का असते असे किशोरवयीन मुलांचे वर्तन? का त्यांना वेगळे स्टंट करावेसे वाटतात? ...तर त्याची काही मानसिक, शारीरिक कारणे आहेत
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सोपान मोहिते
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 14 March 2022
  • पडघम कोमविप किशोरवयीन मुले Teenagers

कोणी तरी एक ‘हिंदुस्थानी भाऊ’ येतो. दहावी-बारावीच्या मुलांना समाजमाध्यमातून संदेश देतो. त्याच्यावर मुले विश्वास ठेवतात. रस्त्यावर एकत्र येतात आणि सरकारला आव्हान देतात. कोणी एक ‘थेरगाव लेडी’ येते, समाजमाध्यमातून शिवराळ भाषेचा वापर करून प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करू लागते.

पुण्यातील एका गुंडाची मुंबईच्या तुरुंगातून सुटका होते आणि त्याची मुंबई ते पुणे अशी भली मोठी मिरवणूक काढली जाते. औरंगाबादमधील प्रा. डॉ. राजन शिंदे खून प्रकरणातला आरोपी विधी संघर्ष हा बालक असल्याचे समोर येते. पुणे-सातारा रोडवर दर रविवारी बेदकारपणे दुचाकी चालवणारे राइडर्स, वर्धा येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांचा अपघात, बार्शीमधील फटे शेअर घोटाळ्यामध्ये पैसे गुंतवलेली तरुण मुले किंवा हॉटेलात, रस्त्यावर तलवारीने केक कापणारी मुले…

ही सगळी साधारणत: वय वर्षं १२ ते २० या दरम्यानची वयोगटातील मुले. यांना ‘किशोरवयीन’ म्हटले जाते. वरील घटना पाहिल्या तर आपल्या समाजातील किशोरवयीन मुलांची वाटचाल कोणत्या दिशेने चालली आहे, हे लक्षात यायला वेळ लागत नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

का असते असे किशोरवयीन मुलांचे वर्तन? का त्यांना वेगळे स्टंट करावेसे वाटतात?

तर त्याची काही मानसिक, शारीरिक कारणे आहेत.

किशोरावस्था ही संक्रमण अवस्था आहे. त्यामुळे जीवनातील अनेक आव्हानांना किशोरांना सामोरे जावे लागते. त्यांच्यात अनेक शारीरिक बदल होतात. परिपक्वतेची गती जलद असते. लैंगिक परिपक्वता येऊ लागते. लैंगिक रुची वाढते. मुले वयात येताच त्यांच्या कौटुंबिक संबंधात झपाट्याने बदल होत जातात. ती आई-वडिलांपासून दूर जातात. त्यांची समवयस्कांशी जवळीकता वाढते. त्यांच्याशी सहवास, संवाद अधिक जवळचा वाटतो. ‘मी आता मोठा झालेलो आहे. मला सांगायची आवश्यकता नाही. मला सर्व कळते’, अशी बंडखोरीची भाषा त्यांच्या तोंडी येऊ लागते. त्यामुळे पालक रागावतात वा गोंधळतात.

पालकांचे निर्णय स्वीकारणारी मुले किशोरावस्थेत त्यांच्या विरोधात बंडखोरी करायला लागतात. त्यांना आता स्वायत्तता हवी असते. स्वतंत्र आणि नियंत्रण मुक्त जीवन जगावेसे वाटते. काही पालक आपल्या मुलांच्या अशा वर्तनाचे स्वागत करतात, परंतु त्यांची दिवसेंदिवस वाढत जाणारी स्वायत्तता हाताळणे त्यांना कठीण जाते. रेल्वे रूळ बदलताना जसा खडखडाट होतो, तसाच काहीसा बदल बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत जाताना मुलांमध्ये होतो.

किशोरवयीनांवर मित्र, कुटुंब आणि शाळेचा सारखाच प्रभाव पडतो. परंतु त्यांची मन:स्थिती गोंधळलेली असते. पण त्यांनी शांत, सुव्यवस्थित समाजमान्य रीतीने वागावे, अशी समाजाची अपेक्षा असते. स्वतःमध्ये होणारे बदल आणि समाजाची अपेक्षा, अशा कात्रीत ते सापडतात. स्वतःचे समाजातील स्थान शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना स्व-बोधन होऊ लागते. स्व-ओळख महत्त्वाची वाटते. इतरांसमवेत ते स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करायला लागतात. इतरांपेक्षा आपण वेगळे कसे होऊ, याचा शोध घेत असतात. स्वतःची एक वेगळी ओळख असावी, यासाठी ते वेगवेगळ्या युक्त्या आणि क्लृप्त्यांचा शोध घ्यायला लागतात. यातूनच ‘थेरगाव क्वीन’ पुढे येते. आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते.

या वयोगटातील मुले वास्तवापासून दूर जातात. समाजात वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. उदा. एखादा मुलगा अभ्यासात हुशार नसेल तर मैदानात, खेळात वेळ खर्च करून खेळाडू म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू पाहतो. अपेक्षित मार्क मिळत नसतील तेव्हा, लेखन, वाचन, गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेऊन आपण कोठे तरी असावे, यासाठी धडपड करतात. मित्रांमध्ये लोकप्रिय असावे, असे त्यांना वाटू लागते.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

किशोरवयीनांमध्ये असे मानसिक बदल होत असताना ते सध्या समाजात कोणाची चर्चा जास्त आहे, कोण प्रसिद्ध आहे, याकडे लक्ष देत असतात आणि त्याप्रमाणे आपले वर्तन असावे, म्हणजे आपणाला प्रसिद्धी मिळेल, याच्या शोधात असतात. लेखक, कवी, राजकारणी, अभिनेता, अभिनेत्री असे जे कोणी त्यांनी आदर्श ठरवलेले असतात, त्या पद्धतीने बोलणे, हेअरस्टाईल, पेहरावात बदल केला जातो. प्रसिद्ध होण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. एकंदरीत काळाच्या ओघात आदर्शांनुसार वर्तन करणे त्यांना आवडते.

उदा. २००३-०४च्या दरम्यान सलमान खानचा ‘तेरे नाम’ हा सिनेमा आला होता. तेव्हा त्याप्रमाणे कॉलेजमधील मुलांची हेअरस्टाईल बदलली होती. नंतर आमीर खानचा ‘गजनी’ आला, तेव्हा त्यांनी त्याप्रमाणे हेअरस्टाईलमध्ये बदल केला. त्या त्या कालखंडात जो कोणी आयडॉल असेल, त्याप्रमाणे वर्तन करावे, असा मोह किशोरवयीन मुलांना होत असतो. कारण सर्वांची नजर आपल्यावर खिळलेली राहावी, असे त्यांना वाटत असते. त्यांचा एक विशिष्ट वयोगटाचा ‘कंपू’ तयार होतो. समान विचारसरणीचे समवयस्क एकत्र येऊन ‘कंपू’ तयार करतात. त्यात सर्वांचे वर्तन कसे असावे, हे ठरवले जाते. त्याप्रमाणे सर्व जण करतात.

उदा. जीन्स वापरायची ठरवले तर, सर्व जण जीन्स वापरतात. दाढी वाढवायची ठरवली तर सर्वांनीच दाढी वाढवायची. एकंदरीत बोलणे, चालणे, गप्पा, विनोद, कपडे, स्टाईल, राहणीमान, मादकद्रव्य, लैंगिक वर्तन या सर्व प्रकारात एकवाक्यता ठेवण्याचा प्रयत्न करतात. एक व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. मानसशास्त्रज्ञ एरिक्सन यांच्या मते ओळखीचा शोध घेताना किशोरांमध्ये ओळख-संघर्ष निर्माण होतो. किशोर मानसिकदृष्ट्या गडबडलेले दिसून येतात.

सध्याच्या काळात मुलांमध्ये समाजविघातक वर्तन करण्याचा कल मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे, त्याला परिस्थिती कारणीभूत आहे, असे दिसते. करोना काळात शाळा, महाविद्यालयांसह सर्व काही ऑनलाईन झाले. ऑनलाईन वर्ग भरू लागले. थोडा वेळ अभ्यास आणि नंतर वेळच वेळ. मग वेबसिरिज पाहणे, गेम खेळणे, सेल्फी काढणे, एखादी अभ्यासाची समस्या असेल, तर यु-ट्युबच्या माध्यमातून ती सोडवणे, असे प्रकार रिकाम्या वेळेत घडू लागले. मग कशाला जास्त प्रसिद्धी जास्त मिळते, त्याकडे लक्ष दिले जाऊ लागले. नवीन व्हिडिओ तयार करून यु-ट्युबवर अपलोड करणे. त्याला किती लाईक आले? किती व्ह्यू आले? आणखी व्ह्यू मिळवण्यासाठी काय करावे लागेल, असा विचार करून त्यात नावीन्य शोधले जाऊ लागले. त्यातून शॉर्ट व्हिडिओ, रील्स व्हिडिओ तयार होऊ लागले.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

यामधून अनेकांना पैसे, प्रसिद्धी मिळाली. उदा. ‘गोलीगत’ व्हिडिओ तयार करणारा सूरज चव्हाण. औरंगाबादमधील प्रा. डॉ. राजन शिंदे खून प्रकरणात विधी संघर्ष या मुलाने क्राईम वेबसिरीज, झटपट खून करता येणारे व्हिडिओ पाहिल्याचे समोर आले आहे. थोडक्यात कोणताही प्रश्न समोर उभा असेल तर त्याचे उत्तर यु-ट्युबच्या माध्यमातून सोडवले जाऊ लागले. गुगलला प्रश्न विचारू लागले. नवीन व्यासपीठ त्यांना मिळाले. उदा. प्रेमात यशस्वी होण्याची ट्रिक, बॉम्ब कसा तयार करावा, खून करून पुरावे कसे नष्ट करावेत, वीज चोरी कशी करावी, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे यु-ट्युबच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न केला जातो. योग्य-अयोग्य समजण्याचे किशोरवयीनांचे वय नसते.

अशा घटना घडण्यामागील कारणांचा शोध घेतला असता एकीकडे असे दिसते की, संबंधित कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा धाक कमी होत गेला. तर दुसरीकडे ‘ही माझी व्यक्तिगत बाब आहे, तुम्ही माझ्या जीवनात नका डोकावू’, असे म्हणण्याची भाषा वाढते.

असे असले तरी योग्य नियोजन केले आणि खिलाडू वृतीने या मुलांना समजावून घेतले, तर त्यांच्याकडून होणाऱ्या विघातक वर्तनाला आळा घालता येतो. ही संक्रमण अवस्था थोड्या कालावधीसाठी असते, परंतु तो कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो. मानसतज्ज्ञ रॉजर्स असे म्हणतात की, प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात त्याच्या विकासाची बिजे सुप्त स्वरूपात असतात. परंतु सभोवतालची परिस्थिती आणि त्या व्यक्तीवर होणारे संस्कार, यामुळे त्याच्या विकासात अडथळे निर्माण होतात. त्यातून विविध मानसिक समस्या निर्माण होतात. मुक्त हालचालींना मुभा असली की, मुलांच्या शारीरिक प्रगतीचा आलेख अपोआपच चढता राहतो. योग्य वातावरण असल्यास व्यक्तिमत्त्वातील सुप्त गुण परिपूर्णतेच्या दिशेने विकसित होत जातात. ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. औरंगाबादमधील प्रा. शिंदे प्रकरणात समोर आलेल्या विधी संघर्ष बालकावर पालकाचा प्रचंड दबाव होता. वारंवार त्यांच्यात संघर्ष होत होते. त्यामुळे त्याचे नैसर्गिक जगणेच हरवून गेले. परिणामी त्याने नको तो मार्ग निवडला.

लहान मुलावर त्याचे आई-वडील किंवा इतर लोकांचे नियंत्रण असते. आई-वडिलांच्या इच्छेनुसार वागणे म्हणजे ‘चांगली वागणूक’ आणि विरुद्ध वागणे म्हणजे ‘वाईट वर्तणूक’, अशी त्याच्या मनाची दृढ समजूत होते. त्यामुळे स्वतःला विकासाकडे नेणाऱ्या नैसर्गिक उर्मी कधी कधी मूल दडपून टाकते. तरुणपणीदेखील ही वागणुकीची कठोर चौकट तशीच टिकून राहते. त्यामुळे समस्या निर्माण होत राहतात. म्हणून मुलांवरील अदृश्य नियंत्रणे हळूहळू शिथिल करणे आणि त्याचा मूळ स्वाभाविक प्रवृत्तींना वाट मोकळी करून देणे आवश्यक असते. आपल्या मुलाच्या नैसर्गिक प्रवृत्ती मुक्त होतील, त्याला विकासाच्या दिशेने घेऊन जातील, असे वातावरण तयार करणे गरजेचे असते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आई-वडिलांनी आपल्या मुलाचा बिनशर्तपणे स्वीकार केला पाहिजे. त्याच्या मनात काही अपराध भाव असतात, न्यूनगंड असतो. स्वत:च्या मानसिक समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी योग्य अशा आत्मविश्वासाचा अभाव असतो. अशा वेळी त्याला दिलासा मिळावा म्हणून आई-वडिलांनी आपल्या वागणुकीतून आपुलकीची, आदराची, स्वागताची भावना व्यक्त करणे, आवश्यक असते. याचा अर्थ ‘तुझे सर्व बरोबर आहे’ असे सांगणे नव्हे, तर ‘चूक-बरोबर’ हा न्यायनिवाडा करण्याची ही वेळ नाही, तर ‘तू कसाही असलास तरी एक सामान्य व्यक्ती म्हणून तुझ्याविषयी आम्हाला विश्वास आहे’, अशी एक स्वीकाराची स्वागतशील प्रतिक्रिया व्यक्त होणे गरजेचे असते. मुलांना समजून घेणे आणि त्याला स्वतःचा मार्ग शोधण्यास प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आणि गरजेचे असते.

मुलांचा आत्मसन्मान जागृत झाला तर ती आपल्या समस्येला धीटपणे सामोरी जाऊ शकतात. लाज, श्रम, पश्चताप या अपराधी भावभावनांना मूठमाती देऊन संकटाशी मुकाबला करू शकतात. आणि आपल्या भवितव्याची सूत्रे समर्थपणे सांभाळू शकतात. ज्या वेळी त्यांना समस्या भेडसावू लागतात, त्या वेळी मोकळे, दिलासा देणारे वातावरण निर्माण केले, तर मुले मार्ग काढू शकतात. त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून जबाबदारी सोपवली, तर स्वत:च्या समस्या ते स्वतःच सोडवण्यात यशस्वी होतात.

..................................................................................................................................................................

लेखक प्रा.डॉ. सोपान मोहिते श्री शिवाजी महाविद्यालयाच्या (बार्शी, सोलापूर) मानसशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक आहेत.

profshmohite@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा