चिकित्सक विचारशक्तीचे दमन करणे, हा सांस्कृतिक राजकारणातला मुख्य अजेंडा असतो
पडघम - सांस्कृतिक
संध्या नरे-पवार
  • ‘जनवादी साहित्य संस्कृती संमेलना’चे बोधचिन्ह, संमेलनाध्यक्षा संध्या नरे-पवार आणि संमेलनाचं एक छायाचित्र
  • Thu , 12 May 2022
  • पडघम सांस्कृतिक जनवादी साहित्य संस्कृती संमेलन Janvaadi Sahitya Sanskriti Sammelan संध्या नरे-पवार Sandhya Nare-Pawar

८ व ९ मे २०२२ रोजी सावंतवाडीमध्ये ‘जनवादी साहित्य संस्कृती संमेलन’ पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षा संध्या नरे-पवार यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा पहिला संपादित भाग...

..................................................................................................................................................................

हे साहित्य आणि संस्कृती संमेलन आहे, केवळ साहित्य संमेलन नाही, ही बाब मला लक्षणीय वाटते. जिथे जनांनी लेखणी हातात घ्यायची का नाही, हे प्रस्थापितांची संस्कृती ठरवते, जनांनी लिहिलेल्या साहित्यकृतीला मान्यता द्यायची का नाही, हे अभिजनांची समीक्षा ठरवते, तिथे या वैचारिक प्रभुत्वाला सामोरे जाताना जनांना आपल्या संस्कृतीसहच उभे राहावे लागते. शिवाय जनांच्या साहित्याची निर्मिती जनांच्या संस्कृतीमधून, विविध लोकप्रकारांमधून, लोकगीतांमधून, मौखिक कथांमधून झालेली आहे. आज पाश्चिमात्य साहित्यातील सिंड्रेलाची कथा इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या कृपेने घराघरांत पोहोचली आहे. पण भिल्ल आदिवासींमध्ये कुंदीराजा, फुलवंती आणि तीची सावत्र आई यांची लोककथा आहे. ती मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत आलेली आहे. पण सिंड्रेला आपल्याला माहीत असली तरी फुलवंती अपरिचित असते, कारण परिघावरच्या संस्कृतींमधील साहित्यही परिघावरच राहते.

आदिवासींमध्ये प्रत्येक जमातीत राम-सीतेची कथा वेगळी आहे. आदिमांचे राम-सीतायण वाल्मिकीच्या रामायणापेक्षा वेगळे आहे. यात कधी सीता रामाची बहीण आहे, कधी रावणाची मुलगी आहे, तर कधी सीतेला स्वयंवरात लक्ष्मणाने जिंकले आहे. वारली आदिवासींच्या राम-सीतायणात लक्ष्मणाने सीतेला जिंकल्यावर त्याने रामाला सीतेशी लग्न करायला सांगितले. नंतर एकदा लक्ष्मण आणि सीता यांचे भांडण होते, तेव्हा लक्ष्मण रामाला सीतेचा त्याग करायला सांगतो. रामाने तसे केल्यावर ती सात समुद्र फिरून सकोबा आणि इटोबा यांच्या आश्रमात राहते. आश्रमातच तीचे दोन्ही मुलगे मोठे होतात. तिकडे नगरात राम-रावणाचे युद्ध सुरू झालेले सीतेला कळते. ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तिथे जाते. युद्धात रामाचा पराभव होत असतो. राम-लक्ष्मण दोघेही जखमी झालेले असतात. तेव्हा सीता आपल्या दोन्ही मुलांसह युद्धात उतरते, रावणाशी युद्ध करते आणि जिंकते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

ही अशी विविध रामायणं कधी पुढे आणली गेली नाहीत. पुरोगामी विचारप्रवाहानेही ही रामायणं पुढे आणत लोकांना ती सांगितली नाहीत. अगदी १९९२नंतरही नाहीत. वारली आदिवासीही महाराष्ट्रातलेच आणि आजही रावण आणि मेघनादाची पूजा करणारे कोरकू आदिवासीही महाराष्ट्रातलेच. बहुजन जातींमधील ग्रामीण स्त्रियांच्या लोकगीतांमध्येही रामायण स्त्री-परिप्रेक्ष्यातून उलगडत जाते. सीतेचे निष्पापपण गाताना ग्रामीण स्त्री म्हणते,

‘वधावया नेली सीतासारख्या नारीला

कलंक लागला चंद्रासारख्या देवाला...’

दुसरी एखादी ‘राम म्हनू राम, नाही सीतेच्या तोलाचा’ असा सीतेच्या श्रेष्ठत्वाचा निर्वाळाही देते. सीतेच्या माध्यमातून ग्रामीण स्त्री आपले स्वतःचे दुःखंही व्यक्त करते आणि त्या दुःखाला शब्दांमध्ये बांधत म्हणते, ‘सीताला सासूरवास, सासू केकईनं केला

‘रामासारखा भरतार, तिला न्हाई भोगू दिला

सीतेला सासूरवास, कवठाच्या कवठीपरी

नाही ग भोगू दिला, रामाच्या नवतीमधी.’

राम आणि सीता या दोन व्यक्तिरेखा इथल्या बहुजनांच्या दैनंदिन जगण्यातला अविभाज्य भाग आहेत, त्यांच्या सहज अभिव्यक्तीचा आविष्कार आहेत. सासूच्या सासूरवासापासून ते पतीपत्नीमधील तणावापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी राम-सीतेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असताना सर्वसामान्यांच्या अभिव्यक्तीतील राम-सीता कधी संस्कृतीच्या पृष्ठभागावर आले नाहीत. प्रस्थापित उच्चजातीय अभिजन संस्कृतीच्या केंद्रस्थानी कायम वाल्मिकी रामायण, तुलसीदासांचे रामायण आणि नंतर माडगूळकरांचे ‘गीतरामायण’ राहिले. मोजक्या अभ्यासकांव्यतिरिक्त लोकमानसातील राम-सीतेशी, आदिवासींमधील राम-सीतायणाशी इथल्या पुरोगामी विचारप्रवाहानेही स्वतःला जोडून घेतले नाही. आम्ही आमच्या नास्तिकपणात, आधुनिकतेत आणि नंतर उत्तर-आधुनिकतेत मग्न राहिलो. पाश्चिमात्य साहित्य अभ्यासत राहिलो आणि इथल्या मातीतल्या लोकप्रतिभेला विसरलो. त्यातल्या मिथकांना, मिथकांमधल्या अदभुताला नाकारत मार्क्वेझच्या ‘मॅजिकल रिअलिझम’ची चर्चा करत राहिलो.

लोकसाहित्य हा विषय अभ्यासकांपुरता मर्यादित झाला. तो मुख्य प्रवाहाचा भाग बनला नाही. इथल्या ज्ञानव्यवहारावर कायम उच्चजातीयांचं प्रभुत्व होतंच. त्यातूनच उच्चजातीयांची संस्कृती हीच मुख्य प्रवाही संस्कृती बनलेली होती. त्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक राजकारणात जनांचं साहित्य आणि संस्कृती, या बाबी कायम परिघावरच राहिल्या. त्या केंद्रस्थानी आणण्याची जबाबदारी इथल्या पुरोगामी विचारप्रवाहाची होती. पण त्यावरही प्रस्थापितांची छाप कायम राहिली.

सत्तरच्या दशकानंतर दलित लेखकांनी लिहिलेले साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होऊ लागले. आत्मचरित्र, कथा, कविता असे याचे स्वरूप होते आणि आहे. अलिकडे भटक्या-विमुक्त समूहातील स्त्री-पुरुषांची आत्मचरित्रे अधिक येत आहेत. पण उच्चजातीय अभिजनांच्या दृष्टीतून या साहित्याचे कायम एक्झॉटिसायझेशन (Exoticization) केले जाते. आपल्या अनुभवविश्वाच्या पल्याड असे काहीतरी विलक्षण, विचित्र या स्वरूपात या आत्मचरित्रांमधून दर्शित होणाऱ्या जीवनाकडे पाहिले जाते आणि त्या स्वरूपातच ते काही काळाने रिचवले जाते. त्यातील संस्कृती ही कायम उपऱ्यांची, परिघावरची अशीच राहते. ती आपली होत नाही. वर्णआधारित, जातीआधारित विभाजन साहित्याचेही विभाजन करत असते. संस्कृती आणि साहित्य एकमेकांना सापेक्ष असतात. त्याचे प्रत्यंतर जातीआधारित समाजात वारंवार येते. आज इथल्या सांस्कृतिक संघर्षाने सांस्कृतिक दहशतवादाचे रूप धारण केले आहे. अशा पार्श्वूभूमीवर हे जनांचे साहित्य आणि संस्कृती संमेलन होत आहे. आजच्या या सांस्कृतिक संघर्षाचे अनेक पैलू आहेत. त्यातील गुंतागुंतही तीव्र आहे. त्यातील काही प्रमुख मुद्दे इथे चर्चेसाठी घेतले आहेत.

धर्मांध कन्सेन्टचे मॅन्यूफॅक्चरिंग आणि माध्यमसंस्कृती

मी माध्यमकर्मी आहे. त्यामुळे सुरुवात माध्यमांपासून करते. संपर्ण आसमंतात एक वैचारिक कोलाहल आहे. विविध विचारांचे टकराव आहेत, संस्कृतींचे संघर्ष आहेत. वास्तवाचे अनेक तुकडे सभोवताली आहेत. वातावरणात एक तीव्रता आहे. समाजाचे मानस रोजच्या रोज उलटेपालटे होत आहे. काहीच एकसंध नाही, सगळंच खंडित आहे. धर्म, जात, भाषा, वर्ण, लिंग या परंपरागत विभाजकांच्या बरोबरीनेच नागरिकत्व, राष्ट्रवाद, देशप्रेम या गोष्टीही आता विभाजनासाठी वापरल्या जात आहेत. सांस्कृतिक संघर्ष अत्यंत टोकदार बनला असून झुंडबळींच्या रूपाने व्यक्त होत आहे. विद्यापीठांच्या आवारांमध्ये या वैचारिक, सांस्कृतिक संघर्षाची कुस्ती खेळली जात आहे. प्रशासकीय यंत्रणा सोबतीला घेतली जात आहे. विरोधकांची, विद्यार्थ्यांची डोकी फोडली जात आहेत. एकूण वातावरण ‘गोली मार भेजे में, भेजा शोर करता हैं’ असे आहे. मान्य नसलेल्या विचारांची थेट हत्या केली जात आहे. या अशा स्थितीत ज्यांनी विचारांना दिशा द्यावी, अशी अपेक्षा असते, ती माध्यमं काही अपवाद वगळता आपली वैचारिक प्रस्तुतताच हरवून बसली आहेत.

एकूण एककल्ली वातावरणात माध्यमंही एककल्ली बनली आहेत. आज माध्यमांचा अवाका आणि पसारा वाढला आहे. लोकांच्या संपूर्ण जगण्याला माध्यमांनी वेढले आहे. मोबाईलमधून रात्री झोपतानाही सगळी माध्यमं लोकांच्या उशाशी असताना माध्यमांना आपल्या वैचारिक भूमिकेचे विस्मरण होणे आणि धर्म, जात, वर्ग, लिंग, भाषा यांच्याबरोबरीने माध्यमांनीही एक विभाजक बनणे, ही बाब अतिशय घातक आहे. शोषित-पीडितांच्या, शूद्र-अतिशूद्रांच्या दुःखाविरोधात व्यक्त होणारे बाबासाहेबांचे ‘मूकनायक’ हे एक टोक मानले, तर आजची माध्यमे ही पार दुसऱ्या टोकाला उभी आहेत, आणि हे कडेलोटाचे टोक आहे. संख्येच्या दृष्टीने पाहता माध्यमांची व्याप्ती वाढत आहे. एका परीने माध्यमांचे लोकशाहीकरण होत आहे. समाजमाध्यमांवर आज वेगवगेळ्या पोर्टलच्या, मीम्सच्या माध्यमातून सर्वसामान्यही व्यक्त होऊ शकतात. पण त्याच वेळी आशयाच्या दृष्टीने पाहता त्यातला कट्टरतावाद वाढत चालला आहे. माध्यमं झुंडशाहीची वाहक बनत आहेत.

एकूणच माध्यम-संसकृतीविषयी बोलताना आपल्याला ग्रामच्शी या नवमार्क्सवादी विचारवंताची मांडणी लक्षात घ्यायला हवी. अभिजन विचारसरणीच्या प्रभुत्वाची संकल्पना मांडताना माध्यमं या कामी महत्त्वाची भूमिका पार पाडतात, याकडे ग्रामच्शी लक्ष वेधतो. समाजातले अभिजन विचारसरणीचे प्रभुत्व (हेजमिनी) केवळ बळजबरीने किंवा हिंसेच्या माध्यमातून प्रस्थापित होत नाही, तर सामाजिक चलनवलनातल्या प्रभावी हस्तक्षेपाने, काही वाटाघाटींमधून हे प्रभुत्व कायम राखले जाते. आधुनिक काळात ही हस्तक्षेपाची, निगोशिएशन्सची प्रक्रिया माध्यमं पार पाडतात, असे ग्रामच्शी यांचे प्रतिपादन आहे. भारतासारख्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या नीतीमूल्यांवर आधारित जातवर्णवर्गवर्चस्ववादी समाजव्यवस्थेत हे वर्चस्व कायम राखण्याचं काम पर्यायी माध्यमं सोडता, मुख्य प्रवाहातील भांडवली माध्यमं कायम करत आलेली आहेत. मात्र आज या प्रक्रियेने अधिक वेग घेतला आहे. माध्यमांचा हस्तक्षेप अधिक चिथावणीखोर झाला आहे.

अलिकडच्या काळात हरर्मन आणि नोआम चोम्स्की या पाश्चात्य अभ्यासकांनी ‘मॅन्यफॅक्चरिंग कन्सेन्ट’ म्हणजेच ‘सहमतीचं उत्पादन’ ही संकल्पना माध्यमांच्या संदर्भात वापरली आहे. त्यांनी ही संकल्पना प्रामुख्याने राजसत्ता आणि भांडवलशाहीच्या संदर्भात वापरली आहे. लोकशाही व्यवस्थेत सहमतीचं उत्पादन ही आता एक नवी कला झाली आहे. नव्वदीच्या दशकानंतर खासगीकरण, जागतीकीकरण, बाजारकेंद्री भाडंवलशाही यांचं पर्व सुरू झाल्यावर समाजात कन्झ्युमरिझम - चंगळवाद रुजवण्यासाठी भांडवलशाहीने माध्यमांना हाताशी धरले. तीव्र होत जाणाऱ्या विषमतेच्या पायावरच चंगळतावादाचे चकाकते इमले उभे असतात.

चंगळतावादाचे इमले चढवत न्यायचे तर उपभोक्तावादी संस्कृती समाजात रुजवायला हवी. तिला पोषक ठरतील, असे आचारविचार समाजात रुजवायला हवे. लोकांची सहमती निर्माण करायला हवी. मग वर्तमानपत्रेच सौंदर्यस्पर्धा आयोजित करू लागली, नवरात्रीत साड्यांचे नवरंग उधळू लागली. खासगी महागडं शिक्षण हे एक उत्पादन आहे. ते विकण्यासाठी माध्यमांमध्ये करिअर गायडन्सवर सदरं सुरू झाली. तज्ज्ञांचे मार्गदर्शन सुरू झाले. स्त्रिया या चंगळवादी संस्कृतीच्या मुख्य ग्राहक आहेत. साहाजिकच स्त्रियांसाठी वेगळ्या पुरवण्या सुरू झाल्या. माध्यमांमध्ये स्त्रियांची एक वेगळी उपसंस्कृती निर्माण करण्यात आली. छापील माध्यमापासून ते इलेक्ट्रॉनिक माध्यमांपर्यंतची विविध माध्यमं स्वतःला आधुनिक, उदारमतवादी म्हणवत असली तरी प्रत्यक्षात त्यांची धमर्संस्था, राजसत्ता आणि अर्थव्यवस्था या त्रयीशी हातमिळवणी असते. धर्मसंस्था, राज्यसंस्था आणि भांडवली अर्थव्यवस्था हे तिन्ही घटक पुरुषप्रधान असल्याने या तीन घटकांच्या आधारे कार्यरत असणारी माध्यमेही पुरुषप्रधानतेच्या साच्यातच स्वतः घडतात आणि पुन्हा पुरुषप्रधानतेचा साचा नव्याने घडवतात.

यातूनच कधी जाणीवपूर्वक तर कधी त्यांच्याही नकळत माध्यमं सार्वजनिक पितृसत्तेची भूमिका पार पाडतात. साचेबद्ध स्त्रीप्रतिमांची निर्मिती केली जाते. चौकटीतल्या स्त्रिया आदर्श ठरतात, तर चौकटीबाहेर पाऊल टाकणाऱ्या स्त्रिया स्वैराचारी ठरतात. आज माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने स्त्रियांचे चित्रण येत आहे, तसेच माध्यमांच्या प्रभावाखाली असणाऱ्या मध्यमवर्गीय-उच्चजातीय स्त्रिया ज्याप्रमाणे धर्मांधतेचे, कट्टरतावादाचे समर्थन करत आहेत, त्यामागे हीच रचना कारणीभूत आहे.

नव्वदीनंतर बाजारकेंद्री भांडवलशाहीचे हितसंबंध जपत माध्यमांनी सहमतीचे भरघोस पीक काढले. २०१४नंतर यात थोडा बदल झाला. सत्ताधारी असलेल्या धर्मांध कट्टरतेशी माध्यमांची मालकी असलेल्या भांडवलदारांनी हातमिळवणी केली, तसेच सत्तेच्या मर्जीतल्या भांडवलदारांनी माध्यमांची खरेदी केली. सत्तेच्या मर्जीतली माणसं संपादकपदावर बसवण्यात आली. यानंतर आता माध्यमांनी मोठ्या प्रमाणात धर्मांधतेच्या सहमतीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. सर्वसामान्य वाचक, प्रेक्षक धर्मांधतेच्या विविध पैलूंशी सहमती दाखवू लागला आहे. ‘लव्ह जिहाद’ ते ‘काश्मीर फाईल्स’ असा हा व्यापक विस्तार आहे.

जागतिक इतिहास हा वर्ग संघर्षांचा इतिहास आहे आणि त्यात उत्पादन साधनांची मालकी महत्त्वाची भूमिका पार पाडते, असे कार्ल मार्क्स यांनी सांगितलेले आहे. माध्यमंही सहमतीचे उत्पादन काढत असल्याने तीही उत्पादन साधनं बनली आहेत, आणि ही अशी उत्पादन साधनं जेव्हा सत्ताधारी कट्टरतेशी, धर्मांधतेशी हातमिळवणी केलेल्या भांडवलदारांच्या ताब्यात असतात, तेव्हा माध्यमं ही प्रबोधनाचे किंवा मनोरंजनाचे केंद्र न राहता, त्यांच्या मालकांच्या हातातले शस्त्र बनतात. आज सत्तेच्या विरोधात बोलणाऱ्यांवर, अल्पसंख्याक समुदायांवर हे शस्त्र रोखलेले आहे.

स्मृतींचे खच्चीकरण, मिथ्या स्मृती आणि तर्क विसंगत मिथ्यासमर्थन

२०१४ला २००२ची पार्श्वभूमी आहे, २००२ला १९९२ची पार्श्वभूमी आहे, तर १९९२ला १९२५ची पार्श्वभूमी आहे. आणि १९२५ला पार ऋग्वेदकाळातल्या पुरुषसुक्ताची पार्श्वभूमी आहे. पण सध्या असा सलग विचार करणं एकूणच कठीण झालं आहे. कारण वर्तमान अतिशय वेगाने वाकडातिकडा, उभाआडवा फिरतोय. सभोवतालचा कोलाहल इतका वाढला आहे की, एक सलग संगती लावणं अशक्य बनत आहे. एकामागोमाग एक घटना घडत आहेत. प्रत्येक घटना अधिकाधिक विखार घेऊन समोर येतेय. सामाजिक आणि राजकीय वातावरण असे आहे की, बुद्धीचा, विवेकाचा, समतावादी विचारांचा खून पडला तरी चालेल, पण आमच्या भावना, आमचा वृथा धार्मिक अभिमान, आमचा जातीअहंकार दुखावता कामा नये. तो दुखावला तर सनातनी, कर्मठ विचाराचे विविध गट आक्रमणाला तयार आहेत. मानवी मूल्यांची पाठराखण करणारे, राज्यघटनच्या चौकटीतले तुमचे एखादे विधान कधीही, केव्हाही धर्मविरोधी, राष्ट्रविरोधी बनते आणि तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलले जाता. या अशा वेळी राज्यसंस्था नामक यंत्रणा अदृश्य असते.

समाजातील कट्टर धामिर्कता, सनातनी विचारांचा प्रभाव यामुळे स्त्रिया, अल्पसंख्याक समुदाय आणि इतर शोषित जन यांच्यावरचे अत्याचार वाढत आहेत. स्त्रियांचा पेहराव, त्यांचं वागणं-बोलणं, त्यांचा प्रेमात पडण्याचा, जोडीदार निवडीचा अधिकार या साऱ्यावर बंधनं येताहेत. मांसाहार करायचा की नाही, करायचा असेल तर कुठे करायचा, केव्हा करायचा याचे निकष ठरवले जात आहेत. या विरोधात वागणाऱ्यांची डोकी फोडली जात आहेत. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून एखाद्याला झुंडीने संपवले जात आहे, लिंचिंग केले जात आहे. रहिवाशी संकुलांमध्ये अल्पसंख्याकांना आणि मांसाहार करणाऱ्यांना जागा नाही, हे अर्थसत्तेच्या बळावर न बोलता सांगितले जात आहे. समाजाचे ‘घेट्टोजाझेशन’ (Ghettoization) केले जात आहे. धर्मांतर करण्याचा राज्यघटनेने दिलेला अधिकार नाकारून धर्मांतरबंदीच्या कायद्याची मागणी केली जात आहे, काही राज्यांमध्ये तो केलाही जात आहे. आंतरधर्मीय लग्नांना ‘लव जिहाद’ ठरवले जात आहे. नागरिकत्वाच्या अधिकारांचा संकोच करून देशांतर्गत वसाहतवाद लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांवरचा सर्व्हेलन्स, टेहळणी वाढली आहे. अगदी सहजतेने कोणावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतोय किंवा त्याला-तिला ‘देशद्रोही’ असे संबोधले जात आहे. अतिशय असभ्य भाषेत महिलांना, तरुणींना ट्रोल केले जात आहे. बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. ‘सुल्ली अॅप्स’वरून अल्पसंख्याक महिलांची आभासी विक्री केली जात आहे. कोविडच्या काळातही सगळे नियम बाजूला सारून कुंभमेळा पार पाडला जातो, पण त्याच वेळी भोंगा विरुद्ध ‘हनुमान चालिसा’ असं द्वैत निर्माण करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा नवा प्रयोग केला जात आहे.

एक घटना घडते, आपण त्यावर काही विचार करू लागतो, त्याचा अन्वयार्थ लावू पाहतो, तोवर दुसरी घटना घडते, तिच्यातून सावरेपर्यंत तिसरी. उत्तर आधुनिक काळात एकूणच जगण्याला वेग आलेला आहे. सामान्य माणूस त्या वेगाशी आपल्या जगण्याची गती जुळवत असतानाच कट्टरतावाद्यांकडून एकामागोमाग एक, अशा दुहीची पेरणी करणाऱ्या घटना घडवून आणल्या जात आहेत. ‘नकाब का शिक्षण’ हा वाद संपत नाही, तोच ‘रामनवमी आणि मांसाहार’ हा वाद पुढे आणला जातो. तो संपायच्या आधीच ‘भोंगे का हनुमान चालिसा’ हा प्रश्न उच्चरवात विचारला जातो. एक घटना मनात रुजायच्या आधीच दुसरी घडतेय. तुमच्या स्मृतीत कुठचीच गोष्ट टिकू दिली जात नाहीय.

अखलाखच्या झुंडबळीची घटना कधीतरी खूप मागे घडल्यासारखी वाटते. मुजफ्फरनगरची दंगल स्मृतीपटलावर अंधूक झाली आहे किंवा काहींच्या बाबतीत ती पुसली गेली आहे. ग्रॅहम स्टेन्सला त्याच्या दोन मुलांसह जिवंत जाळणारा दारासिंग तर आज कोणाच्या लक्षातही नाही. हे एक प्रकारे स्मृतींचं खच्चीकरण आहे. सलग अशी कोणतीच स्मृती उरणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. विलक्षण अशी मानसिक, भावनिक अस्थिरता निर्माण केली जात आहे. अगदी एका वाक्यात सांगायचे, तर प्रतिपक्षाची दमछाक केली जात आहे. मग स्मृती उरल्याच तर त्या तुकड्यातुकड्याने उरतात. सामान्यजनांना त्यांची एकत्र संगती लावणे अशक्य होते. स्मृती आठवल्याच तर त्या निर्जीव चित्रासारख्या आठवतात. त्यातला जिवंतपणा, त्यातले राग-लोभ, क्रिया-प्रतिक्रिया संपलेल्या असतात. ग्रॅहम स्टेन्स आठवा किंवा अखलाख आठवा, त्या वेळी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी, संबंधित एखादा फोटो नजरेसमोर येईल. बाकी फारसे तरंग मनात उमटणार नाहीत. स्मृती आहेही आणि नाहीही, ही अशी अवस्था म्हणजे स्मृतींचं खच्चीकरण आहे, असे मला वाटते.

खऱ्या स्मृतींच्या खच्चीकरणाबरोबरच खोट्या स्मृती रुजवण्याचं कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातून संपूर्ण समूहाची मिळून एक ‘मिथ्यास्मृती’ तयार केली जाते. त्यासाठी भाषेचाही अचूक वापर केला जातो, भाषिक राजकारण खेळले जाते. उदा. आर्यांचे आगमन आणि मुस्लिमांचे आक्रमण. आगमन आणि आक्रमण या दोन शब्दांमधून जे सूचित होते, ते असे की, आर्यांचे जे काही स्थलांतर झाले, ते निशःस्त्र, अगदी शांततामय मिरवणूक काढून झाले आणि मुस्लीम आले ते तलवारी परजत आले. यातून तलवारीच्या जोरावर मुस्लीम राजांनी, सरदारांनी धर्मांतरं केली, अशी एक मिथ्या स्मृती तयार केली जाते.

मुळात भारतात इस्लाम आला दक्षिण भारतात, तो अरब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आणि नंतर सूफी संतांच्या माध्यमातून. मुस्लीम राजवटीत काही ठिकाणी जबरदस्तीने धर्मांतरं झाली असतील. पण खरंच सरसकट तलवारीच्या जोरावर धर्मांतरं झाली असती, तर स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा देशातल्या हिंदूंची संख्या पन्नास टक्क्यांहून कमी असायला हवी होती. कारण जवळपास ७०० वर्षं भारतावर तुर्कांची, मोगल राजांची राजवट होती. पण स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेला हिंदू ८५ टक्के होते.

यासंदर्भातील दुसरी एक मिथ्यास्मृती म्हणजे मुस्लीम आक्रमकांमुळे हिंदूंमध्ये मुलींच्या बालविवाहाची प्रथा रूढ झाली. मुळात इस्लामची स्थापनाच झाली, ती सातव्या शतकात झाली आणि बालविवाहाचं समर्थन करणारे स्मृतीग्रंथ पहिल्या दुसऱ्या शतकातले आहेत. पण रेटून सातत्याने खोटं बोलत रहा आणि समूहमनात मिथ्यास्मृती निर्माण करा, हा उजव्या धमर्वादी विचारसरणीचा व्यूह आहे. आजही या दोन्ही गोष्टी त्यांच्या प्रचारकांकडून समूहमनात सातत्याने पेरल्या जात असतात.

स्मृतींचं खच्चीकरण, मिथ्यास्मृतींची पेरणी या प्रक्रियेत काही गैरसोयीच्या बाबी विस्मृतीत लोटल्या जातात. उदा. बौद्ध कालखंड. विविध प्रकारच्या शास्त्रांमधले, वैद्यकीय क्षेत्रातले नवीन शोध, विद्यापीठं, ज्ञानाच्या क्षेत्रातले त्या काळचे जागतिकीकरण हे सगळे बौद्ध कालखंडात घडले. हा खरा सुवर्णकाळ होता. पण त्याला सुवर्णकाळ न म्हणता वैदिक काळाला सुवर्णकाळ म्हटले जाते. म्हणजे एकीकडे मिथ्यास्मृती निर्माण करायची आणि दुसरीकडे बौद्ध कालखंडाच्या वैशिष्ट्यांना विस्मृतीत लोटायचे. आज इतिहासाचे फारसे वाचन नसलेल्या लोकांनाही गार्गी, मैत्रेयी ही नावे ऐकून माहीत असतात. कारण वेदकाळात या विदूषी होऊ न गेल्या असे सतत वेगवेगळ्या माध्यमातून सांगितले जाते.

गार्गी, मैत्रेयीबद्दल वैदिक विचारांच्या अभ्यासकांना जरूर आदर असावा. मात्र त्याच वेळी ही अभ्यासक मंडळी संघमित्रा हे नाव का उच्चारत नाहीत, हा प्रश्न उपस्थित करायला हवा. ज्या स्त्रीने दोन हजार वर्षांपूर्वी आपल्या भूभागाच्या सीमा ओलांडून धर्मप्रसाराचे काम केले, म्हणजेच त्यातील नीतीमूल्ये, तत्त्वज्ञान प्रसारित करण्याचे, त्यासंबंधी विचारविमर्श करण्याचे काम केले, तिचे नाव प्राचीन काळातील विदूषींची नावे घेताना घेतले जात नाही. ते विस्मृतीत लोटण्याचे प्रयत्न केले जातात. इथे जो काही इतिहास आहे तो वैदिक संस्कृतीचा आहे, हे वेगवेगळ्या मार्गाने प्रस्थापित करत राहणे, हे इथल्या वैदिक संस्कृतीचे सांस्कृतिक राजकारण आहे.

तर्कविसंगत मिथ्यासमर्थन हे या सांस्कृतिक राजकारणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तर्कविसंगत मिथ्यासमर्थन या संकल्पनेबाबत एरिक फ्रॉम या अभ्यासकाने ‘फिअर ऑफ फ्रीडम’ या आपल्या ग्रंथात मांडणी केली आहे. मिथ्यासमर्थानांमध्ये सत्याचा अभाव असतो, फक्त अस्तित्वात असलेल्या भावनिक पूर्वग्रहांना दृढ करण्याचे काम ती करत असतात. मिथ्यासमर्थनाच्या प्रक्रियेला सत्य शोधायचे नसते, तर अस्तित्त्वात असलेल्या वस्तुस्थितीबरोबर आपल्या स्वत:च्या इच्छांचा मेळ घालायचा असतो. आपली मतं वस्तुस्थितीवर लादायची असतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी हे छत्रपतींचे गुरू होते, हे असेच एक मिथ्यासमर्थन आहे. शुद्ध आर्यवंश हे नाझीवादाचे असेच एक मिथ्यासमर्थन होते. मिथ्यासमर्थनाची पुढची पायरी तर्कविसगंत मिथ्यासमर्थनाची असते. एरिक फ्रॉमने दिलेले तर्कविसंगत मिथ्यासमर्थनाचे पुढील उदाहरण आजच्या काळात जे काही चालले आहे, ते अधोरेखित करते. एरिक सांगतात, एका माणसाने आपल्या शेजाऱ्याकडून एक काचेचा प्याला विकत आणला. तो त्याच्या हातून फुटला. शेजाऱ्याने पेला परत मागितल्यावर त्याने उत्तर दिले, पहिली गोष्ट म्हणजे मी तो प्याला तुम्हाला या अगोदरच परत दिलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी तो प्याला तुमच्याकडून आणलेलाच नव्हता आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मला ज्या वेळेला तो प्याला दिला त्या वेळेला तो फुटलेलाच होता.

गेल्या काही वर्षात ही अशी चित्रविचित्र विधानं आपण सातत्याने ऐकत आहोत. ज्या काळात विजेचाही शोध लागलेला नव्हता, त्या काळात आमच्याकडे प्राचीन काळात प्लॅस्टिक सर्जरी होत होती, विमाने उडत होती, असे सांगितले जाते. पराकोटीची महागाई असताना, देशातील असहिष्णुता वाढलेली असताना ‘अच्छे दिन’ आलेले आहेत, असे ठामपणे सांगितले जाते. चिकित्सक विचारशक्तीचे दमन करणे हा सांस्कृतिक राजकारणातला मुख्य अजेंडा असतो.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा