‘इरफान : डायलॉग्ज  विथ द विंड’ - दोन कलावंत माणूस म्हणून कसं एकमेकांशी व्यक्तिगत नातं घडवत जातात, याचा सुंदर पट या पुस्तकातून उलगडत जातो
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
अंजली अंबेकर
  • ‘इरफान : डायलॉग्ज  विथ द विंड’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि इरफान खानच्या काही भूमिका
  • Tue , 15 March 2022
  • ग्रंथनामा दखलपात्र इरफान : डायलॉग्ज  विथ द विंड Irrfan : Dialogues with the Wind अनूप सिंग Anup Singh इरफान खान Irrfan Khan वहिदा रहमान Waheeda Rehman किस्सा Qissa द साँग ऑफ स्कॅार्पिअन्स The Song of Scorpions

“I picture you in your grave positioning yourself… Memory is but one measure of a life. No picture is you.”

आपल्याकडे चित्रपटविषयक पुस्तकांमध्ये चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया, कलावंत किंवा तंत्रज्ञ यांच्या कथनात्मक/आत्मकथनात्मक संदर्भांची बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत. चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया विशद करताना लेखक व दिग्दर्शक यांच्या जुळलेल्या भावबंधाच्या अनुषंगानं, त्यांच्यातलं कलावंतपण आणि माणूसपण अधोरेखित करत असतानाच चित्रपटनिर्मिती प्रक्रिया उलगडून सांगणारं ‘इरफान : डायलॉग्ज  विथ द विंड’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय.

इरफान खान या कसलेल्या आणि अभिनयाचा अनेक अर्थानं ताळेबंद व्यक्त करणाऱ्या अभिनेत्याचं मागच्या वर्षी दुःखद निधन झालं. तेव्हा त्याच्यासोबत दोन चित्रपट करणाऱ्या अनूप सिंग या लेखक-दिग्दर्शकाला त्याच्यासोबत जुळलेल्या मैत्राच्या अनुषंगाने त्यांच्या दोन चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया शब्दबद्ध करावीशी वाटली. आणि त्याच असोशीतून या पुस्तकाची निर्मिती झाली.

अनूप सिंग हे स्वतः उत्तम लेखक, चित्रपटशिक्षक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी मणी कौल या महत्त्वाच्या दिग्दर्शकासोबत ‘सिद्धेश्वरी देवी’ या चित्रपटासाठी सहायक म्हणून काम केलेलं आहे. ‘द नेम ऑफ रिव्हर’ (२००३), ‘किस्सा’ (२०१३) आणि ‘द साँग ऑफ स्कॅार्पिअन्स’ (२०१७) या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजलेल्या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. त्यापैकी ‘किस्सा’ आणि ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स’ या दोन चित्रपटांत इरफानच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

अनूप यांची पटकथा ऐकून इरफानने जवळ जवळ ‘किस्सा’ हा चित्रपट करण्यास नकारच दिला होता. परंतु अनुप सिंग यांनी हट्ट न सोडता पुन्हा पटकथा ऐकवली. या वेळेस इरफानने काम करण्यास संमती दर्शवली. त्यानंतरचा चित्रपटनिर्मितीचा प्रवास, अभिनेता आणि माणूस यांचा इरफानमधील तोल, याचं संवेदनशील चित्रण अनुप सिंग यांनी या पुस्तकात केलंय.

इरफानचं अभिनय क्षेत्रांतील निर्विवाद कर्तृत्व सर्वांना ज्ञात आहेच, परंतु हे कलावंतपण त्याच्या जगण्यातील छोट्या छोट्या क्षणांतून त्याने कसं जपून ठेवलं होतं, याविषयी अनुप सिंग यांनी फार सुंदर लिहिलं आहे. इरफानची अभिनयातील टोन आणि ऱ्हिदम जपण्याची असोशी, व्यक्तिरेखा समजून घेऊन, त्यांत प्रवेश करण्याचा ध्यास, नुसरत फतेह अली खान यांच्या संगीतातून, त्यातल्या प्रेरणेतून स्वतःमधील अभिनेत्याला तपासण्याची जिद्द, या पुस्तकातून तपशीलवार मांडली आहे. कलावंत आणि दिग्दर्शकाचे नातेसंबंध चित्रपटातील व्यक्तिरेखेला समजून-उमजून घेत कसे मानवी पातळीवर समृद्ध होत जातात, हेही यातून समजून घेता येतं.

चित्रपटांतील इतर कलावंत तिलोत्तमा शोम, रसिका दुग्गल आणि टिस्का चोप्रा यांची निवड करताना इरफानची मते, समोरच्या अभिनेत्याच्या अभिनयाबद्दल असणारा आदर मोलाचे इनपुट्स देतो. इरफानला संगीताच्या आवडीसोबतच पतंग उडवण्याचाही शौक होता. ‘किस्सा’च्या चित्रीकरणादरम्यान त्याने २०-२५ पतंग विकत आणले होते. त्याबाबत इरफानचे विचार फार मोलाचे आहेत. तो म्हणे, ‘जेव्हा पतंगाचा मांजा /दोर हातात असतो, तेव्हा सगळं काही आपल्या नियंत्रणात आहे असं वाटतं. परंतु वाऱ्याची एक झुळूक एका क्षणात त्या दोराबाबतची आपली सूक्ष्म हालचाल, ते नियंत्रण आपल्याकडून हिरावून घेते. तेव्हा पतंग एकतर आकाशात आनंदाने विहरतो तरी किंवा जमिनीवर क्षणार्धात कोसळतो तरी. तो क्षणच पतंगाच्या जन्म-मृत्यूच्या बाबतीतला निर्णायक असतो.’

तसंच इरफानचं अभिनयाशी नातं होतं. त्याचा वाऱ्याच्या झुळुकीशी सातत्यानं संवाद होत असायचा. अभिनयाची लांबी-रुंदी आणि खोलीचा तो जगण्याच्या प्रत्येक क्षणात विचार करायचा. आणि ती जाण त्याच्या अभिनयातून व्यक्तही व्हायची. हे फार अनोख्या पद्धतीनं अनुप सिंग यांनी नोंदवलं आहे.

अनुप सिंग आणि इरफानच्या मैत्रीला बांधून ठेवणारा संगीताचा धागा फार तरलपणे पुस्तकांत जागोजागी, सुंदर शब्दांची पखरण पसरत येतो. मग ती नुसरत अली खान यांची कव्वाली असो किंवा मदन गोपाल सिंग या गायकाने गायलेली अप्रतिम गाणी. त्या सोबत इरफान आणि अनुप सिंग यांच्या मैत्रीचा रंगही गहिरा होत जातो.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................ 

‘किस्सा’मधील इरफानच्या उंबर सिंग या व्यक्तिरेखेचे आरोह-अवरोह, त्यातला त्रास, आणि ज्यामुळे सुरुवातीला इरफानने ती भूमिका करायला नकार दिला होता, त्या भूमिकेसोबतचा इरफानचा स्वतःचा प्रवास झाला. चित्रपटनिर्मितीच्या काळातच अनुप सिंग आणि इरफान यांनी इतर कलावंतांच्या भूमिकांची चर्चा करत प्रत्येक प्रसंगातल्या सहकलावंतांच्या क्रिया-प्रतिक्रियेतून उंबर सिंगची व्यक्तिरेखा स्वतः जगून अधिक जिवंत केली. उंबर सिंग ही लाऊड टोन असणारी व्यक्तिरेखा, व्यक्तिगत आयुष्यात सॉफ्ट टोन असणाऱ्या इरफानने कशी उभी केली, हे मुळातून वाचण्यासारखं आहे.

चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेची समज, चित्रपटातील फाळणीची पार्श्वभूमी, याबद्दल काही गोष्टी उलगडत जात होत्या, परंतु इरफानची फाळणीबाबतची समज सआदत हसन मंटोच्या लिखाणातून अधिक प्रगल्भ झालेली होती. ‘किस्सा’च्या शूटिंगच्या वेळी पम्मी नावाचा गृहस्थ इरफानला शीख धर्मीयांमध्ये बांधतात, तशी पगडी बांधण्याचं काम करायचा. ते फार कौशल्याचं काम असायचं. परंतु त्याच्या काही कौटुंबिक समस्यांमुळे तो अस्थिर असायचा. त्याचा परिणाम चित्रपटावर होईल, अशी परिस्थिती उद्भवायची, तेव्हा त्याच्या कौटुंबिक समस्या सोडवणं चित्रपट युनिटला अवघड होऊन बसायचं. ही कसरत करणं कठीण झालं, तेव्हा पम्मीने पगडी बांधण्यासाठी कुणाला तरी ट्रेन करावं, या अटीवर त्याची सुटका करण्यात आली. पम्मी निघताना इरफान यांनी त्याच्या बायकोसाठी सुंदर शाल, पम्मीसाठी कार्डिगन आणि पाकिटात पैसे टाकून दिले. इरफानची ही कृती त्याची युनिटविषयीची भावना व्यक्त करणारी आहे.

‘किस्सा’नंतर दोघांचं क्रिएटिव्ह ट्युनिंग जुळलं होतं. त्यामुळे अनूप सिंग यांच्यासोबत इरफानने ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स’ हा दुसरा चित्रपट केला. याची पटकथा आणि त्यातील आदम या उंट विक्रेत्या माणसाची भूमिका ऐकून इरफानने ‘अनूप साब, आप कितने डिफिकल्ट रोल मेरे लिये लाते हो!’ अशी प्रतिक्रिया दिली होती. कालांतराने ही भूमिका करण्याचे आव्हान स्वीकारले. त्यासाठी स्कॉर्पिअन्स शोधत जोधपूरच्या बाजारात केलेली सैर, त्या लोकांना जवळून अनुभवून आत्मसात केलेला टोन, याचेही संदर्भ या पुस्तकात आहेत.

या चित्रपटात इरफानचे सहकलावंत होते, प्रसिद्ध अभिनेत्री वहिदा रहमान आणि गोल शीफिथ फरहानी या इराणी चित्रपटातील अभिनेत्री. ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन्स’ हा चित्रपट करण्यास तयारी दर्शवण्यापूर्वी वहिदाजींनी आठ वर्षं कुठल्याही चित्रपटांत काम केलेलं नव्हतं. अनूप सिंग यांची पटकथा आणि ‘किस्सा’ हा चित्रपट आवडल्यामुळे त्या काम करायला तयार झाल्या होत्या.

गोल शीफिथ फरहानी या इराणी अभिनेत्रीची आणि अनूप सिंग यांची भेट अबू धाबी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या वेळी झाली. त्या फेस्टिव्हलला इरफान आणि अनूप सिंग, ही दोघेही गेले होती. गोल शीफिथ फरहानीसोबत दोन दिवस एकत्र असताना त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. गोल शीफिथ यांनी अनेक पर्शियन सूफी कविता गाऊन दाखवल्या. गोल शीफिथ यांचं देशापासून सुटण्याचं, तुटण्याचं दुःख बोलण्यातून जाणवायचं. त्या गप्पांमधून गोल शीफिथमधील सृजनात्मक भावावेग तीव्रतेने जाणवला. त्या अधिक उलगडत गेल्या आणि अनूप सिंग यांना त्यांच्या चित्रपटातील नूरा अशी अलगद ओंजळीत आली. स्वतःच्या कोषातून, शरीरातून मुक्त होऊन जगण्याचा शोध घेणारी, जगणं साजरं करणारी नूरा गोल शीफिथमध्येच अखेर सापडली की, गोल शीफिथ यांच्यामुळे नूराचा शोध लागला, हे ठरवणं अवघड आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अनूप सिंग यांच्या मनातली ही आंदोलनं इरफानना जाणवली. गोल शीफिथ निघून गेल्यावर, संध्याकाळी इरफानने अचानक अनूप सिंगांना विचारलं की, ‘ते गोल शीफिथ यांना चित्रपटांत कास्ट करण्याचा तर विचार करत नाहीत ना?’ तेव्हा अनूप सिंग यांनी त्यांच्या मोबाईलमधील गोल शीफिथ फरहानीचा पॅरिसमधील फोननंबर दाखवला. त्यानंतर त्यांनीच नूराची व्यक्तिरेखा करणं ओघानं आलंच.

चित्रपटनिर्मितीची प्रक्रिया, प्रत्यक्ष चित्रीकरणस्थळी येणाऱ्या अडचणी, त्यातून कलावंत आणि तंत्रज्ञ कसं त्यांचं मनोधैर्य टिकवत काम करतात, याबाबतही अनूप सिंग यांनी उत्तम लिहिलं आहे. या पुस्तकात इरफानची अभिनेता म्हणून पॅशन जागोजागी दिसतेच, परंतु दिग्दर्शक व अभिनेता या दोन कलावंतांतील अजोड संवाद किती महत्त्वाचा असतो, हेही जाणून घेता येतं.

अनूप सिंग यांनी इरफानमधील अस्वस्थता, त्याची पत्नी सूतापाच्या हातचे कबाब, त्याच्या घरच्या मैफलीही शब्दबद्ध केल्या आहेत. अभिनेता आणि लेखक-दिग्दर्शक या व्यावसायिक नात्याने जवळ आलेले हे दोन कलावंत माणूस म्हणून कसं एकमेकांशी व्यक्तिगत नातं घडवत जातात, याचा सुंदर पट या पुस्तकातून उलगडत जातो. अनूप सिंग यांच्यातला कवी, लेखक या प्रवासाला फार सुंदर शब्दांत पुढे नेतो.

इरफानच्या शेवटच्या काळातील फार हृद्य आठवणी आहेत. दुर्धर आजाराचं निदान झाल्यावरही इरफानने सकारात्मकता टिकवून ठेवली होती. त्याच्या शेवटच्या हॉस्पिटलायझेशनच्या वेळी अनूप सिंग भेटायला गेले. इरफान शेवटचा काळ जवळ आला आहे, मृत्यूबाबतचं चिंतन अशा आशयाचं बोलायला लागला. यातून त्याला परावृत्त करण्यासाठी अनूप सिंग ‘डान्स’ या विषयावरील त्यांच्या नियोजित चित्रपटाबद्दल बोलायला लागले. तेव्हा इरफानना जागेवरून हालचाल करणंही त्रासदायक होतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या चित्रपटांत वहिदा रहमान मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार होत्या. अनूप सिंग यांनी लॅपटॉपवर वहिदा यांच्या ‘प्यासा’ चित्रपटातील ‘जाने क्या तुने कहीं…’ हे गाणं लावलं. ते ऐकताच इरफान हळूहळू बेडवरून उठल, लॅपटॉप खाली ठेवला आणि गाण्यातील हालचालीनुसार नृत्य करायला लागला.

...हा असा इरफान होता! जीवघेण्या वेदनेतून जात असताना, साक्षात मृत्यू समोर उभा असताना...

‘इरफान : डायलॉग्ज विथ द विंड’ - अनूप सिंग

कॉपर कॉईन, नवी दिल्ली

पाने  - २०५

मूल्य  - ६९९ रुपये.

..................................................................................................................................................................          

लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.

anjaliambekar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......