देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं...
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
डॉ. सुजित अडसूळ
  • डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग
  • Sun , 29 January 2017
  • अभय बंग Abhay Bang राणी बंग Rani Bang सर्च SEARCH शोधग्राम Shodhgram

गडचिरोलीसारख्या दुर्गम व नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासी भागात गेली तीन-चार दशकं राहून व्यसनमुक्ती, कुपोषण, अंधश्रद्धा आणि आरोग्यसेवा यांसारख्या अत्यंत मूलभूत गोष्टींसाठी अहोरात्र झटणारं एक दाम्पत्य म्हणजे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बंग SEARCHच्या (Society for Education, Action & Research in Community Health) माध्यमातून शोधग्राम इथं करत असलेलं संशोधन ‘Lancet’सारख्या जर्नलमधून अनेकदा प्रकाशित झालं आहे. WHOला, जागतिक आरोग्य संघटनेला त्या संशोधनाची दखल घ्यायला लागली.

या ठिकाणी काम करण्याची इच्छा बऱ्याच दिवसांपासून मनामध्ये होती. अनायसे तशी संधी समोर आली आणि सहकारी वैद्यकीय व्यावसायिकांबरोबर मी ८ जानेवारी २०१७ रोजी रवाना झालो. रात्री ११ वाजता आम्ही नागपूर विमानतळाबाहेर आलो. समोर गुरूबंधू (आमच्या ड्रायव्हरचं नाव) सर्चची गाडी घेऊन तयार होता. जेवण करून रात्री बारापर्यंत आम्ही नागपूर सोडलं. गार वारा अंगाला झोंबत होता. अगदी हाडं गोठवणारी नसली, तरी दातखीळ बसवणारी थंडी होती. दोन्ही बाजूला घनदाट जंगल होतं. रात्रीची शांतता किती भयाण असू शकते, याची जाणीव होत होती. रस्त्यावर समोरून येणारं व जाणारं एकही वाहन नव्हतं.

मनात विचारांचा गुंता वाढत चालला होता. नक्षलवाद्यांसंदर्भातल्या बातम्या आठवत होत्या. ‘आपल्या गाडीखाली कधी सुरुंगाचा स्फोट होईल आणि ठिकऱ्या उडतील’, अशी भीती माझ्या हृदयाचे ठोके वाढवत होती. उमरेडच्या पुढे गुरुबंधू चहा घेण्यासाठी खाली उतरला, तेव्हा तर माझी भीतीनं गाळण उडाली. कदाचित या निसर्गात त्या वेळी जास्तीत जास्त भेदरलेला जीव म्हणजे मी होतो. आता माझ्यासमोरच्या अंजली मॅडम व उज्ज्वला मॅडम यांचीही कुजबूज सुरू झाली होती.

एकदाचा तो प्रवास संपला आणि आम्ही आमच्या इच्छित स्थळी म्हणजेच शोधग्राममध्ये दाखल झालो. कडाक्याच्या थंडीनं व रातकिड्यांच्या आवाजानं आमचं स्वागत केलं. रात्रीच्या भयानक अंधारातून आम्हाला नेमून दिलेल्या रूममध्ये आम्ही विश्रांतीसाठी गेलो. आता रात्रीचे अडीच वाजले होते. ‘सकाळी ठीक साडेआठ वाजता सर्जरी सुरू होतील’, असा निरोप होता. आता मात्र झोपण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. शरीरही थकलं होतं. मन मात्र नवनवीन अनुभवासाठी तयारी करत होतं.

पहाटेचे साधारण साडेपाच वाजले असावेत. दारावरती धाप आली व मागून माझ्या नावाने हाक, “सुजीत, उठलास का? उठ पटकन. चल, निघू या!” दार उघडलं तर समोर होते संदीप सर. आधी ठरवल्याप्रमाणं आम्ही दोघं जंगलवॉकसाठी बाहेर पडणार होतो. मोबाईल हातात घेतला, पण रेंज नसल्यानं पुन्हा चार्जिंगला लावून मी रूम सोडली. शेजारी चाळीसगावचा भैय्या पाटील व पुण्याचा जयदीप गाढ झोपले होते.

संदीप सर म्हणजे एक अवलिया! जेवढ्या निष्णातपणे ते सर्जरी करतात, त्यापेक्षाही जास्त ते फोटोग्राफीमध्ये रमतात. त्यांची दोन पुस्तकं मी वाचलेली होती. कास पठारावरच्या पुष्पसृष्टीवर त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. त्यांचं निसर्गप्रेम अफलातून आहे. पक्षीप्रेमासाठी त्यांनी अगदी अमेरिकाही पालथी घातली आहे. अशा या वल्लीबरोबर मी निघालो होतो. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आमचं स्वागत करत होते. सुमारे २ किलोमीटर चालल्यानंतर एक मोठ्ठ तळं लागलं. आता जरा दिवस उगवला होता. दिशा दिसायला लागल्या होत्या. आम्ही परतीच्या दिशेनं निघालो.

सुमारे साडेआठला सगळे जण नाश्ता करून तयार होते. आम्हीही आवरून तयार होतो. तेवढ्याच पांढरीशुभ्र खादीची साडी घालून आम्मा म्हणजे डॉ. राणी बंग आमची चौकशी करण्यासाठी आल्या. अत्यंत आपुलकीनं त्यांनी आमची ओळख करून घेतली. गेल्या तीन वर्षांपासून मी त्यांच्याबद्दल वाचत होतो आणि त्यांच्या रणरागिणी भूमिकेचा माझ्यावर प्रभाव होता.

वेळ न दवडता आम्ही मंदिराकडे निघालो. माँ दंतेश्वरीची पूजा करून आमचा सर्जरी कॅम्प सुरू झाला. अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी तीन ऑपरेशन थिएटर्स सज्ज होती. सर्व प्रकारची औषधं मुबलक प्रमाणात होती. भूल देण्यासाठीचं बॉईल मशीन व मॉनिटर्स अत्यंत आधुनिक होते. सर्व स्टाफ अत्यंत नम्र होता. टीमचे लीडर डॉ. मिलिंद आम्हाला सूचना देत होते, तशीच आमची काळजीही घेत होते. अरुणा, वर्षाली, जयवंत, डॉ.वाघ, आम्ही आपापली पोजिशन घेतली.

मिलिंद सर, संदिप सर, पेंढारकर सर, प्रमोद, पवार सर, गजभोई सर, उज्वला व अंजली मॅडम आपला अभ्यास, अनुभव व कौशल्याचा पुरेपूर वापर करत होते. सुमारे १३० रुग्णांना व्याधीमुक्त करण्याचा प्रतत्न आम्ही पुढील काही तास - काही दिवस करणार होतो. स्टाफ अतिशय वेगानं हालचाल करत होता. राणी बंग स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचं नियोजन करत होत्या. त्या स्वतः स्त्रीआरोग्य तज्ज्ञ आहेत. कामाचा थकवा आल्यावर डॉ. वैभव गप्पा मारून आमचा ताण हलका करत होता.

डॉ. योगेश व डॉ. मृणाल ही जोडी अत्यंत काळजीपूर्वक रुण हाताळत होते. योगेश न्यूरो फिजिशियन व मृणाल पॅथॉलॉजिस्ट आहेत. लौकिक जगात लक्षावधी रुपये दरमहा कमवण्याची संधी असूनही त्यांनी स्वतःला आदिवासींच्या कामात झोकून दिलं आहे. अचानक दुपारी चार वाजता कुजबूज झाली. भारताचे सुपर संगणकाचे निर्माते आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. विजय भाटकर साक्षात माझ्या पुढे होते. "हॅलो, डॉक्टर हाऊ आर यू?" असं म्हणतं त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला. प्रत्येक सर्जन आणि भूलतज्ज्ञाशी संवाद साधून, रुग्णांशी हात मिळवणी करून भटकर आपल्या पुढील कामासाठी निघून गेले.

सकाळपासून डॉ. राणी बंग, डॉ.अभय बंग आणि डॉ. विजय भाटकर यांच्याशी मी बोललो होतो. बसून गप्पा मारल्या होत्या, एकत्र चहा घेतला होता. मी स्वतःला भाग्यवान समजत होतो.

संध्याकाळी बहुतेक तीन तास आधीच माझी सहकारी भूलतज्ज्ञ डॉ. अरुणा हिने माझी जबाबदारी स्वीकारली आणि मला सर्च टीमच्या फेरीसाठी मोकळं केलं. हळूहळू आमच्या ऑपरेशन्स थिएटरमधील प्रत्येकानं आपापल्या नव्या सहकारी मित्रांची जबाबदारी घेतली. त्यामुळे आम्ही पाच-सहा जण सर्चच्या अवलोकनासाठी बाहेर पडलो.

सतत येणारे व्हिजीटर्स व पत्रकार यांच्याशी संवाद साधून डॉ. अभय बंग नुकतेच फ्री होत होते. त्यांच्यावर एक रशियन पत्रकार मुलगी व तिचा सहकारी यांचं गेल्या दोन दिवसांपासून लघुपट बनवण्याचं काम चालू होतं. ते संपल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. सुमारे ३०-४० किलोमीटरवील परसवाडी या आदिवासी पाड्यात आम्ही निघालो होतो. बॉम्बस्फोट, पोलिसांवरील हल्ले य मुळे सतत चर्चेत असणाऱ्या धानोरा तालुक्यातील हे एक दोन-चारशे लोकवस्तीचं गाव. पण आता कसलीच भीती वाटत नव्हती. नक्षलवादी हे सर्वसामान्य लोकांसारखेच व अत्यंत प्रेमळ असतात. फक्त काही मागण्यांसाठी व शासकीय तसेच प्रशासकिय मतभिन्नतेमुळे त्यांच्या रागाचा उद्रेक होतो, मग होणारी हानी मात्र दीर्घकाळ परिणाम करणारी असते. नक्षलवाद्यांनी साठ ट्रक एका रांगेत उभे करून पेटवल्याची घटना होऊन एक आठवडाही उलटला नव्हता. जागोजागी स्पेशल कमांडो कॉम्बिंग ऑपरेशन करताना दिसत होते. पण संवेदनशील विषय असल्यामुळे मी त्याचे फोटो घेतले नाहीत.

अतिशय समृद्ध असा हा भाग आहे. निसर्गानं आपलं सौंदर्य आणि संपन्नता, खनिजं, जंगलातील संपत्ती इ. गोष्टी भरभरून रित्या केल्या आहेत. दोन्ही बाजूला सुमारे दोनशे गायींचे कळप मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहात होतो. भादद्वाज, खंड्यापक्षी, बगळे व इतर बहुतेक देशी पक्षी मनमुराद बागडत होते. सुमारे वीस मिनिटानंतर आम्ही परसवाडीला पोहचलो. आदिवासी नृत्यानं आमचं स्वागत झालं आणि मिरवणूक निघाली. पिवळे टी शर्ट घातलेले युवक आणि साड्या परिधान केलेल्या महिला ढोल वाजवत होते. वातावरणात एकदम चैतन्य संचारलं होतं. मलाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. आदिवासी बांधवांबरोबर नृत्याचा ठेका धरत मी त्यांच्याशी काही काळ एकरूप झालो.

सर्चकडून आदिवासी युवक संघटन होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. त्यापैकी क्रीडा स्पर्धा हा महत्त्वाचा भाग असतो. या ठिकाणी ९४ संघ सहभागी झाले होते. सर्व संघांची जेवणाची व राहण्याची सोय हे गावकरी आपापल्या घरांतच करतात हे ऐकून मी थक्क झालो होतो. खरंच या निसर्गपुत्रांचं मनही खूप विशाल आहे. डॉ. बंग यांच्या हस्ते क्रीडास्पर्धेचं झालेलं उद्घाटन डोळ्याचं पारणं फेडणारं होतं. त्यांचं भाषण सहज, सुंदर होतं. “जिंकणाऱ्या संघानं अगदी सहजपणं आपला करंडक हरणाऱ्या संघाला देऊन टाकावा, कारण ते तर जिंकलेलेच असतात,” हे वाक्य मनाच्या गाभाऱ्यात घर करून राहिलं.

या ठिकाणी व्यसनाधिनता, कोबड्यांची झुंज, पत्ते, मिश्री व दारूचे दुष्परिणाम यांच्यावर भाष्य करणारे स्टॉल्स होते आणि आम्हाला हे बदलायचंय हे ठरवणारी मानसिकता होती. हा सर्व बदल बंग दाम्पत्य यांनी फक्त काही वर्षांत केला आहे. परसवाडीत कमालीची स्वच्छता होती. तेथील रावणाच्या मंदिरात जाऊन त्याचं दर्शन घेतलं. स्थानिक सरपंचाच्या घरचा पाहुणचार घेऊन आम्ही परत शोधग्रामला पोहचलो. रात्री संदिप सरांनी याच परिसरात काढलेल्या पक्ष्यांची छायाचित्रं सर्चला देण्यात आली. पुन्हा एकदा रात्रीची गप्पांची मैफल जमली. दुसऱ्या दिवसाच्या केसेस वर चर्चा झाली आणि सुमारे दोन वाजता मी निद्रादेवीला शरण गेलो.

रात्र जरा पटकन संपल्यासारखी वाटली. परत पहाटेची उस्तुकता होतीच. रात्री झोपताना चाळीसगावचा भैय्या देवरे पाटील खूप अनुभव सांगत होता. त्याच्या स्त्रीरोग्य तज्ज्ञ काकू डॉ. उज्वला यांना घेऊन तो स्वयंसेवक म्हणून आला होता. तो अनुभव अतिशय सपन्न वाटला. आजच्या समाजजीवनावरचं त्याचं भाष्य अगदीच कळकळीचं होतं. डॉक्टरी पेशाचं व्यवसायात झालेलं रूपांतर व समाजाची बघण्याची दृष्टी याविषयी तो भरभरून बोलत होता. अजूनही डॉक्टरांना देवदूत समजणारी मंडळी आहेत, हे ऐकून जरा बरं वाटत होतं. दुसरा मित्र, डॉ.जयदिप हाही भूलतज्ज्ञ, माझ्यापेक्षा सहा पावसाळे जास्त पाहिलेला. पण अगदी पहिल्याच भेटीत आम्ही ‘अरे – तुरे’ करू लागलो.

सकाळी पुन्हा जंगलातील फेरफटका संपला आणि नाश्ता करण्यासाठी आम्ही एकत्र आलो. योगायोगानं डॉ. राणी बंगही आमच्यासोबत नाश्ता करण्यासाठी आल्या. वाफाळलेले, गरमगरम पोहे, भिजवलेले हरभरे आणि जोडीला चिक्कू. मस्त ताव मारला. असा नाश्ता मी तर कधीच केला नव्हता. कँटिनमध्ये मोठं बेसिन होतं. आपापलं जेवण किंवा नाश्ता झाला की, आपणच स्वतः आपलं टेबल साफ करायचं, ओला कचरा एका बादलीत जमा करायचा आणि आपणच आपलं ताट स्वच्छ घासून पुसून फडताळात ठेवायचं. आयुष्याच्या अंति समजणारा हा कर्मबोध सिद्धान्त मला नाश्ता करताना समजला.

दिवस सुरू झाला.

सर्जरी सुरू झाल्या.

सहा टेबल.

महाराष्ट्रातून आलेले सहा निष्णात सर्जन.

त्यांचे सहकारी.

सर्च हॉस्पिटलच्या सिस्टर नंदा व प्रभाकर. गेल्या पंचवीस वर्षांपासून हे दोघेही इथंच काम करतात हे ऐकून त्यांचं कौतुक वाटलं. शेजारील रेस्टरूममध्ये दोन केसेसच्या मध्ये आम्ही गप्पाटप्पा, चहापाणी व खाद्य पदार्थांवर यथेच्छ ताव मारत होतो.

भरपूर काम संपल होतं. अगदी काहीच केसेस बाकी होत्या, पण आम्ही सर्वजण फ्रेश असल्यामुळे सर्व काम संपवून टाकलं. सर्वांशी आता चांगली दोस्ती झाली होती. त्यामुळे वयाची बंधनं व डिग्रींची आपापसातील रेषा पुसून गेली होती.

संध्याकाळी परत फेरफटका.

परत शिवारफेरी.

काही जण परत पसरवाडीला जाऊन आले.

परत एकत्र जेवणं झाली.

परत स्वतःच ताटं स्वतः धुतलं गेलं.

परत परत अंगावरची झूल आपोआप उतरत होती.

‘स्व’त्व गळून जात होतं.

माणसाच्या गरजा किती थोड्या असतात आणि त्या सहज पूर्णही होतात, हा जीवनपाठ शिकायला मिळाला. रात्र झाली. स्वप्नांना परतवून लावत मला वास्तवातच जगायचं होतं.

उद्या आमचा शेवटचा दिवस असणार होता. पण या यज्ञकर्माचा भाग कायमस्वरूपी असण्याचं मी ठरवलं होतं. पुढच्या वर्षी पत्नी-मुलीसह या सेवेसाठी येण्याचं ठरवून शांतपणे झोपलो.

आज आमचा सर्चसाठी असलेला शेवटचा दिवस. सर्व सर्जरीज आम्ही कालच संपवल्या होत्या. आज मुद्दामहून आळसात उठायचं ठरवल. मन जरा उदास होतं. गेल्या ४८ तासात इथल्या वातावरणाची एक नशा आली होती. सर्वांनी आपापल्या बँग्ज पॅक केल्या. आज आम्ही शोधग्रामचीच शिवार फेरी करणार होतो. आम्हाला भेटण्यासाठी डॉ. राणी बंग स्वतः आल्या होत्या. “आदिवासी शहरी भागात हवरून गेल्यासारखं वाटतात. त्यांना गर्दीची सवय नसते. ते कधीही रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत नाहीत. त्यांना व्याधीमुक्त होण्याच्या या काळात आपापल्या घरच्यांची सोबत हवी असते. आणि हे सर्व असेल तरच ते उपचार घेतात,” डॉ.राणी बंग सांगत होत्या. त्यांच्या गरजा लक्षात घेऊनच बंग दाम्पत्यानं या रुग्णालयाची उभारणी केली होती. सर्वत्र छोट्या छोट्या झोपडीच्या आकाराचे वॉर्डस, तशीच ओपीडी... या सगळ्या गोष्टीमुळे आदिवासी रुग्णालयात दाखल होण्यास तयार होतात आणि मग व्याधीमुक्त होण्याचा कालावधीही कमी होतो.

मी जरा बारकाईनं पाहू लागलो. सर्वत्र छोट्या छोट्या चुली या बांधवांनी बांधल्या होत्या. काकडणाऱ्या थंडीत याच चुलीभोवती पेशंटसहीत नातेवाईकही गोल रिंगण करत शेकत बसले होते. पातेल्यातल्या चहाला आधण आल्याचा वास वातावरणात वेगळीच नशा निर्माण करत होता. प्रत्येक झोपडी (= wards) बाहेर हेच चित्र होतं. एकंदरीत काय तर शोधग्रामचं रूपांतर सर्जिकल विलेजमध्ये झालं होतं.

आम्ही प.पु. ठाकुरदास बंग याच्या समाधीला डोकं टेकवून पुढे निघालो. समाधीवरील चरखा मात्र मला अतिशय संयत आणि गंभीर वाटला. कदाचित याला आता माणसांची भीती वाटू लागली असेल.फर्लांगभर अंतरावर एक भुताची विहीर होती. अनेक वर्षांपूर्वी आदिवासींनी दोन कोवळ्या मुलींचा नरबळी याच विहिरीजवळ दिला होता, असे डॉ. राणी बंग यांनी सांगताच काळजात धस्स झालं. या विहिरीजवळ कित्येक वर्ष कुणी फिरकतही नव्हतं. पण आता हीच विहीर शोधग्रामची पाण्याची गरज भागवत आहे.

पुढे आग्नेय दिशेला डॉ. अभय बंग यांची अभ्यासिका लागली. समोर मोठं तळं आणि शांत निसर्ग. याच अभ्यासिकेत बसून त्यांनी अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. तळमजल्यावर सरांची छोटी खोली आहे. तिथे सतार आहे. सरांच्या आवडत्या विरंगुळ्यापैकी हा एक विरंगुळा.

शेवटी निरोपाचा कार्यक्रम झाला.

सर्च टीमकडुन आमच्याबद्दल ऋण व्यक्त केलं गेलं. आम्हीही आमची मनोगतं मांडली. शेवटी डॉ. राणी बंग यांच्या हस्ते सगळ्यांचा सत्कार केला गेला. आम्हा प्रत्येकाला सन्मानपत्र व खादीचा शर्ट भेट म्हणून दिला गेला. अतिशय भावूक क्षण होता तो.

'देणाऱ्यानं देत जावं

घेणाऱ्यानं घेत जावं

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावेत’

एका कवितेतल्या या चार ओळी मनपटलावर चमकून गेल्या!

लेखक बारामतीमध्ये भूलतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात.

editor@aksharnama.com

Post Comment

manoj dholane

Mon , 30 January 2017

fusad samaj sudharak .....tisrya jagach hech praktan aaahe.....farmhouse mast aaahe chatgoan cha....sarkarchich sheti ...baherch funding varun samjsudharkacncha purskar...kay jindagani aaahe rao!!!!1jabrdast buvabaji aahe......gadchiroli chi par darbandi karun takali ya lokani..ekhi gadchiroli kar daru pit nahi.....saglyachich daru sutali.....aata ek kara yana bharatratn deun taka.....vare foknad india.....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......