चिंतन आत्मरुदन ठरू नये...
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • राजस्थानमधील उदयपूर इथं पार पाडलेल्या काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराची काही छायाचित्रं
  • Sat , 21 May 2022
  • पडघम देशकारण काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Sonia Gandhi प्रियांका गांधी-वढेरा Priyanka Gandhi Vadra

‘उशिरा सुचलेलं शहाणपण’ अशा शब्दांत काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या चिंतन शिबिराचं वर्णन करायला हवं. देशाच्या राजकारणात काँग्रेसची नौका डळमळायला सुरुवात झाली ती २०११पासून. झाले न झालेले अनेक आर्थिक घोटाळे, अण्णा हजारे यांचं दिल्लीतलं आंदोलन ही त्या डळमळण्याची सुरुवात होती. २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पक्षाकडून स्वीकृती मिळाल्यावर नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा जो झंझावात निर्माण केला, त्यात तर काँग्रेसची नौका देशाच्या मुख्य प्रवाहातून केवळ भरकटलीच नाही, तर जायबंदीही झाली. तेव्हाच जर असं चिंतन शिबीर घेऊन डागडुजी केली असती, तर पुढे झालेल्या निवडणुकांत हा पक्ष पराभवाच्या गर्तेत सापडला नसता. पक्ष व्यक्तीकेंद्रित आणि नेते सुस्त, अशी काँग्रेसची अवस्था झालेली आहे .

त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस बदलांसाठी सज्ज झालेला आहे, हे संकेत या चिंतन शिबिरानं दिले आहेत. इतकी धूळदाण होऊनही देशात किमान २१-२२ टक्के मताधार असताना हा पक्ष गेले दशकभर एखाद्या सुस्त अजगरासारखा झालेला होता. उदयपूरच्या चिंतन शिबिरात सोडलेल्या नवसंकल्पांमुळे पक्षातला हा अजगरी सुस्तपणा दूर होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा काँग्रेसचे मतदार, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी बाळगायला हरकत नसावी.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

चिंतन शिबिर तर झालं, पण काँग्रेस पक्षासमोर असलेल्या सर्व समस्या सुटल्या आहेत असं नाही. मात्र जे काही नवसंकल्प सोडले आहेत, ते जर प्रमाणबद्ध कार्यक्रम आखून अंमलात आणले, तर येत्या काही वर्षांत काँग्रेस पूर्ववैभव प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल हे नक्की. देशात एकपक्षीय धर्मांध राजवटीचा धोका दिसत असताना तर काँग्रेस बळकट होणं, ही या देशातल्या लोकशाहीसाठी नितांत निकडीची गरज आहे. इतकी धूळदाण होऊनही काँग्रेस देशातील अजूनही दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. निवडणुकांतील काही सलग पराभवांमुळे तो संपणारही नाही; गरज आहे ती पक्ष तळागाळापासून पुन्हा एकदा बांधला जाण्याची आणि कार्यकर्त्यांत विश्वास निर्माण करण्याची. थोडक्यात, नवसंकल्प नवनिर्माण ठरण्याची गरज आहे.  

काँग्रेसकडे एकेकाळी कार्यकर्त्यांची फौज होती आणि ते या पक्षाचं फार मोठं भांडवल होतं. (ते भांडवल आता भारतीय जनता पक्षाकडे गेलं आहे.) एखादा राजकीय पक्ष सळसळत राहतो, तो त्यात सतत दाखल होणारे नवीन कार्यकर्ते आणि त्यांना मिळणाऱ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमुळेही. काँग्रेस पक्षात नेमकी हीच प्रक्रिया थांबलेली होती; आमदारकी असो वा खासदारकी वा सत्तेतील पद, या सर्व ठिकाणी घराणेशाही निर्माण झालेली आहे. तालुका पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत तेच ते लोक दिसतात आणि कार्यकर्ते सतरंज्या उचलण्याच्या कामात आयुष्यभर राहतात. त्यामुळे या पक्षाचा आत्मा हरवला. कार्यकर्ते कमी, नेतेच जास्त, असं या पक्षाचं स्वरूप झालेलं आहे.

आता एक व्यक्ती एक पद, एका कुटुंबातील केवळ एकालाच निवडणुकीत उमेदवारी आणि निम्मे पदाधिकारी पन्नासपेक्षा कमी वयाचे असतील, हे नवसंकल्प काँग्रेसला उभारी तर प्राप्त करून देतीलच, पण त्याशिवाय पक्ष आणि सत्तेत आता नव्या लोकांना संधी मिळेल. सत्तेत आता एक टर्म पाच वर्षांची आणि नंतर तीन वर्षे सक्तीची विश्रांती, हा उतारा चांगला आहे. तो काटेकोरपणे अंमलात आला, तर पक्ष संघटनेची वीण घट्ट होईल. गांधी घराण्यालाही हाच निकष लागू होणार का आणि तसं झालं तर मैदानात सोनिया गांधी राहणार की, राहुल गांधी की, प्रियंका गांधी-वढेरा हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

नेते वाढले, सत्तालोलुप झाले; त्यांचा आणि पर्यायानं पक्षाची दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांशी असणारी नाळ तुटत गेली. या घटकांना देशाच्या विविध भागात समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, तृणमूल काँग्रेस, आप, रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, असे अन्य पर्याय नेमके याच काळात उपलब्ध झाले. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक हे घटक सोबत होते. त्यामुळेच काँग्रेस पक्षाला केंद्र आणि अनेक राज्यांत अनेक वर्षं सत्ता राखता आली. मात्र हे घटक हळूहळू दुरावत गेले आणि काँग्रेसच्या मतांच्या  टक्केवारीत घट होत गेली. हे घटक दुरावण्याची अन्यही अनेक कारणे आहेत हे खरं, पण चिंतन शिबिराच्या निमित्तानं हे घटक पुन्हा आपल्यासोबत जोडून घेण्याचं भान काँग्रेस पक्षाला अखेर आलं आहे, हे महत्त्वाचं आहे.

मात्र, एका चिंतन शिबिरामुळे काँग्रेस पक्ष एका रात्रीत पूर्वीसारखा उभा राहील अशा समजात काँग्रेसजनानं राहणं हा भाबडेपणा ठरेल. नवीन घर उभारण्यापेक्षा मोडलेलं घर दुरुस्त करण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि तेच राजकीय पक्षालाही लागू आहे. शिवाय पक्ष पुन्हा बांधणीचं कोणतंही मॉडेल आज तरी काँग्रेस पक्षाकडे नाही. प्रतिस्पर्धी एकटा, एखादा राजकीय पक्ष नाही, तर तो एक संपूर्ण (आणि तोही शिस्तबद्ध) ‘परिवार’ आहे, हेही भान काँग्रेसला बाळगावं लागणार आहे. दोन खासदार ते लोकसभेत बहुमत, अशी मजल या परिवारानं मारताना कोणतं मॉडेल अंमलात आणलं आणि आपल्याला त्यापासून काय बोध घेता येईल, याचा मूलभूत विचार सर्वांत आधी काँग्रेसला करावा लागणार आहे. आणि मग पक्षबांधणीचं एक मॉडेल तयार करावं लागणार आहे. त्या मॉडेलला यशाची फळं मिळण्यासाठीही वाट पहावी लागणार आहे.

यशाच्या फळांसाठी प्रदीर्घ श्रम करावे लागतील तसंच संयमही बाळगावा लागेल. एकेकाळी काँग्रेस नावाच्या वृक्षाला सेवादल, महिला आघाडी, युवक काँग्रेस, विद्यार्थी, कामगार, अल्पसंख्याक, अशा वेगवेगळ्या आणि विस्तार झालेल्या शाखा होत्या. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत या आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेतलं जात असे. पक्षांतल्या अनेक महत्त्वाच्या  नेत्यांच्या पक्षकार्याची सुरुवात अशा आघाड्यातून झालेली आहे. या सर्व आघाड्यांतून कार्यकर्त्यांची मोठी रसद काँग्रेसला मिळत असे. पक्षाच्या या सर्व उपशाखांचं पुरुज्जीवन करावं लागणार आहे.

काँग्रेसची पुनर्बांधणी हे कुणा एका घराण्याचं आणि त्यासोबत आणखी काही मोजक्या नेत्यांचं काम आहे, अशा गोड गैरसमजात न वावरण्याची दक्षता प्रत्येक नेता व कार्यकर्त्याला घ्यावीच लागणार आहे. राहुल गांधी देशव्यापी यात्रा काढतील, सोनिया गांधी यांची एखादी सभा मतदारसंघात झाली की, आपली सीट निघेल, याही मानसिकतेतून बाहेर येणं गरजेचं आहे.

काँग्रेसचं पुनरुज्जीवन ही एक लोक चळवळ करावी लागेल. त्यासाठी मोठा फौजफाटा आणि निधीही लागेल. काँग्रेससोबत राहून या देशात अनेकांनी भरपूर कमाई केलेली आहे, संस्था किंवा उद्योगांचा पसारा निर्माण केलेला आहे. ही ‘मजबूत’ कमाई करता आली यांची कृतज्ञता म्हणून या सर्वांनी पक्षाला प्रत्येकी दोन-पाच कोटी निधी म्हणून द्यायला हवेत. प्रत्येकी पाच आणि दोन कोटी देणारे पाच-सात हजार मानसबदार निघाले, तरी मोठा निधी उभा राहू शकण्यात काहीच अडचण नाही. पक्षातील ‘जी-२३’ गटातील सर्वांनाच ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. काठावर उभं राहून जर हे नेते सामूहिक नेतृत्व, तसंच पक्षाच्या भवितव्याची चिंता आणि तीही केवळ पत्र पाठवून करणार असतील, तर उदयपूरचं चिंतन आत्मरुदनच ठरेल...

काँग्रेस पक्षाचा लोकांशी असलेला थेट संवाद तुटलेला आहे आणि त्यासाठी राहुल गांधी काश्मीर ते कन्याकुमारी यात्रा काढणार आहेत, ही अतिशय चांगली बाब आहे. पण ही जबाबदारी एकट्या राहुल गांधी यांची नाही. अशा संवादयात्रा प्रत्येक नेत्याने त्याच्या जिल्हा आणि राज्यात काढायला हव्यात. समाजमाध्यमांमुळे काँग्रेसचे बहुसंख्य नेते लोकांपासून फार दूर गेलेले आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

एसी खोलीत किंवा कारमध्ये बसून एखादं ट्विट केलं (खरं तर करवून घेतलं!) किंवा एखादी पोस्ट टाकली की, जनतेशी संवाद साधला  गेला, असं समजणं चूक आहे. हा प्रकार इतका वाढला आहे की, जवळच्या कार्यकर्त्याच्या आनंद किंवा दु:खाच्या प्रसंगातही थेट भेटी ऐवजी समाजमाध्यमांवर पोस्ट टाकण्यात नेते समाधान मानतात. त्यामुळे आपल्या आनंद किंवा दु:खात नेता सहभागी होतो, ही भावना कार्यकर्त्यांत निर्माणच होत नाही. (याबाबतीत भाजपच्या नेत्यांचा आदर्श समोर ठेवायला हवा; लोकसंपर्कासाठी भाजपचे बहुसंख्य नेते समाजमाध्यमं आणि थेट संवाद अशी दुहेरी पद्धत वापरतात.) पूर्वी काँग्रेस नेते आठवडा-पंधरवाड्यातून एकदा तरी लोकांसाठी उपलब्ध असत. वसंतदादा ते विलासराव मार्गे शंकरराव चव्हाण, शरद पवार असा संवादाचा व्यापक पट आहे. यांच्याकडून पाठीवर थाप पडल्याचे अनुभव अजूनही अनेकांच्या स्मरणात आहेत. ती मोडीत निघालेली परंपरा पुन्हा सुरू करायला हवी. 

शेवटी, श्रीमती सोनिया गांधी पक्षनेतृत्वाचा म्हणजे अध्यक्षपदाचा प्रश्न अजूनही सोडवलाच नाही. त्यांनी पक्षाध्यक्षपद सोडून सूत्रं अन्य कुणाहीकडे सुपूर्द करत या नवसंकल्पांची सुरुवात स्वत:पासूनच केली असती, तर तो पक्षासाठी एक चैतन्यदायी संदेश ठरला असता आणि पक्षांतर्गत विरोधकांना जोरदार धक्का बसला असता…

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

बिहारमधील एसआयआर : मतदार यादीची पडताळणी की मताधिकाराची पुनर्परीक्षा? महाराष्ट्रात चाललेल्या एसआयआर प्रक्रियेत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जाणे गरजेचे आहे

प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क प्रत्यक्षात बजावता यावा याची खात्री करणे, हे निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी मतदार यादी हे एक साधन आहे. अंतिम उद्दिष्ट नाही. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक आहे. दुबार नोंदी काढणे आवश्यक आहे. मतदार यादी अचूक ठेवणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रियांचा अंतिम हेतू मतदाराला मतदानापासून वंचित करणे, हा नसून त्याचा मतदानाचा हक्क सुरक्षित करणे हा असतो.......

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......