गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२२ हे नवे वर्ष सर्वांना मनःस्वास्थ्य नि मनःशांती मिळवून देवो. या वर्षात प्रत्येकामधला माणूसपणाचा अंश एका थेंबाने का होईना वाढवा
पडघम - देशकारण
संपादक मुक्त-संवाद
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 08 January 2022
  • पडघम देशकारण कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus हेन्री गुस्ताव मोलायसन सुझन कोर्किन पर्मनंट प्रेझेंट टेन्स हिंदू मुस्लीम

१.

आपण एखाद्याची आतुरतेने वाट का पाहतो? आपण एखाद्याचे आपुलकीने स्वागत का म्हणून करतो, स्वागताचे निमित्त साधून जल्लोश का म्हणून करतो? जल्लोशात आगत-स्वागत झालं की, आलेल्या पाहुण्याची ‘गेस्टरूम’मध्ये रवानगी करून पुन्हा आपली ‘जात’ (मानव जात अशा अर्थाने) का दाखवतो? काहीच काळापूर्वी आपण आपल्या आवडत्या पाहुण्याचं वाजत-गाजत स्वागत केले होते, तत्पूर्वी आदर्श यजमान बनण्याच्या आपण आणाभाका घेतल्या होत्या, हे आपण दर वेळी कसे विसरतो? पुन्हापुन्हा आपल्यातला हिंस्र पशू का म्हणून उसळी मारून वर येतो? का म्हणून आपण एका पावलावर प्रगती साधून आणि दुसऱ्या पावलावर त्याच प्रगतीच्या आधारे विध्वंस घडवून आणतो? धर्मग्रंथाची बेअदबी केली म्हणून एखाद्याचा थेट झुंडीने येऊन खून, गोधनाची खरेदी-विक्री केली, गोमांस खाल्ले म्हणून खून, परधर्मीयावर प्रेम केले, लग्न केले म्हणून खून वगैरे वगैरे...

२.

नव्या वर्षात प्रवेश करताना, काय काय मागे सारायचे, किती किती म्हणून विसरायचे? तसे ते मागे सारता येते का, विसरता येते का? भूतकाळाचे ओझे झटकण्याची मुभा माणसाला घेता येते का? अमेरिकेत हेन्री गुस्ताव मोलायसन नावाचा एक माणूस होऊन गेला. त्याचे वैशिष्ट्य म्हणा वा वैगुण्य (खरे तर मानसशास्त्र आणि विज्ञानाच्या नजरेत ते एक मेंदूकेंद्रीत वैचित्र्य होते.) हे होते की, त्याच्यात स्मृतिसाठवण क्षमताच नव्हती. सरत्या क्षणात काय घडून गेले, याची नोंद त्याचा मेंदू घेत नव्हता. त्यामुळे गेल्या मिनिटभरात, दिवसात, आठवड्यांत, महिन्यांत, वर्षात काय घडले ते सामान्य माणसाला जसे सहजपणे आठवते, तसे मोलायसनला जराही आठवत नव्हते. कधीतरी वयाच्या २७ वर्षी एपिलेप्सी म्हणजेच अपस्माराच्या आजारावर उपाय म्हणून त्याच्यावर एक शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर हा मोलायसन फक्त आणि फक्त वर्तमानाच्या क्षणात तेवढा जगू लागला. मानसशास्त्राच्या दृष्टीने हे मोठेच आव्हान होते.

ते पाहता, सुझन कोर्किन नावाच्या प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ बाईंनी तब्बल पाच दशके मोलायसनच्या अवस्थेचा अभ्यास केला. तो करताना, माणूसाच्या मेंदूत स्मृती कशा साठवल्या जातात, वापरात आणल्या जातात, मेंदूतल्या विभिन्न जोडण्या स्मृतींचे नियंत्रण कशा तऱ्हेने राखतात, माणसाला वेगवेगळ्या स्मृतींचे ज्ञान कसे होते, याही मूलभूत प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सरतेशेवटी कोर्किनबाईंनी ‘पर्मनंट प्रेझेंट टेन्स’ नावाचे पुस्तक लिहिले. ते गाजलेही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सांगायचा मुद्दा हा, एकटा मोलायसन किंवा त्याच्यासारखे बोटावर मोजण्याइतके लोक सोडले तर इतरांना भूतकाळाचे ओझे झटकताही येत नाही आणि बहुसंख्य वेळा ते पेलवतही नाही. जगाचे सोडून द्या, २०२१मधले भारताच्या संदर्भाने विचार करता, ओझे प्रचंड मोठे आहे. आणि न पेलवणारेही. प्रश्न, हा आहे, या ओझ्या-बोज्याची पर्यायाने आपल्यावरच्या जबाबदारीची आपल्याला म्हणजे, २०२२च्या स्वागताला निघालेल्यांना पुरेशी जाणीव आहे की नाही?

३.

दोन-सव्वादोन वर्षांपूर्वी अवतरलेला करोना विषाणू अधिकाधिक विघातक रूप धारण करून मानवजातीवर संकटांची मालिका लादत असताना, जग नव्या वर्षात म्हणजेच २०२२मध्ये प्रवेश करत आहे. निसर्ग आपल्या जागी ठाम आहे. ग्रह-तारे-नद्या-डोंगर-जंगल-आकाश-पाताळ आपल्या गतीत-मस्तीत आहेत. त्यांच्यासाठी तारीख काय, वार काय, वेळ काय नि काळ काय, उंची काय, खोली काय, अमूक दिन काय नि तमूक दिन काय, ख्रिसमस काय, ईद काय नि दिवाळी सारेच बेमतलब आहेत. माणसाने आपल्या आकलनासाठी, सोयीसाठी, प्रसंगी मनाच्या समाधानासाठी निश्चत केलेली ही एकके आहेत. निर्सगात अंधार नि उजेडाचा नित्यक्रम आहे. आपण त्याला शुभ-अशुभ मानले. काळाचे तुकडे केले. क्षणांचा, मिनिटांचा, तासांचा हिशेब मांडला. त्याला सण-उत्सवांची झालर चढवली. तरीही लाखो वर्षांनंतरही आव्हानांचा डोंगर कमी होण्याऐवजी दिसामाजी वाढतोच आहे. वर्तमानाचा विचार करता, हे आव्हान केवळ करोनाचे नाही, तर देशोदेशीच्या शासनसत्तांमध्ये शिरलेल्या युद्धखोरीचे आहे.

मानवी जीवन सुकर करणाऱ्या विज्ञानाची अफाट प्रगती होत असूनही विषमतेचे, भूकबळीचे, दहशतवादाचे, अ-लोकशाहीवादी हुकूमशाही आणि या हुकुमशाहीचे बोट धरून आपली धन करून घेण्याचा इरादा राखून असलेल्या भांडवलशाहीच्या विस्तारवादी-वर्चस्ववादी धोरणांचेही आहे. ही सारी आव्हाने पेलण्यासाठी खरी गरज केवळ तोंडदेखल्या किंवा मागून आल्या-पुढल्या ढकलून दिल्या (फॉर्वर्डेड टाइपातल्या) अशा स्वस्तातल्या, निर्जीव शुभेच्छांची नाही, तर प्रत्येकामधल्या माणुसकीला प्रयत्नपूर्वक जागवण्याची खरी निकड आहे.

माणुसकीविना प्रगती, आधुनिकता, विकास ही सारी निरर्थक मिळकत आहे. ज्या माहितीतून, ज्या ज्ञानातून माणसात माणूसपण येत नाही, ती माहिती आणि ते ज्ञान फिजूल आहे. आज अशाच फिजूल माहिती आणि तथाकथित ज्ञानाच्या या ना त्या निमित्ताने उसळून येणाऱ्या उंचच उंच लाटांवर जग गटांगळ्या खाताना दिसत आहे. तरीही त्या लाटांवर स्वार होणे म्हणजेच आता जग जिंकणे मानले जाऊ लागले आहे. सत्य आणि असत्य, आभास आणि वास्तव यातला फरकही पुसला गेला आहे आणि व्याख्याही बदलल्या आहेत. असत्य हेच सत्य, आभास हेच वास्तव. सत्योत्तरी जगाचा हाच नियम होऊन गेला आहे...

४.

देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाही देशातल्या बहुसंख्य हिंदूंची टक्केवारी ८० टक्के होती, आताही साधारण तितकीच मोठी आहे. याचा अर्थ, आज जर देशाची लोकसंख्या १३० कोटी असेल तर त्यातले तब्बल ८५ ते ९० कोटींहून अधिक लोकसंख्या हिंदूधर्मीय आहेत. ही लोकसंख्या युरोपीय महासंघातल्या देशांच्या लोकसंख्येच्याही दुप्पट आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या हिंदूबहुल देशात, आपण आणि आपला धर्म धोक्यात आल्याची भावना आता टोक गाठताना दिसते आहे. म्हणजे, एका बाजूला हिंदूधर्मीयांच्या कल्याणाचे ठेकेदार बनलेले सत्ताधारी अल्पसंख्याक मुस्लीम आणि ख्रिश्चनांविरोधात जनक्षोभ उसळून येईल, अशा हेतू सामाजिक सौहार्दाला तिलांजली देत फिरत आहेत.

तर दुसरीकडे धर्मरक्षकांच्या भूमिकेतले भगवेवस्त्रधारी तथाकथित साधू-संत-महंत ‘धर्मसंसदे’च्या नावाखाली सार्वजनिक मंचावरून खुलेआम पदरी शस्त्रास्त्र बाळगण्याचे, मुस्लिमांना ठिकाणावर आणण्याचे तारस्वरांत आवाहन करताना दिसत आहेत. पण, या घडीला देशात कुठेही मुस्लिमांनी हिंदूविरोधात युद्ध पुकारलेले नाही. देशात कुठेही समस्त हिंदूंना संपवून देश ताब्यात घेण्याची कटकारस्थाने रचली गेल्याचे पोलीस तपासात सिद्ध झालेले नाही.

उलट कधी नव्हे ते देशातला मुस्लीम आणि इतर अल्पसंख्य समाज भयग्रस्त अवस्थेत जगताना दिसतो आहे. आपले नागरिकत्व दुय्यम दर्जाचे ठरवले जाताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहतोय. आपले बांधव एवढ्यातेवढ्या कारणाने तुरुंगात सडत असल्याचे आणि जे बाहेर आहेत, त्यांचा धर्मांध झुंडी दिवसाढवळ्या बळी घेत असल्याचे हताशपणे पाहतो आहे. तरीही, ‘हिन्दू स्वाभिमान के तत्त्वाधान में’ हरिद्वार येथे ‘तीन दिवसीय धर्मसंसद’ भरवून मुस्लिमांविरोधात धर्मयुद्धाच्या घोषणा का म्हणून दिल्या जाताहेत? समोरून आक्रमण होत नसतानाही धर्मवेडे लोक तथाकथित शत्रूच्या अंगावर चाल करून का जाताहेत? पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा वारसांना का दिली जातेय?

कोणीतरी विचारायला हवेय, ‘सुनिये साधुमहाराजजी, महंतजी... आप किस को ललकार रहें है. सामने तो कोई नहीं दिख रहा हैं. वैसे ललकारने वाले मर गये, उसे भी अब सैकडो साल गुजर गये, फिर भी हो क्या रहा है???’

उद्या देशात मुस्लिमांपेक्षा मोठी संख्या असलेल्या  दलित-आदिवासी-विमुक्त भटके आदींनी याच न्यायाने पूर्वजांवर हजारो वर्षांपासून होत आलेल्या अन्याय-अत्याचाराचा बदला घेण्याचे ठरवले तर? प्रश्न महत्त्वाचे आहेत. ते विचारणेही आवश्यक आहे. कारण, या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये भवितव्याची छोटीशी आशा दडली आहे...

५.

कधीमधी पाच-पन्नास वर्षांपूर्वींचे आपलेच किंवा आपल्या आप्तेष्टांची छायाचित्रे पाहिली की, आठवणींचा पिसारा फुलतोच फुलतो, पण जगणे पुन्हा  सुंदर भासू लागते. जगण्यावरचा विश्वास दृढ होत जातो. ‘फॅमिली अल्बम’ची जादूच तशी असते. पण जसा फॅमिली अल्बम आणि त्यातली मनाला उभारी देणारी, ताजेतवाने करणारी छायाचित्रे, तसाच हे म्हटले तर जगाच्या अल्बममधले छायाचित्र फोटो. २०१७ मधले. घटना उत्तर दिशेच्या लंडनमधली. तिथल्या गोल्डर्स ग्रीन ब्रिजशी जोडलेली. हा ब्रिज काही आत्महत्येसाठी कुप्रसिद्धी असलेला नाही. पण जगण्याला कंटाळलेल्या नि आत्महत्या करू इच्छिणाऱ्या निराश-हताश जनांना उंचीवरच्या टोकाचा शोध असतो. तशी गरज पुरवणारा हा ब्रिज. म्हणजे, पूल नावाची वास्तू दोन टोकांनाही जोडते आणि आयुष्याचा शेवट करणाऱ्याचा इरादाही फळाला आणते.

पाच वर्षांपूर्वी आयुष्याला कंटाळलेला कोण एक जण आत्महत्या करायची म्हणून या गोल्डर्स ग्रीन पुलावरून उडी मारण्याच्या इराद्याने तोंड करून कठड्यावर उभा होता. त्याचा तो इरादा हाणून पाडण्यासाठी ज्यांना आपण एरवी ‘बघे’ म्हणतो, त्यांच्यातले माणुसकीविषयी आत्मीय प्रेम असलेले पूर्णपणे अनोळखी लोक परिस्थितीचे गांभीर्य ओळखून थबकले. त्यात काळेही होते आणि गोरे-सावळेही. त्यातल्या एकाने जगणे नकोसे झालेल्या तरुणाच्या गळ्याभोवती हात टाकून त्याला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला. माणुसकीची गळामिठीच म्हणा ती! तेवढ्यात जवळपास कुठून तरी दोर घेऊन आलेल्या एका स्त्रीने पुलाच्या ग्रीलला त्याला बांधण्याचा प्रयत्न केला. एकाने आत्महत्या करू इच्छिणाऱ्याचे दोन पाय घट्ट धरून ठेवले. त्याच्या पायांना घट्ट मिठीच मारली म्हणा ना. दुसऱ्याने त्याच्या कमरेचा पट्टा घट्ट धरून ठेवला. तिसऱ्याने त्याला बोलण्यात गुंगवून ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान लंडनचे पोलीसपथकही घटनास्थळी अवतरले आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळाचा ताबा घेतला.

मरणाच्या विचाराने ठाम असलेला तरुण आणि त्याला जगण्यातल्या सौंदर्याची ग्वाही देणारे बघे यांच्यात जवळपास दीड-दोन तास हे नाट्य चालले आणि अखेरीस मरणाच्या विचारांवर जगण्याच्या इर्ष्येने मात केली. त्या क्षणी तरुणाला मरणापासून परावृत्त करणारे संवेदनशील लंडनर्स कोण होते, त्याचे नाव-गाव-पत्ता काय हे कुतूहल निर्माण करणारे प्रश्न खरेच, पण या घटनेतल्या खरा गंध त्यांच्या त्या माणुसकीने काठोकाठ ओथंबलेल्या कृतीत दडले होते. म्हणूनच तो क्षण जगाच्या अल्बममधला एक अविस्मरणीय क्षण ठरला होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२०२२चे स्वागत करताना ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ म्हणताना, आजच्या जगाला श्रेष्ठत्वाच्या अहंगंडातून माणसामाणसांचे खून पाडणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या झुंडींपेक्षा लंडनमधल्या गोल्डर्स ग्रीन ब्रिजवरच्या त्या अनोळखी, पण माणुसकीची नेमकी जाण असलेल्या बघ्यांची निंतात आवश्यकता आहे. जगणे यापूर्वीही सुंदर होते. आताही आहे आणि भविष्यातही असणार आहे, हे ओघाने आलेच.

गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२२ हे नवे वर्ष सर्वांना मनःस्वास्थ्य नि मनःशांती मिळवून देवो. गेल्या वर्षाच्या तुलनेत येत्या नव्या वर्षात प्रत्येकामधला माणूसपणाचा अंश एका थेंबाने का होईना वाढवा. राग-लोभ, द्वेष-मत्सर ही सारी माणसामाणसांतल्या परस्परव्यवहारांची फलनिष्पत्ती आहे. त्यामुळे त्या परस्परव्यवहारांत सौहार्द-सहिष्णुता आणि सामंजस्याचा शिडकावा सतत होत राहावा. जगणे आपसूक आनंददायी होत जाईल.

(‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ जानेवारी २०२२च्या अंकातून साभार)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा