मित्र हो, चित्रविचित्र वर्तमान काळ तुमच्यासमोर आहे. तो समजून घेतल्याशिवाय तुम्हाला नवीन, भरीव असं काही करता येईल, असं मला वाटत नाही!
पडघम - साहित्यिक
राजन गवस
  • ‘मराठी युवा लेखक संमेलना’ची निमंत्रणपत्रिका आणि प्रसिद्ध कथा-कादंबरीकार राजन गवस
  • Thu , 01 July 2021
  • पडघम साहित्यिक साहित्य अकादमी Sahitya Akademi राजन गवस Rajan Gavas अविनाश सहस्त्रबुद्धे Avinash Sahastrabuddhe

साहित्य अकादमीच्या वतीने २२ जून २०२१ रोजी ‘मराठी युवा लेखक संमेलन’ ऑनलाईन माध्यमाद्वारे घेण्यात आलं. कथाकथन आणि कवितावाचन अशा दोन सत्रांत हे संमेलन झालं. त्याचे उदघाटक होते प्रसिद्ध कथा-कादंबरीकार राजन गवस, तर अध्यक्ष होते ज्येष्ठ समीक्षक अविनाश सप्रे. गवस यांनी आपल्या भाषणात आजच्या तरुण मराठी लेखकांपुढील आव्हानांची आणि उपलब्ध अवकाशाची चर्चा करताना त्यांच्याकडून काही अपेक्षाही व्यक्त केल्या… त्या विचारप्रवर्तक भाषणाचं हे शब्दांकन…

..................................................................................................................................................................

आपण सर्व कुशाग्र बुद्धीचे आणि विविध प्रकारचं लेखन करणारे लेखक आहात. माझ्या पिढीपेक्षा कितीतरी वेगवान जगात वावरणाऱ्या तुम्हा सगळ्या नव्या, सूज्ञ लेखकांसमोर बोलायचं म्हटल्यानंतर, ‘नेमकं बोलायचं तरी काय?’ असा प्रश्न माझ्यासारख्या आधीच्या पिढीतल्या माणसाला खचितच पडतो. याचं कारण असं की, आम्ही ज्या काळामध्ये जन्माला आलो तो, त्यानंतर आम्ही जो काळ बघितला तो आणि आज ज्या काळामध्ये आम्ही येऊन पोहोचलो आहोत तो, या सगळ्या काळाच्या स्थित्यंतरामध्ये मला प्रचंड प्रकारची गती दिसायला लागलेली आहे. म्हणजे, आजचा संपूर्ण काळ इतका गतिमान आहे की, ही गती स्वीकारता स्वीकारताच आमच्या पिढीला एकीकडे मेटाकुटीला यायला होतं, पण दुसरीकडे हाच काळ तुम्हा नव्या पिढीच्या मात्र अंगवळणी पडत चाललेला आहे. म्हणजे आमच्या पिढीसारखं स्वास्थ्यपूर्ण, संथ जगणं या पिढीच्या वाट्याला येत नाही. या पिढीचं जगणं अत्यंत धकाधकीचं आणि सर्व अर्थांनी गजबजलेलं आहे. विशेषतः आपल्या सर्वांच्याच सभोवती समाजमाध्यमांचाही गजबजाट आहे. या सगळ्याबरोबरच सध्या आपण नवनव्या आणि विचित्र गोष्टींनी वेढून गेलेलो आहोत. अगदी आज ज्या परिस्थितीमधून आपण जातो आहोत किंवा जो भोवताल अनुभवत आहोत, ही सगळी परिस्थितीही विचित्र आहे. कारण एकमेकाला अशा पद्धतीने आपण फक्त लाइव्ह पाहू शकतो, पण भेटू शकत नाही. त्यामुळे हा सगळाच काळ अस्वस्थतेचा काळ आहे, असं म्हणावं लागेल.

अशा काळामध्ये जगत असताना आपण आपल्या नव्या लिहिणाऱ्या लोकांना ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत आणि त्यांच्या नव्या कृतींचं किंवा त्यांच्या नव्या लेखनाचं स्वागतही करणार आहोत; त्यासाठी त्यांना सदिच्छाही देणार आहोत. मित्र हो, या दृष्टीने अगदी मोजकेच मुद्दे मला या ठिकाणी अगदी महत्त्वाचे म्हणून मांडायचे आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

यांतला पहिला मुद्दा मी मगाशी म्हटलो, तो काळाच्या गतीचा आणि गजबजाटाचा आहे. चिंतनशीलतेला कोणत्याही प्रकारचा अवसर उरू नये, अशा काळात किंवा अशा एका व्यवस्थेमध्ये आपण सध्या जगतो आहोत. या सगळ्याचा परिणाम काय होतो आहे? तर सर्वदूर कथा लिहिल्या जात आहेत; कादंबऱ्या लिहिल्या जात आहेत; कविता लिहिल्या जात आहेत, पण मराठी साहित्यामध्ये वैचारिक साहित्याकडं वळणारे तरुण, नवे लेखक अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच सापडताहेत. याची कारणं काय?

तर जी गती, जी गजबज आपण अनुभवतो आहोत, ती सगळी निरर्थक, विचार करायला सवडही न देणारी गजबज-गती आहे. या निरर्थक गजबजीमध्ये आपण आपलं जगणं, आपलं स्वास्थ्य आणि आपले चेहरे हे सगळं हरवत चाललेले आहोत. म्हणूनच मित्र हो, अशा काळात लिहिणारे लोक माझ्या मनात अपार कुतूहल जागृत करतात. या काळाला ते स्वतःच्या लेखनातून कसं चिमटीत पकडताहेत, आपली प्रतिक्रिया कशी देताहेत, हे मी सतत शोधत असतो. हे आव्हान पेलताना या लेखकांच्या मनामध्ये चाललेला कल्लोळ जाणून घेण्याची उत्सुकता असल्यामुळे या नव्या लिहिणाऱ्या बहुतेक लेखकांचं साहित्य मी अतिशय आवडीनं आणि शोधून शोधून वाचत असतो. कारण आपण सगळे लेखक, कवी अशा काळाचं अपत्य आहात, ज्याने वेगवेगळ्या दाबांनी आपलं भोवताल चेपून टाकलेलं आहे.

पुन्हा भरीला समाजमाध्यमांचा गोंगाटही आहे. यामध्ये आपण नव्यानंच अभिव्यक्त होणाऱ्या लोकांचा चेहरा बघतोय. या अभिव्यक्तीत काही सकस दिसतं आहे, तर बरंचंसं दाब आणणारं, निराश करणारं आणि मनाला सैरभैर करणारंही दिसतं आहे. अशा सैरभैर करणाऱ्या काळाला जेव्हा आपण प्रतिक्रिया देता, तेव्हा तुमच्यासमोर असणारे विविध पेच, अडचणी आणि आव्हानं या सगळ्यांकडं तुमची नजर वळवावी, असं मला वाटतं.

आज लिहिणाऱ्या लेखकांचं सातत्याने वाचत असताना काय जाणवतं? तर आज सगळ्या प्रकारच्या लेखनामध्ये येणारा स्वर एकसारखाच आहे. एखाद्या नव्या आणि मोठ्या क्षितिजाकडे जाणारी वाट शोधण्याऐवजी हे लेखन त्याच त्याच गोष्टींच्या आवर्तात सापडताना दिसतं. असं का होतं आहे, याकडे मला वाटतं आपण नव्या लिहिणाऱ्यांनी नीटपणे बघितलं पाहिजे; त्यामागची कारणं शोधली पाहिजेत.

मित्र हो, आज लिहिणाऱ्यांच्या समोरचे प्रश्न बदललेले आहेत. म्हणजे ज्या वेळी आम्ही नव्याने लिहीत होतो, त्या वेळी आमचं कोणी छापावं किंवा छापेल यासाठीसुद्धा आमच्याकडे व्यासपीठं नव्हती. आमचा संपूर्ण काळ पुण्या-मुंबईच्या व्यवस्थेनं एकारलेला आणि या शहरांनी प्रचंड दहशत निर्माण केलेला काळ होता. म्हणजे त्या काळात एखाद्या मासिकाची किंवा प्रकाशन संस्थेची अशी दहशत होती की, तिथे लिहिणाऱ्यांशिवाय बाकी कुणाला स्थानच नव्हतं. पण हा काळ आता राहिलेला नाही. आता कोणतंच, एकच एक मासिक आणि त्यामध्ये येणारं साहित्यच प्रतिष्ठित किंवा उच्च दर्जाचं किंवा त्यात लिहिणारा लेखकच चांगला लेखक, अशा प्रकारची समजूत पूर्णतः पुसून टाकली गेलेली आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक खुलेपणानं व्यासपीठाकडं जाता येतं.

तसंच आमच्या वेळी फक्त प्रिंट मीडिया किंवा मुद्रित माध्यम होतं. आता माध्यमांचे विविध प्रकार आपल्यासमोर उपलब्ध आहेत; आणि जिथं जिथं तुम्हाला व्यक्त होता येईल, अशा विविध ठिकाणी तुम्ही व्यक्त होऊ शकता. मुक्त संचार करण्याचं तुमचं जग तुम्हाला अधिक मोकळेपणानं अभिव्यक्त होण्यासाठी अवसर देतं आहे. पूर्वी जो प्रकाशन व्यवहार पुण्या-मुंबईमध्ये केंद्रित होता, तो संपूर्ण प्रकाशन व्यवहार सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. एवढंच नाही, तर आता तो अत्यंत गतिमानही झाला आहे. यामुळे प्रकाशन व्यवहार, मुद्रित माध्यमं किंवा नियतकालिकं वगैरे यांमधून लेखकाची कोंडी होण्याची शक्यता आता उरलेली नाही. वेगवेगळ्या ठिकाणांहूनही लिहिणाऱ्या लेखकाला त्याच्या त्याच्या ठिकाणी राहून उत्तम पद्धतीची निर्मिती करता येते आणि ती सर्वदूर लोकांच्यापर्यंत पोहोचवता येते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

म्हणजे आज मराठीमध्ये कितीतरी नवे लेखक आदिवासी पट्ट्यातून येताहेत. महाराष्ट्रातला असा एकही कानाकोपरा नाही की, जिथून हे नवे लिहिते तरुण आपल्यासमोर येत नाहीत. हा सगळा बदल आणि अगदी कानाकोपऱ्यांतल्या लेखकांच्या उत्तम लेखनाची नोंद घेतली जाणं, ही विशेष स्वागतार्ह गोष्ट आहे. कारण कधी काळी लोक लेखक व्हायला पुण्या-मुंबईत यायचे आणि ‘पुण्या-मुंबईत आल्यानंतरच लोक लेखक होतात’ असा एक समज त्या वेळी खेड्यापाड्यांत पसरलेला होता. पण हा समज आता पुसून गेला आहे. त्यामुळे असा हा मुक्त काळ मला अधिक महत्त्वाचा वाटतो.

आता मगाशी जे मी म्हटलं की, या काळाचे जसे फायदे आहेत, तसे या काळाचे काचही आहेत. ते काच तुम्ही सोसता आहात आणि तरीही आपापली प्रतिभा; आपलं अभिव्यक्त होण्याचं नवं, विकसित रूप शाबूत राखून आहात; त्याला कुठल्याही प्रकारचा दाब अथवा काच होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहात, याचं मला कौतुक वाटतं. यामुळे मला मराठीमध्ये उद्याच्या काळात कितीतरी सशक्त लेखक, कितीतरी सशक्त कादंबरीकार, कवी हे सगळे पाहायला मिळतील, अशी आशा वाटते. कारण मी जे नव्या लोकांचं वाचतो आहे, त्यांच्यामध्ये दिसणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे उन्मेष आहेत, ते सगळे मला कधी कधी भारावून टाकतात. ‘ही मुलं किती वेगळ्या प्रकारानं नव्या आकृतीबंधाच्या शोधात सुटलेली आहेत’, असं मला अनेकदा वाटतं.

पण हे सगळं जरी कौतुकाचं असलं, तरी त्याच वेळी तुमच्या पुढ्यातले पेचही मला दिसतात. म्हणजे ‘थांबणं’ ही गोष्ट दुरापास्त झाल्यानं, आज जो लिहितो आहे, त्याला असं वाटतं की, ‘माझं उद्या पुस्तक यावं’. उद्या पुस्तक आलं की, त्याला असं वाटतं की, ‘प्रत्येकानं आपल्या पुस्तकाची दखल घेतलीच पाहिजे’. म्हणजे नव्या लिहिणाऱ्याला हे एक नवं, काहीतरी त्या काळानंच दिलेलं आहे की, त्याला थांबायला किंवा वाट पाहायला सवडच उरलेली नाही. त्यामुळे तो अत्यंत अधीर झालेला आहे; आणि या अधीरतेमुळे त्याच्या निर्मितीवर काहीतरी परिणाम होईल, हे भय वाटतं.

आता हे अधीरपण जर सोडायचं असेल, तर मगाशी मी जो मुद्दा मांडला की, आपल्या काळात जो अवकाश उपलब्ध नाही - चिंतनशीलतेचा अवकाश - तो चिंतनशीलतेचा अवकाश आपण सतत शोधत राहिलं पाहिजे. हा अवकाश ज्याला ज्याला शोधता येईल, त्याला त्याला धीरानं आणि अतिशय अभ्यासून प्रकटावं, असं वाटत राहील. मग कोणी त्याच्या साहित्याची दखल घेवो अथवा न घेवो, पण त्याला असं वाटत राहील की, ‘मला माझ्या पद्धतीनं उत्तम लिहायचं आहे; उत्तम निर्मिती करायची आहे’. त्या निर्मितीची दखल कोण घेतं आहे, कोण घेत नाही, यासाठी अस्वस्थ होण्यापेक्षा, पाठीमागं जे लिहिलेलं आहे, त्यापेक्षा किंचित पुढं जाता येतं का, यासाठी तो स्वतःशीच बोलायला लागेल आणि स्वतःच्याच कृतींकडं अधिक गंभीरपणे बघायला लागेल.

मग ही चिंतनशीलता आणि हा हरवलेला अवकाश जर आपल्याला शोधायचा असेल आणि तो आपल्याला सापडावा, असं वाटत असेल, तर आपल्याला पाठीमागं कोणी काय लिहून ठेवलेलं आहे, आपल्या पूर्वपरंपरेमध्ये ज्ञानेश्वरापासून आणि त्याही आधीपासून कोणी काय लिहून ठेवलं आहे, आजपर्यंत या संपूर्ण परंपरेनं आपल्याला काय दिलेलं आहे, या सगळ्याकडे सजगपणे जाता येण्याची आपल्यापैकी प्रत्येकाची आकांक्षा असली पाहिजे.

म्हणजे ज्या लेखकाला उत्तम काही लिहायचं असेल, नवं काही निर्माण करायचं असेल, त्याला त्याच्या परंपरेचं भान असायलाच हवं. कारण कोणताही लेखक आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभा असतो. म्हणून त्याला खूप दूरचं दिसतं. पण ज्याला आधीच्या परंपरेकडंच गंभीरपणे जाण्याचा कंटाळा आहे, किंवा ‘मीच फक्त या भूमीत उगवलेला आहे’ अशा प्रकारचा ज्याचा समज आहे, त्याच्या लेखनाला मर्यादा पडणं क्रमप्राप्त आहे. म्हणून कोणत्याही लिहिणाऱ्यामध्ये त्याच्या-त्याच्या परंपरेचं एक सजग भान निर्माण व्हायचं असेल, तर आधी कुणी काय लिहून ठेवलंय, हे अधिक आस्थेनं आणि अधिक गांभीर्यानं वाचण्याचा प्रयत्न त्यानं केला पाहिजे.

हा प्रयत्न आपल्याला काय काय सुचवतो? आधीच्या लोकांनी जर इतकं करून ठेवलं असेल, तर आपल्याला पुढं जाण्यासाठी काय केलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे, याचा आपोआपच नकळत एक दाब निर्माण होतो आणि आपण अधिक सजग निर्मितीकडे वळतो.

जसं परंपरेचं भान असलं पाहिजे, तसं आपल्या समाजाचं म्हणून एक समाजशास्त्र माहिती असलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र हा गुंतागुंतीचा प्रदेश आहे. या महाराष्ट्राचं संपूर्ण समाजशास्त्र समजून घ्यायचं असेल, तर महाराष्ट्रातल्या विविध जाती, जमाती, त्यांचा एकूण असणारा जीवनव्यवहार या सगळ्याकडं पाहण्याची एक सजग दृष्टी आपल्यात असायला पाहिजे. तरच आपल्या आस्थेचा परीघ विस्तारत जाणार आहे आणि आस्थेचा हा परीघ विस्तारत गेल्यानंतर तुम्हाला अधिक काही चांगलं निर्माण करता येणार आहे.

जसं महाराष्ट्राचं समाजशास्त्र गुंतागुंतीचं आहे, तसा महाराष्ट्राचा इतिहासही गुंतागुंतीचा आहे. महाराष्ट्रातल्या या इतिहासाचं भान आपल्याला फक्त मराठा हिस्ट्रीमधून मिळतं असं नाही. म्हणजे राजा शिवछत्रपतीचं नाव आपण घेतो, पण आपला इतिहास किती घटनांनी आणि किती गुंतागुंतींनी गजबजलेला आहे! आणि आपला प्रदेश तर इतका विस्तीर्ण, तोही दऱ्याखोऱ्यांचा आहे. त्यामुळे या प्रदेशात एकाच प्रकारचं लोकजीवन अशक्य आहे. म्हणजे एका बाजूला भूगोल वेगळा आहे, इतिहास वेगळा आहे, समाजशास्त्र वेगळं आहे; त्यामुळे महाराष्ट्राच्या समजुतीही वेगवेगळ्या आहेत. हे सगळं जर लेखकाला पाहायचं असेल, तर त्याला त्याच्या पूर्वापार चालत आलेल्या लोकसाहित्याच्या ठेव्याकडंसुद्धा जाता आलं पाहिजे.

महाराष्ट्रातल्या माणसांचं मानसशास्त्र काय आहे? हे किती वेगळ्या प्रकारचे लोक आहेत! वऱ्हाडी माणसाचा स्वभाव काय आहे? मराठवाडी माणसाचा स्वभाव काय आहे? कोकणी माणसाचं जगणं काय आहे? म्हणजे एकाच वेळी विभिन्न प्रकारचा स्वभाव असणारा हा प्रदेश आहे. या प्रदेशाचं अन्नधान्यसुद्धा प्रदेशानुसार वेगवेगळं आहे. अगदी इथल्या सगळ्या पशुप्राण्यांचं जगणंसुद्धा एकसारखं नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणाल की, वऱ्हाडातला बैल आणि कोल्हापुरातला बैल यांत फरक काय आहे? तर आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगा आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा या सगळ्यांनी आपल्याला काहीतरी दिलंय, आणि जे दिलेलं आहे, ते समजून घेणं हे लिहिणारा म्हणून आपलं कर्तव्य असलं पाहिजे.

म्हणजे ज्याला संपूर्ण मराठी समूह आपल्या आस्थेच्या कवेत घेता आला, ज्याला संपूर्ण मराठी समूहाचं अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास हे समजून घेण्याची आकांक्षा आहे, आणि त्याबरोबरच ‘माझ्या काळानं मला काय काय द्यायला सुरुवात केलेली आहे’... या सगळ्याकडं जो लेखक अधिक गांभीर्यानं पाहील, त्याला काहीतरी नव्या निर्मितीचा नवा रस्ता दिसेल.

मित्र हो, महाराष्ट्राची परिस्थिती आज अशी झालेली आहे की, महाराष्ट्रातल्या कैक शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल लोक खूप बोलत गेले, पण ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्यापलीकडंसुद्धा एक दारिद्र्य या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांना अनेक प्रकारांनी छळतंय! त्यामुळे आज ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गाच्या दरीमध्येसुद्धा अनेक प्रकारचं अंतर निर्माण झालेलं आहे! म्हणजे शोषित, मजूर, दलित यांच्या जगण्याचे स्तर उंचावतील आणि सगळं जगणं सुखावह होईल, असं जिथं वाटत होतं, तिथं एक प्रकारची भीषण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नांदते आहे. आणि हे भीषण वास्तव समजून घेण्याचं नव्या लिहिणाऱ्यांना नेहमी अधिक कुतूहल वाटलं पाहिजे.

म्हणजे हे सगळे लोक मोठ्या मोठ्या आवाजात सांगतात की, ‘आता खेडं आणि शहर यांमध्ये काही फरक राहिलेला नाही. शहर आणि खेडं एकच झालेलं आहे’. किती चुकीच्या पद्धतीनं आणि निर्बुद्धपणे ही विधानं केली जातात! आज खेड्यांची काय अवस्था आहे? खेडी बकाल झालेली आहेत. खेड्यांतल्या घरांवर आता गवत उगवून त्या घरांचा विध्वंस झालेला आहे! या सगळ्या खेड्यांना स्वतःचा जीव तगवणंसुद्धा शक्य नाहीये.

मी तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातलं वर्तमान सांगतो. पश्चिम महाराष्ट्रातली, खेड्यापाड्यातली गोरगरिबांची घरं पुरुष वगैरे कोणी चालवत नाहीत; जगवत नाहीत. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातलं घर जे जगतं आहे, ते एक म्हैस जगवते आहे आणि दुसरी बाई जगवते आहे. ‘बाई’ आणि ‘म्हैस’ या दोघींनी ही खेडी जगवलेली आहेत. हे वास्तव इतकं विदारक आणि आपल्याला अस्वस्थ करणारं आहे! हे समजून घेणं नव्या लिहिणाऱ्यांसाठी महत्त्वाचं आणि अत्यावश्यक आहे. किंवा एका महानगरातही किती नगरं लपलेली आहेत! म्हणजे खेड्यापाड्यातली, बकाल वस्तीतली मुलं जेव्हा महानगरात जातात, तेव्हा त्यांची झोपडपट्टीतली जागा आणि त्यांचं जगणं हे त्यांच्या संसारात काय प्रकारचं वादळ निर्माण करतं? ती अस्वस्थता काय आहे?

थोडक्यात, आपलं शहरही आधीसारखं राहिलेलं नाही आणि खेडंही आधीसारखं राहिलेलं नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

तर मित्र हो, इतका चित्रविचित्र वर्तमान काळ तुमच्यासमोर आहे आणि हा वर्तमान काळ समजून घेतल्याशिवाय तुम्हाला नवीन, भरीव असं काही करता येईल, असं मला वाटत नाही. तुम्ही इतके ज्ञानी आहात, इतके कुशाग्र बुद्धीचे आहात की, या सगळ्याकडं अतिशय गंभीरपणे बघाल. ‘नाही रे’ वर्गाच्या जगण्याविषयी तुमच्या मनात कुतूहल, आस्था निर्माण होईल आणि त्या लोकांच्या व्यथावेदनांची कुठं ना कुठंतरी एखादी आर्त हाक तुमच्या शब्दांमध्ये येईल; ती यावी.

मित्रांनो, तुम्ही खूप चांगलं लिहाल; महाराष्ट्राला अधिक पुढं घेऊन जाणारं, मराठी भाषेला अधिक समृद्ध करणारं आणि आपल्या भाषेचा ठसा संपूर्ण भारतीय भाषांमध्ये अधिक ठळक करण्याचा प्रयत्न करणारं तुम्ही लिहावं.

आपण माझं ऐकून घेतलंत याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! तुमच्या इथून पुढच्या कार्यक्रमांना माझ्या शुभेच्छा!

शब्दांकन – भाग्यश्री भागवत

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा