समाजाच्या भविष्याचा विचार जर विवेकाच्या मार्गाने घडायचा असेल, तर ‘गांधीनगर’ हे त्या मार्गावरचे आश्वस्त करणारे एक स्थानक निश्चित असेल
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
ओंकार थोरात
  • छायाचित्र - मल्हार जोशी
  • Wed , 09 November 2022
  • पडघम कोमविप चौफेर समाचार Choufer Samachar गांधीनगर Gandhinagar सिंधी Sindhis

दरवर्षी पुण्या-मुंबईबाहेरून जे वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक प्रकाशित होतात, त्यापैकीच एक म्हणजे ‘चौफेर समाचार’. गेली काही वर्षं हा दिवाळी अंक पत्रकार अरुण नाईक यांच्या अतिथी संपादनाखाली प्रकाशित होतो आहे. विषयवैविध्य, नवनवे लेखक आणि त्यांची सुंदर, कलात्मक मांडणी, ही या दिवाळी अंकाची ‘कायमस्वरुपी’ वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील.

यंदाचा ‘चौफेर समाचार’चा दिवाळी अंकही त्याच्या परंपरेला साजेसाच आहे. त्यात यंदा ज्ञानपीठ विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो (कथा), प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (पाच कविता), नितीन दादरावाला (लि मिल्लर), सुरेश प्रभू (नदी जोड प्रकल्प), डॉ. विनया जंगले (संशोधकाची शोधयात्रा), अरविंद पाटकर (महानगरीतले चळवळीचे दिवस), अतुल देऊळगावकर (न जीवनसत्व) अशा विविध मान्यवरांचे लेखन आहे. त्यातील हा एक रिपोर्ताजवजा लेख... संपादकांच्या पूर्वपरवानगीसह...

.................................................................................................................................................................

त्या दिवशी ‘दमा दम मस्त कलंदर’ गाणं मी मुद्दाम स्थान लावलं की, सहजच माझ्याकडून लावलं गेलं, नेमकं काय झालं आठवत नाही, पण हे गाणं कायमच माझ्या आवडत्या गाण्यांच्या यादीतील एक आहे. नुसरत फतेह अली खान, रुना लैला, आशा भोसले, रिचा शर्मा, हरप्रीत कौर, जावेद अली कितीतरी गायक-गायिकांच्या आवाजात हे गाणं मी ऐकलंय. बऱ्याच वेळेस या गाण्यामुळे मला एक वेगळीच अनुभूती झाली आहे. हे गाणे ऐकताना खोलपर्यंत काहीतरी जाणवते. हे गाणे कोणाला ‘झुलेलाल’ या सिंधी इष्टदेवतेचे स्तवन वाटते, तर कोणाला सुफी भक्तिरचनेतला उत्कट आविष्कार.

त्या दिवशी माझी सहकारी मैत्रीण बाईक चालवत होती. मी मागे बसलो होतो. आबिदा परवीनचा आवाज माझ्या ‘इअरफोन’मध्ये घुमत होता. ‘सिंदडी दा सेवर दा सखी शाहबास कलंदर’ या ओळीनंतर आबिदा परवीन यांनी जो एक दमदार हुंकार घेतला, त्याच क्षणी माझ्या मैत्रिणीकडून करकचून गाडीचा ब्रेक लागला आणि माझी तंद्री भंगली. पुणे-बेंगलोर हायवेवरच्या तावडे हॉटेलजवळच्या ओव्हर ब्रिजच्या खालून, ज्या रोडने आपण कोल्हापुरात प्रवेश करतो, त्याच रोडच्या उलट्या दिशेने आम्ही गांधीनगरमध्ये प्रवेश केला. ग्रामपंचायतीच्या नकाशावरची ‘गांधीनगर’ गावाची हद्द अजून सुरूच व्हायची होती, पण लोकांच्या दृष्टीने गांधीनगर कोल्हापूरच्या तावडे हॉटेलपासूनच सुरू होतं. यापूर्वी कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने खरेदीसाठी म्हणून गांधीनगरला दोन-चार वेळा येणं झालं होतं. तेव्हापासूनच या गावाबद्दल, या व्यापारी वसाहतीबद्दल प्रचंड औत्सुक्य होतं.

फाळणीच्या काळात विस्थापित सिंधी जनसमूहाने कालांतराने कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासात एक ठळक स्थान निर्माण केले. कपड्यांच्या दोन-तीन मजली होलसेल दुकानांपासून, भांडी, प्लास्टिकच्या वस्तू इ. होलसेल दुकानांची सलग रांग पहात पहात पुढे निघालो. निरंकारी क्लॉथ स्टोअर्स, गुरुनानक होलसेल, सतनाम रेडिमेडस्, ओम शांती ट्रेडर्स, अमृत रेडिमेडस् अशा वेगवेगळ्या दुकानांकडे पाहता पाहता गांधीनगरच्या मेन रोड वरच्या निगडेवाडी जवळच्या भव्य ‘बापूसाहेब पांडुरंग खुटाळे व्यापारी संकुल’ नावाच्या इमारतीकडे माझे लक्ष गेले. पुढे परत रस्त्याच्या दुतर्फा दुकानांची रांग सुरू झाली. त्या दिवशी मला थोडी घाई होती, कारण सिंधी सेंट्रल पंचायतीच्या ऑफिसमध्ये ज्येष्ठ व्यापारी मंडळींसोबत मीटिंग ठरली होती.

मुख्य रस्त्यापासून आतल्या रोडवरच्या या सिंधी सेंट्रल पंचायतीच्या ऑफिसमध्ये पोहोचलो आणि मग साधारण ८०च्या वयातल्या त्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींशी बोलताना फाळणी, विस्थापन, त्या काळातलं वळिवडे माळावरचे छावणीचे स्वरूप, संघर्ष अशा कितीतरी आठवणी मुखर झाल्या.

“अहो, घर-गाव कायमचं सोडायला लागलेली आम्ही माणसं, काय काय सोबत आणणार? थोडं फार काहीतरी घेऊन इथं-तिथं फिरत या वळिवडे गावात आलो. सरकारनं आमच्यासाठी इथे छावणी टाकली होती. इथे त्या बराकी होत्या. कौलारू छप्पर आणि लहान-मोठ्या खोल्या म्हणा की!” मोहनजी बोलत होते, “पाकिस्तानातून इथं आलो त्या वेळी आठ वर्षांचा होतो. सगळंच काय आठवत नाही, खरं वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी अजून लक्षात आहेत. पाकिस्तानातून पहिल्यांदा आम्ही हैदराबादला आलो, तिथून मुंबईला आणि मग इथं गांधीनगरला,” नेबनदास म्हणाले, पण त्यांच्या आवाजात त्रासदायक भूतकाळाबद्दलचा कोणताच विषाद जाणवला नाही. इतक्यात रामजी म्हणाले, “पाकिस्तानात लाडकानामध्ये आमची भरपूर शेती होती, तांदळाच्या मिल्स होत्या, मोठीच्या मोठी कोठी होती. इथे आलो, त्या वेळी फक्त डोक्यावर छप्पर होतं. आज माझ्या मुलाचं तीन मजली शोरूम आहे.”

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गांधीनगरच्या सेंट्रल सिंधी पंचायतच्या हॉलमध्ये त्या दिवशी जमलेल्या जवळजवळ प्रत्येकाचं कुटुंब गांधीनगरमधील प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळखलं जातं. अभावग्रस्ततेतून समृद्धीकडे झालेला त्यांचा हा प्रवास, त्यांना या वयातही एक निराळीच ऊर्जा देत होता. यांच्यासारख्या व्यापारी वर्गाच्या प्रयत्नांमुळेच एके काळी भारत-पाकिस्तान फाळणीतील निर्वासितांची छावणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधीनगरला कालांतराने पश्चिम महाराष्ट्रातील एक नावाजलेली व्यापारी वसाहत म्हणून स्थान मिळाले आहे.

भारताच्या फाळणीचा रक्तरंजित इतिहास हा हत्याकांडांचा, अनन्वित हिंसाचाराचा आहे. दीर्घकालीन कटकारस्थानातून निपजलेल्या एका अपरिहार्य राजकीय निर्णयामुळे लाखो लोकांचं आयुष्य पणाला लागलं. स्थलांतरितांचे आणि विस्थापितांचे जथ्थेच्या- जथ्थे भारत-पाकिस्तान सीमेरेषेच्या आरपार प्रवास करू लागले. दोन्ही देशांतील हजारो लोक निर्वासित छावण्यांमध्ये आसरा शोधू लागले. फाळणीमुळे स्वाभाविकपणे देशाच्या इतर भागाच्या तुलनेत पंजाब आणि बंगालला अतोनात नुकसान सोसावं लागलं. दोन्ही प्रांतांतील कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. निराळ्या प्रदेशात त्यांना विस्थापित व्हावं लागलं. विस्थापनाच्या या प्रक्रियेमध्ये नव्या प्रदेशात रुजण्यासाठी या मंडळींना काही प्रमाणात धर्म, चालीरिती, परंपरा या सगळ्यांचा आधार लाभला.

पाकिस्तानातील हिंदू सिंधी समाजाच्या बाबतीत मात्र फाळणीचा हा निर्णय अत्यंत वेगळ्या पद्धतीनं परिणाम करणारा ठरला. पाकिस्तानातील मुस्लीम समाजाशी असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संबंधांमुळे म्हणा किंवा इतर काही स्थानिक कारणांमुळे हिंदू सिंधी समाजाच्या बाबतीत फाळणीच्या काळात पंजाबी आणि बंगाली समाजाच्या तुलनेत अत्याचाराच्या घटना घडल्या नाहीत. आता ही जरी या समाजाच्या दृष्टीने चांगली गोष्ट घडली असली, तरी आपल्या ‘मायभूमी’ला कायमचे पोरके होणे, ही अत्यंत खोलवर परिणाम करणारी गोष्ट हिंदू सिंधी समाजाच्या बाबतीत फाळणीच्या काळात घडली. मूळच्या सिंध प्रांतातील हिंदू सिंधी समाजाला फाळणीनंतर भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विस्थापित व्हावे लागले.

ब्रिटिश प्रशासनाच्या दृष्टीने मुंबई आणि सिंध प्रांत संलग्नित असल्यामुळे तिथल्या सिंधी समाजाचं मुंबईशी एक वेगळ्या प्रकारचं नातं होतं. मुंबई हे बहुधर्मीय आणि ग्रामीण भागाच्या तुलनेत अधिक खुल्या विचारांचं महानगर असल्यामुळे इथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला सिंधी समाजाला तुलनेनं कमी संघर्ष करावा लागला असावा.

तत्कालीन भारतातील ग्रामीण जीवन आणि सिधू समाज हे एकमेकांच्या दृष्टीने सर्वतोपरी अपरिचित होते. भारतात ज्या ज्या प्रदेशात हा समाज विस्थापित झाला, तिथल्या स्थानिक समाजाशी त्याचा संबंध आला. आता स्थानिक समाज आणि हा विस्थापित सिंधू जनसमूह यांच्यातील विरोध आणि सामावून घेणं, या दुहेरी वाटा-वळणांनी त्या त्या प्रदेशामध्य बऱ्याच ठिकाणी एक नवाच ‘सांस्कृतिक भूगोल’ आकारास आला.

कोल्हापूरजवळील ‘गांधीनगर’ हे या बाबतीतलं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. याच परिसरात १९४३ ते १९४८ या काळात पोलंड देशातील निर्वासितांची छावणी होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधील ही सगळी मंडळी चार ते पाच वर्षांसाठी स्थलांतरित झाल्यामुळे त्यांचा स्थानिक संस्कृतीशी संकर घडण्याला मर्यादा आल्या. सिंधी समाजाला मात्र इथंच त्यांचं कायमचं नवं विश्व उभं करायचं होतं. स्थानिक लोकांशी जुळवून घेऊनच त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या होत्या. एका ठरावीक संख्येनं विस्थापित झालेला सिंधी समाज गांधीनगर परिसरात एका मोठ्या व्यापारी वसाहतीचा निर्माणकर्ता ठरला आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

साधारणपणे ७५ ते ८० वर्षांपूर्वी आजचे गांधीनगर म्हणजे वळिवडे, मुडशिंगी आणि उचगावचा भाग होता. अर्थात, सुरुवातीला वळिवडेच्या माळावरची वसाहत हीच आजच्या गांधीनगरची सुरुवात आणि केंद्र होतं. तत्कालीन केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाला आदेश देऊन पोलंडच्या निर्वासितांसाठीच्या बराकी भारताच्या फाळणीमुळे परागंदा व्हाव्या लागलेल्या निर्वासितांसाठी राखीव केल्या. एका बराकीमध्ये बारा खोल्या असायच्या. अशा अंदाजे दीडशे बराकी त्या परिसरात होत्या. आज त्या बराकींच्या जागी पक्की घरं दिसतात, तर काही जुने अवशेषही दिसतात. जुन्या गावगाड्यात गावाच्या माळाचं एक विशेष अस्तित्व असायचं. गावगाड्यातल्या भटक्या जमातींच्या पालांपासून जत्रा-यात्रा साजऱ्या करण्याच्या ठिकाणापर्यंत या माळावर हंगामी का असेना, पण थेट गावाशी संबंधित असलेले बरेच सारे उपक्रम घडायचे.

वळिवडेचा माळही पोलंडचे निर्वासित राहायला येण्याच्या आधी कोल्हापूर संस्थानच्या विविध उपक्रमांसाठी वापरला जाणारा भूभाग होता. भारताच्या फाळणीनंतर तुटपुंज्या साहित्यानिशी पाकिस्तानातून विस्थापित झालेली सिंधी मंडळी इथं स्थायिक व्हायला लागली, तसा या परिसराचा भूगोल बदलायला लागला. सुरुवातीला गोळ्या, बिस्किट, कापड-चोपड, कांदे-बटाटे इत्यादी गोष्टी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या या मंडळींनी स्थानिक लोकांचा विश्वास संपादन करून विविध व्यवसायांत आपला जम बसवायला सुरुवात केली. मुख्यतः कापड व्यवसायात यांना गती सापडली. व्यवसाय जस-जसा वाढायला लागला, तशी जागेची कमतरता भासू लागली. वळिवडेच्या माळापासून झालेली सुरुवात मुडशिंगी, उचगावसारख्या गावांच्या हद्दीपर्यंत पोहोचली.

दरम्यान १९७३ साली वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना ‘निर्वासितांची वसाहत’ म्हणून इथल्या विकासाला येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलण्यात आली. आज गांधीनगर परिसरात जवळजवळ ४५०पेक्षा जास्त रिटेल, तर ४००पेक्षा जास्त होलसेल दुकाने आहेत. गांधीनगरमध्ये फिरताना तीन-चार मजली भव्य अशा अनेक इमारती दिसतात. कुठे शोरूम आहे, तर कुठे गोडाऊन, तर कुठे दोन्ही एकत्र दिसते. कापड असो किंवा प्लास्टिकच्या वस्तू, इथल्या व्यवसायाशी संबंधित ग्राहक वर्ग हा इथून अंदाजे २४० किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात आहे.

बेळगाव, गोवा, पुण्याजवळचे शिरवळ इथपर्यंत गांधीनगरच्या व्यवसायाचा विस्तार बघता आपल्याला या सिंधी मंडळींनी केलेल्या आर्थिक प्रगतीची कल्पना येऊ शकते. या संदर्भातले एक अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे तावडे हॉटेलच्या बाजूने गांधीनगरमध्ये प्रवेश केल्या केल्या ‘सरस्वती साडी डेपो’ नावाची एक अत्यंत भव्य इमारत आपले लक्ष वेधून घेते. २ लाख स्क्वेअर फुटांची ही तीन मजली इमारत दुल्हानी परिवाराच्या यशोगाथेची साक्ष म्हणून उभी आहे. फाळणीनंतर भारतात विस्थापित झालेल्या या परिवारातील सदस्यांनी सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी रेल्वे गाड्यांमध्ये रेवड्या विकल्या. तिथपासून ते आज वार्षिक ६०० कोटींची उलाढाल असलेला त्यांचा व्यवसाय आपल्याला थक्क करतो. शंकर, लक्ष्मणदास यांच्यापासून विनोद, अमर दुल्हानी आणि याच्या परिवारातील अनेकांच्या प्रयत्नांमुळे हा व्यवसायाचा इतका विस्तार झाला आहे. व्यावसायिक प्रगतीच्या अशा निरनिराळ्या आर्थिक स्तरातील यशोगाथा हा गांधीनगरच्या बाबतीत नित्याचा भाग झाला आहे.

फाळणीसारख्या गुंतागुंतीच्या राजकीय घटितामुळे उफाळलेल्या हिंसेने जसा विषण्ण करणारा विदारक जीवनानुभव दिला, तसंच एखाद्या विशिष्ट प्रदेशातील भौगोलिक स्थित्यंतराला आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या आर्थिक-सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाला चालना दिली. कृषीसंस्कृतीला मूलाधार म्हणून निर्माण झालेल्या ग्रामरचनेपेक्षा अत्यंत निराळी अशी व्यापारी संस्कृती मध्यवर्ती ठेवून गांधीनगर गावाची रचना घडत गेली. इथले सिंधू मार्केट, गुरुनानक मार्केट, लोहिया मार्केट इ. ठिकाणांमधली लहान-मोठी दुकाने, शोरूम्स, गोडाऊन्स यामुळे या गावाचा खूप मोठा भूभाग हा व्यापारी पेठेने व्यापलेला आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

गांधीनगरच्या विस्तारामुळे आजूबाजूच्या गावांचा काही भागही या मार्केटने व्यापलेला आहे. १९९२ साली स्थापन झालेल्या गांधीनगर ग्रामपंचायतीची सध्याची लोकसंख्या १२.६००च्या आसपास आहे. या एकूण लोकसंख्येच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त लोक हे सिंधी आहेत. आपल्याला वळिवडे, मुडशिंगी, चिचवाड रस्ता, निगडेवाडी-उचगाव या गावांमध्ये पसरलेल्या गांधीनगरच्या लोकवस्तीचा निराळा विचार करावा लागेल. गांधीनगरमधील विविध संस्था आणि संघटनांशी ज्यांचा जवळचा संबंध आहे, असे रमेश तनवाणी हे परिसरात ‘डॅडी’ म्हणून लोकप्रिय आहेत. ते प्रतिष्ठित व्यावसायिक असून, त्यांचा जनसंपर्क आणि त्यांच्या मार्गदर्शनाला असलेले महत्त्व इथल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींशी बोलताना जाणवले. रमेश तनवाणी यांना गांधीनगरचा इतिहास मुखोद्गत आहे. गांधीनगरचा अजून विकास व्हायचा असेल, तर इथल्या सोयीसुविधांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे त्यांचे आग्रही मत आहे.

गाव-माळ आणि पिकेही बदलली

फाळणीसारख्या अत्यंत विदारक राजकीय घटनाक्रमामुळे तत्कालीन वळिवडे माळ आणि परिसरात अनेक प्रकारची भौगोलिक स्थित्यंतरे घडली. फाळणीपूर्वी किंवा पोलंडचे निर्वासित येथे राहायला येण्याआधी तो वळिवडे गावाचाच विस्तारित भाग किंवा माळ होता. कालांतराने निर्वासित सिंधी समुदायाचा व्यापारउदीम वाढायला लागला. आणि मग तो माळही निर्वासितांचे छावणी क्षेत्र न राहता हळूहळू एका गावामध्ये बदलायला लागला. सद्य:स्थितीमध्ये गांधीनगर आणि वळिवडे ही दोन स्वतंत्र गावे आहेत. आधी उल्लेख केल्याप्रमाणे मुडशिंगी, उचगाव यांसारख्या आसपासच्या गावांतही गांधीनगरच्या सीमेचा विस्तार झाला आहे.

गांधीनगर आणि त्याच्या आसपासची गावे, ही कोल्हापूरला अगदी जोडून असल्यामुळे शहराला जोडून असलेल्या गावांमध्ये जे बदल होतात, ते स्वाभाविकपणे इथेही घडले. पण गांधीनगर सारखी शेकडो कोटींची उलाढाल असलेली व्यापारी वसाहत कृषी संस्कृतीशी निगडित गावांना लागून विकसित झाल्यामुळे इथल्या परिसरातील भौगोलिकतेवर मोठा परिणाम घडला. जुन्या गावगाड्यात कोल्हापूर परिसरातील गावांमध्ये गावाच्या आजूबाजूची शेतजमीन आणि गावांमध्ये कुडाची छपरे, दुपाकी कौलारू घरे, धाब्याची घरे, माड्या, वाडे, जनावरांचे गोठे, गायरान-गावठाण, गल्ल्या, विहिरी, देवळे, पार, पांदीची पायवाट, नदीचा घाट इ. गोष्टींचा समावेश असायचा. कालांतराने सगळ्याच गावांमध्ये सिमेंट-काँक्रीटची घरे, बायोगॅस यांसारखे बदल झाले असले, तरी अजूनही गाववाड्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तशाच आहेत.

गांधीनगरसारखे गाव तयार होताना मात्र, जुन्या गावगाड्यातल्या गोष्टींचा फारसा संबंध राहिला नाही. व्यापार-व्यवसाय हाच आर्थिक मिळकतीचा मुख्य स्रोत असल्यामुळे गांधीनगरसहित आजूबाजूच्या गावातल्या जमिनींवर टोलेजंग इमारती बांधल्या गेल्या आणि मोठेमोठे रस्तेही तयार झाले. गांधीनगरच्या काही भागांमध्ये प्रशस्त बंगले आहेत, तर काही भागांमध्ये इमारतींच्या रांगा आणि त्यामधला अरुंद बोळ अशी रचना आहे.

इथल्या चिंचोळ्या गल्ल्या असो किंवा मग सत्संगासाठीचे मोठे हॉल किंवा छोटेखानी गुरुद्वारा. इथले खानपानाचे ठेले-गाड्या, मोठे हॉटेल्स, पिझ्झा-बर्गर-चायनीजचे गाळे-स्टॉल्स, जुन्या गावगाड्यापेक्षा इथला भौगोलिक परिसर निराळ्या पद्धतीने विकसित झाला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावातल्या रचनेवरही त्याचा परिणाम झाला आणि वर्तमानातही ही बदलाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. भौगोलिकतेच्या दृष्टीने हा बदल अनेकांगी आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

परिसरातील पाण्याच्या प्रवाहांपासून झाडे आणि पक्ष्यांच्या प्रजातींपर्यंत अनेक बाबींवर याचा परिणाम झाला आहे. इतकेच नव्हे, तर सिंधी समुदायाच्या खाद्यसंस्कृतीमध्ये ज्या भाज्यांना महत्त्व आहे, त्याची उगवण काही प्रमाणात आपल्या परिसरात व्हायला लागली. तळ्यांच्या काठी फुलणाऱ्या कमळाचे देठ म्हणजे कमल काकडी असो किंवा सुरणासारखी दिसणारी विशिष्ट फळभाजी असो, सुरुवातीला पाकिस्तानातून, पुढे भारतातल्याच इतर राज्यांमधून मागवल्या जाणाऱ्या या फळभाज्या आता तिकडून येण्याबरोबरच आपल्या परिसरातही काही प्रमाणात उत्पादित व्हायला लागल्या आहेत.

या भौगोलिक बदलांबरोबरच आजूबाजूच्या गावातल्या अर्थविषयक व्यवस्थेतही गांधीनगरमुळे परिणाम घडला आहे. वळिवडे रेल्वेमार्गाच्या पलीकडे जी कामगारांची वस्ती निर्माण झाली आहे, तिथे निम्न आर्थिक वर्गातले लोक राहतात. इथे जवळजवळ निम्मे लोक हे सिंधी आहेत. रेल्वे रूळाच्या अलीकडे आणि पलीकडे असे दोन ठळक आर्थिक वर्ग येथे दिसतात. मुडशिंगी हद्दीत गांधीनगरमधील बरीच दुकाने असल्यामुळे की काय, या ग्रामपंचायतीने प्रॉपर्टी टॅक्स भरण्यासाठी स्वतंत्र वेबसाईटची निर्मिती केली आहे. यावरून या गावाचा विकास आणि गांधीनगर यांचा किती जवळचा संबंध आहे हे लक्षात येईल.

अर्थातच या गावांकडून गांधीनगरला मिळणाऱ्या सोयीसुविधांशी संबंधित एक सुप्त संघर्षाचा मुद्दाही इथे आहेच. व्यापारी वसाहत म्हणजे त्याच्याशी संबंधित इतर सेवा आणि कामगार वर्ग हा विषयही अनुषंगाने येतोच. आजूबाजूच्या गावांसोबतच कोल्हापूर, इचलकरंजी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, सांगली या परिसरातून हजारोंच्या संख्येत कामगारवर्ग दररोज गांधीनगरला कामासाठी येत असतो. जवळच्या परिसरामध्ये नोकऱ्यांची उपलब्धता यामुळे या गावांमधील शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या शेतमजुरांचा तुटवडा हा इथल्या शेतीशी संबंधित समस्येचा भाग आहे. गांधीनगरमधील कपड्यांच्या दुकानांमधील किंवा गोडाऊनमधील काम बऱ्याच महिलांना सोयीचे वाटत असल्यामुळे आजूबाजूच्या गावांतील अनेक महिला दररोज गांधीनगरला येतात. त्यामुळे या स्त्रियांच्या आर्थिक दृष्टीने स्वतंत्र होण्याशी, कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्याशी आणि कुटुंबातील या महिलांच्या स्थानांमध्ये बदल होण्याशी गांधीनगरसारख्या व्यापारी वसाहतीचा काही एक वाटा निश्चित आहे.

स्त्रियांच्याच बाबतीत विचार करायचा झाला तर गांधीनगरमधील सिंधी समाजातील स्त्रियांचे आयुष्यही या विस्थापनानंतर बदलले. पूर्वी घरकाम, फार तर भरतकाम, विणकाम, जरदोसी वर्क, घरी पापड बनवणे, यांसारखे काम करणाऱ्या स्त्रिया काही प्रमाणात का होईना, बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला धडपडत आहेत. सामाजिक जीवनात आपला सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. नव्या पिढीतील मुलींनी, महिलांनी हे बदल मोठ्या प्रमाणावर स्वीकारले असले, तरी मागच्या पिढीतील काही जणींच्या बाबतीत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. स्थानिक संस्कृतीचा परिचय आणि लोकशाही व्यवस्थेमुळे मिळालेले प्रतिनिधित्व या बाबी त्यांच्या या प्रवासात साहाय्यकारी ठरल्या असाव्यात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गांधीनगरमधील सामाजिक कार्यकर्ती रितू लालवानी, ५ वर्षे गांधीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि १० वर्षे सदस्य राहिलेल्या पूनम परमानंदानी किंवा सध्याच्या सरपंच असलेल्या सोनी चुग उर्फ रितू सेवलानी यांची उदाहरणे याबाबतीत अत्यंत बोलकी आहेत. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत काम करणाऱ्या निवडक महिला प्रॉपर्टी एजंट म्हणूनही काम करत आहेत. इथल्या काही जणीचे एरोबिक्स-योगाचे क्लासेस जोरदार चालतात. ‘रेखा महिला उद्योगा’च्या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांच्या आणि तीन महिला कामगारांच्या मदतीने सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी परिसरात निरनिराळ्या चवीची सरबते आणि तयार पीठ यांचा व्यवसाय करणाऱ्या रेखाजी यांनी अनेक सिंधी महिलांना नवीन वाट दाखवली आहे. पारंपरिक सिंधी चवीसहित यांच्या सरबतांमधील नवीन प्रयोगांनाही बाजारातून विशेष मागणी असते.

अलीकडेच गांधीनगरच्या कविता चावला या अमिताभ बच्चन यांच्या ‘केबीसी’ कार्यक्रमात करोडपती बनल्या. ‘गांधीनगरमध्ये फक्त व्यवसायाला महत्त्व आहे. शिक्षण आणि तत्सम गोष्टी इथे कमी महत्त्वाच्या समजल्या जातात. कोल्हापूर परिसरात गांधीनगरबाबत असलेला हा ‘लोकसमज’ माझ्या या जनरल नॉलेजवर आधारित स्पर्धेत जिंकल्यामुळे बदलेल’, यावर कविताजींचा विश्वास आहे. सद्य:परिस्थितीत इयल्या सिंधी समाजातील युवावर्गाचा त्यांच्या कुटुंबीयांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार-व्यवसायाकडे असलेला ओढा लक्षात घेता कविताजींचा हा विश्वास सार्थ ठरला. काही काळ जावा लागेल हे निश्चित.

इथल्या बऱ्याचशा तरुणांना व्यापार-व्यवसायात स्थिरस्थावर होण्यासाठी कुटुंबीयांकडून एक विशेष दबाव असतो, असेही दिसले. नव्या पिढीतील काही तरुण-तरुणी मात्र वेगळ्या वाटा निवडताना दिसत आहेत. विशेषतः छोट्या व्यापाऱ्यांच्या कुटुंबांमध्ये हे घडताना दिसते. सीए म्हणून यशस्वी करिअर करणारा जितेंद्र बिष्णोई किंवा त्याचा इंजिनियर भाऊ अमित यांनी पारंपरिक व्यवसायातून बाहेर पडून स्वतःचे करिअर घडवले. ही उदाहरणे संख्येने अल्पच आहेत. यासोबतच इथल्या इतर समाजातील काही तरुणांमध्ये सिंधी मित्रांमुळे किंवा इथल्या वातावरणामुळे नोकरीऐवजी व्यवसायाची गोडी लागताना पाहावयास मिळते.

गांधीनगरमधील शाळा आणि शिक्षणाचे माध्यम

गांधीनगरमधील सिंधी भाषेचे निवृत्त शिक्षक मुरलीधर चंदवानी यांच्याशी बोलल्यानंतर समजले की, स्वामी सर्वानंद स्कूल, गांधीनगर हायस्कूल, हेमूकलानी प्रायमरी स्कूल या इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळा असल्या, तरी येथे सिंधी समाजाव्यतिरिक्त इतर मुलेही शिक्षण घेण्यासाठी येतात. या शाळांमध्ये सिंधी भाषा विषय शिकवला जातो. अर्थात काही ठिकाणी त्याला दुसऱ्या विषयाचा पर्यायही दिला जातो. सिंधी समाजाव्यतिरिक्त इतर जाती-धर्मातील काही मुलेही सिंधी भाषा घेऊन दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे चंदवानी सर सांगतात.

मी ज्या दिवशी सिंधी एज्युकेशन सोसायटीच्या गांधीनगर हायस्कूलला भेट द्यायला गेलो, त्या दिवशी तिथे उत्साहाचे वातावरण होते. रांगोळी घातली होती. लगबग सुरू होती. थोडी चौकशी केल्यावर समजले की, त्या दिवशी तिथल्या मुख्याध्यापिका सुजाता जाधव यांचा वाढदिवस होता.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

गांधीनगरमध्ये कुमार विद्यामंदिर ही प्राथमिक शाळा आणि श्री शाहू हायस्कूल ही माध्यमिक शाळा आहे. मराठी माध्यमाच्या या शाळांमध्ये इतर मुलांसोबत काही निम्न आर्थिक गटातील सिंधी कुटुंबातील मुलेही शिकायला येतात. पण हे प्रमाण अत्यल्प आहे.

गांधीनगरची आर्थिक प्रगती व्हायला लागली, तशी गांधीनगरची बरीच मुले कोल्हापूर परिसरातील आणि महागड्या इंग्रजी माध्यमांच्या शालांमध्ये शिकायला जायला लागली आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय, इथल्या ‘सिंधी कन्या शाळा’ आणि सिंधी माध्यमातून शिक्षण देणारी साधू वासवानी हायस्कूल, या शाळा बंद पडल्या.

गांधीनगरमध्ये सिंधू एज्युकेशन सोसायटीचेच साधू वासवानी ज्युनिअर कॉलेज आहे. इथे कॉमर्सचे शिक्षण दिले जाते. या ठिकाणी शिकताना सिंधी भाषेची काठिण्य पातळी थोडीशी वरच्या दर्जाची असल्यामुळे शक्यतो सिंधी कुटुंबातील विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे शिकायला येतात. गांधीनगरमध्ये जी संधी भाषा शिकवली जाते, ती देवनागरी आणि अरेबिक या दोन्ही लिपीमध्ये शिकवली जायची. सध्या मात्र बहुतकरून देवनागरी लिपीचाच वापर होतो. गांधीनगरच्या सध्याच्या सरपंच रितू सेवलानी यांना सिंधी भाषेत शिक्षण घेतल्याचा अभिमान आहे. त्यांच्या दोन्ही मुलींनीही शाळेमध्ये हिंदी/संस्कृतचा पर्याय असतानाही सिंधी भाषा निवडली आहे. घरी सिंधी भाषा बोलली जात असली, तरी नव्या पिढीचा ओढा हा हिंदी आणि इंग्रजीकडे जास्त आहे, असे अनेक ज्येष्ठ मंडळींनी सांगितले.

गांधीनगरची खाद्यसंस्कृती आणि सलोखा

गांधीनगरमधल्या गुलशन पंजवानी यांच्या घरी एका विशेष प्रकारच्या सरबताने माझे स्वागत झाले. हे थंडाई सरबत सिंध प्रांताची खासीयत आहे, असे गुलशन अगदी उत्साहाने सांगत होते. हे सरबत कधी प्यायचं आणि कधी प्यायचं नाही, याबद्दलच्या विशेष सूचनाही मला दिल्या गेल्या. रोजच्या जेवणात, सण-समारंभांमध्ये बनवल्या जाणाऱ्या विशेष पदार्थांबद्दल ऐकताना पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सिंधी खाद्यसंस्कृतीबद्दल जाणून घेता आले. मेघा आहुजा यांनी गांधीनगरच्या सिंधी घरांमध्ये अत्यंत आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या, तसेच विशेष पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या ‘कचालू’, ‘बेह’, ‘मेया’, ‘साँका साग’ या पाककृतींबद्दल आवर्जून सांगितलं. कचालू आणि बेय/ बेहबद्दल उत्सुकता वाटली, म्हणून इथल्या मंडईमध्ये फेरफटका मारला, तर ही बटाट्यासारखी फळभाजी दिसली. बेह/ बेयला ‘कमल काकडी’ही म्हणतात. या कमल काकडीचे उत्पादन काही प्रमाणात शिरोली परिसरातही केले जाते, असे इथल्या भाजीव्यापाऱ्यांनी सांगितले. धार्मिक उत्सव किंवा विधीच्या वेळी या बेय/बेहच्या विविध पाककृती केल्या जातात.

गांधीनगरच्या सिंधी खाद्य संस्कृतीमधल्या दोन उल्लेखनीय गोष्टी म्हणजे दाल-पकवान आणि आचारमल स्वीट मार्ट. सध्या गांधीनगरमध्ये तीन ते चार ठिकाणी पारंपरिक सिंधी पद्धतीने बनवले गेलेले दाल-पकवान मिळते. मी ज्या दाल-पकवानाचा आस्वाद घेतला ते ‘सधोरामल नाष्टा सेंटर’ वनवाणी कुटुंबीय चालवत होते. त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं की, दाल-पकवान हा सिंधी मंडळींसोबतच इथे येणाऱ्या इतर समाजातल्या बऱ्याच जणांचा आवडीचा खाद्यपदार्थ आहे. खरेदीच्या निमित्ताने गांधीनगरला आलेले अनेक जण दाल-पकवानाचा मनमुराद आस्वाद घेतात.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

सधोरामल नाष्टा सेंटरची आणखी एक खासीयत म्हणजे इथे मला गुरुनानक यांच्यासोबतच सौंदत्तीची यल्लम्मादेवी आणि संत बाळूमामा यांचे फोटो दिसले. आचारमल स्वीटसच्या एका दुकानात सिंधी पद्धतीने बनवलेल्या काही मिठाया चाखायला मिळाल्या. सतपुडा, मिल्क केक, बुगल मावा, गच्च, मावा समोसा, सेव मिठाई इ. प्रकारच्या मिठाया खाल्ल्यानंतर आपल्या नेहमीच्या गोड पदार्थांपेक्षा याची वेगळी चव जाणवली.

आचरमल स्वीटसचे मालक धीरज तुलसानी आणि त्यांचे कुटुंबीय या सिंधी मिठायांच्या पाककृतीबद्दल विशेष दक्ष असतात. त्यांच्या घरी काम करणाऱ्या परराज्यातील कामगारांकडून सूचना देऊन त्या ते बनवून घेतात. सिंधी समूहासोबतच इतर समाजातील लोकांकडूनही त्यांच्या मिठायांना मागणी असते. खाण्यापिण्याची गोष्ट निघाली आहे, तर कर्नाटकात माहेर आणि आंध्र प्रदेशात मूळ गाव असलेल्या आणि गांधीनगर येथे लग्न करून आलेल्या ज्योती प्रकाश अचितल यांचा खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे. या बाईंच्या पुरणपोळ्या आणि मोदक सिंधी कुटुंबीयांमध्ये विशेष प्रिय आहेत. दोन भिन्न समाजांमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित होण्यासाठी खाद्यसंस्कृती किती उपयुक्त ठरू शकते, हे वरील उदाहरणांवरून लक्षात येते. आपल्या परंपरांचा अभिमान बाळगताना इतरांप्रती खुलेपणा ठेवल्यामुळे जीवनात किती नवनव्या आनंदाचा स्वीकार केला जाऊ शकतो, हेच गांधीनगरमधील खाण्यापिण्याच्या या गोष्टींवरून लक्षात येते.

गांधीनगरमधील धर्मस्थळे आणि सण-उत्सव

गांधीनगरमधील मंदिरे विविध ठिकाणी असलेले लहान-मोठे गुरुद्वारा, सत्संगचे हॉल, लहान-मोठी मंदिरे, विविध संतांची भक्तिस्थाने, यांकडे पाहिल्यानंतर इथल्या धार्मिक वातावरणाची कल्पना येते. इथले ग्रामसेवक धीरज सूर्यवंशी यांना त्यांनी काम केलेल्या इतर गावांच्या तुलनेमध्ये गांधीनगरचे हे धार्मिक वातावरण अत्यंत प्रभावित करून घेते, असे मत नोंदवतात. गांधीनगरमध्ये इतर गुरुद्वारांच्या तुलनेत मोठा समजला जाणाऱ्या रेल्वे स्टेशन परिसरातील ‘भक्तिधाम’ या गुरुद्वाराला भेट द्यायला गेलो. गुरुद्वाराची व्यवस्था पाहणाऱ्या आणि सिंधी समाजामध्ये विशेष धार्मिक स्थान असणाऱ्या कुटुंबातील पुरुषांना ‘बावा’ किंवा ‘भाईसाब’ आणि स्त्रियांना ‘बायांनी’ किंवा ‘माताजी’ असे म्हणतात. भक्तिधाम गुरुद्वाराच्या प्रवेशद्वारावरच असणाऱ्या हनुमानाच्या मूर्तीने माझे लक्ष वेधून घेतले. आत गेल्यानंतर मुख्य ठिकाणी गुरु ग्रंथसाहेबचे पठण सुरू होते. आजूबाजूला राधाकृष्णाची मूर्ती, भगवान झुलेलाल गुरुनानक यांची मूर्ती होती. भिंतीवर लावलेल्या फोटोंमध्ये विठ्ठल-रुक्मिणीपासून स्वामी समर्थांपर्यंतचे फोटो दिसले.

भक्तिधामचे भाईसाब मुरलीधर जग्यासी यांच्या वडिलांचे त्या दिवशी श्राद्ध असल्यामुळे, ते थोडे घाईत होते. तरीही वेळ काढून त्यांनी आम्हाला माहिती दिली. हिंदू देवी-देवता, भगवान झुलेलाल, गुरु ग्रंथसाहेब-गुरुनानक, साधू वासवानी, स्वामी समर्थ या सगळ्याचे मूळ अंतिमतः सनातन हिंदू धर्माशीच जोडले गेले आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

हिंदू-मुस्लीम सलोख्याविषयीचे त्यांचे विचारही स्पृहणीय होते. गांधीनगरमध्ये सिंधी समाजाची इष्टदेवता भगवान झुलेलाल यांची जयंती म्हणजेच ‘चेटीचंड महोत्सव’ आणि ‘गुरुनानक जयंती’ हे दोन दिवस अत्यंत उत्साहाने आणि धार्मिक वातावरणात साजरे केले जातात. या दोन्ही दिवशी गांधीनगरची दुकाने जवळजवळ बंद असतात. परिसरातील सर्व धर्मस्थळांच्या भजन आणि नामसंकीर्तनाचा जयघोष असतो. अलीकडच्या काही वर्षांमध्ये गावातील तरुण मंडळाकडून भगवान झुलेलाल जयंतीच्या दिवशी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजनही केलं जातं. सिंधी समाजामध्ये कार्तिक महिन्याचंही विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील दिवाळीच्या तिसऱ्या दिवसापासून गुरुनानक जयंतीपर्यंतच्या पंधरा दिवसांमध्ये धार्मिक कार्यक्रमांसोबतच मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला जातो. सिंधी समाजामधील स्त्रियांमध्ये वटसावित्री प्रथेसारखी पण वेगळ्या प्रकारे साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘करवाचौथ’ म्हणजेच ‘तिजडी’ सणाचं महत्त्व आहे. गांधीनगरमध्ये नवरात्रीच्या काळात देवीच्या मंदिरातील पूजाविधींसोबत दांडियाही खेळाला जातो.

गांधीनगरचा सिंधी जनसमूह आणि सौहार्द

वळिवडे माळावरील बराकींमध्ये स्थिरस्थावर होताना पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या सिंधी जनसमूहापैकी काही जणांकडे थोडेफार दागदागिने होते, पण बऱ्याच जणांकडे तुटपुंज्या साहित्याशिवाय काहीही नव्हतं. फाळणीच्या काळात विपन्नावस्थेत सिंधी समूहाला भारतात विस्थापित व्हावं लागलं. पाकिस्तानातील जमिनीचा, घराचा मोबदला म्हणून भारतात काही ठिकाणी यांना जमिनी जाहीर झाल्या होत्या, तरी बऱ्याच ठिकाणी त्यावर कब्जा मिळवण्यामध्ये स्थानिक लोकांनी अनेक अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे मुख्य विस्थापनानंतर जिथं अनुकूल परिस्थिती असेल, तिथं ही मंडळी स्थलांतरित होत गेली. इतका विपरीत अनुभव आल्यानंतरसुद्धा या सिंधी जनसमूहामध्ये पदोपदी न येण्यामागच्या अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे सिंधी संस्कृतीमध्ये असलेली उदारमनस्कता.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

हिंदू पुराणातील काही विशिष्ट देवी-देवतांना पुजण्याबरोबरच इष्टदेवता भगवान झुलेलाल यांची आराधना करणारे, सिंधी समाजात ज्यांना ‘बावा’ असे संबोधले जाते ते गुरुनानक, गुरुग्रंथसाहेब यांनाही भजणारे लोक, सुफी संप्रदायाशी घनिष्ठ संबंध असलेली मंडळी, राधास्वामी सत्संग बियास, धन निरंकार यांसारख्या संप्रदायातील सत्संगाला नियमितपणे हजेरी लावणारे भक्तजन. सिंधी समाजातील या धार्मिक उपासना पद्धतीचा सर्वसाधारण विचार केल्यानंतर असे लक्षात येते की, या सगळ्यांमधून एक विशेष प्रकारच्या सहिष्णुतेची जोपासना या समाजामध्ये झाली आहे.

अजून एका उदाहरणाने ही उदारमनस्कता आपल्याला ठळकपणे दिसते. गांधीनगरमधील विविध सिंधी लोकांशी संवाद साधल्यानंतर माझ्या लक्षात आले की, काळाच्या ओघात या समाजातून जातीव्यवस्था हद्दपार झाली आहे. वर्तमानात धार्मिक विधी करणारे पुरोहित आणि इतर समाज असाच एक साधारण फरक दिसतो. हा फरकही फारसा जाचक नाही. आता या दोन्ही वर्गामध्येही लग्नविधी होतात. फाळणीमुळे भोगाव्या लागलेल्या यातनांमुळे म्हणा किंवा मग परंपरेने मिळालेल्या धार्मिक मूल्यधारणेमुळे किंवा याच्या एकत्रित परिणामामुळे सिंधी समाज हा इतर जाती-धर्माप्रति उदारभाव बाळगून असतो. अर्थात, आर्थिक समृद्धी आणि त्यामुळे तयार होणारे गंड, दंभ, स्पर्धेपोटी वाटणारी असुरक्षितता आणि त्याचा मनुष्याच्या वर्तणुकीवर होणारा परिणाम, हा सर्वच समाजांसाठी निराळ्या अभ्यासाचा विषय आहे. हाच मुद्दा पुढे नेताना आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते.

एखादा विशिष्ट समाज ज्या वेळी वेगाने आर्थिक प्रगती करतो, त्या वेळी इतरांना असूया वाटणे, स्पर्धात्मक भाव जागा होणे, हे काही प्रमाणात स्वाभाविक आहे. या सगळ्यामुळे एक सुप्त संघर्ष तयार होतो. काही वेळेस हा संघर्ष उग्र रूप धारण करू शकतो, पण गांधीनगरच्या बाबतीत मात्र आजपर्यंत असा मोठा संघर्ष पाहायला मिळालेला नाही. याबद्दलचा विचार करताना इथल्या व्यापाऱ्यांनी स्वीकारलेला शांततेचा मार्ग आणि त्यांचे सामाजिक भान मला महत्त्वाचे वाटते. अर्थातच इथल्या सिंधी समूहाने स्वीकारलेल्या शांततेच्या मार्गाचेही सविस्तर चिंतन अपेक्षित आहे.  

इथल्या व्यापारी वर्गाच्या सामाजिक कार्याच्या अनुरोधाने विचार करताना गांधीनगरमधील ‘सिंधी सेंट्रल पंचायत’ या महत्त्वाच्या सामाजिक संस्थेच्या निवडक कार्याचा आढावा अपरिहार्य आहे. सिंधी समाजातील भांडण-तंटे, छोट्या-मोठ्या तक्रारी सोडवण्यापासून समाजातील गरजूंना विविध प्रकारची मदत करण्यापर्यंत ही संस्था काम करते. महापूर आणि कोरोनाच्या काळात या संस्थेने गांधीनगरमधील नागरिकांसाठी कोणताही भेदभाव न ठेवता मदतकार्य केले.

या संस्थेचा एक उपक्रम म्हणजे गांधीनगरची ‘स्मशानभूमी’. या स्मशानभूमाची उभारणी आणि देखभालीचा खर्च सिंधी सेंट्रल पंचायत करते आणि इथे परिसरातील सर्व जातिसमूहाचे लोक दहनाचे अत्यविधी करू शकतात. याच गावातील निरंकारी भवन आणि डिस्पेसरीमध्ये सर्व समाजातील रुग्णांवर अल्प दरांमध्ये उपचार केले जातात. गांधीनगरच्या सिंधी समाजामध्ये अशा पद्धतीने रुजलेली सहिष्णुता लक्षवेधी आहे. ही सहिष्णुता सामाजिक सलोखा वाढण्यासाठी निश्चितपणे कारणीभूत ठरली असणार, कारण बाहेर कुठेही जातीय-धार्मिक दंगल झाली तरी इथलं वातावरण शांत असते असे अनेकांनी सांगितले. आता ही सहिष्णुता सिंधी समूहाच्या व्यवसायवाढीला कितपत कारणीभूत ठरली, हा एक औत्सुक्याचा विषय आहे. कारण कोल्हापूर संस्थानच्या राजाराम महाराजांनी ‘जयसिंगपूर’ ही व्यापारी पेठ वसवली. ही घटना फाळणीपूर्वीची आहे. व्यवसायवाढीला चालना हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून एका संस्थानिकाने वसवलेल्या जयसिंगपूरच्या तुलनेत गांधीनगरची व्यापारी पेठ म्हणून झालेली आर्थिक प्रगती ही अनेक सामाजिक आणि आर्थिक प्रश्न उभे करते.

गांधीनगरची घडण : सीमा कोळी आणि कुटुंबीय

सीमा कोळी या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या सैनिक टाकळी या गावच्या. त्यांच्या पतीचे मूळ गाव कुंभोज असून तेथे त्यांची शेती आणि राहते घर आहे. सीमा कोळी यांच्या सासूबाई या गांधीनगरमधल्या एका सिंधीबहुल विद्यार्थी असलेल्या शाळेमध्ये शिक्षिका असल्यामुळे त्या इथेच स्थायिक झाल्या. सीमा कोळी यांच्या सासूबाई आणि पती हे उत्तम सिंधी बोलतात आणि काही प्रमाणात वाचू शकतात. सीमा कोळी गांधीनगरमध्ये एकूण १० बचत गटांचे काम पाहतात. पंचायत समितीच्या उमेद योजनेअंतर्गत या बचत गटांचे काम चालते. प्रत्येक गटात १० महिला याप्रमाणे १०० महिला त्यांच्या माध्यमातून या बटत गटांशी जोडल्या गेलेल्या आहेत. या १०० पैकी साधारण ३० ते ३५ महिला सिंधी असून बाकीच्या इतर समाजातील आहेत. आर्थिक स्वावलंबन हा या बचत गटाचा मुख्य उद्देश आहेच, पण त्यासोबत बचत गटातील आपल्या मैत्रिणीला अडीअडचणीत मदत करणे, घराबाहेर पडून समाजात इतरांना भेटणे, संवाद करणे, थोडक्यात काय तर स्वतःचे सामाजिक अभिसरण घडवून आणणे, हा इथे येणाऱ्या अनेक सिंधी महिलाचा उद्देश आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

एकमेकांत मिसळताना, सण-उत्सव साजरे करताना, काही सामाजिक उपक्रम राबवताना जाती-धर्म हे मुद्दे इथे गौण ठरतात. लवकरच बचत गटाशी संबंधित या सर्व महिलांना घेऊन सीमा कोळी ‘सर्वधर्मीय महिला मंडळा’ची स्थापना करणार आहेत आणि या मंडळाचा पहिला उपक्रम म्हणून महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्याचा त्या विचार करत आहेत. सीमा कोळी यांच्या पतीचेही सर्वधर्मीय मंडळ असून काही सण-उत्सव ते या माध्यमातून साजरे करतात.

माझ्या दृष्टीने सीमा कोळी आणि त्यांचे कुटुंबीय ज्या उदात्त विचाराने सार्वजनिक जीवनात वावरत आहेत, त्यामागे दोन संस्कृतीच्या आदान-प्रदानातून उभ्या राहिलेल्या गांधीनगरसारख्या गावाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. जो मूल्यविचार घेऊन ते आपले आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे जीवन बदलण्याचा प्रयल करत आहेत, त्याचे अधिष्ठान या गांधीनगरच्या मातीतच आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, एक अटळ राजकीय वास्तव म्हणून भारताच्या फाळणीचा विचार करताना, या काळात धार्मिक मिषाने घडलेल्या अतोनात हिंसाचाराचा, दोन्ही बाजूंकडून दुबळ्या जीवांवर केलेल्या अन्याय-अत्याचाराचा, उदध्वस्त कुटुंबांचा, परागंदा स्त्रियांचा विचार जसा प्राधान्याने करायला हवा, तसाच या फाळणीत होरपळलेल्या एका जनसमूहाने दुबळेपणाला दूर करत सक्षमपणे उभ्या केलेल्या गांधीनगरसारख्या व्यापारी वसाहतीच्या यशोगाथेचेही चिंतन करायला हवे.

एका मोठ्या जनसमूहाच्या विस्थापनामुळे नव्या प्रदेशात मोठे भौगोलिक बदल घडले आणि त्या अनुषंगाने सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन आकारास आले. गांधीनगरसारखे गाव आकारास येताना सिंधी मंडळींना स्थानिक समाजाचे सहकार्य अपेक्षित होते, तर हे प्रेम, आपुलकी आणि सहकार्य प्राप्त करण्यासाठी परंपरेने मिळालेल्या आणि कदाचित, फाळणीच्या अनुभवामुळे बळकटी लाभलेल्या सहिष्णुता आणि उदारपणाच्या मूल्यविचाराने या समाजाने आपली वाटचाल सुरू ठेवली. आजूबाजूच्या गावांची कृषीसंस्कृती आणि गांधीनगरची व्यापारी संस्कृती यांच्या संमिलनातून इथे जे अनोखे सामाजिक अभिसरण घडले, त्यातून परस्परांप्रति आदरभाव आणि प्रेमच वाढीस लागले.

सध्याच्या काळात धार्मिक आणि जातीय तणाव वाढीस लागताना आपण पाहतो आहोत. या युद्धखोर आणि धगधगत्या समाजाच्या भविष्याचा विचार जर विवेकाच्या मार्गाने घडायचा असेल, तर ‘गांधीनगर’ हे त्या मार्गावरचे आश्वस्त करणारे एक स्थानक निश्चित असेल.

‘चौफेर समाचार’ दीपावली वार्षिक २०२२मधून साभार

............................

‘चौफेर समाचार’ दीपावली वार्षिक २०२२ : अतिथी संपादक - अरुण नाईक

चौफेर पब्लिशिंग हाऊस, सांगली

पाने - २४४

मूल्य - ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा