‘टिपंवणी’ : सामाजिक इतिहासाचा आणि धार्मिक, सांस्कृतिक स्थित्यंतराचा ऐवज
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
कामिल पारखे
  • ‘टिपंवणी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 22 October 2020
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो टिपंवणी Tipanvani सिसिलिया कार्व्हालो Cecilia Carvalho

पालघर जिल्ह्यातील वसई हे माझे एक आवडते सुट्टीचे ठिकाण. वर्षांतून किमान दोन-तीन दिवस माझा तेथे मुक्काम असतोच. याचे एक कारण म्हणजे माझ्याशी अत्यंत जवळचे, स्नेहाचे संबंध असलेली कुटुंबे तेथे आहेत. आणि दुसरे कारण म्हणजे वसईचे गोव्याशी अनेक बाबतीत असलेले साम्य. या दोन्ही किनारपट्टीवरील प्रदेशांमध्ये एकेकाळी पोर्तुगीजांच्या वसाहती होत्या. वसईतली नारळांची झाडे, अनेक गावांत अजूनही राहिलेली हिरवाई, फळझाडे आणि फुलझाडांमध्ये असलेली टुमदार घरे, अरुंद रस्त्यांच्या चौकाचौकांत असलेले क्रूस आणि या क्रुसांसमोर दररोज संध्याकाळी तेवणाऱ्या मेणबत्त्या, बाजारांत आणि रस्त्यांवर विक्रीला असलेली मासळी, यामुळे आपण क्षणभर गोव्यातच आहोत, असे मला अनेकदा वाटते.

गोव्याचे आणि वसईचे ख्रिस्ती लोक यांच्या संस्कृतीतही खूप साम्य आहे. सिसिलिया कार्व्हालो यांचे ‘टिपंवणी’ हे आत्मचरित्र वाचताना वसईच्या या आगळ्यावेगळ्या समाजजीवनात खोलवर डोकावण्याचा अनुभव आला.

कार्व्हालो या मराठी साहित्यक्षेत्रात एक कवयित्री आणि विविध विषयांवर संशोधनपूर्ण लिखाण करणाऱ्या प्रतिभावान साहित्यिक म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रभर होणाऱ्या अनेक सभासंमेलनांत\कार्यक्रमांत हजेरी लावत असल्याने आणि अनेक चळवळींत सहभाग असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांना परिचित आहे. ख्रिस्ती समाजाच्या मर्यादित वर्तुळाबाहेर मराठी सारस्वतात ज्यांना साहित्यिक तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून मान्यता आहे, अशा मोजक्या व्यक्तींमध्ये फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिसिलिया कार्व्हालो, अनुपमा उजगरे आणि गझलकार रमण रणदिवे यांचा समावेश होतो.

मात्र देशात आणि राज्यातही अल्पसंख्य असलेल्या ख्रिस्ती समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाबद्दल बहुसंख्य समाजाला माहिती नसते. मराठी साहित्याच्या सुरुवातीच्या इतिहासापासून ख्रिस्ती व्यक्तींनी अत्यंत मोलाचे साहित्यिक योगदान दिलेले असतानाही अशी परिस्थिती आहे. सतराव्या शतकातील ‘ख्रिस्तपुराण’कार फादर थॉमस स्टीफन्स, मराठी मुद्रणकलेचा पाया घालणारे रेव्ह. विल्यम कॅरी, मराठीतील आद्य कादंबरीकार बाबा पद्मनजी, ‘स्मृतिचित्रे’ लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक, मराठी पंचकवींपैकी एक असलेले रेव्ह. नारायण वामन टिळक, मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांतून बायबल मराठीत आणणाऱ्या पंडिता रमाबाई अशी खूप मोठी यादी देता येईल. मात्र यापैकी कुणाच्याही साहित्यातून खास मराठी ख्रिस्ती समाजजीवनाचे व भावनांचे प्रतिबिंब उमटते, असे म्हणता येणार नाही.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

कार्व्हालो या वसईतील ख्रिस्ती कुटुंबात वाढल्या. ख्रिस्ती धर्माच्या संस्कारांत त्यांची जडणघडण झाली. ख्रिस्ती मंदिरांतील अनेक चालीरीतींत आणि सांक्रामेंतांत सहभाग घेत असतानाच यापैकी काही कालबाह्य रूढी-परंपरांशी त्यांनी फारकत घेतली. शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या कार्व्हालो काही वर्षांपूर्वी वसईतील सेंट गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या प्राचार्या म्हणून निवृत्त झाल्या. लहानपणापासून अलीकडच्या काळापर्यंत कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक आणि भावनिक विश्वांतील अनेक प्रसंगांना कार्व्हालो यांनी आपल्या आत्मचरित्रात शब्दबद्ध केले आहे. ख्रिस्ती समाजजीवनाविषयी, चालीरीतींविषयी आणि श्रद्धांविषयी पूर्णतः अनभिज्ञ असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुसंख्य समाजाला आणि मराठी वाचकांना हे ३३२ पानांचे पुस्तक एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.

कार्व्हालो यांनी समाजजीवनातील बदलांबरोबरच चर्चमधील बदलांचीही या पुस्तकात नोंद घेतली आहे. १९७०च्या दशकापर्यंत जगभर चर्चमध्ये लॅटिन भाषेत मिस्साविधी आणि प्रार्थना व्हायच्या. १९६०च्या दशकात भरलेल्या दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेने सुधारणा अंमलात आल्याने सगळीकडे स्थानिक भाषांत धार्मिक विधी होऊ लागले. लेखिकेने लिहिले आहे – “आम्ही चर्चमध्ये जात असू, तेव्हा लॅटिन भाषेतून धार्मिक विधी चालत. धर्मगुरू त्यांची भरजरी वस्त्रे घालून वेदीकडे तोंड व लोकांकडे पाठ करून मिस्साबलिदान साजरे करत. ते वेदीवरील देवाशी पुटपुटत, लॅटिनमध्ये ते काय बोलतात तेच कळत नसे. पण त्या भाषेतला गोडवा आणि संगीत आपले लक्ष विचलित होऊ देत नसे. ‘सांतुम... सांतुम... सांतुम...’ असे शब्द उच्चारताच सारे वातावरण ‘पवित्र’ होऊन जात असे.”

वरील वर्णन केवळ वसईतील चर्चलाच नाही, तर १९७०च्या आधीच्या जगभरातील सर्वच चर्चमधील भाविकांसाठी लागू होईल.       

मात्र लॅटिन भाषा समजत नसली तरी भक्ताचा भाव महत्त्वाचा, तो कोणती प्रार्थना म्हणतो ते महत्त्वाचे नाही, हे लेखिकेने ‘टोपल्यावर टोपली, शंभर टोपली’ अशी प्रार्थना म्हणणाऱ्या एका साध्या बाईचे उदाहरण देऊन सांगितले आहे. आश्चर्य म्हणजे परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली आणि तिला हवे ते मिळाले, असे सांगून कार्व्हालो लिहितात – “तात्पर्य, असे की, कोणी अडाणी असो की, पंडित पण मनापासून केलेली प्रार्थना महत्त्वाची. मनातला भाव महत्त्वाचा. भाषा महत्त्वाची नाही.”      

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

................................................................................................................................................................. 

वसईच्या आपल्या ख्रिस्ती घरातील धार्मिक वातावरण, नियमितपणे कम्युनियन आणि कुमसार (प्रायश्चित किंवा कन्फेशन) घेण्याबद्दल मनावर झालेले संस्कार याबद्दल लेखिकेने लिहिले आहे. नियमितपणे चर्चला जाणारे मुले-मुली नंतर ‘फादर’ (धर्मगुरू) आणि ‘सिस्टर’ (धर्मभगिनी किंवा नन) होऊ शकतात, अशी भावना त्या काळात केवळ वसईतच नव्हे, तर जगभरातील सर्वच धार्मिक ख्रिस्ती समाजात असायची. धार्मिक कुटुंबातील पालक आपले एकतरी मूल फादर किंवा सिस्टर व्हावे अशी इच्छा बाळगत असत. कार्व्हालो यांनी आपणही एकेकाळी नन होण्याचा विचार केला होता, असे लिहिले आहे. मात्र नंतर त्यांनी आपला विचार बदलला आणि शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द निवडली. ‘सुवार्ता’ मासिकाचे त्यावेळचे संपादक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी याबाबत दिलेल्या एका सल्ल्याने आपले मतपरिवर्तन झाले असे कार्व्हालो यांनी लिहिले आहे. “नन झालीस तर दिवसभराच्या नेमून दिलेल्या कामाच्या व्यापात तू तुझी लेखनातली निर्मितीशीलता गमावून बसशील,” असे फादर दिब्रिटोंनी त्यांना सांगितले होते.

लहानपणी चर्चमधील मिस्सेला दररोज जाणे, नंतर दर रविवारी आणि सणासुदीला जाणे वगैरे धार्मिक प्रथा पाळण्यापासून आपल्या आणि वसईतील इतरांच्याही सामाजिक व धार्मिक जीवनांत झालेले बदल कार्व्हालो यांनी टिपले आहेत. 

एके ठिकाणी त्यांनी लिहिले आहे - ‘‘दारासमोरच्या कुडीत दोन डुकरे होती. घरातलं उरलंसुरलं किंवा भाताची पेज यात कुंडा कालवून आय डुकरांना घालीत असे. घराघरात डुक्करपालनाचा जोडधंदा होता. ज्यांच्या घरी डुकरं नसत ते त्यांच्या घरातली भाताची पेज शेजाऱ्यांना देत वा कधी शेजाऱ्यांकडून मागितली जात असे. काही बाया तर दारोदार पेज मागत फिरत असत. सणावाराला, लग्न व इतर सोहळ्यांसाठी डुकर मारणे हे प्रतिष्ठेचे समजले जाई.”

हे वाचल्यावर गोव्यात आमच्या हॉस्टेलमध्ये दिवसातून दोनदा भाजीपाल्याचा टाकून दिलेला भाग आणि खाद्यपदार्थांचा उरलेला भाग मोठ्या डब्यातून नेणारा आमचा शेजारी ख्रिसमसला व ईस्टर सणाला आमच्यासाठी खास वेगळे डुक्कर आम्हाला आधी दाखवून राखून ठेवत असे आणि या डुकरांच्या मांसापासून बनवलेले विंदालू आणि सोरपोतेल आणून देत असे, हे आठवले.       

“सणावाराच्या दिवशी बहुतेक घरात डुक्कर, कोंबडीचे मटण शिजत असे. इंदियाला, सरपोतेल, टेपरात असे विनीगर घालून तयार केलेल्या डुकराच्या मटणाच्या पदार्थांच्या वासावर सारा गाव झुलत असे,” हे कार्व्हालो यांनी केलेले वर्णन वाचले आणि गोव्यात सणावारानिमित्त अत्यंत लोकप्रिय असलेल्या खास पोर्तुगीज वळणाच्या भरपूर तेल आणि मसाले घालून रटरट शिजवलेल्या विंदालू, सोरपोतेल आणि भरपूर नारळ घालून केलेल्या चिकन आणि बिफ शाकुतीची आठवण आली. वसईतील ख्रिस्ती समाज हा मराठी समाजाचाच एक भाग असला तरी ही खाद्यसंस्कृती तशी मराठी समाजाला पूर्णपणे अनोळखी आहे.

कार्व्हालो २०००मध्ये नाशिक येथे भरलेल्या अठराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांदरम्यान झालेल्या अनेक वादांबाबत कार्व्हालो यांनी परखड भूमिका घेतली. त्याबाबत त्या म्हणतात – “एकमेकांच्या विषयीचा आकस आणि मनाचा कोतेपणा व संकुचितपणा सोडून देण्याचीही आवश्यकता असते. त्यासाठी पुढे येऊन स्पष्ट आणि सत्य बोलण्याचीही गरज असते. ते काम अनेकदा मला करावे लागले आणि ख्रिस्तविचाराच्या पावलावर पाऊल टाकून आपण चाललो आहोत, याची जाणीव तीव्र होत गेली. तीही कोणा ‘गॉडफादर’विना!”

कार्व्हालो हे नाव असलेली ख्रिस्ती महिला मराठी कशी बोलते, मराठीत कविता आणि इतर लिखाण कशी करते, याचे महाराष्ट्रातील अनेकांना कायम आश्चर्य आणि अप्रूप वाटत आले आहे. त्याविषयी कार्व्हालो लिहितात – “आम्हा वसईतील कॅथॉलिकांची नावं पोर्तुगीज होती. त्यामुळे आम्हाला मराठी बोलता येत नाही असे लोकांना वाटे. कुठेही गेलं तरी इंग्रजीत बोलायला सुरुवात करत आणि आम्हाला तर इंग्रजीही धड येत नसे.”

एकदा कार्व्हालो नाशिकला काव्यवाचनाला गेल्या होत्या, तेव्हा एक बाई आपल्या शाळकरी मुलीला घेऊन त्यांना भेटायला आल्या. ‘ख्रिस्ती लोकांना मराठी येते का?’ असा प्रश्न त्यांनी केला. तेव्हा कार्व्हालो म्हणाल्या- ‘‘धर्म आणि भाषा यांचा संबंध काय? कोणत्याही धर्माच्या कोणीही, कोणतीही भाषा, बोलायला- शिकायला कसलेही बंधन नाही.’’ हे ऐकताच ती शाळकरी मुलगी एकदम गांगरली. ती मुलगी आणि तिची आई एकदम ‘मॉडर्न’ वाटत होत्या आणि मी साडी नेसलेली, कपाळावर कुंकू लावलेली, केसाचा अंबाडा घातलेली अशी ‘काकूबाई’ दिसत होते.”

वसई येथील आपल्या वाडवळी बोलीभाषेतील अनेक शब्दांचा, संज्ञांचा आणि वाक्प्रचारांचा कार्व्हालो यांनी या आत्मचरित्रात भरपूर वापर केला आहे. ‘टिपंवणी’ या शीर्षकाविषयी त्या लिहितात – “ ‘टिपं’ म्हणजे थेंब आणि ‘वणी’ म्हणजे ‘पाणी’. ‘टिपंवणी’ म्हणजे थेंब थेंब पाणी. तसेच ‘टिपं’ म्हणजे अश्रूंचे थेंब. थेंबाथेंबाने अश्रू ढाळणे म्हणजे  ‘टिपं’ गाळणे. प्रतिभाशक्तीने जे देणं-लेणं दिलं, त्याचं विविध प्रकारचं साहित्य झालं आणि हृदयात जे साचलं होतं, साचत राहिलं, किंबहुना पाण्यासारखं वळत राहिलं ते ‘टिपंवणी’त मांडावंसं वाटलं. या साऱ्या आठवणी डोळ्यात पाणी आणणाऱ्या आणि पाणीदार अशाही!”   

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

जगभरातील ख्रिस्ती समाज एकजिनसी आहे, असा काहींचा गैरसमज असतो, मात्र त्यात तथ्य नाही. ख्रिस्ती समाजात कितीतरी पंथ आहेत, त्यापैकी मी स्वतः केवळ दहा-बारा नावेच सांगू शकेल. भारतात तर सर्वच राज्यांमध्ये जातिव्यवस्थेने ख्रिस्ती समाजाचीही अनेक शकले केली आहेत. वसईतील ख्रिस्ती समाज त्याला कसा अपवाद असू शकेल? कॉलेजच्या प्राचार्यपदावरचा आपला हक्क एकदा डावलला गेला होता, याचे कारण म्हणजे ‘सामवेदी ख्रिस्ती आणि वाडवळ ख्रिस्ती हा भेद आडवा आला’ असे त्यांनी लिहिले आहे.   

ख्रिस्ती साहित्यिकांनी केवळ ख्रिस्ती विषयच हाताळावे की, इतर विषयांत सखोल अभ्यास करावा, याविषयी कार्व्हालो यांनी केलेली एक मार्मिक टिपणी मला आवडली. त्या लिहितात – “काही विषय दुर्लक्षित राहतात म्हणून ख्रिस्ती संशोधकांनी ख्रिस्ती समाजातील लेखकांकडे आणि त्यांच्या साहित्याकडे वळावे हे खरे आहे. परंतु फादर डलरी, फादर मॅथ्यू लेदर्ले, फादर कामिल बुल्के यांच्यासारखे अनेक धर्मगुरू जसे हिंदू दैवतांचा अभ्यास करण्याकडे वळले, तसा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन बळावयाला हवा. अनेक मराठी संशोधकांनी अत्यंत तर्कशुद्धपणे ख्रिस्ती धर्मीय मराठी लेखकांच्या साहित्यावर संशोधनात्मक मांडणी केली आहे.”

‘टिपंवणी’ लिहून कार्व्हालो यांनी ख्रिस्ती धर्मातील एक वेगळी बोलीभाषा आणि भिन्न चालीरीती असणाऱ्या एका छोट्याशा समूहाची ओळख करून दिली आहे. हे आत्मचरित्र सामाजिक इतिहासाचा आणि धार्मिक, सांस्कृतिक स्थित्यंतराचा ऐवज आहे.    

‘टिपंवणी’ - डॉ. सिसिलिया कार्व्हालो

ग्रंथाली, मुंबई

पाने - ३३२, मूल्य - ४०० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 28 October 2020

नमस्कार कामिल पारखे!

सिसिलिया कार्व्हालो या नावाने लोकसत्तेत लेख यायचे ते मला आठवतं. त्या सदराच्या लेखिकेने ( की लेखकाने? ) टोपणनाव घेतलंय, असा माझा समज झाला होता. कारण की ठाण्याला गडकरी रंगायतनच्या समोर समर्थ शाळेच्या जवळ सिसिलिया नावाचा बार सुरु झाला होता. अर्थात, सगळे नियम धाब्यावर बसवून! त्यामुळे सिसिलिया कार्व्हालो हे एका फटाकड्या तरुणीचं नाव वाटायचं. पण आज तुमच्या लेखामुळे अनपेक्षित माहिती मिळाली. त्याबद्दल धन्यवाद.

वसईच्या ख्रिस्ती पब्लिकशी इंग्रजीतनं संवाद साधणं हा एक भयाण विनोद आहे. बरीचशी मराठी हिंदू लोकं ख्रिस्ती आणि अँग्लो इंडियन यांच्यात गल्लत करतात. युरोपीय धाटणीची नावं दिसली की त्यांना अँग्लो इंडियन समजून इंग्रजीत व्यवहार साधायला जातात. ख्रिस्ती हा येशूचा भक्त असतो. तो शुद्ध मराठी नाव-आडनावाचा असू शकतो. अशी चंदू बोरडे, विजय हजारे, निरंजन उजगरे, इत्यादि नावं चटकन आठवली. याउलट अँग्लो इंडियन माणसाचे किमान एक पूर्वज इंग्लिश व किमान एक पूर्वज भारतीय असतो. बरेचसे अँग्लो इंडियन ख्रिस्ती आहेत. काही हिंदूही आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली ही अँग्लो इंडियन हिंदू आहे.

सिसिलिया ताईंनी ज्या तडफेने आपलं मराठीपण टिकवून ठेवलंय त्यास तोड नाही. खरंतर याबाबत सगळ्याच मराठी ख्रिस्ती वसईकरांचं कौतुक आहे. सिसिलिया ताईंची मराठीतून व्यक्त व्हायची मनीषा पाहून संतोष वाटला. भाषा टिकते ती अशा प्रेमातून.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......