विधिमंडळ अधिवेशन नव्हे, नुसताच कल्ला!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • Sat , 25 December 2021
  • पडघम राज्यकारण उद्धव ठाकरे Uddhav Thackeray शिवसेना Shiv Sena संजय राऊत Sanjay Raut देवेंद्र फडणवीस अजित पवार भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस

आठवण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आहे. वर्ष १९९२ असावं, आणि दिवस असेच थंडीचे होते. तेव्हा वाजपेयी लोकसभेतले विरोधी पक्षनेते होते आणि पंतप्रधानपदी पी. व्ही. नरसिंहराव होते. सभागृहात सत्ताधारी काँग्रेस पक्षाचं बहुमत काठावरचं होतं. शिवाय संसदेबाहेरही अनेक प्रश्न आक्राळविक्राळ बनलेले होते. त्यामुळे प्रत्येक प्रश्नावर विरोधी पक्ष साहजिकच आक्रमक होता. सभागृहाचं नियमित कामकाज होतचं नव्हतं. संसदेत कामकाजाच्या नावाखाली जे काही सुरू होतं, त्याचं वर्णन एका शब्दात करायचं तर ‘गोंधळ’ होतं. सभागृहातल्या त्या कामकाजावर टीका करताना वाजपेयी यांनी ‘संसदेचा मासळीबाजार’ झालाय अशी टीका केली. मासळीबाजारात जसा कलकलाट असतो, तसंच संसदेत सुरू असल्याचं वाजपेयी यांना त्या वेळी सुचवायचं होतं. पण विरोधी पक्ष नेत्यानं इतकी बोचरी टीका केल्यावरही वाजपेयी यांच्याविरुद्ध सभागृहातल्या कोणत्याही सदस्यानं  हक्कभंगाच हत्यार उपसलं नव्हतं. याचं एकमेव कारण म्हणजे वाजपेयी तोपर्यंत सभागृहातले सर्वांत बुर्जुग आणि अनुभवी सदस्य होते. (ही सविस्तर हकिकत माझ्या ‘क्लोज-अप’ या पुस्तकात, प्रकाशक -देशमुख आणि कंपनी, ‘अटल बिहारी वाजपेयी’ या लेखात आहे.)

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

हे आठवलं, कारण सध्या राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन म्हणून (‘शक्ती’ कायद्याचा अपवाद वगळता) जे काही चाललं आहे, त्याचंही वर्णन जर वाजपेयी हयात असते, तर त्यांनी ‘मासळीबाजार’ याच शब्दात केलं असतं, इतका कल्ला आणि सदस्यांचं अशोभनीय वर्तन पाहायला मिळतं आहे. ‘सदस्यांनी सभागृहात संसदीय लोकशाहीला अनुलक्षून सदवर्तन करावं अन् सभ्य भाषा वापरावी’, असं खडसावून सांगणारं समंजस नेतृत्व विधिमंडळात आहे की नाही, असा प्रश्न सहाजिकच पडतो. राज्य विधिमंडळात कामकाज म्हणून सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंकडून घडतंय किंवा घडवून आणलं जातंय, ते लोकशाहीला मुळीच शोभनीय नाही.

अर्थात याला बरंचसं कारणीभूतही सत्ताधारी पक्षाचं वर्तन आहे, हेही स्पष्टपणे सांगायलाच हवं. कारण काही प्रसंगात सत्ताधारी पक्षानंच विरोधी पक्षाच्या हातात कोलीत दिलेलं आहे. उदाहरणचं द्यायचं झालं  तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचं देता येईल. ठाकरे यांना आजारपण काही चुकलेलं नाही, कसं चुकणार कारण ते माणसासारखे हाडामासांचे माणूस आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, गेल्या जवळजवळ दीड महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांचा वावर थांबलेला आहे. राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांनाच नव्हे, तर जनतेलाही मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी वाटणं अतिशय स्वाभाविक आहे. ठाकरे यांच्या प्रकृतीच्या संदर्भात माहिती देणारं अधिकृत निवेदन जारी करून केवळ विरोधी पक्ष आणि जनतेच्याच नव्हे, तर सत्ताधारी पक्षातीलही अनेकांच्या मनातला संभ्रम दूर करता आला असता. एरव्ही अनेक बाबतीत पारदर्शी कारभाराच्या गप्पा ठोकणाऱ्या सत्ताधारी पक्षानं याबाबतीत (अनाकलनीय) मौन पाळून मुख्यमंत्र्यांना विनाकारण संशयाच्या पिंजऱ्यातच उभं करून टाकलं नाही, तर अनेक नावंही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणून अफवांचं पीक काढायलाही सुरुवात करून टाकली. त्यात आलेली काही नावं म्हणजे नाहकच भरडले गेलेले जीव म्हणायला हवेत.

या चर्चेत एक नाव संजय राऊत यांचंही आलं; ते स्वाभाविकचं होतं म्हणा, पण ते असो! तर संजय म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी तरी लोकसभेत कुठे हजर असतात?’ त्यांचं म्हणणं क्षणभर बिनतोड वाटू शकतं मात्र, नरेंद्र मोदी भलेही सभागृहात नसोत, पण त्यांचा सार्वजनिक वावर थांबलेला नाही. ते दौरे करतात, (विविध वेशभूषा करून) सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतात, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकांना ते हजर असतात. ठाकरे यांचं मात्र दर्शनही दुर्लभ झालेलं आहे. पण संधी मिळाली आणि बोलले नाही, तर त्यांना जणू संजय राऊत म्हणताच येणार नाही, असा हा मामला आहे!

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

सत्ताधारी महायुतीचे भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांच्या भाषणाच्या नकलेची जी काही कथित अदाकारी सभागृहात पेश केली, त्याला आवर घालणं सत्ताधारी पक्षातल्या कुणालाही का शक्य झालं नाही, हे उमजण्या पलीकडचं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष आणि त्यातही वाट्याला फुलटॉस आलेला चेंडू षटकार म्हणून भिरकावण्याची भाजपला संधी मिळाली. (अर्थात इथं प्रश्न मोदी यांच्याऐवजी अन्य पक्षाच्या नेत्याची अशी नक्कल झाली असती, तर सभागृहातील भाजपच्या सदस्यांना अशाच मिरच्या झोंबल्या असत्या का? हा आहेच म्हणा!)

भारतीय रंगभूमीवर अभिजात दर्जाचे अनेक विदूषक होऊन गेले. आपला महाराष्ट्रही त्या बाबतीत मागे नाही. भास्कर जाधव यांची सभागृहातील ती अदाकारी मात्र त्या रांगेत बसणारी मुळीच नव्हती, म्हणूनच समर्थनीय नव्हती हे नक्की. त्यांच्या अदाकारीला चाहते भरपूर लाभण्याची शक्यता आहेच. त्यामुळे एक संच जमवून गावोगाव तंबू टाकून ‘या’ अदाकारीनं जनतेचं मनोरंजन करण्याचा उपक्रम भास्कर जाधव यांनी हाती घेतला, तर सभागृहात त्यांच्या जागी जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या अन्य कुणा सदस्याला संधी मिळेल!

विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबतही सत्ताधारी पक्षांनी अति म्हणजे अतिच सावध भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षातले आणि त्यातही भाजपचे १२ सदस्य निलंबित असताना गुप्त पद्धतीनं मतदान टाळून मतदार फुटण्याच्या शक्यतेवर सत्ताधारी पक्षानं शिक्कामोर्तबचं केलं. खरं तर भाजपाचे १२ सदस्य निलंबित असतानाच पहिल्या दोन दिवसांत विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेऊन टाकली जायला हवी होती आणि नव्या अध्यक्षाचा पहिला निर्णय म्हणून त्या १२ सदस्यांचं निलंबन रद्द करून लोकशाहीला अपेक्षित असलेल्या संवादाची प्रक्रिया सुरू करता आली असती, पण तीही खेळी सत्ताधारी पक्षानं टाळली. का टाळली, या प्रश्नाचं उत्तर अर्थातच मिळणार नाही.

सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांचं पुनर्वसन हा सरकारचा प्राधान्यक्रम झालेला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी कळीच्या असणाऱ्या वैधानिक विकास मंडळावरील नियुक्त्या सरकारला अजूनही करता आलेल्या नाहीत आणि या संदर्भात विरोधी पक्षानं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणारंही सत्ताधारी पक्षात अजित पवार वगळता कुणी नाही. त्यातच करोना संपलेला नसतानाच ओमायक्रॉनचं संकट महाराष्ट्राच्या दरवाज्यावर उभं टाकलेलं आहे. एकटे उपमुख्यमंत्री अजित पवार किल्ला लढवताहेत, असंच चित्र आहे आणि ते काही सत्ताधारी पक्षाची शान वाढवणारं नाही.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

एक ना अनेक, असे अनेक मुद्दे सध्या राज्य सरकारच्या विरोधात आहेत. एसटी संप चिघळतच चालला आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. त्यात आता परीक्षा घोटाळ्याची भर पडलेली आहे. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी आदर्श अशी परिस्थिती विरोधी पक्षांसाठी आहे आणि त्या संधीचं सोनं देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आदी विरोधी पक्षनेते करून घेत आहेत.

अनेकांना आवडणार नाही, पण हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की, अलीकडच्या २५ वर्षांत कोणत्याही विरोधी पक्ष नेत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी उल्लेखनीय कामगिरी बजावत सत्ताधारी पक्षाला एवढं कोंडीत पकडलेलं नाही. आक्रमकता, अभ्यास आणि समयसूचकता ही विरोधी पक्षनेत्याची तीन हत्यारं असतात आणि देवेंद्र फडणवीस तसंच सुधीर मुनगंटीवार यांची ही हत्यारं चांगलीच परजलेली आहेत. मात्र मुळीच आरडाओरडा न करता अतिरेकी वाटेल, असा अभिनय न करता फडणवीस का बोलू शकत नाहीत, हा पश्न उरतोच. मुख्यमंत्रीपदाच्या सुरुवातीच्या काळातही ते ‘वर्गातल्या आक्रस्ताळ्या मॉनिटरसारखे वागतात’, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यानंतर काही काळ मध्यम लयीत आलेल्या फडणवीस यांचा तो जुना ‘लाऊडनेस’ पुन्हा एकदा उफाळून आलेला दिसतोय.

विरोधी पक्षात सर्वच सदस्य शोभादायक वावरतात असा याचा अर्थ नाही. ‘भास्कर जाधव नावाची वृत्ती’ विरोधी पक्षातही आहे आणि ती मांजराचे आवाज काढत असते, अशा बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. कुणी असे आवाज काढल्याने वाघाची मांजर होत नाही आणि मांजरीचा वाघही होत नाही. निर्माण होतो तो नुसताच मासळी बाजारातला कलकलाट. म्हणूनच विधिमंडळाचं पहिल्या आठवड्याचं कामकाज बघताना अटल बिहारी वाजपेयी याच्या त्या बोचऱ्या, पण वास्तव टीकेची आठवण आली.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......