आशियाई अरबी संस्कृतींच्या अवमानाची, उपेक्षेची करुण कहाणी म्हणजे कतारचा वर्ल्ड कप होता...
पडघम - क्रीडानामा
गायत्री चंदावरकर
  • फिफा वर्ल्ड कप
  • Thu , 05 January 2023
  • पडघम क्रीडानामा फिफा वर्ल्ड कप Fifa World Cup

सरत्या वर्षात कतार दोहा येथे पार पडलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेने जगभरच्या फुटबॉलप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मने सुखावणारी रोमांचकता, श्वास रोखून धरायला लावणारी थरारकता अनुभवताना चाहत्यांना झिंग चढल्याचे दिसले. सरतेशेवटी मेस्सी आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांचा दिस गोड जाहला. अर्जेंटिनाने फुटबॉलचे वैश्विक मैदान मारले, तर ‘कट्टरपंथी’ कतारने मैदान राखले. मात्र, ते जपताना विश्वचषकाच्या झगमगाटाआड महासत्तांमधला भू-राजकीय संघर्षही उफाळून आला. तो फारच थोड्यांना जाणवला, दिसला. त्या मती गुंग करणाऱ्या विश्वचषकाआड घडून आलेल्या संघर्षाचा वेध घेणारा हा लेख...

.................................................................................................................................................................

फुटबॉटची विश्वचषक स्पर्धा (सर्वांच्या ओठी रुळलेले शब्द ‘फिफा वर्ल्ड कप’) दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. त्यामुळे स्पर्धेच्या काळात जगभरातील फुटबॉल रसिक आणि प्रेक्षकांच्या उत्साहास उधाण आलेले असते. जगातील कोट्यवधी लोक हे निव्वळ फुटबॉलचे चाहते वा प्रेक्षकच नव्हे, तर ठार भक्त आहेत. त्यामुळे ज्या ज्या देशात वर्ल्ड कप आयोजित केला जातो, त्या त्या देशात लाखोंच्या संख्येने फुटबॉल प्रेमी सामने बघायला जातात. त्या त्या देशाच्या जर्सी घालून अक्षरश: स्टेडियम डोक्यावर घेतात. जगभर आणि विशेषतः फुटबॉल खेळणाऱ्या शेकडो देशांत एखाद्या सणासारखा उत्साह नि उल्हास दिसून येतो. फुटबॉल जिंकणाऱ्या देशात जगज्जेत्यांची विजयरथातून जंगी मिरवणूक काढली जाते.

अगदी हेच सगळे या वेळच्या म्हणजे २०२२च्या कतार येथील विश्वचषकात दिसून आले. २०२२ची विश्वचषक स्पर्धा प्रथमच आशिया खंडात, त्यातही कतारसारख्या एका मुस्लीम देशात होणे, ही घटनाच मुळात ऐतिहासिक होती. हा वर्ल्ड कप या खंडात होण्याचे अनेक फायदे कतार या देशाला, तसेच खंडाला मिळणार आहेत, हेही ओघाने आलेच.

अरब-आशियायी देशांना होणारे फायदे

२०१०मध्ये कतारला विश्वचषकाचे यजमानपद मिळाले, तेव्हा तो एक विकसनशील देश होता. गेल्या १२ वर्षांत सोयीसुविधांच्या दृष्टीने मात्र तो एक विकसित देश झाला आहे. वर्ल्ड कपसाठी लागणारी ८ अत्याधुनिक, वातानूकुलित स्टेडियम्स बांधण्यासाठी कतारने ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. १५ लाखांच्यावर बेड असणारी १४० हॉटेल्स उभी करण्यासाठी त्यांनी १६५० कोटी रुपये मोजले. ३६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून नवे मेट्रोचे जाळे उभे केले, तर २००० कोटी रुपये खर्चून विमानतळे, बंदरे आणि रस्ते अत्याधुनिक केले. थोडक्यात, कतार आता दुबईसारखेच एक जागतिक व्यापारी केंद्र झाले आहे. ही सगळी ‘फिफा वर्ल्ड कप’च्या आयोजनातून साधलेली कमाल आहे.

वर्ल्ड कपमधून झालेले एकट्या फिफाचे उत्पन्न ७५० कोटी आहे. गत काळात रशियात झालेल्या वर्ल्ड कपपेक्षा हे उत्पन्न तब्बल १०० कोटींनी वाढले आहे. कतारी विमानतळे, बंदरे, स्टेडियम्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट इत्यादी मार्फत कोट्यवधी डॉलर्सचे उत्पन्न कतारला मिळाले आहे, ते वेगळे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

महत्त्वाचे म्हणजे, जवळजवळ १० लाखांहून अधिक प्रेक्षक कतार येथे वर्ल्ड कपचे सामने बघायला आले होते. या योगे या लाखोंनी कतारच्या आतिथ्याचा अनुभव घेतला आहे. याचा एक परिणाम म्हणजे, येत्या काही वर्षांत दुबईसारखेच कतारदेखील आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आवडते ठिकाण होणार, अशी चिन्हे आहेत. आश्चर्याचा सुखद धक्का म्हणजे, मोरोक्को, कतार, इराणसारख्या फारशा खिजगणतीत नसलेल्या देशांनी दर्जेदार खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यामुळे आशियाई खंड आणि अरब देशातही फुटबॉल हा खेळ, या पुढच्या काळात अधिक लोकप्रिय होणार आणि भविष्यात उत्तमोत्तम खेळाडू या खंडात उदयास येणार यात शंका नाही.

धोरणीपणा, मुत्सद्देगिरी आणि खैरात

फिफा (FIFA) या अति धनाढ्य संस्थेने २०१०मध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या बलाढ्य देशांना डावलून कतारसारख्या अरब अमिरातीतील सर्वार्थाने एका लहान विकसनशील देशाला २०२२ सालच्या फुटबॉल वर्ल्ड कपचे आयोजन करण्याची परवानगी दिली. तेव्हाच जगभरातील माध्यमात अनेक तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या, अनेक आरोप झाले आणि टीकेची प्रचंड झोड उठवली गेली.

जगातील फुटबॉल तज्ज्ञांनी आक्षेप घेतला, तो एका पातळीवर रास्तच होता. कारण कतार देशाची फुटबॉल टीम तोवर कायम निवड स्पर्धेत बाद होत असे. त्यामुळे कुठलाही वर्ल्ड कप न खेळलेला देश कसा काय वर्ल्ड कप आयोजित करणार, असा त्यांचा सवाल अगदी योग्यच.

उणीपुरी १२००० स्क्वेअर किलोमीटर जमीन असणारं कतार हे शेखशाही राष्ट्र! काही मुस्लीम आणि अमिराती देशांप्रमाणे इथेही शेखांची सत्ता आहे. इतर मुस्लीम आणि अमिराती देशांसारखा कतारही पेट्रो डॉलर्स मिळवून गब्बर झालेला देश आहे.

२२सालच्या वर्ल्ड कपचे कतारला यजमानपद मिळावे म्हणून फिफाचे अध्यक्ष इन्फान्टिनो तसेच माजी फ्रेंच खेळाडू प्लॅटिनी यांनी विशेष रस घेतला. इतकेच नव्हे तर प्लॅटिनी यांनी तीन दक्षिण अमेरिकन अधिकाऱ्यांचे मत फिरवले असल्याचे सांगितले गेले. पुढे प्लॅटिनींनी तेव्हाचे फ्रान्सचे अध्यक्ष सार्कोझी आणि कतारच्या तमिम अल थानी यांना भेटून २०२२चा वर्ल्ड कप कतार मध्येच व्हावा, हे पटवून दिल्याचे अभ्यासक म्हणतात. पुढे प्लॅटिनी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन शिक्षाही झाली.

तत्पूर्वी, २२ सालच्या बर्ल्ड कपचे आयोजन करायला मिळावे म्हणून जगावर दादागिरी करत फिरणाऱ्या बलाढ्य अमेरिकेने खूप ताकद लावली होती. अगदी स्पष्टच सांगायचे तर १९८६ ते २०१६पर्यंत फिफाचे अध्यक्ष असणारे ब्लेंटर हे २०२२मध्ये अमेरिकेला यजमानपद मिळावे म्हणून प्रयत्नरत होते. त्याच खेळीचा एक भाग म्हणून अमेरिकेने बिल क्लिंटन आणि मॉर्गन फ्रीमन यांना समितीवर पाठवले होते. मात्र, इथे दादागिरीला यश आले नाही. कतारला यजमानपद मिळाले. ते मिळाल्याचे कळताच क्लिंटन यांनी पेपरवेट फेकल्याची नोंद आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

उत्सुक कतारने त्या वेळी जवळजवळ २० कोटी डॉलर्स निविदा-लिलाव प्रक्रियेसाठी खर्च केल्याचा दावा ‘द गार्डियन’ने केला आहे. ऑस्ट्रेलियाने ४.२७ कोटी डॉलर्स, तर २०१८ सालच्या वर्ल्ड कप कपचे यजमानपद मिळवण्यासाठी इंग्लंडने ५ कोटी डॉलर्स खर्च केले. तरीही लोकांचा पैसा अनाठायी वापरला गेला असल्याची ओरड या दोन्ही देशात झाली होती. कतारने मात्र २० कोटी डॉलर्स कसे आणि कशासाठी वापरले गेले, याची माहिती दडवून ठेवली. पुढे यथावकाश लाचखोरीच्या आरोपांची चौकशी करण्यात आली. त्यात फिफाची बोली प्रक्रिया निर्दोष नसल्याचा, त्यात अनेक त्रुटी तसेच अनियमितता असल्याचा निर्वाळा अमेरिकेतील मायकेल जे. गार्सिया या कायदेतज्ज्ञाने दिला होता.

कतारच्या सॉकर असोसिएशनमध्ये महंमद बिन हमाम नावाचा एक उच्च पदस्थ सदस्य होता. तो काही काळ फिफाच्या २४ लोकांच्या कार्यकारी समितीतही होता. लाचखोरीच्या आरोपाखाली फिफाने २०११ मध्ये त्याच्यावर बंदी आणली होती. भ्रष्ट व्यवहार कितीही झाकला म्हणून लपून राहत नाही. त्यामुळे २०१४ मध्ये इंग्लड मधील 'संडे टाइम्स'ने महंमद बिन हमामने फिफाच्या लालची सदस्यांना कोट्यवधी डॉलर्सची लाच दिल्याचा पुरावा इमेल्सद्वारे जाहीर केला.

‘फिफा’तले काळेबेरे

फिफा धनदांडगी संस्था आहे. तर जगभर जिथे अमाप पैसा आणि प्रचंड आर्थिक ताकद तिथे घोटाळे आणि गैरव्यवहार असण्याचा आजवरचा इतिहास आहे. वर्ल्ड कपचे आयोजन आणि नियोजन, टीव्ही प्रसारणाचे हक्क इथपासून ते अधिकारी, रेफ्री यांच्या निवडीपर्यंत लाचखोरीचे आरोप तसेच खेळातील गोल होणे किंवा न होऊ देणे, खेळाडूंना नीटपणे खेळ खेळू न देणे, अशा प्रकारच्या पक्षपाताचे कायम आरोप झालेले आहेत.

२००६ मध्ये जर्मनीमध्ये तर २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेत तर २०१४ मध्ये ब्राझीलने वर्ल्ड कप आयोजित केला गेला. जर्मनी, दक्षिण आफ्रिका, रशिया आणि कतार या चारही देशांवर आणि फिफावर लाचखोरीचे आणि भ्रष्टाचाराचे त्या त्या वेळी आरोप झाले. म्हणजे, हे उघडच होते की, यातले कोणीही धुतल्या तांदळासारखे नव्हते.

कतार वर्ल्ड कपच्या आधी २०१८मध्ये रशियाला वर्ल्ड कपचे आयोजन करायची परवानगी देऊन फिफाच्या कार्यकारी समितीचा पाय अधिकच खोलात गेला. तेव्हा अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यात जगातला दुसरा दांडगट देश रशियाची निवड केली गेली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

२०१५मध्ये फिफाच्या आर्थिक आणि राजकीय व्यवहारांवर पुन्हा एकदा मीडियाने आरोप केले. तेव्हा फिफाचे अध्यक्ष आणि रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांच्या मैत्रीवर आणि जवळिकीवर रकानेच्या रकाने लिहून येत असे. तेव्हा फिफाच्या जेरमी वोल्की या अधिकाऱ्याने एक वादग्रस्त विधान केले होते. तो जाहीरपणे म्हणाला होता की, लोकशाहीपेक्षा राजसत्ता असणारे तसेच अल्पलोकसत्ताक राज्य किंवा मूठभर अतिश्रीमंतांचे राज्य असणारे देश वर्ल्ड कपचे आयोजन करायला सोपे असतात. कारण, देशाचा एकटाच प्रमुख निर्णय घेतो आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. लोकशाही असणाऱ्या देशात अनेक पातळ्यांवर वाटाघाटी कराव्या लागतात. त्यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया नको तेवढी, नको तितकी लांबते.

अमाप आर्थिक बळाच्या जोरावर राजकीय लागेबांधे तयार करणे आणि मग फुटबॉल वर्ल्ड कप हव्या त्या देशात अगदी सोयीस्करपणे घडवून आणणे, हे पुन्हा एकदा दिसून आले. एकदा का फुटबॉल वर्ल्ड कप जाहीर केला की, मग असंख्य प्रायोजक आहेतच सगळ्यांसाठी पैसा पुरवायला. महत्त्वाचे म्हणजे टीव्हीवरील प्रसारणाचे हक्कदेखील विकत घ्यायला पुन्हा फिफाला भरपूर फी द्यावी लागते. थोडक्यात, फिफा म्हणजे ‘पाचो ऊंगलिया घी में और मुंह कढाई में’ अशी स्थिती असणारी जगातील सगळ्यात श्रीमंत क्रीडा संस्था आहे.

फिफा आणि राजकारणाचा ‘खेळ’

जनमानसाला खिळवून ठेवणारी, त्यांच्या भावनांना भडकवणारी तर कधी दमन करणारी, तसेच त्यांना काही अंशी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या काबूत ठेवणारी जी मोजकीच क्षेत्रे आहेत. त्यात धर्म, मनोरंजन आणि खेळ हे अव्वल आहेत.

खेळ हा मनोरंजनाचा प्रकार असला तरी तो संगीत, चित्रपट, दूरचित्रवाणी, पुस्तके आणि सध्या अतिशय लोकप्रिय असणाऱ्या वेब सिरीज या माध्यमांपेक्षा पूर्णतः वेगळा आहे.

जगातील सगळे संघटित धर्म मनोरंजनाची माध्यमे माहिती आणि मनोरंजनाची साधने गुगल, अ‍ॅपल, फेसबुक-मेटा, नेटफ्लिक्स, तत्सम आयटी कंपन्या, तसेच इंटरनेट सुविधा देणाऱ्या कंपन्या, फोन कंपन्या, सोशल मीडिया इत्यादी आणि खेळ संबंधित संस्थांची किंवा कंपन्यांची आर्थिक ताकद प्रचंड आहे. त्यामुळे साहजिकच त्यापासून राजकारण कसे दूर असेल? तेच तर सगळी सूत्रे हलवते आणि सगळा खेळ खेळते आणि त्यानुषांगिक खेळखंडोबाही करते. अगदी तसेच यावेळच्या कतार येथील फुटबॉल वर्ल्डकपच्या निवडीपासून तर त्यातील सगळ्या तथाकथित वादग्रस्त गोष्टींबाबत दिसून आले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कतारची संस्कृती स्त्री-पुरुष भेद आणि अनुषंगिक अन्याय करणारी, तसेच समलिंगी समाजाचे अधिकार नाकारणारी; त्यामुळे या वरून टीकेचे आसूड ओढले गेलेच. पण याचसोबत तेथील अवाढव्य स्टेडियम्स, त्यांची उभारणी, त्या उभारणीदरम्यान झालेले अन्याय, अत्याचार, त्यातील सामने, सामन्यांदरम्यानचा उघडउघड पक्षपात, एका श्रीमंत मात्र अरब देशातील संशयास्पद व्यवहार करणारे क्रीडा व्यवस्थापन, सांस्कृतिक असहिष्णुता असे अनेक मुद्दे या वेळच्या कतार वर्ल्ड कप सामन्यांदरम्यान चर्चिले गेले.

थोडक्यात, जगभरातील वर्तमानपत्रात, टीव्हीवरील वार्तांकनात आणि सोशल मीडियावर कतार वर्ल्ड कपविषयी प्रखर टीका, रास्त आक्षेप आणि अनेक वेळा अनाठायी आकसही दिसून आला. परंतु, सारासार विचार करता, फिफा ही फुटबॉलची धनदांडगी संस्था आणि तिची आर्थिक, राजकीय ताकद आणि त्यामुळे घडवून आणलेला भू- राजकीय वाद, तसेच त्यामुळे निर्माण झालेले राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक भेदाभेदाचे पर्यावरण याची पाश्चिमात्य नजरेतून प्रस्तृत झालेली सुरस आणि चमत्कारिक कथा मात्र आशियाई अरबी संस्कृतींच्या अवमानाची उपेक्षेची करुण कहाणी म्हणजे कतारचा वर्ल्ड कप होता, असे म्हणता येईल.

भू-राजकीय वाद-संघर्ष

फिफा ही संस्था जागतिक राजकारणापासून आणि भू-राजकीय घडामोडींपासून अजिबात अलिप्त नाही. त्यामुळे भू-राजकीय वाद मोठ्या प्रमाणावर या वर्ल्ड कपच्या दरम्याने झाले आणि पूर्वीही होत आले आहेत, अगदी ३४-३८ सालापासून. अतिशय महत्त्वाचे उदाहरण द्यायचे झाल्यास, १९३८चा वर्ल्ड कप. दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात होण्यापूर्वी हा वर्ल्ड कप झाला. इटली आणि फ्रान्स यांच्या सामन्यांमध्ये दोघांच्याही जर्सीचा रंग निळा असल्याने पेच झाला. तेव्हा इटलीच्या खेळाडूंनी चक्क त्यांच्या फॅसिस्ट राजवटीचा काळा रंग असलेल्या जर्सी घातल्या. आणि त्यावर वरताण म्हणजे फॅसिस्ट पद्धतीचा सलामही केला.

आता २०२२चा विचार करूया. २०२२मध्ये कतार सारख्या एका मुस्लीम आणि अरबी देशात वर्ल्ड कपचे आयोजन केले गेले, हा फक्त क्रीडा जगतातील निर्णय नाही, हा अधोरेखित करण्याचा मुद्दा आहे. मात्र, फिफाला आपले मार्केट आणि प्रेक्षक वाढवायचे आहेत, इतका साधा सरळ हिशेब नाही हा.

इतर भू-राजकीय ताण-तणाव आणि घडामोडी लक्षात घ्यायच्या असल्यास महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की पूर्वी कतारने लिबियाच्या विरुद्ध चाली केल्या. गद्दाफीविरुद्ध लढताना कतारने त्यांची लढाऊ विमाने आणि मालवाहक विमाने पाठवली. पुढे सीरियातील सशस्त्र हल्ल्यात तीच लढाऊ विमाने वापरली गेली. लिबिया आणि सीरिया येथील सशस्त्र संघर्षात कतारने इस्लामिक आतंकवाद्यांना मदत केली होती, हेदेखील लक्षात घ्यायला हवे. कतार हा देश अमेरिका आणि मित्र राष्ट्रांचा जवळचा आहे, हा या समीकरणाचा अर्थ.

सद्य:स्थितीत भू-राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, युक्रेन-रशियाच्या अजूनही सुरू असलेल्या युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियन खनिज तेल आणि गॅसवर बंदी आणली आहे. त्यामुळे कतारी तेल आणि विशेषतः एलपीजी किंवा एलएनजीची मागणी वाढली आहे. त्यामुळे जर्मनी, फ्रान्सपासून ते ब्रिटिश, अमेरिकन राजकीय नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आता दोहाच्या वाऱ्या सुरू केल्या आहेत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कतार येथील वर्ल्ड कपचे आयोजन ही मोठी राजकीय खेळी होती, यातही शंका घेण्याचे कारण असू नये. कतार येथील राजसत्ता, सौदी अरेबियाची राजसत्ता यांना हाताशी धरून अमेरिका आणि मित्र देश यांनी आखातात खूप मोठी व्यापारी आणि विशेषतः राजकीय गुंतवणूक केली आहे. आखताचा हा भूभाग वापरून आणि कतार, सौदी अरेबिया यांना रशिया आणि चीन यांच्या विरोधात मोठी भू-राजकीय आघाडी तयार करून ठेवली आहे.

या पुढचा २०२६चा वर्ल्ड कप संयुक्तपणे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशात होणार आहे. तर २०३०चा वर्ल्ड कप बहुतेक सौदी अरेबियात होईल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. एव्हाना, वर्ल्ड कपच्या यजमान पदाची माळ कोणत्या देशात आणि कोणत्या कारणांने घातली जाते हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच.

.................................................................................................................................................................

महाप्रचंड ‘शेखशाही’

कतार, अमिरात आणि सौदी अरेबियासारख्या देशांचे राज्यकर्ते शेख आहेत. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांची तिथे ‘शेखशाही’ आहे. अनेक पश्चिमी देशांच्या प्रमुखांचे त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध तर आहेतच, महत्त्वाचे म्हणजे अगदी फोक्सवॅगन पासून ते अनेक कंपन्या आणि पंचतारंकित हॉटेल्समध्ये त्यांची गुंतवणूक आहे, अब्जावधींचे शेअर्स आहेत. शेखशाहीने फुटबॉलचा एक फ्रेंच क्लब विकत घेतल्याची चर्चा आहे. त्या क्लबचे नाव ‘पॅरिस सेंट जरमेन’ असून त्यांचे मालक कतारचे राजे आहेत. त्या क्लबतर्फे जगातील अव्वल दर्जाचे खेळाडू म्हणजे अगदी मेस्सी, एमबापे आणि नेमार खेळतात. त्यामुळे शेखशाहीचे पाश्चिमात्य कंपन्या आणि राजकीय नेत्यांचे लागेबांधे आणि हितसंबंध गुंतले आहेत, हे उघड आहे. त्या अर्थाने, फुटबॉल या खेळमागे नुसतं महाप्रचंड अर्थबळच नाही, तर फार मोठी राजकीय आणि व्यापारी ताकदही कार्यरत आहे, हे खरे.

.................................................................................................................................................................

संयुक्त अरब अमिरातीसारखा अत्यंत प्रगत आणि श्रीमंत देश राजकीयदृष्ट्या अलिप्त असला तरी अफगाणिस्तानच्या हमीद करझाईनामे पळून केलेल्या अध्यक्षांना या देशाने आश्रय दिला. मुस्लीम आणि अरब देशांशी निगडित असंख्य बैठका आणि वाटाघाटी दुबईत आणि इतर अमिराती शहरात केल्या जातात. त्या भागातील दुसरा महत्त्वाचा देश म्हणजे, सौदी अरेबिया तिथेही राजसत्ता आहे. पत्रकार जमाल खाशोगी हत्या प्रकरणामुळे थोडी धुसफूस झालेली असली, तरीही सौदीचं आणि अमेरिकेचं साटंलोटं जगजाहीर आहे. अमेरिका आणि मित्र देशांचं इराणशी पटत नाही. इराण त्यांचा शत्रू मात्र सौदी अरेबिया त्यांचा दोस्त!

इराण जवळील अल उदेद येथे अमेरिकेचे सगळ्यात मोठे लष्करी विमानतळ आहे. येथूनच अफगाणिस्तान, इराक आणि सीरियावरील हवाई हल्ले करण्यात आले. खनिज तेलाच्या रशिया विरुद्धच्या संघर्षात अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी अफगाणिस्तान आणि इराकला राजकीयदृष्ट्या संपवले. या तीनही युद्ध सशस्त्र कारवाईत कोट्यवधी निरपराध नागरिकांनी जीव गमावला, तर तितक्याच संख्येने लोकांना परागंदा व्हावे लागले. अमेरिका- रशियामधली वर्चस्वाच्या संघर्षाचा हा परिपाक.

पश्चिम किनाऱ्यावरील इस्रायलशी अमेरिका आणि मित्र राष्ट्रांची दोस्तीच नव्हे तर त्यांच्यात धार्मिक-राजकीय-सांस्कृतिक अनुबंध आहेत, कारण जगातील जास्तीत जास्त शस्त्रांची निर्मिती करणारे ज्युईश लोक असून अमेरिकन मीडिया आणि हॉलिवुडवर त्यांचीच सत्ता आहे. त्याच किनाऱ्यालगतच्या गाझा पट्टीतील मुस्लीम पॅलेस्टिनी लोकांशी मात्र त्या सगळ्यांचा उभा दावा आहे. त्यांचे सशस्त्र संघर्ष सतत सुरू असतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बाकी कतार जरी अमेरिकेचा मित्रराष्ट्र असल्यासारखा वागत असला, तरी त्याचं मुस्लीम देश म्हणून राजकारण आहेच. आधी कतारने सांगितले की, या वर्ल्ड कपमध्ये इस्रायली नागरिकांचे स्वागत आहे. त्यांना त्यांच्या रबाईने पवित्र केलेले खास कोशर जेवण दिले जाईल, तसेच त्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करायला पूर्ण परवानगी असेल. मात्र वर्ल्ड कप सुरू होण्याच्या दोन दिवस आधी त्यांनी दोन्ही गोष्टींना परवानगी नसल्याचे सांगून इस्रायली प्रेक्षकांची मोठी पंचाईत केली.

मानवाधिकार उल्लंघनाचा अक्षम्य इतिहास

कतारने अत्याधुनिक स्टेडियम, मेट्रो, हॉटेल्स इत्यादी आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या त्या आशियायी देशातील म्हणजे नेपाळ, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश अशा अनेक देशातील जवळपास २० लाख स्थलांतरित कामगारांच्या जीवावर त्यांना वेठबिगारी कामगारांसारखी वागणूक दिली. त्यांना पुरेसे वेतन दिले नाही. किंवा एक-दोन महिने वेतन अडवून ठेवले जाई. त्यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ठेवले. त्यांना आठवड्याचे सातही दिवस अत्यंत उष्म्यात १२-१२ तास राबवून घेतले गेले.

.................................................................................................................................................................

चीनची पिछाडी

चीन हा देश आर्थिक-राजकीय-लष्करीदृष्ट्या बलाढ्य ऑलिम्पिकमध्येही अव्वल प्रदर्शन करणारा देश. मात्र या देशाने अजूनही एकाही फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत पात्र ठरण्याइतपत कामगिरी केलेली नाही. क्षी जिनपिंग यांनी खूप प्रयत्न करूनही चीनचा संघ निवडला गेला नाही. त्यामुळे यजमानपद मिळणे हे फारच दूरची गोष्ट आहे. तीच गत टर्की या देशाची आहे. भारतही फुटबॉलमध्ये का नाही, याची वेगळी मीमांसा करावी लागेल.

सध्या इराणमध्ये सरकारी दडपशाही आणि स्त्रियांचे स्वातंत्र्य नाकारणाऱ्या चालीरीतींविरुद्ध प्रचंड प्रमाणावर महिलांची तसेच पुरुषांचीही निदर्शने आणि आंदोलने सुरू आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा इराणची टीम देत होती. तिने चक्क राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिल्यावर जगभरातील सोशल मीडियावर त्यांचे कौतुक करण्यात आले. मात्र पुढल्या मॅचमध्ये इराणी सरकारने फतवा काढला की, राष्ट्रगीत म्हणणे बंधकारक असून राष्ट्रगीत न म्हटल्यास खेळाडूंच्या कुटुंबीयांनाही जाब विचारण्यात येईल.

.................................................................................................................................................................

कतारसारख्या अनेक अरबी देशात कफाला नामक करार केला जातो. त्या नुसार कामगारांचा पासपोर्ट कंपनीकडे जमा करावा लागतो. त्यांना तो देश सोडून जाता येत नाही. अगदी जावेच लागेल तर कॉन्ट्रॅक्टरची परवानगी लागते. अशा अनेक वेठबिगारी जाचांना सामोरे जात लाखो कामगारांनी कतारमधील अत्याधुनिक इमारती, हॉटेल्स, मेट्रो, विमानतळे, बंदरं आणि रस्ते बांधले आहेत.

गार्डियनच्या मते, गेल्या १२ वर्षांच्या काळात ६५०० कामगारांचा मृत्यू झाला आहे. ‘अ‍ॅम्नेस्टी’च्या रिपोर्टनुसार १५ हजार कामगारांचे मृत्यू झाले आहेत. तर कतार सरकारने कामगारांना अमानुष वागणूक दिल्याचा आणि इतक्या कामगारांचा मृत्यू झाल्याचा इन्कार केला आहे.

दुर्दैवाची आणि अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे कतारमधील बांधकामाचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्याचे कंत्राट अल्बर्ट स्पीअर नामक जर्मन फर्मला मिळालेलं होतं. या फर्मने आठ स्टेडियम्स बांधायचा मास्टरप्लॅन तयार केला. या कंपनीचा मालक अल्बर्ट स्पीअर २०१७मध्ये गेला. अल्बर्टचे वडील हिटलरचे आर्किटेक्ट आणि शस्त्रात्र मंत्री होते. युरोपातील कामगारांकडून गुलामांसारखे काम करवून घेऊन त्यांना अमानुष वागणूक देण्यात त्यांची प्रमुख भूमिका असल्याने पुढे त्यांच्यावर न्युरेनबर्ग येथे खटला चालवला गेला आणि त्यांना २० वर्षांची शिक्षादेखील झाली होती.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या अल्बर्ट स्पीअर कंपनीला स्टेडियम्सचे कंत्राट देऊन, आशियायी देशातील कामगारांचे शोषण केले गेले, यावर अर्थातच जगभर ओरड झाली. ‘बीबीसी’ने कतारमधील नेपाळी कामगारांच्या मृत्यूवर एक मोठे रिपोर्ताज केले होते. त्यानुसार संबंधित प्रत्येक कामगाराचा मृत्यू हा नैसर्गिक कारणाने झाला, असे कतारमधील कंत्राटी कंपन्यांनी दाखवले होते. २० ते ३० वयातील कामगाराचा मृत्यू हा हृदयविकाराचा नैसर्गिक झटका असा होऊन उल्लेख केल्याचे नमूद केले होते. यावर प्रत्येक तरुण, कष्टकरी कामगाराचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या कसा होऊ शकतो, अशा प्रश्न या रिपोर्ताजमध्ये विचारला गेला होता. याची कारणमीमांसा करताना रिपोर्ताजमध्ये सांगितले की, कामगारांना नुकसान भरपाई द्यावी लागू नये, या उद्देशाने नैसर्गिक मृत्यू आहे, असा दाखला देऊन कोट्यवधी रियाल किंवा डॉलर्स कंत्राटी कंपन्यांनी वाचवले.

कतारची त्यामुळे बदनामी तर झालीच, याशिवाय वर्ल्ड कप आयोजनासाठी केलेली लाचखोरी, फिफामधील भ्रष्टाचार वर आशियायी कामगारांचं शोषण आणि अमानुष वागणूक, यामुळे कतारची जागतिक प्रतिमा डागाळली. त्यामुळेच अनेक क्रीडा पंडित आणि अभ्यासक यांनी कतारवर ‘sports wash’ करून देशाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तो एका पातळीवर रास्तदेखील आहे.

पुढे अर्थातच मानवाधिकार संस्था आणि ‘अ‍ॅम्नेस्टी’सारख्या या अल्बर्ट स्पीअर कंपनीला स्टेडियम्सचे कंत्राट देऊन, संस्थांनी या अक्षम्य अन्यायाला वाचा फोडली आणि कामगारांना योग्य वेतन मिळावे, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे गेल्या एक-दोन वर्षात कामगारांचे वेतन १००० रियाल किंवा २३० युरोज करण्यात आले होते. यातील आनंदाची आणि अधिक आश्वासक बाब म्हणजे इंग्लंड, जर्मनीसारख्या दहा देशांनी फिफातील उत्पन्नाचा मोठा वाटा नुकसान भरपाई म्हणून मृत कामगारांच्या नातेवाईकांना आणि कामगारांना द्यावा, अशी मागणी केली.

कट्टरपंथी कतार आणि मुक्त जीवनशैलीतला संघर्ष

कतार आता एक विकसित देश आहे. १२ वर्षांत नेत्रदीपक प्रगती करत कतारने वर्ल्ड कपसारख्या जागतिक क्रीडा स्पर्धेला साजेशी स्टेडियम्स, हॉटेल्स इत्यादी उभारली. वर्ल्ड कपचा उद्घाटन समारंभ अप्रतिम झाला. अगदी दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझीलच्या उद्घाटन समारोहाच्या तोडीसतोड झाला. बीटीएस रॉकस्टार युग कूक आणि कतारी गायक फहाद अल कुबैसी यांनी ‘Dreamers’ नावाचे या वर्ल्ड कपचे सुंदर गाणे पेश केले. मॉर्गन फ्रीमनसारख्या आदरणीय अभिनेत्याला त्यांनी समारोहात खास आमंत्रित केले. त्यांच्याबरोबर संभाषण करणारा एक हात, पाय नसलेला एक अरबी माणूस होता. तो माणूस पुढे अधिकच खोलात गेलेला दाखवला. अरब, आफ्रिकन देशांच्या दृष्टीकोनातून त्यांच्या परिस्थितीवर केलेले ते एक फार मोठे विधान होते.

स्पर्धेचा सांगता समारोपही अतिशय देखणा झाला. खरे तर मॉर्गन फ्रीमन आणि हातपाय नसलेला अरब माणूस यांच्यातील संवादावर रकाने भरून लिहून यायला हवे होते. त्यावर जगभर चर्चा व्हायला हवी होते. पाश्चात्य मीडियाने मात्र कतारच्या LGBTQIA समाजाला असणाऱ्या विरोधाचे, त्यांच्या महिलांवरील अन्याय्य भूमिकेवर जहरी टीका केली. मात्र नेत्रदीपक उद्घाटन आणि समारोप सोहळ्याच्या सांस्कृतिक बाजूवर, वेगळेपणावर, त्यातील सौंदर्य, अदबशीर नजाकतीवर तसेच काही अरबी-मुस्लीम देशांच्या करूण परिस्थितीवर केलेल्या विधानावर भाष्य करायचे टाळले. त्यांना, स्त्री-पुरुष भेद आणि अनुषंगिक अन्याय करणारी तसेच समलिंगी समाजाचे अधिकार नाकारणारी कतारची संस्कृती यातच जास्त रस दिसला. काही देशांनी आणि अनेक प्रथितयश पाश्चिमात्य लोकांनी वर्ल्ड कपवर बहिष्कार घातला. कतारच्या समलिंगी समाजाबाबतच्या भूमिकेचा विरोध म्हणून युरोपिअन टीम्सनी ‘rone love’ नावाची फीत दंडावर बांधून खेळायचे ठरवले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांनी तसे केले नाही.

पाश्चात्यांचा आकस

अर्थातच, इतर वर्ल्ड कपमध्ये झाले तसे खेळाडू आणि टीमविषयी पक्षपाताचे आरोप कतार येथेही झाले. व्हीए आरने (Video Assistant Referee) दिलेल्या निर्णयांवर नाराजी दिसली आणि काही रेफ्रींच्या निर्णयाबद्दल तर उघडउघड संतापाची भावना आढळून आली. हे मुद्दे मात्र तसे नेहमीचेच म्हणायचे. या सगळ्यांमध्ये अरब-आशियाई देशांच्या सांस्कृतिक ओळखीविषयीची अनास्था आणि असहिष्णुता पाश्चात्य जगाने दाखवली. त्यातून त्यांचा आकस आणि दुट्टपीपणा दिसून आला. सगळी वैगुण्ये जरी जमेस धरली तरीही, कतार येथील वर्ल्ड कप हा आशियाई अरबी संस्कृतींच्या अवमानाची उपेक्षेची करुण कहाणी ठरला, असेही खेदाने म्हणावे लागते. एरवी, पश्चिम विरुद्ध पूर्व असे धार्मिक, राजकीय भेद आहेतच. कतारमधील वर्ल्ड कपच्या निमित्ताने मात्र सांस्कृतिक भेद आणि असहिष्णुता अधोरेखित झाली आणि मानवी जग किती दुभंगलेले आहे, याची प्रचिती पुन्हा आली.

उद्घाटन समारोहाच्या वेळी मॉर्गन फ्रीमन हे त्या हात पाय नसणाऱ्या अरबाला म्हणतात- “What unites us here in this moment is so much greater than what divides us. How can we make it last longer than just today?”

किती खरंय, विषम, विभाजित आणि भंगलेल्या मानवी जगाला सांधणाऱ्या क्षण, मिनिटे, तास, महिने आणि वर्षे यांची वाढ होवो आणि पुढे येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना ऐक्य आणि समानता असलेल्या मानवी जगात राहायला मिळो, हीच कामना या निमित्ताने कोणीही करील.

‘मुक्त-संवाद’ या मासिकाच्या जानेवारी २०२३च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

लेखिका गायत्री चंदावरकर सामाजिक-सांस्कृतिक विषयाच्या अभ्यासक असून, सध्या संतसाहित्यावर पीएच.डी. करत आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा