चैत्र प्रतिपदेशी शक-संवत नेमका कसा जोडला गेला, ते अचूकपणे आपल्याला माहीत नाहीये...
पडघम - सांस्कृतिक
वरदा खळदकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 02 April 2022
  • पडघम सांस्कृतिक गुढीपाडवा Gudhi Padwa चैत्र प्रतिपदा Chaitra Pratipada शक-संवत्सर Sjak Samvatr शालिवाहन शक shalivahan shaka

शालिवाहन नामक कुठला राजा कधी अस्तित्वात नव्हता. सातवाहन नामक राजकुल होतं, पण त्यांच्यातही कुणाचं नाव सातवाहन किंवा शालिवाहन नव्हतं. राहिता राहिली एक खरी गोष्ट-त्यांचा सर्वांत बलाढ्य राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने क्षहरात कुलातील नहपान नामक अतिशय पराक्रमी शक राजाचा निर्णायक पराभव केला आणि ते राजकुल कायमसाठी संपवलं. मात्र या युद्धाचाही निश्चित असा संबंध शक-संवत्सराशी नाही. एकूण पुरावे बघता शकांचं दुसरं राजकुल कार्दमक, त्यातला महत्त्वाचा आद्य राजा चष्टन, याचं ते राज्यगणना वर्ष आहे (शिवाजीच्या ‘राज्याभिषेक शका’सारखं) असं दिसतं. या कुलाने गुजरात आणि माळवा प्रांतामध्ये अनेक वर्षं राज्य केल्यामुळे तेच आसपासच्या प्रदेशांमध्ये प्रचलित झालं. त्यामुळे त्याचा उल्लेख ‘शक-काल’ असा केला जाऊ लागला आणि हळूहळू ‘शक’ हाच शब्द कालगणनावाचक म्हणून रूढ झाला.

त्या काळी बहुतेक राजे स्वतःच्या राज्यारोहणापासून काळ मोजून तसा अधिकृत दस्तऐवजांमध्ये (यातील आपल्यापर्यंत फक्त प्राचीन कोरीव लेख आले आहेत) लिहीत असत. उदा., सम्राट अशोक आणि ओडिशामधील सम्राट खारवेल यांनी त्यांचे कार्य लिहिताना स्वत:चा राज्यारोहण काळ वापरला आहे - वर्ष अमुकतमुक असा. तशीच कालगणना चष्टनाचीही होती. त्या राजकुलाने गुजरात माळवा भागात पाचव्या शतकापर्यंत राज्य केल्याने, तिथे ही कालगणना लोकप्रिय आणि रूढ झाली होती, तशीच आसपासच्या प्रदेशांतही, असे दिसून येते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

शक-कालाचा सर्वांत जुना उल्लेख स्फुजिध्वजाच्या यवनजातकात ‘समानाम् शकानाम्’ (य.जा. - ७९:१४) आणि ‘कालम् शकानाम्’ (य.जा-७९:१५) असा केलेला आढळून येतो. शके १९१ (गत) हा यवनजातकाचा निर्मितीकाळ आहे (य.जा.-७९-६१,६२). शिलालेखांमध्ये याचा प्रथम उल्लेख ‘शक-काल’ असा ठाणे जिल्ह्यातील वाला येथील सुकेतुवर्मन नामक भोज-मौर्य राजघराण्यातील राजाच्या शिलालेखात आढळतो. नंतर विदर्भामधील हिस्सेबोराळा येथील देवसेन वाकाटक नृपतीच्या शिलालेखात ‘शकानाम् ३८०’ असा उल्लेख आढळतो.

बदामीचे चालुक्य राजेही शिलालेखांमध्ये ‘शक-वर्ष, शक-नृपति-राज्याभिषेक-संवत्सर, शक-नृपति-काल’ असा स्पष्ट उल्लेख करतात. आठव्या शतकातील महाराष्ट्रातील राष्ट्रकूट राजेही स्पष्टपणे ‘शक-नृप-काल’ किंवा ‘शक-नृप-संवत्सर’ असा उल्लेख करतात. एवढेच काय वराहमिहिरानेही बृहत्संहितेत शकेन्द्र-काल आणि शक-भूप-काल, असा उल्लेख करून ही कालगणना वापरली आहे...

साधारण नवव्या-दहाव्या शतकानंतर याचाच उल्लेख संक्षिप्ताने शक-संवत असा व्हायला सुरू होतो. तो इतका रुळतो की, शक याचाच अर्थ कालगणना होतो. म्हणूनच आपण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्यारोहणानंतर जी कालगणना सुरू केली, त्याला ‘शिवराज्याभिषेक शक’ म्हणतो.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

साधारणपणे इ.स.च्या १२व्या शतकापासून (म.प्र. येथील उदयगिरी येथील परमार राजा उदयादित्याचा शिलालेख, पंढरपूरचा शिलालेख, तासगाव ताम्रपट, इ.) या काळाचा उल्लेख शालिवाहन शक असा सुरू झालेला दिसतो. तो पंधराव्या शतकापर्यंत चांगलाच रूढ झालेला दिसतो. शकनृपति काळापासून तो शकांना हरवलेल्या शालिवाहनाचे नाव त्याला जोडले जाईपर्यंत तत्संबंधीच्या मौखिक परंपरेत, कथा/दंतकथांमध्ये कसे आणि मुख्य म्हणजे का बदल झाले, हे आत्ता सांगणे थोडे अवघड आहे. त्यात अनुमानाचा भाग जास्त येऊ शकतो.

हा असा आणि इतर विस्तृत शिलालेखीय पुरावा समुच्चयाने असताना शक-संवत्सर सुरू करणारा कोण, याबद्दल फार काही शंका उरते, असे वाटत नाही.

शक बाहेरचे, आक्रमक होते वगैरेही तितकंसं खरं नाही. ते मध्य आशियातून काही शतके आधी आले असावेत, असं पुरावे दर्शवतात. पण शक-क्षत्रप आणि सातवाहनांची राज्ये शेजारी-शेजारी होती आणि त्यांच्यात व्यापारीमार्गाच्या नियंत्रणासाठी वगैरे कायमच चुरस होती, लढाया होत असत. त्यामुळे परकीय आक्रमकांचा पराभव करण्यासाठी गौतमीपुत्राने ती लढाई केली, या म्हणण्यात तथ्य नाही. तसेच कार्दमक कुलाशी सातवाहनांचे सोयरिकीचे संबंध होते. त्यांच्या एका राजकन्येशी वासिष्ठीपुत्र पुळुमावि या राजाचे लग्न झालेले होते. याउपर सातवाहनांनी कार्दमकांकडूनही पराभवाचे पाणी चाखले होतेच.

या सगळ्या ‘जिओपोलिटिकल’ कारणासाठी झालेल्या स्थानिक महत्त्वाच्या लढाया होत्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. फक्त तो गौतमीपुत्राचा विजय मात्र खरंचच पश्चिम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आठवणींमध्ये पक्का रुजला. त्याविषयी अनेक दंतकथांची पुटं चढली. आणि मग कधीतरी या पाठोपाठ झालेल्या घटनांचं (नहपानाचा पराभव आणि चष्टनाचं राज्यारोहण) सांस्कृतिक स्मृतीमध्ये एकीकरण होऊन शक-संवत्सराशी ‘शालिवाहन’ हा शब्द जोडला गेला... पुरावे एवढंच सांगतात. वरचे ‘हिंदू’ नववर्षाचे, शालिवाहनाने हरवून, परतवून लावलेल्या आक्रमकांच्या गोष्टीचे इमले हे बरीच शतके नंतर उभारलेले आहेत.

(शिवाय आपण दिवाळीत जो किल्ला करतो शिवाजीची आठवण म्हणून, ती प्रथा खरं तर शालिवाहनाने मातीचे पुतळे लहानपणी केले, त्याची आठवण म्हणून अस्तित्वात आली, असं काही जुनी ब्रिटिश गॅझेटिअर्स नोंद करतात. त्याचा शिवाजीशी जोडला गेलेला संबंध नंतरचा आहे.)

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

आता शक-संवत्सर नेमका गुढीपाडव्याशी कसा संबंधित, हा प्रश्न बाकी आहेच!

चैत्र प्रतिपदेशी शक-संवत नेमका कसा जोडला गेला, ते अचूकपणे आपल्याला माहीत नाहीये. भारतात वेगवेगळ्या काळात आणि प्रदेशात वेगवेगळी नववर्षे होती/आहेत. दख्खन/ महाराष्ट्रामध्ये चैत्र प्रतिपदेला सुरू होते. ब्रह्म पुराणाप्रमाणे चैत्र प्रतिपदेला सकाळी ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली. आणि भविष्यपुराणात पताका, कमानी (म्हणजेच गुढी. गुढीचा अर्थ ध्वज/पताका) उभारून कडुलिंब खावा वगैरे सांगितले आहे. इतर पुराणांप्रमाणे जरी इसवी सनाच्या सुरुवातीच्या चार-पाच शतकांमध्ये ब्रह्म आणि भविष्यपुराणाचे बरेचसे लेखन झाले असावे, असे म्हणता येत असले, तरी नंतरही अनेक शतके याच्या मजकुरात भर पडत गेली आहे. त्यामुळे हे उल्लेख बरेच नंतरचेही म्हणजे मध्ययुगाच्या थोडे आधीचे वगैरे असू शकतात.

कदाचित असे असू शकेल की, पारंपरिकरित्या इथे चैत्र प्रतिपदेलाच नववर्ष साजरे होत असेल (ही प्रथाही सातवाहन कालापासून किंवा खरं तर त्या नंतरच आली असणार, कारण त्याआधी इथे वैदिक धर्म, कालगणना वगैरेचा कुठला पुरावा नाहीये.) आणि कालगणनेचे वर्ष शकांकडून आले, तेव्हा चैत्र प्रतिपदेलाच वर्ष सुरू केले, तरी वर्षाचा आकडा शकगणनेनुसार असं काहीसं. आणि मग दोन्हीची सांगड बसली असेल....

भारतातील इतर काही प्रदेशांत नववर्ष वैशाख महिन्यापासून किंवा कार्तिक महिन्यापासून सुरू होतं. एकुणच भारतीय पारंपरिक कालगणनेतही प्रादेशिक वैविध्य आहेच. मात्र शक-संवत ही त्यातली सगळ्यात जास्त वापरली जाणारी कालगणना असावी.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आणि हो, शक-संवताच्या बरोबरीने लोकप्रिय आणि प्रचलित असलेला दुसरा पारंपरिक भारतीय संवत म्हणजेच ‘विक्रम संवत’ ही पाकिस्तानच्या वायव्य प्रदेशात आणि आसपासच्या भागात राज्य करणार्‍या एका इंडो-सिथियन (म्हणजे परत एक शककुल!) राजाचा, अ‍ॅझेस -१ याची राज्यारोहण कालगणना आहे, हे आता बहुतांशी विद्वत्मान्य मान्य असलेले मत आहे....

गेले किमान अडीच-तीन सहस्रके भारतीय उपखंडांमध्ये विविध लोकसमूह येत-जात आहेत, एक सांस्कृतिक घुसळण कायम चालू राहिलेली आहे. आक्रमक म्हणून खूप कमी आले. स्थलांतरे करणारे खूप होते. ज्या कुठल्या कारणाने असो, जे आले ते इथलेच झाले. त्यांना आधीच्या इथल्या समाजांनीही खुल्या मनाने स्वीकारले. दुर्दैव असे की, त्यांचे वंशज असलेले आपण मात्र आपल्या परंपरांमध्ये असे बहुपेडित्व असू शकते, आपल्याला माहीत असलेल्या ‘हिंदू धर्म परंपरां’च्या आणि ‘पारंपरिक दंतकथां’च्या बाहेर जाणारे सत्य असू शकते... ऐतिहासिक पुराव्यांनी ते सिद्ध झालेले असते आणि या तथ्यांच्या स्वीकाराने आपल्या संस्कृतीला कुठे उणेपणा येत नाही, तर उलट समृद्धी आणि संपन्नताच येते, हे विसरून गेलो आहोत...

.............................................................................................................................................

लेखिका वरदा खळदकर पुरातत्व संशोधक आहेत.

varada.kh@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा