आजकाल मराठी वर्तमानपत्रांची - विशेषत: त्यांच्या इंटरनेट आवृत्त्यांची तुलना पाश्चात्य देशांतल्या ‘टॅब्लाईड’शी करावीशी वाटते!
पडघम - माध्यमनामा
सलील जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 21 December 2021
  • पडघम माध्यमनामा पत्रकारिता Journalism संपादक Editor वर्तमानपत्र Newspaper गोविंद तळवलकर Govind Talwalkar माधव गडकरी Madhav Gadkari

गेल्या एक-दीड वर्षांत भारतीय, विशेषत: मराठी वर्तमानपत्रं वाचून एकतर वाचकांची पातळी घसरली असावी किंवा वर्तमानपत्रं आपली योग्यता सोडून लिहायला लागली आहेत, असं वाटतं. (हा विषय कुठल्याही दूरचित्रवाणीच्या डिबेट शोमध्ये ‘कोलाहला’साठी ठेवला जाऊ शकतो!) मराठीत वर्तमानपत्रांची मोठी परंपरा आहे. मराठी पत्रकारितेला बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्यापासून गोविंदराव तळवलकर, माधव गडकरी, अनंत भालेराव, मा. गो. वैद्य, कुमार केतकर यांच्यापर्यंतचा समृद्ध वारसा लाभला आहे. पण वडिलोपार्जित संपत्ती कितीही मिळालेली असली तरी ती टिकवून ठेवण्यासाठी व वाढवण्यासाठीसुद्धा एक प्रकारची हुशारी लागते. आजकालच्या मराठी वर्तमानपत्रांच्या संपादकांना तो वारसा एक जबाबदारी म्हणून जतन करायलाच हवा, असं बहुधा वाटत नसावं. अन्यथा कुठल्याही फुटकळ बाबींना अग्रपानावर मानाचं स्थान देणं (मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांबाबत तर बोलायलाच नको!) आणि तीच एक बातमी महिनोन्महिने पुरवून वापरणं, हे महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रीय परंपरेस खचितच साजेसं नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

जेमतेम वर्षभरापूर्वी जग करोना नावाच्या एका भयंकर महामारीचा सामना करत होतं. भारतासारख्या देशात दिवसागणिक हजारोच्या संख्येनं या रोगाचे रुग्ण आढळत होते. अजून ही महामारी पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही, पण तिचे आत्तापासूनच वैद्यकीय परिणामांसोबत इतर अनेक दूरगामी परिणाम दिसून येऊ लागले आहेत. असं असताना या काळात महाराष्ट्रातील आघाडीच्या वर्तमानपत्रांत अतिशय विसंवादी पत्रकारिता होत होती आणि तो काळजी करावा असाच प्रकार होता, आहे.

वर्तमानपत्रांना समाजाचा आरसा म्हटलं जातं. ती भूमिका सोडून सगळी माध्यमं - ज्यात प्रामुख्यानं दूरचित्रवाणी वाहिन्या - एका अगम्य अशा विषयात गुंतल्या होत्या. ज्यामुळे त्यांच्यापुढेच आरसा धरण्याची गरज वाटू लागली. बॉलिवुडमधील एका अभिनेत्याची आत्महत्या ही घटना अतिशय दुःखद होतीच, पण ती न्यायप्रविष्ट असतानासुद्धा, त्याची जराही पर्वा न करता त्या प्रकरणाचा जणू आपणच छडा लावणार आहोत या थाटात नेते, अभिनेते व आम जनता यांच्या या विषयावरील चर्वितचर्वणानं आपले रकानेच्या रकाने भरण्यात मराठी वर्तमानपत्रं गुंतली होती. समाजात जणू इतर कुठलेच प्रश्न शिल्लक उरले नाहीत, असंच या काळात मराठी वर्तमानपत्रं वाचून वाटायला लागलं होतं.

लेखणी तलवारीसम समजली जात असली तरी तिचा उपयोग निंदा, उचापत्या किंवा राजकीयदृष्ट्या चिथावणारं लेखन करण्यासाठी करणं, हा स्वत:च्या अमर्याद शक्तीचा ‘घाशीरामी’ उपयोग करण्यासारखंच आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

पाश्चात्य देशात, विशेषत: इंग्लंडमध्ये टॅब्लाईड नावाचा वर्तमानपत्रांचा एक हिडीस प्रकार असतो. त्यात बातमी कमी व चहाड्या व मान्यवरांची अश्लील छायाचित्रं अशाच गोष्टींचा भरणा अधिक असतो. या टॅब्लाईडचा एक ठरलेला वाचकवर्ग असतो. त्यांना सहसा बाहेरील जगातील बातम्यांशी फारसं काही कर्तव्य नसतं. आज मराठी वर्तमानपत्रांची - विशेषत: त्यांच्या इंटरनेट आवृत्त्यांची तुलना या टॅब्लाईडशी करावीशी वाटते. मुळात त्यातील बातम्यांची प्रत, त्या बातम्यांमागील अभ्यासाचा अभाव व एखादी बातमी धसास लावून नेण्यासाठी दिवसेंदिवस केलेली अतिशयोक्ती, अशा अनेक कारणांमुळे ही तुलना प्रस्तुत वाटते.

गेला बाजार टॅब्लाईड वर्तमानपत्रांतसुद्धा बातमी देताना वार्ताहरास बरीच मेहनत करावी लागते. मग ती बातमी अगदी राजघराण्यातील व्यक्तींच्या चटपटीत पेहेरावाची असो किंवा कुठल्याशा उमरावाच्या तथाकथित प्रेमप्रकरणाची. पण त्यामागील वार्ताहराची मेहनत (!) - मग ती बातमी मिळवण्याची असो किंवा एखादं प्रक्षोभक छायाचित्र मिळवण्याची असो - दिसून येते. पण तसा कुठलाही विशेष प्रयत्न आजची मराठी वर्तमानपत्रं करताना दिसत नाहीत.

अर्थात पाश्चात्य जगात चोखंदळ वाचकाच्या लेखी अशा टॅब्लाईड वर्तमानपत्रांना फार काही किंमत असतेच असं नाही. कारण त्यांना इतर वाचनीय, अभ्यासयुक्त बातम्यांचे पर्याय उपलब्ध असतात. मराठी वाचकांना ही सोय नाही. निदान दूरचित्रवाणीची वाहिनी बंद तरी करता येते. मराठी माणसाला पिढ्यानपिढ्यांपासून वर्तमानपत्रं वाचण्याची सवय लागली आहे, ती त्याला रोजची वर्तमानपत्रं वाचावयास भाग पाडते.

सध्याच्या मराठी वर्तमानपत्रांच्या वार्तांकनाची शैली बघता मराठीत एकेकाळी नावाजलेल्या वर्तमानपत्रांचा दर्जा आता दयनीय वाटायला लागला आहे. या वर्तमानपत्रांच्या इलेक्ट्रॉनिक आवृत्या या मूळ वर्तमानपत्राएवढ्याच, किंबहुना निदान दर्जेदार तरी असाव्यात, असा प्रयत्न कुठेच दिसत नाही. (इथं छापील वृत्तपत्रं आपला दर्जा टिकवून आहेत, असा प्रस्तुत लेखकाचा समज आहे!)

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

इलेक्ट्रॉनिक आवृत्यांची अपरिहार्यता करोना महामारीत व लॉकडाउनमध्ये सिद्ध झालेली आहे. छापील वर्तमानपत्रं मिळण्याची ददात असताना त्यांची जागा त्यांच्या इंटरनेट आवृत्यांनी घेतली होती, करोना महामारीचा जोर आताशा ओसरला असला तरी अजूनही याच आवृत्त्या मोठ्या प्रमाणावर वाचल्या जातात. त्यामुळे या इंटरनेट आवृत्या नुसत्या जाहिरातींसाठी काढण्याची चूक आता ही वर्तमानपत्रं करू शकत नाहीत.

हल्ली बातमी देण्याचा एक नवाच प्रकार पाहायला मिळतो आहे. तो म्हणजे कोणा एका प्रसिद्ध व्यक्तीच्या सोशल मीडियावरील विधानावर बातमी करणं. म्हणजे त्यांचं सोशल मीडियातील एखादं विधान घेऊन त्याचा एक मथळा तयार करणं; तो करत असताना त्यातील खऱ्या माहितीविषयी बातमीच्या शीर्षकात सुतराम कल्पना न येऊ देणं आणि वाचकांना ‘मोठा खुलासा’च्या मोहात पाडून त्यावर ‘क्लिक’ करावयास भाग पाडणं, ही होय. अशा बातमीचे तीन भाग करून त्यात एकच माहिती (जी सोशल मीडियावर आधीच आलेली असते!) वेगवेगळ्या शब्दांत सांगितली जाते. अशा घोर फसवणुकीनं तयार केलेल्या अनेक बातम्यांनी ई-वृत्तपत्रांचं पहिलं पान सजत चाललं आहे. या बातम्या तयार करणाऱ्या वार्ताहरांची योग्यता व ती छापणाऱ्या संपादकांची विश्वासार्हता या दोहोंविषयी शंका येते.

पाश्चात्य देशांत ‘चालू तासाची ताजा खबर’ किंवा ‘breaking news’ नावाचा रोग जडलेला आहे. ‘Breaking news’ म्हणजे दर तासाला जगात जे काही घडतंय, ते खळबळजनक आहे, असं सांगून वाचकांसमोर मांडण्याची प्रथा. दूरचित्रवाणी वाहिन्यांना झालेल्या या रोगाची लागण वर्तमानपत्रांच्या इंटरनेट आवृत्त्यांनाही झाली आहे. त्यातही पाश्चात्यांचे सगळेच गुण आवडीनं गाणाऱ्या मराठी वर्तमानपत्रांना व त्यांच्या संपादकांना तर त्याची चांगलीच लागण झालेली दिसते. त्यामुळे दर खेपेस वाचकांना नवीन बातम्या देण्याची चटक लावायची असेल आणि त्या बातम्या तयार करण्याची कुवत नसेल, तर प्रसिद्ध अभिनेत्यांच्या किंवा नेत्यांच्या बाष्कळ विधानांतून बातम्यांची निर्मिती करत राहावी लागते. पत्रकारितेच्या मूल्यांशी होत असलेली ही हेळसांड वाचकांना खऱ्या घडामोडींपासून दूर ठेवताना दिसते.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

बहुतेक मराठी वर्तमानपत्रांच्या संपादकांची श्रद्धास्थानं अमेरिका, इंग्लंडमधील वृत्तपत्रं असतात. पाश्चात्य देशातील वर्तमानपत्रांचं कोड-कौतुक करण्यात (ज्याला ती खरंच पात्रही आहेत) भले-भले मराठी संपादक धन्यता मानतात. बऱ्याच वेळी या वर्तमानपत्रांतील (उदा. ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ वगैरे) बातम्यांचे दाखले किंवा त्या बातम्याच मराठी वर्तमानपत्रांत छापलेल्या दिसतात. कदाचित त्याची कायदेशीर परवानगी त्यांच्याकडे असेलही. पण पाश्चात्य देशातील वर्तमानपत्रांत बातम्या ज्या पद्धतीनं छापल्या जातात, प्रत्येक बातमीमागे किती अभ्यास केला जातो, प्रत्येक दाव्याची किती प्रकारे शहानिशा केलेली असते, योग्य तिथंथे आकडेवारीचे दाखले कसे दिलेले असतात, पुराव्यादाखल नकाशे असतात, याची दखल संबंधित मराठी वर्तमानपत्रं व त्यांचे संपादक घेताना दिसतात का? त्यांचं अनुकरण करतात का? मराठी वर्तमानपत्रांत यातील कुठल्याही गोष्टी बघायला मिळत नाहीत.

एकेकाळी ही पश्चिमेतील ‘वैचारिक व्यासपीठं’ सामान्य वाचकाच्या आवाक्याबाहेर होती. आता जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून ही वर्तमानपत्रं-नियतकालिकं हातातल्या फोनवर वाचता येऊ शकतात. अगदी वर्गणीदार नसतानाही यातल्या बऱ्याच वर्तमानपत्रांचे आणि साप्ताहिकांचे दोन-चार लेख तरी विनामूल्य वाचण्यासाठी असतातच. तेव्हा स्वतःच्या इंटरनेट आवृत्तीत विदेशी वर्तमानपत्रांतील बातम्या पुनर्मुद्रित करून आपण फार काही मोठी पत्रकारिता करतो आहोत, अशा भ्रमात राहण्याचं कारण नाही.

अर्थात हे मान्य करावयास हवं की, आजकाल वर्तमानपत्रांचा व्यवसाय करणं जिकिरीचं झालं आहे. त्याच्यासमोर इंटरनेट, केबल टीव्ही, ऑनलाईन पोर्टल्स अशी मोठी आव्हानं आहेत. त्यामुळे या व्यवसायातून पैसा कमावणं कठीण होत चाललं आहे. पण असं असलं तरी केवळ वाचक ज्या बातमीवर जास्तीत जास्त ‘क्लिक’ करतात, अशाच बातम्या तयार करणं, हा काही यावरचा उपाय नव्हे. तसंच वाचकांची पसंती ज्या बातम्यांना असते, त्याच बातम्या देणं म्हणजे तर या व्यवसायाशी प्रतारणा करण्यासारखंच आहे.

वृत्तपत्र व्यवसायावर संकटं आधीही आली होती. आणीबाणीच्या काळातलं सॅन्सॉरशिपचं संकट अस्मानीच म्हणावयास हवं. १९८०च्या दशकातसुद्धा सरकारदरबारी वजन असलेली वर्तमानपत्रं ही त्यांच्या कागदाच्या प्रतीवरूनच ओळखू येत. पण तरीही महाराष्ट्रात कितीतरी वर्तमानपत्रं नियमित व गुणवत्तेसकट निघतच होती.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

गोविंद तळवलकर, माधव गडकरी प्रातःस्मरणीय असलेले बरेच पत्रकार आता वेगवेगळ्या मराठी वर्तमानपत्रांच्या संपादकपदी आहेत. त्यांना मिळालेला वारसा निदान महाराष्ट्रात तरी समृद्ध असाच आहे. तुकोबा म्हणतात की -

अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्दज्ञाने ।

विषयलोभी मन । साधने बुडविली ।।

निव्वळ गल्लाभरू पत्रकारिता करणं म्हणजे विषयलोभी मनाचे चोचले पुरवून साधनांचा नाश करणं होय!

.................................................................................................................................................................

लेखक सलील जोशी बोस्टन, अमेरिकास्थित असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करतात.

salilsudhirjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा