साधनेच्या काळात लेखक अस्वस्थ भावदशेतून प्रवास करतो. तो स्वत:तल्या अस्वस्थतेच्या ‘टोकदार शिंगाच्या बैलाशी’ झुंज देतो
पडघम - साहित्य संमेलन विशेष
भारत सासणे
  • संमेलनाध्यक्ष भारत सासणे आणि उदगीर संमेलनाचे बोधचिन्ह
  • Sat , 23 April 2022
  • पडघम साहित्य संमेलन विशेष ९५वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन उदगीर 95th A. B. Marathi Sahitya Sammelan संमेलनाध्यक्ष Sammelanadhyaksha साहित्य संमेलन SahityaSammelan भारत सासणे Bharat Sasne

९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कालपासून उदगीर, जिल्हा लातूर इथं सुरू झालं आहे. उद्या या संमेलनाचा समारोप होईल. या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कथा-कादंबरीकार भारत सासणे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा पहिला संपादित अंश...

..................................................................................................................................................................

मित्रहो, काळ तर मोठा कठीण आला असं विषादपूर्वविधान काळाच्या प्रत्येक टप्प्यावर चिंतनशील लेखकाने नोंदवून ठेवलेलं आहे. प्रत्यक्षात ‘काळ’ ही भव्य संकल्पना आपल्या चिंतनपरंपरेमध्ये आपण स्वीकारलेली आहे. भर्तृहरीने असं म्हटलं आहे की, दिवस-रात्रीच्या एका आड एक असलेल्या काळ्या-पांढऱ्या चौकटींवर, स्त्री-पुरुषांचे विविध मोहरे फेकून त्यांचा चालू असलेला प्रारब्धविषयक खेळ ‘काळ’ स्वतःच पाहत रमत बसलेला असतो. मला स्वतःला भर्तृहरीची ही कल्पना भव्य आणि थरारक वाटलेली आहे. ही संकल्पना आपल्याला अंतर्मुख करते. स्वतः काळच कर्ता आणि भोक्ता असेल तर सामान्य माणूस कोण आहे, असा प्रश्न यातून निमार्ण होतो. साहित्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं- द्यावं लागणार असतं.

आपल्या सर्वांना माहीत आहे की, बोटाला धरून ‘काळा’ने आपल्याला हळूहळू वेगवेगळ्या कालखंडातून फिरवून आणलेलं आहे. आपण यंत्रयुग अनुभवलं. त्यानंतर तंत्रयुग अनुभवलं. अणूयुग आणि अवकाशयुग अनुभवलं. आणि आता आपण ‘भ्रमयुगा’त प्रवेश केला आहे. या युगात सर्वसामान्य माणूस भ्रमित झालेला आहे, संमोहित झालेला आहे. मुख्य म्हणजे त्याची वाचा हरवलेली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून, व्यापून राहिलेला आहे. या भीतीबद्दल साहित्याने बोलणं, सांगणं अपेक्षित असतं. याबाबत आधीपासूनच साहित्याने वेळोवेळी काहीएक सूचन केलेलं आहे. त्याबद्दल मी आपणाशी थोडं सविस्तर असं, परंतु या निवेदनाच्या उत्तरार्धात बोलणार आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

लेखक का लिहितो, अर्थात निर्मिर्तीप्रक्रिया

तत्पूर्वी, लेखक का लिहितो याची थोडी चर्चा करूयात. आपली व्यक्त होण्याची इच्छा थेट अमूर्तातल्या सर्जनाशी संबंधित आहे, याची प्रत्यक्ष जाणीव लेखकाला होण्यापूर्वी लेखक काहीएक ‘अस्वस्थतेच्या भावावस्थे’तून जात राहतो. ही अस्वस्थता त्याला घडवत असते आणि सर्जनाच्या वाटेवर नेऊन ठेवत असते.

निमिर्ती प्रक्रियेचा ‘आंतरिक अस्वस्थते’शी संबंध असल्यामुळे ‘आपण अस्वस्थ आहोत’ असं विधान प्रतिभावान कलावंत करताना दिसतात, मात्र आपण अस्वस्थ का आहोत, या प्रश्नाचं उत्तर सहसा मिळत नाही. लेखक या नात्याने, मलादेखील हा प्रश्न विचारला गेला आहे आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे.

एखाद्या जिवंत ग्रहाच्या अंतर्भागात विविध रसायनामुळे आणि चुंबकीय वातावरणामुळे जशी वादळं निर्माण होत राहतात, तशीच अस्वस्थ वादळं कलावंताच्या मेंदूत निर्माण होत असतात. ही वादळं म्हणजे ब्रेन स्टॉर्मस, निर्मिर्तीच्या विविध शक्यता निर्माण करतात. कलावंत अस्वस्थ असण्याचं हे एक कारण आहे.

जे अमूर्तात आहे, ते ओढून आणून प्रकट करण्यासाठी कलावंताला अक्षय अशी ऊर्जा व्यतीत करावी लागते. जे जाणवतं, ते एखाद्या माध्यमातून प्रकट करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कलावंताची सुटका नसते. हा एक अटळ असा शाप कलावंताने किंवा लेखकाने आपल्या भाळी स्वीकारलेला असतो. जाणवतं, ते व्यक्त करणं सोपं नसतं. अनेकदा ते अव्यक्तातून व्यक्त होतं. स्वत:हून लादून घेतलेल्या छळवादातून सुटका व्हावी, असं कलावंताला कधी वाटतं का, हा प्रश्न आहे. जगभरच्या प्रतिभावंतांनी असे अनुभव नोंदवलेले आहेत. प्रतिभावंत-कलावंत-स्वत:ला साक्षीदाराच्या वेदनामयी भूर्मिकेतून पाहतात. म्हणजे, ‘पाहणारा’ आणि ‘पाहणाऱ्यालाही पाहणारा’ अशी ही दुहेरी भूमिका असते. ही भूमिका मोठी वेदनामयी असते. हे साक्षित्व अज्ञेयाकडे अंगुलिनिर्देश करतं. निमिर्ती प्रक्रियेचा आत्मीय असा एक घटक या नात्याने प्रतिभावंत-कलावंत स्वतःला अस्वस्थ होताना पाहतात. स्वस्थतेत निर्मिर्तीच्या शक्यता नसतात, म्हणून त्याला, त्यामुळे स्वस्थतेची भीती आणि अस्वस्थतेचं आकर्षण वाटत राहतं.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

साधनेच्या काळात लेखक अस्वस्थ भावदशेतून प्रवास करतो. तो स्वत:तल्या अस्वस्थतेच्या ‘टोकदार शिंगाच्या बैलाशी’ झुंज देतो. हेर्मिंग्वेचं ‘बुल फायचिंग’चं वर्णन म्हणजे कविता आहे, असं म्हणतात. पण ते निर्मितीप्रक्रियेचंही अस्वस्थ असं वर्णन आहे. साहित्यिक त्या ‘बैला’च्या शिंगानं जखमी होतो. जास्त नेमका शब्द ‘घायाळ’ असा आहे. अस्वस्थतेकडून घायाळ झालेला साहित्यिक काही विलक्षण असं निर्माण करू पाहतो. सर्वदूर पसरलेल्या आणि प्रारब्धाच्या खेळामध्ये अडकलेल्या संघर्षरत सामान्य माणसाला साहित्यिक पाहत असतो. ‘नरदेहाच्या साफल्याबद्दल’ साहित्यिक प्रश्न विचारतो. माणसाला किडामुंगीसारखं जगताना पाहतो. ही सगळी ‘महामायेची क्रीडा’ आहे, असं त्याला सांगितलं जातं आणि माणसाच्या जीवित हेतूबद्दल लेखकाला कोडं पडतं. हे कोडं जगण्याच्या जटिल जाळ्याबद्दलचं आहे. हे कोडं सोडवताना लेखकाला स्वतःतल्या ‘टोकदार शिंगाच्या अस्वस्थ बैला’बरोबर झुंज द्यावी लागते. पिंजऱ्यात अडकलेल्या चित्त्याच्या अस्वस्थ फेऱ्यांमधली स्फोटकं मेंदूत घेऊन त्याला वावरावं लागतं. माणसाशी नाळ जोडणाऱ्या निर्मिर्तीची आव्हानं तो स्वीकारतो आणि अस्वस्थ होतो. लेखकाच्या अस्वस्थ असण्याची अशी काही कारणं आहेत. अस्वस्थता हे लेखकाला मिळालेलं वरदानच असतं. याच अस्वस्थतेच्या काळात लेखकाच्या अबोध मनातून साहित्यकृतीची निर्मिती होत असते. लेखक निवांत झाला, रिलॅक्स झाला की, तो संपुष्टात येतो. म्हणून अस्वस्थतेचा काळ हा ‘साधना काळ’च मानला जातो.

लेखनाचं प्रयोजन

आपल्या लेखनाच्या अपरिहार्यतेबाबत अनेक प्रतिभावंतांनी साक्षी नोंदवलेल्या आहेत. कोणताही लेखक लिहितो, तेव्हा त्याला काही तरी अपार आणि अनिवार असं सांगायचं असतं. जे काही सांगायचं आहे ते अपरिहार्य होऊन प्रकट होऊ लागतं, तेव्हा लेखन केल्याशिवाय साहित्यिकाला-लेखकाला दुसरा पर्याय उरत नाही. जे उतरून येतं, त्याला अनेकांनी ‘प्रतिभेचं अवतरण’ असं म्हटलं आहे. अचानक खूप जोराने वारा वाहतो व दारे-खिडक्या थरथरू लागतात याला बा.भ. बोरकर ‘आला अद्भुत वारा’ असं म्हणतात. हे प्रतिभेचं अवतरणंच आहे. प्रतिभावंतांनी आपल्या अंतर्गत असलेल्या व ‘कोठून तरी येणाऱ्या’ अनिवार्य ऊर्जेच्या प्रकटीकरणाबाबत असंच काही नोंदवून ठेवलं आहे. संतकवींच्या साक्षीदेखील निमिर्तीप्रक्रियेबाबत बोलतात. मोत्याची माळ जशी गुंफली जावी, तशी अक्षरे एकामागोमाग एक अनावरपणे उमटत आहेत, असं संत रामदास यांनी म्हटलं आहे, तर कविता झऱ्यासारखी, त्यातल्या पाण्यासारखी सरसर वाहते आहे, असं तुलसीदास यांनी लिहून ठेवलं आहे. जे सांगायचं आहे ते सांगणं विविध माध्यमातून प्रकट होऊ लागलं की, त्या प्रकटीकरणाबद्दल प्रतिभावान मंडळी आपले अनुभव नोंदवतात. बुधकौशिकॠषीनेदेखील स्वप्नातून कविता स्फुरली असं ‘रामरक्षे’च्या संदर्भात लिहून ठेवलं आहे.

आत्मोद्गार अपरिहार्य होऊन प्रकटू लागतो, तेव्हा चांगल्या किंवा श्रेष्ठ कलाकृतीचा जन्म होतो. बहुधा असा आत्मोद्गार सहकंपातून निर्माण होतो. भोवताली, अनेक पातळ्यांवरून, अनेक पद्धतीने, अनेक प्रकारे संघर्ष करत जगत राहणाऱ्या जीवांकडे पाहून जी काही एक वैश्विक करुणा निर्माण होत असेल त्या करुणेतून काहीएक प्रेरणा घेऊन लेखक लिहायला लागतो व अनेकांच्या वेदना स्वीकारून आणि सहकंपित होऊन जीवनदर्शी लेखन करतो. चिंतनशील व प्रामाणिक अशा लेखकाचं, हे असं भागधेय असतं. मनोरंजन किंवा बुद्धिरंजन हा लेखनाचा मग हेतू उरत नाही, तर सर्वसामान्य माणसाचा शोध हा हेतू लेखनामागे शिल्लक राहतो. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अशा माणसाचा शोध घेणं माझ्या लेखनाचं प्रयोजन आहे.

लेखकाच्या वाङ्मयीन निष्ठा

साधना काळातच लेखकाच्या वाङ्मयीन निष्ठा निश्चित होतात. वाङ्मयीन निष्ठा निर्वात पोकळीतून येत नसतात. लेखकाच्या जीवननिष्ठा वाङ्मयीन निष्ठेत रूपांतरित व्हाव्या लागतात. तुमच्या भोवती अनेक स्तरावरचा जो काही समाज पसरलेला आहे, त्या समाजाशी काहीएक बांधीलकी तुमच्या मनात निर्माण होते आहे काय, हा कळीचा प्रश्न असतो. सर्वदूर पसरलेला सर्वसामान्य माणूस तुमच्या आस्थेचा विषय होतो किंवा कसं हे पाहणं गरजेचं असतं. जीवननिष्ठा नैतिकतेशी सुद्धा संबंधित असतात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

मूल्यांची उपासना

लेखकाने शाश्वत आणि अशाश्वत मूल्यांबाबत चिंतन करणं गरजेचं असतं. याचंकारण असं की अंतमितः, लेखकाला शाश्वत मूल्यांचा अंगिकार करावा लागतो. मानसशास्त्राने अंतर्मुखी आणि बहिर्मुखी प्रवृत्ती सांगितलेल्या आहेतच. बुद्धिमान समीक्षकांनीदेखील आंतरवर्तुळातील साहित्य व बहिर्वर्तुळातील साहित्य असे दोन भेद साहित्याच्या संदर्भात केलेले आहेत. आता, या दोन वर्तुळक्षेत्रामध्ये जीवनाशी संबंधित असे कोणकोणते घटक समाविष्ट होतात याचा लेखकाला शोध घ्यावा लागतो. अंतःस्फूर्ती, प्रेरणा, सहानुभूती, दया, क्षमा, त्याग, सेवा, प्रेम नावाची अमूर्त वस्तू, मानवता व अंतमितः ईश्वर, असे काही घटक आंतरवर्तुळातील साहित्यात समाविष्ट होताना दिसतात. या घटकांची यादी आणखी सूक्ष्म व विस्तारीत होऊ शकते. ही सगळी चिरंतन मूल्ये आहेत. त्याउलट, बहिर्मुखी साहित्याच्या वर्तुळात युद्ध, रक्तपिपासा, सत्तासंघर्ष, उपासमार, मारामाऱ्या, भावनिक व शारीरिक शोषण, राजकारण, विश्वासघात, दारिद्र्य, बेकारी, जगण्याबाबतच्या चिंता, लैंगिक क्रौर्य आणि विकृती तसेच ईश्वराला नाकारणे इत्यादी घटक समाविष्ट होताना दिसतात. आंतरवर्तुळातील घटक आणि बाह्यवर्तुळातील घटक या दोन्हींचा लेखकाला साकल्याने विचार करावा लागतो. त्याची लेखणी, त्याचा अंतःस्वभाव कोणत्या वर्तुळाशी जास्त जोडला जातो आहे, हे पाहून त्याला आत्मप्रकटीकरण करावं लागतं. हे करत असताना ‘वास्तव’ नावाच्या एका अवघड अशा गुंत्याशी सामना करावा लागतो. एखाद्याचे लेखन वास्तववादी आहे की नाही, असं सहजच ठरवलं जात असलं तरी लेखकाला स्वतःला मात्र वास्तव नावाच्या अमूर्त कोड्याची सोडवणूक करण्यात शक्तीचा व्यय करावा लागतो.

वास्तव

वास्तववादी साहित्य म्हणून एक प्रकार साहित्यात अस्तित्वात आहे. तुमचं लेखन वास्तववादी असलं पाहिजे, अशा प्रकारचा आग्रह लेखकाच्या भोवती धरला जातो. वास्तववाद म्हणजे काय याबाबतच्या व्याख्या मात्र वेगवेगळ्या असू शकतात. आपल्या साधनाकाळातच लेखकाने वास्तवाचा हा गुंता सोडवणं हितकारक असतं. एकच एक वास्तव कधीच अस्तित्वात नसतं. एकाचं वास्तव दुसऱ्याचं स्वप्न असू शकतं. त्यामुळे वास्तव व्यक्तिसापेक्ष असतं, याची जाणवी लेखकाने ठेवणं गरजेचं असतं. वास्तव बदलत राहतं आणि मुळातून ते बदलतसुद्धा नाही. उदाहरणार्थ, चिरंतन मूल्यं किंवा ईश्वरी सत्ता बदलत नाही. समाज बदलतो, मान्यता बदलतात, गरीबी आणि श्रीमंती येते आणि जाते, बेकारी वाढते आणि कमी होते. या बदलत्या वास्तवाची साहित्याने दखल घ्यायची असते.

लेखकाचा साधनाकाल

सामान्य माणसाचं दुःख प्रतिबिंबित करण्याची साहित्याची प्रतिज्ञा असेल तर सामान्य माणूस लेखनप्रेरणेचा केंद्रबिंदू मानावा लागतो हे तथ्य साधनाकाळातच लेखकाने स्वीकृत केलेलं बरं. लेखकासाठी सर्वसामान्य माणूस हा नेहमीच आस्थेचा आणि कुतुहलाचा विषय राहिलेला आहे. लेखकाला सर्वसामान्य माणसाच्या शोधाबाबत आस्था असावी लागते. त्याच्या जगण्याबद्दल, त्याच्या छोट्या छोट्या लढायांबद्दल आस्था बाळगावी लागते. सर्वसामान्य माणसाच्या संभ्रमावस्थेतबाबत कुतूहल लेखकाला चिंतनशील बनवतं. सामान्य माणसाच्या दुःखाचा परिहार कसा होऊ शकेल, याबाबत काहीएक चिंतन लेखकाला उपकारक ठरून श्रेष्ठत्वाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी साहाय्यभूत ठरतं.

साधनेचा काळ ‘स्व’च्या केंद्राशी स्वतःला जोडून घेण्याचा काळ आहे. आत्मनिष्ठा या काळात स्पष्ट व्हाव्या लागतात. मूल्यांची उपासना चालू असताना जीवननिष्ठांचे वाङ्मयीन निष्ठांमध्ये रूपांतर करण्याचा प्रयास देखील करावा लागतो. परिणामतः, आशय पुढे व शब्द मागे अशी अवस्था निर्माण होते. अर्थात, शब्दांच्या छटा, अर्थांच्या छटा इत्यादी विभ्रम आत्मसात होतात. हा उत्तम अशा वाचनाचा आणि बहुश्रुत होण्याचा काळ आहे. काव्यातली ‘सूक्ष्मता’ साधनाकाळातच सापडली तर ‘ऋतंभरा प्रज्ञा’ जागृत होऊ शकते. कवितेत सूक्ष्म रूपाने दडलेलं अध्यात्म साधनाकाळातच लेखकाला आकर्षून घेतं. हा नाजूक साधनाकाळ व्यर्थ दवडणं लेखकाला परवडत नाही.

लेखकाला स्वतःशी आणि स्वतःच्या निष्ठांशी प्रामाणिक राहावं लागतं. हा त्याचा प्रामाणिकपणाचा काळ साधनाकाळातच सुरू होतो. अंगावर कोसळणाऱ्या व्यर्थ प्रलोभनापासून लेखकाने स्वतःला कसं वाचवावं, याबाबतची पूर्वतयारी साधनाकाळातच होणं इष्ट. लेखकाला आकाश प्रतिबिंबित करावयाचं असतं. लेखकाला विशाल अशा जीवनाचा पट आपल्या लेखनामध्ये बद्ध करावयाचा असतो. सभोवताली सर्वदूर पसरलेल्या नातेसंबंधांचं अमूर्त जाळं त्याला समजून घ्यावयाचं असतं. जीवनातील रहस्यवादाच्या काठावर त्याला येऊन पोहोचायचं असतं. हे सर्वकाही करण्यासाठी लेखकाला कळत आणि नकळतपणे आपला साधनाकाळ समृद्ध करावा लागतो. हे ज्याला जमतं तो सिद्धतेच्या वाटेने जातोच. तत्पूर्वी अर्थात, साधनाकाळातील सृजनाच्या वेदना त्याला सहन कराव्या लागतात. म्हणून, साधनावस्थेला मी ‘टोकदार शिंगाच्या बैलाशी दिलेली झुंज’ असं म्हणत आलेलो आहे. साधनावस्था ही दुर्मीळ अशी संधी आहे, याची जाणीव लेखकाने ठेवलेली बरी.

माझं लेखन जीवनाच्या चिरंतन मूल्यांशी जवळीक साधतं आहे, असं लक्षात आल्यानंतर व त्यामुळे आपलं लेखन कदाचित श्रेष्ठ दर्जाचंसुद्धा होऊ लागलं आहे, असं लक्षात आल्यानंतर त्यातल्या जबाबदारीची जाणीव होऊन मी त्वरेने सजग होऊन गेलो आहे. स्वतःला उन्मत्त होऊ न देण्याची ही दुर्मीळ अशी संधी त्या निमित्ताने मला प्राप्त झाली, हे माझं भाग्य.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

लेखकाची ‘बांधीलकी’

आपण का लिहितो याची काहीएक जाण अंतःकरणात निर्माण झाली असेल आणि कोणासाठी लिहायचं आहे, हे स्पष्ट झाले असेल तर येथून पुढे लेखकाच्या अडचणींची सुरुवात होते. सर्वसामान्य माणसांच्या जीवनव्यवस्थेतील छोट्या छोट्या लढायांबाबत लेखक आस्था बाळगतो तेव्हा तो थोडा स्थिर झालेला असतो. साहित्यक्षेत्रात परिचितही झालेला असतो. येथून पुढे मग ‘व्यवस्था’ तुम्हाला ‘कमिट’ होण्याचा आग्रह धरू लागते. तुम्हाला कथित ‘सामाजिक बांधीलकी’ आहे किंवा नाही, याबाबतची एक झाडाझडती एव्हाना होऊन गेलेली असते. त्यानंतर लेखकावर दबाव वाढू लागतो. त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विचारले जाणारे प्रश्न उद्धट सुद्धा असता. अहोऽ, कोण आहात तुम्ही? तुम्ही व्यवस्थाविरोधी आहात काय? की व्यवस्थेचे समर्थक आहात? तुम्ही कोणत्या ग्रुपचे आहात? तुम्ही कोणत्या कळपामध्ये जाऊन पोहोचला आहात? प्रश्नांचा हा असा गलबला असला तरी लेखकाला स्वतःच्या अंतःप्रकाशात आपली स्वतःची वाट स्वतःच शोधावी लागते, आणि त्याची किंमतही मोजावी लागते.

कलाकृती ही ‘कलाकृती’ असल्यास त्याकडे कलाकृती म्हणून पाहिलं पाहिजे, असं कोण्या जाणकार समीक्षकाने म्हटलं आहे. आपल्या अपेक्षांचं ओझं लेखकावर आणि कलाकृतीवरही लादणं योग्य नसतं, याचा विचार सहसा कोणी करतांना दिसत नाही. लेखकाला हे ‘अडाणी ओझं’ संत्रस्त करू शकतं. आपल्या निमिर्तीच्या प्रक्रियेत अशा अपेक्षा अडकाठी ठरणार नाहीत याची काळजी त्याला घ्यावी लागते. पण मग लेखकाची बांधीलकी कोणती, हा प्रश्न शिल्लक राहतोच. मी स्वतः, सामान्य माणसाला लेखनाचा केंद्रबिंदू मानतो. ज्या मातीशी त्याची नाळ जुळलेली असते आणि ज्या नाळेतून त्याला जीवनरस प्राप्त होतो, त्या नाळेशी माझी बांधीलकी आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा