्याची क्षमता शेतीत आहे. त्यामुळे भांडवल तिथे असायला हवे होते, दिसायला हवे होते, पण तिथे ते दिसत नाही आणि असतही नाही. असे का होते? हा प्रश्न खरे तर पडायला हवा होता. पण हा प्रश्न पडतही नाही आणि पडूही दिल्या जात नाही आणि यदा-कदाचित पडलाच तर त्याला उत्तर ठरलेले आहेत. शेतकरी आळशी आहे, व्यसनी आहे, दारू पितो, अडाणी आहे इत्यादी इत्यादी. आता अशा शेतकर्‍यांकडे पैसा कसा राहणार? धन निर्माण करणारा शेतकरी त्याचे धन दारूतच उडवत असेल, त्याचा आळशीपणा व त्यातही त्याच्या अडाणी व मूर्खपणामुळे त्याने तयार केलेले धन त्याला राखता येत नसेल आणि तो निर्धन होत असेल, तर आपण तरी काय करणार, असा साळसूद पवित्रा घेऊन ‘धननिर्माता निर्धन का?’ या प्रश्नाची बोळवण या व्यवस्थेने आतापर्यंत केली आहे. अजूनही करताहेत.

व्यापारात एक वस्तू या हाताने घेऊन त्या हाताला हस्तांतरित केली जाते. या व्यवहारात कोठेही त्या वस्तूचे आकारमान, वजन, संख्या वाढत नाही. फक्त वस्तूचे ‘हस्तांतरण’ होते. तिथे भांडवल दिसते. विपुल प्रमाणात दिसते. कारखान्यात एक किलो लोखंड टाकले तर त्याचे रूप बदलते. त्या लोखंडाचे खिळे होत असतील, नट-बोल्ट होत असेल किंवा अजून काही. म्हणजेच त्या वस्तूचे ‘रूपांतरण’ होते. पण एक किलो लोखंडाचे वजन वाढत नाही. तरीही जिथे केवळ रूपांतरण होते तिथेही भांडवल दिसतं.

पण शेतीत जिथे गुणाकार होतो, एका दाण्याचे हजार दाणे होतात, म्हणजेच वस्तूचे वजन, संख्या, आकारमान कितीतरी पटीने वाढते. तिथे मात्र भांडवलाचा अभाव? मग हे भांडवल जाते कुठे? ते लुटले जाते. लुटारूच ही लूट झाकण्यासाठी शेतकर्‍यांना मूर्ख, आळशी, व्यसनी ठरवून मोकळे होतात. ही लूट समजून घ्यायची झाल्यास ‘शोले’ सिनेमातील बटबटीत का होईना हे उदाहरण उपयुक्त ठरेल.

‘शोले’ सिनेमातील गब्बरसिंग व त्याची दरोडेखोरांची टोळी लुटालूट करणारी व त्यावर जगणारी. गब्बरसिंग व त्याची टोळी शेती करताना दिसत नाही. तरीही ते जिवंत आहेत, म्हणजे त्यांना अन्न मिळत असेल. ते कसं मिळतं? जेव्हा रामगढमधील शेतकर्‍यांच्या खळ्यातील धान्य गावात येतं, तेव्हा गब्बरसिंगची तीन माणसं घोड्यावर बसून, खांद्यावर बंदुका घेऊन रामगढमध्ये येतात. तो प्रसंग आठवा. रामगढचे शेतकरी गब्बरसिंगच्या माणसांसमोर घरातील धान्य टाकताना दिसतात. जी कदाचित त्याची वर्षभराची बेगमी असेल वा अर्थशास्त्रीय भाषेत बोलायचे, तर ती त्याची भविष्यातील बचत असेल. शेतकर्‍याच्या घरातील बचत गब्बरसिंगची माणसं लुटून घेऊन जातात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

नांगराने, बैलाने केलेल्या शेतीपेक्षा घोड्याने व बंदुकीने केलेली शेती फायदेशीर असणार आणि असला किफायतशीर धंदा करायला बर्‍याच लुटारूंच्या टोळ्या सरसावल्या असतील. रामगढच्या शेतकर्‍यांकडे शेती आहे. त्यात होणारा गुणाकार आहे. पण हा गुणाकार, त्यातून होणारी बचत गब्बरसिंगच्या माणसांनी लुटून नेल्यामुळे ‘भांडवल’ मात्र गब्बरसिंगकडे आहे. शेती नांगराला बैल जुंपून करण्यापेक्षा, खांद्यावर बंदूक टाकून, घोड्यावर बसून शेती करू लागले. म्हणून कोणी तलवारीने, कोणी बंदुकीने, कोणी दीड दांडीच्या तराजूने, तर कोणी दामदुपटीने व्याज आकारून ‘शेती’ करणे फायद्याचे ठरू लागले. म्हणून ‘भांडवल’ तेथे दिसू लागले व भांडवल निर्मात्या शेतकर्‍याकडे भांडवलाचा अभाव.

धननिर्माता या लुटीमुळे निर्धन झाला, हे लुटारू थोडेच सांगणार आहेत? त्यातही ज्याला तलवार वा बंदूक झेपली नाही, त्याने हातात ‘धर्मग्रंथ’ घेऊन शेतकर्‍यांना लुटले. त्याला नाव फक्त ‘दक्षिणा’ असे दिले एवढंच. आता चंबळच्या घाटीतील गब्बरसिंग नसेल. त्याला आता घोड्यावर बसून खांद्यावर बंदूक घेऊन शेतकर्‍याच्या घरातील बचत लुटायला रामगढला जाण्याची गरज नाही. तो आता ‘कागदी घोडे’ नाचवूनसुद्धा शेतकर्‍यांच्या घरातील बचत लुटून नेऊ शकतो.

करोनाच्या काळात शेतकर्‍यांच्या ‘कल्याणा’च्या नावे घाईगर्दीने तीन अध्यादेश काढूनसुद्धा हे काम केले जाऊ शकते. (शेतकर्‍यांच्या तीव्र विरोधानंतर हे तीनही अध्यादेश मागे घेतल्या गेले भाग वेगळा.) खळ्यावरून पीक शेतकर्‍याच्या घरात आल्या आल्या शेतकर्‍याच्या मालाचे भाव पडतात. हासुद्धा अत्याधुनिक गब्बरसिंगांच्या लुटीचाच प्रकार असतो. केवळ अन्नधान्याचे भाव वाढले, म्हणजे आता गरिबांचे कसे होणार, ही पिटली जाणारी हाकाटीसुद्धा शेतकर्‍यांच्या बचत-लुटीचा भाग असतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

एका बाजूला शेती उत्पादनाचे भाव नियंत्रित ठेवायचे, तर दुसर्‍या बाजूला शेती उत्पादनासाठी लागणार्‍या वस्तू आणि सेवांचे भाव अनियंत्रिपणे वाढू द्यायचे, हासुद्धा शेतकर्‍यांना लुटण्याचाच भाग असतो. शेतीमालाचे भाव वाढले की ते पाडण्यासाठी आयात करणे. शेतीमालाचे भाव वाढले की, जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत निर्यातीला बंदी. कांद्याचे भाव वाढले, डोळ्यांत पाणी. साखरेचे भाव वाढले, साखर झाली कडू. आब्यांचे भाव वाढले, तर आंबा झाला आबंट. भाजीपाल्याचे भाव वाढले तर गृहिणींचे बजेट विस्कळीत. दुधाचे भाव वाढले तर गरिबांच्या मुलांना घोटभर दूधही दुरापास्त. आणि मग यासाठी (भाव पाडण्यासाठी) सरकारचा हस्तक्षेप… आनंदी आनंद. पण शेतकर्‍यांच्या शेती उत्पादनाचे भाव गडगडले तर सरकार हात झटकून मोकळे.

हा शेतीच्या लुटीचा गब्बरसिंगी कावाच असतो ना! शेतीत येणारे उत्पादन, त्यासाठी होणारा खर्च व त्याला दिली जाणारी किंमत वा मिळणारी किंमत इथेच खरं तर पाणी मुरते. गेल्या कित्येक वर्षांची आकडेवारी पाहिली तर राज्यशासनाने शिफारस केलेल्या भावाच्या तुलनेत केंद्र सरकारने जाहीर केलेले अंतिम हमीभाव हे जास्तीत जास्त ७० टक्क्यांपर्यंतच होते. म्हणजे राज्य सरकारने काढलेला खर्च व दिल्या गेलेल्या किमती येथेच मुळात ‘गड्डा’ (तोटा) ३० टक्क्यांचा. शेतकरी ‘खड्ड्यात’ जाणार नाही, तर दुसरं काय होणार?

स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक शेतकरी ‘कल्याणा’चीच भाषा झाली, पण त्याचे कल्याण तर सोडाच, अकल्याणच जास्त झाले. शेतीत खरं तर पेरलं तेच उगवते. टमाटे पेरले तर वांगे येत नाही. मोगर्‍याची कलमं लावली, तर त्याला धोतर्‍याची फुलं येत नाही. त्याच शेतीत पेरणी कल्याणाची होते आणि शेतकर्‍यांच्या अकल्याणाचेच पीक भरघोस येते. पेरणी शेतकर्‍यांच्या ‘आबादी’ची आणि पीक शेतकर्‍यांच्या ‘बरबादी’चं. शेतकरी ‘जगण्या’साठीची पेरणी आणि भरघोस पीक शेतकर्‍याच्या ‘मरण्या’चे. असं घडतं कसं?

शेवटी, एकूणच डॉ. पंजाबराव देशमुखांनी त्या काळात विचारलेला प्रश्न ‘धननिर्माता निर्धन का?’ हा प्रश्न आजही तेवढाच प्रस्तुत आहे. स्वातंत्र्यानंतर गोरगरिबांच्या कल्याणासाठी एवढा खटाटोप केल्याचं सांगितलं जातं, पण त्यांचं भलं न होता त्यांचं वाईटच होतं. आणि भलं मात्र काही मूठभर लोकांचंच होतं. त्यातही अदानी-अंबानीचंच कोट-कोट कल्याण होतं. हा काय चमत्कार आहे. कोण्या शायरच्या या ओळी आहेत माहिती नाही. तो विचारतो,

‘देखकर फसल अंधेरो की

आप हैरत में क्यू हो

तुमने अपने खेतो में

उजाले बोये ही कहाँ थे?’

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा