आता आपण ‘मोदी स्वयंसेवक संघ’ म्हणायला हरकत नाही, हो ना होसबळे?
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • संघसरकार्यवाह दत्ताजी होसबळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Thu , 25 March 2021
  • पडघम देशकारण दत्तात्रेय होसबळे Dattatreya Hosabale नरेंद्र मोदी Narendra Modi राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS

गेला आठवडा साऱ्या पत्रकारांना एक बातमी द्यावी लागली. खूप प्रसिद्धी त्या घटनेला दिली गेली. जणू शतकात एखादी घटना घडावी तशी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा बंगलुरात भरणार असून तीत नवा सरकार्यवाह निवडला जाणार (की नाही?) अशा आशयाची ती बातमी. राष्ट्रसेवा करण्यात चूर असल्याने प्रसिद्धीच्या बाबतीत खूप लाजाळू असणाऱ्या संघाने मग ही सभा म्हणजे काय, ती कधी भरते, कार्यक्रम काय असतो, निवड कशी होते, इत्यादी माहिती लाजत लाजत पण भरभरून प्रत्येकाच्या मापट्यात ओतली.

झाले!, दत्ताजी होसबळे सरकार्यवाह झाले! त्यांच्या अल्पचरित्रासह सर्वत्र एक परिचयही प्रसिद्ध झाला. हे होसबळे बळेबळे नव्हे, तर स्वबळे पंतप्रधान मोदी यांचे मित्र, चाहते, अनुयायी, प्रशंसक आहेत म्हणे! त्यांनी सरकार्यवाह व्हावे म्हणून मोदी २०१५ व २०१८मध्येही खटपट करून गेले. पण तोवर राममंदिर आणि काश्मीर यांचा तिढा सुटलेला नव्हता. तो सुटला म्हणून मोदींना बक्षिसाच्या रूपे होसबळे पावले! मोदींनी आपला माणूस तर घुसवला, पण महाराष्ट्रीय ब्राह्मणांच्या संख्येत घट करवून वेगळे ब्राह्मण संघाच्या खुर्च्यांवर बसवायला सुरुवात केली, असेही कोणा संघद्वेष्ट्याने म्हटले. सुरेश उर्फ भय्याजी जोशी इंदुरकर असले तरी महाराष्ट्राशी त्यांचा जुनाच घरोबा आहे. संघातल्या लढाया अशा असतात तर!

होसबळे कराडे ब्राह्मण आहेत की नाहीत ते ठाऊक नाही. कारण सरसंघचालकांसाठी ही जात स्पेशल असते. काही वर्षांनी होसबळे स्वबळे भागवतांना हटवून तिथे बसले तर तीही एक क्रांती झाली म्हणावी…

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आता गंमत पाहा. ‘होसबळे इलेक्टेड’ अशा बातम्या छापून आणल्यावर किती मते पडली, प्रतिस्पर्धी कोण होते काय, कोणी तटस्थ बसले होते काय, विरोधात किती मते पडली, मतदान कोणत्या पद्धतीने पार पडले, अशी माहिती ना कोणा पत्रकाराने दिली, ना कोणी मागितली. संघ नेहमी अशी धूळफेक करत आलेला आहे. आजकालच्या पत्रकारांना ताटात पडेल ते खायची सक्ती असल्याने त्यांना सांगितले तेवढे द्यावे लागते. निवड तर निवड! होसबळे यांचा बायोडाटा तयार असल्याप्रमाणे सर्वत्र तो जसाचा तसा प्रसिद्ध झाला. ‘गोदी मीडिया’सारखा ‘गोदी संघिया’ हा शब्द बहुधा होसबळे रूढ करणार. काय करणार, सर्व माध्यमांत या दोघांचे चांगले जमते, अशा बातम्या पेरण्यात आल्यावर? याचा अर्थ मोदी (आणि शहा) संघाचे फार आवडते नेते नाहीत की काय?

आणखी एक माहिती मुद्दाम दिली गेली जणू. ती ही की, सरकार्यवाह हे पद संघाचे क्रमांक दोनचे असून त्यावरील व्यक्ती संघाचा सारा कारभार, कार्यक्रम आखत असते. हेही आवर्जून सांगितले गेले की, होसबळे यांना मुख्यमंत्री येडियुरप्पा नको आहेत. एक कन्नडिग असल्याने होसबळे पुढे शेजारच्या दक्षिण राज्यात संघाचा प्रसार करणार वगैरे वगैरे.

दत्ताजी होसबळे अनेक वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करायचे, असे त्यांच्याबाबतच्या प्रचारपत्रात सांगितले आहे. म्हणून त्यांचा तरुणांशी, विद्यार्थ्यांशी जुना संबंध असल्याचा फायदा मोदींना घ्यायचा आहे, असाही संघातल्या राष्ट्रभक्तांचा दावा आहे. या दाव्यासह हळूच एक आकडेवारी पुरवण्यात आली. ती म्हणजे शाखा आणि मोदी यांच्याकडे तरुण पिढीचा ओढा कसा आहे त्याची. शाखांमध्ये सध्या तरुणांची म्हणजे ४०च्या आसपास वय असलेल्या हिंदूंची उपस्थिती जास्त असते आणि प्रतिनिधी सभेतही ५०च्या आतबाहेर असणारे बव्हंश आहेत. खेरीज होसबळे बौद्धिकांच्या प्रक्रियेतलेही एक कारभारी होते. त्यामुळेच त्यांनी घडवलेले अनेक जण अजूनही संघात टिकून आहेत. सबब मोदींना होसबळे हवे आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘News18’च्या वेबसाईटवर होसबळेंसंदर्भात डी. पी. सतीश यांनी थोडी गमतीदार माहिती दिली आहे. एच. एस. दत्तात्रेय अशा मूळ नावाचे रूपांतर दत्ताजींनी गावाच्या नावानुसार दत्ता होसबळे असे करून टाकले. त्यांच्या गावापासून अंदाजे १० किमीवर असणाऱ्या कागोडू गावात देशातला पहिला भूमिहिनांचा अहिंसक सत्याग्रह जमीनदारांविरुद्ध उभा राहिला. होसबळे व कागोडू या परिसरात १९५०च्या दशकात समाजवादी पक्ष जोरात होता. डॉ. राममनोहर लोहिया या सत्याग्रहाचे नेतृत्व करायला आले होते. पण दत्ताजींनी समाजवादी वातावरण झुगारून संघात जाणे पसंत केले. त्यांचा स्वभाव मात्र समाजवादी, साम्यवादी अशा त्यांच्या जुन्या मित्रांशी मोकळेपणाचा असतो. इंग्रजी साहित्याची पदवी त्यांच्यापाशी आहे. साहित्यात त्यांना गोडी आहे. त्यांचे वाचनही चांगले आहे. होसबळे यांचे इंग्रजी उत्तम आहे. त्यांच्या बऱ्याच व्हिडिओ क्लिप्स युट्युबवर उपलब्धही आहेत. विशेषत: इंडिया टुडेच्या अनेक कार्यक्रमांत होसबळे झळकलेले दिसतात.

याचा अर्थ गेल्या पाच-सात वर्षांत संघाने सर्व माध्यमांत शिरकाव तर केलाच, शिवाय आपल्याला हवे तेच बोलून प्रतिप्रश्न करणाऱ्याला चूप करण्याची युक्तीही आत्मसात केली. म्हणजे ‘मुख्यमंत्री तीर्थसिंह रावत यांनी फाटक्या जीन्सबद्दल जे मूर्खपणाचे विधान केले, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय?’, असे विचारता होसबळे म्हणाले, ‘याचे उत्तर द्यायला ते मुख्यमंत्री समर्थ आहेत! प्रत्येक प्रश्न संघाशी भिडवू नका!’ हे मुख्यमंत्री एवढे मूर्ख आहेत की, त्यांनी लगेचच्या भाषणात ‘अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केले’ असे अकलेचे तारे तोडले! एकेकाळचे संघाचे बौद्धिक प्रमुख जर अशी पैदास करणारे असतील तर संघाचे बौद्धिक दारिद्रय, दिवाळखोरी आणि दशावतार लवकरच जगाला पाहायला मिळतील…

अवतारावरून आठवले, महाराष्ट्र भाजपचे एक बेछूट प्रवक्ता अवधूत वाघ यांनी पंतप्रधान मोदी विष्णूचा ११वा अवतार असल्याचे २०१८मध्ये घोषित केले होते. एवढ्यात म्हणजे १९ मार्च २०२१ रोजी हिमाचल प्रदेशचे नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाज यांनीही मोदी भगवान शिवाचा अवतार आहेत, असे जाहीर केले. आणखी एक. अरुणाचल प्रदेशचे भाजप खासदार तपीर गाओ (Tapir Gao) यांनासुद्धा मोदी परमेश्वराचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाला आहे. दुसरे एक खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल (Jamyang Tsering Namgyal) यांनी मोदी युगपुरुष असल्याची आरोळी ठोकली. आश्चर्य हे की, तपीर यांनी मोदींना अवताराची उपमा चक्क लोकसभेत चर्चेच्या वेळी दिली! असे हे नेते. मोदी दाढी केस वाढवू लागताच, ही वर्णने होऊ लागल्याचे हे लक्षण नाही. सर्व पातळ्यांवर सपशेल नापास झालेला एक नेता आता या वर्णनांनी आणि त्या अपप्रचाराने आपली प्रतिमा आणखी अढळ करत निघालाय. लोकांना त्याला पाडले तर देशाचेच नुकसान होणार, असे भय दाखवणे चाललेय. लोकही हिंदू भक्तीभाव जागृत होऊन मोदी व त्यांचा पक्ष जिंकून देत राहताहेत.

एकंदर होबसळे यांनाही आपल्या मित्राचा उदोउदो करायलाच निवडले गेले आहे, हे आता देशाला वारंवार उमजणार. एक राहिलेच. मोदींवर टीका करणे म्हणजे देशावर टीका करणे होय, असाही प्रचार सुरू झालेला आहे. बातम्यांत मोदी, प्रचारात मोदी, जाहिरातींत मोदी असे ईश्वरासमान चराचरांत मोदी म्हटल्यावर दुसऱ्या कोणत्या उपमा या ढोलपिट्यांना सुचणार? ट्रम्प नव्हे का मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ आहेत असे म्हणाले? ‘मोदी इज इंडिया, मोदी म्हणजे भारत’ वगैरे अफाट तुलनांचा हेतू त्यांना हुकूमशहा या नात्याने प्रस्थापित करण्याचा तर आहेच, पण त्याखेरीज एक संघस्वयंसेवक राष्ट्र म्हणून दाखवत राहण्याने संघाने देश कसा काबीज केला, त्याची अप्रत्यक्ष पताका फडकावणे होय.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सबब ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे नाव बदलून ‘मोदी स्वयंसेवक संघ’, ‘नमो स्वयंसेवक संघ’, ‘प्रधानसेवक स्वयंसेवक संघ’ यापैकी एखादे नाव संघाने निवडावे, अशा सूचना संघद्वेष्ट्यांकडून येऊ लागल्या आहेत. द्वेष्टेच ते, त्यांना देशासाठी मोदींनी केवढा त्याग केला, याची काय कल्पना? एकदाही तुरुंगात न जाता, एकही आंदोलन न करता, एखादाही सत्याग्रह न करता हा मनुष्य थेट मुख्यमंत्री होतो आणि नंतर १३ वर्षांनी थेट पंतप्रधान बनतो, हे खरोखर अदभुत असल्याने संघाने आपले अस्तित्व मोदींमध्ये मिसळून टाकावे, असेही हे द्वेष्टे म्हणत आहेत.

तसे पाहता संघाचाही आंदोलने, सत्याग्रह, चळवळी, मोर्चे, जेल भरो वगैरेवर विश्वास नाही. एक प्रश्न आहे- कट, कपट, कावे, कारस्थाने यांतूनच विकसित होणाऱ्या संघटनेचे रूप राष्ट्रीय कसे असेल? कोणतेही राष्ट्र असे कपटी आणि कटबाज कसे असू शकते? व्यक्ती असतात तशा. म्हणून एक आदर्श कटप्रवीण, कपटपटू व्यक्तीचे नाव देऊन आत्मगौरव साधायला हवा, असे हे द्वेष्टे म्हणतात. त्यात दोन दोस्त आता कारभारी झाले. मग काय, इकडचे कार्यक्रम तिकडे अन तिकडचे इकडे! लोकांच्या लक्षातही येणार नाही, सरकार कोणते आणि संघ कोणता…

होसबळे खासब‌ळे झाल्यावर हे व्हायलाच हवे. बाय द वे, ‘नरेन्द्रम स्वयंसेवक संघ’ हे नाव कसे आहे अण्णा?

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख