‘मोरया’ हे संबोधन मोरगावच्या मयुरेश्वराचं आहे, मोरया गोसावींचं नाही…
पडघम - सांस्कृतिक
प्रियांका बेंडीगिरी-दीक्षित
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 17 September 2021
  • पडघम सांस्कृतिक मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया Morya Morya Ganpati Bappa Morya गणपती Ganpati गणेशोत्सव Ganeshotsav गणेश Ganesh

गणपती गजवंदनातील ‘मोरया’चा गजर महाराष्ट्रात अनेक शतकांपासून आणि आता संपूर्ण भारतात बऱ्याच ठिकाणी प्रतिध्वनीत होतो. गणेश चतुर्थीपासून गणेश विसर्जनापर्यंत ‘मोरया’ गणेश उत्सव साजरा केला जातो. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ ही वाक्यं एकमुखानं विसर्जनाच्या वेळी निनादत असतात. गुजरातेत असताना याच धर्तीवर ‘गणपती बाप्पा मोरिया, चार लाडू चोरिया, एक लड्डू टूट ग्या, नि गणपति बप्पा रूठ ग्या’ ऐकत होतो. जेव्हा लोकमान्य टिळकांनी मराठी लोकांमध्ये स्वाभिमान आणि देशभक्ती रुजवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवांची परंपरा सुरू केली, तेव्हा उत्तर किंवा मध्य भारतात गणेशोत्सवाची परंपरा नव्हती, हे निश्चित, परंतु आता मात्र हिंदी, बिहारी, भोजपुरी किंवा तत्सम चित्रपटांतदेखील नायक मोरयाच्या तालावर नाचताना दिसतो आहे. 

गणपती बाप्पाच्या पुढे लागणाऱ्या ‘मोरया’ या नावाच्या शब्दामागे मोरया गोसावी या गणेशभक्ताच्या गौरवाचा संदर्भ आहे, असे बऱ्याच जणांना वाटते. पुण्याजवळच्या चिंचवडमध्ये चौदाव्या शतकात मोरया गोसावी नावाचे एक प्रसिद्ध गणेशभक्त होऊन गेले. चिंचवडमध्ये गणेशाची स्थापना करून ते  नित्यनेमाने पूजाअर्चा करत असत. मोरया गोसावी यांनी येथे जिवंत समाधी घेतली. तेव्हापासून चिंचवडमधले हे गणेश मंदिर सिद्ध क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले आणि गणेश भक्तांनी गणपतीच्या नावासह मोरया नावाचाही  जप सुरू केला. भारतात केवळ देवच नाही, तर भक्तांचीही पूजा केली जाते. तर्कशास्त्र, ज्ञान, बुद्धिमत्ता ही साधने अशा विश्वासासमोर थिटे पडतात. या विश्वासाचा स्त्रोत इतिहासाच्या पानावरसुद्धा सापडत नाही. विश्वासात तर्क आणि बुद्धिमत्ता यापेक्षा महिमा प्रभावी ठरतो. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या मागे मोरया गोसावी त्यांच्यावरची श्रद्धा असावी, असा काही लोकांचा कयास आहे.

असे असूनही ‘मोरया’ गोसावींचा संदर्भ आणि गोसावी शब्दाचा उल्लेख थोड्या वेगळ्या अंगाने जातो. गोसावी या मराठी आडनावाचा अर्थ किंवा मूळ उत्तर भारतातील गुसाँईसारखा आहे. दोन्ही शब्दांचे मूळ गोस्वामीन आहे. गोस्वामीन> गोस्वामी> गुसाँई आणि नंतर मराठीत, अनुनासिकतेचा लोप होऊन फक्त गोसावी असा शब्द राहतो. साधारणपणे जो गाई पाळतो, त्याला ‘गोस्वामी’ असे म्हणतात. इंद्रियांना संस्कृतमध्ये ‘गो’ असेही म्हणतात. म्हणून या शब्दाचे एक स्पष्टीकरण असे आहे की, ज्याने सर्व इंद्रियांना वश केले आहे तो, जितेंद्र.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मोरया गोसावीचे वडील वामनभट्ट आणि आई पार्वतीबाई कर्नाटकातून सोळाव्या शतकात (काही संदर्भात चौदाव्या शतकात) पुण्याजवळील मोरगाव नावाच्या खेड्यात स्थलांतरित झाले. वामनभट्ट गणपती संप्रदायाच्या परंपरेतील होते. प्राचीन काळापासून हिंदू समाज शैव, शाक्त, वैष्णव आणि गाणपत्य संप्रदायांमध्ये विभागला गेला आहे. गणेशाच्या उपासकांना ‘गाणपत्य’ म्हणतात. या संप्रदायाचे लोक महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात जास्त आहेत.

गणपती ही सर्वोच्च शक्ती आहे असे गाणपत्य संप्रदाय मानतो. त्याचा आधार पौराणिक संदर्भ आहे. शिवपुत्र कार्तिकेयाने तारकासूरचा वध केल्याचा उल्लेख आहे. त्याची तीन मुले तारकाक्ष, कामक्ष आणि विद्युन्माली यांनी देवांचा सूड घेण्याचे ठरवले. तिघांनीही ब्रह्माची मनापासून पूजा केली. ब्रह्मदेवाने  त्यांना तीन पुरी बनवून (नगरे) दिली. तारकाक्षसाठी सुवर्णपुरी, कमलाक्षसाठी रजतपुरी आणि विद्युन्मालीसाठी लोहपुरी यांची निर्मिती विश्वकर्माने केली. या तीन असुरांनाच त्रिपुरासुर म्हणत असत. या तीन भावांनी या तीन नगरांत राहून सातही लोकांत दहशत पसरवली. ते जिथेही जात, तिथे सर्व जनतेला  सतावत असत. एवढेच नव्हे तर त्यांनी देवतांना देखील देवलोकातून बाहेर फेकले. भगवान शंकराने मग आपल्या बाणाने पुरींना जाळून भस्म करून टाकले. त्या आधी  भगवान शंकराने गणेशाची पूजा केली होती, म्हणून गणेश हाच परमेश्वर असे गाणपत्य मानतात.

तथापि, सोळाव्या शतकात मोरगावात वामनभट्ट आणि पार्वतीबाई स्थायिक झाले. त्याच्या मागेही काही तर्क दिसतो, कारण मोरगाव हे प्राचीन काळापासून गणपती संप्रदायातील मुख्य ठिकाणांपैकी एक आहे. आणि कदाचित मोरया गोसावींच्या पालकांच्या धार्मिक श्रद्धेमुळे, त्यांनी स्थलांतर करायला जे ठिकाण निवडले ते मोरगाव हे खेडे. या खेड्याला मोरगाव हे नाव मिळाले, कारण संपूर्ण परिसर मोरांनी समृद्ध होता. येथे गणेशाची एक सिद्ध प्रतिमा होती. त्याला ‘मयुरेश्वर’ असे नाव होते. गावातील लोक या प्रतिमेची मनोभावे पूजाअर्चा करत असत. अजूनही हे ठिकाण मयुरेश्वर म्हणूनच ओळखले जाते. याशिवाय आणखी सात ठिकाणी गणेश मूर्तींची पूजा केली जात असे. थेऊर, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड आणि पाली ही ठिकाणे आता अष्टविनायक या नावाने प्रसिद्ध आहेत. 

गणेश पुराणानुसार, त्रेतायुगात सिंधू नावाच्या राक्षसाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी देवांनी गणपतीचे आवाहन केले. सिंधूच्या नाशासाठी गणेशाने मोराला आपले वाहन म्हणून निवडले आणि सहा भुजांचा अवतार घेतला. तो मयुरेश्वर अवतार म्हणून ओळखला जातो. मोरगावात गणरायाचा मयुरेश्वर अवतार आहे. मराठीत मोरेश्वर. मयुरेश्वराची पूजा करून वामनभट आणि पार्वती यांना पुत्र प्राप्ती झाली आणि परंपरेनुसार त्यांनी आराध्य दैवताईच्या नावावरून मुलाचे नाव मोरया ठेवले.

मोरयाही लहानपणापासूनच गणेशभक्त झाले. त्याने थेऊरला जाऊन तपश्चर्या केली. त्यानंतर त्याला गणेशाचे दर्शन झाले. तेव्हापासून त्यांना मोरया किंवा मोरोबा अशी ख्याती मिळाली. त्यांनी वेद-वेदांग, पुराणोपनिषदाचे सखोल शिक्षण घेतले. त्यांना योगिराज नयनभारती गोसावी भेटले. त्यांच्या उपदेशाने मोरयाने मुळामुठेच्या काठी थेऊरच्या जंगलात चिंतामणीची घोर तपश्चर्या केली. बेचाळीस दिवसांच्या कठोर अनुष्ठानाने चिंतामणी प्रसन्न झाला. मोरया, इंद्रियांना जिंकणारे गोसावी बनले. ‘गो’ म्हणजे इंद्रिये, त्यांच्या स्वाधीन झाली.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी पुण्याजवळ पवना नदीच्या काठावर चिंचवडमध्ये आश्रम बांधून राहूण्यास सुरुवात केली. या आश्रमाच्या माध्यमातून मोरया गोसावींनी त्यांचे धार्मिक-आध्यात्मिक उपक्रम सुरू केले. त्यांची कीर्ती पूर्वीपेक्षा अधिक वाढू लागली. समर्थ रामदास आणि संत तुकाराम नियमितपणे चिंचवडला भेट देत असल्याचा उल्लेख आहे. त्यांना मोरया गोसावीबद्दल प्रेमळ आदर होता. सुप्रसिद्ध गणपती वंदना ‘सुखकर्ता-दुखहर्ता वार्ता विघ्नाची...’ चिंचवडच्या या सिद्धक्षेत्रात संत कवी समर्थ रामदास यांनी मोरया गोसावींच्या मार्गदर्शनाखाली रचली असे म्हणतात.

चिंचवडला स्थायिक झाल्यानंतर ही मोरया गोसावी मोरगाव स्थित मंदिरात गणेश चतुर्थीला दरवर्षी येत असत. घडलेल्या कथेनुसार, श्री गणेशाच्या प्रेरणेने मोरया गोसावी यांनी जवळच्या कऱ्हा नदीच्या पात्रात तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती प्राप्त झाली. ही मूर्ती चिंचवडच्या आश्रमात स्थापन केली. नंतर त्यांनी जिवंत समाधी घेतली. त्यांचा मुलगा चिंतामणीने नंतर समाधीवर मंदिर बांधले. मोरया गोसावी यांनी जवळच्या इतर गणेश मंदिरांच्या देखभालीसाठीही काम केले. असे म्हटले जाते की, मोरया गोसावी यांनीच अष्टविनायक यात्रेची सुरुवात केली आणि पहिले गणेश दर्शन मोरगाव मंदिराचे घ्यावे, असे  ठरवले.

प्रश्न उद्भवतो, गणेश चतुर्थीला मोरया शब्दामागे मोरया गोसावी यांच्या नावाचा जयघोष आहे की, आणखी काही? मोरगावच्या मयुरेश्वर गणेशालाच ‘मोरया’ म्हणत असावेत. आपल्या आराध्य दैवताला अलौकिक बनवतानाच त्याच्याशी अगदी मानवी संबंध ठेवणे किंवा वागणे भक्ताचा स्वभाव आहे कृष्णाच्या बालरूपाला ‘बालकृष्ण’ म्हणत ‘बाळू’सारखे घरगुती नाव त्यातून बनवले गेले. त्याच प्रकारे मोरया मयुरेश्वरापासून बनवला गेला असावा. 

गोसावीपुत्रालाही तेच नाव मिळाले. मोरया गोसावींनी जी मूर्ती मोरगावच्या नदीतून आणून चिंचवडमध्ये स्थापन केली, त्या मूर्तीला मोरगावमुळे ‘मोरया’असेही म्हणतात. गाणपत्य संप्रदायाच्या गणेश उत्सवांमध्ये मोरगाव आणि चिंचवडचे दोन्ही गणेश प्रमुख आहेत. दोन्ही ठिकाणी गणेश चतुर्थीला ‘गणपतीबाप्पा मोरया’ असाच उद्घोष होतो. मोरया हे संबोधन मोरगावच्या मयुरेश्वराचं आहे, मोरया गोसावींचं नाही, असे म्हणायला हरकत नसावी.

..................................................................................................................................................................

लेखिका प्रियांका बेंडीगिरी-दीक्षित वास्तुविशारद (Arhitect) आहेत.

pribe1283@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा