विचार करता येणे आणि ते व्यक्त करण्याची शक्ती असणे, या मोठ्या देणग्या आहेत. आपण विचार करू शकतो, हेच आपल्या मनुष्यपणाचे एक गमक आहे
पडघम - साहित्यिक
नरेन्द्र चपळगावकर
  • संमेलनाध्यक्ष नरेन्द्र चपळगावकर आणि ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह
  • Fri , 03 February 2023
  • पडघम साहित्यिक नरेन्द्र चपळगावकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून वर्धा इथे सुरू झाले आहे. रविवारी या संमेलनाचा समारोप होईल. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक, चरित्रकार आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा पहिला अंश...

..................................................................................................................................................................

महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आणि भारताच्या स्वातंत्र्यचळवळीच्या मार्गदर्शनाचे एक महत्त्वाचे केंद्र असलेल्या वर्ध्याच्या या परिसरात हे ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे. या संमेलनाचे आणखीही एक महत्त्व आहे. विदर्भ साहित्य संघाच्या स्थापनेला यंदा शंभर वर्षे होत आहेत. या संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षात हे संमेलन होत आहे. त्याच्या अध्यक्षपदी माझी निवड करून आपण माझा मोठाच सन्मान केला आहे. जे थोडेफार मी लिहिले, विचारांच्या स्वातंत्र्याचा नम्रतापूर्वक पुरस्कार केला, महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेत भर घालणार्‍या काही विचारवंतांचे वाचकांना स्मरण करून दिले, त्याचा हा सन्मान आहे, याची मला जाणीव आहे.

लहानपणी जे संस्कार माझ्यावर झाले, त्यांनी माझ्या लेखनाची आणि विचारांची दिशा ठरून गेली. हैदराबाद संस्थानात निजामाची राजवट चालू असताना माझा जन्म झाला. निजामाचा धर्म सुन्नी मुस्लीम होता आणि संस्थानातील सुन्नी मुस्लीम उर्दू भाषाच बोलत असत. राजाचा धर्म आणि त्याची भाषा यांचेच हे राज्य असेल, असे निजाम उघडपणे सांगतही असे. संस्थानात उर्दू भाषिकांची संख्या पंधरा टक्क्यांपेक्षा कमी आणि तेलगू, कन्नड आणि मराठी या लोकभाषा बोलणारे लोक बहुसंख्य होते. तरीही राज्यात माध्यमिक आणि उच्च शिक्षण, राज्यकारभार आणि राज्याशी संबंधित असलेला व्यवहार यात लोकभाषांना कोणतेही स्थान नव्हते.

राजकीय पारतंत्र्याबरोबरच सांस्कृतिक पारतंत्र्यही आम्ही उपभोगीत होतो. विचारांचे आदानप्रदान जेथे होऊ शकेल, विचारांचे प्रगटीकरण जेथे होऊ शकेल, अशा सर्व गोष्टींना संस्थानात बंदी होती. सभा आणि मिरवणुका यांना तर बंदी होतीच; शिवाय संघटना करण्यालाही परवानगी नव्हती. संस्थानात वर्तमानपत्रे आणि पुस्तके अपवादानेच प्रसिद्ध होऊ शकत होती. संस्थानाबाहेरच्या अनेक वृत्तपत्रावर संस्थानात प्रवेशालाच बंदी होती. अशा घुसमटलेल्या परिस्थितीत मी वाढत होतो आणि स्वातंत्र्याच्या चळवळीचे घरात उमटणारे साद-पडसाद पाहतही होतो.

माझे वडील स्वातंत्र्यचळवळीत सहा-सात वेळा तुरुंगात गेले. त्यांच्यावर झालेल्या खटल्यांपैकी किमान तीन खटले त्यांनी केलेल्या भाषणाबद्दल होते. स्वातंत्र्याचा विचार लोकांना सांगणे आणि दडपशाहीचा निषेध जाहीरपणे सभातून करणे, हा निजामाच्या दृष्टीने मोठाच गुन्हा होता. घरात जी पुस्तके यायची आणि मलाही वाचाविशी वाटायची, ती म्हणजे ‘काव्यज्योती’सारखा एखादा कवितासंग्रह किंवा शिवरामपंत परांजप्यांचे बोचक उपराधाने भरलेले ‘काळातील निवडक निबंध’ या काळाचा परिणाम असेल. पुढे माझे मन रमले, ते स्वातंत्र्याच्या इतिहासात. थोड्याफार कथा आणि कविता मी लिहिल्या, पण ते ओढूनताणून आणलेले चंद्रबळ होते. लवकरच ते ओसरले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

इतिहासाचे शिस्तशीर लेखन करण्यासारखा माझा व्यासंग नव्हता आणि त्या काळात तशी साधनेही मला उपलब्ध नव्हती. व्यक्तिचित्रे आणि चरित्रे हा लेखन प्रकार मला अधिक आवडला. ज्यांच्याबद्दल लिहावे, अशा व्यक्ती सुदैवाने अवतीभोवतीच वावरत होत्या. त्यांना जवळून पाहण्याचे, ऐकण्याचे आणि त्यांच्या मोठेपणाला जाणून घेण्याचे भाग्य मला लाभले होते. हैदराबादचा स्वातंत्र्यलढा आणि त्यातला मराठवाड्याचा सहभाग मराठी वाङ्मयाला फारसा परिचित नव्हता. मी जी व्यक्तिचित्रे लिहीत होतो त्यातून आणि ‘कर्मयोगी संन्यासी’सारख्या चरित्रातून स्वामी रामानंद तीर्थांच्या जीवनकहाणीबरोबरच स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासही प्रगट होत होता. या नायकांचे व्यक्तित्व लढ्याच्या इतिहासातूनच घडले होते.

नंतरच्या काळात मला एकोणिसाव्या शतकात झालेल्या सामाजिक आणि वैचारिक उलथापालथीविषयी कुतूहल वाटले. धर्म आणि समाज यांच्याविषयी किती मूलभूत विचार या काळात झाला हे पाहता पाहता मी त्यात गुरफटून गेलो. आपण हेही लिहावे असे वाटले. अलीकडच्या काळात भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांबद्दल, विशेषतः त्यांच्या परस्परांशी असलेल्या संबंधांबद्दल अनेक समज गैरसमज पसरलेले आहेत, असे माझ्या लक्षात आले आणि मी त्यांना समजून घेण्यासाठी काही व्यक्तिचित्रे लिहिली. अगदी अलीकडे पंतप्रधान नेहरूंचे चरित्रही याच कारणासाठी मला लिहावेसे वाटले. या सर्व लेखनात मी किती यशस्वी झालो, याचा निर्णय अर्थातच वाचकांचा असतो. मला मात्र हे लेखन मी करत असताना त्या कालखंडाच्या दर्शनाबरोबरच कर्तव्यपूर्तीच्या समाधानाचाही अनुभव आला, हे नमूद केले पाहिजे.

या संमेलनाच्या निमित्ताने आज कमी होत चाललेल्या वैचारिक लेखनाबद्दल, मराठी भाषा आणि वाङ्मय यांच्या सध्याच्या स्थितीबद्दल आपल्याशी बोलावे, असे मी योजिले आहे.

स्वतंत्र विचारशक्तीची जाणीव

भारतात ब्रिटिशांचे राज्य स्थिर झाल्याबरोबर त्यांनी जे नवे शिक्षण सुरू केले, त्यामुळे भारतीयांच्या मानसिकतेत मोठाच बदल होऊ लागला. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, अशी सामाजिक शास्त्रे आणि विज्ञान विषय यांच्या परिचयाने हा बदल होत होता. या शास्त्रांच्या परिचयाने जग ज्ञानक्षेत्रात किती पुढे गेले आहे, आपण वैचारिकदृष्ट्या गोठलेल्या स्थितीत आहोत, याची नीट कल्पना आली. सामान्य माणसानेसुद्धा स्वतंत्रपणे विचार करावा, देशाच्या स्थितीविषयी अगर राज्यकारभाराविषयी आपले मत व्यक्त करावे, तो त्याचा अधिकार आहे, असे आपल्याला पूर्वी वाटतच नव्हते. स्वतःचे जीवन कसे असावे, याबद्दल निर्णय घेण्याचा व्यक्तीचा अधिकार भारतीय समाजव्यवस्थेत रुजलेला नव्हता. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे, तिलाही स्वतःची प्रतिष्ठा आहे, हे मूल्य नव्याने अधोरेखित होत होते. आजवर आपण विचार करण्याची गरज नाही, आपण काय करावे, कसे करावे, कसे वागावे हे धर्म, परंपरा आणि राजसत्ता ठरवतील आणि काही बाबतीत आपले कुटुंब ठरवील, असेच मानले जात होते. प्रथमच स्वतःबद्दलचे निर्णय स्वतः घेता येण्याची शक्यता निर्माण झाली. सर्व व्यक्ती समान आहेत व त्यांना समान अधिकार असतात, हे भारतीय विद्यार्थ्यांच्या वाचनात येऊ लागले. आपणही आजूबाजूच्या जगाचा आणि आपल्या स्थितीचा विचार करावा, असे त्यांना वाटू लागले.

विचारच प्रगतीची प्रेरणा देतो

विचार करता येणे आणि ते व्यक्त करण्याची शक्ती असणे, या मानवजातीला मिळालेल्या दोन मोठ्या देणग्या आहेत. किंबहुना आपण विचार करू शकतो, हेच आपल्या मनुष्यपणाचे एक गमक आहे. माणसाच्या आणि जगाच्याही प्रगतीची प्रेरणा विचारातूनच आपल्याला मिळत गेली आहे. नैसर्गिकरित्या घडलेल्या असोत अगर मानवी कृतीने घडलेल्या असोत, प्रत्येक घटनेबद्दल माणूस विचार करू शकतो. ती अशी का घडली असावी, याची कारणेही शोधू शकतो. एखादी गोष्ट त्याच्यावर परिणाम करणारी असेल, तर त्याबद्दल आपले मतही तो व्यक्त करू शकतो. अवलोकन, निरीक्षण आणि चिंतन यातूनच माणसाची प्रगती झाली. जगाच्या प्रगतीमागे जी शक्ती होती, ती विचारांची होती.

झाडावरून फळ तुटले तर ते खालीच पडते, हे नेहमी पाहण्यातले होते. पण ते खालीच का पडते याचा विचार केला म्हणून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत शोधला गेला. आपल्या देशात व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांचे आपण अंकित कसे झालो, याचा विचार लोकहितवादींनी केला. त्यांच्या लक्षात आले की, व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांना येथे सैन्य कशाकरिता उभारू द्यावयाचे, असा प्रश्न आपण विचारला असता तर येथे ब्रिटिशांचे राज्यच आले नसते.

लेखकाचे स्वातंत्र्य

अलीकडील काही दिवसांत लेखकाच्या स्वातंत्र्याची चर्चा देशभर चालू आहे. जगाच्या इतर भागांतसुद्धा लेखकावर आणि स्वतंत्र वृत्तीच्या पत्रकारावर बंधने घालण्याचे प्रकार होत असताना ऐकू येतात. आपल्या राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना दिलेल्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा लेखकाचे स्वातंत्र्य हाही एक भाग आहे. भारतात ब्रिटिश राज्य असताना राजसत्तेने केलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार्‍यांना तुरुंगवासारखे देहदंड सोसावे लागले. लेखकांनासुद्धा सरकारी दडपशाहीचा हा अनुभव आला आहे. टीकाकारांची वृत्तपत्रे जामीन मागून आणि खटले भरून बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. जवळपास दीडशे मराठी पुस्तके या काळात ब्रिटिश सरकारने जप्त केली. अशा काळात वाङ्मय विविध अंगांनी फुलणे अवघडच होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

स्वातंत्र्य मिळण्याचे जेव्हा निश्चित झाले, तेव्हा वाङ्मयातसुद्धा वातावरण बदलले. अपेक्षांचे आणि नव्या संकल्पांचे हे युग होते. या काळात लेखकांना नवेनवे लिहावेसे वाटले. मराठी नवकथा आणि नवकविता जन्माला आली. समाजाच्या विभिन्न वर्गातील जीवनाचे आजवर अनोखे असलेले रूप अनेक लेखकांनी वाङ्मयात प्रगट केले. देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच लेखकांनासुद्धा आपल्या स्वातंत्र्याची जाणीव झाली होती. प्रतिभेचे नवे उन्मेष प्रगट होत होते.

कोणत्याही कलानिर्मितीला स्वातंत्र्य हवे असते. साहित्याला तर ते हवेच हवे. ख्यातनाम तत्त्वज्ञ इसाया बर्लिन यांनी स्वातंत्र्याच्या दोन मुख्य संकल्पनांचे विवेचन केले आहे. ‘अभावात्मक स्वातंत्र्य’ आणि ‘भावात्मक स्वातंत्र्य’ अशा त्या दोन संकल्पना आहेत. एखाद्या व्यक्तीला जे करावयाचे आहे, ते करण्याला प्रतिबंध नसणे, अडथळा नसणे किंवा त्याली त्याच्या इच्छेविरुद्ध काही करण्याला भाग न पाडले जाणे, ही त्यांची अभावात्मक स्वातंत्र्याची व्याख्या आहे. अभाव म्हणजे अडथळ्यांचा, बंधनांचा आणि प्रतिबंधांचा अडथळा. हे अडथळे स्पष्ट दिसणारे असतात, कधी कायद्याचे असतात, कधी समाजाने वापरलेल्या झुंडशाहीचे असतात. कधी प्रस्थापित सामाजिक मूल्यांचेसुद्धा असतात.

बर्लिन यांनी सांगितलेली स्वातंत्र्याची दुसरी संकल्पना म्हणजे भावात्मक स्वातंत्र्य. हे राखणे मात्र पहिल्या स्वातंत्र्यापेक्षाही कठीण असते. ‘मी एक कर्ता असले पाहिजे- निर्णय घेणारा कर्ता. माणूस म्हणून मी इतर विश्वापासून जो भिन्न असतो तो माझ्या विवेकशक्तीमुळे. मी एक विचार करणारी, संकल्प करणारी, कृती करणारी, स्वतःच्या निवडीची जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती आहे, याची मला सतत जाणीव असावी अशी माझी इच्छा असते.’

ही जाणीव जागी असलेल्या लेखकाचे स्वातंत्र्य हे भावात्मक स्वातंत्र्य. व्यक्तीवर जसे दुसर्‍याचे दडपण नको, तसेच तिच्यावर स्वतःचेसुद्धा दडपण असता कामा नये. एखाद्या विशिष्ट विषयावर लिहिले, अगर विशिष्ट पद्धतीने लिहिले तर आपण वाचकांत लोकप्रिय होऊ, अगर त्यांना अप्रिय होऊ, पुरोगामी ठरू किंवा प्रतिगामी ठरू, असा विचार त्याच्या मनात येता कामा नये. आपण काय लिहिले तर ते सत्ताधार्‍यांना किंवा आपल्या पक्षाला आवडेल असे अनेक असमर्थनीय कारणे लेखकाच्या मनात आली, म्हणजे लेखक स्वतःच आपले भावात्मक स्वातंत्र्य त्यागून बसतो.

कविवर्य बाळ सीताराम मर्ढेकर हे मराठीतील एक श्रेष्ठ कवी. जे आपल्याला जाणवलेले आहे आणि वाचकांना सांगावयाचे आहे, त्यासाठी योग्य असलेली शब्दकळाच वापरण्याचा त्यांचा आग्रह असेल. त्यांची अभिव्यक्ती आणि तिच्या मागचा आशय अभिन्नच असत. त्यांच्या कवितेने, खरे म्हणजे त्याच्या अभिव्यक्तीच्या रोखठोक पद्धतीने अनेकांना धक्का बसला. शब्द, प्रतिमा परंपरागत पद्धतीपेक्षा वेगळ्या होत्या. बहुसंख्य लोकांनी मर्ढेकरांची कविता वाचून, नीट समजून घेऊन तिचा विचार करण्याऐवजी ती धिक्कारण्याचा मार्ग स्वीकारला. स्वातंत्र्य नुकतेच मिळाले होते. सरकारने मर्ढेकरांच्या काही कवितांवर त्या अश्लील आहेत म्हणून १९४८ साली खटला भरला.

खरे म्हणजे त्या काळात मराठी साहित्याचे एक जाणकार पुरुषोत्तम मंगेश लाड हे सरकारचे अधिकृत सल्लागार होते. त्यांनी असा खटला भरू नये, असा सल्लाही दिला होता. तो धुडकावून भरलेला हा खटला सुमारे चार वर्षे चालला. मर्ढेकरांची खटल्यातून चार वर्षांनी सुटका झाली. मर्ढेकर मनःस्ताप भोगत असताना फारसे कोणी साहित्यिक मर्ढेकरांच्या समर्थनार्थ उभे राहिले नाहीत. साहित्य संस्थांनीही त्यांना साथ दिली नाही, अपवाद होता तो एका थोर गांधीवादी विचारवंताचा.

याच काळात १९४९मध्ये पुण्याला मराठी साहित्य संमेलन भरले. या संमेलनात कवींचा एक अनौपचारिक मेळावा झाला. या मेळाव्यात स्वतः मर्ढेकरही बोलले. त्यानंतर आचार्य स.ज. भागवत यांनी एक उत्स्फूर्त भाषण केले. आचार्य मर्ढेकरांच्या निमित्ताने बोलत असले तरी त्यांचा सल्ला सगळ्याच लेखकांनी कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे.

“तुम्ही जे लिहिता आहात ते फार मोलाचं आहे. मानवी जीवनाचा अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेला अतिशय अर्थपूर्ण अनुभव व्यक्त करणारं आहे. जीवनाचा जो अनुभव तुम्ही घेतला असेल किंवा आत्मसात केला असेल तो व्यक्त करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हांला आहे आणि तुम्ही ते घेतलं पाहिजे. तुमचं ते कर्तव्य आहे. तुमच्या अंतःकरणाला सत्य जसं प्रतीत झालं असेल, तसं तुम्ही व्यक्त करा. त्याला जी भाषा आणि जे रूप स्वाभाविक आणि अपरिहार्य वाटेल, ती भाषा व ते रूप आपल्या लेखनात वापरा. मग कोणी काही म्हणो. माणसांना सत्य निडर डोळ्यांनी पाहवत नाही. विशेषतः ते जर आपल्या आत्म्याच्या विरूपाचं दर्शन घडवीत असेल तर माणसं दचकतात, हादरून जातात, क्रुद्ध होतात आणि त्या सत्याचा नाश करू पाहतात; निदान त्या सत्याचं दर्शन घडवू पाहणार्‍या द्रष्ट्याला नष्ट करू जातात. त्यांच्या क्रोधाला न घाबरता आणि सत्यदर्शनाची पडले ती किंमत देऊन तुम्ही आपली जाणीव प्रामाणिकपणानं व्यक्त केली पाहिजे. बाह्यतः विद्रूप व विदारक भासणारे सत्याचं रूप अंतिमतः सुंदर आणि मंगलच असेल.’’

आचार्य भागवतांनी मर्ढेकरांना आणि त्यांच्या निमित्ताने सगळ्याच लेखक-कवींना जो सल्ला दिला, तो फार मोलाचा आहे. आपल्याला जे जाणवले ते आपण निर्भयपणे लिहावे, अनुभवाला अनुरूप शब्दांत लिहावे. निर्मितीच्याबाबत आपण पूर्णपणे स्वायत्त असावे, असे त्यांनी म्हटले आहे. माणूस स्वतःचा स्वतंत्र निर्णय घेतो, त्या वेळेलाही तो आपल्या मनाशी करावयाच्या किंवा लिहावयाच्या कृतीची योग्यायोग्यता तपासून पाहतो… ती दुसर्‍या कोणत्याही निकषावर नव्हे, तर त्याच्या स्वायततेचाच एक भाग असलेल्या विवेकाच्या कसोटीवर कवी आणि लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य हवे, असे आपण म्हणतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या विवेकाशी सुसंगत असलेलेच स्वातंत्र्य आपण अपेक्षित असतो. जो अनुभव त्याला सांगायचा आहे, त्याच्याशी सूतरामसंबंध नसलेले आपण लिहू नये, याची त्याने काळजी घेतली पाहिजे. कोणाची तरी बदनामी करणे अगर आपल्या मनातील कशाबद्दलची तरी नाराजी व्यक्त करणे, हा लेखकाचा उद्देश असेल तर ते वाङ्मयबाह्य प्रयोजन असते. लेखकाचे स्वातंत्र्य कधीकधी त्याच्या डोळ्यावर लागलेल्या झापडामुळे आपोआप नष्ट झालेले असते. अमूक प्रकारचेच साहित्य लिहावयाचे, तेच देशहिताचे आहे, अगर आपल्या तत्त्वज्ञानाच्या समर्थनार्थच लिहिले पाहिजे, असा त्याचा चुकीचा समज झालेला असतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

विचारवंतांची परंपरा

महाराष्ट्रात विचारवंतांची एक मोठी परंपरा आहे, असे आपण मानतो आणि ते खरेही आहे. समाजाच्या हिताचा विचार करणारे आणि आपले विचार निर्भयपणे समाजासमोर मांडणारे विचारवंत हा आपला अभिमानास्पद वारसा आहे. या वारशाचे संक्षेपाने स्मरण करणे वैचारिक वाङ्मयाचे स्वरूप लक्षात घेण्यासाठी उपयोगी पडेल. समाजातील अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी या विचारवंतांच्या टीकेचे पहिले लक्ष्य होणे, अगदी स्वाभाविक होते. अव्वल इंग्रजी आमदानीतील एक महत्त्वाचे विचारवंत लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी आपल्या सामाजिक स्थितीचा आणि त्यातील अन्यायकारक रूढींचा विचार केला. जातीने ब्राह्मण असलेल्या लोकहितवादींनी धर्माच्या नावाखाली रुजवण्यात आलेल्या आणि दृढ केल्या गेलेल्या लोकभ्रमांचा आणि रूढींचा निषेध केला आणि या सामाजिक अवस्थेला जबाबदार असणार्‍या ब्राह्मण भिक्षुकवर्गाची कडक निर्भर्त्सना केली. धर्माचा आधार घेऊन ब्राह्मणांनी प्रस्थापित केलेले वर्चस्व आणि बहुजन समाजाने सोडलेली विद्येची कास हेच बहुजनांच्या अवनतीचे कारण आहे, असे निदान म. जोतिराव फुल्यांनी केले.

न्या. महादेव गोविंद रानड्यांना इष्ट सामाजिक बदल उत्क्रांतीनेच होतील असा विश्वास होता. समाजाला विचार करायला लावले तर त्याला योग्य दिशेने नेता येईल, असे त्यांना वाटत होते. जी उत्क्रांती त्यांना हवी होती, ती ‘बंधनातून स्वातंत्र्याकडे, भाबडेपणाकडून विश्वासाकडे, अधिकाराकडून विवेकाकडे आणि धर्मांधतेकडून सहिष्णुतेकडे’ जाणारी होती. ज्यांनी समाजाच्या सुधारणेचा विचार धर्मसुधारणा म्हणून न करताना व्यक्तीस्वातंत्र्याच्या आणि समतेच्या मूलभूत हक्काच्या आधारेच केला व स्त्रीला बरोबरीचे स्थान देण्याचा आग्रह धरला, त्या गोपाळ गणेश आगरकरांचे आणि ‘स्त्री-पुरुष तुलना’ लिहिणार्‍या ताराबाई शिंद्यांचेही स्मरण केले पाहिजे.

समाजाने ज्यांचे माणूसपणच हिरावून घेतले होते, अशा दलित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागे केले. अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि स्वतःच्या उन्नतीसाठी शिक्षण, या त्यांनी दिलेल्या मंत्रामुळे दलित समाजच नव्हे, तर आजवर त्यांच्यावर अन्याय करणारा किंवा तो अन्याय स्वस्थपणे पाहणारा वर्गसुद्धा खडबडून जागा झाला. डॉ. आंबेडकरांच्या विचारांच्या प्रभावाने आपली सामाजिक व्यवस्थाच नव्हे, तर राजकीय व्यवस्थाही प्रभावित झाल्याचे आपण पाहतो आहोत. डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी एक कृतिशील सुधारक म्हणून सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही आघाड्यांवर मन्वंतर घडवून आणले.

नवे विचार मांडणारे विचारवंत आणि त्याचा विचारांने विरोध करणारे स्थितीवादी असा सामना झाल्याचे फारसे प्रसंग दिसत नाहीत. विधवाविवाह सशस्त्र आहे की नाही, यावर न्या. रानड्यांच्या पुढाकाराने झालेला एक वादविवाद वगळला तर नव्या विचारांचा मुकाबला हे संहितांतील उद्धरणांच्या आधारे आणि परंपरा महत्त्वाची आहे, या आग्रही प्रतिपादनानेच केला गेला. वैचारिक मंथनाचे स्वरूप त्याला आलेच नाही. कित्येक वेळा विचारवंतांचे प्रतिपादन बंद पाडण्याच्या उद्देशाने बहिष्कारासारख्या शस्त्राचा, हिंसक कृत्याच्या धमकीचा वापर स्थितीवाद्यांनी केला.

स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला दुसरा महत्त्वाचा वैचारिक वाङ्मयाचा प्रवाह स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा होता. ब्रिटिशांच्या राजवटीचे आपल्या देशावर काय परिणाम झाले, याचा विचार करून विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ‘आमच्या देशाची स्थिती’ कशी विदारक झाली आहे, हे मांडले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांसारखे सहकारी यांनी आपल्या लेखनाद्वारे स्वातंत्र्याची आकांक्षा जागृत केली व त्यासाठी देहदंड सोसण्याचेही उदाहरण घालून दिले. ‘काळातील निबंधा’तून उपरोधाच्या शस्त्राने वाचकांना वास्तवाची जाण आणून देणारे शिवराम महादेव परांजपे मराठीतील एक महत्त्वाचे साहित्यिक. अहिंसकमार्गाने स्वातंत्र्य येऊ शकते, अशी श्रद्धा असलेल्या आणि समाजात निर्भय परंतु उदार विचारपरंपरा निर्माण करू पाहणार्‍या आचार्यांनी पुढे गांधीयुगात महत्त्वाचे वैचारिक योगदान दिले.

शं.द. जावडेकर, स.ज. भागवत, शंकरराव देव इत्यादींचे नावे सहज आठवतात. जावडेकरांनी समाजवाद हा सत्याग्रह मार्गाने येऊ शकतो, असे सांगणारे सैद्धांतिक लेखनही केले. गांधींच्या विचाराने प्रभावित झालेले, परंतु आपली स्वतंत्र प्रज्ञा सतत जागी ठेवणारे आचार्य विनोबा भावे हे एक थोर मराठी विचारवंत आणि साहित्यिक. विनोबांनी भाषेचा आणि साहित्याचा मूलभूत विचार केला होता. आपल्या विधायक वाणीने समाजात समतेचा विचार रुजवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.

मराठीतील वैचारिक वाङ्मय ज्यांच्या लेखनाने समृद्ध झाले, अशा लेखकात विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, विठ्ठल रामजी शिंदे, श्रीधर व्यंकटेश केतकर आणि इतिहासज्ञ त्र्यंबक शंकर शेजवलकर अशी अनेक नावे सहज आठवतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे त्यागमय जीवन तर आपल्या स्मरणात असतेच; त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे समाजाच्या अनेक अंधश्रद्धांवर कोरडे ओढणारे स्पष्ट विचार मांडणारे ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ त्यांनी लिहिले. संतती नियमन ‘समाजस्वास्थ्या’साठी आवश्यक आहे, हे समाजाला पटवताना रघुनाथ धोंडो कर्वे यांनी किती अवहेलना सहन केली, हे आपल्याला विसरता येणार नाही.

काही विचारवंतांचा निर्देश मी वर केला. ही काही काटेकोरपणे केलेली महाराष्ट्रातील विचारवंतांची यादी नव्हे, केवळ वैचारिक लेखनाचे स्वरूप लक्षात यावे म्हणून उदारहणादाखल मी काहींची आठवण करून दिली.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा