जोवर आपण करोनावर मनाने मात करत नाही, तोवर तो आपल्या अवतीभोवतीच फिरत राहील…
पडघम - देशकारण
डॉ. शुभदा राठी-लोहिया
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 17 April 2021
  • पडघम देशकारण कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus

सध्या करोनामुळे तुम्हीआम्हीआपणसगळेच संभ्रमित झालो आहोत. गेल्या वर्षभरातील अनुभवाने हा आजार बरा होऊ शकतो, हे अनेकांना माहीती झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी जी भीती लोकांमध्ये होती, त्यापेक्षा आताची भीती निश्चित कमी झाली आहे. परंतु सध्या करोनाचा संसर्ग जास्त मोठ्या प्रमाणात होत असल्याने लोक, डॉक्टर्स व प्रशासन सर्वच जण गोंधळलेल्या स्थितीत आहेत, असे चित्र गेल्या एक महिन्यापासून दिसते आहे.

एखाद्या व्यक्तीला जर करोनाचा संसर्ग झाला तर तिने नेमके घरी राहावे, की स्कॅन करावा, की रक्त तपासणी करावी, की लगेच दवाखान्यात दाखल व्हावे, याबद्दल वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत आणि प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या घाबरवणाऱ्या बातम्यांमुळे लोकांना निर्णय घेताना अडचणी येत आहेत. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांच्या अडचणी बघून नेमक्या मार्गदर्शक सूचना देणे जास्त इष्ट ठरेल, असे वाटते.

१. जर सर्दी अगर खोकला झाला असेल तर आपल्या डॉक्टरांना दाखवून औषधे घ्यावीत आणि दोन दिवस अति महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये.

२. दोन दिवसांनी जर बरे वाटले नाही, तर ‘कोविड अॅंटिजेन’ अगर ‘आरटीपीसीआर’ तपासणी करून घ्यावी.

३. तपासणीचा निष्कर्ष जर पॉझिटिव्ह असेल तर स्वतःची लक्षणे काय व कशी आहेत, यावर लक्ष ठेवावे. जर तुमचा ताप आटोक्यात असेल पण थोडा खोकला असे तर लगेच स्कॅन करून किंवा रक्त तपासून आजाराची तीव्रता कळत नाही. सीटी स्कॅन किंवा रक्त तपासणी ही ज्येष्ठ लोक किंवा ज्यांना इतर काही आजार आहेत, अशा लोकांसाठी उपयुक्त ठरतात. पण सध्या भीतीपोटी लहान-थोर सगळेच मंदिरात जसे डोके टेकायला येतात आणि ‘माझे भले कर’ म्हणून नवस बोलतात, तसे स्कॅन करायला गर्दी करत आहेत. अनेक वेळा डॉक्टरसुद्धा त्यांच्या तपासण्या करून घेताना दिसत आहेत. कारण डॉक्टर हादेखील सर्वसामान्य लोकांसारखाच एक माणूस आहे. त्याला वाटते- ‘मी स्कॅन करायला सांगितले नाही आणि उद्या काही झाले तर? लोक बदनामी करतील. त्यापेक्षा घेऊ स्कॅन करून.’ त्यामुळे जे बाधित आहेत किंवा नाहीत, अशांची सरमिसळ होत आहे. सीटी स्कॅन जर श्वासाचा दर १८ प्रति मिनिटापेक्षा जास्त असेल किंवा ऑक्सिजनची पातळी ९५ पेक्षा कमी असेल तरच करावा. त्यामुळे संसर्गाची तीव्रता लक्षात येते आणि उपचार करण्यासाठी योग्य दिशा मिळते. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

४. प्रसारमाध्यमांनी संसर्ग झालेल्या व्यक्तींना ऑक्सिजनचा तुटवडा किंवा एकाच वेळी अनेक लोकांवर होणारे अंत्यसंस्कार, या बातम्यांपेक्षा बरे होणारे, घरी राहून ज्यांनी योग्य उपचार घेतले, स्वतःची काळजी स्वतः घेतली, अशा रुग्णांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली तर त्यांच्यातील भीती कमी होईल. आणि सर्वजण या आजारावर मात करू शकतात, हा विश्वास वाढीस लागेल.

५. पूर्वी सर्दी झाल्यावर औषध घेतले नाही तर ती सात दिवसांत बरी होते आणि औषध घेतले तर आठवड्यात बरी होते असे म्हणत. करोनाची सर्दीदेखील आराम केला तर सात दिवसांत बरी होते, पण  काही जणांना ८ ते १० दिवस त्रास होऊ शकतो. करोना हा विषाणू जास्त तीव्र स्वरूपात शरीरावर परिणाम करतो. त्याचा संसर्ग १४ दिवसांपर्यंत इतरांना होऊ शकतो, म्हणून ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांनी घरी राहणे व शरीरात थकवा आहे, तोपर्यंत आराम करणे, हा प्राथमिक उपचार आहे.

६. अनेकदा असे आढळून येते की, जेव्हा असा प्राथमिक उपचार घ्यायला पाहिजे, त्या वेळी नेमकी भीतीपोटी संबंधित व्यक्ती सैरभैर होतात. सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या बातम्यांमुळे मानसिक शांतता नष्ट होते, जी आजार वाढण्यास कारणीभूत ठरते. ज्या काळात रुग्णाला आराम हवा असतो, त्या काळात नेमके विविध तपासण्या करण्यात रुग्ण गुंतून पडतात.

परिणामी शारिरीक थकवा वाढतो व आजार कमी तीव्रतेवरून जास्त तीव्रतेकडे झुकतो. अशा रुग्णांच्या बातम्या ऐकून इतरांची भीती वाढत राहते. नवीन रुग्णदेखील सैरभैर होतो आणि पुन्हा त्याच दिशेने वाटचाल होते. त्यातून एक न संपणारे भीतीचे चक्र तयार होते. पण खरी गरज आहे ती, हे चक्र खंडित करण्याची. लोकांना आश्वस्त करून त्यांना धीर देण्याची. यासाठी डॉक्टर, प्रशासन, समाज व प्रसारमाध्यमांनी पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

७. सीटी स्कॅन अगर रक्तातील आजाराची तीव्रता दर्शवणाऱ्या घटकांची तपासणी ही खोकला सुरू झाल्यानंतर केली तरच, त्याचा उपचारासाठी योग्य उपयोग होतो. अनेक जण सध्या सर्दी झाली की, लगेच या तपासण्या करत आहेत. त्यामुळे ज्या रुग्णांना खरोखर अशा तपासणीची गरज आहे, नेमकी त्यांना जागा मिळत नाही. त्यामुळे करोनाचा संसर्ग झाल्यावर संयमितपणे व विचारपूर्वक या तपासण्यांचा व औषधांचा वापर केल्यास अनेक विपरीत घटना टाळता येतील. उदा. हॉस्पिटलमध्ये बेड न मिळणे, रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता या गोष्टी घडणार नाहीत. रुग्ण इतर कोणत्याही आजाराने आजारी असल्यामुळे जरी दगावला तरी त्याचा करोनाच्या तपासणीत विषाणू दिसल्याने तो करोनाचा मृत्यू गृहित धरला जातो आणि गैरसमज वाढत जातात. त्यामुळे डॉक्टरांनी व प्रसारमाध्यमांनीदेखील अशा बातम्या देताना दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.

८. आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवणार्‍या मुलांच्या कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो. अशा मुलांना समाज बेजबाबदार या गटात टाकून नावे ठेवतो. आई-वडिलांची म्हातारपणाची जबाबदारी निभावणे हा संस्कार सर्वांमध्ये रुजणे महत्त्वाचे आहे. परवा एक बातमी वाचण्यात आली- ‘मातृप्रेमाखातर लपूनछपून वार्डमध्ये राहून केली आईची सेवा’. स्वतःच्या आईची जबाबदारी एखाद्याला लपूनछपून घ्यावी लागावी, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ही व्यक्ती जर चूकूनमाकून शासनाच्या निदर्शनास आली, तर त्यास आपत्ती व्यवस्थापनेचा गुन्हेगार मानले गेले असते. लहानपणापासूनचे केलेले संस्कार, आईबद्दलचे प्रेम या सगळ्या गोष्टी करोनाच्या भीतीमुळे आज मातीमोल झाल्या आहेत. आपल्या या कृत्याचे कौतुक नक्कीच होणार नाही, पण शिक्षा नक्की होईल, ही भीती बाळगत त्या व्यक्तीने हे केले, याचे कौतुक वाटले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आजारपणाच्या काळात ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी जर घरातील व्यक्ती सोबत असेल तर रुग्ण बरा होण्याची शक्यता ३० ते ३५ टक्क्यांनी वाढते. ज्या वयात काठी असल्याशिवाय फिरणे शक्य नसते, त्या वयात रोजच्या सोयीसुविधांची सवय सोडून नवीन ठिकाणी आजारपणात जुळवून घेणे कठीण असते. परंतु आज कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी शासनाकडे परवानगी घेण्याची वेळ आली आहे. सध्याच्या परिस्थितीत करोनाची तपासणी जर पॉझिटिव्ह आली तर ६० वर्षांवरच्या व्यक्तींना दवाखान्यात जाणे अनिवार्य आहे. दिल्ली सरकारने ऑगस्टपासून ज्यांच्याकडे योग्य काळजी घेण्याची सोय आहे, अशांना घरीच क्वारंटाईन होण्याची परवानगी दिली आहे. तेथील करोना संसर्गाची आकडेवारी पाहता ज्येष्ठांचा मृत्यूदर कमी झाला हे निदर्शनास आले आहे. एक फॅमिली फिजिशियन म्हणून ज्येष्ठांना दवाखान्यात ठेवणे अनिवार्य करणे, या गोष्टीचा पुनर्विचार व्हावा असे वाटते.

या सोबतच रुणांना व लोकांना आश्वस्त करणे महत्त्वाचे वाटते. जर सर्वच फिजिशियनना करोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी मिळाली, तर शासकीय दवाखान्यापर्यंत पोहोचणारे रुग्ण चाळणी होऊन येतील आणि त्यांना योग्य सेवा देणे सोपे होईल.

जोवर आपण करोनावर मनाने मात करत नाही, तोवर तो आपल्या अवतीभोवतीच फिरत राहील…

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. शुभदा राठी-लोहिया एम.डी. मेडिसन असून अंबाजोगाई येथे वैद्यकीय व्यवसाय करतात.

shubhada.lohiya@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 21 April 2021

नमस्कार डॉक्टर शुभदाताई !
लेख अतिशय समयोचित आहे. करोना हा सर्दीपडशासारखा 'रोग' आहे. फारतर फ्लू सारखा म्हणता येईल. सर्दीने वा फ्लू मुळे माणसं मरंत नसतात. सर्दीसाठी जर कोणी रुग्णालयाची खाट अडवंत असेल तर त्यामुळे खरी गरज असलेल्या रोग्यांना उपचार मिळंत नाहीत. हे तुमचं निरीक्षण अगदी समर्पक आहे. पण लक्षांत कोण घेतो.
करोनाचं थोतांड सुरू झाल्यावर ही भीती मी गेल्या वर्षी एके ठिकाणी ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1067251#comment-1067251 ) वर्तवली होती. या मुद्द्याला तुमच्यासारख्या जाणकारांकडून पाठबळ मिळू लागलंय हे स्वागतार्ह आहे. गंभीर आजार असेलल्या रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावेत यासाठी तुमच्यासारख्या डॉक्टरांनी आवाज उठवणं अत्यावश्यक आहे. धन्यवाद !
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा