वारीतल्या वीराची डायरी, म्हणे चढू पायरी, झाली सारी तयारी!
पडघम - सांस्कृतिक
जयदेव डोळे
  • वारकऱ्यांची प्रातिनिधिक चित्रे
  • Thu , 30 June 2022
  • पडघम सांस्कृतिक वारी Wari पंढरपूर वारी Pandharpur Wari वारकरी Warkari विठ्ठल Viththal माऊली Mauli जय श्रीराम Jay Shree Ram हिंदूराष्ट्र Hindu Rashtra संघ RSS

दिवस दुसरा

परमपूज्य नानासाहेब,

नगरप्रमुख, राजकीय स्वयंसेवक संघ,

यांचे चरणी माझा सा.न.वि.वि.

गुरुजीकृपे मी इकडे सुखरूप आहे. आपणही तिकडे असाल अशी प्रार्थना. आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे मी धोतर, टोपी, टाळ, गोपी-चंदन, तुलशीमाळ या वेषात वारीत सामील झालो आहे. प्रथमच हा वेष केल्याने जरा गडबड झाली. मी कोणी बनावट, चोर वा लफडेबाज आहे की काय, या नजरेने वारकरी पाहत होते. पण तुमची शिकवण व बौद्धिक कामी आले. आग्ऱ्याहून सुटकेचा प्रसंगी कानी गुंजत होता. अखेर, आषाढीला फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा व्हावी, असा आसामप्रांती सोडलेला संकल्प जाहीरपणे बोलण्यास सुरुवात केली आहे. उगाच कोणाशी उराउरी करतो व त्याच्या कानात पुटपुटल्यासारखे, पण पंढरपूरच्या दिशेने तोंड करून ‘विठ्ठला, माझ्या देवेन्द्राला पुन्हा मुख्यमंत्री कर’ असे म्हणून चेहरा फार गंभीर, पवित्र आणि आसुसलेला करतो. शेवटी ‘जय श्रीराम’सुद्धा करतो.

वारकरी चमकून या साऱ्याकडे पाहतो, पण या वेषाची जादू आहे नानासाहेब! मान हलवत सारे आपल्यासारखे ‘जय श्रीराम’ पुटपुटतात हो. किती भाबडे मन! केवढा हा सोशिकपणा. उगाच नाही नरेनभाई जिंकत वारंवार. १२ जूनला नाही का देहूमध्ये साक्षात अजितदादांची फजिती केली. प्रोटोकॉल पाळला नाही म्हणून बातम्या छापून आणल्या त्यांनी. पण त्यांच्या नाकाखाली आपण अवघे देहू संस्थान काबीज केले. त्यांना फार उशिरा समजले. शिवसेनेचा खासदार बारणे बेपत्ता, राष्ट्रवादीचा आमदार शेळके गायब. वर अजितदादांना बोलू दिले नाही! म्हणजे त्यांचे नावच वक्त्यांच्या यादीतून वगळले. ही गंमत म्हणे आपला हुशार भोसले आणि सेवेन्द्र फडणवीस यांनी घडवून आणली. तरी बरे, देहू पालिका राष्ट्रवादीची आहे. पण नगराध्यक्षालासुद्धा बघ्या करून टाकले आपण. सदगुरू दादा महाराज मोरे यांचा आशीर्वाद असतो आपल्याला, जाता कुठे म्हणावे!

अजून काय म्हणाले, ठाऊक आहे? म्हणे, तुकाराम महाराज संस्थानाच्या शिळा मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम भाजपच्या ‘आध्यात्मिक आघाडी’चा होता. किती बावळट!! एखाद्या राजकीय पक्षाची ‘आध्यात्मिक आघाडी’ असते, यावर विश्वास ठेवतात हे लोक? कीव करावी तेवढी कमीच.

नाना, ‘अंगी तुमच्या कळा, वेष बदलून मिसळा’ हा तुमचा दिव्य संदेश आहे. प्रधानसेवक नव्हे का, जिथे जातील, तिथला वेष पांघरून फोटोसेशन करतात आणि मीडियात झळकतात. इतके कसे हो भाबडे हे लोक? बघा ना, मला ना अभंग येत होते, ना तालावर नाच. पण शिकलो निर्लज्जासारखा (हा आपला बाणा) अन् झालो वारकरी.

ही वारी, ही संतमंडळी, ही परंपरा तरी कुणाची हो?

मला तर शाखेत एकही बौद्धिक या संतांबद्दल घेतलेले आठवत नाही. आपल्या गटांची नावेही तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव यांसारखी कधी नसतात. हातात चिपळ्या, खांद्यावर एकतारी अन् ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हटल्याने ‘हिंदूराष्ट्र’ बनत नसते, असा तुमचा एका बौद्धिकातला निर्वाळा आठवतो मला. त्यामुळे मला वारीत जायला सांगितल्यावर फार आश्चर्य वाटले. तेव्हा तुम्ही म्हणालात की, ‘गुंगा होऊन जगण्यापेक्षा भुंगा होऊन जगा!’ मला त्या वेळी कळले नव्हते. आता कळते आहे. भुंग्यासारखा मी यांच्यात शिरलो आहे. फारच भुसभुशीत आवरण आहे. फक्त मी पांढराशुभ्र भुंगा आहे, काळा नाही. हा…हा…!

दिवस चौथा

प.पू. नाना, अचानक वारीमधून संघाच्या वैद्यकीय पथकात जायला सांगण्यात आले. त्यामुळे पायांना जरा आराम मिळतो आहे. या पथकात जरी वेगवेगळे डॉक्टर्स असले, तरी आम्ही आयुर्वेदिक औषधांचीच शिफारस आणि उपयोग करतो. का, ते तुम्हाला सांगायचे धाडस मी करत नाही. भारतीय संस्कृती व तिच्यामधील आपण ब्राह्मणांनी जपून-जतन करून ठेवलेल्या उपचारपद्धती पुढे न्यायच्या असतील, तर अशा गर्दीत त्या मोफत का होईनात दिल्या पाहिजेत, असेच तुम्ही एकदा म्हणाल्याचे लक्षात आहे माझ्या. बहुजन समाज असाच वारीसारखा वाहता आणि उथळ असतो. त्याचे स्वास्थ्य टिकवायला कुणी तरी स्वस्थचित्त, अनुभवी व अधिकारी पुरुष लागणार. आमच्या पथकात ते आहेत.

महिलांचे पथक अर्थातच वेगळे व दूर आहे. औषधे देताना न चुकता ‘जय श्रीराम’चा घोष करतो. एखादा मंत्र म्हटल्याप्रमाणे. वारकरी लगेच विरघळतो. आम्हालाच वंदन करून परततो. विठ्ठलाचा विसर असाच पडत राहो, ‘जय श्रीराम’ तोंडात घोळत राहो, अशी सर्व तयारी केलेली आहे.

कमरेवरचे हात काढून त्या हातात धनुष्य बाण घेतलेला व यवनांच्या संहारास उद्युक्त झालेला विठ्ठल काल आमच्या पथकातल्या सर्वांच्या स्वप्नात आला होता. काहींनी रेखाचित्रे काढून स्वप्नातल्या तशा विठ्ठलाची प्रतिमा रंगवली. ती सर्व चित्रे मी एकत्र केली असून पुढील वर्षी प्रदर्शनात मांडण्यासाठी लॅमिनेट व फ्रेम करण्याचा निश्चय केलेला आहे.

वारकऱ्यांनी त्यांच्या सात्त्विक, सलोख्याच्या, मवाळ भूमिकेचा त्याग करायला हवा, असे फार मनात आहे. शिवसेनेने शक्तीपरंपरा उभी करून भक्तीपरंपरेला चांगला छेद दिला होता. तिचे रांगडे हिंदुत्व लोक नीट पाहत होते. पण आपल्या सनातन परंपरेला त्यामुळे वाळीत टाकल्यासारखे वाटू लागले. शेवटी काय, सनातन परंपरा पुनरुज्जीवित करणे हा आपला म्हणजे परिवाराचा उद्देश. सेनेची शक्ती आता दिसत नाही. हे मावळे शिवाजी महाराजांच्या नावावर जगतात, पण तुकोबांना विसरतात. आपण नाही विसरलो, नाही का?

दिवस पाचवा

काल रात्री मुक्कामाच्या ठिकाणी आपल्या हुशार भोसलेचे कीर्तन आयोजित केले होते. तरुण असल्याने फार गर्दी जमली नव्हती. कारण तो काही परंपरेतला नाही. शिवाय राजकीय विचारांशी बांधील. तरी त्याने आपली परंपरा मांडण्याचा प्रयत्न केला. लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगू पाहतो की, कीर्तन करताना भसाडा आवाज, आक्रमकता आणि समोरच्याला गारद करायची शैली वारकऱ्यांना आवडत नाहीसे वाटते. राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर फार वावरल्याचा हा दुष्परिणाम. मला वाटते, आपल्या परिवाराला प्रेमळ, सात्त्विक, सोशीक तरीही भाविक, असा पवित्रा घेणे जड जाते. आमची बौद्धिके शौर्य, साहसे, लढाया, मात यांचीच असतात. त्याने असे होते का?

तुम्ही अहवाल द्यायला सांगितला म्हणून एवढे लिहू शकतोय. अन्यथा परिवाराच्या शिस्तीबाहेर मी जात नाही.

दिवस सातवा

वारीत पुन्हा सामील झालोय. बव्हंशी वारकरी गडकरीसाहेबांचे फार कौतुक करताना ऐकायला मिळाले. महानायकाची जादू उतरल्यासारखे वाटते. चूकभूल देणे-घेणे. वारीचा अनुभव फारचा विचित्र येतोय. सतत पुढे पुढे जात राहणारा प्रवाह मला अस्वस्थ करतो. कारण सलग एकमार्गी ‘पुरोगामी’ प्रवास वा वाटचाल परिवाराने कधी केल्याचे आठवत नाही. मागे न बघता, मागचे काहीही न उकरता फक्त पुढे पुढे जायचे जरा जड जात आहे. इतके दुष्काळ, पूर, नुकसान, नापिकी अनुभवणारा हा शेतकरी वारकरी काहीच कसे जुनेपुराणे आठवत नाही, याचे आश्चर्य वाटते.

वारीत सारखा ‘माऊलीं’चा गजर चालतो. मला प्रश्न पडला की, ही माऊली म्हणजे आपली प्रिय पितृभू की दुर्गामाता? परंतु खूप शोध घेतल्यावर कळले की, तशी कुणी देवताच नाहीये. माऊली म्हणजे ज्ञानेश्वर. त्यांनी संतपरंपरेचा पाया रचला, जन्म दिला म्हणून त्यांना ‘माऊली’ म्हणायचे. मला हे फार उशिरा समजले. परंतु शंका वाटते की, ही माऊली आणि सनातन परंपरेची भारतमाता यांच्यात द्वैत तर निर्माण होणार नाही ना? आपली माता उभी, सशस्त्र व अवघ्या देशाची. ही माऊली बसलेली, कधी ध्यानस्थ तर कधी ‘ज्ञानेश्वरी’चे लेखन करणारी. शांत आणि करुणामय. ती तर साऱ्या मनुष्यमात्राला उपदेशामृत पाजणारी. म्हणजे राष्ट्र विरुद्ध मानवता, असा संघर्ष उदभवायला नको, असे वाटते.

तुम्हाला वाटत असेल याला वारीत धाडून आगावपणा केला. परंतु सावध व्हायला पाहिजे असे वाटते म्हणून हा प्रपंच. नाही तरी आपली स्वतंत्र वारी आहे म्हणा. ती हेडगेवारी! विठोबाची वारी हेडगेवारी करावयाच्या आपला संकल्प असून मी त्यातला एक छोटासा वारकरी आहे, एवढे ध्यानी असू द्यावे. ‘हेडगेवारी!’ किती छान शब्द सुचला ना? शाखेत गेल्याने बुद्धी अशी सतेज राहते. त्यात तुमच्यासारख्या बौद्धिकप्रमुखाचा आम्हाला सहवास. छान योग आलाय जुळून.

दिवस आठवा

माझे ब्रेनवॉशिंग होतेय की काय, भीती वाटते. अवतीभवती इतके भक्तीमय, उत्साही, सश्रद्ध आणि निर्लेप वातावरण माझा कायापालट करील की काय? कुठे कसा कट नाही की, कारस्थान! कोणात संशय नाही की द्वेष!! इतके कसे लोक सरळ मनाचे अन् निर्विष असू शकतात? मला हे लोक बनाव करतायत असे फार वेळ वाटले. माझा डाव साऱ्यांनी उधळला. कारण मी व माझ्या बरोबरच्या स्वयंसेवकांनी काही मुसलमान वारकरी हेरले अन् त्यांना येता-जाता ‘मियाँ, चाचा, जनाब’ असे संबोधून वेगळे पाडायचा डाव रचला. पण त्यांच्या दिंडीप्रमुखाच्या ते लक्षात आले व त्याने आम्हाला हटकले.

काही डाव्या नतद्रष्टांनी ‘संविधाना’ची दिंडी, पालखी आणली होती. आमच्या गटाने कुरकूर त्यांना अलग पाडता येईल का पाहिले. म्हटले, ‘आज हे आपले संविधान आणतायत. उद्या ‘बायबल’ आणतील, परवा ‘कुराण’ आणतील. मग आपण हिंदू नुसते खांदेकरी व्हायचे की काय?’ थोडी गडबड उडाली. पण ते लोक आपल्याला त्रास देत नाहीत की, वारीत काही विघ्न आणत नाही, या मुद्द्यावर आम्हाला चूप करण्यात आले. मात्र पुढे-मागे हा मुद्दा पेटू शकतो, एवढे लक्षात आणून देतो. धार्मिक पुस्तकांव्यतिरिक्त अन्य काहीही पालखीत मिरवले जाऊ नये, असा कायदा भावी मुख्यमंत्री देवेन्द्रजी यांच्याकडून करवून घ्यावा, ही नम्र सूचना.

दिवस नववा

पहाटे नदीत आंघोळ करताना काहींच्या खांद्यावर जानवी पाहिली. अंगावर सर्रकन काटा आला! सनातन धर्माच्या अशा खुणा कोणतीच आधुनिक परंपरा नष्ट करू शकत नाही, हे जाणवले. माझ्या जानव्याचा मला प्रचंड अभिमान वाटला. गायत्री मंत्र जोरजोरात म्हणत त्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येकाने इशारा करून दटावले. हा आपला कार्यक्रम उधळला न जावा साठीचा संकेत वाटला.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

तुम्ही इतरांना पाठवले आहे, एवढे समजले होते. पण ते इतके असतील, वाटले नव्हते. एक कल्पना सुचतीय. दिंड्या जिथून म्हणजे गावांमधून जातात, तेथील दृश्य असतील अशा मोकळ्या जागा निवडून दिंड्यांच्या सकाळच्या वेळी व सायंकाळी शाखा भरवल्या तर? रस्त्यावरून वारी जात आहे अन् मैदानावर स्वयंसेवकांची शाखा भरली आहे. सारे स्फूर्तीगीते आणि देशभक्तीपर गीते गात आहेत. मोठे पवित्र वातावरण निर्माण झाले आहे. शिस्त, सेवा, राष्ट्रवाद व त्याग या सर्वांचे मोठे विलोभनीय दर्शन या दिंड्यांना होईल. क्षणभर वारीची पावले थबकतील आणि शाखेमधील राष्ट्रप्रेमाचा किंचितसा प्रसाद घेऊन पुढे रवाना होईल… कशीय आयडिया? धर्मकार्य व राष्ट्रकार्य यांचा असा समांतर संसार कधीतरी एक व्हावा. वारीत स्वयंसेवकच स्वयंसेवक असावेत, असा माझा संकल्प आहे. त्याचीच ही एक चुणूक. नाही तरी आपली ही हेडगेवारीच ना!

दिवस दहावा

१८ जुलै तारीख कधी एकदा येते अन् आमचा मुख्यमंत्री कधी विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री या नात्याने करेल असे झाले आहे मजला. माझी सारी स्वप्ने सत्ता मिळाली की, पूर्ण होतील, याची खात्री आहे मजला. एकेक करून सारी देवस्थाने स्वयंसेवकांनी ताब्यात घेतली आहेत. पंढरपूर तेवढे बाकी होते. वेदपाठ शाला, कीर्तनकरांच्या टोळ्या, छोटी मंदिरे आदी आम्ही काबीज केलेच आहे. हळूहळू या संतमंडळींचा डाव्यांनी घेतलेला ताबा सोडवून सर्व संतांना सनातन धर्माशी जोडून घ्यायचे आहे.

यांनी म्हणे थेट भक्त आणि ईश्वर यांच्यात संवाद स्थापन केला. अधलेमधले जे होते, त्यांना म्हणे बाजूला सारले होते. त्यांना म्हणजे पुरोहित, पुराणीक, भटजी, गुरुजी यांना! पण जमले का तसे? अखेरीस बडव्यांची बडदास्त ठेवावीच लागली ना? कितीही आणा कायदे अन् करा कितीही चळवळी… परमेश्वरप्राप्ती करायची असेल तर पूल लागेलच तिथवर जायला. हे संतांचे अनुयायी उडीच घ्यायला निघाले अंगावर ईश्वराच्या. काय तर म्हणे तो सखा असतो!

मधली दोन वर्षे करोनाने वाया गेली आमची तयारीची. नाही तरी योग कसा जुळून आणलाय बघा, परमेश्वराने. इकडे देव, तिकडे देवेन्द्र. माझी निष्ठा फळास येणार. त्यांच्या शपथविधीला अन् विठ्ठलाच्या पूजेला संपूर्ण गणवेषात आमच्या गटाने त्यांनी खडी सलामी देण्याचा निर्धार, आम्ही पंढरपुरात पोचलो की विठ्ठलचरणी करणार आहोत.

टाळकुट्या अन बिनकामाच्या लोकांपेक्षा राष्ट्रभक्त, त्यागी, शूरवीर, आक्रमक सैनिकांची आज खरी गरज आहे. हिरवे विष पसरता कामा नये. भोंग्यांची तोंडे बंद झाली पाहिजेत.

तुमचा आशीर्वाद हवा प. पू. नानासाहेब.

लवकरच भेटू.

आपला नम्र बालक,

अ. ग. निवीर

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा