संघाने केली निजाम-स्तुती! याला ‘तुष्टीकरण’ नाही हं म्हणायचं!! ते तर ‘नव्या भारता’चं प्रेमगीत!!!
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ स्वयंसेवक आणि ‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’ या संघाच्याच एका अपत्याचे पालक इंद्रेशकुमार यांनी सातवा निजाम उस्मान अली खान याची तोंडफाट स्तुती. त्याच्या वृत्तपत्रांतील काही बातम्या
  • Fri , 01 April 2022
  • पडघम देशकारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ Rashtriya Swayamsevak Sangh आरएसएस RSS भाजप BJP हिंदुत्व Hindutva हिंदू Hindu हिंदू-राष्ट्र Hindu Rashtra

बातमी सोमवार, दि. २९ मार्च २०२२ची. हैदराबाद येथून आलेली. पण माहीत झाली दोन दिवसांनी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ स्वयंसेवक आणि ‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’ या संघाच्याच एका अपत्याचे पालक इंद्रेशकुमार यांनी सातवा निजाम उस्मान अली खान याची तोंडफाट स्तुती केलीय. निजाम सेक्युलर होता, शिक्षणप्रेमी होता, विकासाची दृष्टी बाळगणारा होता आणि महत्त्वाचे म्हणजे त्याने भारत सरकारला ऐन अडचणीच्या वेळी पैसा पुरवून राष्ट्रप्रेम दाखवून दिले, असे प्रशस्तीपत्र या कुमारांनी बहाल केले. तेही निजामाचे नातू नजफअली खान यांच्या गळाभेटीनंतर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर!

औचित्य होते निजामाचा १३६वा जन्मदिन साजरा करण्याचे. उस्मानिया विद्यापीठाच्या महिला महाविद्यालयात सदर गौरवोदगार कुमारांच्या तोंडून बाहेर पडले. म्हणजे ‘बालिश बाळू बायकांत बहु बडबडला’ अशातला हा प्रकार नव्हता, असे ३१ मार्च २०२२ रोजी जी सारवासारव सुरू झाली, ती सांगू लागली.

पहिली अडचण झाली, ती संघाचे सर्वांत ज्येष्ठ अपत्य भाजपची. तशी नैतिक घालमेल, लज्जित हावभाव किंवा चुकल्यामाकल्याची परवड करणे, भाजपने कधीचेच सोडले आहे. म्हणजे न-नैतिकता व आत्मश्रेष्ठत्व या दोन गोष्टी मातृसंघटनेतच खुराकासारख्या दिल्या जात असल्यावर विचार कसला करायचा?

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ या दैनिकाने महंमद निजामुद्दिन (घ्या, बातमीदाराचेही नाव निजाम!) यांच्या नावाने २९ मार्च २०२२ रोजी जी बातमी दिली, ती सांगते की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत तिथल्या ९ टक्के मुसलमानांनी भाजपला मतदान केले, असे भाजपचेच म्हणणे आहे. ते पुढे तेलंगणात राबवण्यासाठी म्हणे इंद्रेशकुमार असे बोलले. मुस्लीम राष्ट्रीय मंचाने तेलंगणात चांगलीच मुसंडी मारली आहे. तशी त्याने उत्तर प्रदेशातही मारली म्हणे! येणाऱ्या निवडणुकीत त्याचा फायदा भाजपला व्हावा, असा हेतू असला तरी एम.एम. सत्तार हे मंचाचे दक्षिण भारत निमंत्रक मात्र तो हेतू नाही असे म्हणतात. उत्तर भारतीय निरीक्षकांच्या मते काही मुस्लीम बहुसंख्याक मतदारसंघात भाजप जिंकला. त्यातही पश्चिमेकडील मतदारसंघात तो विजयी झाला, तरी नऊ टक्क्यांची शहानिशा करावी लागेल. तसा काही संख्याशास्त्रीय पुरावा ना कोणी देतोय, ना या म्हणण्याला काही ठोस आधार सापडतोय. पण हा दावा केला जाण्याची ही तिसरी वेळ आहे.

इंद्रेशकुमार निजामाचे गुणगान करून परतले, तरी तेलंगणा राज्य भाजपची अळीमिळी गुपचिळी काही संपत नाही. निजामाच्या पाठिंब्याने स्थापन झालेला एमआयएम हा पक्षही गप्प आहे. आंध्र काय, तेलंगणा काय, भाजपचा प्रचाराचा पाया निजामशाही आणि मुसलमानांचा द्वेष हाच राहिला आहे. निजामाने हैदराबाद मुक्तीलढ्याच्या वेळी रझाकारांमार्फत करवलेले अत्याचार भाजपवाले प्रचारात सांगत असतात. त्या वेळी भाजप नव्हता की, जनसंघ. रा. स्व.संघ होता, पण तो लबाडीने कोणत्याही स्वातंत्र्य-चळवळीत उतरत नसे. भारताच्या स्वातंत्र्याची त्याला फिकीर नव्हती, मग हैदराबाद संस्थानाची कशी असणार?

आर्य समाज व हिंदू महासभा यांनी मुक्तीलढा सुरू केला खरा, पण भागानगरचा सत्याग्रह करायची घोषणा करणारे व्ही. डी. सावरकर नेमके त्या वेळी अदृश्य झाले. या दोन्ही संघटना बिनकामाच्या आणि धर्मनिष्ठ असल्याचे पाहून हैदराबाद संस्थानातील बहुसंख्याक हिंदूंनी स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले.

निजाम ब्रिटिशधार्जिणा होता. त्याला आपले संस्थान साम्राज्याच्या वळचणीला नेल्याशिवाय वाचवता येत नव्हते. त्यामुळे तो इंग्रजांचा सोबती होता. संघाने इंग्रजांची गुलामी हटवायचे मनातही कधी आणले नाही. निजाम बोलूनचालून मित्राचा मित्र. मग त्याला त्रास कसा द्यायचा? सबब, संघाचे कार्य त्याच्या स्वभावानुसार ‘भूमिगत’ राहिले. स्वातंत्र्य मिळाल्यावर अमुकाने तमूक केले अन तमुकाने ढमूक केले, असे सांगणारे खूप पुढे आले. पण उपयोग काय? गरज होती, तेव्हा उघडपणे संघ निजामशाहीविरोधात उतरला नाही. तो शाखांमध्ये आभासी मुसलमान शत्रूचा नि:पात करत होता म्हणे!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

इंद्रेशकुमारांचे हे निजामगान ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘सियासत’, ‘मुन्सिफडेअली’, ‘अब्बोन्यूज’, ‘डेक्कन न्यूज’ अशांनीही छापले असल्याने त्याचा प्रतिवाद संघाला करता येणार नाही. बहुतेक वृत्तपत्रांनी कुमार व निजाम यांच्या छायाचित्रांची सजावट या बातम्यांत केलेलीय. ‘डेक्कन न्यूज’ने तर लाल गंध व पांढरी विभूती कपाळावर लावलेले इंद्रेशकुमार आणि शेजारी राजाच्या पोशाखात निजाम उस्मान अली यांचे छायाचित्र प्रसिद्ध केलेय.

इंद्रेशकुमारांनी उर्दू भाषेची स्तुती तर केलीच, शिवाय हैदराबादी नागरिकांनी परस्परांच्या धर्मांचा आदर राखीत ऐक्य टिकवले, असेही सांगितले. त्यांच्या या भाषणात त्यांनी किती उर्दू शब्द वापरले, त्याची गिनती बातमीत केलेली नाही. मुसलमानांची भाषा म्हणून संघवाले उर्दू शब्द टाळतात. नेटाने.

निजाम १९६७ साली वारला. तोवर त्याचा ना काँग्रेसने सन्मान केला, ना कोण्या संस्थेने. तो एक जुलमी, धर्मांध, लबाड आणि शोषक राजा होता, हे साऱ्यांना ठाऊक होते. चीनच्या युद्धाच्या वेळी त्याने भारत सरकारला काही कोटी रुपये पुरवले, हे खरे असले तरी, ती संपत्ती जनतेची लूट करून मिळवलेली होती. निजाम काय अन त्याचे राजपुत्र व राजकन्या काय, कोणीच काही काम करत नव्हते. त्यामुळे त्याच्या या दानतीचे कौतुक काही मूर्ख मुसलमानांना असू शकते, बाकीच्यांना नाही.

मुलींसाठी निजामाने शिक्षणसंस्था सुरू केल्याचा फार आनंद इंद्रेशकुमारांना झालाय. काही घबाड मिळवण्याच्या लालसेने ही तारीफ त्यांनी केली असणार. नाही तर त्यांना सावित्रीबाई फुले, रमाबाई, महर्षि शिंदे, महर्षि कर्वे आदींची याद आली असती.

उर्दू भाषेचे गोडवे गाताना इंद्रेशकुमार इतिहासनामक संघाच्याच लाडक्या विषयात ‘ढ’ असल्याचे जाहीर झाले. निजाम संस्थानात मराठी, कन्नड व तेलुगु भाषकांना मातृभाषेत शिक्षण घेता येत नव्हते, हे या ‘कन्व्हर्टेड’ उर्दूप्रेमीला कसे ठाऊक असणार? सर्वांच्या माथी उर्दू मारण्यात आलेली होती आणि जे जे हिंदू असतील त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये नगण्य स्थान मिळत असे, हे नादान ‘हिंदूराष्ट्रवादी’ कसे जाणून असणार?

अशा आपमतलबी अन अहंकारी माणसाला स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, शंकरराव चव्हाण, आ. कृ. वाघमारे, मंडामुला रामचंद्र राव, रामकृष्ण राव, देवीसिंह चौहान यांची नावे माहीत आहेत का, असे विचारणेही मूर्खपणाचे. पी. व्ही. नरसिंहराव माहीत असतील. ते भारताचे पंतप्रधान होते म्हणून. नरसिंहराव एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते. निदान त्यांचे कार्य काय होते, याची तरी माहिती घेऊन यावे. पण तिथेही गडबड. नरसिंहराव यांची मुलगीच आता भाजपमध्ये आहे. त्यामुळे आपण काहीही बकलो तरी अडवणार कोण, असा खास संघीय आत्मविश्वास कुमारांच्या ठायी असणार!

‘वंदे मातरम’ माहीतच असणार इंद्रेशकुमारांना. ‘जनगणमन’ची बदनामी करून मुद्दाम हे काव्य मोठ्याने म्हणणाऱ्यांपैकी ते एक. तर ही ‘वंदे मातरम’ची घोषणा याच तुमच्या नव-लाडक्या, नवबंधू निजामाने बेकायदा ठरवलेली होती. हो, हो, आमच्या मायदेशात परमप्रिय भारतभूमीत ‘वंदे मातरम’ म्हणणे गुन्हा ठरवलेले होते त्या निजामाने.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

इंद्रेशकुमारांनी त्यांच्या निजामसुक्तानंतर ‘वंदे मातरम’ नक्कीच म्हटले नसणार. शेजारी निजामाचे वंशज बसलेले असताना यांचे धाडस कसे होणार? शिवाय संयोजकांनी शिताफीने ‘अब कार्यक्रम संपन्न हुआ’ असे सांगून संभाव्य अडचण टाळली असणार.

निजामाचे राजकीय वंशज एमआयएम अजूनही १७ सप्टेंबरचा हैदराबाद मुक्ती दिन पाळत नाही. त्यामुळे ज्याला भाजपची ‘बी टीम’ म्हटले जाते, त्यांच्या सुरात सूर संघाचा आपोआप मिसळला गेला. या एमआयएमच्या कारवायांचा थोडक्यात समाचार घेतला पाहिजे. तो असा -

“ही चळवळ हाणून पाडण्यासाठी मुस्लिमांचा एक गट शस्त्रांचा वापर करीत आहे, अशाही बातम्या मी ऐकल्या होत्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सभा चाललेल्या असता, मुस्लीम जमातीपैकी काही सशस्त्र लोक सभेभोवती कडे करून उभे राहत. ते बहुतेक इत्तिहादुल मुसलमीनपैकी असायचे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्लासुद्धा व्हायचा… गोविंदराव पानसरे यांच्या खुनाने सर्व लोकशाही शक्तींचे डोळे उघडले. या घटनेने हे स्पष्ट झाले की, केवळ हैदराबाद सरकारचाच नव्हे तर मुस्लीम समाजाच्या मोठ्या गटाचा कुठलाही लोकशाही स्वरूपाचा बदल घडवून आणण्यास विरोध आहे व आहे तीच परिस्थिती चालू ठेवण्यासाठी म्हणजे अल्पसंख्याकांचे बहुसंख्याकांवर प्रचंड वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी तो गट शेवटपर्यंत लढत राहणार.” (स्वामी रामानंद तीर्थ, ‘हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामाच्या आठवणी’, पृष्ठ १६८)

लक्षात घ्या इंद्रेशकुमार, निजामाने ठार मारलेले गोविंदराव पानसरे आणि हिंदुत्ववाद्यांनी ठार केलेलेही गोविंदराव पानसरेच! तुम्ही कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध न करणे समजू शकतो, पण निजामशाहीच्या विरोधातल्या पानसरेंच्या खुनाचीही तुम्हाला काही पर्वा नाही? त्यांच्यासारखे हुतात्मे गावोगावी झाले. कोणी मारले त्यांना? त्याच त्या उस्मान अली खान या सातव्या निजामाच्या शिपायांनी आणि कार्यकर्त्यांनी. एरवी भारताची गांधीप्रणीत स्वातंत्र्य-चळवळ पुळचट असल्याचा तुमचा दावा. रक्तपाताविना काही मिळत नसते, असा तुमचा सशस्त्र क्रांतिकारकांच्या मागे लपून सादर केला जाणारा पुरावा! तो हैदराबाद मुक्तीलढ्यात कुठे गायब झाला बरे?

संघ जन्मला १९२५ साली. हैदराबाद मुक्तीलढा रस्त्यांवर सुरू झाला १९३८ साली. तो संपला १९४८ साली. संघ ना ३८ साली दिसला, ना ४७ साली, ना ४८ साली. तो अचानक दिसतोय २०२२ साली निजामशाहीच्या जुलमी बाजूकडे डोळेझाक करताना. व्यक्ती म्हणून निजामाचा गौरव करताना त्याला आपले राज्य पाकिस्तानात सामील करायचे होते, हे संघ विसरतोय.

एक राहिलेच. इतिहास कच्चा असणाऱ्यांना पुन्हा पुन्हा काही गोष्टी सांगाव्या लागतात. वल्लभभाई पटेल नावाचे काँग्रेसचे एक थोर स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा खूप मोठा पुतळा गुजरातमध्ये आहे. ते भारताचे पहिले गृहमंत्री होते. त्यांनी निजामशाही बुडवली. निजाम भारत स्वतंत्र झाला तरी संघाप्रमाणेच हे स्वातंत्र्य मानायला तयार नव्हता. त्याला नाना खटपटी करून आपले संस्थान स्वतंत्र ठेवायचे होते. आता स्वतंत्र भारत देशात एखादे स्वतंत्र राज्य कसे काय राहणार? तेव्हा याच वल्लभभाईंनी (त्यांना ‘सरदार’सुद्धा म्हणत!) निजामाला भारतीय सैन्याकरवी पराभूत करून शरण यायला लावले. मराठवाड्यातले लोक म्हणूनच सरदारांना खूप मानतात. अशा शरण आलेल्या, मार खाल्लेल्या राजाचा पुळका संघाला का बरे आलाय? वठणीवर आलेला निजाम पुढे आपल्यावर काही बालंट कोसळू नये, यासाठी काँग्रेसला मदत करत राहिला. इडी, सीबीआय, राष्ट्रद्रोह असे काही व्हायचे मग टळले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

संघाच्या या चापलुशीने काय होईल? मुस्लीम राजाची तारीफ केली म्हणून अवघा मुसलमान मतदार भाजपला मते देईल का? सांगता येत नाही. पण एक सांगता येईल. राजेशाही, गुलामी, अन्याय, मागासलेपण, सुखोपभोग यांचे प्रतीक असलेला निजाम स्वातंत्र्याची-स्वावलंबनाची-स्वराज्याची भावना नष्ट करणारा एक धर्मांध विचार होता. संघ अशा विचाराला प्रतिसाद देणारा मुसलमान स्वतंत्र भारतात उभा करू पाहतोय.

थोडक्यात, भारतात एक पाकिस्तान निर्मू पाहतोय. आपल्या ‘हिंदूराष्ट्रा’च्या उभारणीआड धर्मनिरपेक्ष व समतावादी विचार येऊ नयेत, यासाठी एक धर्मनिष्ठ मतदारच उभा करायचा, हा डाव या निजाम-आरतीमागे दिसतोय. तुम्हाला तुमचा धर्म प्यारा आहे ना, घ्या. आमच्या धर्माआड येऊ नका, असा डाव या निजामी-प्रशंसेमागे खेळला जातोय, एवढे नक्की.

हिंदुत्ववाद्यांनो, सावध व्हा. तुमच्या निष्ठा रंग बदलू लागल्यात…

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख