‘‘कुठलीही विचारसरणी कलेला दावणीला बांधून तिच्या माध्यमातून आपले मुद्दे राबवू पाहतेच, पण सर्जनशील कलाकाराने असे कोणाच्या गोठ्यात बिल्ला लावून उभे राहू नये!’’
पडघम - साहित्य संमेलन विशेष
सोनाली नवांगुळ
  • ‘लेखक आणि लोकशाही मूल्ये’ या विषयावरील परिसंवादाचे एक छायाचित्र
  • Sat , 23 April 2022
  • पडघम साहित्य संमेलन विशेष ९५वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन उदगीर 95th A. B. Marathi Sahitya Sammelan संमेलनाध्यक्ष Sammelanadhyaksha साहित्य संमेलन Sahitya Sammelan

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कालपासून उदगीर, जिल्हा लातूर इथं सुरू झालं आहे. उद्या या संमेलनाचा समारोप होईल. या संमेलनात काल संध्याकाळी ‘लेखक आणि लोकशाही मूल्ये’ या विषयावर परिसंवाद झाला. पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर, लेखिका-अनुवाद सोनाली नवागुंळ, नाटककार राजकुमार तांगडे, पत्रकार हलिमा कुरेशी, साहित्य-अभ्यासक दिलीप चव्हाण आणि शिक्षण-अभ्यासक हेमांगी जोशी हे वक्ते यात सहभागी झाले, तर ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे डॉ. दीपक पवार यांनी सूत्रसंचालन केले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने झालेल्या या परिसंवादातले सोनाली नवांगुंळ यांचे हे लिखित भाषण...

..................................................................................................................................................................

सर्वसामान्य माणूस या नात्यानं कुठल्याही विषयाला विरोध आणि समर्थन अशा दोन पातळ्यांवर आपण भिडत असतो. लेखक, कलावंतही याला अपवाद नाहीत. धरणांमुळं झालेलं विस्थापन-स्थलांतर या पातळीवर सामाजिक न्यायाच्या अंगानं व्यक्त होणारे असतात, तसे धरणातून होणार्‍या आर्थिक विकासाची मांडणी करणारेही असतात. मुळातच लोकशाही ही सातत्याने हस्तक्षेपाची गरज असणारी व्यवस्था आहे. तिथं दोहोबाजूच्या चर्चांना स्थान असतं, चर्चेचं स्वागत असतं. वर्तमानपत्रं, चॅनल्स आणि सोशल मीडियाच्या अर्धकच्च्या व बहुतकरून एकांगी प्लॅटफॉर्मस्च्या आधारे अलीकडं पुष्कळ माणसं आपली मतं, प्रतिक्रिया बनवताहेत. अशा काळात सजगपणानं चर्चा आणि चिकित्सा करणं आणि त्यासाठी जोखीम पत्करणं, ही गोष्ट कधी नव्हे इतकी महत्त्वाची होऊन बसली आहे. 

परवा एका कार्यक्रमाला गेले होते. तिथं राजकीय जाण नि सामाजिक भान बर्‍यापैकी असणारा मनुष्य म्हणून ख्याती असलेले एक गृहस्थ भेटले. मला बरीच वर्ष ओळखणारे. बोलणं झालं. मी ‘लोकशाही संवादा’त सहभागी होण्यासाठी उदगीरला निघालेय कळताच म्हणाले, ‘आम्हाला सांगत जा, गाडीत एखादी सीट असेल रिकामी तर. पण एक बाकी आहे, आम्ही नुसते येणार, तुझं ‘करणं’ काही आम्हाला आता वयाच्या मानानं झेपणार नाही!’ ‘करणं’ या शब्दावर मला संतापायला होणं साहजिकच होतं, पण संवादावर भर द्यायचा, असं मनाशी असंख्य वेळा आळवून झालं असल्यामुळे आणि तेच समंजस लोकशाहीवादी शिक्षणात बसत असल्यामुळे मी शांतपणानं उत्तर दिलं- ‘अहो, शरीरानं जरा वेगळ्या असणार्‍या माणसांचं नेहमीच काही ‘करावं’ लागतं असं नसतं. उलट ‘परावलंबी, निष्क्रिय, निरुपयोगी, अडगळ’ असा आरोप लादल्यामुळे अशी बहुसंख्य विकलांग माणसं झेपतं, त्यापेक्षा जादाच कष्ट करून स्वत:ला स्वावलंबी करत असतात. दिसताना हाडं किती का वाकडीतिकडी दिसेनात, स्वत:ला ताठ ठेवू बघतात. अपंगत्व ही शारीरिक स्थिती आहे, आजार नव्हे! इतक्यांदा मी हे बोलून झालंय, तुम्ही ऐकून झालंय. सजग म्हणवणार्‍या तुमच्यासारख्यांनी तरी अपंगत्व असणार्‍या माणसांसंबंधीच्या साचेबद्ध प्रतिमांमधून बाहेर पडायला नको काय?’

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

- अपंग, त्यात पुन्हा स्त्री आणि पुन्हा मिळवती, ठरवती स्वाभिमानी स्त्री हा प्रवास वरून पुरोगामी-सुधारणावादी परंतु आतून सरंजामी वृत्तीच्या पुरुषसत्ताक समाजात अतीच खडतर! त्यामुळे हा बोलत-लिहीत राहण्याचा प्रवास सारखाच करावा लागतो. सातत्यानं न थकता करावा लागतो. आज ते करण्याचं धारिष्ट्य मला लोकशाही व्यवस्थेनं दिलं आहे. मात्र या व्यवस्थेत वेगळ्या माणसांना समजून घेणारी, त्यांना फुलायचा अवकाश देणारी, त्यांच्या वेगळेपणाचं स्तोन न माजवणारी, उदात्तीकरण न करणारी, शिवाय त्यांना एकटंही न पाडणारी शिक्षण व्यवस्था अथकपणे घडवत राहावी लागते. हे शिक्षण औपचारिकसुद्धा आणि अनौपचारिक म्हणजे जगण्यातून व अनुभवातून पोसलं गेलेलंसुद्धा! प्रश्‍न असा आहे की, शारीरिक किंवा मानसिक दुर्बलता असणार्‍या आणि वेगवेगळ्या कारणांमुळे अल्पसंख्याक असणार्‍या अशा सगळ्या समूहांना ही शिक्षणाची, सहभागाची, संवादाची, उत्कर्ष साधण्याची जमीन उपलब्ध आहे का? आज माझ्या हातात पेन आहे, कीबोर्ड आहे... ज्या वेळी यांच्या ताकदीची कल्पना नव्हती, तेव्हाही नकळत किंवा कळत वाट्याला आलेली लोकशाही मला काय देत होती, हे किंचित मागं वळून बघावं असं वाटतं आहे.

मला माझं लहानपण एखाद्या सिनेमासारखं आठवतं. चालतं-बागडतं, शाळेत जाणारं, ओढ्याकाठी रेंगाळणारं असं बालपण एका लहानशा अपघातात थांबून गेलं. शरीर नऊ वर्षांच्या लहान मुलीचंच राहिलं, पण अचानक जागेवर खिळल्यानं वाहतं जगणं थांबलं. त्या वेळी कुठलं साचे मोडणं ठाऊक होतं नि कसली मूल्यं कळत होती! मात्र आईबाप मध्यमवर्गीय आणि शिक्षक असणारे. दोन्ही मुलींवर संतती थांबवण्याइतकं भान असणारे. त्यांनी मुंबईच्या मोठ्या दवाखान्यात उपचार करवले. तिथं निम्न आर्थिक गटात मोडणार्‍या पेशंटसाठी काही राखीव खाटा होत्या. मोडलेल्या लहानग्या देहाची शक्य तितकी दुरुस्ती करवून दीड वर्षांनी त्यांनी मला गावी पाठवलं.

आर्थिक उदारीकरण होऊन देशाची दारं जगासाठी उघडली जाणं आणि मी पारंपरिक रचनेच्या पायर्‍या-उंबरठ्यांच्या घरात, अपंगत्वाबद्दलची झापडबंद समज असणार्‍या खेडेगावात येऊन बंद होणं, हे एकाच वेळी घडलं. त्या वेळच्या एकटेपणाच्या बेटावर रंगीत टीव्ही आणि त्यावर लागणारी भरपूर चॅनल्स यांनी सोबत केली. प्रचंड भरपूर पसरून राहिलेला काळ संपवत न्यायची सोय, घरच्या कट्ट्यावर निवांतपणी गप्पा मारणार्‍या बायकांनी, वर्षातून दोनदा ओढ्याकाठी येणार्‍या मेंढपाळांनी, डुकरं पकडण्यासाठी येणार्‍या माणसांनी, जवळच्या देवळात पाया पडायला येणार्‍या भाविकांनी केली होती. नंतर कधीतरी शाळेत जाऊन बघितलं.

वयाच्या १४ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींना सक्तीच्या मोफत शिक्षणाच्या हक्काची तरतूद आपल्या घटनेनं केली आहे. मात्र वेगळ्या माणसांविषयी उदार दृष्टीकोन, मैत्रीपूर्ण पायाभूत सुविधा, या पातळीपर्यंत हे शिक्षण झिरपलं नसल्यामुळे मी तिथं थांबू शकले नाही. आपण चालत नाही, आपल्याला लघवी-संडास कपड्यात होते, आपण इतरांपेक्षा शरीरानं खुरटलो आहोत, या न्यूनगंडामुळे आणि माझ्याच वयाच्या मुलींचं चिडवणं, नजरांनी लाजवून टाकणं सहन न झाल्यामुळे मी शाळा-कॉलेजात गेले नाही. योग्य अशा कृत्रिम साधनांसह आपल्याला शिकायचं, खेळायचं आहे, अशा ठिकाणी विनाअडथळा जाता येणं, जगण्याचा रेटा सगळ्या अंगांनी समजून घेत वाढणं हुकून गेलं. माणूस म्हणून असलेल्या हक्काच्या अशा गोष्टी हुकून जाणं किती तर्‍हेचं असतं, हे आज प्रौढ माणूस म्हणून आसपास बघताना लक्षात येतंय.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

माझं शिराळा गाव सोडून मी अपंगांच्या पुनर्वसनासाठी १५ वर्षं कार्यरत असणार्‍या एका एनजीओत प्रवेश घेतला. कारण स्वावलंबी होण्यासाठी आपल्या लोकशाही रचनेत माझ्यासारख्यांसाठी अवकाश नव्हता व अवकाशही नव्हता. ‘स्त्रीदेहाचं जाहिरात युगात कसं वस्तुकरण होत चाललंय!’ अशी शब्दफेक ठाऊक नव्हती, त्या काळात तर्‍हतर्‍हेचे अपंग देह प्रदर्शनात ठेवल्यासारखे संस्थेच्या वास्तूभर विखरून ठेवायचे आणि त्यांच्या गरजा, गुण, त्यांचं ‘डाऊनट्रोडन’ असणं देणगीदार व हितचिंतकांना विकत समाजासाठी वाहून घेतल्याचे पुरस्कार कमवत राहायचे, ही वृत्ती बघितली. उबग आला. माणसांमधल्या गिल्टवर, सहानुभूतीवर, पाप-पुण्याच्या कल्पनेवर फोकस करत आणि ‘आपण एका मोठ्या कामात फूल ना फुलाची पाकळी म्हणून साथ देतो आहोत’ असं फसवं समाधान पेट्रन्सना पुरेपूर मिळावं, याची नीती आखत चिकार पैसा कसा कमावला जातो आणि तो प्रत्यक्ष मूलभूत पुनर्वसनाच्या कामी न लागता आणखी देणग्या मिळवण्यासाठी मोठमोठी भवनं बांधण्यात कसा खर्च पडतो, हे मला पाहता आलं. त्याबद्दल प्रश्‍न विचारण्याची जोखीम मी पत्करली. ‘सकारात्मक गोष्टीच बोलूया!’ या रोगानं बाधित झालेल्या मोठमोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि संस्थेच्या बड्या हितचिंतकांच्या रोषाची बळी ठरले.

हा संघर्ष या थोरा-मोठ्यांनी माझा आणि संस्थेच्या खाजगी मानापमानाचा, शिवाय माझ्या लहानवयातील असमंजसतेचा विषय करून टाकला. मला खरं तर नैतिक पातळीवरचं वर्तन दुटप्पी झाल्यामुळे सगळाच कसा व्यापार होऊन बसतो, या व्यापक विषयावर काहीतरी सांगायचं होतं. अपंग व्यक्तींना लाभणार्‍या जीवनाच्या गुणवत्तेबद्दल चर्चा करायची होती. मात्र प्रत्येक लाभार्थी आणि प्रशिक्षणार्थी आपल्या मताचाच व आपली आज्ञा शिरसावंद्य असणारा असायला हवा किंवा असतो, या संस्थेच्या माजोरी विश्‍वासाला तडा गेला होता.

जगण्याची असुरक्षितता आणि परीघावर ढकललं जाण्याची किंमत सोसून अशी चित्रं पाहत, सांगत, बोलत-लिहीत राहायची असा निर्णय मी लेखक नसतानाही घेऊ शकले होते. त्यामुळेच लिहिती झाल्यावर निरनिराळ्या पातळीवरच्या भ्रष्ट आचरणाकडे डोळे रोखून बघणं, सत्ताधार्‍यांना न भिता व त्यांचे अंकित न राहता सत्य सांगणं, संस्था-संघटना व व्यक्तींकडे बघण्याचा साचा मोडणं, शोषण कोणकोणत्या तर्‍हांचं होतं ते ओळखून त्यावर बोट ठेवणं, घटनांचे अर्थ लावणं व सर्व पातळ्यांवरच्या शोषित, वंचितांकडे बघता येणं, ही गोष्ट कधी नकळत, तर कधी कळत होत गेली. लसलसणारी शहाणी संवेदनशीलता अशी तयार होत गेली की, तिला विषयांचं बंधन नसतं, जातीपातीचा व धर्माचा अडसर नसतो. ती भेदाभेद ओळखते, संमोहित व गुंग होणं नाकारते. कांद्याच्या पापुद्रयांसारखे घटनेचे पदर जोखण्याची पात्रता घडवण्यासाठी सतत श्रम घेते.

सलमा या बंडखोर तमिळ लेखिकेनं लिहिलेल्या कादंबरीचा अनुवाद करताना धर्माचे ठेकेदार आणि पुरुषसत्तेमुळे उंबरठ्याआत अडकलेल्या स्त्रियांचं भावविश्‍व मला कळलं. मासिक पाळी झाल्यावर शाळेत जायला बंदी, सिनेमा बघायला बंदी, स्वच्छंदपणे उंबरा ओलांडून मैदानावर खेळायला जायला बंदी, इतकंच काय स्वत:चं हक्काचं शरीर आरशात न्याहाळायलाही बंदी! या बंदीची कितीतरी गुदमरवणारी रूपं सोसणार्‍या या बायका आपल्या त्रोटक अवकाशात स्वातंत्र्यासाठी शक्तीनिशी धडका मारतात!

ही धडक महत्त्वाची. या धडकेची नोंद महत्त्वाची, हे मला लेखक म्हणून जास्त स्पष्टपणानं कळत गेलं. सलमानं कादंबरीत चितारलेल्या लहानमोठ्या वयाच्या बायका आणि पुरुषसत्तेचा बळी झालेले पुरुष ही तिच्या खरोखरीच्या जगातली जिवंत हाडामांसाची माणसं होती. त्यांना आवाज नव्हता किंवा आवाज पोहोचवण्याचं कौशल्य नव्हतं, माध्यम नव्हतं. सलमा तो आवाज बनली! त्यांच्या उद्गाराचं माध्यम बनली. त्यासाठी तिला जिवे मारण्याच्या, बदनामीच्या, बलात्काराच्या, विद्रूपीकरणाच्या धमक्या आल्या. ती बधली नाही. घाबरली नाही. समाजातील सत्तास्थानं, मग ती राजकीय असोत की सामाजिक किंवा कौटुंबिक - ती सत्तास्थानं आवाज दाबत असतील तर दुप्पट ताकदीनं मात्र अहिंसक मार्गानं, विवेकाचा सूर लावत अभ्यासपूर्ण पद्धतीनं आपलं म्हणणं हरतर्‍हेनं सांगत राहायचं, हा निर्णय तिनं घेतला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

- लेखकाला हा निर्णय घ्यावा लागतो. तो निर्णय घेणं व निभावणं ही जबाबदारी असते. अनुभवांच्या कडवटपणाच्या निवेदनासोबत शहाणपणानं दिशादर्शनही करावं लागतं. फाळणीनंतर उसळलेल्या जातीय विद्वेषाच्या वणव्याचा अनुभव घेतलेल्या भीष्म साहनींनी ‘तमस’मध्ये काय केलं ते आपण पाहिलं आहे. कृष्णा सोबतींचं ‘लेखक का जनतंत्र’ या पुस्तकातलं एक वाक्यही सांगावंसं वाटतंय, “मैं उन खौफनाक वक्तों की पौध हूं, विभाजन को झेले हुए हूं, फिर भी बांटना चाहती हूं आपसे कि मेरी धर्मनिरपेक्षता को पिछले पचास वर्षों में शक-सुबह से किसी सांप्रदायिकताने जखमी नहीं किया!”

आजच्या अवकाशात या धर्मनिरपेक्षतेचं काय होऊन बसलंय? ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकरांच्या संपादकीय मार्गदर्शनातून ‘जेव्हा मुंबई जळत होती’ नावानं भारताच्या एका विद्रूप इतिहासाचं दस्तावेजीकरण केलं आहे. ६ डिसेंबर १९९२पासून ६ जानेवारी १९९३ पर्यंतचं सूडनाट्य त्यात नोंदलं गेलं आहे. त्यातल्या एका भागात या काळाचं वर्णन असं आहे : “शस्त्रांच्या आणि दंगलीच्या गदारोळात शहाणपणाचे चार शब्द विरून जावेत असाच तो काळ होता. त्या कालखंडात सत्याची जागा पूर्वग्रहांनी, सूज्ञतेची जागा उन्मादाने, धर्माची जागा माथेफिरूपणाने आणि इतिहासाची जागा अफवांनी घेतली होती. आपापल्या धर्मातील मूलभूत शिकवणुकीचा हिंदू व मुसलमान या दोघांनाही विसर पडला आणि अतिरेकी प्रवृत्तीचे नेते जे काही सांगतील, ते खरेच असले पाहिजे, असे मानण्यात येऊ लागले. धर्माच्या नावाखाली धर्मबाह्य वर्तनाला ऊत आला. - हे सारे संपले आहे असे मानायचे कारण नाही. काल जे घडले, ते उद्या, परवा, पुन:पुन्हा घडू शकेल.” - आज ३० वर्षांनीसुद्धा हे सांगणं आजच्या काळासाठी अधिकच ज्वलंत आहे, असं नाही वाटत?

बुरखे, आरत्या, अजान अशी निमित्तं वापरून दहशतवादी गटांना लाजवतील, अशी अफवाकेंद्रे सोशल मीडिया होऊन बसली आहेत. बहुतेक जनता आभासी वादविवाद आणि प्रतीकात्मक खेळांत दिवसेंदिवस गुंतून पडल्यामुळे अस्मितांचं कार्ड खेळणं राजकीय महत्त्वाकांक्षा असणार्‍यांना अधिक सोपं झालं आहे. सध्याचा काळ शाब्दिक फुले उडवण्याचा असल्यामुळे मूलभूत संकल्पनांची जागा दुय्यम स्वरूपाच्या आणि अलंकारिक शब्दांनी घेतली आहे. त्यातून आजच्या विज्ञानवादी काळात ‘दिव्यांग’सारखा चमत्कारिक व उदात्तीकरण करणारा शब्द येतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सोशल मीडियावर मेंदूला सतत ‘हॅपनिंग’ची चटक जडलेली उतावीळ जनता ‘काम दाखवा’ म्हणण्यापेक्षा शब्दांच्या खेळात रमते, त्यामागचा तर्क, राजकारण आणि दिशा बघत नाही. आभासी जगात शेकडो-हजारो मनुष्यदिवस वाया घालवण्याची चैन आपल्या देशाला परवडण्यासारखी नाही. प्रतीकात्मक नव्हे प्रत्यक्ष कृतीची गरज लोकशाही टिकवण्यासाठी जरुरी असते. ‘लोकशाही आणि स्वातंत्र्य हे समानार्थी शब्द नव्हे, जुलमी राज्यकर्ते निवडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, एवढेच काय ते प्रौढ मतदान पद्धतीने सिद्ध होते’ असं नानी पालखीवालांच्या पुस्तकात वाचलेलं मी मनाशी घोकते आहे.

अतुल पेठेचं वाक्य उद्धृत करून मी थांबेन. ‘कुठलीही विचारसरणी कलेला दावणीला बांधून तिच्या माध्यमातून आपले मुद्दे राबवू पाहतेच, पण सर्जनशील कलाकाराने असे कोणाच्या गोठ्यात बिल्ला लावून उभे राहू नये!’

तर समस्त सर्जनशील लेखकांना आणि कलावंतांना माणसांच्या संघर्षाकडे, सोसण्याकडे त्यांच्या नजरेतून बघावं लागतं. माणसांच्या मनात त्यांच्यासाठी एक विशिष्ट अनुकूल जागा आहे! ती जागा, ती पॉवर नीट वापरावी लागणार...

..................................................................................................................................................................

लेखिका सोनाली नवांगुळ स्तंभलेखिका, अनुवादक, मुलाखतकार आणि गप्पिष्ट आहेत.

sonali.navangul@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा