‘गीता प्रेस’ ही रा.स्व.संघाच्या आधीची हिंदुत्ववादी राजकारणाची पाऊलखुण ठरते. ती ओळखली आणि अभ्यासली जाण्याची गरज पुस्तकातून अधोरेखित होते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
प्रकाश बुरटे
  • ‘हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा : दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ या पुस्तकाचे मुखृष्ठ
  • Sat , 30 July 2022
  • ग्रंथनामा शिफारस हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा Hindutvavadi Rajkarnachya Paulkhuna हिंदू इंडिया Hindu India प्रमोद मुजुमदार Pramod Mujumdar गीता प्रेस ॲण्ड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया Gita Press and the Making of Hindu India अक्षया मुकुल Akshaya Mukul हिंदू राष्ट्र Hindu Rashtra

ज्येष्ठ पत्रकार अक्षय मुकुल लिखित ‘गीता प्रेस ॲण्ड दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ हे हार्पर कॉलिन्सने २०१५मध्ये प्रकाशित केलेले इंग्रजी पुस्तक प्रमोद मुजुमदार यांच्या वाचनात आले. त्यांच्या असे लक्षात आले की, सर्वसाधारणत: हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे ‘आद्य प्रवर्तक’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (रा.स्व. संघ) मानले जाते. परंतु ते काम तर गीता प्रेस आणि ‘कल्याण’ नियतकालिकातून संघाच्याही दोन वर्षे आधीपासून (१९२३) मोठ्या प्रमाणावर घडत होते. हा इतिहास मराठी वाचकांना माहीत असणे त्यांना खूप महत्त्वाचे वाटले. त्यामुळे त्यांनी या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या आधाराने ‘हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा’ हे तुलनेने संक्षिप्त रूपातील स्वतंत्र पुस्तक लिहिले.

पुस्तकाचा आशयविचार

एकूण ३६ उपविभागांतील पहिला उपविभाग प्रस्तावनावजा आहे. त्यामध्ये लेखक प्रथम आजचे राजकीय वास्तव सांगून बंगाल इलाख्यातील इतिहासाकडे वळतो. भारतातील ब्रिटिश वसाहतीची राजधानी कलकत्ता (कोलकाता) येथून दिल्लीत हलवायचा निर्णय जरी १९११ साली झाला असला, तरी तो निर्णय प्रत्यक्षात उतरण्यासाठी १९३१ साल उजाडले. तोपर्यंत सगळ्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि महत्त्वाचे निर्णय यांचे केंद्र कलकत्ता होते.

जयदयाल गोयंका आणि त्यांचे सहकारी हनुमान प्रसाद पोद्दार या मारवाडी समाजाच्या कलकत्त्यातील दोन व्यापाऱ्यांनी हिंदूधर्मात सर्वांत पवित्र मानलेल्या ‘गीते’च्या प्रसाराचे आणि हिंदूधर्मातील प्रथा-परंपरांचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवण्याचे काम करण्याचा ध्यास १९१० सालापासून कसा घेतला होता, हे हा उपविभाग सांगतो.

व्यापारानिमित्त त्यांचा संपर्क सध्याचा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथील मारवाडी समाजातील व्यापाऱ्यांशी येत असे. प्रथम त्यांनी कलकत्यातील मारवाडी समाजाच्या व्यक्तींचा गट बनवून हिंदूधर्म प्रसाराचे काम सुरू केले. त्याला व्यापाऱ्यांचा उत्साही पाठिंबा मिळू लागला. मग त्यांनी शहरातील एक जागा भाड्याने घेतली. या ‘गोविंद भवना’त धर्मप्रचाराचे काम सत्संगामार्फत सुरू केले. याला जोडून हाती घेतलेले पहिले मुख्य काम म्हणजे ‘गीते’ची प्रमाणीकरण केलेली प्रथमावृत्ती तयार करणे आणि तिच्या ११ हजार प्रती छापून घेणे. पाठोपाठ त्यातील बऱ्याचशा प्रती शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये वाटल्या गेल्या. त्या विद्यार्थ्यांच्या घरांत पोहोचल्या. साक्षरतेची १९२२मधील परिस्थिती आणि उपलब्ध बाजारपेठ लक्षात घेतल्यास ११ हजार प्रती वितरीत करणे, ही खूप मोठी हनुमान उडी होती.

ही छपाई चांगली वाटली नाही, म्हणून त्यांनी स्वतःची प्रेस उभारण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे गोरखपूर येथे १९२३ साली ‘गीता प्रेस’ उभारली. त्यासाठी आणि गीतेच्या छपाई खर्चासाठी मारवाडी समाजातील अनेक व्यापारी मंडळींचे हात पुढे आले. शाळांशाळांतून गीतेच्या प्रती मोफत वाटणे आणि जोडीला गीता पठणाला प्रोत्साहन देणे, या कामासाठी काही निवृत्त सुप्रसिद्ध माणसे नेमली गेली. ते काम आजही खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे.

२०१४पर्यंत हिंदी ‘कल्याण’ मासिकाचे दोन लाख वर्गणीदार आणि ‘कल्याण कल्पतरू’ या इंग्रजी नियतकालिकाचे १ लाख वर्गणीदार होते. तोपर्यंत गीतेच्या ७ कोटी २० लाख प्रती, पुराणे आणि उपनिषदांच्या एक कोटी ९० लाख प्रती, ‘तुलसी रामायणा’च्या सात कोटी प्रती वितरीत केल्या गेल्या. हे जगङ्व्याळ काम कसे घडवले, याचाही तपशील दिलेला आहे.

१८८५ साली स्थापन झालेल्या काँग्रेसच्या हाती विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व आले. तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही एक चळवळ असल्याने स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा भारत कसा असावा, याबाबत विचारविमर्श आणि त्याआधारे कार्यक्रम घेतले जात असत. काँग्रेसमध्ये हिंदुत्ववादी विचारधारेचा एक गट काम करत होता आणि हिंदू धर्माधिष्ठित राष्ट्र घडवण्याचे आपले विचार पुढे रेटतही होता. त्या गटाशी संबंध असणाऱ्या कलकत्त्यातील मुख्यतः जयदयाल गोयंका आणि हनुमानप्रसाद पोद्दार या दोन धार्मिक व्यक्तींच्या पुढाकाराने ‘गीता प्रेस’ आणि हिंदी तसेच इंग्रजीतील ‘कल्याण’ मासिकांतून पुढील जवळपास नव्वद-शंभर वर्षांत प्रसिद्ध झालेल्या लिखाणातील हिंदुत्ववाद सर्वत्र बळकट करणारे विषय थोडक्यात असे दिसतात -

- सनातन हिंदुधर्माचा तसेच हिंदुधर्मग्रंथांचा प्रचार-प्रसार

- वर्णाश्रम पद्धतीचे, जातीयतेचे आणि स्त्रीदुय्यमत्वाचे समर्थन

- मुस्लीम-ख्रिश्चन धर्मियांना विरोध

- गोरक्षा, गोहत्याबंदी यासाठी आग्रह

- रामजन्मभूमी मुक्ती; आणि

- हिंदीभाषा ‘शुद्धी’चा आग्रह.

यावरून भविष्यात भारताला एक वर्चस्ववादी ‘हिंदूराष्ट्र’ म्हणून घडवण्याचा प्रवास १९०५-१९१०पासून सुरू करणे, हे या मंडळींचे वैशिष्ट्य लक्षात येते.

याच उपविभागात स्थानिक पातळीवर हिंदूंच्या सभा भरवायला १९०५ या वर्षी सुरुवात होण्याच्या कारणांची चर्चा आहे. तेव्हाचे ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड कर्झन यांनी ‘प्रशासकीय सोय’ या नावाखाली बंगाल इलाख्याची पूर्व आणि पश्चिम बंगाल, अशा दोन भागांमध्ये विभागणी केली होती. त्यापैकी पश्चिम बंगाल हिंदूबहुल होता, तर पूर्व मुस्लीमबहुल. ही फाळणी तेव्हाच्या बहुतांश जनतेला मान्य नव्हती. परंतु राजस्थानातून बंगालमध्ये येऊन व्यापारउदिम, सावकारी आणि औद्योगिक क्षेत्रात पहिली पाऊले टाकणाऱ्या मुख्यतः पूर्व बंगालमधील मारवाडी समाजाला तिचा फटका निश्चित बसेल, अशी धारणा तेव्हाच्या बंगालमधील मारवाडी समाजात मोठ्या प्रमाणात पसरली होती. हा समाज धनिक, धार्मिक आणि पक्क्या पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेत वाढलेला होता. वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था, आणि स्त्रीचे समाजातील दुय्यमत्व यासह पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था टिकल्याने या पुरुषांना मिळणारे कौटुंबिक ‘स्वास्थ्य’ कायम ठेवायचे होते. जयदयाल गोयंका आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नांची दिशा हिंदू धर्मातील ब्राह्मण्य आणि पितृसत्ताक वर्चस्ववादी धारा बळकट करणारी होती.

त्यानंतर १९०६ या वर्षी मुस्लीम लीगची स्थापना झाली आणि १९०९मध्ये मोर्ले-मिन्टो यांच्या प्रस्तावित सुधारणांखाली मुस्लिमांसाठी राखीव मतदार संघांची योजना राबवण्यात आली. या राजकीय घटनांची प्रतिक्रिया म्हणून ‘सर्व हिंदूंच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी’ पंजाब हिंदू सभा (इंग्रजीत पंजाब हिंदू असेंब्ली) स्थापन झाली.

त्याच धर्तीवर बिटिश इंडियात इतरत्रदेखील हिंदू सभा उदयाला आल्या. त्यांच्या वार्षिक सभा होत होत्या. या हिंदू सभांना धर्माधारित राष्ट्रे हवी होती आणि हिंदूबहुल राष्ट्रांतील मुस्लीम नागरिकांना कोणतेही अधिकार असू नयेत, अशी त्यांची धारणा होती. या सर्व संघटनांच्या कामांमुळे विविध भागांतील हिंदू सभांच्या १९२१ साली झालेल्या सहाव्या वार्षिक परिषदेत अखिल भारतीय हिंदू महासभेची औपचारिक स्थापना झाली. काँग्रेसचे चारदा अध्यक्षपद भूषवलेले मदन मोहन मालवीय आणि पंजाबमधील काँग्रेसचे लोकप्रिय नेते लाला लजपत राय यांचा हिंदू महासभा स्थापनेत पुढाकार होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१९२०पासून हिंदू महासभेमध्ये बाळकृष्ण मुंजे आणि वि. दा. सावरकर यांचे महत्त्व वाढत होते. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांच्यासोबत काँग्रेसमधील काही हिंदुत्ववादी नेत्यांनीदेखील काँग्रेस सोडली. हिंदू महासभेला याचा मोठा धक्का बसला. कारण नंतर संघाची प्रगती जास्त वेगाने होऊ लागली. या प्रगतीचे एक कारण पुढीलप्रमाणे असावे : गीता प्रेस आणि ‘कल्याण’ मासिक सनातन हिंदूधर्माचा प्रचार-प्रसार करत असल्याने संघाने तेव्हापासूनच त्या कामाची द्विरुक्ती टाळून गाजावाजा न करता सरळ हिंदुत्वाचे कार्यक्रम आणि त्या द्वारे हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी काम करायला सुरुवात केली.

काँग्रेसमधील उरलेल्या हिंदू महासभेच्या सभासदांनी गांधीजींच्या असहकार चळवळीत भाग घेतला नव्हता. श्यामाप्रसाद मुखर्जी १९३९पासून १९४६पर्यंत हिंदू महासभेचे अध्यक्ष या नात्याने नेतृत्व करत होते. मुखर्जींनी स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या मंत्रीमंडळात एक वर्ष कामही केले. काँग्रेसमधून राजीनामा देत त्यांनी १९५१मध्ये संघाच्या मदतीने ‘भारतीय जनसंघ’ हा पक्ष स्थापन केला. पुढे हा पक्ष जनता पक्षात सामील झाला आणि त्यातून फुटून ‘भारतीय जनता पार्टी’ स्थापन झाली. सुरुवातीची काही वर्षे काँग्रेसमध्ये घालवलेल्या मुखर्जी यांना भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पार्टी यांचे संस्थापक मानले जाते.

थोडक्यात, काँग्रेसच्या पोटात हिंदुत्वाची उभारणी आणि हिंदुत्ववादी पक्षांची स्थापनाही करता येत होती. काँग्रेस नेतृत्वाला सर्वधर्मांच्या आणि जातींच्या स्त्री-पुरुषांना सामावून घेणारा आणि त्यांना विकासाच्या समान संधी देऊ पाहणारा भारत घडवायची मनीषा होती. या उलट, गीता प्रेस आणि ‘कल्याण’ मासिक यांच्या संपादक मंडळींना वर्णव्यवस्था, जातव्यवस्था आणि पितृसत्ताकता टिकवून ठेवणारा वर्चस्ववादी हिंदुधर्माधारित देश घडवण्यात रस होता. त्यांशिवाय हिंदूधर्म टिकणार नाही, असे त्यांना वाटे. या दोन विचाराधारांमधील मोठ्या फरकाकडे काँग्रेस कानाडोळा करत आल्याची काही उदाहरणे या पुस्तकात आढळतात. याचे एक कारण काँग्रेस ही एकाच वेळी अनेक विचारधारांना आपल्या पंखाखाली घेणारी स्वातंत्र्य चळवळ, ब्रिटिश सत्तेशी बोलणी करणारी प्रातिनिधिक संघटना आणि एक राजकीय पक्ष या सर्व भूमिका वठवत होती.

स्वातंत्र्यानंतर एका वर्षाच्या आत ३० जानेवारी १९४८ रोजी कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी मानणाऱ्या नथुराम गोडसे आणि सहकारी कार्यकर्त्यांनी धार्मिक हिंदू असणाऱ्या गांधींचा गोळ्या झाडून खून केला. ते त्यांना आवश्यक वाटत होते. त्याच वेळी हिंदुत्ववादी संघटनांसाठी गांधी खुनाच्या आरोपाला तोंड देणे, हे दीर्घ काळ मोठे आव्हान बनले होते. कारण त्या गुन्ह्यात वि.दा. सावरकर एक आरोपी होते. संघावर बंदी घातली गेली होती.

गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची वाढ अशी झाली होती की, तो पक्ष सर्वधर्मसमभाव जपणारा आणि सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांना समान मूलभूत अधिकार मिळणे व्यवहारात स्पष्टपणे मान्य करणारा पक्ष होता. त्याचा मूर्त आविष्कार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील घटना परिषदेने तयार केलेल्या भारतीय घटनेच्या मसुद्यावर सर्व पक्षीय चर्चा होऊन आणि सुधारणा स्वीकारून २६ जानेवारी १९५० रोजी तिच्यावर अंमल होणे हा होय.

जागतिक कलही तोच होता. नव्याने वसाहतवादातून स्वतंत्र होऊ लागलेली राष्ट्रे सर्वधर्म समभाव मानणारी किंवा धर्मनिरपेक्ष राष्ट्रे बनत होती. स्वातंत्र्यानंतर हिंदुत्ववादी पक्षांना कळून चुकले होते की, यापुढे त्यांना काँग्रेसच्या छत्राखाली हिंदुत्ववादी राजकारणाला वाव मिळणार नाही. अशा परिस्थितीत भारताला वर्चस्ववादी हिंदूराष्ट्र बनवणे हे आव्हानदेखील जास्त कठीण बनले होते. परिणामी देशाची घटना मान्य करणे आणि त्याच वेळी घटनेने बहाल केलेले धर्म आचरणाचे आणि प्रचाराचे जनतेला असलेले मूलभूत स्वातंत्र्य वापरत आपली धर्माधिष्ठित राष्ट्राची संकल्पना लोकांच्या गळी उतरवत राहण्याचा प्रयत्न नेटाने करत राहणे व्यावहारिक शहाणपणाचे होते.

त्यानुसार गीता प्रेस सनातन हिंदूधर्म प्रचार आणि प्रसाराचे काम स्वातंत्र्यानंतरही करतच राहिली. या मुद्द्यांचा पुस्तकांतील पुढील उपविभागांत जास्त तपशीलात विचार केला गेला आहे.

वरील विषयांना पूरक असे काही कायदे वर्तमान काळात संमत केल्याने अनेक ठिकाणी खासगी गोरक्षक मंडळे उगवली. काही ठिकाणी मुस्लिमांचे झुंडीने खून केले गेले. अशा टोकाच्या हिंसक कृतींमागे गीता प्रेस आणि कल्याण मासिक यांचा सनातन हिंदूधर्म प्रसार प्रचार जसा आहे, तसाच संघाचा हिंदुत्वाचा क्रूरकठोर पाठपुरावाही  कारणीभूत आहे.

निसटलेले संदर्भ

बंगालमध्येच १८२८ साली राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांच्या प्रयत्नातून गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीप्रथेला पायबंद घालणारा कायदा केला. ब्राह्मो समाजाच्या धर्तीवर मुंबईत प्रार्थना समाज स्थापन झाला. त्यांच्या धर्मसुधारणेच्या उपक्रमांचे उदाहरण देशांतील सुशिक्षितांच्या समोर होते. जोतीराव फुल्यांनी महाराष्ट्रात ‘सत्यधर्मा’ची स्थापना केली. या साऱ्या घटितांकडे गीता प्रेसने ढुंकूनदेखील पाहिले नाही.

तसेच मारवाडी समाजाला महाराष्ट्रातील केशवसुत, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, धोंडो केशव कर्वे, गोपाळराव आगरकर, उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर किंवा बंगालमधील राजाराम मोहनराय, तसेच शरतचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर, यांच्यासारख्या साहित्यिक, कार्यकर्ते, शिवाय कलावंत यांनी स्वीकारलेल्या आधुनिक मूल्यांचे मोल अजिबात वाटले नाही. त्याची कारणमीमांसा या पुस्तकांत करता आली असती.

त्याचबरोबर प्रामुख्याने मुस्लीमद्वेषावर उभारलेले ‘हिंदुत्व’ आणि हिंदू धर्मातील धारणा, तत्त्वविचार यांच्या संबंधातील साम्य-फरकांची प्रत्यक्ष व्यावहारिक उकल केली असती, तर त्याआधाराने हिंदुत्ववादी पक्षांच्या प्रगतीचा अन्वयार्थ लावता येणे वाचकाला सोपे गेले असते.

गीता प्रेसचे धर्मप्रसाराचे आणि संघपरिवाराचे हिंदुत्व अजेंडा रेटण्याचे काम ही दोन केंद्रे समांतर कार्य करत राहिली. अशा प्रदीर्घ कामाची परिणती विश्व हिंदू परिषदेने ‘रामजन्मभूमी मुक्ती’ आंदोलन छेडण्यात, त्याच्या समर्थनार्थ भाजपच्या तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी केलेल्या रथयात्रांमध्ये आणि शेवटी लोकशाहीमध्ये एखाद्या पक्षाने दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळाचा विध्वंस करण्यात कशी झाली, याचे भान येण्यास वाचकाला मदत झाली असती. हिंदूधर्म आणि धर्माधिष्ठित राजकीय विचारधारा (हिंदुत्ववाद) यातील मूलभूत फरक स्पष्ट व्हायला हवा होता, असे वाटते.

पुस्तकातील अनेक उपविभाविगांतून हनुमानप्रसाद पोद्दार आणि जयदयाल गोयंका यांचे कार्य, त्यामागील त्यांच्या प्रेरणा, तसेच अनेक घटना यांचे उदबोधक तपशील येतात. त्यांच्या मृत्युनंतरच्या ‘गोयंका आणि पोद्दार - काळाच्या पडद्याआड’ या क्र. ३२व्या उपविभागात (मुख्य विभाग- चवथा) ही जोडी पुन्हा मुख्यतः त्यांच्या लैंगिक वर्तनाच्या संदर्भातील आरोपांमुळे भेटते. ‘विविध लैंगिक स्व-प्रतिभा पुरस्कर्ते नागरिक’ यांच्यासह तमाम भारतीय नागरिकांना अर्पण केलेल्या या पुस्तकातील बळजबरी नसणाऱ्या लैंगिक वर्तनाशी निगडीत चर्चा आणि आरोप खटकतात. पुढील आवृत्तीत हा अप्रस्तुत भाग वगळण्याचा जरूर विचार करावा.

अर्थात, अशा मोजक्या त्रुटी सुधारणांच्या केवळ जागा दाखवत असतात; त्या पुस्तकाचे बाकी मोल जराही कमी करत नाहीत. गीता प्रेसने भगवद्गीतेच्या आणि इतरही धार्मिक साहित्याच्या प्रती प्रसिद्ध केल्या आणि गीतेच्या प्रती तर मोफत वाटल्याचे, तसेच ‘कल्याण’ मासिकाने (इंग्रजी-हिंदी) त्याच्याशी संलग्न साहित्य नेमाने पुरवल्याचे आपण सुरुवातीलाच पाहिले आहे. त्या सातत्यपूर्ण कामातून जसा धर्माचा प्रसार झाला आणि आजही होतो आहे, तसाच प्रत्येक पिढीसाठी लोकशाहीला मारक वर्चस्ववादी हिंदुत्वाचा पायादेखील कळत-नकळत तयार झाला आणि सतत तयार होतो आहे. गीता प्रेस स्वतःच्या कामामुळे रा.स्व.संघाच्या आधीची हिंदुत्ववादी राजकारणाची पाऊलखुण ठरते. ती ओळखली आणि अभ्यासली जाण्याची गरज पुस्तकातून अधोरेखित होते.

मुखपृष्ठ व मांडणी

प्रस्तुत पुस्तकाचे मिलिंद कडणे यांचे मुखपृष्ठ विविध राजकीय पक्षांना सध्या मिळणाऱ्या जनाधाराच्या स्तंभालेखाची आठवण जागवते. पुस्तकाच्या आशयाला वाचकाभिमुख करणारा मांडणीचा ढाचा काही बाबतीत नवा मानावा लागेल. प्रत्येक उपविभागाच्या शेवटी आणि सुरुवातीला ठेवलेल्या मोकळ्या जागा वाचकाला लेखकाशी एकतर्फी का होईना, पण मुक्त-संवाद करता येण्याची शक्यता वाढवतात.

‘हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा : दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ - प्रमोद मुजुमदार

लोकवाङ्मय गृह, मुंबई.

पाने - २३२.

मूल्य - ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

या पुस्तकाची प्रस्तावना वाचण्यासाठी पहा -

https://www.aksharnama.com/client/article_detail/5985

.................................................................................................................................................................

लेखक प्रकाश बुरटे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.

prakashburte123@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......