‘अस्तिसूत्र’मधील कथा वाचणे, अनुभवणे हा निखळ बौद्धिक आनंद आहे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नीतीन वैद्य
  • ‘अस्तिसूत्र’ या कथासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 17 December 2021
  • ग्रंथनामा शिफारस अस्तिसूत्र Astisutra सुरेंद्र दरेकर Surendra Darekar

प्रा. सुरेंद्र दरेकर यांचा पहिला कथासंग्रह ‘डिसेंबर’ आला १९८३ साली. या जेमतेम शंभर पानांच्या संग्रहातल्या नऊपैकी आठ कथा या आशय-विषय, रचनाबंध अशा सगळ्या दृष्टीनं वेगळ्या लघुकथा आहेत. शेवटची ‘ऑर्डर’ ही एकमेव दीर्घकथा मात्र पुढे साडेतीन दशकांनी आलेल्या कादंबरीकांच्या खाणाखुणा वागवणारी आहे. खेड्यातल्या खासगी शिक्षणसंस्थेच्या कॉलेजमधला नव्यानं रूजू व्हायला आलेल्या तरुण काऱ्या प्राध्यापकाचा सुरुवातीच्या वर्षभरातला, प्रगल्भ जीवनभान देणारा, एरवी सारं आयुष्य खर्चूनही मिळत नाही, असा अनुभव यात आहे.

तदनंतर थेट साडेतीन दशकांनंतर दरेकर इतक्या प्रदीर्घ काळातला बॅकलॉग भरून काढावा एवढा भरीव ऐवज असणारे चार कादंबऱ्यांचे (का दीर्घकथा?) दोन संग्रह घेऊन भेटतात. ही पुनर्भेट सुखद धक्का देणारी आहे. जगण्यातल्या विशुद्धतेचा, निकोपपणाचा शोध हा या दोन्ही पुस्तकांचा युएसपी आहे, असं वाटतं. बुद्धीच्या अंगानं आयुष्यातल्या अनुभवांचा अर्थ लावत श्रेयस्करापर्यंत पोचू पाहणारी पात्रं या चारही दीर्घकथांमधून भेटतात.

‘बुडता आवरी मज’ या दीर्घकथेत तरुण मुलाच्या अकाली मृत्युमुळे घराचा काहीसा थांबलेला प्रवाह वाहता व्हावा, याची धडपड थेट तपशीलात कुठेही न दिसता येते. तत्त्वज्ञ जे.कृष्णमूर्ती आणि त्यांचे वेगवेगळे संदर्भ हा कथेतला महत्त्वाचा विशेष आहे. बाबा आणि त्यांना प्रवासात भेटलेले बॅ.सेनगुप्ता याच्यातल्या रूढार्थानं तात्त्विक, पण रोजच्या जीवनव्यवहाराशी संबंधित चर्चा वाचाव्यातच अशा आहेत. या कथेत शेवटाला या दोघांतला एक अप्रतिम संवाद आहे. त्याचा संक्षेप असा-

“चैतन्यापाठोपाठ अंधःकार असतोच, किंबहुना एकापाठोपाठ एक असे दोन्हींचे द्वंद्व. पण शाश्वत या सगळ्या पलीकडे असते. माणसाला यात भूमिका नसली तरी तो खेळण्याची सक्ती मात्र असते. अशातही श्रेयस्कराचा शोध हे निबीड, घनदाट अरण्यात वाट शोधण्यासारखे. अशा वेळी 'संकटांपासून मुक्तता नको, पण त्याला सामोरे जाण्यासाठी मानसिक धैर्य दे.” या रवींद्रांच्या ‘गीतांजली’ल्या ओळीवर कथा संपते. या कथेची अनेक वाचनं व्हायला हवीत.

‘अस्तिसूत्र’ ही कादंबरी हे संवेदनशील, बुद्धिवादी मनाचं प्रश्नोपनिषद आहे. थोरली पाती, भावंडं, शिक्षक, मित्रमंडळी असा जिव्हाळ्यानं बांधलेला, वैचारिक बौद्धिक चर्चा करणारा, जीवनानुभवाचा अर्थ लावण्याची निकड भासण्याइतकी संवेदनशीलता आणि त्याचा उलगडा करता येण्याइतकी बौद्धिक पात्रता असणारा असा विरळा गोतावळा चारही कथांमधून भेटतो, तेव्हा गौरी देशपांडे यांच्या कादंबऱ्यांची आठवण होते (अर्थात साम्य इतपतच). आपल्या अस्तित्वाचा अर्थ कसा ओळखावा? मुळात तसा अर्थ असतो का? गार्गीला आपण घरदार, सगळ्यांचं करण्यात अडकून पडलो आहोत असं वाटतं राहतं. सगळं स्वेच्छेनं, पण ती इच्छा तरी आपली असते का? असं वाटणं कासावीस करणारं असतं. या कथेतली काही संभाषितं अशी आहेत-

‘घटना इच्छेने घडतात की अनायासेच? मग त्यांची दिशा, काल कोण ठरवतो? मग अपेक्षा तरी काय ठेवायच्या? निव्वळ आलिया भोगासी सादर असायचे तर सगळ्या उठाठेवी आणि खटाटोप कशासाठी?’

‘उमेदीच्या वयात स्वायत्त होण्याची धडपड अन् संगोपनात अडकून पडणं यातील गाठ सोडवणं हा कळीचा मुद्दा.’

‘सारा भूतकाळ लाटेसारखा मनाच्या किनाऱ्यावर वाहून आला असला तरी यातील मुख्य भाग घटिताला केवळ प्रतिसादक्षम राहण्याच्या वृत्तीचा होता. यातील साक्षित्वच केवळ खरं असेल तर काही करून सांगण्याच्या कर्तव्याला काही अर्थच उरत नव्हता, तर्कानुमानाला बोटभरही जागा नव्हती.’

‘केवळ ईश्वरच ब्रीद राखणारा असेल तर मानवी कृतीच्या इच्छा, आविर्भाव व पूर्ततेच्या साधन अवलंबनाला काय अर्थ उरतो? कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात सुत्रधाराची किमान लोकरंजनाची तरी भुमिका असते, इथे केवळ आत्मक्लेशाची मालिका. बोचत नाही म्हणून सुख म्हणावं अशा व्याख्येत आयुष्य बसवल्यावर करायला काही राहात नाही, तरी अकर्तेपणाचं पोकळ शून्य खुणावत असतं, त्याला स्वतःची ओळख देऊन आकाराला आणता येतं का पाहायला हवं. पण म्हणजे नेमकं काय करायचं?’

इथं विपश्यना प्रवेशते. विपश्यना म्हणजे विशेषपणे स्वतःकडे बघण्याची साधना. गार्गी स्वगत म्हणावं तसं बोलत राहते. ‘लहानपणापासून आपण करतोय ते अज्ञात शक्तीच्या दबावातून, रेट्यातून असं वाटतं आलंय. सारं काही निवडीशिवाय करायलाच जणू बांधिल असल्यासारखं. ज्या विरुद्ध काही करता येत नाही, अशी एक प्रकारची नाराजी व्यापून. ऐच्छिकपणे अनेक गोष्टी करण्याची सुप्त इच्छा आहे, पण काय ते समजत नाही. भवतालातील अनेकांचं निरीक्षण केल्यावर हे सूत्र फक्त आपल्याच बाबतीत बिनसलंय अशी खंत वाटते.’

रसिका सांगते, ‘घडतात त्या गोष्टी अनाहूतच आहेत असं वाटण्याइतकी नकारात्मकता कुठून आली?... एखादी घटना घडण्यासाठी अनेक घटकांची गरज असते हे लक्षात घेतले तर आपला सहभाग मर्यादित असतो हे सहज लक्षात येण्याजोगे. या मर्यादेस ओलांडून जातो तो अहंभाव... या अहंभावाचा विलय, तो आपल्या शुद्ध असण्याशी करायचा. सात्त्विक, तामस दोन्ही त्यागांपलिकडे जात गुणातीत निर्गुण होणे.. बाहेर त्याला गती नाही हेच जीवनसुक्त.’

तरी अर्थात हा इथवरचा प्रवासही सोपा नाहीच. दरेकर सहज, ओघवत्या संवादातून, घटिता- संभाषितांमधून, अनेक पात्रं, अनेक तत्त्वज्ञानात्मक, सांकल्पनिक संदर्भ देत तो घडवतात. तो वाचताना अनावर बौद्धिक आनंद व्हावा पण गरज वाटली तरी त्याची उकल करता येऊ नये, अशी अवस्था होते.

या संग्रहातली दुसरी कथा ‘आरण्यक' हा मराठीतला अलीकडचा मास्टरपीस म्हणता येईल. आयुष्यातल्या घटितांकडे आपण कुवतीनुसार लावू शकू त्या कार्यकारणभावापलीकडे काय असतं? यातलीही क्रमवार  संभाषितं पाहता येतील-

‘आयुष्य डोंगरउतारावरून घरंगळत गेलेल्या एखाद्या दगडासारखं एका अवस्थेला येऊन ठेपली म्हणावं का, ही कसली गती होती प्रारब्धाची?’

‘एकीकडे व्हायचं ते काही केल्या चुकत नाही, अशा अर्थानं पोळलेलं मन अन् दुसरीकडे एवढ्या वाईटातही मार्ग दिसला तर नेटानं चाललं पाहिजे असा बुजरा आशावाद यांच्या कात्रीत ती सापडली होती.’

या कथेतही आयुर्वेदिक औषधप्रणाली ते ख्रिश्चॅनिटीतील पापसंकल्पना असा संकल्पनांचा विविध संदर्भात दीर्घ आलेख येतो. एके ठिकाणी ‘कुठल्याही सश्रद्ध व्यक्तीने आपल्या ऐहिक उत्तरदायित्वाचा निर्वाह करताना कोणत्या नैतिकतेला अनुसरून जगले पाहिजे याचे ते मार्गदर्शक सूत्र होते’, असा उल्लेख येतो. मला वाटतं, दरेकरांचा याचिसाठी केला होता म्हणतात, तो हाच असावा…

वैज्ञानिक ज्ञानसिद्धान्त जसे कथात्म स्वरूपात मांडता येतात, तसेच सामाजिक सिद्धान्तांनाही कथेतून वाहतं करता येणं शक्य आहे, असं दरेकरांनी त्यांच्या ‘मौज’मध्ये आलेल्या ‘वर्जितमध्याचा नियम’ या कथेसंदर्भात भूमिका मांडताना म्हटलं आहे.

या दोन्ही संग्रहातल्या दीर्घकथांनाही (का कादंबरिका?) ‘सामाजिक बरोबरच वैचारिक सिद्धान्त’ असा थोडा विस्तार केला तर ही भूमिका नेमकी लागू होते. ‘सर्व ज्ञानाची सुरुवात अनुभवातून होते, पण सर्वच ज्ञान अनुभवातून मिळत नाही’, या कांटच्या उक्तीचाही उल्लेख दरेकर करतात. त्याचा आठवही या कथांमधलं तत्त्वज्ञान, त्यातल्या विविध संकल्पनांचा अनुभवांच्या संदर्भातला उलगडा वाचताना होतो. तो काहीसा गुंतागुंतीचा तरी सामान्य आकलनाच्या कक्षेत येतो. आंतरज्ञानशाखीय चर्चा त्यातील जागतिक संदर्भांसह तरी आपल्या जीवनानुभवांच्या संदर्भातच, आयुष्याच्या आकलनाच्या प्रवासाचाच एक भाग इतक्या सहजतेनं या कथांतून येतात, त्या वाचणं, अनुभवणं हा निखळ बौद्धिक आनंद आहे. सामाजिकतेचा बोलबाला असताना तीसह बौद्धिकतेला दरेकरांनी समकालीन मराठी साहित्यात मानानं मंचावर विराजमान केलं आहे.

‘अस्तिसूत्र’ - सुरेंद्र दरेकर,

संवेदना प्रकाशन, पुणे

मूल्य – ३०० रुपये.

............................................................................................................................................

लेखक नीतीन वैद्य पुस्तकप्रेमी आहेत.

vaidyaneeteen@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......