‘‘व्यक्तींच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्या संबंधी उपायांची चर्चा” करणारे र. धों. कर्वे आणि त्यांचे ‘समाजस्वास्थ्य’
पडघम - सांस्कृतिक
मुकुंद टाकसाळे
  • र. धों. कर्वे यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची काही मुखपृष्ठे
  • Fri , 27 May 2022
  • पडघम सांस्कृतिक र. धों. कर्वे Raghunath Dhondo Karve समाजस्वास्थ्य Samaj Swasthya लैंगिकता Sexuality अश्लीलता Obscenity

र.धों. हे काळाच्या पुढचा विचार करणारे होते, हे ‘समाजस्वास्थ्य’च्या पानापानांतून स्पष्टपणे दिसते. त्यांचे विचार आजच्या काळातही तेवढेच महत्त्वाचे आहेत. ‘समाजस्वास्थ्य’चे अंक सहजी उपलब्ध नाहीत. र.धों.च्या बुद्धिवादाशी नातं सांगणार्‍या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ने https://radhonkarve.com या संकेतस्थळाद्वारे ते अंक वाचकांना- अभ्यासकांना उपलब्ध करवून देण्याचे ठरवले आहे. ३० मे २०२२ रोजी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांच्या उपस्थितीत या संकेतस्थळाचे उद्घाटन पुण्यात होत आहे. या संकेतस्थळाचा वाचकांनी अवश्य लाभ घ्यावा.

..................................................................................................................................................................

र.धों. कर्वे यांच्यासारखा बुद्धिप्रामाण्यवादी आणि कृतिशील विचारवंत शतका-शतकांत एखादाच जन्मतो. त्यांनी जुलै १९२७मध्ये ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. पहिल्या अंकातच त्यांनी आपला उद्देश स्पष्ट केला होता.

‘‘व्यक्तींच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्या संबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषत: ज्या विषयांसंबंधी लेख छापण्यास इतर पत्रकार लाजतात किंवा भितात असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्या संबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकांस अतिशय अडचण पडते व ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. यात केवळ तत्त्वज्ञानाचा खलच न करतां व्यवहारो पयोगी माहितीही दिली जाईल.

‘कामशास्त्र’ या शब्दाचा दुरुपयोग झालेला आहे, तरीही ‘कामवासनेचा वा शास्त्रीय दृष्टीने विचार’ अशा अर्थाने हा शब्द वापरणें आम्हांस भाग पडत आहे. याबद्दल कोणासही क्षुब्ध होण्याचे कारण नाही…”

र.धों.नी जो ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाचा उद्देश सांगितला होता, त्या उद्देशाची पूर्ती करण्यासाठी त्यांनी अक्षरक्ष: हयात वेचली. २६ वर्षं ४ महिने त्यांनी मासिक चालवले. शेवटचा अंक त्यांच्या मृत्युनंतर लोकांच्या हाती पडली. १९५३मध्ये त्यांच्या मृत्युनंतरच हा अंक बंद पडला.

र.धों.च्या ठायी स्वकार्याविषयी निष्ठा पुरेपूर होती. त्यासाठी त्यांनी अंकांमध्ये स्वत: भरपूर लेखन केले. देशपरदेशांतले कामशास्त्राविषयीचे आधुनिक संशोधन वाचकांपर्यंत पोहोचवले. त्यासाठी त्यांनी अफाट वाचन केले. अंगी विनोदबुद्धी होती. त्यामुळे र.धों.च्या नव्या विचारांवर तुटून पडणाऱ्या सनातन्यांची खिल्ली उडवण्यात आणि त्यांना निरुत्तर करण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नव्हता. प्रतिगाम्यांच्या त्रासापायी त्यांना वारंवार कोर्टकचेऱ्याही कराव्या लागल्या. तो मनस्ताप त्यांनी सोसला याला एकमेव कारण म्हणजे आपण जे कार्य करत आहोत, त्याचं महत्त्व त्यांना पुरेपूर ठाऊक होतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्यांनी द्रष्टेपणाने संततिनियमनाचे महत्त्व ओळखले होते. त्याबाबत प्रत्येक अंकात काही ना काही उपयोगी मजकूर ते देत असत. पण एवढेच करून ते थांबले नाहीत. त्यासाठी त्यांनी संततिनियमनाची साधनं विकली, औषधं विकली, लोकांना इष्ट तो सल्ला दिला. संततिनियमनांच्या साधनांची माहिती देणं हा ज्या काळात अमेरिकेतील संयुक्त संस्थानातील कायद्यांप्रमाणे आणि फ्रान्समधल्या कायद्यांप्रमाणे गुन्हा होता, त्या काळात र.धों. हे निर्भीडपणे कार्य करत होते.

‘ब्रह्मचर्य’ या मुद्द्याबाबत त्यांचा गांधींजीशी कायमचा वाद होता. ते सारे युक्तिवाद मोठे मजेशीर आहेत. ‘ब्रह्मचर्य’ ही अनैसर्गिक गोष्ट आहे, असे त्यांचे ठाम मत होते. ‘ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश हाच मृत्यू’ हा गैरसमज तरुणांच्यात पसरवून त्यांच्यात घबराट निर्माण करणार्‍या स्वामी शिवानंदांनी र.धों.ना काहीतरी शिवीगाळ करून उत्तर दिलं, तेव्हा त्यावर र.धों.ची प्रतिक्रिया होती, ‘‘दाढिमत्तेच्या जोरावर गालिमय वटवट करणार्‍या या अहंमन्य स्वामींची दया येते. गरीब विचारे स्वामी! त्यांची पत्नी नुकतीच निवर्तल्यामुळे त्यांचे डोके फिरले आहे असे समजते. अशा तात्पुरत्या ब्रह्मचर्यानंही ज्यांची इतकी शोचनीय स्थिति होते, त्यांचं ब्रह्मचर्य दांडगेच असले पाहिजे! स्वामी मजकुरांनी स्वतःचे नांव ‘शिवानन्द’ याऐवजी ‘शिव्यानंद’ ठेवल्यास अन्वर्थक तरी होईल! शिव्यानंदांनी केलेली निंदा ही आमच्या मते स्तुतीच आहे.’’

पुढे र.धों. असेही नोंदवून ठेवतात, ‘‘गतानुगतिक लोकांस आणखी एक गोष्ट सांगावयाची म्हणजे महात्मा गांधींनी कृत्रिम संततिनियमनाचे विरुद्ध मत दिले असतांही कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनीं आपले अनुकूल मत अमेरिकेतील ‘बर्थ कन्टोल रिव्हयू’चे मार्फत सर्व जगास जाहीर केले आहे.’’

र.धों.चे लेखन कळायला अत्यंत सोपे आहे. त्यांची शैली समजावण्याची आहे. त्यासाठी ते तर्कशुद्ध आणि बुद्धिगम्य युक्तिवाद करतात. त्यांच्या मदतीला कायमच त्यांची विनोदबुद्धी हजर असते. ‘उपहास’ हे तर त्यांचे हुकमी हत्यार. पण त्या बाबत त्यांचा दृष्टीकोन किती खेळकर आहे ते पाहा. ते म्हणतात, ‘‘पारंपरिक मतांची आम्ही चेष्टा करतो म्हणून काही लोक आम्हांस नांवें ठेवतात. याबद्दल आम्हांस इतकेंच सांगायचें आहे की, कांही बाबतीत तरी पारंपरिक मतें बदलण्याची जरूर सर्वांस भासतेव ती बदलण्याचा प्रयत्न जर कोणास करणे असेल तर तेथें युक्तिवादापेक्षां उपहासच जास्त उपयोगी आहे असे आमचें मत आहे. परंपरेंत वृद्ध झालेले लोक अर्थातच उपहासाला दाद देणार नाहीत, परंतु ज्यांची मतें अजून कायम झालेली नाहीत, अशांवर त्याचा परिणाम खात्रीने होतो. पारंपरिक लोक काय थोड्या वेळां नवीन मतांची टर उडवण्याचा प्रयत्न करतात? आमच्या मतांची चेष्टा करण्याचा त्यांस जितका हक्क पोचतो, तितकाच त्यांच्या बाबतीत आम्हांस पोचतो. आणि हा हक्क दोघांसही असला पाहिजे असेच आमचे म्हणणे आहे. पारंपरिक बाजू लंगडी असल्यामुळे त्यांस कोर्टाकडे धांव घ्यावी लागते, व पारंपरिक जज्ज भेटल्यास आम्हांस शिक्षाही होते. अर्थात् हा न्याय नाहीं, व हायकोर्टाने आमचा अर्ज काढून टाकला हा त्याहीपेक्षा अन्याय आहे. अशा रीतीने नवीन मतांस विरोध झाल्यामुळे सर्व देशांत प्रगतीस नेहमी अडथळा होत असतो, तो हिंदुस्थानांतच का नाही होणार?’’

संततिनियमनाच्या प्रचाराबरोबरच त्यांनी आणखी एक गोष्ट आवर्जून सांगितली, ती म्हणजे लैंगिक सुखाचा हक्क पुरुषांप्रमाणे स्त्रीलाही आहे. स्त्रीला- मग ती विधवा असो वा कुमारिका, विवाहित असो वा अविवाहित, तिला लैंगिकसुख घेण्याचा हक्क आहे. हे विचार त्या काळात सनातन्यांच्या पगडीच्या झिरमिळ्या थरथरवणारे होते. लैंगिक स्वातंत्र्याचा मुद्दा आजही इतक्या वर्षांनंतरही किती जणांना मानवेल, ही शंकाच आहे. या बाबतीतले त्यांचे विचार अत्यंत मूलगामी असून ते मुळातून वाचण्यासारखे आहेत. र.धों. नग्नतेचे पुरस्कर्ते होते. त्यामुळेच त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’च्या मुखपृष्ठावर आवर्जून नग्न स्त्रियांची मुखपृष्ठे छापली.

या ‘कामस्वातंत्र्या’चे समर्थन करताना ते समाजातले अनेक गैरसमज दूर करायचे. उदाहरणच द्यायचे झाले तर पहिल्याच वर्षाच्या पहिल्याच अंकात त्यांनी ‘स्त्रीसुलभलज्जा’ ही कशी ‘स्त्रीसुलभ’ नसून तिच्यावर लादली गेलेली आहे, हे स्पष्ट केलेले आहे. ते नग्नतेचे पुरस्कर्ते होते. स्त्रियांचे कोणकोणते अवयव लज्जास्पद मानावेत, या बाबत निरनिराच्या देशांत निरनिराळ्या विचित्र समजुती आढळतात. कुठे चेहरा तर कुठे पोट दाखवणे असभ्य मानतात. तेव्हा अशा गोष्टींबाबतही सर्व देशांत एकमत आढळत नाही. नग्नतेत अश्‍लील काहीही नाही, हे पटवून देण्यासाठी समाजस्वास्थ्याच्या अंकांमध्ये त्यांनी किती तरी लेख लिहिलेले आहेत. देशाविदेशांतली उदाहरणे दिलेली आहेत.

‘‘प्रजोत्पादनासंबंधी मुलांमुलींस खरी माहिती द्यावी कीं नाहीं व द्यावयाची असल्यास ती कोणीं, केव्हां व कशी द्यावी, हा आजकालच्या वादग्रस्त प्रश्नांपैकी एक आहे,’’ अशी प्रस्तावना करून र.धों. म्हणतात, ‘‘आपल्या समाजांत रजस्वला स्त्री बाजूला बसते व लहान मुलांनीं याचं कारण विचारल्यास ज्याप्रमाणे ‘कावळा शिवला’ असे कारण सांगतात, तसं इंग्लंडांत एकाद्या लहान मुलाने ‘नवीन भावंड कोठून आले?’ अशी शंका काढल्यास, बगळ्याने आपल्या चोंचींतून किंवा डाक्टरनें आपल्या बॅगेतून आणले असे सांगण्याची पद्धत आहे. फ्रान्समध्ये ते कोबीच्या कांद्यात सापडले असे सांगतात. अर्थात अशा उत्तरांनी मुलांचे फारसे समाधान होत नाहीं व ती खर्‍या उत्तराच्या शोधांत असतात व आईबाप खरे बोलत नाहींत असे ती मनांत पक्कें समजतात. ही माहिती त्यांस पुढेमागे बर्‍या वाईटमार्गानी मिळते, व मुले होणे ही लज्जास्पद व लपवण्यासारखी गोष्ट आहे अशी त्यांची समजूत होते.’’

‘समाजस्वास्थ्य’मधील एक लोकप्रिय सदर ‘शारदेचे पत्र’ हे होते. यातील स्त्री-शिक्षणाविषयीची, स्त्रियांच्या सन्मानाविषयीची शारदेची मते कमालीची खणखणीत आहेत. ती म्हणते, ‘‘पुण्याच्या लग्नसराईत तुझी अगदीं चैन झाली असेल नाही! माझ्या मते हल्लीची विवाहसंस्था बायकांना कमीपणा आणणारी आहे आणि बायकांनी कोणत्याहि लग्नसमारंभांत मिरवतां कामा नये आणि कामहि करता कामा नये. पण मग कपडे आणि दागिने लोकांना कसे दिसतील? यांत तर पुरुषांचा सगळा कावा आहे. सरकार जसे मवाळांना पदव्या देते तसेच पुरुष बायकांना कपडे आणि दागिने देतात. नथीची वेसण घातल्यावर कोणती बाई नाक वर करील? काय म्हणे, ‘अमक्याची मुलगी तमक्याच्या मुलाला दिली.’ ‘मुलगा मुलीला दिला’ असे कधी म्हणतो आहे का कोणी? आणि हा अपमान बायका सहन करतात. जिला काडीइतका तरी अभिमान असेल किंवा माणुसकी तरी असेल तिला स्वतःसंबंधी असली भाषा वापरलेली कधीहि खपणार नाही. पण परावलंबी मुलींना अभिमान तरी कसा असावा? आणि म्हणूनच तर स्त्रियांना पुरुषांसारखे शिक्षण देता कामा नये असे आपमतलबी पुरुष म्हणत असतात आणि बावळट बायका त्यांची ‘री’ ओढतात.’’

स्त्रियांविषयी अशी खणखणीत, पुरोगामी भूमिका र.धों. घेतात. प्रतिगामी विचार मांडणार्‍यांवर ते अक्षरशः तुटून पडतात. एके ठिकाणी ते म्हणतात, ‘‘कोणतेंहि मासिक, साप्ताहिक किंवा दैनिक हातांत घेतले तरी त्यांत एखादा तरी मागासलेला लेख नाही असे होतच नाही, म्हणजे ‘समाजस्वास्थ्य’ खेरीजकरून. उदाहरणार्थ ग्वाल्हेरच्या ‘हितचिंतका’चा फेब्रुअरीचा अंक पहा. त्यांत एक एम. ए.,बी. टी. झालेले गृहस्थ सहशिक्षणाची अनावश्यकता सिद्ध करूं पाहतात. वास्तविक पाहतां प्रचलित शिक्षणाचा व्हावा तसा उपयोग होत नाही हे त्यांचे म्हणणें खरें आहे, आणि त्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे त्यांचा स्वतःचाच लेख. एम.ए., बी.टी. होऊनदेखील त्यांना युक्तिवाद कशाशी खातात हे माहीत नाही. ते म्हणतात की वैदिक काली सहशिक्षणाचा प्रघात नव्हता, नसेल कदाचित. वैदिक काली काय होते याचा व्यवहारांत बिलकूल उपयोग नाही. या सद्गृहस्थांचें आणखी असेहि मत आहे की पाणी भरणे, दळणकांडण, धुणी धुणे, वगैरे, हीं स्त्रियांच्या व्यायामाची साधने आहेत. आणि अर्थात् टेनिस वगैरे खेळ पुरुषांच्या व्यायामाची साधने आहेत. या साधनांची अदलाबदल केली तरी दोघांसहि व्यायाम होईलच हे या विद्वानांच्या लक्षांत तरी आले नाही किंवा त्यांनी स्वार्थाकरता वरील वांटणी सुचविली आहे. बहुधा हे गृहस्थ अविवाहित असावे आणि बायकोनेच नोकराचें काम करावे अशी त्यांची इच्छा असावी. तसे असल्यास असा लेख लिहिणें हा हल्लीच्या दिवसांत अविचार आहे, आणि ते विवाहित असल्यास त्यांच्या बायकोची दया येते. हे लोक स्त्रियांचे शत्रू आहेत आणि त्यांच्यापासून सावध राहणे जरूर आहे.’’

अगदी कालपरवापर्यंत (किंवा आजही) लग्न म्हटल्यावर ‘घरकाम’ हे बाईनेच करायचे आणि पुरुषाने बाहेरच्या खोलीत पेपरवाचत बसायचे, अशी ‘गोड’ प्रतिमा उभी राहते. पण शंभरवर्षांपूर्वी र.धों. हा सावधानतेचा इशारा देत होते.

‘समाजस्वास्थ्य’ म्हणजे फक्त लैंगिक मार्गदर्शन किंवा लैंगिक मजकूर असं मात्र नव्हे. र.धों.नी त्यांच्या अंकांतून समाजाच्या आरोग्याचे विविध प्रश्न हाताळले. चित्रपट-नाटकांची परीक्षणे, संगीतातील चीजा आणि त्यांतली (मुळात नसलेली) अश्‍लीलता, मिश्र विवाह व समाजाची त्यांप्रती असणारी असहिष्णुता, पित्ताशयाचे विकार, हातपाय कशाने फुटतात, शाकाहार-मांसाहार, पाणी कसे प्यावे, चीनमधील मजुरांची पिळवणूक, कॉलरा कसा टाळावा, मलेरियाचा प्रतिबंध, स्त्रियांची स्वच्छता, दातांची स्वच्छता असे अनेक विषय.

कॅन्सरवरील एका लेखात तेम्हणतात, ‘‘कॅन्सरची गोष्ट थोडी वेगळी आहे. तो कोठेंतरी शरीराच्या आंतल्या भागांत झाल्यास आरंभी कळत नाहीं आणि म्हणून उपचार वेळेवर होत नाहीं, पण स्तनाच्या कॅन्सरची तशी गोष्ट नाही, तो दिसतो, आणि वेळेवर उपचार केल्यास बराहि होतो, पण खोटी लाज आडवी येते आणि डॉक्टराकडे जाण्यास बायका कचरतात, वेळ जाऊं देतात आणि परिणामी मरतात.’’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

जेवणापूर्वी हात धुतले पाहिजेत यावर लेख लिहिताना ते किती आधुनिक विचार करतात, हे आपल्या लक्षात येतं. ते म्हणतात, ‘‘हातास माती लावून धुतल्याने ते स्वच्छ होतात ही प्राचीन समजूत सूक्ष्मदर्शक यंत्राने खोटी ठरविली आहे. मातीने सूक्ष्मजंतु मरत नाहीत, व म्हणून हात स्वच्छ होत नाहीत असे आता म्हणावे लागते. या करीता साबण वापरणे जरूर आहे. हा साबण उत्तम वासाचा किंवा विशेष किमतीचा असला पाहिजे असे नाही, परंतु जंतुनाशक असला पाहिजे व त्यानें त्वचेस इजा होता कामा नये. जेथे एकच साबणाची वडी पुष्कळ माणसांस वापरावी लागते, तेथे साबणाच्या वडीऐवजी पातळ साबण बाटलीत ठेवून त्याचे काही थेंब हातावर पाडण्याची व्यवस्था करावी, म्हणजे एकाच्या त्वचेचा मळ दुसर्‍यास लागणार नाही. अशा साबणाची वाटली बाजारात विकत मिळते. साबणाची वडी वापरल्यास ती प्रत्येकाची वेगळी असावी. हात धुण्यास पाणी गरम असल्यास उत्तम, कारण गरम पाण्याने मळ चांगला निघतो...’’

मासिकाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी एक पत्र एका वाचकाला लिहिलेले आहे. त्यातली त्यांची तळमळ हृदयाला जाऊन भिडते. ‘‘आज या मासिकास एक वर्ष पुरे झाले. यांतून फायदा झाला नाहीं तरी आपल्या वेळाच्या व श्रमाच्या मोबदल्याची अपेक्षा न केल्यास निदान खर्च भागण्याइतके वर्गणीदार मिळतील अशी आमची कल्पना होती ती सर्वथैव निराधार ठरली. लोकांस रुचतील अशींच मते प्रतिपादन करून व वारा येईल तशी पाठ फिरवून लोकप्रिय होणे फारसे कठिण नसते, व अशा तर्‍हेनें मासिक लोकप्रिय करण्याची आमची कधीच इच्छा नव्हती. कामशास्त्र व तदनुषंगिक इतर विषयांवर आधुनिक शास्त्रीय पद्धतीचे स्वतंत्र विचार प्रसिद्ध करण्यास इतर पत्रे किंवा नियतकालिके तयार नाहीत याचा आम्हांस अनेक वेळां अनुभव आल्यामुळेच हे मासिक काढण्याचे आम्ही ठरवले, व ते एकदम लोकप्रिय होणार नाहीं हे आम्ही जाणून होतो. परंतु केवळ ५०० वर्गणीदार मिळतांच छपाईचा खर्च बाहेर पडेल व जास्त मिळाल्यास आपणांस मासिकाचा आकार वाढवता येईल अशी आम्हांस उमेद होती. अजून वर्गणीदारांची संख्या २०० वरही गेलेली नाहीं...’’

त्या काळातल्या या कोमट प्रतिसादाविषयी आश्चर्य वाटायला नको. आणि त्यामुळेच र.धों.च्या स्वकार्यावरील निष्ठेला दाद द्यायला हवी.

.............................................................................................................................................

लेखक मुकुंद टाकसाळे प्रसिद्ध विनोदी लेखक आहेत.

mukund.taksale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा