करोना विषाणूचा फैलाव वटवाघळांमुळे नैसर्गिकरित्या झाला की, चीनमधल्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार झाला, या प्रश्नाची उत्तरं शोधताना रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत
पडघम - विज्ञाननामा
आरती कुलकर्णी
  • वटवाघळांची काही छायाचित्रं
  • Thu , 24 June 2021
  • पडघम विज्ञाननामा वटवाघूळ Bat वुहान Wuhan कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus

जगभरात उद्रेक झालेल्या सार्स कोविड-२ या विषाणूबद्दलच्या संशोधनाची कहाणी सुरू होते... चीनमधल्या युनान प्रांतात असलेल्या एका उजाड खाणीपासून. नैऋत्य चीनमधल्या डोंगराळ भागात मोजियांगमधली ही तांब्याची खाण वापरात नसल्याने तिथं वटवाघळांची वस्ती होती. २०१२मध्ये चीनमधल्या काही कामगारांना या खाणीची सफाई करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. या कामगारांनी वटवाघळांची विष्ठा गोळा करून खाण स्वच्छ केली. पण या कामगिरीनंतर हे सहाही जण विचित्र प्रकारच्या न्युमोनियामुळे आजारी पडले आणि त्यातल्या तिघांचा मृत्यू ओढवला.  

या घटनेनंतर वुहानमधल्या विषाणू संशोधन प्रयोगशाळेतल्या शास्त्रज्ञांना या खाणीच्या परिसराची तपासणी करण्यासाठी बोलावण्यात आलं. शास्त्रज्ञांनी युनानमधल्या या गुहेतून वटवाघळांचे नमुने घेतले, तेव्हा त्यांना या वटवाघळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे करोना विषाणू आढळले. या कामगारांना बाधा झालेला विषाणू सार्स कोविड-२ मात्र नव्हता.

यानंतर वटवाघळांमध्ये आढळणाऱ्या करोना विषाणूंमुळे नेमके कोणकोणते आजार होऊ शकतात, या विषाणूची वाढ कशी होते, यावर या प्रयोगशाळेत संशोधन सुरू होतं. अशाच प्रकारच्या संशोधनातून ‘सार्स कोविड-२’ हा विषाणू तयार झाला, असं आता म्हटलं जातंय.  

करोनाचा उगम कुठे?

२०२०मध्ये जगभरात करोनाचा फैलाव वाढल्यानंतर वुहानमधल्या प्रयोगशाळेकडेच संशयाची सुई रोखली गेली होती. आता अमेरिकेतल्या ‘Wall Street Journal’, ‘Vanity Fair’ यांसारख्या नियतकालिकांमधून या गृहितकाला पुन्हा एकदा वाचा फोडण्यात आली आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

करोना विषाणूचा फैलाव वटवाघळांमुळे नैसर्गिकरित्या झाला की, चीनमधल्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार झाला, या प्रश्नाची उत्तरं शोधताना रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. करोना विषाणू नैसर्गिक आहे, असं म्हणणारे तज्ज्ञ आधी उद्भवलेल्या साथीच्या रोगांचा संदर्भ देतायत, तर हा विषाणू मानवनिर्मित आहे, असा दावा करणारे शास्त्रज्ञही तेवढ्याच प्रमाणात पुरावे मांडताना दिसत आहेत. यापुढे अशा विषाणूंचा सामना करण्याची वेळ मानवजातीवर येऊ नये, यासाठी करोनाचा उगम नेमका कुठे झाला, हे शोधणंही गरजेचं बनलं आहे.  

वटवाघळांची गुहा

करोनाच्या उगमाबद्दल कोणताही ठोस निष्कर्ष अजूनही निघालेला नाही. सार्स कोविड–२ हा विषाणू नैसर्गिक स्वरूपात कुठेही आढळलेला नाही. असं असलं तरी करोना विषाणूमुळे जगभरातल्या वटवाघळांच्या प्रजाती संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. डिसेंबर २०२०मध्ये बीबीसीने पत्रकारांच्या एका गटाला चीनमधल्या त्या वटवाघळांच्या खाणीच्या परिसरात पाठवलं होतं, पण तिथल्या तपासणी नाक्यावरून या पत्रकारांना परत पाठवण्यात आलं. तिथल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून ते नेमके कुठे जातायत, याचाही माग घेतला. यामुळे तर चीनमधल्या या गुहेमध्येच करोना विषाणूची भयानक रहस्यं दडली आहेत का, हा प्रश्न विचारला जातोय.

चीनची बॅट वुमन

वटवाघळं आणि करोना या कहाणीच्या केंद्रस्थानी चीनमधली ही गुहा आहे, तसंच आणखीही एक व्यक्ती या कहाणीमधली महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. ती म्हणजे वटवाघळांच्या संशोधनाबद्दल ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं, त्या चीनच्या ‘बॅट वुमन’ शी जिंग ली. जगभरात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर वुहानमधल्या या विषाणू संशोधन प्रयोगशाळेकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. पण सार्स कोविड-२ आणि आमच्या प्रयोगशाळेचा कोणताही संबंध नाही, असं शी जिंग ली यांनी तेव्हाच जाहीर करून टाकलं होतं. 

‘बॅट वुमन’शी जिंग ली

एवढंच नव्हे तर ‘नेचर’ या विज्ञानविषयक मासिकात करोना विषाणूच्या नैसर्गिक उगमाबद्दल एक लेख प्रकाशित झाला होता. यामध्ये करोना विषाणू वटवाघळांमधून खवले मांजरामध्ये आणि खवले मांजरामधून माणसांमध्ये पसरला, असं म्हटलं होतं. पण वटवाघळं आणि तस्करी झालेल्या खवले मांजरांमध्ये आढळलेला करोना विषाणू आणि सार्स कोविड-२ यांच्यात १०० टक्के साम्य आढळलं नव्हतं, हेही आपण लक्षात घ्यायला हवं.

करोना विषाणू हा Z00N0TIC व्हायरस आहे, म्हणजे तो प्राण्यांमधून माणसांमध्ये येतो. हा विषाणू वुहानमधल्या वेट मार्केटमधून पसरला, यावरच सुरुवातीला भर देण्यात आला होता. चीनमध्ये वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. या प्राण्यांची वुहानमधल्या या बाजारपेठेत मोठी विक्री होते. यातूनच करोनाचा संसर्ग झाला, अशी सगळ्यांची धारणा होती. पण वुहानमधल्या ज्या वेट मार्केटचा इतका गवगवा झाला, त्याच वुहानमध्ये विषाणू संशोधन प्रयोगशाळा आहे, या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. आता मात्र करोना विषाणू मानवनिर्मित आहे, या गृहितकाला पुष्टी देणारे पुरावे गुप्तचर यंत्रणा, पत्रकार आणि शास्त्रज्ञांच्या हाती लागले आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

वुहानमधल्या विषाणू संशोधन प्रयोगशाळेतल्या शास्त्रज्ञांनी वटवाघळांमधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या करोना विषाणूंचं रोपण उंदरांच्या शरीरात केलं आणि करोना विषाणूची वाढ नेमकी कशी होते, याचा अभ्यास सुरू केला, असाही एक कयास आहे.

वटवाघळांच्या १४०० प्रजाती   

जगभरात वटवाघळांच्या सुमारे १४०० प्रजाती आहेत. यातली ८० टक्के वटवाघळं ही कीटकभक्षी आहेत, तर २० टक्के वटवाघळं फलाहारी आहेत. वटवाघूळ असं म्हटलं जातं की, दिवसभर झाडाला लटकणारी आणि रात्री उडणारी वटवाघळं आपल्या डोळ्यासमोर येतात. ही FLYING FOX नावाची फलाहारी वटवाघळं आपल्याला परिचित आहेत. पण याशिवाय भारतात वटवाघळांच्या १२३ प्रजाती आहेत. त्यातल्या बहुतांश प्रजाती कीटकभक्षी आहेत. ही वटवाघळं गुहा, पडिक इमारती, किल्ल्यांवरच्या भग्न इमारती, अशा ठिकाणी राहतात. या वटवाघळांचं जग अदभुत आणि रहस्यमय आहे.

वटवाघळांचं वृक्षारोपण

वटवाघळांवर संशोधन करणारे डॉ. महेश गायकवाड यांच्याशी संवाद साधताना या उडणाऱ्या सस्तन प्राण्यांबद्दल अनेक रंजक गोष्टी कळतात. वटवाघळं त्यांचं अन्न द्रवरूपात मिळवतात. ती जेव्हा फळं खातात, तेव्हा त्यांच्यातला रस शोषून घेऊन चोथा बाहेर फेकून देतात. अशा फळांच्या बिया जमिनीवर पडून पुन्हा रुजून येतात. वड, उंबर, पिंपळ अशा झाडांची फळं ते खातात, तेव्हा त्यातला रस शोषून घेताना त्या बिया त्यांच्या पोटात जातात आणि विष्ठेद्वारे बाहेर पडून रुजून येतात. म्हणजे वटवाघळं नवी झाडं लावण्याचं आणि जंगलं वाढवण्याचं मोलाचं काम करत असतात. कीटकभक्षी वटवाघळं कीटकांच्या संख्येवर नियंत्रण राखतात. फक्त ही सगळी कामं ते रात्री करतात आणि त्यामुळे त्यांचं पर्यावरणातलं योगदान अंधारातच राहतं, असं डॉ. महेश गायकवाड यांना वाटतं. आपला सह्याद्री जो हिरवागार आहे, त्याचं श्रेय वटवाघळांनाही द्यायला हवं, असंदेखील त्यांचं म्हणणं आहे.

रक्तपिपासू वटवाघळं

याच सह्याद्रीमध्ये ‘पेंटेड बॅट’ नावाचं रंगीत वटवाघूळही आढळतं. हे वटवाघळ रानकेळीसारख्या गर्द झाडांच्या दाटीत राहतं आणि हेही कीटकभक्षी आहे. काही वटवाघळं रक्त पितात, असंही वन्यजीवतज्ज्ञांना आढळलं आहे. ही वटवाघळं भारतात आढळत नाहीत. अ‍ॅमेझानच्या जंगलात अशा रक्तपिपासू वटवाघळांच्या तीन प्रजाती आहेत. ही वटवाघळं सस्तन प्राण्यांमधलं रक्त शोषून घेऊन चोचीतून पिल्लांसाठीही घेऊन जातात!

वटवाघळांवर संशोधन करणारे डॉ. महेश गायकवाड

वटवाघळं हे दाटीवाटीनं राहणारे सस्तन प्राणी आहेत. गुहांमध्ये, पडक्या इमारतींमध्ये अंधारलेल्या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या विषाणूंची वाढ होते. अशा गुहांमध्ये जाऊन वटवाघळांचे नमुने तपासले तर त्यांच्यात कोणते ना कोणते विषाणू आढळणारच आहेत, पण त्यामुळे सगळीच वटवाघळं माणसांना घातक आहेत, असं नाही, हे डॉ. महेश गायकवाड ठासून सांगतात.

वटवाघळं आणि निपाह

अलीकडेच पुण्यामधल्या NIVच्या शास्त्रज्ञांना महाबळेश्वरमधल्या गुहेत एका वटवाघळामध्ये निपाह विषाणू आढळून आला आणि त्यामुळे एकच खळबळ माजली. पण करोना विषाणूचे जसे वेगवेगळे प्रकार आहेत, तसेच निपाह विषाणूचेही आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं.

निपाह विषाणूमध्ये हेनिपाव्हायरस हा विषाणू सर्वांत घातक आहे, पण हा विषाणू महाबळेश्वरमधल्या वटवाघळांमध्ये आढळून आलेला नाही. हा विषाणू मलेशिया, व्हिएतनाम आणि चीनमधल्या वटवाघळांमध्ये आढळतो. काही वर्षांपूर्वी केरळमध्ये झालेला निपाह विषाणूचा फैलाव मलेशियामधून आला होता. भारतातल्या वटवाघळांमुळे विषाणूंची बाधा झाल्याची घटना अजून घडलेली नाही, असंही डॉ. महेश गायकवाड यांनी नमूद केलं आहे.

मागच्या वर्षी भारतात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी भारतातल्या वटवाघळांचे नमुने तपासले होते. या वटवाघळांमध्ये करोना विषाणू जरूर आढळले, पण हे विषाणू आणि सार्स कोविड-२ यामध्ये कोणतंही साधर्म्य आढळलं नाही.  

वटवाघळांची सुप्तावस्था

चीनमधल्या वटवाघळांच्या अभ्यासात आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली, ती म्हणजे वटवाघळं सुप्तावस्थेतही जातात. २०१९मध्ये जेव्हा चीनमध्ये करोनाचा संसर्ग झाला, तेव्हा युनान प्रांतातली वटवाघळं सुप्तावस्थेत होती. शिवाय ती वटवाघळं ५० किमीच्या हद्दीबाहेर उडतही नव्हती, हेही सिद्ध झालं. त्यामुळे युनानमधल्या वटवाघळांनी उडून येऊन वुहानमध्ये करोनाचा फैलाव केला असावा, या म्हणण्यात तथ्य नाही, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

डॉ. महेश गायकडवाड सांगतात, आपल्याकडे नियंत्रित तापमानात वटवाघळांना सुप्तावस्थेत जाण्याची गरज नसते. वटवाघळांनी गुहेबाहेर येऊन किंवा झाडावरची लटकती अवस्था सोडून काही खाल्लं नाही, तर दोनतीन दिवसांत त्यांची उपासमार होऊ शकते. पण बर्फाळ प्रदेशात गोठवणाऱ्या हिवाळ्यामध्ये वटवाघळं टिकाव धरू शकत नाहीत. अशा वेळी तापमान साधारण होईपर्यंत ती एकमेकांना चिकटून गुहांमध्ये एकवटतात. त्या काळात ती शरीरातली चरबी साठवून ठेवतात.

वटवाघळांचं स्थलांतर

वटवाघळं त्यांच्या राहण्याच्या जागेपासून मैलोनमैल स्थलांतर करत नाहीत. पण जंगलांचा ऱ्हास, वसतिस्थानांचा अभाव, यामुळे आता त्यांना नवेनवे अधिवास शोधणं भाग पडलं आहे. अशी वटवाघळं मानवी वस्तीतल्या पडक्या इमारती, अशोक, निलगिरी यासारखी उंच झाडं अशा ठिकाणी राहू लागली आहेत. तिथेच माणसांचा त्यांच्याशी संपर्कही वाढत चालला आहे आणि वटवाघळांपासून वेगवेगळ्या विषाणूंची बाधा होण्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे.

याआधी नोव्हेंबर २००२मध्ये सार्स विषाणूचा फैलाव चीनमध्येच झाला होता. हा विषाणू HORSE SHOE BAT नावाच्या वटवाघळापासून पाम सिव्हेटमध्ये आला. तिथून त्याचा संसर्ग माणसांना झाला, असं तज्ज्ञांना आढळून आलं. त्यानंतर २०१२मध्ये MERS रोगाचा फैलाव झाला. हा विषाणूही वटवाघळांमधून उंटांमध्ये आणि उंटांमधून माणसांमध्ये आला, असं संशोधन सांगतं.  

वटवाघळं आणि विषाणू

वटवाघळांमध्ये एवढे विषाणू असताना त्यांना त्याची बाधा कशी काय होत नाही, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण वटवाघळांच्या शरीरातलं उच्च तापमान अशा विषाणूंना नियंत्रित ठेवतं. शिवाय वटवाघळं त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे या विषाणूंशी सामनाही करतात. त्यामुळे सगळीच वटवाघळं करोनासारख्या जीवघेण्या विषाणूंचा फैलाव करतात, असं म्हणणं चुकीचं ठरेल, असं डॉ. महेश गायकवाड यांचं म्हणणं आहे.

HORSE SHOE BAT

वटवाघळं आणि विषाणू याबद्दल संशोधन करताना वटवाघळांच्या वेगवेगळ्या प्रजाती, त्यांचा विशिष्ट प्रदेशातला आढळ या बाबी लक्षात घेऊन निष्कर्ष काढायला हवेत. चुकीची आणि अशास्त्रीय माहिती देऊन आपण लोकांची दिशाभूल तर करत नाही ना, याचंही भान शास्त्रज्ञांनी पाळायला हवं, असं ते सांगतात.

वटवाघळांचे शुभशकुन!

आपल्याकडे भारतात वटवाघळांबद्दल बरेच गैरसमज आहेत. वटवाघळांच्या विचित्र हालचाली, त्यांचं दिसणं, त्यांच्या रात्री उडण्याच्या सवयी यामुळे आपण त्यांना बिचकून असतो. त्यातच आता करोनाबद्दलच्या संशोधनामुळे आपल्याला वटवाघळं नकोशी झाली आहेत. ज्या चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाला, तिथेही वटवाघळांना शुभशकुन मानलं जातं. वटवाघळं ही भरभराटीचं प्रतीक आहेत, अशीही चिनी लोकांची धारणा आहे. पण तिथेही करोनामुळे वटवाघळांच्या अस्तित्वावर घाला आला आहे.  

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

करोनाच्या महामारीमध्ये काही ठिकाणी वटवाघळांना मारण्याच्या घटनाही घडल्या. पण वटवाघळांना मारून करोना विषाणू नष्ट होणार नाही. वटवाघळं नसतील तर हे विषाणू आणखी दुसऱ्या प्राण्यांमध्ये आसरा शोधतील आणि त्यांच्या संसर्गाचा धोकाही कमी होणार नाही, याकडे डॉ. महेश गायकवाड यांनी लक्ष वेधलं आहे.

वटवाघळांच्या मार्फत होणारं परागीभवन, बीजारोपण, कीटकांवर नियंत्रण या गोष्टी पाहिल्या, तर वटवाघळं आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. धनेशासारखे मिश्रहारी पक्षी, शिकारी पक्षी, साप यांचंही ते खाद्य आहेत. त्यामुळे निसर्गसाखळीमध्ये त्यांना निश्चित भूमिका आहे. करोनाच्या भीतीमुळे आपण वटवाघळांनाच नष्ट करू लागलो, तर पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोकाही आहे.

शिवाय माणसांना होणारे कॅन्सरसारखे जीवघेणे आजार, वयोमानानुसार शरीरात होणारे बदल या समस्यांवर उपाय काढण्यासाठीच्या संशोधनात वटवाघळांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, हेही विसरून चालणार नाही, याची आठवण ते करून देतात.

वटवाघळांपासून होणाऱ्या विषाणूंची बाधा रोखायची असेल तर वटवाघळांचे मूळ अधिवास जपायला हवेत आणि त्यांच्या वसतिस्थानातला माणसांचा हस्तक्षेप थांबवायला हवा, असंही त्यांना वाटतं. 

..................................................................................................................................................................

लेखिका आरती कुलकर्णी पर्यावरण-निसर्ग पत्रकार आहेत.

artikulkarni262020@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा