४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी सौंदर्यस्पर्धा घेण्यात येणार आहे म्हणे! स्वतःच्या भांडवली प्रचारासाठी निष्पाप, निरागस मुलींच्या मनात या स्पर्धेच्या निमित्तानं कोणती बीजं पेरली जाणार आहेत?
पडघम - सांस्कृतिक
ममता क्षेमकल्याणी
  • छायाचित्रं सौजन्य - https://www.facebook.com/juniormissindia
  • Sat , 26 March 2022
  • पडघम सांस्कृतिक ज्युनिअर मिस इंडिया Junior Miss India बेबी पिंक Baby Pink रिअ‍ॅलिटी शो Reality Show सौंदर्यस्पर्धा Beauty Pageant

केवळ भारतीयच नव्हे, तर जगभरातील मुली आणि महिलांच्या जवळपास सगळ्याच बाबतीतले निर्णय घेणारी एक निबर व्यवस्था आणि बीभत्स भांडवलवादी यंत्रणा आपल्या भोवताली कार्यरत असल्याची जाणीव एका मुलीची आई म्हणून होते, तेव्हा त्याचा प्रचंड त्रास होतो.

पाच वर्षांच्या लेकीसाठी कपडे खरेदी करायला गेल्यावर हमखास फिकट गुलाबी, जांभळा किंवा फार तर फिकट पिवळ्या रंगाचे कपडे दाखवले जातात. त्यातली ‘बेबी पिंक’ ही शेड तर कायमच माझ्या डोक्यात जाते. शिवाय मुलींसाठीचे हे कपडे कमनीय, फुलं, फुलपाखरं, नको तिथे असलेले शो बटन्स, बो आणि जाळीदार कापडाने, अशा काही पद्धतीने तयार केलेले असतात की, ते पाहून आणखीनच त्रास होतो. छोट्या मुलींचे कमनीय टी-शर्ट म्हणजे तर कपडेबाजाराचा बीभत्सपणा आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

गेल्या काही वर्षांत याच बीभत्स बाजाराने बार्बीनामक हाडकुळ्या बाहुल्यांचा जो काही उच्छाद  मांडला आहे, त्यामुळे अगदी बालवाडीतील मुलीही ‘फिगर मेन्टेनन्स’सारख्या भंपक प्रकारात ओढल्या जात आहेत. चंदेरी-सोनेरी किंवा अगदी गुलाबी-जांभळे केस असलेल्या, हाय हिल्सच्या पोजसाठी टाचा उंच केलेल्या, बचाबचा मेकअप केलेल्या कमनीय आकारातील या हाडकुळ्या बाहुल्या आणि त्यांचे थोड्याफार फरकाने असेच असलेले संसार लहान वयातील मुलींच्या मनावर सातत्याने कोणते विचार कोरत असतील, या वास्तवाने खरोखरच अंगावर काटा येतो.

आज बहुतांश लहान मुली इतर अनेक वैविध्यपूर्ण खेळणी सोडून बार्बीशीच खेळतात आणि गुलाबी हाच त्यांचा आवडता रंग असतो, हे भीषण वास्तव आहे. पण यामध्ये त्या मुलींचा दोष नसून ‘मुलगी’ म्हणून त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या बीभत्स भांडवलवादी यंत्रणेचा, या यंत्रणेला पोसणाऱ्या व्यवस्थेचा आणि आंधळेपणाने या सगळ्याचा स्वीकार करणाऱ्या पालकांचा दोष आहे.

या सगळ्यात भरीस भर म्हणजे काल रात्री फेसबुकवर एक स्पॉन्सर्ड पोस्ट पाहिली आणि सगळी रात्र जागून काढली. खास ४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी सौंदर्यस्पर्धा घेण्यात येणार आहे म्हणे! चार हे मुलींनी सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्याचं वय आहे का? स्वतःच्या भांडवली प्रचारासाठी निष्पाप, निरागस मुलींच्या मनात या स्पर्धेच्या निमित्तानं कोणती बीजं पेरली जाणार आहेत, याचा विचार करायला नको का?

रिअॅलिटी शो मध्ये कंबर ठुमकवून, छातीवर हात फिरवून इशारे करणाऱ्या (हे अर्थातच त्यांना शिकवलं जातं किंवा दाखवलं जातं!) चिमुरड्या मुलींना परीक्षक आणि प्रेक्षकांकडून मिळणारी शिट्ट्यांची दाद माझ्या काळजाचा ठोका चुकवते. या सौंदर्यस्पर्धा म्हणजे रिअॅलिटी शो चा पुढचा टप्पा असल्याने त्यातील धोके वेळीच ओळखले पाहिजेत.

अशा स्पर्धांमध्ये आपल्या कोवळ्या लेकींना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांची कीव करावी, तेवढी कमीच आहे.

मुळात ज्या वयात मुलगा-मुलगी असले लैंगिक भेद मनात न ठेवता मुलींनी टी-शर्ट-पँटसारखे सुटसुटीत कपडे घालून मनसोक्त खेळावं, फिगर मेन्टेनन्सचा विचार न करता शरीर दणकट बनवावं, ज्या वयात गुलाबी किंवा तत्सम रंगांच्या चौकटीत न अडकता मनमुरादपणे सगळ्या रंगांचा आनंद घ्यावा, हाडकुळ्या बाहुल्यांच्या संसाराच्या पलीकडे जाऊन मैदानी खेळ खेळावेत, सौंदर्यापेक्षा मुलींच्या बुद्धीला महत्त्व द्यावं, असं कोणालाच वाटत नाही का?

बीभत्स बाजाराची ही भांडवली चाल आपल्या रोजच्या जगण्यावर इतकं अतिक्रमण करते आहे की, या सगळ्याचा क्षणभर विचार करण्याचा वेळदेखील आपल्याला मिळत नाही किंवा तो आपण करत नाही, हे खरं वास्तव आहे. पण या सगळ्याची वेळीच दखल घेऊन त्याचा निषेध करून निदान आपल्यापुरतं तरी या सगळ्या गोष्टी फाट्यावर लावल्या नाही, तर येणारा काळ फारच भीषण असेल. स्त्रीकडे बघण्याचा उपभोगवादी बीभत्स दृष्टीकोन आपल्या कोवळ्या बालिकांचं भवितव्य अंध:कारमय करणार...

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

म्हणूनच या अंधार मार्गावर चालताना एक संवेदनशील माणूस म्हणून, एक सजग नागरिक म्हणून आणि एक जबाबदार पालक म्हणून आपण निदान आपल्या पातळीवर काजवा बनून काही पथ्यं पाळायला हवी, असं मला वाटतं.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण बाजारू भांडवलवादी आक्रमणांबद्दल आपण सतत सजग राहिलं पाहिजे. आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागील हेतू आणि हितसंबंध आपल्याला ओळखता आले पाहिजेत. कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्याआधी तिच्या परिणामांचं वास्तव समजून घेता आलं पाहिजे. त्यासाठी स्वतःशी कायम विवेकी संवाद कसा होईल, हे पाहिलं पाहिजे.

आज आपल्या हातात अनेक माध्यमं सहज उपलब्ध असताना त्यांचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं वापर करून आपल्याला जाणवणाऱ्या अविवेकी गोष्टींबद्दल आपण थेट व्यक्त झालं पाहिजे. या माध्यमांच्या प्रभावी वापरातून आपले विचार आणि दबावगट तयार करण्यासाठी आपण एक संवेदनशील माणूस म्हणून पुढे यायला हवं. लोकशाही व्यवस्थेतील सजग नागरिक म्हणून वावरताना आपला ‘वापर’ होत नाही ना, याचं भान राखायला हवं.

एक पालक म्हणून जबाबदारी पार पाडताना आपण आपल्या पाल्यांना नेमकं काय देत आहोत, याचा विचार करायला हवा. याही पुढे जाऊन बाजारू गोष्टींनी भुलून न जाता आपल्या पाल्याच्या झोळीत निर्भेळ आनंद, चिरकालीन समाधान आणि संवेदनशील विचारांची पुंजी पडण्यासाठी आप खमकेपणानं उभं रहायला हवं. म्हणूनच या सगळ्याविषयी मी माझ्या मुलांशी कायम मोकळेपणानं बोलत असते. क्षणिक प्रसिद्धी, टाळ्या आणि पैसा या पलीकडचं जगण्याचं भान देण्यासाठी प्रत्येक व्यवहाराविषयी मी त्यांना समजेल, अशा शब्दांत त्यांच्यापर्यंत विचारांचे धागे घेऊन जाते.

काही मुलींना गुलाबी रंग आवडतो, यात गैर काहीच नाही, मात्र हा गुलाबी रंग विशिष्ट पद्धतीनं जेव्हा सरसकट सगळ्या मुलींची आवड म्हणून लादला जातो, तेव्हा त्याचा निश्चित विचार केला गेला पाहिजे. गुलाबी रंग मुलींचा म्हणजे ‘बायकी’ आणि निळा रंग मुलांचा म्हणजे ‘पुरुषी’, अशी अगदी बाल्यावस्थेत होणारी विभागणी समाजात लैंगिक दुजाभाव निर्माण करणारी आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यातून एकाच वेळी मुली आणि मुलं यांना आपण किती चुकीचा संदेश देतो, याचं भान राखलं पाहिजे. त्यासाठी मुलांबरोबरचा संवाददेखील महत्त्वाचा आहे. तो वाढवला पाहिजे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

माझ्या पाच वर्षांच्या मुलीला मी खरेदी करायला घेऊन जाते, तेव्हा तिला कोणती वस्तू घेणं गरजेचं आहे, त्यात कोणते वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत, कोणत्याही एका विशिष्ट चौकटीत न अडकता उपलब्ध पर्यायांचा विचार कसा करायचा असतो, असं मी तिच्याशी बोलते. वस्तूंचे आकार, त्यांचे रंग, निसर्गात या रंगांचं असलेलं महत्त्व पटवून देतानाच या पर्यायांमुळे आपलं जगणं किती वैविध्यपूर्ण होणार आहे, हेही तिला सांगते.

हेच माझ्या ११ वर्षांच्या मुलाच्या बाबतीतही करत आले आहे आणि आजही करते. मुलांबरोबरच्या या संवादातून त्यांना जो अवकाश प्राप्त होतो, त्यातून मुलं अधिक संवेदनशील आणि निर्णय घेण्यासाठी सक्षम होतात, असा माझा अनुभव आहे. यातून त्यांचा भविष्याचा मार्ग अधिक सुकर होतो, कारण छोट्या छोट्या निर्णयांमुळे त्यांची स्वतःची विचार आणि निर्णय क्षमता अधिक परिपक्व होते आणि मग ते अशा बाजारू भांडवलवादाला भीक घालत नाहीत.

बरेचदा ‘मुलांना काय कळतं?’ असं म्हणून  पालक शस्त्र टाकून देतात. पण माझा अनुभव असा आहे की, जितक्या ताकदीनं आपण मुलांपर्यंत असे विवेकी विचार पोहोचवतो, त्याच्या कैक पटींनी मुलं तो विचार आत्मसात करत असतात. इतकंच नाही, तर प्रसंगी पालकांना त्यांच्या विचारांची आठवणदेखील करून देतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

त्यामुळे आपण नकळतपणे या बीभत्स भांडवलवादाला खतपाणी तर घालत नाही ना, हे तपासून पहायला हवं. मुलांसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातून लैंगिक दुजाभाव आणि स्त्रीविषयीचा उपभोगवादी संदेश व्यक्त होत नाही ना, याकडे आपण आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. कारण स्त्री-पुरुष यांच्यात दरी निर्माण करणारा भांडवलवादाचा हा रेटा थांबवणं, हे आता कोणाच्याच हातात राहिलेलं नाही, याची स्पष्ट जाणीव मला आहे. त्यामुळे काहीतरी चमत्कार होईल आणि येत्या काळात हा बीभत्स भांडवलवाद कायमचा नेस्तनाबूत होईल, अशी माझी भाबडी आशा अजिबात नाही.

उलट मी जो विचार करते आहे आणि मांडू पाहते आहे, त्याला ‘मागास’ म्हणून तुच्छ लेखणाऱ्यांचं प्रमाण बरंच जास्त असणार, याचीदेखील मला खात्री आहे. अशा परिस्थितीत माझ्या बाजूने विचार करणाऱ्या मूठभरांचं मनोबल वाढवणं आणि काठावर असणाऱ्यांना अल्ल्याड की पल्ल्याड, हा निर्णय घ्यायला माझ्या अनुभवांच्या माध्यमातून मदत करणं, हाच माझ्या या मांडणी मागचा हेतू आहे. आपण नेमकं काय काय करू शकतो, याची ही केवळ एक उजळणी आहे, असं म्हटलं तरी चालेल.

.................................................................................................................................................................

लेखिका ममता क्षेमकल्याणी या मुक्त पत्रकार आहेत.

mamatakshem@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख