भारताला, जंबुद्वीपाला राजकीय अखंडता लाभणे, हे येथील जनतेच्या हिताचे आहे आणि त्याचा मार्ग ‘सेक्युलॅरिझम’ हाच आहे…
पडघम - देशकारण
हेमंत गोळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 24 August 2021
  • पडघम देशकारण सेक्युलॅरिझम धर्मनिरपेक्षता Secularism सेक्युलर Secular इहलोक टेंपोरल Temporal परलोक हिंदू Hindu मुस्लीम Muslim

‘सेक्युलर’ (secular) या शब्दाचा अर्थ ‘इहलोका’तील. त्याविरुद्धचा शब्द ‘टेंपोरल’ (temporal) म्हणजे परलोकातील. मुळात हे शब्द आले इंग्लिशमधून. तसे बघितले तर ‘इहलोका’त असताना ‘परलोक’ असतो किंवा नाही हादेखील अंदाजच असू शकतो. जसे आपण परदेशात जाऊन परत येतो, तसे ‘परलोका’त जाऊन काही येऊ शकत नाही. काही जण तसा दावा करतात, त्यावर विश्वास ठेवणे न ठेवणे हा ज्याचा त्याचा प्रश्न. मला वाटते की, परलोक, परमेश्वर, त्याचा न्याय वगैरे कल्पना तपासून बघणे काही शक्य नाही. त्यामुळे मी या सर्व गोष्टींना ‘तपासून बघता न येणारे अंदाज’ समजतो. माझ्या दृष्टीने इहलोकात बिगर इहलोकी जीव संभवत नाही. माझ्यासाठी विहिंप, तालिबान, रोमन कॅथॉलिक चर्च हे सर्व इहलोकातीलच आहेत. इहलोकामधील गोष्टींमध्येच रस घेणारे आहेत, म्हणजे इहवादीच आहेत.                             

असे असले तरी मध्ययुगीन युरोपात ‘सेक्युलर’ आणि ‘टेंपोरल’ अशा दोन वेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या शक्ती होत्या. खरे तर दोघेही याच लोकातील, पण भेद पडले ते त्या शक्तींच्या समाजामधील वेगवेगळ्या स्थानांमुळे. राजसत्ता ही ‘सेक्युलर’ म्हणून ओळखली गेली, तर चर्च (जे त्या काळात बरीच शक्ती कमावून बसले होते) ‘टेंपोरल’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

हे अर्थ झाले युरोपच्या संदर्भात. आपल्याकडे राजसत्तेला आव्हान देऊ शकेल, अशी शक्ती पुरोहित वर्ग कधीच कमावू शकला नव्हता. मुसलमान सत्ताधारी असणाऱ्या राज्यांतदेखील धर्मगुरू राज्यकर्त्यांना आव्हान देण्याएवढे शक्तिमान नव्हते. त्यामुळे असाच भावार्थ असणारे शब्दच आपल्याला जरूर पडले नाहीत. आपण त्या शब्दाचा अनुवाद करून आपल्या विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात त्याला वेगळा अर्थ दिला. तो अर्थ असा की, राजकारण करताना धर्म या कल्पनेचा वापर न करणे.

‘सेक्युलर’ या शब्दाच्या मूळ अर्थाने बघितले तर ‘सेक्युलर नाही’ असे या इहलोकात कोणीच नाही. पण भारताच्या संदर्भात त्याचा अर्थ ‘धर्माधारित राजकारण न करणे’ असा होतो. या अर्थाने ओवेसींचा पक्ष, भाजप हे सेक्युलर नाहीत. काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट, विविध प्रादेशिक पक्ष, आम आदमी पक्ष इत्यादी सेक्युलर आहेत.                              

ब्रिटिशपूर्व भारताबद्दल बोलायचे तर तो खरोखर अवनतीला गेला होता. युद्धकला एवढी एकच गोष्ट जरी  विचारात घेतली तरी युरोपियन्स आपल्या प्रचंड पुढे होते‌. कथा-कादंबऱ्या-सिनेमांमधून आपण बरेच महानायक निर्मिले आहेत, पण लक्षात हे घेतले पाहिजे की, ते ‘रणजी टॉफी’तले ‘दादा’ होते. ‘टेस्ट मॅच’ खेळण्याची त्यांची पात्रता नव्हती.

निकोलाय मनुची हे नाव सर्वांना परिचित आहे. मनुचीने मोगलांचा इतिहास लिहिलेला आहे. त्याचे पुस्तक संक्षिप्त स्वरूपात मराठीत साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले आहे. मनुची हा तोफखान्यामध्ये काम करत असे, हेदेखील बहुतेकांना माहीत असेल. औरंगजेबाच्या काळात मोगल सत्ता जेव्हा सामर्थ्याच्या शिखरावर होती, तेव्हा मनुचीचे असे मत होते की, युरोपियन सैन्याची केवळ एक ब्रिगेड पूर्ण हिंदुस्थान जिंकण्यास समर्थ आहे.

मी असेच अजून बरेच आधार देऊ शकेन, पण विस्तारभयास्तव देत नाही. ब्रिटिशांनी भारत जिंकला, तेव्हा एतद्देशीय सत्ताधारी हताश झाले होते. आपण यांच्यापुढे उभे राहू असा आत्मविश्वासच कोणामध्येच नव्हता. ब्रिटिश राजवटीमुळे पेंगत बसलेले भारतीय खडबडून जागे झाले. पण तसे ते लवकर भानावर आले. नवीन सत्ताधाऱ्यांची शक्तिस्थाने त्यांना समजू लागली होती, ती ते आत्मसात करू लागले होते.

नाना फडणवीस कारभारी असताना फ्रेंच राज्यक्रांती झालेली होती आणि नानांना त्याची खबरदेखील होती. अशा घटनांचे परिणाम होतात. लोकांना नवीन कल्पना सुचू लागतात. नवशिक्षितांना आपल्या चुका समजू लागल्या होत्या. कुठे जायचे आहे, ती दिशा समजली होती.                  

मराठ्यांचे भारताच्या इतिहासातील कार्य काय, या प्रश्नाचे उत्तर इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी दिले आहे. त्यांच्या मते राजसत्तेमधील मुसलमानांची मक्तेदारी मोडून काढणे, हे मराठ्यांचे ऐतिहासिक कार्य होते. ते पूर्ण होत असतानाच सत्ता ब्रिटिशांकडे गेली. ती घटना बरी आणि वाईट दोन्हीही होती. (जपानची झोप साधारण याच सुमारास उडवली गेली, १८४८. पण ते परकीय अंमलाखाली गेले नाहीत, हे त्यांचे नशीब.) ब्रिटिशांमुळे जगाशी परत ओळख झाली, मागे पडल्याची जाणीव झाली.   

पण ब्रिटिश राज्ययंत्र फार महाग होते आणि त्यांनी आणलेली औद्योगिक सभ्यता नवे प्रश्न उभे करत होती- पर्यावरणाचे, बेकारीचे! समाजामधील प्रश्न दर वेळी सुटतात असे नाही… ते अप्रस्तुत होतात. मुसलमानांची सत्तेमधील मक्तेदारी हा संपत आलेला प्रश्न आता तसाच अप्रस्तुत झाला होता. त्यापेक्षा फार मोठे प्रश्न उभे राहिले होते. पुढे बघणाऱ्यांना हे समजते. ते पुढील प्रश्नांना सामोरे जाण्यास तयार होतात.

‘राज्ययंत्रात आम्हालाही वाटा हवा’ या मागणीपासून काँग्रेसने सुरुवात केली. रानडे, नवरोजी, टिळक, गोखले यांच्या काळात काँग्रेसने ब्रिटिश राजवटीकडून होणाऱ्या आर्थिक शोषणावर बोट ठेवले, बेकारीच्या प्रश्नालाही हात घातला, ‘गांधीयुगा’त सत्ताधाऱ्यांबद्दलची भीती झुगारून देण्यात आली, सामाजिक प्रश्नांना सामोरे जाण्यास सुरुवात केली गेली, औद्योगिक सभ्यतेच्या शाश्वततेबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. भारत ‘गणराज्य’ असेल हे ठरवले गेले.

काँग्रेसची ढोबळमानाने ही अशी वाटचाल आहे. या वाटचालीत अडचणी आल्या नाहीत, असे नाही. सर्वच लोक पुढे पाहू शकत नाहीत. अप्रस्तुत झालेले प्रश्न बाजूला ठेवून काँग्रेस वर्तमान आणि भविष्याला सामोरी जात होती. पण काही जण त्याच त्या जुन्या प्रश्नांना कवटाळून बसले होते. राज्यकर्त्यांसाठी ते सोयीचे होते. धर्मांचे प्रश्न राजकारणात न आणता केवळ जगण्याच्या ऐहिक प्रश्नांवर सर्व जंबुद्वीपामधील माणसांना एकत्र ठेवण्याचा काँग्रेसने आटोकाट प्रयत्न केला, पण धर्माचे राजकारण करणाऱ्या मुसलमान व हिंदूंनी ते होऊ दिले नाही.                             

जंबुद्वीपामधील धार्मिक विभागणीच अशी आहे की, धर्म बाजूला ठेवल्याशिवाय जंबुद्वीपाचे राजकीय एकीकरण शक्य नाही. जंबुद्वीपाचे राजकीय एकीकरण हे येथील जनतेच्या निश्चितपणे हिताचे आहे. पण त्यासाठी भारतात ‘सेक्युलर’ हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो, त्यावर आधारलेलेच राजकारण करणे आवश्यक आहे. सिंधू नदीपासून सिंधुसागरापर्यंतच्या भूमीला जे पितृभू मानतात, ते सर्व हिंदू, ही भूमिका नक्कीच स्वीकारार्ह आहे, पण त्याला पुण्यभूचे शेपूट चिकटवले की, ते आधीची भूमिका रद्द करून टाकते.     

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................                                 

मुसलमानांबद्दल विशेषतः २०१४ पासून जे लिहिले-बोलले जाते आहे, ते वाचल्यावर असे वाटू लागते की, हे कोणी परग्रहांवरून आलेले जीव आहेत. त्यांचे सगळे काही वेगळेच असते. पण हा समज चुकीचा आहे‌. मानवी पेशींमधील मायटोकॉंड्रिया अभ्यासावरून असे समजले आहे की, समस्त मानवजात ही एकाच आईच्या लेकरांपासून निपजली असावी. अतएव सर्व माणसांचे जगण्यासंबंधीचे नियम सारखेच आहेत.

मध्ययुगात सर्व जगातील माणसे धर्मसंस्थेच्या प्रभावाखाली होती. काळाबरोबर सर्व बदलली, बदलावेच लागले. स्त्रियांनी पायात पादत्राण घालावे की घालू नये, या विषयावर आगरकरांना लिहावे लागले, त्याला शंभर वर्षे तरी झाली आहेत का? आता मुलींना सांगून बघा बरे पायांत बूट घालायचे नाहीत म्हणून आणि सकच्छच नेसले पाहिजे म्हणून! पंचहौद मिशनमध्ये चहाबरोबर बिस्कुट खाल्ले म्हणून टिळकांवर ग्रामण्य झाले. त्यानंतर तीसेक वर्षांत ना. सी. फडके यांच्या कादंबरीतील पात्रे कॅम्पातील हॉटेलांत जाऊ लागली होती.

हे जे हिंदूंबाबत घडते, ते मुसलमानांबाबतही घडणे अपरिहार्य असते. किती जणांना शाळेपासून मुसलमान वर्गमित्र असतात? मला होते. मी तालुक्याच्या गावात शिकलेला आहे. लक्षात घ्या की, आपणाला कोणाबद्दल आत्मीयता वाटावी, याचे नियम फार वेगळे असतात. कल्पना चावला भारतीय मुलगी होती का? सुनीता विल्यम्स भारतीय आहे का? पण आपल्याला कल्पनाच्या मृत्यूबद्दल हळहळ वाटते, सुनीताबद्दल अभिमान वाटतो. देवयानी खोब्रागडे यांनी अमेरिकी कायद्याचा भंग केला होता. एका भारतीय कामवालीवर अन्याय केला होता, पण तरी त्यांच्यावर जो प्रसंग आला, त्यामुळे मला राग आला. देश वगैरे ओलांडून अशी आत्मीयता माणसांना वाटते.                                                            

मुस्लीमबहुल देशांबद्दल एक चमत्कारिक योगायोग आहे. त्यांपैकी बऱ्याच देशांमध्ये तेल आहे आणि त्या तेलासाठी ते पाश्चात्यांकडून कायम चिरडले गेले आहेत. त्याबद्दल भारतीय मुसलमानांमध्ये राग असणे, हे स्वाभाविक आहे. मी मुसलमान नसून मला या अन्यायांबद्दल राग येतो, तर त्यांना का येणार नाही?

आपण थोड्या काही जिहादींवरून सगळेच जिहादी असल्याचा निष्कर्ष काढतो. तसे नसल्याचे कितीतरी पुरावे आपण टाळतो. माझ्या दिवंगत भावाचा सैन्यदलातील एक मित्र अचानक आला आणि माझ्याकडे मागणी करू लागला की, ‘तुझ्या कुटुंबातील सर्व मुले तीन दिवस मला माझ्याबरोबर पाहिजेत.’ तो काश्मीरमध्ये नियुक्त होता आणि तेथील चाळीस एक हायस्कूल विद्यार्थ्यांना घेऊन आला होता. तो मला सांगत होता, ‘आम्हा फौजींना काही समजत नाही. या मुलांना सदर्न कमांड आणि एनडीए दाखवून काय उपयोग? मला त्यांना फर्गसन कॉलेज दाखवायचे आहे. म. गांधी रस्त्यावर भटकवायचे आहे. येथील (म्हणजे भारतामधील) मुले कशी मोकळेपणे वावरू शकतात, शिकू शकतात हे मला त्यांना दाखवायचे आहे. आणि म्हणून सोबत मला तुझ्या कुटुंबातील मुले हवी आहेत.’

हे सांगणारा केरळमधील मुसलमान होता बरे का! तुम्ही मला दहा जिहादी दाखवा, मी तुम्हाला हजार तुमच्या-माझ्यासारखेच असणारे मुसलमान दाखवेन!!  

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

आणि हिंदूंमध्ये जिहादी नाहीत की काय? तिघेही चापेकर बंधू फाशी गेले‌. सुखाने आयुष्य कंठणे त्यांनाही शक्य होते, पण त्यांनी धोक्याचा मार्ग स्वीकारला आणि तो क्षुद्र स्वार्थासाठी नाही स्वीकारला, याबद्दल ते आदरास पात्र आहेत. पण त्यांची दुसरी बाजू माहिती असावी. ते सुधारकांचे द्वेष्टे होते. दामोदरपंतांचे आत्मचरित्र प्रकाशित झालेले आहे. त्यात त्यांनी स्वत:च सांगितले आहे की, एका व्यक्तीला तो सुधारक आहे, केवळ एवढ्या एकाच कारणासाठी एकट्याला गाठून बदडले होते. टिळक हे सुधारकांपैकीच असून उगी शिंग मोडून वासरांत येऊ बघतात, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

ज्या कोणाला दामोदरपंतांची ही मते मान्य असतील त्यांनी स्मृतिधर्माचे पालन तरी करावे वा दामोदरपंत अतिरेकी होते हे कबूल करावे.

त्यांना ‘शरिया’ पाहिजे, यांना ‘स्मृती’ पाहिजे!

आम्हाला दोन्ही नको आहेत हो!                          

क्षुद्र राजकीय स्वार्थापोटी समाजामधील एका समूहाला लक्ष्य करण्यापलीकडे ज्यांना काहीच धडपणे करता आलेले नाही, अशा एका पक्षाच्या धंदेवाईक प्रचारकांच्या पोस्ट्स पुढे पाठवण्यात धन्यता का मानली जाते? ते कोणाच्याच हिताचे नाही.

भारत, नव्हे जंबुद्वीपाला (जंबुद्वीपे भरतखंडे… भारत हा जंबुद्वीपाचा एक भाग आहे) राजकीय अखंडता लाभणे, हे येथील जनतेच्या हिताचे आहे आणि त्याचा मार्ग ‘सेक्युलॅरिझम’ हाच आहे.

..................................................................................................................................................................

लेखक हेमंत गोळे निवृत्त बँक कर्मचारी आहेत.

gole_hemant@yahoo.co.in

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारताच्या पंतप्रधानपदाचा हा ऱ्हास खरे देशभक्त, खरे राष्ट्रप्रेमी, खरे राष्ट्रवादी व लोकशाहीची चिंता वाहणारे नागरिक यांचा आत्मविश्वास डळमळीत करणारा आहे

आपल्या देशात राष्ट्रपती देशाचा प्रमुख असतो, लोकसभा-राज्यसभा यांच्या अध्यक्षांना विशेष मान असतो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनाही वेगळे महत्त्व असते आणि मुख्य निवडणूक आयुक्ताला खास असे स्थान असते. मात्र देशाचा पंतप्रधान जेव्हा कार्यक्षम असतो, सुसंस्कृत, दूरदृष्टी असलेला, मूल्ये जपणारा असतो, तेव्हा वरील सर्वांना विशेष इज्जत असते. त्यामुळे मोदी यांनी स्वतःचे व पंतप्रधान या पदाचेच नाही, तर वरील पदांचेही अ.......