सर्वांना स्वातंत्र्य उपभोगायचं आहे, मजा करायची आहे. स्वातंत्र्याचा अर्थ सर्वांनाच कळलेला आहे. त्या स्वातंत्र्याच्या ‘हायवे’वर सगळे सुसाट वेगानं धावत आहेत, पण…
पडघम - देशकारण
कुंडलिक विमल वाघंबर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 16 August 2021
  • पडघम देशकारण १५ ऑगस्ट 15 August स्वातंत्र्य दिन Independence Day स्वातंत्र्य Liberty लोकशाही Democracy

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं होत आहेत, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या तयारीला लागला आहे. करोना विसरून बाजार फुललेला आहे, मॉल भरलेले आहेत. सर्वत्र ‘ऑफर- ऑफर’ असे टॅग लागलेले आहेत. स्वातंत्र्याच्या हॉलिडेमध्ये शॉपिंग करण्यासाठी, पिकनिकला जाण्यासाठी मध्यमवर्ग-उच्च मध्यमवर्ग आसुसलेला आहे. सरकार करोना, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आंदोलन विसरून अमृत महोत्सवाच्या कामाला लागले आहे. सगळीकडे कसा आनंदीआनंद आहे!

देशाला स्वातंत्र्य मिळवणयासाठी १५० वर्षं जनतेनं लढा दिला. अनेक जण हसत-हसत फासावर चढले, हजारोंनी गोळ्या झेलल्या. त्यांच्यामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, अशी रटाळ भाषणं ऐकण्याची कोणाची इच्छा नाही. सर्वांना स्वातंत्र्य उपभोगायचं आहे, मजा करायची आहे. स्वातंत्र्याचा अर्थ सर्वांनाच कळलेला आहे. त्या स्वातंत्र्याच्या ‘हायवे’वर सगळे सुसाट वेगानं धावत आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आपण स्वातंत्र्याचे नवनवे टप्पे गाठत आहोत. बघण्याच्या कार्यक्रमात आई-वडिलांनी मुला-मुलींना एकमेकांशी बोलण्यासाठी पाच मिनिटांची प्रायव्हसी देणं म्हणजे ‘स्वातंत्र्य’ झालेलं आहे. आजची नवीन पिढी मोबाईल, सोशल मीडिया, दारू, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड यांमुळे बरबाद झालेली आहे, अशी जुन्या पिढीला बोलायला मोकळीक असणं म्हणजे ‘स्वातंत्र्य’ झालेलं आहे. व्हॉट्सॲपवर गुड मॉर्निंग-गुड नाईट, हॅप्पी बर्थ डे असे मेसेजवर मेसेज पाठवतं राहणं म्हणजे ‘स्वातंत्र्य’ झालेलं आहे. 

हातात ॲपलचा फोन, मनगटावर रोलेक्सचे घड्याळ, पायात बाटाचे शूज, अंगात रेमंडचे कपडे, बोटात सोन्याची अंगठी, फिरायला बुलेट, फिरवायला गर्लफ्रेंड, राहायला आलिशान बंगला हे म्हणजेच आजचे ‘आदर्श स्वातंत्र्य ’आहे. हे ज्याच्यापाशी आहे, तो खऱ्या अर्थानं ‘स्वातंत्र्य’ अनुभवतो आहे. ज्यांच्याकडे नाही, तो हे मिळवण्याचं स्वप्न पाहतो आहे, त्यासाठी प्रयत्न करतो आहे. ज्यांना हे स्वप्न दूरवरचं वाटतं, ते आपली सिगारेट ओढकाक, स्टाईलमध्ये टू व्हीलर चालवतात, ऑनलाईन पिझ्झा मागवतात, तलवारीने केक कापतात… त्यांच्यासाठी हेही ‘स्वातंत्र्य’च आहे. 

आपल्या मुला-मुलींनी आपण सांगतोय तेच ऐकलं पाहिजे अन् तेचं केलं पाहिजे, ही पालकांची ‘स्वातंत्र्या’ची व्याख्या असते. पालकांना चुकवून आपण बियर प्यायला लागलो, हे मुलांना ‘स्वातंत्र्य’ वाटतं. बायकोला धाकात ठेवणं, हे नवऱ्याचं ‘स्वातंत्र्य’ असतं. ऑफिसमध्ये कामगारांना जे सांगितलंय ते त्यांनी इमाने-इतबारे करणं म्हणजे बॉससाठी ‘स्वातंत्र्य’. काहीतरी कारण सांगून सुट्टी मिळवणं, हे कामगाराला वाटणारं ‘स्वातंत्र्य’.

सर्वांना आपलं ‘स्वातंत्र्य’ कशात आहे, हे समजलेलं आहे. ज्याने त्याने आपापल्या ‘स्वातंत्र्या’ची व्याख्या बनवलेली आहे.

समाजही गेल्या ७५ वर्षांत खूप पुढे गेलेला आहे. धर्माच्या नावावर मॉब लिंचिंग करण्याचं ‘स्वातंत्र्य’ समाजानं मिळवलेलं आहे. जातीच्या-धर्माच्या संघटना बांधण्याचं ‘स्वातंत्र्य’ मिळालेलं आहे. मुलगी खाली मान घालून चालते की नाही, मुलासारखं वागत तर नाही ना, कुणा मुलाचा विचार तर करत नाही ना, यावर लक्ष ठेवण्याचं पारंपरिक ‘स्वातंत्र्य’ समाजानं अजून स्वतःकडेच ठेवलेलं आहे. यामुळे आपल्या नेत्यांना, मंत्र्यांना कधी नव्हे एवढं ‘स्वातंत्र्य’ मिळालं आहे. ते कधीही मुलीनं कसं राहावं यावर बोलू शकतात, धर्मावर वाट्टेल ते भाष्य करतात... मॉब लिंचिंग करणाऱ्यांचे, बलात्कार करणाऱ्याचे सत्कार करू शकतात. अशा मंत्र्यांना शिव्या देण्याचं ‘स्वातंत्र्य’ही आपल्याकडे आहे, हे काय कमी नव्हे!

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

वस्तूची निवड, अफाट वस्तूंचा साठा, मनासारखी गर्लफ्रेंड, मनासारखी बायको, पोरं-बाळं, गाडी-बंगला… स्वातंत्र्य इतकं संकुचित असतं का? कशाला म्हणायचं ‘स्वातंत्र्य’? बाजारात पैसे देऊन ‘स्वातंत्र्य’ विकत घेता येतं का? संसदेत, सर्वोच्च न्यायालयात मिळेल का ‘स्वातंत्र्य’?

स्वातंत्र्य हे कोणत्या पोपटाचं नावं आहे?

आपल्याला स्वातंत्र्याची गरज तरी आहे का?

की भागेल आपलं स्वातंत्र्यावाचून?

अजूनही काही लोकांना वाटतं की, इंग्रज बरे होते.

आपल्या देशासाठी बऱ्याच लोकांना हुकूमशाही चांगली वाटते.

कुठे मिळेल ‘स्वातंत्र्य,’ कुठे शोधायचं त्याला?

स्वातंत्र्य म्हणजे काय?

हे शोधणं स्वतःला शोधण्यासारखंच आहे. मला पाहिजे ते करण्याची मुभा म्हणजे ‘स्वातंत्र्य’ नाही. केवळ सगळी बंधनं तोडणं म्हणजेही ‘स्वातंत्र्य’ नाही. जे स्वतःची बंधनं तोडत, त्यातून केवळ स्वतःचा स्वार्थ साधतात, त्याला ‘स्वातंत्र्य’ म्हणता येणार नाही.

जे दुसऱ्याचीही बंधनं तोडतं, त्याला ‘स्वातंत्र्य’ म्हणतात. दुसऱ्याच्या स्वातंत्र्याबद्दल ज्याला तळमळ वाटते, त्याला ‘स्वातंत्र्य’ म्हणायचं. जे गुलाम आहेत, त्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, असं ज्यांना अंतःकरणापासून वाटतं, ते म्हणजे ‘स्वातंत्र्य’.

लाखो-शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. का? त्यांच्यावर ही वेळ का आली? आपला देश जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, तरी अजूनही आपल्या देशात कुपोषण, गरिबी, बेरोजगारी, महागाई का आहे? मेट्रो-बुलेट ट्रेनपेक्षा प्रत्येक तालुक्यात दर्जेदार मोठी रुग्णालयं का उभारली जात नाहीत? लाखो रुपये देऊन शिक्षण का घ्यावं लागत आहे? अजूनही बालविवाह का होतात? असे प्रश्न आपल्याला जोपर्यंत पडत नाहीत, तोपर्यंत आपणही गुलाम आहोत, पैशानं बांधलेले आहोत, व्यवस्थेच्या जाळ्यात अडकलो आहोत.

सरकारी प्रचार, चमचमीत गाड्या, झगमगाटी मॉल यामुळे आपण अंध झालो आहोत. समाजात काय चाललं आहे, ते आपल्याला दिसत नाही.

इंग्रज घरासमोर पाटी लावायचे की, भारतीयांना व कुत्र्यांना येण्यास परवानगी नाही. आजही अदृश्य पाट्या आहेत. शिक्षणसंस्थांमधील फी-चार्ट गरिबांना त्या शाळा-महाविद्यालयांमध्ये पाय ठेवू देत नाही. रुग्णालयांमधील प्रचंड बिलामुळे गरिबांना तिथं प्रवेश मिळत नाही. हॉटेलमधील मेन्यूकार्ड तिथं जाण्याची परवानगी देत नाही. मूठभर धनाढ्य भारतीय सर्व काही करू शकतात, तर कोट्यवधी भारतीय आपल्या कुटुंबाला जगवण्यासाठी मरमर मरतात. 

आपल्या समाजात मालक आणि नोकर दोघंही गुलाम आहेत. नोकराला मालक म्हणेल ते ऐकावं लागतं, तर मालक कामगारांकडून कसं जास्तीत जास्त काम करून घेता येईल, याच विचारात असतो. म्हणजे एकप्रकारे तोही गुलाम असतो. नवरा-बायको यांच्यातही मालक-गुलाम यांचं नातं आहे. कुटुंबात स्वातंत्र्य नाही. देशातील दोन नागरिकांमध्ये स्वातंत्र्य नाही. साधं प्रियकर-प्रेयसीच्या नात्यातही स्वातंत्र्य नाही. यामुळेच आपल्याला हुकूमशाही प्रवृत्तीचा नेता आवडायला लागतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर तरी आपण स्वातंत्र्यावर विनाअट प्रेम करायला शिकलं पाहिजे. स्वातंत्र्याचा झरा पहायचा असेल तर तो तुम्हाला शेतकरी आंदोलनात मिळेल. जे कुण्या एकाच्या नाही तर सर्वांच्या हिताचं आंदोलन आहे. तेथील नि:स्वार्थी सेवाभाव पाहून तुमचा आत्मा तृप्त होऊन जाईल.

महिला, दलित, आदिवासी आंदोलनात स्वातंत्र्याचा हुंकार ऐकायला मिळेल. वस्तूच्या स्वरूपातील गिफ्ट देण्यापेक्षा व्यक्तींना समजून घेऊन आपापसातील स्वातंत्र्य फुलवण्याचा प्रयत्न करूया, त्यासाठी संघर्ष करावा लागला तर तो आनंदानं करूया. संघर्षातूनच ‘स्वातंत्र्याचा वसंत’ फुलतो.

चला तर, सर्वच नात्यांमध्ये स्वातंत्र्याचं बीज रुजवूया. त्यातूनच ‘स्वातंत्र्याची संस्कृती’ जन्माला येईल…

..................................................................................................................................................................

लेखक कुंडलिक विमल वाघंबर लोकायत संघटना (पुणे)चे कार्यकर्ता आहेत.

kundalik.dhok@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख