संदर्भ काय, इतिहास काय, हेतू काय, त्याकडे न पाहता एकदम एका महामानवाचे नाव घ्यायचे, हा कावा झाला…
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • दिल्ली भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि ज्ञानवापी मशीद
  • Thu , 09 June 2022
  • पडघम देशकारण नूपुर शर्मा Nupur Sharma नवीन जिंदाल Naveen Jindal ज्ञानवापी मस्जिद Gyanvapi Masjid भाजप‌ BJP हिंदू Hindu मुस्लीम Muslim

‘नूपुर नूपुर कानुपूर गर्म

काना उपटला, नाही येत शर्म

निंदिले प्रेषिता अन त्याचा धर्म

भारता अवमानिले, भेदिले त्याचे मर्म’

“बाष्कळ, फडतूस, हिणकस…! हे काय काव्य आहे? पोरकट. निव्वळ बालिश!!” असा तीव्र निषेध आम्ही सुविख्यात (आमच्यामुळे) झालेले ज्येष्ठ संघद्वेष्टे यांचा त्यांच्या घरी जाऊन केला. कारण त्यांनी सकाळी सकाळीच आम्हाला या त्यांच्या ओशट ओळी फोनद्वारे धाडल्या होत्या. आम्ही भयंकर भडकलो होतो. तितकेच ते चिवट अन ओशाळवाणे होत आमच्या हाताला धरून बसवू पाहत होते.

श्रीयुत संघद्वेष्टे अलीकडे प्रसिद्धीपिपासू बनत चालल्याचे आमच्या ध्यानी आले होते. थेट संघासारखी प्रसिद्धीपिपासा या सदगृहस्थाने आत्मसात केल्याचे दिसतही होते. भाजपने त्याचे दोन प्रवक्ते एका दमात टपकावले असा त्यांचा दावा होता. आम्ही आक्षेप घेतला. ‘टपकावले?’ हे असे माफिया टोळ्यांचे क्रियापद त्यांनी वापरावे? म्हणजे एन्काउंटर केले असे त्यांना सुचवायचे होते. एकाला म्हणे त्याच्या सदनी पाठवले, तर एकीला निमसदनी. म्हणजे बडतर्फे आणि निलंबन!

आम्ही शिवलिंगाची सततची अवहेलना न सहन होऊन नूपुर शर्माताई जशा बेभान झाल्या व प्रेषित महंमदांच्या व्यक्तिगत आयुष्यावर पिचकारल्या, तसे संघद्वेष्ट्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावलो. पण काहीच सापडेना. एकदम पापभीरू, घाबरट, कातडीबचावू आणि मेणचट माणूस. एकही लफडे आढळेना. ना भानगड, ना गडबड. संघाच्या दंडासारखा सरळ, काळ्या टोपीसारखा तिऱ्हाईत अन चॉकलेटी पाटलोणीसारखा ठेवणीतला घरबश्या.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

................................................................................................................................................................

“बसा, बसा, बसा हो,” असे आर्जव करत संघद्वेष्टे आम्हाला सांगू लागले, “माहिताय आम्ही कवी नाही आहोत ते. आमच्या लेखी काव्य म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, व्ही.पी. सिंग आदी पंतप्रधानांनी त्यांच्या पदामुळे आदबशीर केलेला यमकसंग्रह. कविता म्हणजे एकाखाली एक लिहायच्या चार-पाच शब्दांच्या ओळी आणि ‘ट’ला ‘ट’ जुळवायची केलेली खटपट. पण लोकांना असेच आवडते हो. आता आम्ही पंतप्रधान नसल्यामुळे आमची यमकावली फसते, पण वर्मावर बोट ठेवले की नाही सांगा! या चारोळीत सारा इतिहास उभा केला की नाही? काव्य म्हणजे संक्षेपात सर्व काही असेच केले की नाही आम्ही?”

हे संघद्वेष्टे आता आम्हाला काव्यसिद्धान्त समजावून सांगतायत की काय या भयाने आम्ही त्यांना म्हटले, “कळले, कळले. प्रश्न संघद्वेष्ट्या माणसाला आनंद का झाला अन देशाच्या अपमानामधून तो काय साधू पाहतो, याचा आहे. तुम्ही अशा ‘निसरड्या जिभे’चा म्हणजे ‘स्लिप ऑफ टंग’चा गैरफायदा नको होता घ्यायला…”

संघद्वेष्टे त्वेषाने उसळून म्हणाले, “अपमान मी नाही केला. तुमचा प्रश्न साफ चुकीचा आहे. ज्यांनी तो केला, तो करतेवेळी त्यांना आपला देश का नाही दिसला, असा मूळ प्रश्न आहे. शिवलिंग की कारंजे या वादावेळी महादेव, शिव-पार्वती, भगवान शंकर अशी नावे घेऊन कोणी या देवदेवतांची टवाळी अथवा निंदा केली होती का? पुराणकाळी कोणी काय केले, याची उकराउकरी कोणी केल्याचे ठाऊक आहे का? मी त्या वाहिनीच्या वाटेला जात नसतो. पण रोज चार-सहा पेपर वाचतो. त्यात शिवलिंगाबाबत कोणी पौराणिक दाखले देऊन व्यक्तिगत कृती सांगितल्या असे आढळले नाही.

नूपुरताईंना वादात ओढणारा कोणी दाढीवाला त्याच वेळी मोठ्याने बोलत होता. म्हणून तो नेमके काय म्हणतोय, ते कळले नाही. परंतु ज्या अर्थी त्याला दिलगिरी व्यक्त करावी लागली नाही, त्या अर्थी तो शिवलिंगाबाबत काही धक्कादायक बोललेला नाही. या व आधीच्या चर्चकांनी खूप चिरडीस आणले म्हणून नूपुरताई भडकून पैगंबराच्या व्यक्तिगत आयुष्यात का गेल्या, ते समजले नाही. माणूस चिडला की, व्यक्तीवर आरोप करू लागतो. त्याची उणीदुणी काढू लागतो. जो उत्तर द्यायला हजर नाही, त्याविषयी काही बोलू नये, असा वादशास्त्राचा नियम आहे. ज्ञानवापी मशीद आणि महंमद पैगंबर यांचा थेट संबंध काय? स्त्री म्हणजे पापाची खाण आणि मोहाची जननी, असे ठरवून विवाहापासून लांब राहणाऱ्यांनी असे दुसऱ्याच्या स्त्रियांबद्दल का बरे बोलावे?”

संघद्वेष्टे कळवळून बोलतायत हे दिसल्याने आम्ही आमची चीड गिळून टाकली. संघद्वेष्टे तसे संसारी, एकनिष्ठ सदगृहस्थ. ते स्त्रीद्वेष्टे नाहीत हे आम्ही जाणतो. स्वत:ला स्वयंसेवक म्हणवणारा संघ स्त्रियांच्या संघटनेला ‘राष्ट्रसेविका’ अशी जबाबदारी देऊन टाकतो अन तीही ‘समिती’ अशा निरुपद्रवी नावाने, हे संघद्वेष्टे सतत लक्षात आणून देत असतात, हेही आम्ही जाणून आहोत. तब्बल १० दिवस मोदी सरकार नूपुरताईंच्या टोमण्यांवर मांडी घालून बसले होते. इस्लामी देशांनी प्रेषिताची बदनामी केली, अशी ओरड सुरू केली अन मग नूपुरताईंना आणि त्यांची री ओढणाऱ्या नवीन जिंदाल या दिल्ली प्रदेश प्रवक्त्याला शिक्षा देण्यात आली. म्हणजे सारा मामला आपखुशीने आणि सहमतीने सुरू होता.

१५ राज्यांत मुसलमान व्यक्ती मंत्री नाही. केंद्रीय मंत्रीमंडळातल्या एकमेव मुस्लीम मंत्री पुन्हा सभागृहात सदस्य मिळवायच्या प्रतीक्षेत आहे. जाणीवपूर्वक भाजपने मुस्लिमांना असे सत्तावंचित ठेवले असूनही सरकार धार्मिक भेदभाव करत नसल्याचे पत्रक परराष्ट्र खात्याने काढले. जे धार्मिक अनादर करणारे होते, ते ‘काठावर’चे लोक असल्याचा निर्वाळाही सरकारने दिला. बघा, म्हणजे आपलेच पक्षप्रवक्ते असे सीमावर्ती ठरवून त्यांना हद्दपार करावे, हा केवढा निलाजरेपणा!

हे सारे दुतोंडी राजकारण समजावून घ्यावे, असा बेत मनात शिजत असतानाच संघद्वेष्टे सदहगृहस्थ म्हणाले, “तुम्हाला प्रवक्ता म्हणजे काय, त्याचे काम काय वगैरे काही माहिती आहे का?”

आम्ही म्हटले, “नको! नंतर कधी तरी आमचा अभ्यासवर्ग घ्या. त्यात सांगा. आता तुमची भट्ट तापलेली दिसतीय तर ही नूपुरताईंची भानगडच नीट समजावून सांगा.”

झाले! आम्ही अशी नकळत आमची मान फासात अडकवल्याची जाणीव झाली आम्हाला. संघद्वेष्टे चवताळेच. जणू त्यांच्या अंगात भाजपचे सारे प्रवक्ते शिरले. एकाच वेळी नूपुर, नवीन, तेजिंदर, पूनावाला, केशव उपाध्ये, दरेकर, फडणवीस, सोमय्या बोलू लागल्याचा भास आम्हाला झाला. टीव्हीच्या पडद्यावर या साऱ्या चेहऱ्यांचे बोलके चौकोन उगवून त्यातून ते बदाबदा, भडाभडा आणि कचाकचा काही भाषिक व्यवहार करत असल्याचे आम्ही पाहू लागलो. इतकी अखंड एकाच लयीत, कुजके नासके बोलणारी तोंडे मराठी भाषेला सोसेनात. ती जागच्या जागी थरथरू लागली. तिच्या पायात गोळे आले. डोळ्यांपुढे अंधारी आली. आधारासाठी काही सात्त्विक, सत्यवादी अन सरळ सापडते का, ते ती बघू लागली. अखेर काही दिसेना झाल्यावर ‘दे माय धरणी ठाय’ अशी किंकाळी फोडून ती कोसळली…

संघद्वेष्टे सावरले. तोंडाला आलेला फेस रुमालाने, कपाळावरील घाम हाताने अन डोळ्यांवरचा चष्मा गंजिफ्रॉकने पुसून त्यांनी जरा उसंत घेतली.

आम्ही म्हणालो, “इतके पिसाटायला काय झाले? संघ म्हटले की, पिसाळताच तुम्ही. नीट सांगा.”

संघद्वेष्टे म्हणाले, “मी आता भाजपचे न दिसणारे ज्येष्ठ प्रवक्ता माधव भंडारी यांच्या सुरात बोलतो. ऐका. मीदेखील कधी काळी टीव्हीच्या चर्चांमध्ये एक भागीदार असायचो. सत्ता आल्यावर भाजपच्या प्रवक्त्यांना जणू एक शिकवण दिली गेली. शक्यतो आरंभापासून टिंगलीचा, उडवाउडवीचा व आरोप झटकण्याचा सूर लावायचा. प्रश्नाला उत्तर न देता प्रतिप्रश्न करत राहायचे. समोरच्याला उत्तर द्यायला वेळ मिळू नये, असे वेळकाढू बोलत राहायचे. आपल्याकडे लगेच उत्तर द्यायला सूत्रसंचालकाने वळावे, यासाठी सतत बोट नाचवत ठेवून अस्वस्थता निर्माण करायची. मध्ये मध्ये बोलून एकाग्रता नष्ट करायची. आरोप खरे ठरत असल्याचा अंदाज आला की, व्यक्तिगत पातळी गाठायची आणि ‘तेव्हा तुम्ही कुठे होता?’ असा प्रतिसवाल करून पळ काढायचा. माघार, पराभव किंवा निरुत्तर झाल्याची कधीही कबुली द्यायची नाही. उलट काँग्रेससारख्या पक्षांवर विषयबाह्य आरोप करत मूळ प्रश्नावरून चर्चा दुसरीकडे वळवायची.

चर्चेला प्राध्यापक, लेखक, नट वा अभ्यासक असल्यास त्यांच्या ‘राजकीय अज्ञाना’चा उल्लेख करून आम्ही कसे प्रत्यक्ष राजकारणात असल्याने खरे जाणकार आहोत, असे भासवत राहायचे. एखादे विश्लेषण वर्मी लागले की म्हणायचे, ते त्यांचे मत आहे. म्हणजे त्या विश्लेषणाचा व्यापक आणि सर्वमान्य स्वीकार रोखायचा. भाजपवर टीका सुरू झाली की, काँग्रेसवाल्यांना ‘हे तुम्ही कधी का नाही बोललात?’ असा आरोप करून प्रश्नकर्त्याविषयी संशय उत्पन्न करायचा. सर्व चर्चा कायम काँग्रेस विरुद्ध भाजप, अशा द्वंद्वात घुमवायची. काँग्रेस, डावे वा अन्यांना श्रेय मिळू द्यायची नाही.

ही शैली निर्मला सीतारामन ज्या वर्षी भाजपच्या प्रवक्त्या बनल्या, तेव्हापासून रुजली. उगाचच आक्रमक होत प्रश्नकर्त्याला नामोहरम करायचे. टोमणे मारून प्रश्नकर्त्या पत्रकाराची बुद्धी काढायची. अडचणीचा प्रश्न बेशरमपणे टाळून ‘नेक्स्ट’ म्हणत आपल्या मर्जीतल्याला संधी द्यायची. थोडक्यात, आपण व आपला सत्ताधारी पक्ष अचूक, निर्दोष, सत्य आणि पवित्रतम आहे, असा आवेश उत्पन्न करत राहणे, म्हणजे या टीव्हीवरच्या चर्चा, पत्रकार परिषदा होत राहिल्या.

नूपुर शर्मा या मंडळींचे अवलोकन करत पुढे आल्या. एकंदर ‘प्रश्नाला उत्तर द्यायचे’ या संस्कृतीऐवजी ‘प्रश्नकर्त्याला गप करायचे’, या संस्कृतीत त्या वाढल्या. त्यामुळे चर्चा कुस्तीत पालटवून टाकणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या त्या लाडक्या बनल्या. उत्खनन, संशोधन, परीक्षा या तज्ज्ञांच्या ताब्यातल्या विषयांतही त्या बेफामपणे उतरल्या आणि एका क्षणी बेभान होऊन भारताला मान खाली घालायला लागेल, असे बोलून गेल्या.”

संघद्वेष्टे फारच अचूक बोलतायत हे लक्षात आल्यावर आमच्या अंगात असंख्य प्रवक्ते शिरले. या माणसाला कसे आडवे करायचे, याचा विचार खास संघपद्धतीने आम्ही करू लागलो. लगेच एक वैयक्तिक मुद्दा सापडला. मोठ्या विजयी मुद्रेने संघद्वेष्टे आपले विवेचन थांबवताच आम्ही त्यांना टोकले. म्हणालो, “आम्ही जेव्हा जेव्हा तुमच्या घरात प्रवेशतो, तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीच्या प्रश्नांना याच थाटात उत्तरे देताना आम्ही पाहतो. हे घर तुम्ही एखाद्या वृत्तवाहिनीचा स्टुडिओ बनवलाय की काय? तुमच्या मिसेस सतत थोबाड फुटलेल्या, अवमानित अन अवाक अशा स्थितीत आम्हाला आढळतात. थोडक्यात त्यांचा पुरता पत्रकार झालेला आम्हाला बघायला मिळतो! तुमच्यासारख्या आघाडीच्या संघद्वेष्ट्याने चक्क संघवाल्यांची नक्कल करावी?”

आमच्या या खोडसाळपणाकडे साफ दुर्लक्ष करत अतुल भातखळकर यांच्या खवट स्वरात संघद्वेष्टे सांगू लागले, “अहो, एक राह्यलेच. नूपुरताईंना टिळक-आगरकर यांचे मतभेद बालविवाहाच्या मुद्द्यावर झाल्याचे नक्की ठाऊक नसणार. मुलींच्या विवाहाचे वय ७-८-९ याऐवजी वयात आल्यानंतरच्या वयात करावे असे गोपाळ गणेश आगरकर यांचे म्हणणे होते. संमतीवयाच्या कायदा लागू करायला ते सांगत होते. लोकमान्यांना हा कायदा आपल्या हिंदू संस्कृतीत नको तो हस्तक्षेप वाटला. त्यांनी विरोध केला. त्यामुळे नूपुरताईंनी पैगंबराबद्दल जी टीका केली, ती जशीच्या तशी त्या काळच्या हिंदूंवरही लागू होऊ शकते.

१२५ वर्षांपूर्वी तर अशी जरठ-बाल लग्ने महाराष्ट्रात व भारतात प्रचंड होत. खेरीज दोन-तीन बायका करण्याचीही मुभा पुरुषांना होती. १९२५ साली रा.स्व.संघ स्थापन झाल्यावरही ही प्रथा चालूच होती. ‘उंच माझा झोका’ ही मालिका बघा म्हणावे नूपुरताईंना. न्यायमूर्ती रानड्यांनी अशाच एका नऊ वर्षांच्या बालिकेशी विवाह केल्यावर पुण्यात कोणी कोणी आवाज उठवला, ते कळेल त्यांना. उगाच प्रेषितांना का मध्ये ओढता? संदर्भ काय, इतिहास काय, हेतू काय, त्याकडे न पाहता एकदम एका महामानवाचे नाव घ्यायचे, हा कावा झाला. बाय द वे, तुम्ही अजून कारे कसे काय? तुम्ही विवाहबद्ध कधी होणार?”

मराठी पत्रकारांच्या भयंकर नाजूक दु:खावर संघद्वेष्ट्यांनी असे जोवर लावून बोट ठेवले की, आम्ही कळवळलो. आमचा पगार, आमची मुस्कटदाबी अन अंधारलेले भवितव्य आम्हाला गृहस्थाश्रमात प्रवेश देत नाही, हे सर्वांना कळाल्याने तर आम्ही आणखी हळहळलो. अलीकडचा प्रसंग. आमच्याविषयी अनुकंपा वाटून आमच्या एका वर्गमैत्रिणीने तिच्या पुतणीचा व आमचा संवाद एका कॅफेत घडवला. आम्ही जरासे हुश्श होतो न होतो तोच समोरच्या तरुणीने आमच्या पुढ्यात एक दुपानी प्रश्नावली ठेवली. थंड पाणी पित आम्ही ती वाचू लागलो अन तेवढ्यात एक प्रश्न आमच्या कानावर आदळला.

त्या म्हणाल्या, “त्या संघद्वेष्ट्याला तुम्ही एवढी प्रसिद्धी का देता? आपल्या महान संस्कृतीच्या महान देशाची आणि तितक्याच महान मोदीजींची बदनामी ते सतत करतात. तुम्हाला ती ऐकवते तरी कशी? तो म्हातारा कायम हिंदूंच्या वाईटावर टपलेला असतो अन तुम्ही त्याला डोक्यावर चढवून घेता? काय लायकी काय त्याची?”

“अहो, असे अरे-तुरे-एकेरीवर काय येताय? ज्येष्ठ अभ्यासक अन संशोधक आहेत ते. संघपरिवारावर टीका करतात ते… त्यांचा हक्क आहे तो. तुम्हाला आवडत नसेल तर दुर्लक्ष करा.”

आम्ही स्टुडिओतल्या हल्ल्याला तोंड देणाऱ्या एखाद्या सरावलेल्या विरोधी पक्षप्रवक्त्याप्रमाणे तडजोडीचा सूर काढला. काय करणार, संधी फार दिवसांनी आली होती!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

‘सिक्युलर, लिबटार्ड, अर्बन नक्सल’, असे शब्द सटासट बाहेर पडून आमच्या कानाचा वेध घेऊ लागले, “तुम्ही पत्रकार असे दुतोंडी, ढोंगी वागता. राष्ट्रद्रोही आणि हिंदूनिंदकांना तुमच्याकडे नेहमी जागा असते. त्यांना तुम्ही हमेशा चर्चांना बोलावता. सुरुवात आणि समारोप त्यांच्यापासून करता. म्हणजे चर्चेला एक वळण मिळेल असा तुमचा डाव. तुम्ही काँग्रेसला विकले गेलात. शरद पवार तुम्हाला दरमहा पाकिटे पुरवतात, ठाऊक आहे आम्हाला. देवेनभावजींनी तुमचे संपादक बदलले, विषय तर तेच रोज ठरवतात. चर्चेतल्यांची नावे त्यांच्या होकाराशिवाय मंजूर होत नाही म्हणून बरेय. नाही तर तुम्ही डाव्यांनी शिल्लक ठेवला नसता हा भारत.”

‘एक मिनिट, एक मिनिट’ करत आम्ही समोरच्या तोफेला थांबवले, “आपला धड परिचय व्हायच्या आधीच तुम्ही एकदम चढाई केलीत मॅडम. का? एवढ्या संतापल्या का?” अशी नम्र विचारणा आम्ही पुन्हा मविआमधल्या पडखाऊ काँग्रेस मंत्र्याप्रमाणे केली. फक्त नैतिक क्षोभ आणि तात्त्विक पंचाईत आम्ही सुरातून सूचित केली.

“मी टिपूर… अभाविपची प्रवक्ता. अखिल भारत विद्यामर्दिनी परिषदेची स्पोक्सपर्सन!....”

भयंकर कंप सुटलेला, घशाला कोरड पडलेली… कसेबसे ‘सॉरी सॉरी’ म्हणत आम्ही कॅफेबाहेर पळालो.

पाणीच प्यायलो होतो. बिलाचा मुद्दा नव्हता, म्हणून निभावले…

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा