हे समजावणे की ‘पुरुषी’ समजावणे? ‘मॅन्सप्लेनिंग’चा धांडोळा
पडघम - सांस्कृतिक
गायत्री लेले
  • ‘पुरुषस्पंदनं’ दिवाळी २०२२चे मुखपृष्ठ आणि त्यातल्या गायत्री लेले यांच्या लेखातील चित्र
  • Mon , 31 October 2022
  • पडघम सांस्कृतिक पुरुषस्पंदनं PurushSpandanana हरीश सदानी Harish Sadani मावा MAVA मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अॅब्युज Men Against Violence and Abuse मॅन्सप्लेनिंग Mansplaining

‘मेन अगेन्स्ट व्हायलन्स ॲन्ड अब्युज’ अर्थात ‘मावा’ ही मुंबईस्थित संस्था गेल्या २६-२७ वर्षांपासून महिलांवरील हिंसा आणि लिंगभाव यांविषयी युवक व पुरुषांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहे. स्त्री-पुरुषांकडे पाहण्याची पारंपरिक, साचेबद्ध चौकट मोडून लैंगिक विविधतेचा उदारपणे कसा स्वीकार करावा, यासाठी या संस्थेकडून वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. समाजातलं पुरुषी वर्चस्व कमी करून लैंगिक असमानतेबाबतचा दृष्टीकोन बदलणं ही सोपी गोष्ट नाही, नसते. त्यासाठी खूप चिकाटीनं प्रयत्न करावे लागतात. संयमानं हे प्रश्न हाताळावे लागतात आणि तितक्याच संयमानं ते तरुण आणि पुरुषांपर्यंत पोहचवावेही लागतात. हे आव्हान पेलत ही संस्था काम करते आहे. त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेतर्फे दरवर्षी ‘पुरुषस्पंदनं’ हा दिवाळी अंकही काढला जातो. गेली २६ वर्षं लैंगिक असमानतेबाबतचे वेगवेगळे पैलू केंद्रस्थानी ठेवून हा अंक प्रकाशित होतो आहे. 

यंदाचा ‘पुरुषस्पंदनं’चा २७वा दिवाळी अंक आहे. या अंकाची मध्यवर्ती संकल्पना आहे - ‘माणूस ते माणूसपण यातला अदभुत प्रवास’. त्याअनुषंगाने या अंकात लेख, कविता, मुलाखती आहेत.

‘बलात्कार-संस्कृती थांबवण्यासाठी’ हा परिसंवाद हे या अंकाचं मुख्य आकर्षण आहे. त्यातला हा एक लेख संपादकांच्या पूर्वपरवानगीसह...

.................................................................................................................................................................

प्रसंग एक

मी आणि माझी सहकारी तिच्या केबिनमध्ये डबा खात होतो. आमचा ऑफिसमधला एक मित्रही आमच्यासोबत बसला होता. तेवढ्यात आमचे जुने वरिष्ठ सहकारी आम्हाला भेटायला आमच्या ऑफिसमध्ये आले. आमचा हा मित्र लगेच माझ्या मैत्रिणीला म्हणाला- “अगं, सरांना बसायला दे तुझी खुर्ची!” त्याक्षणी काय बोलावे, हे माझ्या मैत्रिणीला दोन मिनिटे कळलेच नाही. हे नमूद करायला हवं की, ही मैत्रीण आमच्या या पुरुष सहकाऱ्याच्या वरच्या पदावर काम करत होती. ती केबिनही तिचीच होती.

प्रसंग दोन

माझी एका सेमिनारमध्ये एका रुबाबदार संशोधकाशी ओळख झाली. तिने तिचा पेपरही उत्कृष्टपणे सादर केला होता. जेवणाच्या ब्रेकमध्ये आम्ही गप्पा मारत होतो. तिने बाकी जेवणासोबत भरपूर टोमॅटोच्या चकत्या घेतलेल्या मला दिसल्या. मी त्याबाबत तिला सहज विचारले असता, ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याने कुठेतरी वाचलंय की, रोजच्या जेवणात भरपूर टोमॅटो खाल्ल्याने मूल व्हायची शक्यता वाढते. आणि तसेही त्याने काही अपाय तर नाही. त्यामुळे मीही खाते.” हे नमूद करायला हवं की, तिचा नवरा डॉक्टर नाही किंवा वैद्यकीय क्षेत्राशी त्याचा दुरान्वये संबंध नाही.

प्रसंग तीन

मुख्याध्यापिका असलेल्या माझ्या एका मामींच्या घरी मी गेले होते. त्या घरच्या गाऊनमध्ये बसल्या होत्या, आम्ही गप्पा मारत होतो. तिथे मामींचे भाऊही बसले होते. नंतर त्यांचे काही मित्र आले. या भावाने मामींना लगेच गाऊन बदलून यायला सांगितलं. त्याही लगबगीने आत गेल्या, कपडे बदलून बाहेर आल्या. नमूद करायची गोष्ट अशी की, यात काही वावगे आहे, असे ना त्या भावाला वाटले, ना मामींना वाटले. आमच्या गप्पाही तशाच पुढे चालू राहिल्या.

प्रसंग चार

एक ओळखीच्या काकू अचानक बॉबकट करून आल्याचे पाहून मला फार बरे वाटले. मी सहज त्यांना म्हटले, “तुमचे केस पाहून इतकं बरं वाटतंय! उन्हाळ्यात हे असेच केस ठेवायला विचार करतेय.” त्या पटकन म्हणाल्या, “अगं ही आमच्या ह्यांची हौस. इतकी वर्षं मला म्हणायचे की, तुला लांबसडक वेणीच छान दिसते. तुझे केस नाहीतरी छान सरळ आहेत, त्यांना फार मेंटेनससुद्धा लागत नाही. पण आता वयामुळे बरीच गळती झाली. मग हेच म्हणाले की, छान छोटा कट करून टाक, ती पिळपिळीत वेणी नकोच. मग काय, गाठलं ब्युटीपार्लर.” हे नमूद करायला हवं की, काकूंना स्वतःला नक्की काय आवडतं किंवा आवडेल, याबद्दल गप्पा झाल्या नाहीत. मीही विचारले नाही.

प्रसंग पाच

माझ्या एका नात्यातल्या मुलीला लग्नानंतर पाच वर्षांत दोन मुले झाली. कारण म्हणजे, तिच्या नवऱ्याला त्याच्या वयाची पस्तीस वर्षे गाठण्याच्या आत फॅमिली ‘पूर्ण’ करायची होती. एकदा गप्पा मारताना ती सहज उद्गारली, “मला चाललं असतं जर लग्नानंतर थोडी मजा केली असती, थोडा वेळ घेतला असता.” हे नमूद करायला हवं की, ती असेही म्हणाली की, “ठीक आहे, पण फॅमिली ‘पूर्ण’ तर झाली.”

प्रसंग सहा

एका प्रथितयश नर्तिकेची मुलाखत यु-ट्युबवर ऐकत होते. त्यात ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याने मला सांगितले होते की, तू जर नाटकात काम करणार असलीस तर आपण लग्न नको करूया. त्यामुळे मग मी अभिनय सोडून पूर्णतः नृत्याकडे वळले आणि आमचं लग्न झालं.” हे नमूद करायला हवं की, नंतर ती हेसुद्धा म्हणाली की, “मी माझ्या नवऱ्याला थँक्स म्हणेन, कारण मी माझं नंतरचं जीवन नृत्यासाठी वाहून घेतलं.”

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

‘मॅन्सप्लेनिंग’ या संकल्पनेचा विचार करताना आणि त्याबाबत वाचत असताना माझ्या अनुभवविश्वातील हे काही ठळक प्रसंग मला एकामागोमाग एक आठवले. अर्थात ते त्या त्या वेळेस मला खटकले तर होते, पण नेमके काय खटकत होते, याचा नीट उलगडा होत नव्हता. थोडा आणखी विचार केल्यावर उमगले की, हे सगळे प्रसंग वेगवेगळे असूनही त्यांच्यात काही समान धागे आहेत.

एकतर या सगळ्या प्रसंगांत स्त्रिया आहेत, ज्या कोण्या एका पुरुषाचे ऐकत आहेत अथवा त्यांच्याकडून ऐकून घ्यावे लागत आहे. पहिल्या प्रसंगातील स्त्री तिच्या पुरुष सहकाऱ्याने अचानक दिलेल्या सूचनांमुळे अवाक झालेली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रसंगातल्या स्त्रिया त्यांच्या नवऱ्याच्या आणि भावाच्या सूचना फारसा विचार न करता निमूट ऐकून घेत आहेत, जणू त्या त्यांच्या अंगवळणी पडल्या आहेत. चौथ्या प्रसंगातील स्त्री वर्षानुवर्षे आपल्या नवऱ्याचे म्हणणे सहज मान्य करून आपली आवड कानामागे टाकत आहे, आणि कदाचित तिला त्याचा फारसा खेद वाटत नाही. पाचव्या प्रसंगातील स्त्रीचे मत पुरुषापेक्षा कदाचित निराळे आहे. पण नवऱ्याचे म्हणणे शेवटी आपल्या हितासाठीच होते, असे काहीसे तिचे मत दिसते. तिच्यासारखीच अवस्था सहाव्या प्रसंगातील स्त्रीचीही आहे.

या सगळ्या स्त्रिया आपापल्या कार्यक्षेत्रात रूढार्थाने यशस्वी आहेत. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत, काही तर ‘सुपरवूमन’ वगैरे बिरुदाच्या मानकरीदेखील आहेत. पण तरीही वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांना ‘मॅन्सप्लेनिंग’चा सामना करावा लागला आहे.

काय आहे हे ‘मॅन्सप्लेनिंग’?

या शब्दाची फोड केल्यास ‘मॅन’ आणि ‘एक्सप्लेनिंग’ असे दोन शब्द मिळतात. म्हणजे एक गोष्ट नक्की की, हे निव्वळ एक्सप्लेनिंग म्हणजे समजावण्यापेक्षा निराळे असते. याचा साधासरळ अर्थ म्हणजे, एखाद्या पुरुषाने त्याच्या ‘पुरुषी’ दृष्टिकोनातून बायकांना सल्ले वा माहिती देणे. अशा संवादात पुरुषाला संबंधित विषयाची पुरेशी माहिती असेलच असे नाही. कदाचित त्याला एखाद्या गोष्टीबाबत काहीच कल्पना नाही, असेही असू शकते. पण तरीही, एक ‘पुरुष’ या नात्याने बाईला अनाहूत सल्ला दिला जातो. हे बोलणे साधे नसते. त्यात बाई कशी निर्बुद्ध आहे. तिला कसे काही येत नाही, काहीच समजत नाही अशा पद्धतीने अवमानित करणारा, बायकांना खाली दाखवणारा सूर लागलेला असतो. पुरुषप्रधान व्यवस्थेत पुरुषाला असलेले स्थान आणि सन्मान याचा परिणाम म्हणजे अनेक पुरुषांना आपण सर्वज्ञ असल्याचा भास होत राहतो. त्याचाच आविष्कार म्हणजे ‘मॅन्सप्लेनिंग’.

परंतु यात अनेक समस्या आहेत. वर दिलेली व्याख्या कितीही साधीसरळ वाटली, तरीही ती प्रत्यक्षात तेवढी सोपी नाही. ‘मॅन्सप्लेनिंग’ नेहमीच थेट होत नाही. ते अस्पष्ट किंवा अगदी सूक्ष्म पातळीवर असू शकते. कदाचित त्याचे अगदीच सामान्यीकरण झालेले असू शकते. साधे ‘एक्सप्लेन' करण्याचा बाऊ करत बायका, याला ‘मॅनस्प्लेन’ करणे म्हणत आहेत, असाही आरोप केला जाऊ शकतो.

‘चला, म्हणजे आता या बायकांशी आता काही बोलायलाच नको’ अशा उथळ प्रतिक्रियाही येऊ शकतात. याची ‘फेमिनिश्टांचे नवे खूळ’ असे म्हणूनही भलामण केली जाऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे, लैंगिक भेदभावाचे इतर प्रकार जसे थेटपणे नजरेस पडतात, तसे कदाचित ‘मॅन्सप्लेनिंग’ लक्षात येत नाही, प्रत्येक वेळेस चिमटीत पकडता येत नाही. आणि म्हणूनच त्याची बारकाईने मीमांसा करणे आवश्यक ठरते.

‘एक्सप्लेनिंग’ आणि ‘मॅन्सप्लेनिंग’मध्ये फरक कसा करावा, या प्रश्नाचे उत्तरही तितकेसे सोपे नाही. हाच प्रश्न जेव्हा डिझायनर असलेल्या किम गुडवीन हिला विचारला गेला, तेव्हा तिने एका आकृतीच्या आधारे ते समजावण्याचा प्रयत्न केला. ही आकृती मुख्यतः पुरुष सहकाऱ्यांसाठी आहे. ज्यांना कदाचित याद्वारे आपण एक्सप्लेन करतोय की, मॅन्सप्लेन करतोय याचा अंदाज येऊ शकतो. किम गुडवीनने ही आकृती तिच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केली, ज्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.

‘मॅनसप्लेनिंग’चा परिणाम

हा शब्द जरी नवा असला तरी त्यामागची प्रवृत्ती जनीच आहे. रेबेका सोल्नीत या लेखिकेने २००८ साली ‘मेन एक्सप्लेन थिंग्स टू मी’ या नावाचे एक पुस्तक लिहिले. आणि तेव्हापासून ‘मॅन्सप्लेनिंग’वर चर्चा सुरू झाली. तिने स्वत: ही संज्ञा वापरलेली नाही. पण तिने कथन केलेल्या अनुभवांतून आणि त्यातून झालेल्या चर्चांमधून या संकल्पनेचा उदय झाला. या पुस्तकाची प्रेरणा तिला ज्यातून मिळाली, तो तिने अनुभवलेला प्रसंगही मजेशीर आहे. कुठल्याशा समारंभात एक पुरुष तिच्याशी आणि तिच्या मैत्रिणीशी संवाद साधत होता. बोलण्याची गाडी एका विषयावर आली, आणि त्या पुरुषाने रेबेकाला त्याने नुकत्याच वाचलेल्या ‘अत्यंत महत्त्वाच्या’ पुस्तकाची माहिती देण्यास सुरुवात केली. हळूहळू तिला कळले की, तो तिनेच लिहिलेल्या पुस्तकाविषयी बोलत होता. रेबेकासोबत असलेल्या मैत्रिणीने त्याला एक-दोन वेळा हे सांगण्याचाही प्रयत्न केला, पण त्याच्या वागण्यात विशेष फरक पडला नाही. हा अनुभव तसा गमतीदार असला तरी अंतर्मुख करणाराही आहे. आता हे तर अगदीच थेट उदाहरण झाले, पण अशाच धाटणीचे अनुभव स्त्रियांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि वेगवेगळ्या प्रकारे येतात का, हे तपासून पाहणे आवश्यक ठरते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

जसा ‘मॅन्सप्लेनिंग’ हा शब्द रूढ झाला, तसे बाकी अनेक शब्द त्यातून उदयास आले. जसे, ‘हीपथी’- म्हणजे, एखाद्या चुकणाऱ्या पुरुषाला जर बरोबर केले गेले आणि त्यामुळे त्याला अपमानित वा वाईट वाटले, तर त्याला अतिरिक्त ‘सिम्पथी’ देणे\मिळणे, ‘मेनोलॉग्ज’ (डायलॉगच्या धर्तीवर) किंवा ‘मॅनटरप्शन’ (‘इंटरप्शन’च्या धर्तीवर) असे अजून काही शब्द. हे शब्द अनेकदा निव्वळ हवेचे बुडबुडे राहत नाहीत, त्यातून आपण मुळात एक व्यक्ती म्हणून अथवा समाज म्हणून एकमेकांशी संवाद कसा साधतो, याचे चित्रण करता येऊ शकते. जर तो संवाद केवळ पुरुषाकडून एकतर्फी होणार असेल, तर त्यात बदल केले जाऊ शकतात.

अशा पद्धतीच्या संभाषणांचा आणि संज्ञापनाचा दूरगामी परिणाम होऊ शकतो. एकतर पुरुषांच्या अतिआत्मविश्वासामुळे स्त्रिया त्यांच्याकडे असलेला आत्मविश्वास गमावून बसू शकतात. जर एखाद्या बाईला मुळातच कमी आत्मविश्वास असेल, तर तिला पूर्णतः हताश वाटू शकते. एखाद्या विषयातील तज्ज्ञ असलेल्या स्त्रीला सतत मॅन्सप्लेनिंगला सामोरे जायला लागले, तर तिच्या मानसिक स्वास्थ्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. सतत पुरुषांचे आवाज येत राहिले, तर बायकांना नेमके काय म्हणायचे आहे, हे समजत नाही. केवळ पुरुषांच्याच इच्छांचे, आकांक्षांचे आणि ज्ञानाचे प्रकटीकरण होत राहिले, तर स्त्रियांना काय वाटते, हे कधी कळणारच नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, कुठल्याही विषयात पुरुषाला अधिक ज्ञान आहे, असा आभास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही संज्ञापनात प्रथम स्थान हे पुरुषालाच दिले जात आहे, असे होऊ शकते. याचे एकप्रकारे दडपण पुरुषावरही येते, कारण त्याने सर्वज्ञ असायलाच पाहिजे, त्याच्याकडे निर्णयशक्ती असायलाच हवी, असे कुठेतरी गृहीत धरले जाते. म्हणजे एखादा पुरुष मॅन्सप्लेनर जरी नसला तरी मोठ्या प्रमाणावर घडत असलेल्या मॅन्सप्लेनिंगचा तोही एक प्रकारे बळी असतो.

यातून एक व्यक्ती म्हणून आणि एक समाज म्हणूनही आपण स्त्रियांकडे कसे पाहतो, याचे परीक्षण करता येते. प्रत्येक समाजात बाई आणि पुरुष या दोघांसाठीच्या काही धारणा आणि समज रूढ असतात. कितीही पुरोगामी विचारांची माणसे असली, तरी त्यांच्याही मनावर आयुष्यभर बिंबवलेले ‘जेंडर रोल्स’ सहजासहजी पुसले जात नाहीत. इच्छा असल्यास आपण आपल्या अशा विचारांत बदल घडवून आणू शकतो. परंतु जर सौहार्दाने आणि समानतेने संवाद न होता सातत्याने मॅन्सप्लेनिंगच होत राहिले, तर मात्र अशा व्यापक बदलांची वगैरे शक्यता पुसट होत जाते. यातून समाजात आधीच रूढ असलेल्या धारणांना आव्हान देण्याऐवजी उलट बळकटीच दिली जाते.

उदाहरणार्थ, एखादी बाई ड्रायव्हिंग, बाईक्स, गाड्या, करिअर, अर्थव्यवस्था, शेअरमार्केट, राजकारण इत्यादी विषयांवर बोलायला लागली, तर तिला एकतर गप्प बसवले जाते, किंवा तिची टर उडवली जाते. हे कामाच्या ठिकाणी आणि घरातही होते. कारण पारंपरिकरित्या हे सगळे विषय पुरुषांचे मानले जातात. त्यामुळे एखादी स्त्री या विषयातील तज्ज्ञ जरी असेल, तरी ती एक बाई आहे या कारणामुळे तिचा आवाज प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दाबला जाऊ शकतो. जणू काही स्वयंपाक, घर, संसार, कुटुंब, मुलंबाळं, बागकाम, होम सायन्स, फॅशन, कला आणि साहित्य वगैरेच तिचे विषय आहेत... तिला यातल्या कशातच रस नसेल तर भुवया उंच केल्या जातात.

तुम्ही पुरुष असाल आणि अशा टवाळीत सामील असाल, तर वेळीच सावध व्हायची गरज आहे.

मॅन्सप्लेनिंग सातत्याने घडत असते. त्याला स्थळ-काळ-वेळ-वय यापैकी कशाचेही बंधन नाही. एखादा पुरुष कोण आहे, त्याची सामाजिक, आर्थिक आणि बौद्धिक कुवत काय आहे. तो एखाद्या विषयातील तज्ज्ञ आहे की नाही, तो वयाने लहान आहे की मोठा, हे प्रश्न इथे पडत नाहीत. तो एक ‘पुरुष’ आहे एवढे पुरेसे असते. लहान मुले हे सारे घरातून आणि आजूबाजूच्या परिघांमधून हळूहळू आत्मसात करतात. त्यामुळे अशा वागण्याचा एक प्रकारचा पॅटर्न बनतो आणि तो अविरतपणे सुरू राहतो.

‘मॅन्सप्लेनिंग’ होत असल्यास स्त्रियांना काय करता येईल?

या प्रश्नाचे उत्तरही सोपे नाही. आपल्याला नेमके कोण मॅन्सप्लेन करत आहे, हे बघणे महत्त्वाचे आहे. तुमचा एखादा मित्र, सहकारी वा सहचर तुम्हाला खरोखरचा कळकळीचा सल्ला देऊ शकतो. परंतु काही व्यक्ती कदाचित आपल्या संवाद-परिघाच्या पलीकडल्या असू शकतात. तुमच्या कामाच्या ठिकाणचा वरिष्ठ हा आपला अधिकार गाजवण्यासोबतच मॅन्सप्लेनिंगही करू शकतो, पण कदाचित ते नुसते समजावणेदेखील असू शकते. त्यामुळे कोणतीही कृती करण्याआधी वा प्रतिक्रिया देण्याआधी सीयांनीसुदधा एक्सप्लेनिंग आणि मॅन्सप्लेनिंग यामधला फरक समजून घ्यायला हवा.

ज्यांच्याशी संवाद करता येईल असे पुरुष असल्यास त्यांना या संकल्पनेची माहिती देता येईल. त्यांचे वागणे आणि बोलणे हे तुम्हाला मॅन्सप्लेनिंग वाटत आहे, हे स्पष्ट करून त्यांचे म्हणणेही ऐकून घेता येईल. शक्यता अशी आहे की, पुरुषांना हे असेच बोलणे ‘नॉर्मल’ वाटत असावे, पण मग तुम्हाला ते त्रासदायक होते. आणि त्यामुळे त्यात सुधारणा आवश्यक आहे, हे स्पष्टपणे नमूद करायला हवे. कामाच्या ठिकाणी लगिक छळवणुकीबद्दल जनजागृती व्हायला हवीच, पण त्याचबरोबर लैंगिकदृष्ट्या संवेदनशील वर्तणूक कशी असावी, याबाबत चर्चा करता येतील. तज्ज्ञांना बोलवून जेंडरसंदर्भात काही कार्यशाळा आयोजित करता येतील. हळूहळू पुढे जाणाऱ्या संवादातून कदाचित बदलांना सुरुवात होऊ शकेल.

एखादा पुरुष (मग तो कोणीही असो) तुमच्या शरीराबद्दल, तुमच्या गर्भारपणाबद्दल- गर्भपाताबद्दल, तुमच्या पाळीबद्दल, वेदनांबद्दल, लैंगिकतेबद्दल, तुमच्या जबाबदाऱ्यांबद्दल, निवडीबाबत, भावनिक आणि शारीरिक मर्यादांबद्दल, तुमच्या इतरांशी असलेल्या संबंधांबद्दल, नात्यांबद्दल त्याला फारशी माहिती नसताना अधिकारवाणीने बोलत असेल आणि तुम्हाला त्याच्यासमोर बोलायची काही संधीच मिळत नसेल, तर ते वेळीच ओळखायची गरज आहे. बहुतेक बायकांसाठी हे ओळखता येणे, ही पहिली पायरी आहे. त्यानंतर त्यावर उपाययोजना करता येतील.

पुरुषांना याबाबतीत काय करता येईल?

याआधी म्हटल्याप्रमाणे, एखाद्या स्त्रीला तुम्ही समजवायला जाताना, सल्ला देताना तिने तुम्हाला त्यासाठी विनंती केली आहे का, किंवा तसे करण्याचा औपचारिक अधिकार तुम्हाला आहे का, हे पडताळून पाहणे आवश्यक आहे. आपण ज्या बाबतीत तिला सल्ला द्यायला जात आहोत, त्या विषयाची आपल्याला पूर्ण माहिती आहे का, हेही तपासणे आवश्यक आहे. आपण देत असलेला सल्ला ज्ञानातून येत आहे की, अतिरिक्त आत्मविश्वासातून येत आहे, हेही बघणे अत्यावश्यक आहे. आपल्या पुरुषी वर्चस्वामुळे आपण एखाद्या स्त्रीला कायमचे दुबळे करू शकतो, याची जाण ठेवायला हवी.

एखादी स्त्री तुमच्याशी अथवा तुमच्यासमोर तिच्या शरीराबद्दल, तिच्या वेदनांबद्दल किंवा तिच्या अनुभवांबद्दल बोलत असेल, तर तिला जास्तीत जास्त बोलू द्यावे. तिचे बोलणे मध्येच तोडून आपले मत व्यक्त करू नये. असे केल्याने तिला जे काही म्हणायचे आहे, ते अव्यक्त राहू शकते. तिच्या काही वैयक्तिक गोष्टींबाबत ती तुमच्याशी चर्चा करत असेल आणि सल्ला मागत असेल, तर तुमचे मत व्यक्त करताना त्यात मित्रत्व आहे की, अधिकारवाणी आहे, याकडेही लक्ष द्यायला हवे. हे सगळे लगेच जमेल असे नाही. पण स्वतःच्या बोलण्याचे, संवाद साधण्याच्या पद्धतीचे आणि एकूण विचारांचे सातत्याने व बारकाईने निरीक्षण करत राहिल्यास बदल शक्य आहे. हा अर्थात एक मोठा प्रवास आहे. सगळ्यात मोठा प्रश्न- तुमची तो प्रवास करायची इच्छा आहे का, हा आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

याशिवाय छोटे छोटे बदल रोजच्या आयुष्यातही करता येतील. आपण सगळे आता व्हॉट्सअॅप आणि इतर समाजमाध्यमे सर्रास वापरत असतो. त्यावर सातत्याने बायकांचा अपमान करणारे, त्यांना कमी लेखणारे असे ‘विनोद’ आपल्याला फॉरवर्ड केले जातात. यातले अनेक विनोद हे ‘केवळ विनोद’ म्हणून घ्या आणि हसा असा सल्लाही वरचेवर दिला जातो. पण बायकांवरचे हिणकस विनोद मात्र कमी होत नाहीत. तुम्हाला असे मेसेज कोणी पाठवले, तर पाठवणाऱ्या माणसाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करावा. प्रसंगी तीव्र शब्दांत तंबी द्यावी. तुम्ही एक तरुण पुरुष असाल, तर तुमच्या मित्रमंडळींमध्ये यावर चर्चा करावी. तुम्ही एक वडील असाल, तर आपल्या मुलांसोबत, घरच्यांसोबत ही चर्चा करावी. हे सगळे बदलायला अर्थात वेळ लागेल, पण सतत त्यावर बोलले गेल्याने बदलाची सुरुवात तर नक्की होईल...

अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ‘हिल्स लाईक व्हाईट एलिफंट्स’ नावाची कथा आहे. ही कथा १९२०च्या सुमारास लिहिलेली आहे, ज्यात एक पुरुष आणि एक बाई बोलताना दाखवले आहेत. ती मुलगी गर्भवती आहे, आणि तो पुरुष तिला गर्भपात करायला सांगत आहे. तो काळ असा होता जेव्हा गर्भपात करणे, हा कायद्याने गुन्हा होता, आणि वैद्यकीय क्षेत्रही आजच्याएवढे पुढे गेले नव्हते. त्यामुळे गर्भपात करणे जीवावरही बेतू शकत होते. अशा परिस्थतीत या कथेतील पुरुष मात्र ‘गर्भपात करवून घेण्यात तितकीशी अडचण नाही, अगदी थोड्या वेळाने काम आहे, तुला काही त्रास होणार नाही’ अशा अर्थाची वाक्ये पुन्हापुन्हा बोलत असतो. तिच्या मनात मात्र काही वेगळे असते. तिला बाळाला जन्म देण्याची इच्छा असते आणि तसे ती मध्येच सूचितही करते. पण तो आपल्याच जगात मश्गुल असतो. तिचे न ऐकता स्वतःचे म्हणणे मांडत राहतो. शेवटी ती म्हणते, “तू प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज बोलायचं बंद करशील का?”... हे सात वेळा ‘प्लीज’ म्हणणे म्हणजे माफी मागणे नव्हे, तर उद्वेगाने समोरच्या पुरुषाला स्त्रीच्या वतीने न बोलायची केलेली विनंती आहे.

आज २०२२मध्येही स्त्रियांना अशा मॅन्सप्लेनिंगला वरचेवर सामोरे जावे लागतेच. स्त्रियांच्या बाजूने अनेक कायदे आहेत, अनेक विषयांवर चर्चा होत आहेत. पण दैनंदिन आयुष्यात होणारा भेदभाव थांबलेला नाही... तो थेट आहे आणि अस्पष्ट, जाणवेल न जाणवेल असाही आहे. आजच्या स्त्री-पुरुषांना यावर उपाय शोधायचा आहे. अधिक विचार करून, अधिक संवादी राहून, अधिक जोरकसपणे.

‘पुरुषस्पंदनं’ - माणूसपणाच्या वाटेवरची : संपादक हरीश सदानी

पाने - २६८, मूल्य - २५० रुपये.

.................................................................................................................................................................

गायत्री लेले

gayatrilele0501@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा