सदा डुम्बरे हे जसे अतिशय उत्तम संपादक होते, तसेच ते अतिशय सहृदय अशी व्यक्ती होते
पडघम - माध्यमनामा
संध्या टाकसाळे
  • सदा डुम्बरे आणि साप्ताहिक सकाळचे काही अंक
  • Tue , 16 March 2021
  • पडघम माध्यमनामा सदा डुम्बरे Sada Dumbre साप्ताहिक सकाळ Saptahik Sakal नानासाहेब परुळेकर Nanasaheb Parulekarश्री. ग. मुणगेकर S. G. Mungekar सदानंद मोरे Sadanand More

‘साप्ताहिक सकाळ’चे माजी संपादक सदा डुम्बरे यांचे २५ फेब्रुवारी २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्याबरोबर तब्बल २० वर्षे सहसंपादक व कार्यकारी संपादक या नात्याने कार्यरत राहिलेल्या संध्या टाकसाळे यांनी लिहिलेला हा लेख...

..................................................................................................................................................................

विद्या बाळ आणि सदा डुम्बरे या दोघांनाही इतक्या लागोपाठ, एका वर्षांच्या आतच निरोप द्यावा लागेल, असं क्षणभरही कधी वाटलं नव्हतं. ‘स्त्री’ मासिकात विद्या बाळ आणि ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये सदा डुम्बरे यांच्याबरोबर काम करायला मिळाल्यानं माझी पत्रकारिता अर्थपूर्ण झाली. दोघेही आपापल्या परीनं वैशिष्ट्यपूर्ण पत्रकारिता करत होते. पत्रकारितेतून सामाजिक बदल घडू शकतात, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. दोघेही पुरोगामी, लोकशाहीवादी आणि उदारमतवादी होते. आताच्या काळात हे किती दुर्मीळ झालंय, हे आपण रोज बघतो.

आणि डुम्बरे यांना तर फारच अकाली, अचानक निरोप द्यायला लागला. निरोप तरी का म्हणायचं त्याला? निरोप देण्या-घेण्याचा अवसर तरी कुठे मिळाला? त्यांचं अकाली जाणं जेवढं धक्कादायक आणि वाईट होतं, तेवढंच ते वेदनादायकही होतं. वेदनादायक अशासाठी की, करोनाने झडप घातल्यावर, त्यांना कुणीही भेटायला जाऊ शकत नव्हतं. शेवटचा पूर्ण प्रवास अगदी एकट्याने झाला. म्हणजे आपण म्हणतो की - कुठल्या तरी दूर परक्या गावात एखाद्याला मृत्यू आला, एकटेपणाने आला तर ते किती भयानक असतं. पण इथे करोनानं जे घडवलंय, ते त्याहूनही भयानक आहे. तुम्ही तुमच्या देशात आणि गावात असता, तुमच्या कुटुंबात असता, तुमचे असंख्य मित्रमैत्रिणी आणि सहकारी त्याच गावात असतात; पण ते तुम्हाला भेटू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत. शेवटचा निरोपही देता येत नाही.

सदा डुम्बरेंनी चांगल्या आठवणींचं झाड मात्र अनेकांच्या मनात लावलेलं आहे. गेले काही दिवस अनेक जण ज्या पद्धतीनं जिव्हाळ्यानं बोलत आहेत, भरभरून लिहीत आहेत, हृद्य आठवणी सांगत आहेत, हे बघितलं तर त्यांनी बरंच काही रुजवलेलं आहे, हे लक्षात येतं.

सदा डुम्बरेंची पत्रकारिता वेगळ्या प्रकारची होती. चांगल्या पत्रकारितेमधून काही तरी साधता येतं, असा विश्वास त्यांना असे... त्यांच्याबरोबर काम करताना एक अनुभव नेहमी यायचा, कुठल्या ना कुठल्या निमित्तानं नानासाहेब परुळेकर आणि श्री.ग. मुणगेकर यांचं नाव चर्चेत हमखास यायचं. नानासाहेब परुळेकर हे ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक. डुम्बरे नेहमी म्हणायचे की, परुळेकरांना परदेशी स्थायिक होणं, तिथं करिअर करणं सहज शक्य होतं. नानासाहेबांचं शिक्षणच प्रख्यात कोलंबिया विद्यापीठात झालं. ‘न्यूयॉर्क वर्ल्ड’मध्ये ते लिहीत असत. तरीही त्यांनी भारतात येऊन पुण्यामध्ये ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरू केलं. त्यामागे मोठी दृष्टी होती. परुळेकरांनी ‘प्रेस ट्र्‌स्ट ऑफ इंडिया’च्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. डुम्बरे असं म्हणत की, राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या संस्थांच्या व्यवस्थापनात एवढा मोठा सहभाग असणारा एकही समकालीन संपादक मराठीमध्ये त्या वेळेला नव्हता. सर्वसामान्य माणसांसाठी परुळेकरांनी पत्रकारिता केली.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

श्री. ग. मुणगेकर यांच्याबरोबर तर थेट सदा डुम्बरे यांनी कामच केलं. त्यांचाही प्रभाव डुंबऱ्यांवरती खूप होता. सर्वसामान्य माणूस हा इथे पत्रकारितेच्या केंद्रस्थानी होता. ‘वृत्तपत्र हा लोकांचा आवाज आहे आणि विरोधी मताला त्यात महत्त्वाचं स्थान आहे.’ - हा पत्रकारितेचा आदर्श त्यांच्यापुढे होता. त्यामुळेच अलीकडच्या गप्पांमध्ये आत्ताच्या स्थितीवर पोटतिडकीने आणि अतिशय तळमळीने ते बोलायचे. वर्तमानपत्राचं प्रॉडक्ट होणं, वाचकांचं ग्राहक होणं, आणि संस्थांची दुकानं होणं हा विषय वारंवार निघायचा. पत्रकारितेतले हितसंबंध, त्यातला छुपा अजेंडा, पेड न्यूज याबद्दल त्यांना कमालीचं दु:ख व्हायचं. बातम्यांची विश्वासार्हता ही तर त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट होती. ‘Crises of Credibility’ हा त्यांचा एक आवडता शब्द होता.

मला त्यांच्याबरोबर ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल वीस वर्षं काम करता आलं. हा काळ ‘साप्ताहिक सकाळ’चाही सुवर्णकाळ होता. ‘साप्ताहिक सकाळ’ सुरू झालं आणि त्याच्यानंतर लगेचच एक वर्षानी डुम्बरे त्याचे संपादक झाले. त्याआधी  कोल्हापूर ‘सकाळ’चे संपादक होते, रविवार ‘सकाळ’चे संपादक होते. आता एका साप्ताहिकाला वेगळं रूप देणं हे त्यांच्यासमोर एक आव्हानात्मक काम होतं. ज्या पद्धतीनं नंतर ‘साप्ताहिक सकाळ’ बहरलं, ज्या पद्धतीनं तो एक ब्रॅन्ड झाला, त्याच्यामध्ये त्यांचं योगदान लखलखीत होतं.

प्रत्येक संस्थेत राजकारण असतंच. इथेही ते भरपूर होतं. मात्र, आवर्जून उल्लेख करायला हवा ती गोष्ट अशी की- त्या कशाचाही वारा लागू न देता, डुम्बरे यांनी ‘साप्ताहिक सकाळ’चा गड ‘वेगळा’ आणि ‘अभेद्य’ राखला. तो तसा अभेद्य राहिला म्हणून आणि केवळ म्हणूनच पुढे साप्ताहिकाला तेवढी उंची गाठता आली. इतिहासाचे दाखले देताना आपण नेहमी असं म्हणतो की, राज्यात स्थिरता असेल तर संगीत, साहित्य आणि कला बहरतात. साप्ताहिक सकाळच्या कालखंडात नेमकं तेच झालं. अनेक अंगांनी हे साप्ताहिक बहरत गेलं. या अंकाचा खास असा एक फार्म्युला होता. तो यशस्वी तर होताच, पण त्याचबरोबर वाचकाला आनंद देणारा आणि मुख्य म्हणजे त्याला चार पावलं पुढे नेणारा होता. वाचनाचीच नाही तर विचारांचीही जाणीव विस्तारणारा होता.

कुलदीप नय्यर, रामचंद्र गुहा, कल्पना शर्मा, यू.आर. अनंतमूर्ती, योगेंद्र यादव अशी भारतीय पातळीवरची, तर मराठीमधील सदानंद मोरे, प्रकाश बाळ, अभय बंग, प्राचार्य लीलाताई पाटील, शांता गोखले, प्रकाश संत, सानिया, गौरी देशपांडे... अशी किती तरी लखलखीत आणि तेजस्वी नावांची मालिकाच साप्ताहिक व डुम्बरे यांच्याशी जोडली गेली. त्यामुळे भाषा, राज्य, राष्ट्र, धर्म, वर्ग यांच्या सीमा ओलांडून हे साप्ताहिक पलीकडे जाऊ शकलं. बुद्धिवादी विचारांचं व्यासपीठ आणि लोकप्रियता या गोष्टी सहसा एकत्र नांदताना दिसत नाहीत. पण साप्ताहिकानं ती किमया करून दाखवली. डुम्बरे यांची दृष्टी त्यामागे होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

माणसं जोडण्याचं आणि नेमके विषय त्यांच्याकडून लिहून घेण्याचं कसब त्यांचाकडे होतं. शशी देशपांडे या इंग्रजीमध्ये लिहिणाऱ्या महत्त्वाच्या भारतीय लेखिका. पद्मश्री आणि साहित्य अकादमी असे सन्मान मिळवणाऱ्या. ‘दॅट लाँग सायलेन्स’ नावाची त्यांची एक कादंबरी आहे आणि तिचा मराठी अनुवाद ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये क्रमशः द्यावा, असं डुम्बऱ्यांना वाटत होतं. तर, याचा अनुवाद कोण करणार? ते म्हणाले, आपण सानियांना विचारून बघू. सानिया तोपर्यंत फक्त स्वतंत्र लेखन करत असत. पण त्या अनुवादासाठी तयार झाल्या. अगदी अलीकडे सानिया भेटल्या तेव्हा त्यांना मी ही आठवण दिली. त्या म्हणाल्या की, ‘मी कादंबरीचा अनुवाद केला नव्हता यापूर्वी. पण जेव्हा डुम्बऱ्यांनी विचारलं तेव्हा मी पटकन हो म्हटलं. आणि तो अनुवाद माझ्या हातून झाला.’ तशीच आठवण गौरी देशपांडे यांचीही आहे. गौरी देशपांडे पुण्याला आल्या की आम्ही त्यांना भेटायला जात असू. त्यांच्याशी भरपूर गप्पा व्हायच्या. दिवाळी अंकासाठी काय लिहायचं याचे विषय ठरायचे. गौरी देशपांडे यांची शेवटची ‘उत्खनन’ ही कादंबरी ‘साप्ताहिक सकाळ’च्या दिवाळी अंकामध्ये आलेली होती.

‘तुकाराम दर्शन’ आणि ‘लोकमान्य ते महात्मा’ हे तर मला वाटतं, सदा डुम्बरे यांचं संपादक म्हणून आणि सदानंद मोरे यांचं लेखक म्हणून फार मोठं योगदान ठरावं. तुकोबांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राचा काढलेला सामाजिक-सांस्कृतिक आलेख काय किंवा दोन महापुरुषांच्या निमित्ताने सर्व राजकीय, ऐतिहासिक आणि सामाजिक ताणेबाणे समजून देणं काय- एखाद्या साप्ताहिकाच्या प्रदीर्घ लेखमालेतून उलगडत नेणं हे आव्हानात्मक होतं.

साप्ताहिकातून आलेल्या किती तरी सदरांची पुस्तकं झाली आणि ती भरपूर गाजली. युनिक फीचर्सचे वृतांतलेख आणि शोधलेख आवडीनं वाचले जायचे.

यश हा योगायोग नव्हे

वाचनीय असलेले चार उत्तम लेख, एखादी कथा, एखादी पाककृती, उपयुक्त सदर एकत्र आणली की अंक चांगला होतो, असं मात्र नाही. तर यापाठीमागे काहीएक धोरण आणि एक सुसूत्रता लागते. मुख्यत: त्या साप्ताहिकाची पर्सनॅलिटी काय, याचं भान लागतं. म्हणजे कुठल्याही साप्ताहिकाला योगायोगाने यश येत नाही. त्याच्यामागे दृष्टी लागते आणि मला वाटते की, ती दृष्टी संपादक म्हणून डुम्बऱ्यांनी खूप कसोशीनं तयार केली आणि पाळली. त्या वेळेला ‘लोकप्रभा’, ‘चित्रलेखा’ अशी तगडी आणि मोठा खप असलेली साप्ताहिकं बाजूला होती. मात्र ‘साप्ताहिक सकाळ’चं स्थान आणि दबदबा वेगळा होता. एकाच वेळेला क्लासेस आणि मासेस यांच्यापर्यंत पोचणं ही मला वाटतं सगळ्यात जमेची आणि दुर्मीळ बाजू होती.

‘साप्ताहिक सकाळ’ हे एकाच वेळेला वैचारिक व्यासपीठ होतं, बुद्धिवादी व्यासपीठ होतं आणि त्याच वेळेला ते अत्यंत लोकाभिमुख होतं. वाचकांना आवडणारे अनेक विषय त्यात असायचे. म्हणूनच त्याचं व्यावसायिक गणित हेही अतिशय चांगल्या पद्धतीनं बसलं. आम्ही नेहमी म्हणत असू की- रुचीपालट विशेषांक, मेंदी विशेषांक किंवा पर्यटन विशेषांक असे लोकप्रिय पण वेगळे अंक आणि गंभीर कव्हर स्टोरी असं सहसा दिसत नाही. व्यावसायिकता आणि चांगली पत्रकारिता यांची ही अतिशय वेगळी सांगड होती.

‘साप्ताहिक सकाळ’चा वाचकवर्गही वैशिष्ट्यपूर्ण होता. काही साप्ताहिकं फक्त शहरी भागात किंवा फक्त एलिट क्लासमध्ये वाचली जातात किंवा दुसऱ्या प्रकारची साप्ताहिकं असतात ती फक्त तालुक्याच्या गावी, खेड्यांमध्ये किंवा अत्यंत सनसनाटी मजकुरासाठी वाचली जातात. इथे मात्र गावं, शहरं, संस्कृती, वर्ग या सगळ्यांना भेदून ‘साप्ताहिक सकाळ’ची लोकप्रियता पोचली होती. कारण प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातल्या प्रत्येकासाठी काही ना काही रसपूर्ण, रोचक असं त्याच्यामध्ये असायचं.

तुम्ही जर ‘साप्ताहिक सकाळ’ची फाइल नजरेखालून घातली तर या गोष्टी आणि सामान्यांशी जोडलेली त्याची नाळ आहे, हे सहज लक्षात येईल.

अस्सल मराठी आणि अट्टल ग्लोबल

संपादक म्हणून डुम्बरे यांचा गौरव करताना व्यक्ती म्हणूनही त्यांच्याविषयी नक्कीच बोलायला हवं. ते उदारमतवादी, पुरोगामी मूल्य मानणारे आणि मुख्य म्हणजे त्याप्रमाणे वागणारेही ते होते. बुद्धिवादी विचार हा त्यांचा एक अत्यंत आकर्षणाचा विषय होता. महाराष्ट्रातील बुद्धिवादी परंपरा, एकोणिसाव्या शतकातला महाराष्ट्र हे त्यांचे आवडीचे विषय असत. ही बुद्धिवादी परंपरा आपण पुढे नेली पाहिजे याची एक सतत जाणीव त्यांना असे आणि महाराष्ट्रात तसं घडत नाही याची खंतही असे.

डुम्बऱ्यांचं वर्णन करायचं झालं तर मला असं वाटतं की, ‘अस्सल मराठी आणि अट्टल ग्लोबल’ असं करायला लागेल. कारण जागतिक पातळीवरचं राजकारण, तिथली वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्या, तिथं काय काय चाललंय, युरोप- अमेरिका आणि पश्चिम आशिया यांच्यातले ताणेबाणे अशा सर्व गोष्टींवर त्यांचं बारीक लक्ष असे. मात्र याच बरोबरीनं अस्सल मराठीपण डुम्बऱ्यांमध्ये होतं. आणि हा जो काही मिलाफ होता ना, तो फार लोभस होता. इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांवरती कमालीचं प्रभुत्व होतं. म्हणजे त्यांच्याइतकं चांगलं इंग्लिश बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या मराठी संपादकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या-एवढीच होती.

अस्सल मराठीपण अशासाठी की- मराठी माणूस, त्याचं जगणं; ते समृद्ध कसं होईल, चांगल्या मराठी परंपरा पुढे कशा नेता येतील याविषयी त्यांना सतत एक आस असायची. मराठी माणसाची एवंगुणवैशिष्ट्यं, त्याच्यातले काही दोष किंवा तो मागे का पडतो, यावरही ते बोलायचे. उदाहरणार्थ- आम्ही जेव्हा करिअर विशेषांक काढायचो, तर त्याच्यामध्ये मराठी मुलं मागे का पडतात, मराठी मुलांना आणखी काय करता येईल, त्यांच्यासाठी काय संस्था सुचवता येतील- हा त्यांचा सततचा विषय असायचा.

ते स्वतः सजग पुणेकर होते. पुण्यातले रस्ते, पुण्यातील वाहतूक, पुण्याचं झालेलं विद्रूपीकरण यावर त्यांनी लिहिलेलं आहे. बालगंधर्व रंगमंदिराचा परिसर आणि त्याच्यावरती झालेलं पोलीस चौकीचं - अत्यंत सौंदर्यहीन इमारतीचं अतिक्रमण याच्याविषयी ते पोटतिडकीने बोलायचे. गेल्या काही वर्षांत भारतातील शहरं ही किती विद्रूप आणि बकाल झाली आहेत यावर लिहायचे.

एस्थेटिक्स किंवा सौंदर्यशास्त्र आणि सौंदर्यदृष्टी हाही त्यांचा आवडीचा विषय. मग ते शहरातल्या इमारतीचं असो की बागा आणि सार्वजनिक ठिकाणांचं. गृहसजावट विशेषांक न म्हणता अंतर्गत संरचना विशेषांक म्हणण्याचं कारणही तेच. कारण त्यात भर होता तो सौंदर्यदृष्टी, त्यातलं सामाजिक भान, चांगल्या रचनेमुळे, चांगल्या घरांमुळे माणसाची कार्यक्षमता कशी वाढेल यावर. या अंकासाठी श्रीकांत निवसरकरांसारखे ज्येष्ठ आर्किटेक्ट सल्लागार असायचे. इंटेरिअर डिझाइनमधला जागतिक ट्रेन्ड काय आहे आणि सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून आपल्याकडे त्यातलं काय आणता येईल, हे अतिशय सोप्या-सरळ शब्दांमध्ये या अंकामध्ये असायचं. म्हणजे ही जी ग्लोबल आणि लोकल म्हणजे अस्सल मराठी आणि अट्टल ग्लोबल ही दृष्टी होती, ती अनेक ठिकाणी दिसायची.

निसर्ग आणि पर्यावरण

पर्यावरण हा सदा डुम्बरे यांच्या आवडीचा, अभ्यासाचा आणि तळमळीचा एक भाग होता. पर्यावरण, प्रदूषण, नद्या, जंगलं, वनसंपदा याविषयी ते सातत्याने बोलत आणि लिहीत असत. अनेक पर्यावरण संस्थांशी ते संबंधित होते. नर्मदा आंदोलन चळवळीमधल्या अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क असायचा. मला आठवतंय की, मेधा पाटकर यांची एक अत्यंत प्रदीर्घ मुलाखत घ्यायला मी आणि डुम्बरे त्यांच्याकडे गेलेलो होतो.

सामान्य लोकांसाठी त्यातलं नेमकं काय पोचायला हवं, जे धोरण आखतात त्यांच्यापर्यंत काय जायला हवं, याबाबत डुम्बरे यांच्या विचारात स्पष्टता होती.

पर्यावरण हा अभ्यासाचा विषय असला तरी अनेकांना निसर्गसौंदर्य, झाडं, फुलं, त्यांचे प्रकार यात रस असतोच असं नाही. डुम्बऱ्यांचं एक मोठं वैशिष्ट्य होतं की निसर्गसौंदर्य, झाडं याविषयी ते नेहमी बोलत आणि लिहीत असत. ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये श्री. द. महाजन, प्रकाश गोळे, प्र. के. घाणेकर अशा अनेक मंडळींना त्यांनी लिहितं केलं. त्यांना स्वत:ला झाडांविषयी बरीच माहिती असायची. म्हणजे उदाहरणार्थ- कॅशियाच्या किती तरी जाती आहेत. कॅशिया जावानिका, कॅशिया रेजिनी, कॅशिया ग्रॅन्डिस... असं ते जाता-जाता सांगायचे. किंवा महाराष्ट्राचं राज्यपुष्प तामण- त्याचं शास्त्रीय नाव लॅगर्स्टोमिया स्पेसिओसा आहे, हे त्यांच्या सहजी जिभेवर यायचं. किंवा पुण्यामध्ये तबुबियाची किती झाडं आहेत, ते पहिल्यांदा कुणी पुण्यामध्ये आणलं वगैरे. तबुबिया अर्जेंटिनाचा बहर पिवळ्या रंगाचा असतो, पण तबुबिया ॲव्हेलॅन्डीचा जरा दुर्मिळ आणि जांभळट राणी रंगाचा बहर असतो. मला आठवतंय की ते दुर्मीळ झाड आम्ही भांडारकर रोडवर मुद्दाम बघायला गेलो होतो. (आता ते झाडही गेलं.) तर अशी शास्त्रीय माहिती त्यांच्याकडे खूप असायची. ही रसग्रहणात्मक दृष्टी असल्यानं त्यांचं पर्यावरणाविषयी लेखन जड, बोजड झालं नाही.

चळवळीशी नातं

डुम्बरे हे स्त्री-मुक्ती, विषमता निर्मूलन, लोकविज्ञान, पर्यावरण अशा  क्षेत्रांतल्या अनेक पुरोगामी चळवळींशी जोडलेले होते. हे जोडलं जाणं हे केवळ नावापुरतं नव्हतं, तर अनेक संस्थांच्या- उदाहरणार्थ, ‘मिळून साऱ्याजणी’चा ‘निरामय चॅरिटेबल ट्रस्ट’, 'मुक्तांगण', 'शंवाकि' अशा संस्थांचे ते विश्वस्त होते. नुसते विश्वस्त होते हे महत्त्वाचं नसून, या सगळ्या चळवळींना त्यांचा आधार वाटायचा.

आधार अशासाठी की, त्या-त्या गोष्टीतलं संपूर्ण थिअरॉटिकल ज्ञान त्यांना होतं आणि माणसाचाही अभ्यास होता. म्हणजे हे सगळं माणसांपर्यंत कसं पोहोचवायचं, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे असा बुद्धिवादी परंपरेतला पण मानवी चेहऱ्याची जाण असलेला माणूस विश्वस्त म्हणून असणं ही मोठी गोष्ट होती. सामाजिक विषयांवरच्या लेखांसाठी ते ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये भरपूर जागा उपलब्ध करून देत असत.

सहृदयता

सदा डुम्बरे हे जसे अतिशय उत्तम संपादक होते, तसेच ते अतिशय सहृदय अशी व्यक्ती होते. त्यांच्याशी बोलताना खरोखर अख्ख्या जगाची सैर होत असे. सहृदयता अशी की, अनेक कार्यकर्ते किंवा नव्याने लिहायला लागलेली तरुण मंडळी किंवा पत्रकारितेमधले विद्यार्थी यांच्याशी ते अत्यंत प्रेमाने बोलत, लिखाणाबाबत त्यांच्यावर विश्वास टाकत. अनेक माणसांना जोडून घेत असत. ‘साप्ताहिक सकाळ’ची जी वर्धापनदिनाची व्याख्यानं होत, ती वाचकांच्या आकर्षणाचा विषय होती. यू.आर. अनंतमूर्ती, एम.टी. वासुदेवन नायर, जावेद अख्तर, रामचंद्र गुहा अशी किती तरी मोठी नावं आहेत. नंतरसुद्धा त्यांचा डुम्बरे यांच्याशी संपर्क असे. यू.आर. अनंतमूर्ती पुण्याला आले की, ते आवर्जून डुम्बरे यांना भेटत असत.

मला असं वाटतं की, माझ्या पत्रकारितेच्या करिअरमध्ये ‘साप्ताहिक सकाळ’ची वीस वर्षं हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. डुम्बऱ्यांसारखा संपादक असल्यामुळे दृष्टी विकसित व्हायला खूप मदत झाली. साप्ताहिकाच्या सुवर्णकाळामध्ये आणि डुम्बरे संपादक असताना तिथं असणं, त्या कामातनं आनंद मिळणं हा अक्षरश: मोलाचा ठेवा आहे.

त्यांच्याबरोबर काम करताना आमच्यापैकी कुणालाच त्यांच्या ‘बॉसगिरीचा’ अनुभव नाही. त्यांच्या आवडी-निवडी तीव्र होत्या. त्यांच्या मताबद्दल ते ठाम किंवा आग्रही असायचे, पण दुराग्रही नसायचे. डुम्बरे, मी, निलांबर साठे, अनिल उपळेकर, श्याम देशपांडे - दोन दशकं आम्ही एकत्र काम केलं. इतकी वर्षं सातत्यानं एकत्र काम करणारी टीम आता सापडणं दुर्मीळ! ‘साप्ताहिक सकाळ’ची कव्हर्स डिझाईन करणारे आणि आकर्षक जाहिराती करणारे श्याम देशपांडे सकाळमध्ये नसले तरी आमच्याच टीमचा एक भाग बनले होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

दर सोमवारी दुपारी अंकाचं कव्हर ठरवण्यासाठी आमची जी मीटिंग व्हायची, ती म्हणजे आमच्या दृष्टीनं आनंदाचा ठेवा! कव्हरच्या निमित्तानं जगातल्या यच्चयावत विषयांवर चर्चा झडायच्या. गरम कॉफी, कधी प्रभा विश्रांती गृहातला वडा, तर कधी वैशालीतला दोसा यांच्याबरोबर गप्पा रंगायच्या. कित्येक विशेषांकांचे आणि लेखांचे विषय या गप्पांमधून सुचले आहेत. या सगळ्यामुळे आपण ‘काम’ करतोय, ‘नोकरी’चा भाग म्हणून हे करतोय, असं कधी जाणवलंसुद्धा नाही. या आनंदाचं प्रतिबिंब आमच्या कामामध्ये आणि साप्ताहिकाच्या पानांमध्ये नक्कीच पडत असणार.

‘साप्ताहिक सकाळ’मधून बाहेर पडल्यानंतरही मी, डुम्बरे आणि श्याम असं आमचं त्रिकूट अधून-मधून कॉफीसाठी भेटत असू. पुन्हा तशाच गप्पा रंगायच्या. आमची तिघांची शेवटची भेट डिसेंबर महिन्यातली. करोनामुळे नेहमीप्रमाणे संध्याकाळी भेटण्याऐवजी भल्या सकाळी फिरायला भेटायचं, असं ठरलं. प्रभात रोडचा इराणी कॅफे पुन्हा सुरू झाला होता. थंडीतल्या त्या गरमागरम चहावर आमच्या बऱ्याच गप्पा रंगल्या. कोविडचा विषय अर्थातच निघाला होता. अत्यंत नियमित आणि भरपूर व्यायाम करणाऱ्या आणि सर्वतोपरी काळजी घेणाऱ्या त्यांनाच करोना गाठेल आणि तेही इतक्या वाईट, अनाकलनीय पद्धतीनं- हे पचवणं फार जड आहे. वेदनादायक आहे.

‘द गिव्हिंग ट्री’-  हे अमेरिकन लेखक-चित्रकार शेल सिल्व्हरस्टाईन यांनी लहान मुलांसाठी लिहिलेलं आणि जगभर गाजलेलं छोटेखानी चित्रपुस्तक. डुम्बरे यांचं ते अत्यंत आवडतं होतं. समोरचा माणूस कसाही वागला तरी सतत देत राहणाऱ्या, नि:स्वार्थीपणे मदत करणाऱ्या झाडाचं रूपक त्यात वापरलं आहे. खरं तर डुम्बरे हे स्वतःच एक देणारं झाड होते.

आता ते नाहीत, पण त्यांच्या आठवणीची दाट सावली दिलासा देत राहील.

‘साधना’ साप्ताहिकाच्या १३ मार्च २०२१च्या अंकातून साभार

..................................................................................................................................................................

ज्येष्ठ संपादक सदा डुम्बरे यांचे आणि त्यांच्याविषयीचे ‘अक्षरनामा’वरील लेखन

अनिल अवचटांनी सोसवतही नाही आणि सांगताही येत नाही, अशा दु:खाच्या नव्या जातकुळीला सामोरे जाण्याची अनवट वाट मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली!

श्रीनिंचे ‘डोह’ व इतर लेखन वाचून या समीक्षाग्रंथाकडे वळायचे, की या समीक्षेच्या प्रकाशात मूळ लेखन वाचायचे, याची निवड वाचकाला आपल्या प्रकृतीनुसार करावी लागेल

जागतिक आवाका असलेल्या एका प्रगल्भ संपादकाने प्रसंगपरत्वे वेळोवेळी केलेले हे लेखन आपली जाण अधिक समृद्ध करणारे आहे! 

संस्कृतीहीन राज्याचे नेतृत्व देशपातळीवर कोण स्वीकारणार?

‘लोकमान्य ते महात्मा’ : महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इतिहासाचे पुनर्वाचन

..................................................................................................................................................................

लेखिका संध्या टाकसाळे ‘साप्ताहिक सकाळ’च्या माजी संपादक आणि सध्या ‘प्रथम बुक्स’ या प्रकाशनसंस्थेत ज्येष्ठ संपादक आहेत.

sandhyataksale@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा