कन्हैया, क्रांतिकारी राजकारण बळकट करण्याच्या जबाबदारीपासून पळ काढणे, हा काही खरा मार्ग नाही!
पडघम - देशकारण
दत्ता देसाई
  • कन्हैयाकुमार, शहीद भगतसिंग आणि जिग्नेश मेवानी
  • Wed , 29 September 2021
  • पडघम देशकारण कन्हैयाकुमार Kanhaiya Kumar जिग्नेश मेवानी Jignesh Mevani भगतसिंग Bhagat Singh काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi

भगतसिंगाच्या जन्मदिनी आणि त्याला साक्षी ठेवून दोन युवा नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले – जिग्नेश मेवानी आणि कन्हैयाकुमार! हे नेमके काय झाले, असा प्रश्न अनेक युवकांना पडला आहे.

या पक्षांतराबद्दल इतिहास आणि राजकीय ज्ञानाचे आपले सगळे बळ एकवटून कन्हैयाकुमार युक्तिवाद करत आहे. त्याचा भाषा व प्रतिमा वापर पाहण्यासारखा आहे, त्याच्या नव्या भूमिकेची झलक त्यातून दिसते. तो म्हणतो- ‘मॉल जळत असताना, छोटे दुकान वाचवत बसायचे का?, वस्ती जळत असताना, बेडरूम वाचवण्याचा विचार करत बसणार का?, जहाज बुडत असताना, होडी कशी वाचवणार?’ वगैरे, वगैरे! वरवर पाहता हा युक्तिवाद बिनतोड वाटू शकेल. पण यात काय लपले आहे? तर आता कन्हैयाला छोटी दुकाने, छोट्या होड्या, यापेक्षा मॉल आणि जहाज वाचवणे महत्त्वाचे वाटते आहे. तसेच तो ज्या वस्तीची भाषा करतो आहे, ती आता गरिबांची-कष्टकर्‍यांची वस्ती नाही, तर जिथे बेडरूमवाली घरे आहेत अशी ‘वस्ती’ आहे! म्हणजे मध्यम व उच्च मध्यमवर्गीय. थोडक्यात, कन्हैयाचा प्राधान्यक्रमच नव्हे तर त्याचा वर्गीय दृष्टीकोनच आता बदलतो आहे. तो आता ‘व्यापक’ होण्याच्या नावाखाली काँग्रेसी भूमिका म्हणजे पूर्णपणे उच्चभ्रू राजकीय परिभाषा बोलू लागला आहे!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आता दुसरा एका मुद्दा घ्या. तो असा युक्तिवाद करतो आहे की उदा., आपल्याला ‘देश वाचवा’यचा आहे, त्यासाठीचे बळ काँग्रेसमध्येच आहे! प्रश्न असा आहे की, एकतर एवढा प्रदीर्घ काळ सत्ता असलेल्या काँग्रेसने असे काय केले की, ज्यामुळे देश खड्ड्यात जाण्याची प्रक्रिया सुरू झाली? काँग्रेसने स्वतःच स्वत:ला जनतेपासून दुरावण्याचे इतके ‘यशस्वी’ राजकारण कसे केले? याची कारणमीमांसा कन्हैयाने पूर्वी केलेलीच असेल, तिचे काय झाले? अशातही जर काँग्रेसच देशाला वाचवू शकत असेल, तर कन्हैया-जिग्नेश तिथे काय करताहेत? ते काय गळक्या जहाजाची भोके बुजवणार की, आग लागलेल्या मॉलमध्ये बादल्यांनी पाणी टाकणार?

काँग्रेसचा इतिहास सांगतो की, तिला अशी कामे करायला ‘बाहेरून’ येणारी मंडळी हवीच असतात. दुसरे असे की, ‘देश वाचवणे’, ‘संविधान वाचवणे’, ‘धर्मनिरपेक्षता वाचवणे’ ही भाषा जेव्हा जनजागृती, जनसंघर्ष वा गंभीर राजकारण सोडून पक्ष बदलणे वगैरेसाठी वापरली जाते, तेव्हा ते तद्दन संधिसाधू राजकारण असते. ही भाषा, किंवा ‘डावे-उजवे’ याला आता अर्थ नाही, म्हणून आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत, हा त्याचा युक्तिवाद आहे किती घिसापिटा आहे, हे आता वेगळे! मार्क्स आणि आंबेडकर यांच्या विचारांना एकत्र आणून देशभर जागृती करणार्‍या युवा कार्यकर्त्याने ‘डावे-उजवे’ वा ‘विचारसरणी’ असे काही नसते, असे म्हणणे, हा एकविसाव्या शतकातला एका मोठ्ठा विनोद नाही काय?

कन्हैया, तुला काँग्रेसमध्ये जायचे तर जा ना बाबा, पण त्यासाठी भगतसिंगासारख्या अव्वल क्रांतिकारकाचा संधिसाधू वापर कशासाठी? ‘बॉम्ब आणि पिस्तुलांनी क्रांती होत नसते’, या त्याच्या वाक्याचा वापर कशासाठी? तर काँग्रेसप्रवेश समर्थनासाठी? अरे बाबा, तू थोडाच एखाद्या सशस्त्र क्रांतीवाल्या एमएल गटात होतास? तू तर अशा कम्युनिस्ट पक्षात होतास की, जो सशस्त्र क्रांतीचा अजिबात पुरस्कार करत नाही, मग हा मुद्दा आला का व कुठून? तू एवढा जेएनयु उच्चशिक्षित व मार्क्सचा अभ्यासक असताना अचानक ‘क्रांती म्हणजे काहीतरी केवळ सशस्त्र व हिंसक कृती असते’ असे भासवणारी वक्तव्ये का करायला लागलास रे बाळा? तू ज्या भगतसिंगाचे उठता-बसता नाव घेतोस, त्याचे एखादेच वाक्य हे तू सोयीस्करपणे सांगतोस, पण त्याने या सार्‍याबाबत काय म्हटले आहे, ते सविस्तर का नाही वाचत पुन्हा एकदा? ते का नाही सांगत लोकांना? याचे कारण उघड आहे. हे सारे आत्ताच्या तुझ्या राजकारणाच्या सोयीचे नाही म्हणून!

हेच आपल्याला जिग्नेशला बाबासाहेबांच्या संदर्भात विचारावे लागेल!

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

कन्हैया तुला ठाऊक आहे की, चौरीचौरा घटना घडल्यावर व म गांधींनी १९२२ मध्ये असहकार आंदोलन अचानक मागे घेतल्यावर देशभर जे असंख्य लोक, विशेषत: युवक, प्रचंड निराश झाले, त्यात भगतसिंग होता. तो गांधीवादी विचारांपासून दूर होत पुढच्या दोन वर्षांत शास्त्रीय समाजवादाच्या क्रांतिकारी भूमिकेपर्यंत येऊन पोहोचला. गांधीजींचे मोठेपण, कोट्यवधी जनसामान्यांना वसाहतवादी सत्तेविरुद्ध लढ्यात उतरवणारे त्यांचे जननायकत्व, आणि त्यांची विश्वबंधुत्वाची भूमिका याकडे आदराने पाहत असतानाच तो काही प्रश्न उपस्थित करत होता, जे आज आणखी महत्त्वाचे बनले आहेत. उदा., ‘सर्वसाधारण (काँग्रेस) नेता आपले दौरे, जिथे टपालगाडी त्यांना आरामात घेऊन जाऊ शकेल, अशा ठिकाणापर्यंत सीमित ठेवतो. गांधीजींनी मात्र त्यांच्या दौऱ्याचा परीघ जिथवर ते मोटारकारने पोहोचू शकतील, अशा मर्यादेपर्यंत वाढवला आहे’ याची नोंद भगवतीचरण वोहरा-भगतसिंग हे त्या वेळी घेतात. मात्र ते म्हणतात गांधीजी ‘त्या त्या ठिकाणच्या धनाढ्य व्यक्तींच्या निवासस्थानी राहिले’. असे म्हणून ते दोघे विचारतात ‘कधी त्यांनी एखाद्या संध्याकाळी एखाद्या गावात शेकोटीभोवती बसून कुणा शेतकऱ्याचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे? कधी एखाद्या कारखान्यातील कामगाराबरोबर एखादी तरी संध्याकाळ बोलण्यात घालवून त्याचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे?’. काँग्रेसने आणि गांधीजींनी कामगार-शेतकऱ्यांना आंदोलनात आणले, मात्र त्यांचा मुख्यत: राष्ट्रीय आंदोलनापुरता वापर केला, असा आक्षेप ते घेतात.

हे प्रश्न आज आणखी तीव्र बनले आहेत. आता विमाने, हेलिकॉप्टर्स, मर्सिडिज आणि एसी एसयूव्ही यातून काँग्रेसी मंडळी फिरतात आणि आम जनतेशी तर मतदान वगळता त्यांचे कसलेच नाते उरलेले नाही. आजच्या काँग्रेसी नेत्यांबद्दल, बहुतांश जणांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल आणि जनविरोधी राजकीय संस्कृतीबद्दल तर देशातील आम माणूस जाणतोच, कन्हैयाही जाणतो! पण काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर आणि विशेषत: सत्तेत नसताना व खास करून गेल्या सात वर्षांत जनतेला तिच्या प्रश्नावर किती आंदोलनात उतरवले आहे? गांधींजींच्या सल्ल्याप्रमाणे ‘शेवटच्या माणसाला डोळ्यासमोर ठेवणारी’ किती धोरणे घेतली आहेत? गांधींजींना अपेक्षित नैतिकतेचा तर नामोनिशाण काँग्रेसमध्ये शिल्लक नाही. खुद्द प्रामाणिक काँग्रेसवालादेखील हे मान्य करतो की, गांधीजी हे एक प्रतीक म्हणून वगळता काँग्रेसमधून हद्दपार आहेत! मग बाप्पा कन्हैय्या तुला रे कोणत्या कोनातून काँग्रेस ‘गांधीवादी’ दिसते?

आज भगतसिंगाला मानणे याचा अर्थ काय होतो? देशातील कष्टकरी-आम जनतेमध्ये स्वतंत्र क्रांतिकारी चळवळ व संघटन उभे करणे आणि या शक्तींचा व राजकारणाचा बाहेरून दबाव ठेवून काँग्रेसमधील डावा प्रवाह बळकट करणे, ही भगतसिंग-हिंसप्रस (HSRA)ची व्यूहरचना होती. काँग्रेस वर्धिष्णु व लोकाभिमुख असतानादेखील तिच्यामध्ये विलीन होणे, ही दृष्टी या क्रांतिकारकांनी कधीही ठेवली नव्हती!

त्यामुळे आज भगतसिंगाच्या जन्मदिनी भारतातील प्रत्येक युवक-युवतीने एका गोष्टीचे भान ठेवले पाहिजे. येत्या दहा वर्षांत म्हणजे भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांच्या महान-क्रांतिकारी हौतात्म्याला शंभर वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देशात क्रांतिकारी राजकारण आणि समाजकारण हेच नेतृत्वस्थानी असले पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................

गेल्या ९० वर्षांत बरेच काही घडून गेले आहे. काँग्रेस ना आता प्रगतीशील राहिली आहे, ना लोकाभिमुख. ना ती वर्धिष्णु आहे, ना तिच्यात कणखर डावा प्रवाह आहे. ती केव्हापासून मूलत: जैसे-थे-वादी शक्ती बनली आहे. अशा वेळी नवहिंदुत्ववादी वर्चस्व परतवून लावण्यात एक उदारमतवादी (बाबासाहेबांच्या भाषेत तोही ‘अर्धाकच्चा’) पक्ष म्हणून तिच्याशी टॅक्टिकल आघाडी करणे गरजेचे असू शकते, ते आपण समजू शकतो. पण क्रांतिकारकांनी आपला पाया, आपली दृष्टी व आपले स्वतंत्र राजकारण न सोडता ते केले पाहिजे. आजच्या सर्वंकष अरिष्टाच्या काळात तर यावर विशेष कटाक्ष असला पाहिजे.

आणि त्यासाठीच काँग्रेसवर बाहेरून क्रांतिकारी दबाव वाढवण्याची ‘भगतसिंग-हिंसप्रस व्यूहनीती’ आज आणखी जोरकसपणे व व्यापकपणे राबवली पाहिजे. बाबासाहेबांनीदेखील निवडक वेळी काँग्रेसशी सहकार्य केले,पण तेही सतत तिच्यावर बाहेरून दबाव ठेवून होते, म्हणून दलित आणि जनतेला काहीएक अधिकार मिळू शकले. हे जिग्नेश आणि कन्हैयाने आज विसरत आहेत. मात्र आम युवक-युवतींना मात्र हे विसरणे आज अजिबात परवडणारे नाही. उसळत्या रक्ताच्या आजच्या युवापिढीने ही हिंमत दाखवण्यात आता पुढाकार घेतला पाहिजे.

भगतसिंगाच्या जन्मदिनी, त्याचे नाव घेत व त्याला अभिवादन करत काँग्रेसमध्ये विलीन होणाऱ्या कन्हैयासारख्या युवा नेत्यांनी खरे तर काय केले पाहिजे? भगतसिंग-भगवतीचरण-हिंसप्रसने काँग्रेसवर केलेले लेखन व तिचे मूल्यमापन त्यांनी पुन्हा वाचले पाहिजे.

असल्या राजकारणाने हे युवानेते फार तर वैयक्तिक व जैसेथेवादी राजकीय करिअर करू शकतील, पण भगतसिंगाचा क्रांतिकारी विचार व त्याचे राजकारण ते कधीही पुढे नेऊ शकणार नाहीत. फार तर एखादी निवडणूक कन्हैया जिंकेल, अर्थात तेही होऊ नये, अशी फिल्डिंग भाजप-नितीश-लालू-तेजस्वी एवढेच नव्हे, तर काही काँग्रेसवाले लावतील. त्यातूनही तो एकदा जिंकला तरी पुढे सारे सपाट असेल. हाच आजवरचा अनुभव आहे. आणि कन्हैया तर नीट जनाधार न बांधताच हवेवर स्वार होऊ पाहतोय!

अनेक डाव्यांनी पूर्वी याचा अनुभव घेतला आहे. तेच पुन्हा कन्हैया करू पाहतोय. पण थोडेसे मिश्कीलपणे मार्क्स म्हणाला होता- “इतिहासाची पुनरावृत्ती होते… पण पहिल्यांदा शोकांतिका म्हणून, आणि दुसर्‍यांदा फार्स (विनोदी प्रहसन) म्हणून!” इथे कन्हैया-जिग्नेशबाबत धोका आहे तो शोकांत फार्स वा फार्सिकल शोकांत होण्याची. इथून पुढचे त्यांचे ‘यश’ असो वा ‘अपयश’, ते क्रांतिकारी परिवर्तनवादी नक्कीच नसेल! काँग्रेसच्या माध्यमातून असे काही घडणे अशक्य. त्यासाठी पुन्हा भगतसिंग आणि त्यांचे साथीदार यांच्याकडूनच शिकावे लागेल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जगातील सर्वांत बलाढ्य व हिंस्र दमनकारी-दहशतवादी सत्तेला गेल्या शतकाच्या विशी-तिशीच्या दशकात या विशी-तिशीतल्या वीस-तीस युवक-युवतींनी नामोहरम केले, ते क्रांतिकारी प्रेरणेच्या बळावर. आज नवहिंदुत्ववादी दहशतीला नामोहरम करण्यासाठी आणखी कितीतरी व्यापक पाया व वाव उपलब्ध आहे. असे असताना या दहशती शक्तीला बावरून वा ‘तोंड देण्या’चे निमित्त करून क्रांतिकारी राजकारण बळकट करण्याच्या जबाबदारीपासून पळ काढणे, हा काही खरा मार्ग नाही. एखादा युवा नेता जरी आज असे करत असला, तरी कोट्यवधी भारतीय युवक-युवतींना इथून पुढे अधिकाधिक क्रांतिकारी राजकारणाचीच कास धरावी लागणार आहे.

शहीद भगतसिंगाला तेच खरे क्रांतिकारी अभिवादन ठरणार आहे!

..................................................................................................................................................................

लेखक दत्ता देसाई सामाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

dattakdesai@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Narendra Apte

Wed , 29 September 2021

लेख वाचनीय आहे. माझ्या मते पण कन्हैया कुमार हा काँग्रेस मध्ये काही बदल घडवून आणू शकेल अशी शक्यता खूप कमी आहे. काँग्रेस पक्षाला आता जिवंत ठेवणे सोपे नाही आणि गरजेचे पण नाही कारण तो मृतवत झालेला पक्ष आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा