२०००च्या सुरुवातीला आयटीमध्ये काम सुरू केलेल्या पिढीने आयुष्यात नक्की काय मिळवले? गुलामगिरी!
पडघम - तंत्रनामा
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 01 June 2022
  • पडघम तंत्रनामा आयटी IT अमेरिका America माहिती तंत्रज्ञान Information Technology आयटी उद्योग It industry

Passed by Congress on January 31, 1865, and ratified on December 6, 1865, the 13th amendment abolished slavery in the United States and provides that “Neither slavery nor involuntary servitude, except as a punishment for crime whereof the party shall have been duly convicted, shall exist within the United States, or any place subject to their jurisdiction.”

अमेरिकन संविधानातील ही १३वी दुरुस्ती १८६५ साली गुलामगिरी संपली, असं सांगते, मात्र कायद्यानं संपली तरी गोऱ्या मनातील वर्णद्वेषाशी संबंधित गुलामगिरी अजूनही अबाधित आहे आणि अनेक प्रकारे ती प्रकट होत असते. अमेरिकेत एके काळी कापूस व तंबाखूच्या शेतात काम करणारे गुलाम आणि सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय अभियंत्यामध्ये काही साम्यस्थळं जाणवतात का? या वाक्यामुळे अनेकांना राग येईल, पण भारतीय माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंत्यांची स्थिती बघून अमेरिकेतील गुलामगिरी अजूनही संपलेली नाही, याचा प्रत्यय येतो.

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीयांची अजूनही मक्तेदारी आहे. तिची सुरुवात ९०च्या दशकात झाली. ‘चिप लेबर’ या प्रकारात मोडणाऱ्या या नोकऱ्या आउटसोर्सिंग या व्यवसायात ८०च्या दशकात सुरू झाल्या. त्याची भरभराट ९०च्या दशकात झाली. १२+४ व १२+३ शिक्षण असणाऱ्यांना गणिताचं माफक ज्ञान होतं, पण त्यांना या व्यवसायात प्रचंड मागणी होती. अमेरिकेतील शिक्षण पद्धतीमुळे उच्चशिक्षण घेतलेले अभियंते एवढ्या कमी पैशात काम करणं अशक्य होतं, ज्याचा फायदा भारतीयांना झाला.

या नोकर्‍यांमध्ये बुद्धीला चालना देणारं असं विशेष काही नव्हतं, मात्र डॉलर्समध्ये पैसा येत असल्यानं भारतीयांना याचा मोह पडला. २०००च्या सुरुवातीपासून उच्चशिक्षित IIT व IIM झालेल्या भारतीयांचं एकमेव लक्ष्य अमेरिकेत जाऊन नोकरी मिळवणं आणि तिथंच स्थायिक होणं हे होतं. त्यासाठी काहीही सहन करायची तयारी होती.

अमेरिकेतलं वातावरण, भारतीयांना (अजूनही) मिळणारी दुय्यम वागणूक, भेदाभेद, कामाच्या ठिकाणचा छळ, या सर्व सहन करत एक पिढी ‘अमेरिकन ड्रीम’च्या मागे गेली २२ वर्षं धावत आहे. चाळिशीत आलेली ही पिढी अजूनही ढोरकाम करते. अमेरिकेतून परत आलेल्या ओळखीच्या लोकांचे अनुभव ऐकले की, एकटेपणा, चिंता, नाकारले गेल्याची भावना, याची जाणीव होते.

अमेरिका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अव्वल असली तरी उच्च गुणवत्तेचा टोकाचा ध्यास, त्यातून निर्माण होणारा विक्षिप्तपणा, याचा उदो उदो अख्ख्या भारतात मोठ्या प्रमाणावर होतो. गेली अनेक वर्षं स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स व सध्या एलन मस्क यांचे पोवाडे गाण्यात धन्यता मानणारी भारतीय जनता त्यांची काळी बाजू बघायला घाबरते.

अमेरिकेत माहिती तंत्रज्ञानात काम करणाऱ्या भारतीयांना कॉन्ट्रॅक्ट धर्तीवर खूप काम करावं लागत. तिथं नागरिकत्व मिळवणं सोपं नाही. त्यामुळे एक दिवस जरी नोकरी नसली तर अमेरिकेत निभाव लागत नाही. अमेरिकन समाज चंगळवादी आहे. उगवत्या सूर्याला सलाम करणाऱ्या समाजात अपयशाला जागा नसते. कॉन्ट्रॅक्ट धर्तीवर नोकऱ्या असल्यानं एका विशिष्ट वयानंतर नोकरीसाठी वणवण करणं दुर्दैवी व अपमानकारक आहे. संचालकपदापर्यंत पोहोचलेल्या लोकांसाठी आयुष्य सुखकर आहे, अन्यथा वर्षानुवर्षे प्रोग्रामिंगचा जॉब करणं शक्य नाही. पन्नाशी पार झालेल्यांना नोकरी मिळत नाही, कारण अमेरिकेत ‘वयवाद’ (ageism) प्रचंड आहे.

उच्चशिक्षणासाठी कर्ज काढून अमेरिकेत काम करणाऱ्या लोकांची सुरुवातीची चार-पाच वर्षं ते कर्ज फेडण्यात जातो. त्यांनतर लग्न, मुलं व आयुष्य जगताना बहुतेकांची बचत होत नाही. स्वतःचं घर घेणं प्रचंड महाग आहे. लहान मुलांना सांभाळायला आजी-आजोबा नसतील, तर त्या आईला नोकरी सोडणं भाग असतं. पूर्वी गंमतीनं अमेरिकेत मुलगी लग्न करून जातेय म्हटलं की, ती ‘DBM’ करतेय म्हणजे धुणं, भांडी व मुलं असा अर्थ व्हायचा! तिथं जाऊन मुलांकडून लग्नानंतर फसवणूक झाल्याच्या खूप केसेस आल्यानंतर २०१०नंतर अमेरिकेची क्रेझ कमी झाली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रत्येक वेळी पालकांना नेणं शक्य नसतं. त्यामुळे बऱ्याच लोकांचे वृद्ध पालक भारतात एकटेच आयुष्य जगतात, काही वेळा तर एकटेच प्राणसुद्धा सोडतात. जे पालक तिकडे राहतात, त्यांना तिथलं वातावरण सहन होत नाही. नातवांची भाषा न कळल्यानं त्यांच्याशी संवाद होईलच, याची शाश्वती नसते. अल्पसंख्याक असल्यानं सामाजिक सुख फारसं वाट्याला येत नाही. अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना साधारण बालपण मिळणं कठीण असतं, कारण त्यासाठी हवा असलेला सामाजिक पाठिंबा व सुरक्षित वातावरण मिळत नाही.

मुळात अमेरिकन ‘वापरा व फेका संस्कृती’कडून बालपण, संस्कार वगैरे गोष्टींची अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. तिथं नुकत्याच झालेल्या शाळेतील गोळीबारात १९ लहान मुलं मारली गेली. त्यावरून अमेरिकन संस्कृती ही वर्णद्वेष व वंशद्वेष अजूनही विसरली नाही, हेच दिसतं. ‘मिनारी’ नावाच्या एका कोरियन चित्रपटात स्थलांतरित कोरियन कुटुंबाची कथा ही सर्वच स्थलांतरित लोकांची व्यथा दर्शवते.

डॉलर्समध्ये मिळणारं उत्पन्न व अमेरिकेन संस्कृतीचा मोह हा अनेकांना अक्षरश: वेड लावतो. अमेरिकेचा स्टॅम्प पासपोर्टवर आल्यानं भारतातील सामाजिक प्रतिष्ठा, विशेष करून मुलांना लग्नाच्या बाजारात मिळणारा भाव, या गोष्टीमुळे अमेरिकेत जाण्यासाठी भारतीय लोक तडफड करतात. पण फार कमी हुशारीनं काही वर्षं काम करून भारतात परत येतात, मात्र अनेकांना परत येणं अपमानकारक वाटतं.

भारतात काम करणारे आयटी अभियंते हेसुद्धा बऱ्यापैकी पैसे कमवत असले तरी आनंदी आयुष्य जगत नाहीत. पैशानं सुख मिळवता येतं, पण समाधान व आनंद मिळत नाही. एक उद्योग म्हणून दर्जा नसल्यानं आयटीमध्ये कामगार संघटना नाहीत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी मिळणारा पगार, सुविधा, या समान नाहीत. औद्योगिक आरोग्य (Occupational Health) संबंधित सोयी नाहीत. ४०च्या वर गेलेल्या लोकांना भारतातील आयटी उद्योगात काम मिळत नाही, हे कटू सत्य आहे. कारण त्यांना मिळणारा पगार. त्यापेक्षा कमी पगारात अर्ध्या वयाच्या लोकांकडून काम करून घेता येतं, घेतलं जातं. त्यामुळे भारतात आयटी उद्योगात कामाची अ-मानवीय संस्कृती आहे. तिचा भर फक्त देखाव्यावर आहे.

भारतीय आयटी उद्योगात काम करणार्‍या लोकांना tangible output म्हणजे त्यांनी तयार केलेल्या मालाला/वस्तूला हातानं स्पर्श करता येत नाही. जे काम येतं ते तुकड्यात येतं, त्याचा अंतिम परिणाम हातानं स्पर्श करता येत नाही. त्यामुळे कामातून मिळणारं समाधान कमीच असतं. त्यामुळे अनेक जण (ज्यांना जाणीव आहे) एवढे पैसे कमवूनसुद्धा काहीतरी कमी आहे, हे बोलून दाखवतात.

कामगार संघटना नसल्यानं कंपनी सोडली की, कर्मचाऱ्यांचा एकमेकांशी विशेष संबंध राहत नाही. त्यामुळे सौहार्द ही भावना अत्यंत अल्प प्रमाणात आहे. त्यामुळे एकटेपणा व आत्महत्या यांचं प्रमाण आयटीत फार आढळून येतं. एकंदरीत मनुष्यबळ विभागाची काम करण्याची पद्धत समाधानापेक्षा adrenaline rushच्या भोवती फिरते. त्यातून चटकन आनंद मिळतो, पण दीर्घकालीन समाधान मिळत नाही. मानसिक व शारीरिक आरोग्याबद्दल भारतीय आयटीत विशेष सुविधा नाहीत. ज्या आहेत त्या नावापुरत्या.

अमेरिकन लोकांसाठी काम करताना त्यांच्यासारखं व त्यांना खुश ठेवण्यासाठी स्वतःची सांस्कृतिक ओळख बदलतानासुद्धा अनेकांना त्रास होतो. एकसुरी व रटाळ काम, यातून सुटका म्हणून विचित्र गोष्टी केल्या जातात. त्यात प्रेमप्रकरणंसुद्धा येतात. बरेच आयटीवाले वयाच्या पस्तिशीनंतर ‘आयर्न मॅन’ वा अशा इतर स्पर्धात्मक खेळांत हौसेनं भाग घेतात, ज्याचा मूळ उद्देश रटाळ आयुष्यातील विरंगुळा शोधणं हा असतो.

आयटी कंपन्या या पुणे, बंगलोर, हैदराबाद, गुरगावं यांसारख्या ठिकाणी एकवटल्यामुळे भारतातील सर्व दिशांतून लोक येऊन या शहरात स्थिरावले आहेत. त्यामुळे सगळा भार या शहरांवर आलाय. स्थलांतरित लोकांना दुसर्‍या शहरात काम करताना ज्या सामाजिक, भावनिक व शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळे आनंदी व समाधानी आयुष्य त्यांच्या वाट्याला येत नाही. या आयुष्याची प्रेरणा ईएमआय म्हणता येईल इतकं एककल्ली आयुष्य स्थलांतरित लोक जगतात.

स्वत: स्थलांतरित असल्यानं या सर्व प्रकारच्या त्रासातून मी गेले आहे. बाहेरून आलेल्या लोकांना कितीही वर्षं काढली तरी या शहराचे रहिवासी म्हणून ओळख मिळत नाही आणि त्यांचं स्वत:चं शहर/गावसुद्धा परकं होतं.

२०००च्या सुरुवातीला काम सुरू केलेली ही पिढी चाळिशीला आहे. त्यांची मुलं आता पौंगंडाअवस्थेत आहेत. या मुलांचं बालपण अमेरिकेत मोठ्या झालेल्या भारतीय मुला-मुलींपेक्षा वेगळं नाही. पाळणाघरात बालपण गेलेल्या या पिढीला नाती माहीत नाहीत. मोबाईल त्यांना सगळ्यात जवळचा वाटतो. तुटक, भावनिकदृष्ट्या बधिर म्हणता येईल इतकी या मुलांची अवस्था केविलवाणी आहे. एका निरीक्षणानुसार आयटीमध्ये पालक असणार्‍यामु-मुलींत स्वमग्नता म्हणजे ऑटिझमचं प्रमाण विशेष दिसून येतं. नात्यांची सुरक्षितता न अनुभवल्यानं मानसिक आरोग्याचे प्रश्न पालक व त्यांचे पाल्य यांच्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. पहा - 

https://www.theatlantic.com/international/archive/2013/10/behind-the-bad-indian-coder/280636/

गेली १६ वर्षं मी भारतीय आयटी उद्योगाशी संबंधित आहे. माझा स्वानुभव आहे की, आयटीच्या ग्लॅमरने बहुतेकांचे डोळे दिपले आहेत. त्यामुळे व स्वत:ला उच्च, बुद्धिमान समजणारी ही मंडळींना आपण जे करत आहोत, त्याचा आपल्यावर व त्या अनुषंगानं आपल्या कुटुंबावर व समाजावर काय परिणाम होतो, याचा विचार करवत नाही. आणि ही त्यांची शोकांतिका आहे.

२०००च्या सुरुवातीला आयटीमध्ये काम सुरू केलेल्या या पिढीने एवढे पैसे कमावून आयुष्यात नक्की काय मिळवले, हे येत्या दहा वर्षांत कळेल.

.................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत मानसशास्त्रज्ञ आहेत.

vrushali31@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा