‘मायलेकी-बापलेकी’ : तरुण पिढीच्या नव्या सकारात्मक प्रयोगातील उत्साह, उमेद, आनंद आणि पेच या पुस्तकात वाचायला मिळतात
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
चैताली भोगले
  • ‘मायलेकी-बापलेकी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 26 December 2020
  • ग्रंथनामा शिफारस मायलेकी-बापलेकी Maayleki-Baapleki सोनाली कुलकर्णी Sonali Kulkarni दासू वैद्य Dasoo Vaidya ऋषीकेश गुप्ते Rushikesh Gupte आशुतोष जावडेकर Ashutosh Javadekar

पालकत्व ही एक तारेवरची कसरतच असते. पालकांचे स्वभाव, पूर्वानुभव, महत्त्वाकांक्षा, आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी अशा अनेक गोष्टींतून पिढ्यानपिढ्यांपासून पालकत्वाच्या चाकोऱ्या घडत गेलेल्या आहेत. आपोआपच मुलांना या चाकोऱ्यांत घडवण्याचा प्रयत्न पालकांकडून होतो. या चाकोऱ्या समाजाच्या नीतिनियमांशी सुसंगत असल्यामुळे आपले मूल मोठे होऊन समाजात सहज मिळून-मिसळून जाईल की नाही, याची चिंता नसते. फारशी तोशीस न पडता, सरधोपट मार्गाने तेही किनाऱ्याला लागेल, अशी आशा असते. मुलींना वाढवताना तर या चाकोऱ्या थोड्या अधिकच सुरक्षित वाटतात आणि अधिक कटाक्षाने जपल्या जातात. पण या साऱ्याच्या पार जात आपल्या लेकीचे व्यक्तिमत्त्व एक स्वतंत्र माणूस म्हणून उमलावे, यासाठीचे कष्ट आनंदाने आणि संवेदनशीलतेने घेत असलेल्या नव्या पिढीतील काही पालकांची मनोगते टिपण्याचा प्रयत्न ‘मायलेकी-बापलेकी’ या नव्या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे.

‘अक्षरनामा’ या मराठी फीचर्स पोर्टलच्या २०१८ सालच्या ‘बालदिन’ विशेषांकासाठी ‘मायलेकी-बापलेकी’ हा विषय निवडण्यात आला होता. त्यातील लेखांमध्ये आणखी काही लेखांची भर टाकून हे पुस्तक साकारले आहे. अनेक वर्षांपूर्वी मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘बापलेकी’ या पुस्तकाची आणि ऋतुरंग प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘एकच मुलगी’ या पुस्तकांची प्रेरणा आणि पार्श्वभूमी या पुस्तकाला आहे. ‘बापलेकी’मध्ये गौरी देशपांडे, सई परांजपे, प्रिया तेंडुलकर, रजिया पटेल, विद्या बाळ, अरुणा ढेरे अशा लेकींचे आपल्या बापमाणसाबद्दलचे, तर मे.पुं. रेगे, विजय तेंडुलकर, वसंत गोवारीकर, आनंद अंतरकर, मुकुंद टाकसाळे आदींचे आपल्या लेकींबद्दलचे मनस्वी लेख संग्रहित करण्यात आले होते. ‘एकच मुलगी’मध्ये निळू फुले, गुलजार, मृणाल गोरे, सुलोचना अशा दिग्गज मंडळींनी आपल्या एकुलत्या मुलींबद्दलची हृदगते आत्मीयतेने मांडली होती.

‘बापलेकी-मायलेकी’ या पुस्तकामध्ये सोनाली कुलकर्णी, भक्ती चपळगावकर, ममता क्षेमकल्याणी, अमिता दरेकर, अश्विनी काळे, हृषिकेश जोशी, दासू वैद्य, सरफराज अहमद, योगेश गायकवाड अशा अभिनय, साहित्य, मीडिया, प्रशासन, सामाजिक कार्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील आई-बाबा आपल्या लेकींशी असलेल्या खास नात्यांबद्दल लिहिते झाले आहेत. या सर्वच मंडळींचा पालकत्वाचा प्रवास तसा नुकताच सुरू झाला आहे. एकाअर्थी या लेकींच्या आणि पालकांच्याही जडणघडणीची सुरुवातीची वर्षे आहेत. त्यामुळे वरील पुस्तकांतील लेखांचा परिपक्व सूर, परस्पर नात्याची मनस्वी गुंफण इथे नाही; पण त्याऐवजी तरुण पिढीच्या नव्या सकारात्मक प्रयोगातील उत्साह, उमेद, आनंद आणि पेच या पुस्तकात वाचायला मिळतात.

पुस्तकातील पहिल्याच लेखामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी अनेक प्रसंग आणि आठवणींतून आपली मुलगी कावेरीचा स्वभाव, तिच्या सवयी, तिचे छंद, तिचा समजूतदारपणा अशा साऱ्या गोष्टी मांडल्या आहेत. सेलिब्रिटी आईची लेक म्हणून सार्वजनिक आयुष्यात तिच्याकडे थोड्या अधिक कुतूहलाने पाहिले जाणार हे स्वाभाविकच असले, तरीही त्यामुळे तिचे लहानपण हरवून जाऊ नये, तिने संवेदनशील, कलासक्त बनावे आणि हे सारे शिकवण्यातून नव्हे तर आपल्या आचरणातून तिच्यापर्यंत पोहोचावे, याकडे सोनाली आणि नचिकेत यांचा कटाक्ष असल्याचे दिसते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

पुस्तकातील सगळ्याच लेकी लाडाकोडाच्या, अप्रूपाच्या आहेत. त्यातही बहुतेक जणी एकुलत्या आहेत. स्वच्छंदी, बडबड्या, चुणचुणीत, चौकस आणि बिनधास्त आहेत. एकेकाळी मुलींना वाढवण्याचे काही स्पष्ट संकेत होते. त्यांनी मोठ्याने बोलू नये, हसू नये, खाली पहावे, फारसे प्रश्न विचारून नयेत, आपली मते मांडू नयेत, शांत समंजस असावे वगैरे अपेक्षा त्यांच्याकडून ठेवल्या जायच्या. आता एकूणच या अशा अपेक्षा कालबाह्य होऊ लागल्या आहेत.

या पुस्तकातल्या जवळजवळ सगळ्या मुली म्हणजे तर त्याचे थेट दुसरे टोक आहेत. त्यांच्या अशा बेधडकपणामुळे प्रसंगी होणारी आपलीच दमछाक आणि फटफजिती बहुतेक लेखांत कौतुकाने मांडली गेली आहे.

‘एका तळ्यात होती’ गाण्यावर हमसून हमसून रडणाऱ्या पण आपल्या फ्रेंड्सना कुणी त्रास दिला तर त्यांच्याशी खुशाल पंगा घेणाऱ्या ईशाच्या मनस्वी तरीही बिनधास्त स्वभावाचे सीमा शेख-देसाई यांना कौतुकच आहे. आजच्या जगामध्ये वावरताना आपला स्वभाव थोडा रोखठोक असायलाच हवा असे म्हणत तिच्या बिनधास्तपणाला मुरड घालणे त्यांनी टाळले आहे.

ममता क्षेमकल्याणी यांनी तर आपल्या दमयंतीला ‘दमात घेणारी दमा’ आणि ‘दमवणारी दमू’ अशीच लघुनामे देऊन टाकली आहेत ‘खूप लाजरंबुजरं माझं बालपण आणि अनेक वर्षं स्वत:च्या आवडीचा रंगही माहीत नसलेलं माझं लहानपण, लेकीमुळे पुन्हापुन्हा आठवत राहतं’ असं ममता लिहितात आणि तिच्या ठामपणाला कटाक्षाने जपत राहतात. तर भक्ती चपळगावकर यांच्यासाठी त्यांची शरयू म्हणजे दमवून, थकवून, पुरती वाताहात लावणारा झंझावात आहे. या झंझावाताला समजून घेण्याच्या प्रयत्नांत त्यांना आतापर्यंत गृहित धरलेल्या पालकत्वाच्या अनेक ठरलेल्या कल्पनांना सोडचिठ्ठी द्यावी लागली आहे. मुलगी असल्याबद्दल वाटणारी श्रेष्ठत्वाची भावना, तरीही डिस्नेच्या प्रभावामुळे खुणावणारी प्रिन्स चार्मिंगची स्वप्ने, स्वतंत्र बुद्धी आणि सर्जनशीलता, प्रसंगी उफाळून येणाऱ्या तापटपणा अशा साऱ्या रसायनाला नेमका कसा आकार द्यायचा, अशा पेचात टाकणाऱ्या प्रश्नातून कधी चुकतमाकत, कधी ठामपणे, कधी काही प्रयोग करत मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या साऱ्यात प्रसंगी होणारी चिडचिड, वैताग, त्रास, गोंधळ सारं सहन करूनही मुलींनी मुक्त बागडू देण्याकडेच या सगळ्या पालकमंडळींचा कटाक्ष आहे. प्रत्येक गोष्टीवर लॉजिकली चर्चा करायची, प्रश्न विचारायचे आणि त्यातून आपली आपण उत्तरे काढायला शिकायची ही सवय प्रिया सुशील यांनी आपल्या माहीला लावली आहे. आपल्या मतालाही किंमत आहे, आपल्यावर सगळ्यांचा विश्वास आहे, यातून मुले अधिक जबाबदार बनतात, असे निरीक्षण प्रिया सुशील यांनी आपली लेक माहीबद्दल लिहिताना मांडले आहे.

मुलींच्या अशा खुल्या, मैत्रीपूर्ण स्वभावाला खतपाणी घातल्यावर त्या आजूबाजूच्या सगळ्यांशी, अगदी रस्त्यावरच्या माणसांशीही मोकळेपणाने बोलायला लागल्यावर त्यांचे हे वागणे सुरक्षिततेच्या दृष्टीने मात्र या पालकांना काहीसे धोक्याचे वाटते आहे. ‘ती मोठी व्हायला लागली तशी अनोळखी माणसांशी बोलण्याची तिची सवय खूपायला लागली. डे-केअर, शिशुगट,  शाळेत व्हॅनने जाताना तिला सगळ्यांशी मित्रत्वाने वागताना पाहून माझी झोप बऱ्याचदा उडाली आहे,’ असे कीर्ती परचुरे आपल्या सईबद्दल लिहितात.

पण या भीतीपायी त्यांची वाढ खुरटू देणेही या पालकांना नको आहे. हा पेच त्यांना आव्हानात्मक वाटत आहे. बहुतेकांनी खूप लहानपणीच मुलींना ‘गुड टच बॅड टच’च्या संकल्पना शिकवल्या आहेत, स्वसंरक्षणाचे धडे गिरवण्यासाठी काहींनी मुलींना मार्शल आर्ट्सच्या क्लासेसना टाकले आहे. प्रश्नांचा बागुलबुवा करण्याऐवजी प्रसंगी स्वत:ला सावरता यावे इतके त्यांना खंबीर बनविण्याकडे या पालकांचा कल आहे.

आपल्या अपंगत्वासोबत हिंमतीने जगणाऱ्या अश्विनी काळे यांच्यासाठी पालक बनण्याचा हा प्रवास अधिकच आव्हानात्मक आहे. समंजस जोडीदाराच्या साथीने स्वत:च्या शारीरिक मर्यादांवर मात करत आपली लेक अनुश्रीला हिंमतीने वाढवणाऱ्या अश्विनी यांचे कौतुक वाटते. आपल्या मुलीला शक्य तितके स्वावलंबी बनण्याचे धडे त्या देत आहेत. आईबाबांच्या सावलीतून हळूहळू बाहेर पडू द्यायला हवे असे त्या म्हणतात. आपल्या मुलीनेही स्वत:ची जबाबदारी घेणारी स्वतंत्र व्यक्ती बनावे, यासाठी त्या सजगपणे प्रयत्न करत आहेत.

.................................................................................................................................................................

एकविसाव्या शतकात ‘आंबेडकरी तत्त्वज्ञाना’त लिहिली जाणारी कविता कशी असेल, याचं उत्तर म्हणजे ‘बीइंग’ हा कवितासंग्रह

बीइंग – विजय अशोक इंदुशोकाई, आऱ्हान मीडियास्मिथस, नाशिक, पाने – २२२ (हार्डबाऊंड), मूल्य - ३६० रुपये

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5250/Being

..................................................................................................................................................................

आपण व्यक्ती म्हणून कधी चांगले असतो, कधी ठीकठाक, कधी चक्क वाईट. पालकत्व याहून वेगळे नसते. त्यामुळे आपले आईपणही कधी बरे, कधी चांगले, कधी वाईटही आहे असे लिहिणाऱ्या पत्रकार अमिता दरेकर यांच्या लेखाचा सूर बराचसा आत्मपरीक्षणाचा आहे. किमया आणि अनया अशा दोन लेकींची आई म्हणून काय साधायचे आहे, याबद्दल सतत स्वत:शीच साधलेला हा संवाद आहे. पालक बनण्याच्या या प्रवासामध्ये आपल्याला मुलींची घट्ट मैत्रीण बनायचे नाही, पण मुलींना जिच्याशी कधीही, काहीही मोकळेपणाने बोलता यावे अशी व्यक्ती बनायचे आहे. ‘‘आपण कुठे चुकलो हे वयाच्या त्या त्या टप्प्यावर आपल्याला नीट ठाऊक असतं. ते त्यांनी शक्यतो टाळावं अशी इच्छा असली तरीही त्यांनी ते करूच नये याचा अट्टहास मात्र सोडायला हवा’’, असे त्या लिहितात.

अगदी गेल्या पिढीपर्यंत दोन पिढ्यांमधल्या संवादामधली ही दरी भरून निघत नव्हती. स्पर्शातून, जवळिकीतून प्रेम व्यक्त करण्याची, मनातलं मोकळेपणी बोलून दाखवण्याची सोय नव्हती. त्यातून किती गोंधळलेपण, भांबावलेपण, चारचौघांत वावरण्याचे अडाणीपण या साऱ्याला मुली सामोऱ्या जात राहिल्या. पालकांबरोबरचे नाते असे मोकळे झाले, तर त्यांचे हे भांबावलेपण कदाचित थोडे दूर होऊ शकेल.

मुलांना घडवताना त्यांच्या मनात परंपरांनी चालत आलेल्या भ्रामक प्रतिमांची पेरणी करण्याबद्दल असलेली चीड योगेश गायकवाड यांच्या लेखातून व्यक्त झाली आहे. अशा कल्पना लादणाऱ्या परंपरांइतकाच मुलींना सुंदर, नाजूक देखणेपणाच्या चौकटीत अडकवणाऱ्या, लेखकाच्या भाषेत ‘सुंदराबाईच्या फेऱ्यात’ अडकवणाऱ्या बाजारपेठेचाही राग आहे. त्या नादात आपल्या मुलीचे - मीराचे मैदानावरचे खेळणे थांबू नये, तिच्या मुक्त विचारांना तर्कहीन समजुतींचा, साचेबद्ध कल्पनांचा वेढा बसू नये म्हणून ते आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. अशा वेगळ्या वाटेने जगण्याच्या अट्टाहासात ती ठामपणे उभी राहील की जास्त गोंधळून जाईल, ही शंका मनात जरूर आहे. पण तरीही मुलीने आपल्या आवडीची निवडणारे स्वतंत्र विचारांचा माणूस बनावे असे त्यांना वाटते.

बाई घडत नाही, घडवली जाते अशा अर्थाचे एक वाक्य आहे. आपण कोण, समाजातील आपली भूमिका काय हे मोठ्या माणसांना पाहत पाहतच मुले शिकत असतात. तेच संस्कार कळत नकळत त्यांच्यावर होत असतात. या पुस्तकातील मुलींसाठी अजून तरी घर हेच विश्व आहे आणि त्यांच्या या जगात बाई-पुरुषांच्या भूमिकांत प्रचंड मोठी तफावत नाहीये. पालकत्वाच्या प्रक्रियेत दोन्ही पालक सारखेच सहभागी आहेत. घरांतल्या निर्णयप्रक्रियेत सगळ्यांचाच सहभाग आहे, कुठे बाबा घरून काम करत आहेत, कुठे दोघांचेही काम ‘वर्क फ्रॉम होम’ प्रकारातले आहे. कुठे आईपेक्षा बाबाला स्वयंपाकघरात अधिक आवडीने रमताना त्यांनी पाहिले आहे. किशोर धस्कटे, नयना जाधव यांच्या मुलींनी आपल्या आईला पोलिसी वर्दीमध्ये कर्तव्य बजावताना पाहिले आहे. घरात अमुक व्यक्तीची अमुकच भूमिका असते अशी काही समीकरणे अजून तरी त्यांच्या मनात नाहीत. त्यामुळे मोठी होताना जोडीदाराकडूनही त्यांच्या अशाच अपेक्षा असणार आहेत. वैवाहिक आयुष्यात लोकशाहीला महत्त्व असणार आहे.

..................................................................................................................................................................

‘खिंडीत’ : शैक्षणिक जगताच्या अंतरंगाची विरूपता भेदकपणे उलगडणाऱ्या कथा

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5254/Khindit

..................................................................................................................................................................

या पुस्तकाला डॉ. आशुतोष जावडेकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी या साऱ्या मुद्द्यांचा उहापोह केला आहे. या मुली मोठ्या होईपर्यंत लग्नसंस्था नाहीशी होणार नसली तरीही ‘या मुली मोठ्या होतील, तेव्हा अनेक रिलेशनशिप्समधून पार पडून, वळणं घेत घेत, शारीर आणि मानसिक प्रेमाचे आणि फसवणुकीचे अनेक अनुभव घेत घेत लग्नापर्यंत पोहोचतील, असं मला वाटतं.’ लग्न ही मध्यवर्ती गोष्ट, स्वप्नांची इतिकर्तव्यता असे त्यांच्याबाबतीत असणार नाही. उलट पंखांमध्ये पुरेसे बळ आल्यावर मुक्त आकाशात भरारी घ्यायला ती सज्ज होईल, तो पाठवणीचा खरा प्रसंग असणार आहे आणि त्या प्रसंगाला प्रगल्भतेने सामोरे जाणे ही लेकींच्या या पालकांची कसोटी असणार आहे, ते म्हणतात ते खरेच आहे.

बाकी पुस्तकातील बाबा मंडळींच्या लेखांचा एकूण सूर ‘लेकींनी आयुष्यात बहार आणली आहे’ असाच आहे. जगासमोर, बऱ्याचदा सहचारिणीसमोरही वाकवता न आलेला पुरुषी अहंकार या लेकींनी पुरता नामोहराम केलेला दिसतो. सामाजिक-आर्थिक परिस्थितीने लादलेली फरफट, संघर्ष यांच्या पार्श्वभूमीवर लेकींची वर्णने ‘उन्हातला पाऊस’ उतरली आहेत. दासू वैद्य यांच्या लेखात त्यांनी ‘मुलगी होणं म्हणजे दुसऱ्यांदा प्रेमात पडणं’ असे लिहिले आहे. अन्वयीचे ‘बाबा’ म्हणून हाक मारणे आपल्या श्रवणशक्तीचा सर्वोच्च सन्मान असे त्यांना वाटते.

तू जगप्रसिद्ध कलावंत नाही झालास

तरी चालेल

फक्त दारापुढची रांगोळी

मात्र कधी नकोस तुडवू

या आपल्या कवितेतील ओळींप्रमाणे तिने संवेदनशील बनावे अशी इच्छा आहे.

किरण केंद्रे यांनाही आपल्या बेनझीरचे घरात वावरणे काव्यमय वाटते. मुलींना वाढवताना, त्यांचे न्हाऊखाऊ करताना, त्यांच्याशी खेळताना प्रेमाचे स्वत:मधील हळवेपणा, हळुवारपणा नव्यानेच सापडल्याचा अनुभव ते मांडतात.

पुस्तकाचे संपादक राम जगताप यांनी आपली लेक- मुद्रा हिचे व्यक्तिचित्र रेखाटताना भरपूर प्रसंगांतून आपला पालक बनण्याचा प्रवास विस्ताराने मांडलाय. तिची अखंड बडबड, तिचे सतत प्रश्न विचारणे, फँटसीत रमणे, गोष्टी सांगायला लावणे, हक्क गाजवणे यातून आपण प्रथमच ‘निर्भेळ आणि निर्व्याज हसू काय असतं हे अनुभवतोय’ असे त्यांनी लिहिले आहे.

नृत्य आणि तिरंदाजी अशा दोन्ही गोष्टी शिकणाऱ्या आपल्या इरासोबतचे मायेचे, आनंदाचे अनेक क्षण किशोर रक्ताटे यांनी टिपले आहेत. मुलांमुळे कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडते, मुले ‘स्पेस’ खातात, अशा काहीशा उदासीन विचारांपासून लेकीला पहिल्यांदा हातात घेताना पहिल्यांदा जाणवणारी माया, तिने बाबा म्हणून आपल्याला पहिल्यांदा ओळखण्यातले अप्रूप, आनंद इथपर्यंतचा प्रवास हृषिकेश गुप्ते यांनी आपल्या लहानशा लेखात मांडला आहे. प्रचंड संघर्षाने भरलेले आयुष्य, हालअपेष्टा हे सारे मुलगी मारियाच्या निरागस हाकेमुळे धुवून निघण्याचा, भूतकाळाबद्दलची अढी निवळण्याचा हृद्य अनुभव सरफराज अहमद यांनी मांडला आहे. हिंदू-मुस्लीम अशा आपल्या भिन्नधर्मीय पालकांची वेगवेगळी सामाजिक पार्श्वभूमी सहजपणे समजून, आत्मसात करतच आसिफ बागवान यांच्या लेकी अल्विरा आणि अधीरा मोठ्या होत आहेत.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘मायलेकी-बापलेकी’मधील लेख बरेचसे पालकत्वाच्याच अनुषंगाने लिहिले गेले आहेत. त्यातील बराचसा भाग हा लेक आयुष्यात येण्याआधीची पार्श्वभूमी, लहानग्या बाळाचे संगोपन करताना आलेले अनुभव, त्यातील आव्हाने, मुली संस्कारक्षम वयाच्या झाल्यावर त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलावे यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यातून आलेले अनुभव यांचा आहे. पण मुले या साऱ्या संस्कारांच्या पार आपली आपणही घडत जातात. एक स्वतंत्र माणूस म्हणून त्यांच्या अशा घडत जाण्याकडे संयमाने आणि तटस्थपणे पाहताना, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांवर आपल्या पूर्वग्रहांचे सावट पडू नये म्हणून जपताना प्रत्येक पावलावर सजग राहावे लागते. या प्रक्रियेत आपल्या व्यक्तिमत्त्वाची मोडतोड चाललेली असताना होणारा मनस्तापही अनेकदा झेलावा लागतो आणि तरीही या नात्यातील ओल टिकून रहावी यासाठी प्रयत्न करावे लागतात. जगण्याच्या रेट्यात माणसे कठोर, कणखर, रोखठोक होत जातात, पांघरून ठेवलेले कित्येक आवेश, हट्ट, दुराग्रह, इगो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनलेले असतात. एका नव्या जीवाशी नाते तयार होत असताना हे सारे मागे टाकावे लागते. हे आव्हान पार करतच दोघांचाच असा एक अवकाश तयार होतो, सोबत तयार होते.

लडकीयाँ बैठी थी पाँव डालकर

रोशनी सी हो गयी तालाब में

हृषिकेश गुप्ते यांच्या लेखाच्या अखेरीस या दोन ओळी येतात. मुलींच्या ठायी असलेला अफाट उत्साह, ऊर्मी, त्यांचे खळाळणारे निर्व्याज हसू, त्यांचे स्वप्नांत रमणे, त्यांचे सतत किलबिलणे, त्यांचे हक्क गाजवणे, अवघे घर उजळवून टाकणे हे सारेच या ओळींतून उभे राहते. आपल्या देशातील अनेक घरांत अजूनही ‘नकुशा’ मुली आहेत, त्यांच्या लग्नाच्या काळजीने काळवंडलेले बाप आहेत, कुठे शिक्षण अर्धवट सुटून जात आहे, लग्नव्यवस्थेतील कुचंबणा\तडजोडी आहेत. या पार्श्वभूमीवर हे चित्र प्रातिनिधीक नसले तरीही आश्वासक आहे.

‘बाईच्या जातीने...’ वगैरे पालुपद कधीच कानावर न पडलेल्या, अपेक्षांची ओझी डोक्यावर नसलेल्या या मुली मोठ्या होतील, अजूनही बऱ्याच अंशी सरधोपट चालणाऱ्या समाजाच्या मोठ्या प्रवाहाचा भाग बनतील, जाहिराती, सोशल मीडिया यांचे प्रभाव मोठे होत जातील, या पुढच्या काळासाठी त्यांना खंबीर, निडर, कणखर बनवताना त्यांच्यातील कोवळीक, खळखळता निरागसपणा हरवून जाऊ नये, हे पहावे लागेल. त्यांच्या या मुक्त जगण्याला तशीच साथ देण्यासाठी मुलग्यांची जडणघडणही महत्त्वाची ठरणार आहे. ती कशी मोठी होताहेत हे चित्र मांडणारे आणखी एक पुस्तक यायला हवे.  

..................................................................................................................................................................

‘मायलेकी-बापलेकी’ : संपादक – राम जगताप-भाग्यश्री भागवत,

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे

पाने – २४०, मूल्य – २९५ रुपये.

..................................................................................................................................................................

लेखिका चैताली भोगले मुक्त पत्रकार आहेत.

chaitalib6@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......