मुस्लीमद्वेष हा मुख्य सामाजिक आणि राजकीय विचार बनत चालला आहे... इतक्या टोकाच्या राजकीय विचारांच्या काळात आपण जगत आहोत...
पडघम - साहित्य संमेलन विशेष
अंजुम कादरी
  • १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, उदगीर, जि. लातूर
  • Sat , 23 April 2022
  • पडघम साहित्य संमेलन विशेष १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 16th Vidrohi Marathi Sahitya Sammelan अंजुम कादरी Anjum Kadri

उदगीर, जि. लातूर इथं आजपासून १६वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन सुरू झाले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष मराठीतील प्रसिद्ध कवी गणेश विसपुते, तर स्वागताध्यक्ष डॉ. अंजुम कादरी या आहेत. प्रथमच एक मुस्लीम महिला या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवडली गेलीय. प्राप्त राजकीय, सामाजिक परिस्थितीत एका मुस्लीम महिलेच्या नेतृत्वात होणारे हे संमेलन ‘ऐतिहासिक’ आहे. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून केलेले भाषणदेखील भूमिकेच्या बाबतीत खूप धाडसी आहे. ते संपूर्ण भाषण...

..................................................................................................................................................................

१६व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी आलेल्या तमाम रसिक, वाचक, श्रोते आणि चळवळीतील कार्यकर्त्यांचे उदगीरच्या ऐतिहासिक भूमीत मी स्वागत करते. माणसाच्या विकासाचं तत्त्वज्ञान सांगणारे उदयगिरी महाराज आणि सुफी हजरत शाह मोहम्मद कादरी यांची ही कर्मभूमी आहे. अनेक संस्कृतींना आणि मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या विचारांना उदगीरने आपल्यात सामावून घेतले आहे. त्यामुळे उदगीरमध्ये सांस्कृतिक बहुलता आढळते. या शहरात बहुसांस्कृतिकतेच्या संकल्पनेवर आधारीत हे संमेलन होत आहे. उदगीर जशी मराठी बोलणाऱ्यांची माउली, तशी ती कानडी, उर्दू, दखनी बोलणाऱ्यांची आश्रयभूमी आहे.  उदगीरपासून अवघ्या काही मैलांच्या अंतरावर समताशिरोमणी बसवण्णांची कल्याणनगरी आहे. त्यांनी दयेवर आधारित धर्माची संकल्पना मांडली. दयेशिवाय, प्रेमाशिवाय धर्म असू शकत नाही, हे सांगताना ते म्हणतात,

‘‘दये इल्लद धर्म याउदय्या

दयेवे बेकु सकल प्राणीगळेरल्ली

दये वे धर्मद मुलवय्या’’

हाच बसवण्णांचा दयाभाव दखनीतही अवतरला. दखनीचा ग़ालिब असणाऱ्या मुल्ला गवासीने जिथे चिरनिद्रा घेतली, ते निलंगा शहर बसवकल्याणप्रमाणेच उदगीरची सांस्कृतिक पाठराखण करत आले आहे. मराठी प्रागतिक विचारांच्या चळवळीचे नेतृत्व करणारे ना.य. डोळे आणि सुफी तत्त्वज्ञानाला नवी दिशा देणारे कुतूब-ए-दखन मौलाना अ. गफूर कुरैशी यांच्यासारखे सुपूत्र या उदगीरनगरीने घडवले आहेत. शिवलींग शिवाचार्य महाराजांनीही याच उदगीर परिसरात आपल्या कर्तृत्वाची मुहूर्तमेढ रोवली. मराठी माउलीसारखेच प्रेम कानडी आणि उर्दू या आमच्या मावश्यांनीही उदगीरवर केले आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

उदगीरची मराठीतील साहित्यनिर्मिती पुरोगामी विचारांना अधोरेखित करणारी आहे. तर उर्दू साहित्यानेही मानवी जाणिवांना पुन्हा बळ दिले आहे. उदगीरच्या भूगोलात वसलेल्या लोकसंस्कृतीतूनच उर्दूची आई असणाऱ्या दखनीचा जन्म झाला आहे. दखनी अस्मितेचा आग्रह धरत हसन गंगू बहामनी यांनी उत्तरेच्या आक्रमणाला रोखले. आणि उदगीरच्या नजीक बिदरला आपली राजधानी स्थापन केली. या राजधानीतच महमूद गवान यांनी जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापीठातूनच कालांतराने दखनीला समृद्ध करणाऱ्या मुल्ला शजी, वजालती, अहमद बगदादी, शाज नुरीसारखे साहित्यिक जन्मले. आणि दखनभूमीला त्यांनी समृद्ध केले. दखनी राष्ट्रवादाला जन्म दिला. मुल्ला वजहीसारखा शायर दखनीत दखनभूमीविषयी म्हणतो –

‘‘दखन सा नई ठार संसार में

पंज फजीला का हैं ठार में

दखन हैं नगीना, अंगुठी हैं जग,

अंगुठी कूं हरमत नगीना है लग।

के सब मुल्क सर, होर दखन ताज हैं।’’

अशी बहुसांस्कृतिकता असलेल्या दखनेने कधीही धार्मिक भेदभावाला थारा दिला नाही. इथे तुकाराम महाराजांचे गुरू शेख चांद बोधले होते, तर लाडले मशायख यांना ‘चैतन्यस्वामी’ म्हणून हिंदूनी आपलेसे केले आहे. बंदानवाज यांचा ‘चक्कीनामा’ असो वा त्यांचे वडील राजू खत्ताल यांचा ‘सुहागननामा’ हे सारे ग्रंथ दखनी अस्मितेसह हिंदू-मुस्लीम एकतेची साक्ष देतात.

‘शेख महंमद अविंध त्याच्या हृदयी गोविंद’ म्हणणारे शेख महंमद असो वा जंगली महाराज म्हणून नावारूपाला आलेले जंगलशाह कादरी, हे सारेच दखनी समाजाने मानवी समाजाला दिलेले हिरे आहेत. शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी असणारे बाबा याकुत आणि शाहू महाराजांच्या दरबारातील लहरी हैदर, हे दखनी भीमा-कृष्णा प्रेम संस्कृतीतील हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक आहेत.

त्यामुळेच दखनेत निर्माण झालेल्या मुस्लीम सत्तादेखील सहिष्णू होत्या. आदिलशाहीसारखी प्रमुख राजवट बिदरच्या आश्रयाला आलेल्या युसुफ शाहनेच स्थापन केली होती. उदगीरला तो अनेक दिवस वास्तव्याला होता. म्हणूनच त्याच्या आदिलशाही राजघराण्यात मल्लू आदिलशाह, पार्वती आदिलशाह, किशोर आदिलशाह, अशी हिंदू संस्कृतीशी समन्वयाची भूमिका घेणारी नावे आढळतात. बिदरमधूनच कुतूबशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली. कुतूबशाही हीच खऱ्या अर्थाने दखनी भाषेची आश्रयदाती राजवट होती. पण कालांतराने उत्तरेच्या आक्रमणापुढे दखनी राजवटी कोसळल्या, पण दखनेतला सद्‌भाव संपला नाही. दखन ही खऱ्या अर्थाने माणुसकीची, माणसांची भूमी आहे. आणि उदगीर हे दखनेच्या सर्व सांस्कृतिक राजकीय घडामोडींचे केंद्र राहिले आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

त्यामुळे इथे होणारे हे संमेलन ऐतिहासिक ठरले आहे. त्यासोबतच या संमेलनाला वर्तमानातील अतिशय गंभीर अशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभली आहे. केंद्रातील सत्ता मानवी समाजाला काळीमा फासत आहे. अमीर खुसरोंच्या स्वप्नातील माणसाचा हा देश या सत्तेने झुंडीच्या हवाली केला आहे. आसिफासारख्या कोवळ्या लेकरावर बलात्कार करणाऱ्यांच्या समर्थनार्थ देशात तिरंगा रॅली काढली जात आहे, तर झुंडहत्येतील आरोपीच्या प्रेतावर तिरंगा पांघरला जात आहे. ज्या तिरंग्याला लाल किल्ल्यावरील युनियन जॅकच्या ठिकाणी फडकवण्यासाठी मुस्लीम समाजातील हजारो सुपुत्रांनी प्राण दिले, त्याच समाजाला आज सामाजिक न्यायापासून वंचित ठेवले जात आहे. ही भूमी जशी गांधींची, तशी ती मौलाना आझादांची आहे. जशी शिवाजी महाराजांची, तशी टिपू सुलतानची आहे. जशी भगतसिंगची, तशी ती हुतात्मा कुर्बान हुसैन यांचीही आहे. पण आता मुस्लिमद्वेषापोटी या सर्व इतिहासातून एका विशिष्ट समाजाला वगळले जात आहे.

मुस्लीमद्वेष हा मुख्य सामाजिक आणि राजकीय विचार बनत चालला आहे. मागे नागरिकत्व सुधारणा कायद्यातून अशाच पद्धतीने मुस्लिमांना नागरिकत्वापासून रोखण्याचा प्रयत्न झाला. राजकीय निर्णय प्रक्रियेतून मुस्लीम समाजाला बाद ठरवण्यात आले आहे. इतक्या टोकाच्या राजकीय विचारांच्या काळात आपण जगत आहोत. तेव्हा पुरोगामी, डावे आणि मानवतावादी म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. उदगीर शहराने सातत्याने या झुंडशाहीचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक समतेच्या चळवळींची पाठराखण केली आहे. याच शहरात शाहीनबागच्या धरतीवर माझ्या नेतृत्वाखाली गांधीबाग आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवले आहे. देशभरातील विद्यार्थी नेते, क्रांतिकारी शाहीर, कवींनी ७० दिवस चाललेल्या या आंदोलनाला भेटी दिल्या आहेत.

या आंदोलनातून उभ्या राहिलेल्या माझ्यासारख्या प्रासंगिक मुस्लीम महिला नेतृत्वाला विद्रोही सांस्कृतिक चळवळीने सांस्कृतिक नेतृत्व दिले आहे. ही खरी तर माझ्यासाठी भारावून टाकणारी अतिशय भावूक घटना आहे. पुरुषी वर्चस्ववादाने ग्रासलेल्या समाजासमोर महिलेचे नेतृत्व पुढे केले जातेय, ही परिवर्तनवादी घटना आहे. भारतीय महिलांसाठी ती एका दृष्टीने सामाजिक न्यायाची आहे. तर दुसऱ्या बाजूने राजकीय-सामाजिक अस्पृश्यता लादल्या जात असलेल्या मुस्लीम समाजासाठी ही सन्मानाची बाब आहे.

उदगीर हे पूर्वी हैदराबाद संस्थानातील एक महत्त्वाचे शहर होते. बिस्मिल्ला बिलग्रामी नावाच्या आमच्या माउलीने १८३० मध्ये स्त्री शिक्षणासाठी सामाजिक न्यायाची भूमिका घेतली. तिच्या बंडाचा आवाज उदगीरपर्यंत ऐकू आला होता. आणि त्याच बंडाची परिणीती आज मुस्लीम महिलेला सांस्कृतिक नेतृत्व प्रदान करण्यात झाली आहे, असे मी मानते. हा माझा एकटीचा सन्मान नसून बिस्मिल्ला बिलग्रामी, सावित्रीमाई, बेगम हजरत महल, मुक्ता साळवे, रमाईचा सन्मान असल्याचे मी मानते.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीने नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेतली आहे. सांस्कृतिक न्यायासाठी विद्रोही चळवळीने लढा दिला आहे. एक मुसलमान महिला म्हणून मी माझ्या समाजाच्या सांस्कृतिक प्रतिनिधीत्वाची मागणी येथे करत आहे. हे सांस्कृतिक प्रतिनिधीत्व शहरांच्या नामकरणातून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

औरंगाबादचे नामांतर हे त्याचाच एक भाग आहे. मी या संमेलनाची स्वागताध्यक्ष म्हणून त्या नामकरणाला विरोध करते. कारण औरंगाबाद शहर हे खऱ्या अर्थाने दखनी मुस्लिमांचे सांस्कृतिक केंद्र आहे. त्या शहरातूनच दखनी मुस्लीम समाजाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेथे दखनी मुस्लीम संस्कृतीच्या समतेचे प्रतीक असणाऱ्या मलिक अंबर यांची समाधी आहे. सातशे सुफी संतांनी या भूमीतूनच आपल्या कार्याला सुरुवात केली होती. हे शहर वसवण्यासाठी मुस्लीम समाजाने प्रचंड योगदान दिले आहे. किंबहूना हे शहर दखनी मुस्लीम संस्कृतीची ओळख आणि अस्मिता आहे. त्यामुळे त्याचे नामकरण करणे याचा अर्थ दखनी मुस्लीम समाजाशी सांस्कृतिक विषमतेचा व्यवहार करण्यासारखे होईल. जर औरंगाबादचे नाव बदलायचेच असेल, तर त्याला ज्येष्ठ विचारवंत शरद पाटील यांच्या सूचनेप्रमाणे मलिक अंबरची स्मृती म्हणून अंबराबाद हे नाव देणे, संयुक्तीक ठरेल. त्यासोबतच मी या विचारपीठावरून कर्नाटकातील कलबुर्गी आणि विजयपुरा या शहरांना त्यांचे जुने नाव बहाल करण्याची मागणी करत आहे.

उदगीर शहर पूर्वी हैदराबाद प्रांतात होते. ऑपरेशन पोलोद्वारे त्याचे विलिनीकरण करण्यात आले. त्या वेळी उसळलेल्या हिंसाचारात दखनी मुस्लीम समाजावर मोठे अत्याचार झाले. त्या अत्याचाराचा अभ्यास करण्यासाठी सुंदरलाल कमिटीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने प्रचंड कागदपत्रे गोळा करुन, सखोल संशोधनाद्वारे अहवाल सादर केला होता. हा अहवाल आजही जाहीर केलेला नाही. विलिनीकरणाचे रौप्यमहोत्सव पुढील वर्षी सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दखनी मुस्लीम समाजासोबत न्यायाची भूमिका भारत सरकारने घ्यायला हवी.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

विलिनीकरणापासून आजपर्यंत मराठवाड्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढलेला नाही. उदगीर शहराच्या पाण्याचा प्रश्न असेल अथवा नागरी सुविधांचा मागील ७५ वर्षात तो सुटलेला नाही. उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. रोजगार नसल्याने येथील युवकांना पुणे–मुंबईसारख्या शहरात स्थलांतरीत व्हावे लागत आहे. रोजगाराच्या संधी येथे उपलब्ध झाल्या नाहीत, तर स्थलांतरितांचे लोंढे वाढतील. आणि मराठवाडा अधिकाधिक बकाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारने या मुद्द्यांकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाच्या नव्या संधी येथे निर्माण झाल्या पाहिजेत. मराठवाड्याची संस्कृती जपण्यासाठी बसव-सुफी संस्कृती विद्यापीठाची स्थापना उदगीर येथे व्हावी, अशी मागणी मी या संमेलनाची स्वागताध्यक्ष या नात्याने करत आहे.

सरतेशेवटी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला दिली, त्याबद्दल मी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे आभार मानते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......