बौद्ध धर्म आणि जागतिक शांतता – मानवजातीसमोरील एक वळण (उत्तरार्ध)
पडघम - सांस्कृतिक
ख्रिस्तोफर क्वीन
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध आणि ‘Buddhism and the contemporary world : an Ambedkarian perspective’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 07 December 2022
  • पडघम सांस्कृतिक भगवान गौतम बुद्ध Bhagwan Gautam Budha बौद्ध धम्म Baudha Dhamma डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar दलित Dalit

हा लेख ‘Buddhism and the contemporary world : an Ambedkarian perspective’ या डॉ. भालचंद्र मुणगेकर व आकाश सिंग राठोड यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील ‘Buddhism and World Peace: A Turning Point for Humanity’ या लेखाचा  हा अनुवाद आहे. २००५ साली मुंबईमध्ये झालेल्या ‘पहिल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्स’मध्ये सादर केल्या गेलेल्या शोधनिबंधांचा समावेश या संग्रहात केला असून हे पुस्तक नवी दिल्लीतील Bookwell या प्रकाशनसंस्थेने २००७मध्ये प्रकाशित केले आहे.

प्रस्तुत लेखाचा अनुवाद - कुमुद करकरे

..................................................................................................................................................................

बौद्धांच्या शांतिप्रस्थापनेच्या परंपरांचे मूळ आणि परिणाम यांचा थोडा सूक्ष्म आढावा घेणे जरुरीचे आहे. प्रो. विजेसेकेरा यांनी शांतितत्त्व हे बौद्धधर्म पद्धतीच्या सामाजिक नीतीशास्त्राचा कळीचा मुद्दा आहे, असे म्हटले आहे. पाली भाषेमध्ये त्यासाठी संस्कृत ‘शांति’ या शब्दापासून रूढ झालेला ‘सांती’ हा शब्द प्रचलित आहे आणि तो व्यक्तिगत मन:शांतीशी संबंधित आहे. बौद्ध मानसशास्त्रात त्याचे ‘निब्बण’ (संस्कृत - निर्वाण) हे रूप लालसा, संताप, दु:ख आणि आक्रमण या भावनांचा पूर्ण उपशम दर्शवणारे आहे. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये शांती आणि अहिंसा यांचा संबंध समूहातंर्गत नात्यांशी पोहचतो. विजेसेकेरा यांनी या संबंधांत असे निरीक्षण नोंदवले आहे –

“बौद्धधर्मीय आणि भारतातील इतर धर्मांच्या तत्त्वज्ञानात व्यक्तिगत मन:शांतीवर भर दिलेला असून त्याचे सामाजिक परिणाम व्यक्तीच्या स्वत:च्या मानसशास्त्रीय केंद्राशी एकवटलेले दिसतात. तेथूनच त्यांचा उगम होतो.”

गौतम बुद्धांनी पहिले धर्मचक्र प्रवर्तन सारनाथ येथे केले. त्या वेळी त्यांनी चार मौलिक सत्यांचा उच्चार केला. मानवी आयुष्य हे लोभ आणि दु:ख या भावनांमुळे अस्थिर बनते. वेदनांचा किंवा दु:खाचा उगम जीवनाच्या क्षणभंगूरतेबद्दलचे अज्ञान, सुखोपभोग आणि सुरक्षितता यांचा सतत घेतलेला ध्यास यातून होतो. निर्वाण किंवा शांतीचा लाभ सर्व दु:खाचे परिहरण (निरोध) करतो आणि योग्य दृष्टीकोन, आकांक्षा, कृती, वक्तव्य, जीवनपद्धती, जाणीवजागृती आणि एकाग्रता या आठ मार्गांचा अवलंब मानवाला मुक्तीची दिशा दाखवतो.

बुद्धांनी प्रवर्तित केलेली मौलिक सत्ये आणि दाखवलेले अष्टमार्ग हे एकएकटेसुद्धा माणसाच्या भावनिक गरजा भागवणारे आहेत. पण त्या ध्येयाकडे – विशेषत: योग्य कृती, वक्तव्य आणि जीवनपद्धती या पायऱ्या आपल्याला सामाजिक संबंधांच्या परिमाणापर्यंत थेटपणे पोहोचवतात. डॉ. आंबेडकर आणि त्यांचे नवयान बौद्ध आज चटकन या गोष्टींकडेच निर्देश करतात.

इतिहासातील फार मोठ्या प्रमाणात जे शिकाऊ बौद्ध भिक्षू होते व आहेत, त्यांनी योग्य कृती या शब्दाचा अर्थ पाच कर्मकांडापासून, म्हणजे प्राणीहत्या, जे दिलेले नाही त्याचा स्वीकार, चुकीचे वक्तव्य, लैंगिक दुराचार आणि नशा चढवणाऱ्या द्रव्यांचे ग्रहण, यांच्यापासून दूर राहणे (पंचशील), असा केला आहे. या आचारात अंतर्गत मन:शांतीचा शोध अहिंसेची शपथ घेतल्यावर सुरू होतो. अपाय आणि जखमा यांच्यापासून सर्व सजीवांचे (ज्ञानेंद्रिये असणाऱ्या) रक्षण करणे कर्तव्य असल्याची भावनाही बळावते. त्यामुळे प्राचीन बौद्ध समाज (भिक्षूंचे संघ) यांना माणसे किंवा जनावरे यांची धार्मिक कार्यासाठी होणारी हत्या थांबवावी लागली. बौद्ध धर्माचा स्वीकार केलेल्या सम्राट अशोकानेही या निर्बंधांचे पालन केले. माणसाने आपल्या मनातील विकारांची म्हणजे हिंसा, असत्य चौर्यकर्म, लैंगिक दुराचार आणि व्यसने यांची आहुती देणे, ते विकार नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, हीच खरी धार्मिकता आहे, असा उपदेश बुद्धांनी केला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्राचीन काळी आजच्या इतका दुसऱ्याला उपसर्ग न पोचवण्याच्या आचार पद्धतीचा पगडा होता. विचार, हेतू आणि त्याचे परिणाम या मुद्द्यांच्या गुंतागुंतीमुळे अवघड झालेला होता. बहुतेक सर्व बौद्ध देशांत मांसाचा आहारात पूरक अन्न म्हणून समावेश असे. इतकेच नाही तर, स्वसंरक्षण, कायदा-सुव्यवस्था, राष्ट्रीय संरक्षण आणि शेतीसाठीसुद्धा सजीवांची हत्या होतच असे. यातून मध्यम मार्ग काढावा, असा बौद्धांचा एक विचारप्रवाह होता. हिंसेवर आधारलेल्या जीवनपद्धती व व्यवसाय – शिकार, कसाईखाने, सैन्यभरती अशा प्रकारचे – टाळावेत आणि जीवनाला योग्य वळण लावावे, असा होता.

दुसरा विचार प्रवाह जैनांचा. अतिरेकी म्हणजे कीटकांची किंवा सूक्ष्म जंतूंचीसुद्धा हत्या तोंडावर फडके बांधून थांबवणे किंवा चालताना वाट झाडत चालणे, यांसारखे आचार कृतीत उतरवणे हा होता. बौद्धांच्या अहिंसक तत्त्वाला हेतूंचीही एक बाजू होती. यानुसार क्रिया करणाऱ्याच्या मनातील हेतू किंवा त्याची मन:स्थिती ही विचारार्ह बाजू होती. जोपर्यंत पशू भिक्षुकांना खायला घालण्यासाठी मुद्दाम कापले जात नाहीत, तोपर्यंत त्याच्या भिक्षेच्या वाडग्यात पडलेला मांसाचा तुकडा खाण्यास त्यांना प्रतिबंध नव्हता. त्याचप्रमाणे घरात एखादा अपघात एखाद्या किरकोळ व्यक्तीच्या हातून अनवधानाने घडला, तर त्यावर पूर्वरचित कट किंवा हत्येचा आरोप ठेवून त्याच्याकडून दुष्कर्म घडले, असे मानण्यास येत नसे.

प्राचीन बौद्ध धर्माचे अहिंसा तत्त्वाला सर्वांत महत्त्वाचे योगदान होते. ते हे की, द्वेष, लोभ आणि मोह या कोणत्याही कृतीच्या मुळाशी असणाऱ्या तीन विकारांचा बंदोबस्त किंवा उपशमन करण्याचे तंत्र. द्वेषाचा उपशम करण्यासाठी निराकरण करण्यासाठी निस्सीम प्रेमळपणा, लोभ शमवण्यासाठी औदार्याचा आणि मोहाचे निराकरण करण्यासाठी ज्ञान किंवा प्रज्ञा यांचा वापर करण्याचे तंत्र प्राचीन बौद्ध विचाराने ‘अहिंसा प्रस्थापने’साठी दिले. हिंसेला चिथावणी देण्यात ज्याप्रमाणे लोभ आणि मोह हे विकार बरोबरीने जबाबदार असतात, तसेच अन्य व्यक्ती आणि समूह यांच्याविषयी वाटणारा अकारण संताप आणि द्वेष यामुळेही हिंसा व विध्वंस आजच्या जगात थैमान घालताना दिसतो.

याच संदर्भात प्रेमळपणा अगर मित्रभावना स्वत:बद्दल आणि दुसऱ्यांबद्दलही जी सदभावना किंवा आत्मीयता निर्माण करते, तोच बौद्ध धर्माच्या अहिंसेचा पाया आहे. बौद्धांच्या शिक्षणक्रमातील पहिला पाठ ‘परमधाम’ (ब्रह्मविहार) यात मित्रभावनेला संकटात सापडलेल्या अन्य व्यक्तीबाबत सहानुभूती (करुणा), इतरांचा उत्कर्ष पाहून वाटणारा आनंद (मुदित) आणि लाभ व हानी, या दोनही प्रकारच्या प्रसंगात मनाचा राखलेला समतोल, यांची जोड मिळावी लागे. मैत्रभावनेच्या वाढीसाठी साधकाने स्वत:च्या अस्तित्वावर लक्ष केंद्रित करून पालीमध्ये अगर स्वत:च्या भाषेत खालील सूत्रांता पुनरुच्चार करणे गरजेचे आहे –

‘अहम अव्हरो होमी’ – शत्रुभावनेपासून मी मुक्त असावे.

‘अभ्यापज्जो होमी’ – दुष्टपणापासून मी मुक्त राहावे

‘अनिघो होमी’ – दु:ख आणि वेदना यांच्यापासून मी मुक्त असावे

‘सुखी अत्तानाम परिहरामि’ – मला स्वत:ला संतुष्ट ठेवता यावे.

स्वत:इतकेच दुसऱ्यावरही प्रेम करता यावे, या ख्रिस्ती जनांच्या प्रयत्नांचा आदर्श ठेवून बौद्ध धर्मही शत्रुत्व, दुष्टबुद्धी आणि दु:ख यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि भोवतालच्या परिसरात व स्वत:ला सुखवृद्धी व्हावी म्हणून पायरीपायरीने – म्हणजे प्रथम एखाद्या आवडत्या शिक्षकाबद्दल किंवा आपल्या पालकांबद्दल व्यक्ती आत्यंतिक प्रेम बाळगतो, आणि नंतर त्याच्या मैत्रभावनेचे क्षेत्र मित्र, एखादा परका किंवा अपरिचित माणूस आणि शेवटी एखादा प्रतिस्पर्धी अगर न आवडणारी व्यक्ती, अशा क्रमाने विस्तारत जाते. हे करत असता प्रत्येक पावलावर साधकाचे मन अधिक मृदू आणि संस्कारक्षम होत जाते. करुणा, दुसऱ्याच्या उत्कर्षाचा आनंद आणि मनाचा समतोलपणा, या अवस्था वाढीला लावण्यासाठीही वरीलप्रमाणे ध्यान-धारणेचे शिक्षण घेणे व सराव करणे जरुरीचे आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बौद्ध धर्माच्या अहिंसेबद्दलच्या दृष्टीकोनाचे मूळ पद्धतशीरपणे केलेल्या स्वभावावरील संस्कारांमध्ये आहे. ज्यामध्ये द्वेषभावना, लोभ आणि स्वाभाविक असंतुलन यांसारख्या नकारात्मक दोषांचे निर्मूलन ध्यानधारणेच्या स्वयंशिक्षण प्रयोगांद्वारे सकारात्मक सामाजिक जाणीवांमध्ये करण्याचे सामर्थ्य आहे. पण या अंतर्बाह्य मन:शांतीसाठी बुद्धांनी प्रतिपादन केलेल्या अष्टमार्गी साधनेची वाटचाल आवश्यक आहे. ध्यानधारणा आणि नैतिक व्यवहार सांभाळण्यासाठी योग्य संकल्पनांच्या रूपरेखा बनवण्यासाठी सुयोग्य दृष्टीकोन, तो सराव सांभाळण्यासाठी आणि वाढवण्यासाठी योग्य त्या अपेक्षा आणि प्रयत्न यांचे भान, प्रत्येक क्षण जगताना नवनव्या घटना आणि निर्माण होणाऱ्या नात्यांचा सांभाळ करण्यासाठी उचित अशी जाणीव-जागृती आणि मन:शांती हस्तगत करण्याच्या सरावासाठी आवश्यक ती एकाग्रता, जिच्यामुळे साधक, व्हिएतनामी झेन मुनी थिक न्हाट हान यांनी म्हटल्याप्रमाणे, स्वत:च शांतीचा निर्हेतुक आदर्श बनून, निर्वाण अवस्थेतील मुक्तीचे उदाहरण जगासमोर ठेवील. बौद्धांच्या शांतिमार्गाच्या सर्व परंपरांची माहिती येथे एकत्रित करणे शक्य नसल्यामुळे आपण येथे बौद्धांच्या नैतिक व्यवस्था आणि त्यानंतर वैश्विक मुक्तीचा बोधिसत्त्वांचा मार्ग यांची थोडक्यात माहिती घेऊ.

बौद्धांची शांतिप्रस्थापना : सिद्धान्त आणि आचरण

कर्म, नीतीव्यवहार, संसार यांच्यातून मिळणारी शिकवण माणसे, जनावरे, देवता आणि इतर क्षूद्रजीव यांचे जन्म आणि मृत्यु या चक्रातील फेऱ्यांची अटळता या कल्पनांचा प्रभाव युगानुयुगे आशियायी संस्कृतीवर पडला आहे. बौद्ध भाष्यकारांच्या मते मानव लोक हा स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण मानवी रूपातील स्त्री-पुरुषच फक्त उत्तम नीतीमत्ता हस्तगत करून बौद्धपदाला पोचतात आणि जीवन-मृत्युच्या चक्रातून कायमचे मुक्त होतात. नैतिक वर्तन हा प्रत्येक व्यक्तिमनाचा एक खोल कप्पा आहे आणि प्रत्येक जण आपल्या कृत्यांनी पाप-पुण्याची बीजे पेरत असतो. ज्याची बरी-वाईट फळे त्या व्यक्तीला मिळत राहतात. क्रोध आणि हिंसा यांसारख्या कृत्यांच्या जहाल शिक्षा नरकवासासमान परिस्थितीत जन्म घेऊन भोगाव्या लागतात.

बौद्ध समाजांमध्ये नैतिकतेला उत्तेजन देण्यासाठी दाखवलेली प्रलोभने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पण माणसे परस्परांपासून तोडण्यापेक्षा जीवनचक्राची ही कल्पना सर्वांनाच एकमेकांशी जोडून टाकते. कोणताही जीव एकेकाळी आपली माताही असू शकतो, हा विचार त्या जीवाबद्दल मनात आदर निर्माण करू शकतो, यावर अनेकांचा विश्वास आहे. आणि अतिशय दु:ख ज्यांनी भोगले आहे, त्यांच्याकडून अपेक्षित असलल्या धोक्याचे आनंद निर्मितीत रूपांतर करण्याची संधी मिळते.

दुष्ट आत्मे त्याग आणि बलिदानाने संतुष्ट होत नाहीत. ते पवित्र (सदगुणी) व्यक्तींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सामर्थ्याने नम्र बनतात, माणसाळतात. ऋषीमुनींनी आपल्या मानसिक सामर्थ्याने राक्षसांचे परिवर्तन घडवून आणल्याच्या पद्धतींचा पुढील शतकांमध्ये ठिकठिकणी पसरत गेलेल्या बौद्धधर्मीयांनी दुष्ट आत्म्यांच्या बंदोबस्तासाठी केलेला दिसतो. सौम्य प्रवृत्तीच्या आत्म्यांच्या खोडकरपणाच्या कथा प्राचीन वाङ्मयात निर्विष विनोदाने सजवलेल्या असतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आदर आणि सदभावना दाखवण्याच्या या पद्धतींचा मानवी स्तरावर योग्य वापर करून बौद्ध प्रसारकांनी आशियामध्ये सर्वत्र बुद्धाचे तत्त्वज्ञान पोहोचवले, हे सांगण्याची गरज नाही.

पण या ठिकाणी बुद्धाच्या मुक्तीविषयक तत्त्वज्ञानातील विसंगती सामोरी येते. कारण शेवटी या तत्त्वज्ञानाच्या शिकवणीनुसार ‘स्वत:’ आदर, संरक्षण, पुनर्जन्म आणि बुद्धाशी एकरूपता साधकच नसतो. बौद्ध मानसशास्त्रे आणि नीतीतत्त्वे यांच्या गाभ्याशी ‘स्वत:’ नसणे किंवा नि:स्वार्थीपणा (अनत्त-संस्कृत-अनात्मन्) याची शिकवण असते. सर्व ऐहिक अस्तित्व हे अनित्य (अनिक्क) आहे, या शिकवणुकीचा उपसिद्धान्त, नि:स्वार्थ याचा अर्थ बंदिस्त, संमिश्र आणि अस्थर स्वरूपाचे व्यक्तित्व असा होतो आणि मग कायम अस्मितेच्या स्वरूपात ते पकडून ठेवणे नैराश्य, वैफल्य किंवा अगदी हिंसेला आमंत्रित कसे करते, याचाही खुलासा त्यातून होतो.

या शिकवणुकीचा स्वीकार, दुसऱ्या बाजूला कोणत्याही कृतीच्या वाईट हेतूचे (मुळांचे) पोषण करणे नाकारतो. कोणाही नि: स्वार्थी व्यक्तीचा द्वेष कसा करील? त्यांच्याकडे कोणीही हावरेपणाने किंवा ताबा घेण्याच्या दृष्टीने कसे पाहू शकेल? मानवी स्वभावाचे सत्य जेव्हा उमगते, तेव्हा फसव्या समजुतीत गटांगळ्या खात कोण राहील? अशा प्रकारच्या विचारसरणीचा परिणाम अधिक प्रवाही आणि दुसऱ्यांबद्दल आणि परिस्थितीबाबत खुल्या आणि मोकळ्या दृष्टीकोनात होतो. आणि त्यातून मानवी जीवनातले अपेक्षित संघर्ष कमी होऊन जीवनातील प्रश्नांना अनेक प्रकारची उत्तरे सापडतात.

आशियायी बौद्धवादामध्ये अहिंसेचे जे तत्त्वज्ञान आहे, त्याला आधार देणारी दुसरी एक शिकवण परस्पर अवलंबित्वाची अपरिहार्यता ही आहे. म्हणजे नैतिक विश्वातील जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकलेले सर्व प्राणी आणि त्यांच्या कृती यांचे परस्परावलंबित्व. मनाचे सामर्थ्य विश्वव्यापी बनवण्याची संकल्पना – जी बुद्धाच्या प्रज्ञेचे आणि आंतर्दृष्टीचे केंद्र मानले जाते, तीचा संबंध नि:स्वार्थीपणा आणि पुनर्जन्म यांच्याशी आहे. तिचा विकास बौद्ध तत्त्वज्ञानाच्या उत्तरकाळात शून्यता अनुभवण्याच्या शिकण्यातून आणि अस्तित्वाचे अद्वैत अनुभवताना झाला. या अनुभवात परस्परांच्या सहवासातून आणि नात्यातून होत जाणाऱ्या विकासाचा लाभ होतो.

इहलोकातील सर्वांचे एकमेकांवरचे परस्परावलंबित्व ‘इंद्राचे जाळे’ या संज्ञेनेही व्यक्त होते. ज्याप्रमाणे जाळ्यात गोळा केलेली रत्ने त्यांच्या विविध पैलूंमुळे परस्परांचे प्रतिबिंब उमटवत, त्या सर्व प्रतिबिंबाबतून एक ‘आभा’ निर्माण करतात. त्याप्रमाणे जीवांच्या परस्परावलंबित्वातून एक प्रकारचे सामाजिक ‘इंद्रजाल’ निर्माण होत जाते, असा या संज्ञेचा अर्थ असावा. या सर्व सिद्धान्ताचा नैतिक परिणाम बौद्ध साधकांना अनेक युगांत अनुभवास आला. समाजाची अस्थिरता आणि घटकांचे परस्परावलंबित्व यांतून एकमेकांविषयी आदरभावाची निर्मिती होते. या पवित्र नात्यांची हिंसेद्वारा चिरफाड करणे, हे भीषण परिणामांना आमंत्रण ठरेल, असाही इशारा या सिद्धान्तातून मिळतो.

बौद्ध धर्माने परिपक्व होऊन भारतात पाय रोवल्यानंतर तो मध्य, पूर्व आणि आग्नेय आशियात पसरला. त्यातून त्या भागात शांतीचे नवे संदेश विकसत गेले. त्यातून सुधारणावादी चळवळ अस्तित्वात आली. तिला ‘महायान’ (वैश्विक वाहन) असे नाव पडले. ही बोधीसत्त्वासाठी म्हणजे भविष्यात निर्माण होणाऱ्या बुद्धाच्या अवतारांना प्रेरणा देणारी चळवळ होती.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बौद्ध वाङ्मयात जातक कथा लोकप्रिय आहेत. त्यात शाक्यमुनी बुद्धांच्या मागील जन्मांच्या कथा आहेत. या कथांतील माहितीप्रमाणे बुद्धाचे ३५७ मानवजन्म, ६६ देवाचे अवतार म्हणून आणि १२३ प्राणीजन्म असे पूर्वजन्म झाले. या सर्व जन्मांत बोधिसत्त्वांनी दुसऱ्याचा प्राण वाचवण्यासाठी अगर दुसऱ्याने जगावे म्हणून बलिदान केलेले आहे. पण महायान पंथाच्या शिकवणुकीप्रमाणे प्रत्येकामध्ये बुद्ध बनण्याची सूक्ष्मक्षमता आहे, हे प्रसृत झाल्यानंतर अगणित बोधिसत्त्व निर्माण झाले. त्यात शेजारच्या घरातला एखादा हुशार सामान्य माणूस (विमला किर्तिनिर्देस सूत्र), आगीत अगर पुरात उडी घेऊन लोकांना वाचवणारा ‘देवदूत’ (प्रज्ञापरिमिता किंवा प्रज्ञा पक्व प्रज्ञा साहित्यातील उदाहरण), किंवा संभ्रमात राहणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या मानवांना योग्य (बुद्धाच्या) मार्गावर आणण्यासाठी जो कुशलतेने प्रयत्न करतो, विविध उपाय योजतो. त्याचे उदाहरण ‘सद्धर्मपुंडरिक’ किंवा ‘कमलसूत्रा’त आहे. अथवा समाजातील स्त्रिया, मुले, माता आणि इतर असहाय व्यक्ती यांना मदत करणारा. हे सर्व बोधिसत्त्वच मानले जातात.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा