‘अ‍ॅनिमल फार्म’ : ही कादंबरी उपहास, उपरोध शैलीत राजकीय विडंबन मांडते. लोककथेचं मिथक वापरून एकाधिकारशाही व हुकूमशाही नेतृत्वाचं पितळ उघडं पाडते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘अ‍ॅनिमल फार्म’चे मुखपृष्ठ
  • Sat , 25 June 2022
  • ग्रंथनामा शिफारस अ‍ॅनिमल फार्म Animal Farm जॉर्ज ऑर्वेल George Orwell

साहित्याची भाषा ही लक्षार्थ किंवा व्यंजनार्थ स्वरूपात असते. ती संदेशवहनाचं काम करत असली तरी त्याचं स्वरूप बदलतं असतं. याविषयी वेलेक आणि वॉरेन यांचं मत बोलकं आहे. ते म्हणतात, “शास्त्रीय साहित्याची भाषा ही शुद्ध अभिधात्मक (denotative) असते. त्यातील एका (शब्द)चिन्हाची जागा समतुल्य असे दुसरे (शब्द)चिन्ह घेऊ शकते. निर्दिष्ट वस्तू आणि तद्दर्शक चिन्ह यांत एकास एक संबंध राखला जावा, हा तिचा हेतू असतो. या भाषेचा कल गणिती किंवा प्रतीकात्मक तर्कशास्त्राच्या चिन्हपद्धतीकडे झुकलेला असतो.”

साहित्यिक मात्र या भाषेचा वापर फक्त भाव व्यक्त करण्यासाठी करत नाही, तर तो भावानुभव साक्षात करतो. प्रतिमा, प्रतीक, रूपक, प्राक्कथा या माध्यमांतून तो जे भावविश्व वाचकांसमोर उभा करतो, ते स्थळ, काळ, व्यक्ती पलीकडे जाऊन समकालावरील भाष्य वाटायला लागतं. जॉर्ज ऑर्वेल यांच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या कादंबरीत आजच्या सत्तासंघर्षाचीही रूपकं जाणवतात, ती त्यामुळेच. जॉर्ज ऑर्वेल यांनी या कादंबरीतून साम्राज्यशाही व एकाधिकारशाहीवर कोरडे ओढले. प्रस्तुत कादंबरीत रूपकात्मक माध्यमातून जे सत्तासंघर्ष नाट्य रंगते, ते कोणत्याही काळात समकालीनच वाटायला लागते.

‘टाइम’ या जगविख्यात साप्ताहिकाने निवडलेल्या इंग्रजीतील १०० सर्वोत्तम कादंबऱ्यांपैकी एक असलेली आणि विसाव्या शतकातील सर्वाधिक प्रसिद्ध राजकीय उपहासात्मक कादंबरी म्हणून ‘अ‍ॅनिमल फार्म’कडे पाहिलं जातं. भारती पांडे यांनी मराठीत अनुवाद केलेली ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. जॉय बॅचलर आणि जॉन हलास यांच्या रेखाचित्रांमुळे हा अनुवाद देखणा झाला आहे.

‘ॲनिमल फार्म’ची सुरुवात मनॉर फार्मच्या मि.जोन्सनं यांच्या फार्म हाऊसवर पाळलेल्या प्राण्यांच्या बंडापासून होते. मेजर अनेक उदाहरणं देऊन बंड करणं किती महत्त्वाचं आहे, हे समजावतो. अनेक प्रलोभनं व भविष्यातल्या भव्यदिव्य जगण्याची स्वप्नं दाखवून मि.जोन्स यांच्या विरोधात बंड केलं जातं. मात्र सत्ता संपादन करताच सुरुवातीच्या आश्वासनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं, इतकंच नव्हे तर हेच आपले नियम होते, असं सांगितलं जातं.

या बंडाचं नेतृत्व मेजर करतो. या बंडात मि.जोन्स फार्म हाऊसवरील कुत्री, कोंबडी, कबुतर, गायी, घोडा, शेळी, गाढव, बदक, मांजर हे सर्व प्राणी सामील होतात. मेजर म्हणतो, “आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा कॉम्रेडस, तुमचा निश्चय कधीही डळमळू देऊ नका. कोणत्याही युक्तिवादानं तुमचा रस्ता सोडू नका. माणूस आणि प्राणी यांचं  ध्येय एकच आहे- एकाची भरभराट म्हणजे दुसऱ्यांची भरभराट, असं तुम्हाला कोणी सांगितलं, तर त्यावर कधीही विश्वास ठेवू नका. ते साफ खोटं आहे. माणूस स्वतःखेरीज दुसऱ्या कुणाचेही हित बघत नाही. आणि या लढ्यांमध्ये आपणा सर्व प्राण्यांमध्ये संपूर्ण एकजूट असू द्या. संपूर्ण कॉम्रेडशिप असू द्या. सर्व माणसं शत्रू आहेत, सर्व प्राणी कॉम्रेडस आहेत.” (पृ.३१)

भाषणाच्या शेवटी संघटनेचे काही नियम बनवले जातात. एक गीत, ध्वज व उदघोषणा तयार केली जाते. जोन्स या मालकाच्या मृत्यूनंतर स्नोबॉल व नेपोलियन हे दोन बुद्धिमान तरुण (असा समज अन्य प्राण्यांमध्ये करून दिलेला असतो.) डुक्कर मेजरकडे येतात. नेपोलियन थोरला, काहीसा उग्र दिसणारा, आपल्या मनासारखं करून घेणारा हुशार, तर स्नोबॉल बोलका अधिक कल्पक, परंतु पुरेसा सखोल विचार नसलेला. त्यांचा प्रवक्ता स्क्वीलर चपळ, कर्कश आवाजाचा, बोलून प्रभावीत करणारा आणि काळ्याला पांढरा ठरवण्यात तरबेज असतो.

यांचे सर्वांत निष्ठावान शिष्य (?) बॉक्सर आणि क्लोव्हर दोन घोडे असतात. शिष्यत्व पत्करल्यानंतर ते डोक्याचा वापर करणं सोडून देतात. ‘नेपोलियन नेहमीच बरोबर असतो व आपण नेहमी काम करत राहायचं’ एवढंच त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. अन्य प्राणी व पक्ष्यांना अस्तित्वाची भीती दाखवून आपलं नेतृत्व ताकदवान करण्यात नेपोलियन पटाईत असतो. विशेष म्हणजे अन्य प्राणी व पक्ष्यांना आपणच पूर्वीचे नियम विसरलो आहोत, सध्या आहे हेच बरोबर असेल, हे पटवण्यात नेपोलियन यशस्वी होतो.

दर रविवारी तो सर्वांना मार्गदर्शन करतो. पूर्वीच सगळं कसं चुकीचं होतं, हे सांगून ते सर्व नव्या रूपात बदलून टाकतो. कोबंड्यांसाठी अंडी निर्मिती समिती, गायींसाठी स्वच्छ शेपट्या समिती, उंदीर व सशांसाठी आदिवासी पुनर्शिक्षण समिती, अशा अनेक समित्या स्थापन करून त्यांवर आपली हुकूमत गाजवतो. स्वत: कुठलंही काम न करता इतरांना कामं करायला लावतो आणि त्या बदल्यात त्यांची तुटपुंज्या अन्नावर बोळवण करतो. उलट ‘तुमच्या कल्याणासाठी व सुरक्षिततेसाठी आमची अजिबात इच्छा नसताना व आवडत नसताना पौष्टिक आहार (दूध, सफरचंद इ.) आम्हाला घ्यावा लागतो,’ हे तत्त्वज्ञान इतरांच्या मनात बिंबवलं जातं.

स्नोबॉल वरचढ होतो आहे, हे लक्षात येताच नेपोलियन गुप्तपणे पाळून ठेवलेल्या अतिशय हिंस्र नऊ कुत्र्याच्या मदतीनं त्याला हाकलून देतो. मग ‘तो किती वाईट होता आणि शत्रूपक्षाला जाऊन मिळालेला होता’ हे अन्य प्राणी-पक्ष्यांच्या गळी उतरवलं जातं. सर्वांत ज्येष्ठ असलेलं बेंजामिन गाढव मात्र आपलं कोणतंच मत व्यक्त करत नाही. ते फक्त एवढंच म्हणतं, ‘गाढवं खूप जगतात, तुम्ही कोणीही कधी मेलेलं गाढव पाहिलेलं नसेल’. यावरून ‘कातडी बचाव’ धोरण बाळगऱ्यांची मानसिकता अधोरेखित केली जाते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

नेपोलियन म्हणतो, “शौर्यापेक्षा एकनिष्ठा, शिस्त आणि आज्ञाधारकपणा जास्त महत्त्वाचा असतो. खरा आनंद हा काटकसरीनं राहण्यात आणि खूप काम करण्यात आहे”. शेवटी शेवटी तर ज्या व्यवस्थेला दोष देऊन, टीका करून, चुका दाखवून सत्ता संपादन केली जाते, त्याच व्यवस्थेशी हातमिळवणी केली जाते. माणूस हा आपल्या सगळ्यांचा शत्रू आहे, हे सांगणारा नेपोलियन (डुक्कर) माणसांसोबतच व्यवहार करतो. त्यांच्या गुप्तपणे होणाऱ्या बैठका पाहून “बाहेरचे प्राणी डुकराकडून माणसाकडे बघत होते -माणसाकडून डुकराकडे बघत होते; पण आत्ता त्यांच्यामध्ये वेगळेपण दिसणं- कोण माणूस आणि कोण डुक्कर हे सांगणं अशक्य झालं होतं.” (पृ.१४८) या भयग्रस्त अवस्थेत ही कादंबरी संपते.

१५२ पानांची ही कादंबरी तिच्या रूपकात्मक विडंबन शैलीनं जगप्रसिद्ध झाली. तीत आलेल्या संवादातून मानवी वृत्ती-प्रवृत्तीचे विविध रंग उलगडतात. एकाधिकारशाही व हुकूमशाही या प्रवृत्ती लोकशाही व्यवस्थेत अवतरल्याचा संकेत ही कादंबरी देते. कडवट विनोद व उपहासगर्भ भाषा, ही या कादंबरीची ताकद आहे. ही कादंबरी प्रत्येक राष्ट्रात व राज्यात आपल्या अवतीभवती असलेल्या नेतृत्वाकडे संशयानं पाहायला लावते.

थोडक्यात ही कादंबरी प्रतिमा, प्रतीकं, रूपकं या माध्यमांतून उपहास, उपरोध शैलीत राजकीय विडंबन मांडते. लोककथेचं मिथक वापरून एकाधिकारशाही व हुकूमशाही नेतृत्वाचं पितळ उघडं पाडते.

‘अ‍ॅनिमल फार्म’ (सचित्र आवृत्ती) – जॉर्ज ऑर्वेल

मराठी अनुवाद – भारती पांडे

मधुश्री पब्लिकेशन, पुणे

पाने - १५२

मूल्य – १५० रुपये

..................................................................................................................................................................

हेही वाचा\पहा -

‘अ‍ॅनिमल फार्म’ची पंचाहत्तरी साजरी करण्याचे काही प्रयोजन आहे काय?

दुःस्वप्नासारखी कादंबरी आणि दुःस्वप्नासारखाच वर्तमान

‘1984’ : २०१७ साली वाचलंच पाहिजे असं पुस्तक!

ऑर्वेलच्या अंतरंगाचा वेध घेताना त्याचं व्यक्तित्व आणि साहित्य यांचा संगम साधण्याचा हा प्रयत्न आहे. हे पुस्तक वाचकांना ऑर्वेलशी जोडणारा पूल ठरावं...

हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवण्यासारखं नाही. ‘ऑर्वेलियन’ मते आपल्याला विचार करायला भाग पाडतात...

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते मराठीचे प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......