‘स्वतःला शोधताना मुलांना स्वतःचा शोध लागतो. आम्ही या शोधात त्यांना मदत करतो, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतो, बाकी सगळं ती स्वतः करतात...’
पडघम - क्रीडानामा
भक्ती चपळगावकर
  • जापालूप या केंद्राची काही छायाचित्रं
  • Sat , 16 October 2021
  • पडघम क्रीडानामा जापालूप Japalouppe जापालूप इक्वेस्ट्रियन सेंटर Japalouppe Equestrian Centre

रोहन आठ वर्षांचा होता, त्या वेळी त्याच्या वडिलांनी त्याला बोलावले. त्याचे वडील तळेगावजवळच्या सोमाटणे या गावात घोड्यांची पैदास करणारे फार्म चालवत होते. रोहनचे बाबा त्याला तबेल्यात घेऊन गेले. तिथे एका घोडीच्या प्रसुतीची वेळ आली होती. रोहनच्या बाबांनी सांगितले, ‘तू हिच्याबरोबर थांब, मी बाहेर थांबतो. तुला मदत लागली तर प्रश्न विचार.’ रोहनने एकट्याने हे बाळंतपण केले आणि शिंगरू झाल्यावर त्याचे बाबा आत आले.

असला जगावेगळा बाबा आणि जगावेगळा मुलगा असेल तर गोष्टी जगावेगळ्याच होणार. याच रोहन मोरे आणि त्याची आई लोरेनने मिळून याच फार्मवर आता ‘जापालूप’ नावाचे अश्वारोहण प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. पश्चिम भारतातील सर्वांत मोठे अश्वारोहण प्रशिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध झालेल्या या केंद्रात ७१ घोडे आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘जापालूप’ हे नाव या केंद्राला देण्यामागची गोष्ट रंजक आहे. जापालूप हे नाव फ्रान्समध्ये पैदास झालेल्या एका छोट्या घोड्याचे होते. जापालूपसारखा छोटा घोडा कोणत्याही शर्यतीत यश मिळवणार नाही, अशी अनेक अश्व-तज्ज्ञांची खात्री होती, विशेषतः ‘शो जंपिंग’ या प्रकारात त्याला सगळीकडे नाकारण्यात आले. पण रायडर पियर ड्युरांड आणि जापालूप या दोघांनी यश मिळवण्यासाठी चंग बांधला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे पियरला १९८८च्या ऑलिम्पिक्समध्ये सुवर्णपदक मिळाले. मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशा या प्रख्यात घोड्याचे नाव रोहन आणि लोरेनने आपल्या केंद्राला दिले आहे.

रोहनच्या आजोबांनी आणि बाबांनी घोड्यांची पैदास केली. मग त्याने तोच वारसा पुढे सुरू का ठेवला नाही, असे विचारल्यावर रोहन मोरे म्हणतो, ‘खरं तर हा वारसा नाही. त्यांनी मला दिलं आणि म्हणून ते मी पुढे चालवतोय, अशातला हा प्रकार नाही. मी इथंच लहानाचा मोठा झालो. माझ्यासाठी हे माझं जग आहे. मी सायकल नंतर शिकलो, पण घोड्यावर बसायला आधी शिकलो. इतकं माझं घोड्यांशी घट्ट नातं आहे. पण मग हळूहळू माझ्या लक्षात आलं की, घोड्यांच्या उत्तमोत्तम जाती तयार करणं यात मला रस नाही, पण त्यांच्या संगोपनात, अश्वारोहणात मला रस आहे, खूप रस आहे.’

साधारणतः १९९८ साली हॉर्स फार्मच्या जागी अश्वारोहणाचे प्रशिक्षण, घोड्यांचे संगोपन सुरू झाले. मुलांना घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यासाठी इथे तीन-चार मैदाने किंवा अरीना तयार करण्यात आली. या मैदानांच्या चारी बाजूला शिरिष, सोनमोहर, गुलमोहरासारखी मोठी झाडे लावण्यात आली, आता त्यांचे डेरेदार वृक्ष झाले आहेत. त्यामुळे आज इथे सगळीकडे हिरवाई आहे. आपल्या लहानपणी आपल्याला जे जे उपभोगायला मिळाले, ते ते सगळे काही इथे येणाऱ्या मुलांना मिळावे, अशी रोहनची इच्छा आहे. म्हणून मग इथल्या डेरेदार झाडांवर मुलांना चढता येईल, अशा पायऱ्या बनवण्यात आल्या, पण तरीही मुलांना फार मदत केली जाणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारची कुत्री-मांजरे इथे शांतपणे फिरत असतात. त्यातली बहुतेक ‘रेस्क्युड’ आहेत, म्हणजे मालकांनी काही कारणांनी सोडून दिलेली आहेत. इथे लोक पिकनिकलाही येतात. त्यांच्यासाठी ‘पेटिंग झू’ आहे, म्हणजे प्राण्यांना खायला द्यायचे, त्यांच्याबरोबर मैत्री करायची. पण हे सगळे करताना काही नियम पाळावे लागतात. त्यासाठी जापालूपचा कर्मचारी वर्ग तुमच्याबरोबर असतो. प्राण्यांशी मैत्री करताना त्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यायला. थोडक्यात मुलांना हूडपणा करायला आणि नव्या गोष्टी शिकण्यासाठी इथे मुक्त संचार करता येतो.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

मुलांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या या केंद्रामागची भूमिका सांगताना रोहनने मला विचारले, ‘तुला ‘टायगर मॉम’ म्हणजे काय माहीत आहे का?’ मी म्हणाले, ‘हो, म्हणजे मुलांनी काय केले पाहिजे आणि जे करतात त्यात उत्तम असले पाहिजे याचा ध्यास ज्यांना असतो, त्या आयांना ‘टायगर मॉम’ किंवा वडलांना ‘टायगर डॅड’ म्हणतात.’ पण या संज्ञेचा उगम त्याने सांगितला- ‘टायगर वूड्स हा जगप्रसिद्ध गोल्फपटू दोन वर्षांचा असताना त्याच्या वडलांनी ठरवले, याला आपण जगातला सर्वोत्तम गोल्फ प्लेयर बनवायचे आहे. त्यानुसार त्यांनी मुलाचे भविष्य अक्षरशः स्वतः रचले. त्याने काय केले पाहिजे, कसे केले पाहिजे आणि मुख्य म्हणजे यशस्वी झालेच पाहिजे या जिद्दीने. मुळात हुशार असलेला टायगर फार लवकर जगप्रसिद्ध झाला. म्हणून अशा पालकत्वासाठी ‘टायगर मॉम/डॅड’ असे शब्द प्रचलित झाले.’

पण रोहनच्या मते असे लहानपण मुलांसाठी अन्यायकारक ठरू शकते. कारण अशा दुसऱ्यांनी रचलेल्या वाटेवर अविरत श्रम करून यशस्वी होणाऱ्या व्यक्ती फार लवकर कोसळतातसुद्धा. म्हणून नियोजन, शिस्त आणि मोकळेपणा यांचा कुठेतरी बॅलन्स हवा.

इथे मुलांसाठी रोज प्रशिक्षण वर्ग असतात आणि त्याचबरोबर निवासी कॅम्प्ससुद्धा होतात. मुलांना घोड्यावर बसायला, रपेट मारायला शिकवताना घोड्यांशी कसे वागले पाहिजे, स्वतःच्या शरीराला कसे सांभाळले पाहिजे, या दोन्ही गोष्टी मुले शिकतात. आयुष्यात नियंत्रण असणे खूप महत्त्वाचे आहे, मग आधी आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवून मग साडेचारशे किलो वजनाच्या घोड्यावर नियंत्रण ठेवताना मुलांचा आत्मविश्वास खूप वाढतो. पण प्रत्येक मूल वेगळे असते, काही मुले वीस-पंचवीस वर्गांनंतर स्वतंत्रपणे घोड्यावर रपेट मारायला तयार होतात, तर काही अधिक वेळ घेतात. अशा वेळी तुला इतक्या वेळा प्रशिक्षण दिल्यानंतर स्वतःचे स्वतः कसे घोड्यावर फिरता येत नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारणे चुकीचे आहे, असे रोहनचे मत आहे. तो म्हणतो, ‘एवढ्या मोठ्या जनावराला काबूतमध्ये ठेवणे, ही मुलासाठी फार मोठी झेप आहे. ती प्रत्येक मुलाने सारख्या गतीने घेणे शक्य नाही. पण एकदा ती मैत्री झाली की, मग आयुष्यभराची होते आणि या सगळ्या प्रक्रियेत मुले निर्णय घ्यायला शिकतात.’

निर्णय क्षमता म्हणजे दोन किंवा तीन पर्यांयातून एक पर्याय निवडणे नव्हे. निर्णय क्षमता म्हणजे फक्त चांगल्या वाईटाची ओळख नव्हे. निर्णय क्षमता म्हणते स्वतः घेतलेला निर्णय निभावणे. बऱ्याचदा आपण निर्णय घेतो, पण तो पटला नाही, तर ती गोष्ट अर्ध्यावर सोडतो आणि काही काळानंतर आपल्याला ती सवय लागते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हॉर्स रायडिंगबद्दल सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे, इथे तुम्हाला तुमचा निर्णय निभवावा लागतो. जापालूपला शो जंपिंगच्या स्पर्धा होतात. त्यात भाग घेताना मुले उत्साहाने म्हणतात, ‘आम्ही करू’. पण प्रत्यक्षात करायची वेळ आली की, त्यांना लक्षात येते की, हे सोपे नाही, पण त्यांनी निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे ती मुले प्रयत्न करतात, शिकतात आणि निभावतात. स्वतःला शोधताना मुलांना स्वतःचा शोध लागतो. आम्ही या शोधात त्यांना मदत करतो, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतो, बाकी सगळे ती स्वतः करतात.

..................................................................................................................................................................

लेखिका भक्ती चपळगावकर मुक्त पत्रकार आहेत.

bhalwankarb@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा