चक्रधर आणि तुकाराम या दोन श्रेष्ठ माणसांनी ‘कवीचं काम काय असतं?’ हे आपल्याला खूप स्पष्टरूपात सांगितलं आहे...
पडघम - साहित्य संमेलन विशेष
संदीप जगदाळे
  • केदारनाथ सिंह स्मृती सन्मान सोहळ्याची काही छायाचित्रं, डावीकडे संदीप जगदाळे
  • Fri , 22 April 2022
  • पडघम साहित्य संमेलन विशेष संदीप जगदाळे Sandip Jagdale असो आता चाड Aso Aata Chad केदारनाथ स्मृति सन्मान Kedarnath Smruti Sanman

मागच्या आठवड्यात तरुण कवी संदीप जगदाळे यांना ‘पहिला केदारनाथ स्मृति सन्मान’ वाराणसीमध्ये समारंभपूर्वक देण्यात आला. २०२१पासून केदारनाथ सिंह स्मृति सन्मानाची घोषणा करण्यात आली आहे. एक पुरस्कार हिंदीतील तरुण कवीला तर एक पुरस्कार इतर भाषेतील तरुण कवीला देण्यात येणार आहे. यंदा पहिल्याच वर्षी हिंदीचा पुरस्कार अचिंत यांना, तर इतर भाषेतील पुरस्कार जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या कवितासंग्रहाला देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात संदीप जगदाळे यांनी केलेल्या मूळ हिंदी भाषणाचं त्यांनीच केलेलं हे मराठीरूप...

..................................................................................................................................................................

नमस्कार,

केदारनाथ सिंह स्मृती सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष श्री अरविंदाक्षण, प्रमुख पाहुणे श्री. सितांशू यशश्चंद्र आणि विचारमंचावरील इतर मान्यवर व श्रोत्यांनो....

सगळ्यात आधी ‘साखी’ नियतकालिक आणि निवड समितीचे सदस्य श्री. अरविंदाक्षण, श्री. चंद्रकांत पाटील, श्री. राजेश जोशी, श्री. अरुण कमल, श्रीमती अनामिका आणि श्री. सदानंद शाही जी यांच्या प्रती आभार प्रकट करतो. हा सन्मान मला मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. यापेक्षाही अधिक आनंद मला या गोष्टीचा आहे की, हा सन्मान एका मराठी कवीला देण्यात येत आहे. मी माझ्या मातृभाषेतील समकालीन कवींचा प्रतिनिधी म्हणून हा सन्मान विनम्रतापूर्वक स्वीकारतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

केदारनाथ सिंह यांच्या नावानं देण्यात येणारा हा सन्मान माझ्या कवितेला मिळणं, हा माझ्या आयुष्यातील एक दुर्मीळ क्षण आहे. आपल्या सगळ्यांप्रमाणेच केदारनाथ माझेही खूप प्रिय कवी आहेत. जितक्या वेळेस एक वाचक म्हणून मी त्यांच्या कवितांमधून गेलो, तितक्या वेळेस ही कविता मला माझ्या गावाची, माझ्या मातीची वाटली. माझ्या गावाचे सुख-दुःख मी केदारनाथ सिंह यांच्या कवितांमधून अनुभवले आहे. या आत्मीयतेमुळेच मला असे वाटते की, केदारनाथ सिंह यांची कविता जितकी गंगा किनाऱ्याची आहे, तितकीच ती माझ्या गोदावरी किनाऱ्यावरचीही आहे. जितकी ती हिंदी आणि भोजपुरीची आहे, तितकीच ती मराठी व जगातल्या सर्व भाषांची आहे. त्यांच्या कवितांनी आपल्याला समृद्ध बनवलं आहे. यासोबतच या कवितेनं आपल्याला अधिक माणूस बनवलं आहे.

‌‍‌मी ज्या भागातून आलो आहे, तो महाराष्ट्रातील मराठवाड्याचा ग्रामीण प्रदेश आहे. गोदावरीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे ऐतिहासिक गाव पैठण. येथे गोदावरीवर उभारण्यात आलेल्या जायकवाडी धरणात १०८ गावं बुडवण्यात आली. त्यात एक गाव माझंही होतं. स्वातंत्र्यानंतर ‘मोठे धरण-मोठा विकास’ अशा घोषणा देण्यात आल्या आणि या घोषणांना अनुसरून भारतभरात वेगवेगळ्या नद्यांवर‌ धरणं बांधण्यात आली. हजारो गावं धरणाच्या घशात घालण्यात आली. लाखो लोक विस्थापित होऊन उदध्वस्त झाली. धरणामुळे विस्थापित झालेल्यांना सोनेरी भविष्याचे खोटे स्वप्न दाखवण्यात आले. पुनर्वसन प्रक्रियेत विस्थापितांचं आयुष्य सुस्थिर तर झालंच नाही, उलट ही पुनर्वसन प्रक्रिया राजकीय, प्रशासकीय भ्रष्टाचार आणि अमानवीयतेचं जिवंत उदाहरण बनली. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार जिथं जिथं विस्थापन झालं, त्या प्रत्येक ठिकाणी झाला.

एक गाव बुडाल्यानं त्या गावाची फक्त काळी-पांढरी नष्ट होत नाही, तर गावासोबतच तिथला ऐतिहासिक वारसा, रितीरिवाज, तेथील प्रादेशिक म्हणी आणि वाक्यप्रचारांनी समृद्ध बनलेली बोलीभाषा सगळं काही बुडून मरून जातं. शिल्लक राहतात फक्त अधांतरी लटकलेली माणसं. ज्यांना अतिशय क्रूरपणे पृथ्वीच्या एखाद्या अनोळखी कोपऱ्यात फेकून देण्यात येतं. आपल्या उखडलेल्या मुळांना पुन्हा रुजवण्याची धडपड करणारे विस्थापित अनोळखी मातीवर उपरे व घरघुसे ठरतात. ज्या धरणांसाठी आमचं घरदार धरणाच्या घश्यात घालण्यात आलं, ते धरणं बनून ५० वर्षं उलटली तरी आमची मुळं नव्या मातीत रुजली नाहीत.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

१८५५ साली अमेरिकेत विस्थापनाला विरोध करत इंडियन आदिम जमाती ‘दूबामिश’चा सरदार चीफ सिएटलने तत्कालीन राष्ट्रध्यक्ष फ्रैंकलीन पियर्स यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात तो म्हणतो- “आमचे प्रेतही या अतुल्य भूमीला विसरू शकणार नाहीत. कारण ही लाल माणसाची आई आहे. आम्ही या भूमीचे भाग आहोत अन् ही भूमी आमचा एक अंश आहे. सुगंधी फुलं, हरणं, घोडे आणि फुलपाखरं आमचे सख्खे भाऊबंद आहेत. डोंगराच्या या उभ्या शिळा, सळसळणारे गवत, घोड्यांच्या आणि माणसांच्या शरीरातील ऊब - सर्व काही आमचं आहे.”

चीफ सिएटलच्या या पत्रात जगातील सर्व विस्थापित आणि विस्थापित होऊ घातलेल्या लोकांचं दुःख सामावलेलं आहे.

माझा जन्म झाला, तेव्हा भारतात जागतिकीकरण औपचारिक स्वरूपात आलं होतं. हरितक्रांती होऊन २५ वर्षं झाली होती अन् ग्लोबल होण्याच्या ‘रॅट रेस’मध्ये आपण पळण्यास सुरुवात केली होती. मी माझ्या गावाच्या वर्तमानाविषयी विचार करतो, तेव्हा मला हरितक्रांती, सहकार, शिक्षणाचं बाजारीकरण, खाजगीकरण, भूसंपादन या महत्त्वपूर्ण घटनांचे मोठे परिणाम माझ्या गावाच्या मागच्या ५० वर्षांच्या आयुष्यावर झालेले दिसतात.

मागच्या ३०-४० वर्षांत बदलांनी घेतलेली गती आपल्याला गोंधळून टाकणारी आहे. जागतिकीकरणाच्या रेट्याने आपली ‘समाजवादी’ व्यवस्था ‘भांडवली’ व्यवस्थेत रूपांतरीत झाली आहे. ‘कल्याणकारी राज्या’ची जी संकल्पना घेऊन आपण १९४७ साली मोठ्या उत्साहात निघालो होतो, ती मागे पडली आहे. ‘खाऊजा’नं फक्त आपल्या आर्थिक व्यवहारांवरच नाही, तर आपल्या सामाजिक संबंधांवर व मूल्यव्यस्थेवर विपरित परिणाम केले आहेत.

भांडवलीकरणामळे सामान्य माणूस अमर्याद शोषणाचा बळी ठरत आहे. या शोषणाचा प्रतिवाद करण्यास तो असमर्थ ठरत आहे. यामुळे निष्क्रिय होऊन जगण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्यासमोर नाही. हरितक्रांतीचे अपयश, सहकाराचे रूपांतर भांडवलशाहीच्या ‘वेलफेअर मॉडेल’मध्ये होणं, शिक्षणाचं बाजारीकरण, भूसंपादन, यामुळे आपली गावं अरिष्टात सापडली आहेत. गावाच्या खऱ्या विकासासाठी प्रगती आणि समृद्धीच्या संकल्पनांचा विचार आपल्याला अधिक मानवीय अंगाने करावा लागेल. यासाठी आपण महात्मा गांधींच्या ‘ग्रामस्वराज्या’कडे पूर्ण इमानदारीने गेलं पाहिजे. मी ज्या गोष्टींविषयी बोलत आहे, त्या तुम्हाला कदाचित खूप वस्तुनिष्ठ व ‘नॉन-पोएटीक’ वाटत असतील. परंतु हीच जमिनीवरची काही तथ्यं आहेत, ज्यांनी माझ्या दररोजच्या आयुष्यावर व कवितेच्या आशयावर खोल परिणाम केला आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कोणताही कवी अधिक चांगल्या जगाचं स्वप्न पाहत असतो. प्रत्येक माणसाचं आयुष्य सोपं व सुखकारक व्हावं, हीच त्याची इच्छा असते. ‘माणसाच्या डोळ्यात अश्रू पाहायला न मिळो’ हीच त्याची प्रार्थना असते. याच ऊर्जेने तो अभिव्यक्त होत असतो.

मी ‘पैठण’ या प्राचीन गावात राहतो. हे ‘प्रतिष्ठान’ नावानं प्रसिद्ध होतं. ‘प्रतिष्ठान’ सातवाहनांची राजधानी होती. दुसऱ्या दशकात भारताची यात्रा करणाऱ्या टॉलेमीनं पैठणला रोम-अथेन्स-काशी इतकंच प्राचीन नगर संबोधलं आहे. पैठणच्या मातीतच मराठीचा जन्म झाला. हे गाव भक्ती चळवळीचं एक मोठं केंद्र राहिलेलं आहे. महात्मा चक्रधर, संत ज्ञानेश्वर ते संत एकनाथ अशी मोठी विचार परंपरा या गावाला आहे. मला असं वाटतं की, हा वैचारिक आणि सांस्कृतिक वारसाच मला लिहिण्याची ऊर्जा देतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘लीळाचरित्र’ या १२व्या शतकातील ग्रंथात चक्रधर स्वामींची एक लीळा आहे. त्यात ते म्हणतात- ‘तुम्ही महात्मे की गाः | तुम्ही चतुर्विधा भूतग्रामा आभय देयावे कीं’. अर्थात, तुम्ही विद्वान लोक आहात. यामुळे चारी दिशांच्या जीवसृष्टीला, गावांना अभय देण्याचं काम तुमचं आहे. दुसरीकडे संत तुकाराम म्हणतात - ‘उजळाया आलो वाटा । खरा खोटा निवाडा।।’ अर्थात, सत्य-असत्याला ओळखून वाटांना प्रकाशमान करण्यासाठी आम्ही आलो आहोत.

चक्रधर आणि तुकाराम या दोन श्रेष्ठ माणसांनी आपल्याला ‘कवीचं काम काय असतं?’ हे खूप स्पष्टरूपात सांगितलं आहे. चारिदिशांच्या जीवसृष्टीला अभय देत, खऱ्या-खोट्याचा निवाडा करत, अंधारलेल्या वाटांना प्रकाशमान करण्यासाठी आपल्याला संपूर्ण निष्ठेनं झटत राहायचं आहे.

सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा