विघटनवादी विचार प्रसृत करणारी व्यवस्था व कावेबाज मंडळी आपण ओळखली पाहिजेत. कारण अखंड समाजाच्या अस्तित्वाशिवाय कोणताही देश ‘अखंड’ राहू शकत नाही!
पडघम - सांस्कृतिक
संजय करंडे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 10 December 2022
  • पडघम सांस्कृतिक धर्म Religion उदारता Kindness सहिष्णूता Tolerance लोकशाही Democracy जमातवाद Communalism

सिगारेटच्या पाकिटावर ‘धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे’ (Tobacco is injurious to health) असे आणि दारूच्या बाटलीवर ‘अल्कोहोलचे सेवन करणे शरीरस्वास्थ्यासाठी हानिकारक आहे’ (Alcohol consumption is injurious to health!) असे स्पष्ट शब्दांत नमूद केलेले असते. या सूचना व्यापक आणि उदात्त दृष्टीकोनातून जनजागृतीसाठी छापलेल्या असतात. त्या लोकांमध्ये जाणीवजागृतीचे काम करतात.

काही लोक कीर्तन, प्रवचन, बैठक अथवा सत्संग, यांस हजेरी लावतात. त्या वेळी त्यांच्या ठायी अशी भावना असते की, तिथे फक्त चांगली शिकवण दिली जाते, जगण्याविषयी प्रबोधन केले जाते. कोणतेही धार्मिक कार्य जर धार्मिक कट्टरता, इतर धर्माविषयी अनादर, भेदभाव, जातीभेद शिकवत असेल, तर त्याचा हेतू आपण तपासून पाहिला पाहिजे.

या दोन्ही घटनांतून लोकांना समजावण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु तो किती खरा व किती प्रामाणिक आहे, याकडे डोळसपणे पाहणे व त्यावर चिंतन करणे गरजेचे आहे. या दोन्ही घटनांमधील वास्तव व पूर्वीपासूनच तयार असलेले समाजमन तपासले, तर आपल्या लक्षात येईल की, सिगारेटच्या पाकिटावरील व दारूच्या बाटलीवरील सूचनेला लोक ‘प्रबोधन’ मानत नाहीत, त्यास ‘चेतावणी’ मानतात. कारण लोकांना माहीत असते की, विक्रेता सुबक वेस्टनामध्ये आपल्या माथी विष मारत आहे. परंतु दुसऱ्या घटनेतील हेतूला लोक ‘प्रबोधन’ मानतात. कारण इथे त्यांना आपल्या माथी नेमके काय मारले जात आहे, याची जाणीव नसते. या पाठीमागे त्यांच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक भावना अजाणतेपणाने गुंतलेल्या असल्याने त्यांच्यामध्ये या उपक्रमाच्या हेतूची चिकित्सा करण्याच्या प्रवृत्तीचा नाश झालेला असतो. शिवाय त्यांची सदसद्विवेकबुद्धी काम करत नाही किंवा ती काम करत नाही, हे समजण्याची मूलभूत इच्छाशक्ती संपुष्टात आलेली असते. म्हणून त्याला ‘प्रबोधन’ मानले जात असावे.  

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

खरे तर पहिल्या घटनेमधील सूचना ही अत्यंत प्रबोधनकारी वास्तव असूनही लोक ती स्वीकारत नाहीत आणि दुसऱ्या घटनेमध्ये तार्किकदृष्ट्या पूर्ण अनिश्चितता, गूढ आणि सार्वजनिक सत्याचा अभाव असूनदेखील त्यास ‘प्रबोधन’ मानले जाते. पण मुळात खरे प्रबोधन वा जागृती या दोन्ही प्रकारांतून होते का, याचा विचार केला पाहिजे. त्यासाठी या दोन्हीमागील हेतू समजून घेतला पाहिजे. ज्यामागे निश्चित असा प्रबोधनाचा, जनजागृतीचा, मानवकल्याणाचा, सार्वजनिक हिताचा व निकोप समाजवाढीचा हेतू असेल, त्यालाच ‘प्रबोधन’ म्हणता आणि मानता येईल, अन्यथा ती एक चेतावानीच आहे, असेच आपण मानले पाहिजे.

मानवकल्याणाच्या आणि सार्वजनिक हिताच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट निषिद्ध मानून, तिचे सामाजिक सलोख्याच्या आणि नैतिक हेतूच्या दृष्टीकोनातून विश्लेषण करण्याची क्षमता स्वतःमध्ये आणि आपल्यानंतरच्या पिढीमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

तत्त्वज्ञानामध्ये कोणत्याही घटनेची व कृतीची सत्यता व नैतिकता ही ती कृती करण्यामागील हेतूवरून ठरते. जसे की, एखाद्या व्यक्तीने कुणाला तरी मदत करण्याच्या हेतूने त्याच्याकडे सोन्याची वीट फेकली आणि ती त्याच्या डोक्याला लागून ती व्यक्ती रक्तबंबाळ झाली, तरी फेकणाऱ्या व्यक्तीच्या हेतूवरून ती कृती नैतिक मानली जाते. कारण इजा पोहचवणे हा त्या दात्याचा हेतू नव्हता. याउलट वाईट हेतू मनामध्ये ठेवून जर एखाद्यास कुणी सोन्याचा मणी भेट दिला, तर ते नैतिकदृष्ट्या वाईट ठरवले पाहिजे. म्हणजेच तात्त्विकदृष्ट्या चांगल्या हेतूने केलेले काम वरकरणी वाईट दिसले, तरी हेतू वरून ते चांगले ठरवले पाहिजे आणि वाईट हेतू मनामध्ये जर एखादे काम केलेले असेल, तर ते नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरवले पाहिजे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सहिष्णूता आणि औदार्य यामुळे व्यक्ती आणि संस्था उत्कर्ष पावतात. जे लोक सहिष्णूतेचा आणि उदारतेचा पुरस्कार करतात, तेच खऱ्या अर्थाने समाजाचे स्वास्थ्य व कल्याण यांचा विचार करत असतात. ज्यांच्याकडे सहिष्णूता आणि उदारता नसते, ते कोणत्याही धर्माचे पाईक असू शकत नाहीत आणि कोणत्याही संताचे वा महापुरुषाचे अनुयायीही. कारण जगातील प्रत्येक धर्म सहिष्णूतेची आणि उदारतेचीच शिकवण देणारा आहे. कितीतरी संत-महात्यांनी सहिष्णूता आणि उदारता यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे.

काही लोक मात्र धार्मिकतेच्या नावाखाली धर्माधर्मातील सलोखा बिघडवण्याचे काम करतात, तेव्हा तो धर्माच्या नावाखाली केलेला अधर्म असतो. कधीकधी महापुरुषांच्या अनुयायांकडून स्वतःच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःच्या विचारधारेला बळकटी आणण्यासाठी ऐतिहासिक घटनांची पुनर्मांडणी केली जाते. त्याद्वारे इतिहास विकृत करण्याचे काम केले जाते. त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण होतो, सहिष्णुता भंग पावते आणि सामाजिक ऐक्याला बाधा निर्माण होते.

आपण हे समजून घेतले पाहिजे की, ताण-तणावग्रस्त आणि दहशतीच्या वातावरणात संस्कृतीचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळे चिरंतन आणि शाश्वत विकासासाठी आपण स्वतःला आणि आपल्या समाजाला ताण-तणावाच्या व दहशतीच्या वातावरणातून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आपल्या अवतीभवती अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, वेगवेगळ्या धार्मिक कार्य करणाऱ्या संस्था, प्रतिष्ठाने, वेगवेगळ्या आध्यात्मिक संस्था आणि धार्मिक पंथ-संप्रदाय कार्यरत असतात. त्यांच्याकडून खरोखरच जनजागृतीचे व सार्वजनिक हिताचे कार्य होते का, हे तपासणे निकोप समाज व्यवस्थेचे काम असते. हे लोक या कार्याच्या आडून आपल्या व्यक्तिगत इच्छा-आकांक्षा, द्वेष, आकस, वर्णवर्चस्ववादी विचार लादून आपली फसवणूक तर करत नाहीत ना, हे पाहिले पाहिजे. ते जर असहिष्णुता, द्वेष पसरवत असतील, उदारतेऐवजी संकुचित भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, तर हे लोक जागृती वा प्रबोधन करण्याचे काम करत नसून समाजाला दहशतीकडे घेऊन जात आहेत, हे आपण ओळखले पाहिजे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अशा वेळी प्रबोधनाची परिभाषा समजून घेणे महत्त्वाचे ठरते. प्रबोधन ही अत्यंत व्यापक अशी संकल्पना आहे. ती, सबंध मानव जातीला एकत्र आणण्यासाठी लोकांच्या मनाची मशागत करते. साहित्य, कला, संस्कृती, समाज व राजकारण याला स्फोटक स्थिती उपयुक्त नसते, परंतु त्याचेच व्यवस्थापन काही राजकीय पक्षांना सत्ता मिळवण्यासाठी व ती टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. त्यासाठी स्वार्थी राजकारणी समाजातील भोळ्या निष्ठांचा वापर करून काही तरी वादग्रस्त स्थिती निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. लोकांना त्या दृष्टीने सतत चिथावतात. उदा., धार्मिक गोष्टींवर चुकीचे अथवा वादग्रस्त बोलत राहणे, विशिष्ट समाजाला आदरस्थानी असलेल्या महापुरुषांबद्दल अपशब्द अथवा बदनामीजनक टिप्पणी करणे इत्यादी इत्यादी. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडून तणावाचे, स्फोटक वातावरण तयार होते. परंतु आपल्या समाजाच्या एकूणच जडण-घडणीसाठी आणि सर्वंकष प्रगतीसाठी अशी स्थिती धोकादायक असते. त्यामुळे हा राजकीय कावेबाजपणा ओळखणे आणि स्वत:बरोबर इतरांनाही त्याची बाधा होणार नाही, याची खबरदारी घेणे, हे आजच्या घडीला भारतीय समाजासाठी अत्यावश्यक झाले आहे.

हे आपण रोखले नाही, तर आपला देश एक सहिष्णू, लोकशाही समाज म्हणून रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर आपल्या देशाला स्वातंत्र्याची फळे चाखयला मिळाली आहेत. त्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या सर्वस्वाचे बलिदान दिले आहे. त्यात सर्व जातीपातींच्या, धर्मांच्या महापुरुषांचा समावेश आहे. त्यांनी स्वातंत्र्याला महत्त्व दिले, जाती-धर्मांना नाही. म्हणून आपण त्यांनी मिळवून दिलेल्या स्वतंत्र्याचा आदर केला पाहिजे आणि या महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीत बंद करण्याचे पातक आपल्या हातून होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे.

घराची चौकट आपले रक्षण करते, पण असहिष्णुतेच्या चौकटी आपल्याला गुलामगिरीत ढकलतात. एक विकसित राष्ट्र निर्माण करण्यासाठी एक सर्वंकष समाज उदयाला यावा लागतो. सध्या आपल्या मनामध्ये संकुचितपणाची बीजे रोवून राजकीय, सांप्रदायिक कावेबाज लोक परस्परांचा द्वेष-तिरस्कार करण्यातच आपले हित असल्याचे भासवून आपल्याला विघटीत करण्याचे काम करत आहेत. आपल्या विविधतेने नटलेल्या परंपरांना गालबोट लावत आहेत. अशा वेळी आपण शांतपणे विचार करून सत्य आणि  चिथावणी यातला फरक ओळखला पाहिजे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

काही तथाकथित स्वयंघोषित राष्ट्रवादी मंडळी देशभक्तीला वेगळाच रंग देण्याचे काम करत आहेत. राष्ट्रप्रेम, देशप्रेम हे कधीही जात, पंथ, धर्म अथवा पक्षाधिष्ठित नसते. इतिहासाने हे वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना घ्या किंवा १९४७ला आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य घ्या, सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी त्यात योगदान दिलेले पाहायला मिळते.

काही स्वयंघोषित विद्वान मंडळी इतिहासाच्या पुनर्मांडणीच्या नावाखाली समाजाचे ध्रुवीकरण करण्याचे काम करत आहेत. एकात्मता जाळणारी अशा प्रकारची विद्वत्ता समाजाच्या हिताला बाधक व धोकादायक आहे. अखंड भारताचे स्वप्न दाखवून विघटनवादी विचार प्रसृत करणारी व्यवस्था व कावेबाज मंडळी आपण ओळखली पाहिजेत. कारण अखंड समाजाच्या अस्तित्वाशिवाय कोणताही देश ‘अखंड’ राहू शकत नाही.

.................................................................................................................................................................

लेखक डॉ.संजय करंडे बार्शीच्या बी. पी. सुलाखे वाणिज्य महाविद्यालयामध्ये सहायक प्राध्यापक आहेत.

sanjayenglish@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा